आ॓बा- औषधी वनस्पती

Submitted by अर्चना दातार on 8 June, 2011 - 05:19

आंबा
प्रत्येक ऋतुमध्ये त्या त्या हवामानानुसार आरोग्यसंवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक असणारी फळे आणि वनस्पती निर्माण करून निसर्गाने माणसावर अनंत उपकार केले आहेत.
चैत्र्य आणि वैशाख म्हणजे उन्हाळ्याचे महिने. वैशाखातील उन्हालाा तर वैशाख वणवा म्हणतात. अश्यावेळी येणारे फळ म्हणजे आंबा. आंब्याच्या विशिष्ठ स्वादामुळे त्याला फळांचा राजाच म्हणतात. मंगलकार्य, सण, उत्सव, देवपूजा आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने आंब्याला खूप महत्त्व आहे. आंबा हा वृक्ष सर्वसाधारणपणे सहा ते पंधरा मीटर उंच असतो. कधी कधी २० ते ३० मीटर उंचही वाढतो. झाड डेरेदार आणि भरपूर सावली देणारे असते. आम्रावृक्षाचा उल्लेख पुराणात आणि प्राचीन साहित्यात बऱ्याच ठिकाणी आढळतो. या झाडाला प्रजापतीचे रूप मानतात. आम्रमंजिरी ( मोहोर) हि कामदेवाच्या पाच बाणातील एक बाण आहे असे मानतात. महाकवी कालिदासाच्या साहित्यात मनाला प्रसन्नता देणाऱ्या आमराईचे आणि कोकीळ कुजनाचे वर्णन आढळते. वेद काळी आंबा हे राष्ट्रीय फळ होते.
आंब्याच्या विविध जाती आहेत. हापूस , पायरी, उत्तर भारतातील लंगडा, दक्षिण भारतातील नीलम, तोतापुरी अशी अनेक नावे सांगता येतील. या फळाच्या आपल्या देशात ७००- ८०० जाती आहेत. आंब्याचा मोहोर, कैरी , पिकलेला आंबा, आंब्याची कोय, पाने, झाडाची साल ह्या सर्व गोष्टींची आयुर्वेदाच्या दृष्टीने वेगवेगळी उपयुक्तता आहे.
आंब्याचा मोहोर थंड, रुची उत्पन्न करणारा असून अतिसार, रक्तदोष आणि कफ पित्त दूर करणारा आहे.
कैरी मध्ये आम्लता आणि क्षाराचे प्रमाण खूप आहे. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो. या साठी कैरीचे पन्हे उत्तम आहे. पन्हे प्यायालामुळे उन्हाळ्याच त्रास खूपच कमी होतो. कैरीचा कीस फडक्यात घालून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांची दमणूक आणि ताण कमी होतो. आपल्याला आरोग्य देण्याच्या दृष्टीने या दिवसात कैरीची डाळ खाण्याची पद्धत आहे. कच्च्या कैरीचा गर अंगाला लावून अंघोळ केल्यास घामोळ्याचा त्रास होत नाही. कैरीच्या बाठीचे चूर्ण हिरड्यांच्या तक्रारी कमी करण्यास उपयुक्त आहे तसेच हे चूर्ण पाण्यात घालून अंघोळ केल्यास घामोळ्याचा त्रास होत नाही.
आंब्याची कोवळी पाने चावून नंतर टाकून द्यावीत. त्या रसाने आवाज सुधारतो, खोकला कमी होतो आणि हिरड्यांचा पायोरीयाही कमी होतो. आंब्याच्या पानांचा चीक टाचांच्या भेगा कमी करण्यास उपयुक्त आहे. आंब्याचा गोंदाचा सांधेदुखीत खूपच उपोयोग होता. ऐरेंड तेल, लिंबाचा रस, हळद आणि आंब्याचा गोंद सम प्रमाणात घेऊन ते मिश्रण शिजवून एकजीव करावे. त्याचा लेप सांधा निखळणे, पाय मुरगळणे, लचाकणे ह्यासाठी गुणकारी आहे.
पिकलेला आंबा शक्तीवर्धक आणि अतिशय रुचकर आहे. आंब्याने शरीराची कांती सुधारते आणि पोषणही उत्तम होते. आंब्यात अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहेत. अ जीवनसत्व जंतुनाशक तर क जीवनसत्व त्वचारोग हारक आहे. त्यामुळे आंबा उत्तम आरोग्य देणारा आहे. आंबा उष्ण असल्यामुळे त्याचे अतिसेवन त्रासदायक ठरते. तसेच कैरीचे अतिसेवन पोटाचे विकार वाढवते. कैरी खाल्यावर पाणी पिऊ नये किंवा लहान मुलांना कैरीचे पन्हे जास्त प्रमाणात देऊ नये.
आयुर्वेदाच्या दृष्टीने आंबा आणि दूध एकत्र करून पिणे विरुद्ध आहार मानतात.
आंब्याला धार्मिक कार्यातही खूप मह्त्व आहे. कोणत्याही शुभप्रसंगी, मंगल कार्यात आणि सणाच्या दिवशी दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. कलशपूजन हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य प्रतिक आहे. कलशात नेहमी आंब्याची पाने ठेवतात.
आम्रवृक्ष सदाबहार, सदाहरीत आणि विपुल फळे दिणारा आहे. हा वृक्ष कधी निष्पर्ण होत नाही. हा वृक्ष दीर्घायू आहे त्यामुळे देवपूजेत आणि मंगल कार्यात त्याला विशेष महत्व आहे. संसारात नेहमी प्रसन्नता असावी, संसारवृक्ष बहरावा या भावनेतून विवाह प्रसंगी आंब्याचे महत्व आहे. आंबा संततीदायी आहे. पुत्र प्राप्तीसाठी या वृक्षाची पूजा करतात. थोर विभूती किंवा सत्पुरुष पुत्र व्हावा म्हणून स्त्रियांच्या ओटीत आंबा प्रसाद म्हणून देतात. आंब्याने सुवासिनींची ओटी भरतात. अधिकमास आणि दशहरात आंब्याचे वाण देण्याची पद्धत आहे. विवाह विधीत गौरीहराजवळ आंब्याच्या झाडाचे चित्र असते. लग्नानंतर वधू- वर त्याची पूजा करतात. तसेच आंबा शिंपणे हा विधीपण केला जातो.
आमराईत गारवा आणि प्रसन्नता मिळते. गर्भवती स्त्रीचे आमराईत डोहाळजेवण करण्याची पद्धत आहे.
अर्थाजनाच्या दृष्टीने आंब्याचे महत्व खूप आहे. कैरीचे लोणचे, मुरंबे, आंबापोळी, कैरीचे सरबत, आंब्याचा गोळा, आंबा बर्फी असे विविध पदार्थ आंब्यापासून केले जातात. खेड्यात अनेक ठिकाणी महिला गटातर्फे हे पदार्थ केले जातात. स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यात या वृक्षाचा वाटा आहे.
आम्रवृक्ष शुभ, पवित्र, मांगल्यादर्शक आणि आरोग्यदायी आहे.

लेखिका: अर्चना दातार
हा लेख माझी वाहिनी मासिकात मे २०१० मध्ये प्रकाशित झाला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users