टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

Submitted by सत्यजित on 7 June, 2011 - 13:04

छपरावरुन गळणारं पाणी
आकाश ढवळत होतं
मला सुकं ठेवण्यासाठी
माझं छप्पर भिजत होतं

छपरावरुन पाणी खाली बादली भरत होतं
त्या बादलीत पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

तो आडोश्याला उभा
छत्री बंद करुन
भीजलेली पॅंट
वर गुढघ्यात धरुन

ओल्या भाळी आठ्या पावसाला बघून
त्याच्या छत्रीतून पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

तिच्या केसातलं पाणी
टप टप गालावर
कानाच्या पाळीवरून
ट्प टप खांद्यावर

अंग चोरून तिने ओढला पदर
तिच्या पदरातून पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

त्याचं लक्ष तिथे
ओघळणार्‍या थेंबावर
त्याचं लक्ष तिथे
ओल्याचिंब वक्षावर

त्याचं लक्ष तिथे थरथरणार्‍या ओठांवर
त्याच्या ओठांतून पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

पावसाला लाच देती
चिमुकली बोटं
डबक्यातील चिखलाचं
तेव्हा उटणं होतं

बेडकाची गाणी गात कागदाची बोट
चिमण्या पंखातून पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

गरीबाचं घर
गळकं छप्पर
लेकराला ज्वर
नाही दूध अंगावर

तिच्या जीवाला घोर रडे कवटाळून पोर
तिच्या डोळ्यातून पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

पनावरून ओघळता थेंब
पनावर थबकला
अंतरंगात विश्व पाहून
क्षणभर हबकला

मागून येणार्‍या थेंबानी त्याला पुढे रेटला
मग रानभर पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

पाउस गातो गाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

-सत्यजित.

गुलमोहर: 

अतिशय उत्तम. अप्रतीम.... फारच सुंदर !! Happy नि:शब्द ....

गरीबाचं घर
गळकं छप्पर
लेकराला ज्वर
नाही दूध अंगावर

तिच्या जीवाला घोर रडे कवटाळून पोर
तिच्या डोळ्यातून पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .


मागून येणार्‍या थेंबानी त्याला पुढे रेटला
मग रानभर पाणी

टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

व्वा

म स्त Happy

वेगळ्याच पद्धतीने केलेलं वर्णन आवडलं.

फक्त शेवटून दुसर्‍या कडव्यात
एकदम वेगळ्या विषयाला का हात घेतला ते समजलं नाही.

एकाच पावसाची वेगवेगळी रुपे खुप छान प्रकारे खुलवुन शब्दबद्ध केली आहेत. मला कवितेतील फारसे कळत नसले तरी तुमच्या कवितेतला आशय समजण्यास खुप्च सोपा वाटतो आणि मनाला पटतो..:)
शिर्षक वाचुन नवीन बालगीत असावे असे वाटले होते.. असो..

सत्याभाई,
(मायबोलीकरांच्या) "पाऊस" गाण्यांवर काम करतोय.. त्यात ही तुझी कविता घेतो आहे. हरकत नाही ना?
खरे तर या कवितेतले दडलेले सौंदर्य गाण्यातून व्यक्त करणे एक चॅलेंज वाटते आहे आणि म्हणूनच घेतो आहे... पहिल्यांदा वाचली (तुला लिहीले होतेच) तेव्हापासूनच हे टीबूक टीबूक मनात चालू आहे.. Happy असो प्रयत्न करणार आहे बघुया..