गाज (२)

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
Time to
read
<1’

गाज (१)- http://www.maayboli.com/node/24892
***

सकाळी मारूतीने उठवलं, तेव्हा शार्दूलला काही क्षण लागलेच. त्याचा आवाज ओळखायला, आपण कुठे आहोत ते कळायला. मग हेही लक्षात आले,की संपूर्ण रात्रभर शांत झोप. मध्ये जाग नाही. ती रोज पडणारी भलीबुरी कुठची कुठची ओळखीची आणि अगम्य स्वप्ने नाहीत..!

खिडकीतून तळ्यावरून येणार्‍या थंड हवेमुळे तो उल्हसित झाला. उत्साहाने, लगबगीने आवरू लागला. मग सोमनाथसोबत बसून बोलत मारूतीने दिलेला चहा पीत असतानाच वृंदावन तिथे आला. याची परवा भेट झाली होतीच, पुण्याच्या ऑफिसात. बोरूले प्रोजेक्टबद्दल सारे काही समजून सांगत होते, तेव्हा तिथे शार्दूलसोबत हा होता. काम कशापासून आणि कसे सुरू करायचे आहे, हे समजून घेत होता. त्याला कामाचा बर्‍यापैकी अनुभव असावा, कारण ऐकून घेता घेता तो त्याचीही मते देत होता. मग त्यानेच कामगार लोकांच्या टीमची शार्दूलला ओळख करून दिलेली. ते सारे लोक ओरिसाचे. आपापसात उडीसी भाषा बोलत, पण सर्वांना हिन्दी चांगलेच बोलता येत होते, आणि बरीच वर्षे इथे काम केल्यामुळे थोडेफार मराठीही. या अठरा लोकांपैकी तिघे चौघे कुटुंबकबिला असणारे असावेत. पण बायकामुले गावाकडे ठेऊन कामासाठी इथे एकटेच राहणारे. त्यातल्या प्रल्हादचाचाने फक्त चाळीशी ओलांडली असावी. बाकी वृंदावनसह तिघे चौघे अठ्ठावीशी-तिशीचे. वृंदावनचे मात्र अजून लग्न झालेले नव्हते. उरलेले बहुतेक सारे शार्दूलच्याच वयाचे. विद्याधर, रमेश, लालू आणि किशन हे चौघे पोरगेले. यांनी विशी देखील ओलांडलेली नसावी..

मग अठरा लोकांची टीम घेऊन तो त्याच दिवशी इथे कारखान्यावर आला होता. कालच्या दिवसात बहुधा त्या सार्‍यांनी कारखान्याने दिलेली राहायची जागा बघून घेऊन आपापले सामान टाकले-थाटले होते.

सलाम साब. आ गये आप लोग? चलो काम शुरू करते है जोरशोरसे. थोडा एक छोटासा प्रॉब्लेम. वो अपना शंकर है ना, उसकी अब्बी अब्बी शादी हुई. गांवमें सिर्फ मां थी, वो भी कुच महिने पहिले गुजरी. उसकी वाईफ को इदर लाना पडेगा. अब्बी चार रूम मिले है, उसमें हम बाकी लोग तो रह लेंगे मिलबाटके. लेकिन शंकरको एकादा छोटासा रूम मिल जाय तो बडी मेहरबानी होगी. फॅक्टरी-कॉलोनीमें मिलेंगी तो बी चलेगा. फिर उसे बुला लेंगे इदर. बडे इंजिनियरसाबसे बात करेंगे क्या आज कारखानेमें?

सव्वा सहा फूट उंचीचा वॄंदावन त्याच्या लांब हातांनी हातवारे करत, सारखे केस सावरत त्यांच्याशी बोलत होता. शार्दूल त्याच्या हसर्‍या चेहेर्‍याकडे आणि बघताक्षणीच प्रामाणिक भासणार्‍या डोळ्यांकडे बघत होता.

तू बस रे बच्चन इथे. चहा पी आधी चल. सोमनाथने त्याच्या हाताला पकडून त्याला खाली बसवले. शार्दूलच्या लक्षात आले- अरे खरंच की. हा बच्चनचा ड्युप्लिकेट म्हणून सहज खपून जाईल. जरा सावळा आहे, आणि थोडा हडकुळा आहे, इतकंच!

तू साईटवर चल, आम्ही येतोच आहोत- असं म्हणून सोमनाथने त्याला वाटेस लावलं आणि शार्दूलला तो हसून म्हणाला- याला आम्ही बच्चनच म्हणतो, आणि त्याला ते आवडतंही. अमिताभचा निस्सीम भक्त आहे हा. सारे डॉयलॉग, गाणी पाठ आहेत. खुषीत आला, की नक्कल देखील करून दाखवतो बच्चनची!

***

चीफ इंजिनियर बशेट्टींना घेऊन ते साईटवर आले, तेव्हा वृंदावन आणि कंपनीने कामाची लगबग सुरू केली होती. वेल्डिंग मशीन, बेंडिंग मशीन, गॅस कटर्स आणि इतर काही मशीने योग्य ठिकाणी लावली होती. बेंडिंग मशिनसाठी आधीच एक तात्पुरता काँक्रीटचा चौथरा केला होता. भल्यामोठ्या लोखंडी प्लेट्स एका ठिकाणी ओढून बेंडिंग मशिनशेजारी नीट लावून ठेवल्या होत्या.

त्या प्रचंड देहवाल्या बशेट्टींनी शार्दूलच्या खांद्यावर हात ठेवला, तेव्हा काखेत पकडून आपल्याला सहजच उचलतात की काय, असा त्याला भास झाला. तो अवजड हात तसाच खांद्यावर ठेऊन ते चालू लागले तेव्हा त्याला चक्क आपण झोकांड्या खात असल्यागत वाटलं. साईटवर इकडे तिकडे फिरत निरीक्षण करत राहिले, मग थांबून अचानक ते गरजले- सोमनाथभाऊ तुमचं ते वर्नियर काडा. तुमचं ते प्लेटचं थिकनेस तेवडं मोजून दावा आमाला.

सोमनाथ लगबगीने पुढे झाला. व्हर्नियर कॅलिपर काढून त्या थप्पीतल्या वरच्या लोखंडी प्लेटला लावले, आणि ते बशेट्टींना दाखवले. चष्मा कपाळावर चढवून त्यांनी बारकाईने बघितले आणि पुन्हा गडगडाट करत म्हणाले- हां. बरोबरच. पन ह्ये एकच नाही. सगळं प्लेट मोजा. आमचं मोलॅशेस ट्यांक ड्राईंगमधे दहा फुट उंचीपर्यंत अठरा यमेम प्लेटाने बनलेलं दाखवलंय तेवडं लक्षात ठेवा!

मग वृंदावननं पुढे होऊन सार्‍या लोखंडी प्लेट्सची जाडी मोजून दाखवली. ते सारे बारकाईने बघून झाल्यावर साहेब म्हणाले- या थप्पीतल्या मार्क केलेल्या या दोन प्लेटी काडा बाजूला. अठरा यमेमला जरा दोन केसभर कमी वाटतात!
मग तोच अवजड हात सोमनाथच्या पाठीवर ठेऊन म्हणाले- चलतो आता आमी. नीट काम व्हायला पायजेल. शिस्तीत. नियमात. बोरूलेंना सांगा आमचा निरोप. काय म्हंता?

सोमनाथ मान हलवून म्हणाला- हो साहेब. सांगतो. आणि संध्याकाळी जाताना तुम्हाला भेटून जातो.

मग साहेब तिथून फॅक्टरीच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या त्यांच्या ऑफिसकडे जायला निघाले. शार्दूलने ड्रॉईंग्जचा पसारा मांडून त्यात डोके घातले. आणि सोमनाथला म्हणाला- या प्लेट्सच्या थिकनेसचा इतका मायक्रॉन्स वगैरेमध्ये हिशेब होतो की काय? त्याच प्लेट्स इतर ठिकाणी मोजल्या, तर भरतीलही अठरा एमेम. किंवा क्वचित जास्तही!
तोवर वॄंदावनने इतर लोकांच्या मदतीने बशेट्टींनी सांगितलेल्या त्या दोन लोखंडी प्लेट्स बाजूला काढायला घेतल्या तेव्हा सोमनाथ म्हणाला- नको काढूस त्या. अठरा एमेमच आहेत त्याही. साहेबांना सांगतो मी.

***

गुढी उभारून झाली. नारळ फोडून पूजा झाली. काम सुरू झाले. खरे तर काम सुरू करण्याच्या दृष्टीने तयारीच जास्त. सारे सामान आणि मशिन्स व्यवस्थित लावणे. टँकसाठीचे फाऊंडेशन कारखान्याने आधीच करून ठेवले होते, त्याची साफसफाई. प्लेट्स नीट लावून त्यातल्या काही बेंडिंग मशिनजवळ ओढून घेणे. सार्‍या मशिन्सचे टेस्टिंग. साईट ऑफिस-कम-शेडचीही साफसफाई आणि राखीव सामान त्यात नीट लावून घेणे. सर्वांची नावे घालून हजेरी बुक तयार करणे.. आणि काय काय. सोमनाथने इमर्जन्सी काँझ्युमेबल्ससाठी फॅक्टरीच्या स्टोअरमध्ये अकाऊंट उघडले. तसेच लेबर ऑफिसरकडे जाऊन हजेरी बुक दाखवले. सार्‍या काम करणार्‍यांची तिथे नोंद केली. सार्‍यांच्या अपघात-विम्याच्या प्रती तिथे दिल्या..

संध्याकाळी साडेपाचला आजच्यापुरते एवढे बस- म्हणून त्यांनी टीमला काम बंद करायला सांगितले. मग टीमच्या राहायच्या खोल्यांकडे त्यांच्यासोबतच दोघेही आले. सी आकाराची चाळीसारखी बांधलेली बैठी इमारत होती, आणि तीतल्या चार खोल्या टीमला मिळाल्या होत्या. बाथरूम्स, पाणी, त्यांची स्वैपाकाची जागा इत्यादी सार्‍या गोष्टी बोलून झाल्यावर शार्दूलने प्रत्येकाशी काहीबाही बोलून ओळख वाढवायचा प्रयत्न केला. सोमनाथ लगेचच जाणार होता, आणि त्यानंतर आपल्यालाच टीमला हाताळून नीट काम करून घ्यावे लागणार- याची त्याला जाणीव होती. त्यातले दोघे-तिघे अबोल असल्यामुळे असावेत किंवा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे असावेत- शार्दूलकडे रोखून बघत होते. कंपल आणि चरणदास. बाकी वृंदावन, प्रल्हाद, ओमपाल आणि इतर एक दोघे भरभरून बोलत होते. नवीनच लग्न झालेले असल्याने शंकरची सारे जण भरपूर थट्टामस्करी करत होते.

तिथेच चहा आणि मग सार्‍यांचा निरोप घेऊन ते चीफ इंजिनियर बशेट्टीसाहेबांच्या घरी आले. त्यांनी तोच गडगडाट करत काही प्रश्न विचारले. यांनी जमतील तशी उत्तरे दिली आणि त्या नवीन लग्नवाल्या शंकरसाठीच्या एखाद्या छोट्या खोलीचेही त्यांच्या कानावर घातले. त्यांनी लगेच लेबर ऑफिसरला फोन करून सूचनाही दिल्या.

मग साहेब म्हणाले- तुमचं ते बोरूले साहेबं, कदी येनार आमाला भेटायला म्हनायचं? तसा सोमनाथ सोबतच्या हँडबॅगमधून एक पुडके काढून साहेबांच्या हातात देऊन म्हणाला- त्यांनी तुम्हाला नमस्कार सांगितला आहे साहेब. वेळात वेळ काढून कामावर लक्ष ठेवा म्हणाले. पुढच्या महिन्यात येतीलच इथे साईटवर- कामाची प्रगती बघण्यासाठी. ही एक छोटीशी भेट पाठवली आहे..
त्यांच्या हातात दिलेलं ते पुडकं शार्दूलने नीट पाहिलं. शंभरच्या नोटांचं बंडल.

***

गेस्टहाऊसवर येईस्तोवर सोमनाथ बशेट्टींबद्दलच बोलत होता- या कारखान्यात आपल्या कंपनीने आधीच दोन-तीन कामं केली आहेत, त्यांत या माणसाने आपल्याला बिले पटापट सँक्शन होऊन पेमेंट मिळायला भरपूर मदत केली आहे. माणूस तसा चांगला. दिलदार. हुशार. कारखान्यावर बर्‍यापैकी पकड नि वचक असलेला. आपण सप्लायर-व्हेंडर लोकांनी त्यांना धरून राहिलं, त्यांना मदत केली, तर तेही मदत करतात..!

ते दोघे गेस्टहाऊसवर आले, नि लगेच मारूतीने लगबगीने येऊन त्यांना निरोप सांगितला- चीफ अकाऊंटंट कागवाड साहेबांनी बोलावलंय भेटायला.

सोमनाथ शार्दूलकडे क्षणभर पाहत राहिला, मग हसत म्हणाला- चला यांनाही भेटण्याचं काम आजच होऊन जाऊ देत. एकेक काम हातावेगळं झालेलं बरं. काय?

कॉलनीत ऑफिसर्स क्वार्टर्सचा एक वेगळा विभाग होता. त्यातली घरं शिस्तीत आडव्या उभ्या आखलेल्या ओळींत. स्वतंत्र बंगल्यांना कंपाऊंड आणि त्यात अंगण, बाग वगैरे असणारी. सोमनाथ आधी चुकीच्याच गल्लीत शिरला. मग गोंधळून कुणाला तरी विचारण्यासाठी इकडे तिकडे बघू लागला. तेवढ्यात शार्दूलला एक गव्हाळवर्णी तरतरीत मुलगी ओढणी सावरत समोरून येताना दिसली, आणि असंख्य आठवणींचा कल्लोळ त्याच्या जाणीवे-नेणीवेतून उसळला. पाय खिळल्यागत होऊन तो पाहत राहिला, तेव्हा रस्ता अडल्यागत होऊन तिने शेवटी विचारलेच- कोण हवंय?

मागे पाहत असलेला सोमनाथ वळला, आणि म्हणाला- कागवाड.. कागवाडसाहेब इथंच राहतात ना?
तिने मागे वळून उजव्या ओळीतल्या तिसर्‍या घराकडे बोट दाखवले, आणि शार्दूलकडे विचित्र नजरेने पाहत ती त्याला ओलांडून घाईघाईने निघून गेली. सोमनाथने त्याचा हात पकडून पुढे नेले, आणि ते त्या घरात गेले.

एका मध्यमवयीन बाईंनी त्यांना बसायला सांगितलं. या साहेबांच्या सौ. असाव्यात. ओसरीतून आतल्या खोलीच्या कोपर्‍यात असलेले देवघर दिसत होते. उदबत्त्यांचा मोठा जुडगाच लावल्यागत खूप धूर आणि वास सार्‍या घरभर पसरला होता. कागवाड देवघराजवळ मांडी घालून बसले होते, डोळे मिटून कसलेसे स्तोत्र म्हणत.

शार्दूल त्यांच्याकडे बघत राहिला. बुटकी काळीशी मुर्ती, बसके नाक, मोठ्या कपाळावर आडवे पांढरे मोठे गंध, तसेच गळ्यावर. डोळे मिटून गंभीर चेहेर्‍याने कपाळाला भल्याथोरल्या आठ्या घालत ते पुट्पुटत होते. तसं बराच वेळ केल्यावर त्यांनी डोळे किलकिले करून गालावर थडाथडा चापट्या मारून घेतल्या. मग पुन्हा शांत होऊन पुटपूटू लागले. आपल्या श्वास घेण्याचाही व्यत्यय त्यांच्या साधनेत येतो की काय असं शार्दूलला वाटून तो स्तब्ध राहून, श्वास रोखून त्यांच्याकडे पाहत राहिला.

बराच वेळ ते डोके देव्हार्‍यासमोर टेकवून बसले. मग पुन्हा थाडथाड गालात मारणे. त्याचा मोठा आवाज होऊन शार्दूल क्षणभर दचकलाच. मग आळीपाळीने कानांची पाळी पकडत, उठून साष्टांग नमस्कार घालून, मग चारही दिशांना नमस्कार करून पुन्हा आठ्या घालून उभे राहूनच देव्हार्‍याकडे बघत राहिले. हे सारे झाल्यावर त्यांनी हळूच घरात आलेल्या पाहुण्यांकडे पाहिले. आता शार्दूलला जाणवले, की त्यांचे डोळे नेहेमीच रोखून बघत असल्यागत वाटणारे, समोरच्याचा वेध घेणारे. अजिबात थांग लागणार नही असे!.

हा! तर ते, ट्यांकचं काम करायला तुम्ही आमच्याकडे आलाय न्हवे?- ते छताकडे बघत नमस्कार केल्याच्या आविर्भावात म्हणाले.

तर हे, नवीन काम तुमचं, किती लाखांचं म्हणायचं? आन अ‍ॅडव्हान्स काढलाय का नाही म्हणायचा
आमच्या कळसन्नवारानं? आन ते तुमचं बशेट्टि भेटलंय का नाही म्हणायचं ते?

गुढी उभारलीय आजच सर. काम चालू केलंय. चीफ इंजिनियर साहेबांना भेटलो. तुमचा निरोप आला तसा तुमचे पण आशीर्वाद घ्यायला आलोय सर!- सोमनाथ कागवाडांच्या डोळ्याला डोळे भिडवत म्हणाला.

कागवाड साहेब नाजूक हसले, पण हे हसणं शार्दूलला बशेट्टींच्या गडगडाटी हसण्यापेक्षा भयंकर वाटलं.
हा शार्दूल आहे. आमचा प्रोजेक्ट इंजिनियर. लक्ष असू देत. आता निघतो साहेब. काम झटपट करून तुमच्याकडे येत राहू बघा- सोमनाथ काहीबाही बोलून निरोप घेण्याच्या घाईत होता. आणि- काम करा पटदिशी. भेटत राहा. तुमच्या साहेबाला निरोप द्या- वगैरे पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या शब्दांत चालूच कागवाडांचं. कसेबसे पाणी पिऊन ते बाहेर निघाले, तशी मघाचीच घर दाखवणारी मुलगी अंगणात.

शार्दूलचा पुन्हा पुतळा झाला, तसा सोमनाथ त्याचा हात ओढून पुटपुटल्यागत म्हणाला- चल बे साल्या. त्याची लेक आहे ती. निघ इथनं. लई डेंजर बेणं ते. त्याच्या नादी लागू नकोस.

***

त्या रात्री त्या ओसाड पिवळ्याढक्क खोलीत कागवाड. कसले तरी भयानक भडक पिवळ्या रंगाचे जुने पुराणे फाटके कागद हातात घेऊन. ओठातच नाजूक आणि तरीही तांबडंपिवळंभडक हसणारे कागवाड. बाहेर एकही झाड नाही. सावलीचा पत्ता नाही. नजर जाईल तिथवर नुकत्याच शांत झालेल्या ज्वालामुखीचा रंग. पिवळ्यापासून ओसाड लालतांबड्या रंगांच्या सर्व छटांचं अमंगल संमेलन भरल्यागत. अन सगळीकडे ओसाड भक्क पिवळंतांबडं ऊन.

***
***

क्रमशः
***

विषय: 
प्रकार: 

वा! सुरेख झालाय पुढचा भाग. विशेष म्हणजे इतक्या दिवसांच्या गॅपनंतर पहिल्या भागाच्या पोताशी संलग्नता ठेवणे अवघड असावे, पण ते तू उत्तम रितीने केलेस. Happy
पण दोन महिन्यांची गॅप म्हणजे फार झालं हां!

ह्या स्प्पीडनी दोन वर्ष तरी लागतील पूर्ण व्हायला.. जरा पटापटा टायपा की साहेब.. जमलय मस्त.. कानडी हेल काढत मराठी...

हा भाग बघितल्यावर मी परत एक्दा पहिला भाग शोधला आणि सगळे संदर्भ लागले. अंमळ लवकरच लिहिलात दुसरा भाग Happy
असो. नेहमीप्रमाणेच चांगल लिहिलय.

वाचते आहे.. पहिल्या भागाची लिंक दे इथे आणि पुढच्या भागांत (कधी येतील तेह्वा) अगोदरच्या भागांची लिंक देणार का?

छानच पकड घेत आहे कथा. विषयही वेगळा असल्याने उत्सुकता आहेच. फक्त दोन मागण्या.. एक म्हणजे मागच्या पुढच्या भागाची लिंक, दोन म्हणजे लवकर लवकर लिहा.