आता येतो तुझ्या गावी

Submitted by -शाम on 1 June, 2011 - 11:35

रोज झाकळुनी येतं
रोज सपानं फुलतं
मला वाकुल्या दावितं
रोज आभाळं पळतं

दूरं वावरा मधुन
हाक मातीची ऐकतो
कसं द्यावं तिला काही
मीच भीक रे मागतो

माझ्या डोळ्यांचा पाऊस
त्यो बी भिजविना रानं
आता तूच सांग देवा
कसं पेरावं बीयाणं?

श्वास जातो श्वास येतो
अशी कणगीची तर्‍हा
हंबरुन गोठ्यामधी
गुरं मागत्यात चारा

देवा सुखानं का कोणी
घेतो गळ्यामधी फास?
कशी याला कीव नाही
कसा तुझा हा पाऊस?

रिती पोटांची खळगी
सांग, कशानं बुजावी?
तूच दिलीस ना भूक
आता येतो तुझ्या गावी

--शाम

गुलमोहर: 

व्वा.. जबरदस्त अष्टाक्षरी.

शेवटचं कडवं फार आवडलं.