जिणं सिनेमातलं

Submitted by ठमादेवी on 30 May, 2011 - 05:06

दै. प्रहारमध्ये प्रकाशित झालेला हा लेख... हा माणूस खूप वेगळ्या वातावरणातून, परिस्थितीतून आलेला आहे. त्यामुळेच त्याचे विचार वेगळे वाटतात आणि मनाला थेट भिडतात. म्हणूनच हा लेख मायबोलीकरांसाठी इथे टाकते आहे...

तो http://www.prahaar.in/collag/42299.html इथेही पाहता येईल nagraj.JPG

लघुपट हा सिनेमा नाही; आणि सिनेमानं करमणूकच केली पाहिजे, अशा लोक-मतांना छेद देणारे अनेक जण भारतात आहेत, त्यापैकी नागराज मंजुळे हा सर्वात नवा! लघुपटाचा विचार ‘सिनेमा’ म्हणूनच करताना तो कोणत्या पद्धतीनं बनावा, कोणत्या विषयावर आणि कोणासाठी बनावा, याबद्दल नागराजची मतं आग्रही आहेत. ‘पिस्तुल्या’ या त्याच्या पहिल्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही ‘चित्रपटातून जगण्याचा पसारा उभा करायचाय’ असं तो म्हणतो ते याच आग्रहांमुळे..

ग्रामीण- दलित साहित्यनिर्मिती होऊ लागली, त्याला पिढीचा काळ लोटला. तरीही ग्रामीण सिनेमा ग्रामीण लोकांनी तयार केलेला नसल्याचं चित्र खूप चिंता वाटण्यासारखं आहे. ‘‘या एका गोष्टीमुळे सिनेमातलं ग्रामीण वास्तव वरवरचं, उथळ वाटू शकतं. चेह-यावर, वागण्याबोलण्यात शहरी छाप असलेले कलाकार ग्रामीण चित्रपटात काम करतात तेव्हा त्यांना ग्रामीण वास्तवाचे चटके कधीतरी बसले आहेत का, असा प्रश्न पडतो’’ असा टीकेचा सूर लावणारा नागराज मंजुळे ग्रामीण सिनेमाच्या नव्या दिशा शोधतो आहे. सिनेमा कसा बनवायचा, याची त्यानं शोधलेली वाट मराठीपुरती नवी आहे. त्या वाटेवरून त्याला पुढे जाता आलं, अशी दाद दहा-बारा दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी दिली. यासंदर्भात, ‘‘चांगला सिनेमा कोणत्याही ‘टार्गेट ग्रूप’पुरता मर्यादित राहात नाही तर स्वत:चा प्रेक्षकवर्ग निर्माण करतो,’’ असं मत नागराज मंजुळे व्यक्त करतो आणि त्याच्याशी बोलण्यातून काही सहमती येऊ शकते, याची खात्री पटते.

सोलापूरमधल्या करमाळा तालुक्यातल्या जेऊर गावातला एक मुलगा. एका विशिष्ट समाजाचे म्हणून त्याच्यावर असलेला शिक्का. वडील त्या समाजाचं पारंपरिक म्हणजे ‘दगडं फोडायचं’ काम करायचे. घरात काय, आजूबाजूला कुणीच शिकलेलं नाही. अशा परिस्थितीत शिकलेला घरातला नागराज एकटाच. मराठीत एम. ए. केलेल्या नागराजने पोलिस भरतीमध्ये जाऊन पोलिस खात्यातही काम केलेलं आहे. पण त्यात मन रमलं नाही असं सांगत घरच्यांच्या, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या स्वप्नांवर बोळा फिरवून तो पुण्यात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी जातो. तिथेच ‘पिस्तुल्या’ची कल्पना प्रोजेक्टसाठी सुचते. मग काही वर्षानी त्यात बदल करून सुमारे 15 मिनिटांचा लघुपट बनवतो आणि त्याला केंद्र सरकारच्या रजतकमल पुरस्कारासकट तब्बल 17 पुरस्कार मिळतात. सारंच अचंबित करून टाकणारं. नागराजला ‘पिस्तुल्या’मध्ये मुंबई-पुण्याकडचं कुणीही नको होतं. त्याला ग्रामीण भागामधला एक मुलगा हवा होता. आयुष्यात कधीही कॅमे-यासमोर न गेलेले कलाकार त्याला हवे होते. त्यातलं ‘पिस्तुल्या’चं काम केलेला मुलगाही अगदी तसाच आहे. त्याचं खरं नाव ‘टायग-या’ आहे. या मुलांना नीट शिक्षण मिळत नाही. त्यांना शिकायचंअसतं. पण अनेक कारणं आड येतात. कधी घरची परिस्थिती कारणीभूत असते, कधी शिक्षक स्वाभिमानाला ठेच पोहोचवतात तर कधी इतर कारणं आड येतात. शिवाय ‘त्या’ एका विशिष्ट वर्गाचे म्हणून त्यांच्यावर शिक्का असतो तो वेगळाच, असं नागराज सांगतो.

‘‘शाळेत असताना मी कधीच अभ्यासात हुशार नव्हतो. ‘पिस्तुल्या’सारखाच उनाड होतो. बास्केटबॉल चांगला खेळायचो, कविता करायचो. पण हे कुणीच लक्षात घेत नाही. तुम्ही अभ्यासात चांगले नसाल तर शिक्षक तुम्हाला सर्व दृष्टीने नालायक ठरवतात. त्या न्यूनगंडातून बाहेर यायला मला खूप वेळ लागला. एम. ए. मराठीत मिळालेला फर्स्ट क्लास सोडला तर त्यापूर्वी मला कधीही फर्स्टक्लास मिळाला नाही. ग्रामीण भागांतल्याच नव्हे तर शहरातल्याही खूप मार्क न मिळवणा-या मुलांची हीच परिस्थिती असते,’’ अशा शब्दांत तो शालेय शिक्षण पद्धतीच्या वर्मावरच बोट ठेवतो.

पूर्वी ग्रामीण भागांमधलं साहित्य पुण्या-मुंबईकडचे पांढरपेशा वर्गातले लोक लिहायचे. त्यामुळे ते खूप उपरं वाटायचं. आपल्या जवळ येतं असं वाटत नव्हतं. पण 1960-70 च्या आसपास खूप दलित लेखक आले आणि त्यांनी स्वत:ची साहित्यनिर्मिती सुरू केली. हे साहित्य ग्रामीण भागाच्या जवळ जाणारं, तिकडच्या लोकांना आपलंसं वाटणारं. तसंच सिनेमांचंही. सिनेमाचा ग्रामीण बाज शहरी कलाकारांना पकडता येतोच असं नाही. हौशे, नवशे, गवशे सगळ्याच क्षेत्रांमध्ये असतात. सिनेमाचं क्षेत्रही त्याला अपवाद नाही. गावागावांमध्ये असलेल्या ‘टूरिंग टॉकीज’ साठी म्हणून बनवण्यात येणारे सिनेमे कमी नाहीत. पिटातल्या प्रेक्षकांना आवडतात म्हणून अमुक पद्धतीचा सिनेमा बनवला, असंही सांगणारे लोक आहेत. अत्यंत बाष्कळ विनोद, भाषेचं कडबोळं आणि तेच तेच हावभाव यांनी आता फार काळ ग्रामीण प्रेक्षक खेचता येणार नाही, नागराज सांगतो.

‘‘ ‘सीसीडी’मध्ये बसून ग्रामीण भागाचं कल्पनाचित्र किती दिवस रंगवत राहणार आहेत हे लोक?’’ असा प्रश्न नागराज विचारतो. त्याचबरोबर ग्रामीण आणि शहरी सिनेमांमधली दरी हळूहळू कमी होऊ लागलीय, असंही त्याला वाटतं. ग्रामीण प्रेक्षक बदलू लागला आहे. तो फक्त प्रेक्षक म्हणून नाही तर माणूस म्हणूनही बदलत चालला आहे. त्याच्या आजूबाजूची परिस्थिती त्याला बदलते आहे, असं मत तो व्यक्त करतो.

मग चांगला चित्रपट नेमका कुठला? जो सिनेमा ग्रामीण- शहरी, अभिजात- पिटातला सिनेमा, देशाच्या-भाषेच्या भिंती ओलांडून पुढे जातो तोच चांगला सिनेमा असं म्हणायला हवं. या सिनेमांना प्रेक्षकवर्ग डोळ्यांसमोर ठेवावा लागत नाही. ते स्वत:चा प्रेक्षक स्वत: निर्माण करतात. किंबहुना त्यांनी तो केला पाहिजे. शहरी-ग्रामीण, भाषा, देश या सगळ्यांच्या सीमारेषा ओलांडून जाणारे सिनेमे तयार होण्याचा काळ आता फार दूर नाही. अगदी अलीकडच्या काळात तयार होणारे काही सिनेमे पाहता मराठी सिनेमा पुढच्या काळात आणखी गडद आणि देखणा होईल, असं नागराजला वाटतं. या पुढच्या काळात चित्रपटांमध्ये असलेली मुंबई-पुण्याची मक्तेदारीही कमी होईल, इतर भागांमधले चांगले लोक या क्षेत्रात येतील, अशी आशा त्याला आहे.

ग्रामीण भागांमध्ये जिथे जातीपातीचे अदृश्य पदर आजही कायम आहेत तिथे नागराजला विशिष्ट समाजाचा प्रतिनिधी म्हणून दाखवण्याचा खूप प्रयत्न झाला. पण त्या सगळ्या भिंती ओलांडून तो बाहेर आला आहे. माझ्यासारख्या अनेक तरुणांना जाती मान्य नाहीत. ‘‘ब्राह्मणी शब्दप्रामाण्य नाकारताना आंबेडकरी शब्दप्रामाण्य निर्माण करण्याची काय आवश्यकता आहे?’’ असा प्रश्न तो आणि त्याचे मित्र आपल्या आसपासच्या लोकांना विचारतात. आपण आपल्या गुणांमुळे लायक आहोत, हे दाखवणं आवश्यक असल्याचा आग्रहही तो धरतो. अर्थात, आधी त्याचं कुणी ऐकत नव्हतं. ‘हा काहीतरीच बोलतो’ असं सांगून त्याचं म्हणणं उडवून टाकलं जायचं. पण आता लोक ऐकतात. आमचं म्हणणं त्यांना पटतं. हाच त्यातल्या त्यात आशेचा किरण, असं नागराजला वाटतं.

महात्मा फुलेंच्या एकूण साहित्याचं मूळ सूत्र शिक्षण हेच आहे. हेच सूत्र धरून नागराजने ‘पिस्तुल्या’ साकारला. या पुढच्या काळातही अशाच प्रकारचं चित्रण आपल्याला चित्रपटांमधून करायचं आहे. त्याला चित्रपटातून जगणं उभं करायचं आहे. चित्रपट फक्त कमर्शियल नसावा, त्याने जगण्याचा पसारा मांडला पाहिजे, असं तो म्हणतो ते याचसाठी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

‘‘ब्राह्मणी शब्दप्रामाण्य नाकारताना आंबेडकरी शब्दप्रामाण्य निर्माण करण्याची काय आवश्यकता आहे?’’>>> खणखणीत, एकदम मान्य.

खरंच ठमा. तथाकथित ग्रामीण सिनेमातली, भाषा / पेहराव / पात्रं सगळेच वरवरचे वाटते. आणि हे माझ्यासारख्या शहरात राहिलेल्या माणसाला जाणवते तर त्या लोकांना किती जाणवत असेल ? त्यांच्या कथा व्यथा मांडणारा चित्रपट आला, तर खरेच प्रेक्षक उचलून घेतील.

छान ओळख!
‘ब्राह्मणी शब्दप्रामाण्य नाकारताना आंबेडकरी शब्दप्रामाण्य निर्माण करण्याची काय आवश्यकता आहे?' >> हे फार आवडले.

>>अत्यंत बाष्कळ विनोद, भाषेचं कडबोळं आणि तेच तेच हावभाव >> अगदी.
>>‘‘ब्राह्मणी शब्दप्रामाण्य नाकारताना आंबेडकरी शब्दप्रामाण्य निर्माण करण्याची काय आवश्यकता आहे?’’ आपण आपल्या गुणांमुळे लायक आहोत, हे दाखवणं आवश्यक >> एकदम योग्य.

चिनूक्स त्याचा उन्हाच्या कटाविरूद्ध हा कवितासंग्रह मला मिळेल लवकरच. मलाही वाचायचाय तो आणि पिस्तुल्याही पाहिला नाहीये मी अजून.

हम्म..!

सिनेमाचा ग्रामीण बाज शहरी कलाकारांना पकडता येतोच असं नाही.>> अनुमोदन..

नागराजला त्याच्या पुढील कारकिर्दीस भरभरून शुभेच्छा..:)

ब्राह्मणी शब्दप्रामाण्य नाकारताना आंबेडकरी शब्दप्रामाण्य निर्माण करण्याची काय आवश्यकता आहे?’’ असा प्रश्न तो आणि त्याचे मित्र आपल्या आसपासच्या लोकांना विचारतात. आपण आपल्या गुणांमुळे लायक आहोत, हे दाखवणं आवश्यक असल्याचा आग्रहही तो धरतो. >>>

जो सिनेमा ग्रामीण- शहरी, अभिजात- पिटातला सिनेमा, देशाच्या-भाषेच्या भिंती ओलांडून पुढे जातो तोच चांगला सिनेमा असं म्हणायला हवं. या सिनेमांना प्रेक्षकवर्ग डोळ्यांसमोर ठेवावा लागत नाही. ते स्वत:चा प्रेक्षक स्वत: निर्माण करतात. >>>

परफेक्ट !!

मस्त लेख. 'पिस्तुल्या' या लघुपटाबद्दल वाचलं होतं. पण नागराजबद्दलची माहिती आजच कळली.

ठमे मस्त लिहिलायेस लेख. आता टॉडची मुलाखत पण पोस्ट करून टाक. 'पिस्तुल्या' खरोखर एका वेगळ्याच धाटणीचा लघुपट आहे. मला तरी आवडला. Happy खरोखर अप्रिशिएबल आणखी काही नाही.

ठमे असे प्रश्न का विचारतेस तु? हेच मला कळत नाही. Wink तुझा टॉडचा लेख अजूनही मुखपृष्ठावर आहे तो जायच्या आधी तरी तु मुलाखत पोस्ट कर म्हणजे मिळवलं.

आवडलं.

‘ब्राह्मणी शब्दप्रामाण्य नाकारताना आंबेडकरी शब्दप्रामाण्य निर्माण करण्याची काय आवश्यकता आहे?’’>> +१.
आवडलं. पिस्तुल्या कुठे बघायला मिळेल का?

वा, मस्त लेख..... मयीला अनेक धन्स .....

नागराज मंजुळे - एकदम वेगळेच रसायन दिस्ते आहे ..... त्याच्या पुढील कारकिर्दीस भरभरून शुभेच्छा.... >>+१०..

चिनुक्स, मला सापडत नाहीये पिस्तुल्या. त्या नाववए "पायताण" नावाची फिल्म सापडतेय.किंवा पुरस्कार समारोह प्लिज हेल्प

मला पण पाहिजे पिस्तुल्या ची लिंक प्लीज.

दिनेश. | 30 May, 2011 - 14:56
खरंच ठमा. तथाकथित ग्रामीण सिनेमातली, भाषा / पेहराव / पात्रं सगळेच वरवरचे वाटते. आणि हे माझ्यासारख्या शहरात राहिलेल्या माणसाला जाणवते तर त्या लोकांना किती जाणवत असेल ? त्यांच्या कथा व्यथा मांडणारा चित्रपट आला, तर खरेच प्रेक्षक उचलून घेतील.

>> हे खरं ठरलं तर Happy

‘ब्राह्मणी शब्दप्रामाण्य नाकारताना आंबेडकरी शब्दप्रामाण्य निर्माण करण्याची काय आवश्यकता आहे?’’>> +१.

स्वतःच्या समाजातल्या अल्पशिक्शीत बायकोला सोडून देउन , उच्च्वर्णीय व्यक्तीबरोबर लिव इन रेलेशनशिप मध्ये राहताना कलाकारांची ' संवेदनशीलता ' कुठे गवत खायला जाते बरे ?