पायरेटस ऑफ द कॅराबियन - ऑन स्ट्रेंजर टाईडस

Submitted by केदार on 29 May, 2011 - 23:02

पायरेटस ऑफ द कॅराबियन - ऑन स्ट्रेंजर टाईडस चित्रपट विरंगुळा म्हणून बरा वाटला. चित्रपट आवडणे हे रिलेटिव्ह आहे त्यामुळे कोणास चित्रपट आवडला नाही तरी हरकत नाही. काही अ आणि अ गोष्टी आहेत पण त्या झाल्या नाहीतर तो पायरेटस कसा? आम्ही काही ठळक गोष्टी मांडायचा प्रयत्न करू. पण सगळ्या अ आणि अ गोष्टींसाठी चित्रपटास जाणे बरे, कसे? म्हणजे तेवढीच तुमचीही करमणूक!

चित्रपटाच्या सुरूवात नेहमीप्रमाणे (म्हणजे पायरेटस प्रथेप्रमाणे) रंजक आहे. गिब्स काकांना (पाररेट्स नेहमी पाहणार्‍यांना हा माहिती असेल) फाशी देण्यासाठी कोर्ट बोलावलेले असते. तिथे अचानक जॅक स्पॅरो भौ एकदम न्यायाधीश बनून जातात अन जनतेला बनवतात, गिब्सची नाट्यमय (की चित्रपटमय) सुटका करतात आणि त्यांना वाचवतात, पण डबल क्रॉस होऊन परत दोघेही पकडले जातात, तेथून सुटका करून नाही घेतली जर जॅक भौ ते कसे? ह्या सुटकेच्या प्रयत्नात डेप भौ मध्येच एकदा दोन बग्गींवर पाय टाकून प्रवास करतात,ते बघून मला तर आपल्या देवगणांच्या अजयच्या (फुल और कांटे फेम) सीनाची आठवण झाली,एकदम दोन दोन बाईकवरून उभे टाकून मारामारी वगैरे) इकडे डेप भौ पण आपल्या अनोख्या अंदाजात दोन बग्यांवर मस्त प्रवास करतात ते बघून ए कॉपी रे कॉपी असे मी थेटरात ओरडलो, ते पाहून बाजुच्या मध्यमवर्गीय गोर्‍या लावण्यवती स्त्री ने लुक दिला, तर तिला म्या समजावून सांगीतले अरे भौ, ही आमची वरीजनला आयडीया हाय!

पिनोलपे क्रुझ नावाच्या एकेकाळी हॉट असणार्‍या (तशा आत्ताही आहेतच म्हणा, एक दोन सीनात आम्ही आवंढा गिळलाच!) बाईंची एन्ट्री एकदम जॅक व्हर्सेस जॅक अशी झाली आहे. एकदम मारामारी. मागे एकदा पिनोलपे आणि सलमा हायकची एन्ट्री पण अशीच झाली होती एका सुमार चित्रपटात. मारामारीत कोण वरीजनल अन कोण कॉपी ह्याचे गेस मारत आम्ही बसलो असताना ( काय करणार एखादा चांगला बॉलीवुड पट आला की तो कोणता मुळ हॉलीवुडपट आहे ह्याचे गेस पिक्चर चालू असतानाच करायची सवयच झाली) एकदम जॅक भाऊ ते कीस घेण्यासारखा अभिनय करतात तेंव्हा म्हणलं पोराटोरांना आता काय इपरित बघायला भेटतं की काय म्हणून खाकरून उगाच पोरांना बोलण्याचा प्रयत्न केला पण तो जॅक भौनेच हाणून पाडला, कीस झालाच नाही!

तो जॅक व्हर्सेस जॅक सीन बघून तर आम्हास मायबोलीची आठवण आली. कोणीतरी डुप्लिकेट आयडीच स्वतःला वरिजनल म्हणून खपवू पाहत असतो. जॅक स्पॅरो पण हे स्पेअर करू शकला नाही हे बघून आमचे इतिहासाचे लेख चोरीला जातात ह्याचे दुखः कमी झाले. आणि वेषभुषा प्रताधिकार कायदा प्रकरणात पिनोलपेला कोणती शिक्षा करता येईल ह्याची आम्ही उजळणी करत बसलो. तर अचानक ष्टोरीच पुढे गेली. कोणीतरी २०० की ४०० वर्षापूर्वीचा म्हातारा समुद्रतळापाशी स्पेनच्या मच्छिमारांना गावत, ते त्याला राजाकडे आणतात. अन तो कुठल्याश्या फाउंटन ऑफ युथची माहिती देतो. ती माहिती ऐकून म्हणलं की हत लेका ही अशी अमृताची माहिती हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे, ह्यात शिकरेट ते काय? पण गोची अशी की त्या धबधब्यातून पाणी प्यायचे पण त्यात एका मरमेडचा (अर्ध नारी, अर्ध मासा) अश्रू पण सामील करायचा तरच तो नेहमीसाठी युथ राहणार. आता आली का पंचाईत? ही मरमेड कुठून आणायची, मग त्यासाठी पुढे एक दबंग टाईप मारामारी होते. (कोणी शर्ट काढले नाहीत पण टाईप तीच)

मध्येच बार्बोसा काका (तेच ते जुने कॅप्टन बार्बोसा) उपटतात. त्यांची एक आपली वेगळीच कहाणी. ते आता गोर्‍यांची चाकरी करण्याचे नाटक करतात. स्पेनवाले भौ पण आपली बोट काढतात डुप्लीकेट जॅक खर्‍या जॅकची मांडवली करून त्याला बोटीत नेते. तर त्या बोटीचा कप्तान ब्लॅक बियर्ड हा विचित्र माणूस असतो. त्याला जारण-मारण, मंत्र तंत्र, बाहूली करून सुया टोचवणे ( म्हणजे आपली भानामतीच की ) येत असतं ( परत एकदा हिंदूस्थानातील गोष्टींची कॉपी करतात म्हणून मला भरून आले आणि मी परत कॉपी रे कॉपी असे ओरडणार होतो, पण म्हणलं ते जाऊ द्या) तो जॅकला बंदी करतो, म्हणजे सुया टोचवतो. हे पाहून तर आम्हास अंधश्रद्धा निर्मुलन समीती ह्या चित्रपटावर भारतात बंदी आणणार ह्याची खात्री पटली.

त्या बोटीवर बायबल घेऊन देवावर श्रद्धा ठेवा, तो तुम्हाला रिडीम करेल असं म्हणणारा एक पाद्री कम योद्धा असतो. मध्ये एका लढाईत तो म्हणतो की मला शरीराला लागलं, माझा आत्मा शुद्ध आहे. ते पाहून तर खात्रीच पटली, ह्यांनी नक्कीच प्रश्नोपनिषिद वाचले अन हा प्यारा तिथून उचलला! मग अचानक हे मरमेडचे आंसू आणन्यासाठी एक छोट युद्ध होतं.ते पुरोहित बापू त्या मरमेडीच्या प्रेमात पडतात, इकडे जॅक बाबू आपल्या ड्यु आयच्या प्रेमात असतात. हे असे बरेच गुंते, अ आणि अ सिन पाहायला पडद्यावरच जा, इथे लिहून रसभंग करत नाही. नाट्यमय रितीने शेवटचं युद्ध होते आणि जॅकभौ आपल्या प्रेयसीला वाचवतात ते बघून तर हिंदी सिनेमाच जणू असे वाटले.

सिनेमाटोग्राफी, वेषभूषा सगळे चांगले आहे, थ्रीडी मात्र इतके प्रभावशाली नाही. खासकरून युद्ध करताना तलवारी फिरवताना ती थ्री डीत अंगावर यायला पाहिजे, ती तलवार तशी येऊन, आँ तिच्या मारी लागतं की काय? असे कधीही वाटत नाही. आणखी एक जाणवलेली गोष्ट म्हणजे ब्लॅक पर्ल कुठेच दिसली नाही. (बाटलीशिवाय), ते तिचे न दिसने मात्र पिक्चर संपल्यावरही व्यापून राहिले.

शेवटावरून असे दिसते की अजुन एक पायरेटस येऊ घातला आहे. तर भौ आपण तरी कॅप्टन जॅक स्पॅरो चे फ्यान असल्यामुळे पुढच्या चित्रपटाची वाट बघणार. तो पर्यंत तुम्ही निदान हा चित्रपट पाहून घ्या.

पाचापैकी साडेतीन ष्टार

ह्या कॅराबियनला करेबियन असेही म्हणतात.इंग्रजी भाषा शुद्धीकरण वाल्यांनी ह्याची नोंद घ्यावी. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या सुटकेच्या प्रयत्नात डेप भौ मध्येच एकदा दोन बग्गींवर पाय टाकून प्रवास करतात,ते बघून मला तर आपल्या देवगणांच्या अजयच्या (फुल और कांटे फेम) सीनाची आठवण झाली,एकदम दोन दोन बाईकवरून उभे टाकून मारामारी वगैरे

<< Biggrin
बरोब्बर, अता इतक्या वर्षांनी स्टार झालेल्या देवगण नी बाइक च्या जागी २ कार घेऊन गोलमाल ३ मधे पुन्हा एकदा तसाच स्टंट केला बहुदा, तो नक्की पाहिला असणार डेपोबानी
धम्माल लिहिलय , भरपूर अ आणि आ. साठी पहावा लागणार Proud

शेम तु शेम भावना व्यक्त केल्यास रे केदार Lol
पण ते लावण्यवतीला तु भौ कसा म्हणालास, नक्की 'ती' च होती की अजुन ,ती, च्या पोषाखात ' तो' होता. Proud
जॅक भौ ती च्या शेजारी जाऊन झोपतो पाहुन काही भलतचं बघावं लागतयं की वाटतं होतं पण हाय रे दैवा , फुसकाच बार ठरला Lol

मायबोलीच्या ढंगात परीक्षण Lol सही आहे. पायरेट्सची सिरीज म्हणजे माय फेव्हरीट. नक्की बघणार हा चित्रपट.धन्स.

लईच भारी परिक्षण Proud
हॉलीवूडवाले आपल्या इतकेच अ आणी अ आहेत यात शंकाच नाही, पहा- मिशन इंपॉसिबल-२ यातला कुठलाही स्टंट मिथूनदांनी केला अस्ता तर आपण काय बकवास आहे म्हणून टवाळी केली अस्ती पण टॉम क्रूझला मात्र सगळं क्षम्य? हा अन्याय आहे.
मागे एकदा पिनोलपे आणि सलमा हायकची एन्ट्री पण अशीच झाली होती एका सुमार चित्रपटात.>>> त्याचे नाव 'बंडीडॅस' (ते मी आधी बंदीदास वाचले व्हते मला वाटले की असेल कोणी अमेरिकन संत, तर हा प्रकार निघाला!!!)

फुसकाच बार ठरला हाहा >> अरे पायरेटस मध्ये तसे सिन नसतात. कारण पायरेटस पाहायला मुलंही जातात, त्यामुळे चांगली भाषा, क्लिन सीन्स हे ह्या सिरीजचे वैशिष्ट्य. .

हा अन्याय आहे >> Lol हो

छान. बघायला पाहिजे. हल्ली ३ डी एक नवीनच फ्याड आलय. पूर्वी फक्त पोराटोरांचे पिक्चरच ३ डी असायचे.

Lol लई भारी केदारभौ!

क्रूझकाकींचा शेवटाकडला, "मैं तुम्हारे बच्चे की.." तेवढा टाकायचा राहिला.

मला पण सगळे पायरेट्सचे सिनेमे आवडले, विशेषतः जॉनी डेप. बाकीच्या लोकांकडे नुसतेच खोगीरभरती म्हणून बघतो. त्यांच्या बाबतीत डेप जर काही करणार नसेल तर गेले उडत. असे मी समजतो. त्यामुळे फारसा कळत नाही सिनेमा पण नाहीतरी हिंदी सिनेमे बघतोच की, ते तरी कुठे कळतात?

पण दबंग आवडला!

मृ मैं तुम्हारे बच्चे की टाकला होता, पण वाढेल की काय म्हणून काढला. हा तो प्यारा ..

मध्येच आम्ही मिट्ट काळ्या अंधारात, काळ्या गॉगल्समधून कुठे काही हिरवळ दिसते का असे शोधत असताना अचानक आम्हास, मै माँ बननेवाली हूं असे ऐकु आले, इकडे तिकडे बघून आम्ही नक्की पायरेटसला आहोत की 'पतिता' बघत आहोत ह्याची खात्री करून घेतली, बरं माँ व्हावे असे काही आम्हास दिसले नाही, हा थ्रीडीचा परिणाम असावा म्हणून सोडून देतानाच आम्हास प्रकाश पडला की अरे भौ ही तर आपली महाभारतातील नियोग पद्धत! म्हणलं आपल्या संस्कृतीला लईच डिमाडं आला, ह्या विचारात आम्ही आहोत न आहोत तोवर जॅक भौ पेल्यातून ते अमृत आणतात आणि हिंदी सिनेमासारखे सगळे आल इज वेल घडते ते पाहून आम्हास बॉलीवुड, अंधश्रद्धा, नियोग पद्धत आणि आत्मा अमर आहे, हे हॉलीवुडवाल्यांनी मान्य केले असे याची देहाम याची डोळा पाहून भरते आले आणि आम्ही परत एकदा आपल्या वेद संस्कृतीच्या पुढील भागाचा लेखांना न्याय द्यायचा हे ठरविले अन तिथून काळी हिरवळ (काळ्या चष्म्यातून हो) पाहत पाहत एकदाचे बाहेर पडलो.

खरोखर यावेळेस भट्टी काही जमली नाही. तरीहि जॅक स्पॅरोला पहाणे म्हणजे ट्रीट. कुठेतरी वाचण्यात आलं होतं कि पायरेट्स-४ हा या फ्रँचाइजचा शेवटचा चित्रपट पण यातील कॅरेक्टर बिल्डींग आणि प्लॉट डेवलप्मेंट बघुन पुढचा(चे) भाग येइ(ती)ल असं वाटतं.

वर म्हटल्याप्रमाणे मलाहि ब्लॅक पर्लची उणीव भासली. शेवटी-शेवटी तर वाटलं कि ती बाटली फोडुन ब्लॅक पर्ल समुद्रात झेपावेल. तसं झालं असतं तर जॅकचेच शब्द तोंडातुन बाहेर पडले असते... "सॅवी"!

तटी: जॅकच्या फर्स्ट मेटचं नांव गीब्स आहे.