तुम्हे याद हो के न याद हो - २

Submitted by बेफ़िकीर on 26 May, 2011 - 03:28

"दादा? ती समोर राहायला आलेली निवेदिता तुझ्या शाळेत होती का रे?"

धाकटी बहिण क्षमाने घरातील सर्वांसमोर हा प्रश्न विचारल्यावर आपल्यातील उत्साह फार वाटू नये म्हणून अत्यंत विचारात पडल्यासारखा चेहरा करत उमेश म्हणाला..

"हो का? मलाही जरा पाहिल्यासारखा वाटला चेहरा.. काय करते ती??"

खरे तर तो चेहरा गेले तीन दिवस डोळ्यांसमोरून हालतच नव्हता. विनीत गुजर बरोब्बर उमेशच्या वर राहायचा. तो गेले दोन दिवस 'मला आता एम कॉमचा अभ्यास करावा लागेल' असे म्हणत कॉमन गॅलरीतच रात्री झोपायला लागला होता. पुस्तक हातात धरून दर पंधराव्या सेकंदाला तो निवेदिताच्या खिडकीकडे पाहायचा. तिकडून वर्षा तिच्या खिडकीतून याच्याकडे पाहात आहे याची दुखरी जाणीव असल्यामुळे तो दर विसाव्या सेकंदाला तिच्याही खिडकीकडे पाहायचा.

अप्पाचा प्रश्नच नव्हता कारण तो निवेदिताच्या शेजारच्या खोलीत असल्यामुळे त्याला निवेदिताचे घर दिसूच शकायचे नाही. तो आपला प्यासाला जायचे नसेल तर गेले दोन दिवस रात्री साडे दहालाच पडी टाकत होता वहिनीच्या शिव्या खाऊन! राहुलची खोली विनितच्या खोलीसमोर, वरच्याच मजल्यावर असल्याने त्याच्या बरोब्बर खाली निवेदिताची खोली यायची. त्यामुळे त्याला गॅलरीत येऊन बसूनही इंप्रेशन नाहीतरी पाडता येणारच नव्हते.

त्यामुळे विनीत आणि उमेश दोघे खुष होते की दोन स्पर्धक आपोआपच गळाले. मात्र एकमेकांवर ते अतिशय खवून होते आणि त्यातल्यात्यात उमेशवर विनित! कारण....

... उमेशच्या खोलीची खिडकी बरोब्बर निवेदिताच्या खिडकीसमोर यायची, ज्या खोलीत निवेदिता एकटीच झोपायची. उमेशच्या खोलीत मात्र आजोबा असायचे. आणि क्षमा आणि उमेशचे आई वडील दुसर्‍या खोलीत! त्यामुळे, आजोबा एकदा निद्राधीन झाले, जे ते साधारण दहा वाजताच व्हायचे, की उमेश आपला खिडकीचा पडदा उघडून काहीतरी वाचत बसल्यासारखा बसायचा. तिकडून मधेच समोरच्या खोलीतून आप्पा त्याला उचकवून जायचा. पण आप्पाच्या हातात तितकेच होते.

चौघे संध्याकाळी क्रिकेटही खेळले नव्हते गेले दोन दिवस!

कारण एकच! आपली विकेट बिकेट गेली किंवा आपण पडलो बिडलो अन तिने पहिले तर? हासली बिसली तर? आयुष्यभराची बोच मिळायची.

वाडा त्यामुळे शांत होता. आणि या चौघांमध्ये झालेला सूक्ष्म बदल व त्याची कारणमीमांसा बहुतेक सर्व ज्येष्ठांना समजलेली होतीच अंधुकपणे, पण तसे दाखवायचे नसते.

आणि दोन दिवस केलेल्या तपश्चर्येचे फळ आज मिळाले उमेशला!

कधीतरी सव्वा दहाच्या सुमारास निवेदिताच्या खोलीतला दिवा लागला. बहुतेक जेवणे आटोपून आता झोपायची तयारी चालली असावी. दिवा याच वेळेला गेले दोन दिवस लागतच होता, पण आज...

.... आज तिच्या खिडकीचा पडदा चक्क उघडा होता..

सरसावून उमेश खिडकीत बसला व पुस्तकात प्रचंड लक्ष आहे असे भासवून हळूच एक तिरपा कटाक्ष त्या खिडकीकडे टाकू लागला. वर विन्या नक्की हेच करत असेल हे उमेशला माहीत होते तसेच उम्याचेही विनीतला! पण आत्ता त्यावर विचार करण्यात अर्थच नव्हता.

आणि... दीदार-ए-यार झाला एकदाचा..

नदीचे झुळझुळ पाणी वाहावे तशी पावले टाकत निवेदिता अचानक खिडकीपलीकडे आली आणि उम्याचे पुस्तकातले लक्ष पूर्णपणे गेले..

निवेदिताने कपाटातील आरश्यात पाहात स्वतःचे तोंड पुसले... मग मोकळे सोडलेले केस हातात घेऊन ती आता अंबाडा घालू लागली... त्या खोलीतला प्रकाश जणू दिव्याचा नसून तिच्या त्या रौशन चेहर्‍याचाच आहे असे वाटत होते... क्लिप तोंडात धरून ती अंबाडा घालत असतानाच...

सूरज हुवा मद्धम.. चांद जलने लगा... आसमां भी हाय... क्युं पिघलने लगा...

सहज वळत तिने खिडकीतून बाहेर पाहिले...

पहिली नजरानजर... थबकून एक सेकंद ती खिडकीबाहेर तशीच पाहात राहिली... वर बहुधा विन्याचा जळून कोळसा झालेला असणार... कारण ती खालच्या मजल्यावरच्या खिडकीत बसलेल्या उम्याकडे पाहात होती...

मै ठहरा रहा.. जमी चलने लगी.. धडका ये दिल... सांस थमने लगी...

जाणीव झाल्याक्षणीच तिने पटकन पडदा लावून घेण्यासाठी पलंगावर झुकून आपला उजवा हात पुढे केला... त्यामुळे तिचा बांधून येत असलेला अंबाडा पुन्हा सुटला... केसांचा बटा घरंगळून चेहर्‍यावर येताच तिने मानेला झटका देऊन त्या खांद्यावर ढकलल्या... आणि.. पडदा लावायचा फक्त वन मिलियन्थ सेकंद आधी...

क्या ये मेरा पहला... पहला प्यार है.. सजना....

निवेदिता आपटेंनी एक वीज चमकून जावी तसे स्माईल दिले होते...

आणि अंगावर वीज पडल्यावर व्हावे तसा उमेश स्तब्ध झाला होता जागच्याजागी... आपणही हसावे हे बावळटाला आठवलेही नव्हते....

तिने पडदा लावल्याच्या पाचव्या मिनिटाला त्या खोलीत अंधारही झाला होता...

आणि उमेश राईलकर आपल्या घोरणार्‍या आजोबांकडे वळून बघत विचारात पडले होते... आपण बघितले ते खरेच की आपल्याला फक्त तसे वाटले??

नाहीतर उद्या आपण हसायला जायचो आणि... ती म्हणायची मवाली दिसतोय..

त्याने पुन्हा खिडकीकडे पाहिले.. पण आता प्रॉब्लेम असा होता की ती जर अंधारातून हळूच इकडे बघत असेल की आपण तिच्या खिडकीकडे बघतोय का, तर आपली चोरी पकडली जाईल.. तिकडे अजिबात बघायचे नाही असे ठरवले तर किमान अर्धा तास तरी उगाचच हे पुस्तक वाचण्याचे नाटक करत बसावे लागेल.. आणि हे पुस्तक तर जाम समजतही नाही आहे.. करायचे काय???

पुस्तक वाचण्याचे नाटक करणेच योग्य ठरले असते... पण हा विन्या नालायक...

वाड्याच्या गणेशोत्सवात कधीतरी एकदा ती पेटी काढतो अन रमैया वत्तावैय्या वाजवून दाखवतो.. आज अगदी हरामखोर... लगेच इंप्रेशन मारायची गरज आहे का एवढी???

वरून रास्ते वाड्यात पेटीचे धीरगंभीर पण चांगल्यापैकी सूर घुमत होते...

... मुझे देवता बनाकर.. तेरी चाहतोंने पूजाSSS.. मेरा प्यार कह रहा है... मै तुझे खुदा बनादूं...

आपल्याला सालं एक डबडंही नीट वाजवता येत नाही... या विन्याला एकदा बडवला पाहिजे... अगदी आजच बरी रात्री पेटी सुचली रे तुला??

पण ते बडवण्याचे विचार अधिक काळ करावेच लागले नाहीत... भुमकर काकू तरातरा चालत गॅलरीत येऊन जोरात म्हणाल्या..

" तुझी आई तुला शिकवत नाही का रे कधी काय करायचं ते???"

विन्या पेटी गुंडाळून पटकन आत निघून गेला. इकडे उमेशला फस्सकन हसू आले. अक्का मात्र उठल्याच. आता त्या आल्या गॅलरीत! त्या काही बोलायच्या आतच भुमकर काकू घरी निघून गेल्या असाव्यात. कारण अक्कांनी एकच वाक्य टाकलं!

"बघा बघा.. कोंबडी कशी पकपकून आत पळून गेली ते.. "

भुमकर काकू ही आपली भावी सासू आहे हेच निवेदितामुळे विसरून गेलेला विनित आज आईला काहीही बोलला नाही.

आता वरच्या मजल्यावर हे वाद झाल्याचे निमित्त करून उमेशने खिडकीतच अभिनय केला 'काय साली कटकट आहे वाड्यात, साधे वाचूसुद्धा देत नाहीत' असा! आणि दिवा बंद करून खिडकीपाशीच असलेल्या पलंगावर आडवा झाला. परवापर्यंत या पलंगावर आजोबा निजायचे. परवापासून उमेश निजू लागला होता. त्याचे कारण त्याने 'खिडकीतून वारा फार येतो.. तुम्हाला बाधेल' असे सांगितले होते व आजोबांनी "वयंच आहेत बाबा तुमची खिडकीत झोपायची" असे वाक्य टाकून उम्याचा पार सातारा करून टाकला होता. त्याने चमकून आजोबांकडे पाहिले तेव्हा ते जप करत डोळे मिटून बसलेले होते. त्यामुळे 'तुमच्या म्हणण्याचा अर्थच मला लक्षात आला नाही' असा अभिनय करून हा त्या पलंगावर आडवा झाला होता.

आणि मगाशी झालेल्या अतीमधूर नजरानजरीच्या आठवणीत आडवा होऊन डोळे आढ्याकडे लावून बसलेला असतानाच उमेशला एक मोठा धक्का बसला... अचानक आजोबांचे दचकवणारे वाक्य कानावर आले..

"कोण आहे रे ती??? "

खल्लास! च्यायला आजोबांना सगळे दिसले?? बोंबललेच आता... तरी धीर धरून उमेशने विचारले..

"कोण??"

"ती बातम्या देणारी नवी आलीय ती??"

"स्मिता तळवलकर"

हृदयावर ऐंशी किलो वजनाचा दगड ठेवायचे ठरल्यानंतर ठेवता ठेवताच कुणीतरी म्हणावे की "अरे याचे नाही.. त्याचे हृदय" तसे झाले आत्ता उमेशला!

कित्येक क्षण तो अंधारातच अंधुक दिसणार्‍या आजोबंच्या निद्रिस्त मूर्तीकडे पाहात होता.

'आपले आजोबा पोचलेले असावेत' असेही त्याला क्षणभर वाटले. पण नंतर त्याने तो विचार झटकून हळूच खिडकीबाहेर.. निवेदिताच्या खिडकीकडे नजर वळवली..

'तुम्हे याद हो.. के न याद हो.. ' ची पहिलीवहिली रात्र होती ती! एका अनसंग प्रेमकहाणीची... !

=============================================

"नाही गं बाईSSS.. मी बाहेर जेवणार आहेSSS"

घराच्या बाहेर निघताना उमेशने आईच्या 'किती वाजता येणारेस जेवायला' या पाचव्यांदा विचारलेल्या निरर्थक प्रश्नाला शेवटी असे उत्तर दिले आणि पटकन बाहेर पडला..

मागे कटकट सुरू झालेली त्याला ऐकू आलीच.. "रोजच यांना बाहेरचे हवे... झाडाल लागलेत का पैसे?" वगैरे वगैरे!

मात्र उमेश केव्हाच वाड्याच्या दारातून बाहेर येऊन थांबला होता. विनित, अप्पा आणि राहुल एक दोन मिनिटातच येतील हे त्याला माहीत होते..

आज आजवर न घडलेली घटना घडली होती....

गर्द निळा पंजाबी ड्रेस घालून सकाळी दहा वाजता कॉलेजला जाताना निवेदिताने एकदाच का होईना पण उमेशच्या त्या खिडकीकडे पाहिल्याचे उमेशने स्वयंपाकघरातून पाहिले होते आणि तो सहज दारात येऊन उभा राहिलेला असताना ती त्याच्याकडे ढुंकूनही न बघता वाड्याच्या दारात गेली आणि तिथे मात्र सायकल काढताना तिने.. कुणालाही अगदी सहजच वाटेल असे.... मागे वळून उमेशच्या दाराकडे.. म्हणजेच त्याच्याकडे पाहिले आणि ... गालातल्या गालात मंद हासली.. हा मंद हासण्याचा मात्र उमेशचा भास होता असे त्याचे त्यालाच उगाचच वाटत होते... कारण त्याला लांबून ते नीटसे जाणवलेले नव्हते.. त्याला असे वाटत होते की तिने हसावे अशी त्याची इच्छा असल्याने त्याला ती हसल्यासारखे वाटले की काय.. मात्र हे मित्रांसमोर तो मुळीच कबूल करणार नव्हता..

आपल्या प्रेमकहाणीचा पहिला अध्याय सर्वांना ऐकवायचा व मत्सराने प्रत्येकाच्या पोटात ढवळून काढायचे व त्यासाठी जरूर पडलीच तर पॉकेटमनी आजच संपवून सर्वांची पोटे भरायची इतपत तयारी त्याने ठेवलेली होती..

आणि अप्पा आला.. आला तोच मुळी 'काय बोलावता रे मला उगाचच, कामं किती पडलीयत' असा चेहरा करून... पाठोपाठ विन्या आला तो मात्र एखादा तपस्वी गंभीर असावा तसा चेहरा करून आला होता.. राहुलला यायलाच दहा मिनिटे लागली... तोवर कुणीही कुणाशीही काहीही बोलले नाही.. जणू एका बसथांब्यावर तिघे जमलेले होते आणि बसची वाट पाहात होते...

राहुल आला. तो आल्यावर सगळे आधीच ठरले असावे तसे सगळेजण लक्ष्मीरोडकडे चालू लागले..

लक्ष्मीरोडचे अण्णा टी भुवन आले आणि सगळे आत घुसले... सगळ्यांच्या समोर एक एक कटिंगचा ग्लास आदळला गेला... आणि अप्पाने विधान केले..

"शेजारधर्म... या नात्याने मी यातून अंग काढून घेत आहे.. "

राहुलने घेतलेल्या चहाच्या घोटातील ऐंशी टक्के घोट नियंत्रण सुटल्याप्रमाणे हवेत फवारला गेला.

अप्पा शांतच होता.

अप्पा - का हासलास??

राहुल - तुझे अंग होते कधी या प्रकरणात? काढून घ्यायला??

अप्पाचा सरळसोट प्रॉब्लेम होता. एक तर त्याला ती शेजारीच असण्यामुळे दिसणे शक्यच नव्हते सारखी! त्यात तो बेकार! आणि या तिघांपेक्षा एकाच वर्षाने का होईना, पण मोठा! त्यामुळे त्याने माघार घेण्याचा मोठेपणा घ्यायचा प्रयत्न केला होता. पण राहुलने अमृततुल्य चहा फवारून त्या विधानातील सॅन्क्टिटि घालवून टाकली होती.

अप्पा - माझ्यासमोर बिझिनेसचे आव्हान आहे... प्रेम वगैरे करत बसण्यात मी वेळ घालवू शकत नाही.. आता दिवस तुमचे आहेत...

राहुल - आमचे म्हणजे?? तू संसाराला लागल्यासारखा काय बोलतोयस??

विनित - अप्पा... काश मै तुम्हारे जैसा अपनाभी अंग काढ सकता...

विनितचे हिंदी अण्णा टी भुवन ला शोभत होते.

तिन्ही चेहरे विनितकडे वळले. चेहर्‍यांवर 'हा आता काय शहाणपणा सांगतो ते पाहू तरी' असा भाव होता.

उमेश - म्हणजे?? तू यातून अंग का काढून घेऊ शकत नाहीस?

विनित - डेंजर स्माईल दिलं रे तिने मला काल...

अण्णा टी भुवनमध्ये बॉम्ब पडल्यामुळे भुवनच्या ठिकर्‍या उडाल्या.

राहुल - कधी??

विनित - रात्री... मी घड्याळ पाहात नव्हतो... पण.. साडे दहा झाले असावेत...

उमेश - एक मिनिट एक मिनिट.... स्माईल दिलं म्हणजे काय केलं??

विनित - स्मितहास्य केलं...

उमेश - तू कुठे होतास??

विनित - माझी एम कॉमची तयारी चाललीय... मी गॅलरीत अभ्यास करत होतो...

उमेश - आणि ती कुठे होती??

विनित - ती तिच्या घरात... खिडकीत..

उमेश - अंबाडा घालत होती???

दुसरा बॉम्ब! भुवनच्या ठिकर्‍यांच्या ठिकर्‍या! आता तीन चेहरे उमेशकडे वळलेले..

विनित - ... तुला कसे माहीत??

उमेश - ते स्माईल मला दिलं तिनी...

विनित - किस खुषीमे म्हणे?? तू डॅनी डेन्झोंग्पा आहेस??? की जितेंद्र??

उमेश - डॅनीचा काय संबंध??

विनित - तोही हल्ली बरा दिसतो..

उमेश - तिच्या त्या स्मितहास्यात 'फक्त माझ्यासाठी' असा एक भाव होता...

विनित - हे कधी ठरलं??

उमेश - आज रात्रीच बघ ना?? काय होतं ते?? तू बाहेर थांबूच नकोस.. तरीही ती खिडकीतून स्माईल देऊनच दिवा बंद करेल..

विनित - एक काम कर ना त्यापेक्षा?? तूच झोप दहा वाजता... आणि अंधारातून लक्ष ठेव... ती मला स्माईल देऊनच झोपेल...

उमेश - वर्षाचं काय ठरवलंयस विन्या??

विनित - मला नुकतंच कळू लागलंय की तिचं आणि माझं लॉन्ग टर्म पटू शकत नाही...

उमेश - का??

विनित - तिच्यात प्रेमात झोकून द्यायची वृत्ती कमी आहे असे लक्षात येत आहे..

उमेश - अप्पा.. तू मोठायस ना?? तूच सांग आता याला... हा बेवफाई करतोय..

अप्पा - विन्या.. दोन डगरींवर हात ठेवू नकोस..

विनित - आपला एकाच डगरीवर आहे...

राहुल - हा... प्रेमाचा त्रिकोण होऊ पाहतोय...

उमेश - काही त्रिकोण वगैरे नाही.. हा शायनिंग मारायला काल पेटी वाजवायला बसला.. भुमकर काकूंनी पिसं काढल्यावर आत पळाला...

विनित - तेच म्हणतोय.. एका कलाकाराची मुस्कटदाबी जर लग्नाआधीच करत असेल सासू... तर आमचं कसं काय होईल???

उमेश - हो पण कालच पेटी कशी काय वाजवलीस??

विनित - कलाकार मनस्वी असतो...

अप्पा - मी पण मनस्वीच आहे.. वर्षाला जाऊन सांगीन.. तू असा म्हणतोस ते..

विनित - अप्पा... याला मैत्री म्हणता येणार नाही..

अप्पा - माझा दावाच नाही तू आणि मी मित्र आहोत असा..

विनित - हो पण काही शरम बिरम तरी??? एका मुलीला सरळ सांगायचं की तू ज्याच्यावर भाळलीयस त्याच्यावर आणखीन एक तिसरीच भाळलीय कुणी???

राहुल - ती तुझ्यावर भाळली नाहीये विन्या... तुला भुमकर काकूंनी झापला ना... त्याचे तिला हसू आले असणार...

उमेश - आयला हे बरंय! म्हणजे ती चक्क माझ्याकडे बघून हासली.. कालच काय.. आज सकाळीही हासली..

राहुल - मला एक बिडी दे रे?

अप्पा - तुझ्या बिड्या फार होतायत हां राहुल्या..

असे म्हणून अप्पानेही एक विल्स पेटवली व दार्शनिकाच्या आवेशात सर्वांकडे पाहू लागला..

उमेश - आता मात्र कटू निर्णयाची वेळ आलीय अप्पा.. तूच सांग.. मी की विन्या??

राहुल - की मी??

उमेश - राहुल्या.. तू यात पडू नकोस.. हा प्रेमाचा मामला आहे..

राहुल - समजा मी पडलो... तुम्ही काय करणार??

अप्पा - विनीत गुजर...

उम्या - काय विनीत गुजर??

राहुल - विनीत गुजर काय??

अप्पा - या प्रकारात यापुढे फक्त विनित गुजरने पडायचे आहे.. मला उद्यापासून उमेशकडून पुन्हा या विषयावर चर्चा नको आहे.. जे काय आहे ते विनित बघेल..

विनित - माझ्यातर्फे आज प्यासामध्ये एकेक पेग प्रत्येकाला..

उमेश - अप्पा... हे तू... हे तू फार वाईट केलंस.. तुझा निर्णय मी स्वीकारत नाही...

अप्पा - मग ग्रूपमध्ये तू नाहीस..

'मैत्री की प्रेम' या गंभीर वळणावर उमेश उभा होता. खूप वेळ विचार केला त्याने. सगळेच्या सगळे स्तब्ध होते.

उमेश - तुम्हाला तिघांना सोडून मी काय करणार रे??? काय करणार मी?? शेवटी.. मला अप्पाचा निर्णय मान्य आहे... विन्या... मी यातून अंग काढून घेत आहे...

विनीत - थॅन्क्स उम्या... याला म्हणतात मैत्री..

उमेश - पण उद्या जर लक्षात आलं... की तिला तुझ्याबद्दल काहीही वाटत नाही...

विनित - जे होणे शक्य नाही..

उमेश - ऐकून घे... समजा लक्षात आलंच.. तर मात्र... मी पूर्ण शक्तीनिशी यात उडी घेणार...

अप्पा - हे काय महायुद्धंय का?? च्यायला घ्या उड्या... हव्या तेव्हा..

उमेश - म्हणजे केव्हाही??

अप्पा - नाही.. विन्याबद्दल तिला काहीही वाटत नाही हे सप्रमाण सिद्ध झाल्यानंतर...

उमेश - ठीक आहे.. माझ्या निर्मळ प्रेमासाठी... मी कितीही थांबायला तयार आहे..

विनित - मला तर थांबायची गरजच नाही.. माझं निर्मंळ प्रेम मला मिळालेलं आहे..

अप्पा - विन्या.. मी तुला पंधरा दिवसांची मुदत देतो.. तिला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं हे सप्रमाण सिद्ध करायचंस..

विनित - फक्त पंधरा??

उमेश - अप्पा पंधरा दिवस?? फार होतात हे.. मला तिच्यशिवाय एक रात्रही थांबवत नाही...

विनित - तिला वाड्यात येऊन झाल्यात तीन रात्री.. अन हा बघा काय बकतोय..

अप्पा - पंधरा दिवस.. हे फायनल.. आज तारीख कितीय??

राहुल.. पंधरा..

अप्पा - एकतीस तारखेला मला काय ते कळायला हवं...

राहुल - हा फेब्रुवारीय...

अप्पा - मग.. पंधरा वजा अठ्ठावीस.. वजा तीन अधिक.. बारा...

राहुल - दोन तारखेला समजायला पाहिजे तुला..

अप्पा - हां... दोन किंवा तीन तारखेला.. तेही केवळ फेब्रुवारीत तारखांचा घोळ होतो म्हणून दोन वेगळे दिवस देण्यात येत आहेत... दोन किंवा तीन तारखेला प्यासामध्ये विन्याने सप्रमाण सिद्ध करायचे की निवेदिता आपटे या महिलेला..

राहुल - ही पोलिस केस आहे का अप्पा???

अप्पा - या मुलीला त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर म्हणा किंवा एक प्रकारची अशी भावना आहे जिला या जगात प्रेम असे नांव आहे.... ते त्याने सिद्ध केल्यास त्या दिवशीचा संपूर्ण खर्च पार्टी म्हणून त्याला करावा लागेल.. आणि ते त्याने सिद्ध न केल्यास.. उम्याच्या आयुष्यातील पंधरा गुलाबी दिवस वाया घालवल्याची नुकसान भरपाई म्हणून त्या पार्टीचा सर्व खर्च त्यालाच करावा लागेल..

विनीत - पण ते सिद्ध कसे करायचे?? म्हणजे ती माझ्याकडे बघते, माझ्याकडे पाहून हासते, माझ्याशी बोलते वगैरे गोष्टी ती तुमच्यासमोर थोड्याच करणार आहे??

अप्पा - त्यावर एक उपाय आहे.. आजपासून आठव्या दिवशी मी वाड्यात बातमी फिरवणार की विन्याला मुंबईला नोकरी लागली... सात दिवसात तिने एकदा तरी आगामी विरहासंदर्भातल्या तिच्या भावनांना तोंड फोडलेच पाहिजे...

विनित - नक्कीच फोडेल ती...

चांडाळ चौकडी निर्णय झाल्याच्या समाधानात वाड्यात परतली तेव्हा अक्का चौकात उभ्या होत्या आणि वर उभ्या असलेल्या भुमकर काकू काहीतरी ओरडत होत्या.. चौघे वाड्यात प्रवेशले तेव्हा भूमकर काकूंचे एकच वाक्य ऐकू आले..

"गेली एकदाची कटकट आमची... "

विन्याला पाहून अक्कांनी हर्षवायू झाल्यासारखे सांगितले..

"विनित... बाळा मुंबईच्या कंपनीचे पत्र आले बघ तुला... तीन हज्जार आहे हो पगार?? पण... माझ्यापासून लांब जाणार तू???"

विनितकडे तिघे आणि तिघांकडे विनित हबकून बघत असतानाच... विनितचे लक्ष वरच्या खिडकीत गेले तेव्हा... चौघांनीही ते पाहिले..

भुमकर काकुंच्या खिडकीतून वर्षाचे लाल लाल झालेले डोळे... आणि नकारार्थी मान हालवत ती विनितकडे पाहात होती...

तेवढ्यात ... तो प्रकार झाला...

सगळे ऐकत असलेली निवेदिता फारशी ओळख नसतानाही... तिच्या घराच्या दारातूनच मुलायम आवाजात हासत म्हणाली..

"अभिनंदन हं विनीत?? .. किती मस्त जॉब मिळाला नाही???"

गुलमोहर: 

.

'दिपु काजल' ची बात काही औरच होती.>>>> अगदी अगदी. पण हा ही भाग चांगला आहे, अभी तो शुरुआत है....., नवीन भागाच्या प्रतिक्षेत..

Hi Befikir
Have just started reading these pretty stories, liked them alot, specially the last one Savat

Just that I cant type fast in MARATHI font so had to take english..

Waiting for the part3 of this story.

jaraaa lavkar taaka ho.....SAAVAT KASHI ROZ YAAYACHI....

aata kon umesh kon vinit...?

parat 1st part vaachayla havaa... Sad

पहिले प्रेम. अगदी सुरेख वण्रन. हम्म. कथा चांगला वेग घेत आहे. ¨सावटा¨च्या परिणामतुन बाहेर यायला अश्याच कथेची गरज होती. पुढ्च्या भागाची वाट पहाते आहे.

बेफिकीर छान विषय घेतला आहे. अजून हाफ राइस एवढी रंगत आली नाही, पण तुम्ही हळू हळू फुलवाल याची खात्री आहे.
आणि एक कळकळीची, आग्रहाची, प्रेमाची विनंती ह्या कथेला HAPPY ENDING द्या.

आणि एक कळकळीची, आग्रहाची, प्रेमाची विनंती ह्या कथेला HAPPY ENDING द्या...

>> मै तेरी नजर का सुरुर हु
हेच ते गाणे ना!
तो ७०-८० चा काळ वेगळा आणि प्रेम करण्याची पद्धत वेगळी.

सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे. ज्या सदस्याने हा भाग निवडक दहात घेतला त्या सदस्याचे विशेष आभार! श्वेतांबरी, आपलेही खास आभार!

-'बेफिकीर'!