माझा देश महान

Submitted by -शाम on 23 May, 2011 - 16:07

लई दिस बिचार्‍याची झाली ओढा-तान
देवा माझा देश आता झालाया महान...

ऑलंपिकासाठी कोटी, कोटी खर्च झाले
नवे नवे विक्रम आम्ही डोपिंग मध्ये केले
चार-दोन पदकांची आमची तहान
देवा माझा देश आता झालाया महान...

सानिया सानिया हरली तरी छान
लांडा फ्रॉक घालून नुस्ती फिरली तरी छान
टेनीस नाही कळलं तरी आम्ही तिचे फॅन
देवा माझा देश आता झालाया महान...

आदर्श लोकांचा इथे आदर्श घोटाळा
एक आण्णा कित्तीकांना घालीन तरी आळा
वाळू चोरणारा इथे बनतोया डॉन
देवा माझा देश आता झालाया महान...

घरामध्ये टिव्ही आला टिव्ही मध्ये घर
करपून जाते रोज रोटी तव्यावर
सासू-सुना बसत्याती मांडुनी दुकान
देवा माझा देश आता झालाया महान...

बिघडुनी तरूणाई पिच्चरवाले खूश
मल्लिका नि बिपाशाचा चाले धुडगूस
घाबरूनी घालतोया कपडे सलमान
देवा माझा देश आता झालाया महान...

झाशीवाली रानी तुमची पुस्तकात झोपली
नव्या जमान्याची 'राखी' सुपरवुमन आपली
एका मुक्यापायी 'मिका' झाला परेशान
देवा माझा देश आता झालाया महान...

द्यावं द्यावं म्हणलं तरी मत द्यावं कोणा
खुर्ची येता जो तो लावितोया आम्हा चुना
घड्याळाला हात, जातो कमळात बाण
देवा माझा देश आता झालाया महान...
.....

महागाई महागाई झाली भरपूर
कुठे चुली बंद कुठे नोटांचाच धूर
गरिबीच्या ओझ्याखाली कुणब्याचे प्राण
देवा माझा आता बघ झालाया महान...

--शाम

गुलमोहर: 

वास्तव अंगावर येणारं ........ कुठे चाललोय आपण नि काय होणारे आपले ???
सारं मांडलंस मात्र अप्रतिम.....