तुम्हे याद हो के न याद हो - १

Submitted by बेफ़िकीर on 23 May, 2011 - 04:12

"कटकटे स्साली"

सायंकाळी सहा वाजता रास्ते वाड्यातील प्रमुख चौकातील एका चौथर्‍यावर विनित, उम्या आणि अप्पाच्या शेजारी बसून राहुलने वैताग व्यक्त केला. विनितच्या हातात बॅट, उम्याच्या हातात स्टंप म्हणून वापरले जाणारे फळकुट, अप्पाच्या हातात बॉल आणि राहुलच्या हातात त्याच्या नव्या स्लीकची किल्ली होती.

आज क्रिकेट खेळताच येत नव्ह्ते.

कारण साडे पाच वाजल्यापासून समोरच्या दोन रिकाम्या खोल्यांमध्ये सामान येऊ लागले होते. कपाट, बेड, एक दिवाण, एक टीव्ही, फ्रीझ, काही बॅगा! संपतच नव्हते.

आज क्रिकेट नाही, त्यामुळे उरलेल्या अभंग काचा भंग होण्याची शक्यता नाही, कोणताही आवाज नाही, कोणतीही पडझड नाही आणि चौकातून अजिबात जखमी न होता जाणे येणे शक्य आहे याचा तमाम रास्ते वाड्याला झालेला अभूतपूर्व आनंद पन्नाशीच्या भुमकर काकूंनी वरील मजल्याच्या 'टेरेस' - जे कॉमन असल्याने भांडणांचे प्रमुख स्थान होते - तेथून व्यक्त केला.

"अगोबाई किती ते चेहरे उतरलेले.... असेच रोज कुणी ना कुणी येत राहिला ना?? बरे होईल बाई! हे क्रिकेट म्हणजे वाड्याला लागलेला शाप आहे नुसताSSS"

"तुम्हाला असता विशीचा मुलगा की कळलं असतं.. "

अक्कांनी स्वतःच्या खोलीच्या बाहेर येऊन भुमकर काकूंच्या जखमेवर मीठ चोळले. भुमकर काकूंना दोन मुली होत्या. वर्षा आणि विद्या! आता 'व' या अक्षराने सुरू होईल असे नांव ठेवता येईल असा एक मुलगा व्हावा म्हणून त्यांनी हिंदू धर्मात मुळातच अस्तित्वात असलेल्या व त्यांनी स्वतः अस्तित्वात आणलेल्या अशा जुन्या नव्या सर्व देवांचे नवस बोलून ठेवलेले होते. मात्र दैवाने कधीच ग्रीन सिग्नल न दाखवल्याने व नंतर वयच झाल्याने आता केवळ दोन्ही मुलींना उजवून एकदाचे सांसारिक जबाबदारीतून मोकळे व्हायचे इतकेच कर्तव्य राहिलेले होते. मुलगा नव्हताच नशिबात! अक्कांचे मिस्टर आता हयात नव्हते. त्यांना विनित नावाचा विशीचा मुलगा होता. खरे तर विनितला भुमकर काकूंची मोठी मुलगी, वर्षा, आवडायची. त्याचे असे आग्रही म्हणणे होते की तिलाही तो आवडतो. पण बोलायची हिम्मतच नव्हती. कारण एकदा भुमकर काकू आणि अक्का पेटल्या की रास्ते वाडा दणाणून जायचा. त्यामुळे हे नजरानजरीतलेच प्रेम राहिलेले होते.

स्वतःला मुलगा नसल्याने भुमकर काकू मुलगा असलेल्या प्रत्येक स्त्रीशी भांडण कसे काढता येईल हे बघायच्या. आणि आज त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या ऐतिहासिक शत्रूबरोबर पूर्ण ताकदीनिशी भांडण्याची संधी उपलब्ध झालेली दिसल्याने रिकामटेकडे या सदरात मोडणारे रास्ते वाड्यात त्या क्षणी जितके नागरिक होते ते सर्व प्रमुख चौकात खाली उभे राहून वर बघू लागले.

त्यातच विनितने खालून अक्कांना, म्हणजे आपल्या आईला ओरडून सांगितले..

"आई... आत जा तू... उगाच काय त्यांना बोलतेस??"

अक्कांचे बोलणे चुकीचे असले तरीही आजवर भुमकर काकूंनी जे अपमान केलेले होते त्यांचे अ‍ॅक्युम्युलेटेड दु:ख त्यांच्या आत्ताच्या वाक्यात असल्याचे कुणीही अ‍ॅप्रिशिएट करणारच नव्हते. मात्र विनितच्या या वाक्याचा त्याला एक साईड फायदा मिळाला. भुमकर काकुंना आत ओढून नेण्यासाठी आलेली वर्षा त्याच्याकडे पाहून गोड हासली. या घटनेवर व तिच्या चर्चेवर पुढचा पंधरवडा सहज निघेल हे विनित, अप्पा, राहुल आणि उम्या या चौघांनाही समजले. आज रात्रीच ते मंडईतल्या एका बारमध्ये जाऊन 'वाड्यात कुणीतरी नवीन भाडेकरू आला' हा आनंद साजरा करणार होते. त्यांना काहीही निमित्त चालायचे साजरे करण्यासाठी! गल्लीतले एक जख्खड वृद्ध गोरे आजोबा हे मरणासन्न अवस्थेत तीन वर्षे झोपून असल्यानंतर त्यांना आलेला शांत मृत्यू कुणालाही माहीत नसताना यांनी मंडईत साजरा केला होता. का तर म्हातारा सुटला. तो म्हातारा सुटल्याचा खरे तर त्या म्हातार्‍यालाही आनंद झालाच असेल! पण म्हणून यांनी कशाला दारू प्यायची?

पण वयाच्या दुसर्‍या वर्षापासून सगळे एकमेकांचे मित्र होते. भांडणे व्हायची, मारामार्‍या व्हायच्या पण चैन पडायची नाही एकमेकांशिवाय!

अप्पा सगळ्यात मोठा! अप्पा उर्फ सचिन जोशी! आई वडील नाहीत. सध्या बावीस वर्षांचा! तो बारावीनंतर कॉलेजला नकोसा झाला होता हे सत्य त्याने दडवून ठेवण्यात कमालीचे यश मिळवले होते व आता तो काहीही न करता मोठ्या भावाच्या पगारातील एक भाग स्वतःवर खर्च करून 'मी काहीतरी स्वतःचा बिझिनेस करणार आहे' हे विधान गेली दोन वर्षे रोज सहा वेळा विविध लोकांना ऐकवत होता. त्या विधानावर होत असलेली टीका तो नळी फुंकिली सोनारे प्रमाणे ऐकायचा. वहिनी मात्र त्याला सतत ऐकवायची की तो फुकट जगतो आहे. दोन वर्षांचा पुतण्या अभिवर त्याचे व अभिचे त्याच्यवर मात्र अत्यंत प्रेम होते.

विनीत हा अक्कांचा मुलगा! एकमेव, एकुलता एक! विनित गुजर! सध्या वीस वर्षांचा! अक्कांचे मिस्टर सरकारी नोकर होते व त्यांना जाऊन दहा वर्षे झाली असावीत. अक्कांना महिना साडे चार हजार पेन्शन मिळायची. त्यामुळे त्यांचे तसे बरे होते. विनित नुकताच बी कॉम झालेला होता व त्याला आता एका ऑफिसमध्ये सकाळी दहा ते दुपारी दोन असे पार्टटाईम सहा महिन्यांसाठी घेतले होते. त्याला आठशे मिळायचे. तेथे बरे काम केल्याचे वाटल्यास त्याला फुल्लटाईम घेणार होते. विनित दुपारी तीनपासून दुसर्‍या दिवशी सकाळी नऊपर्यंत त्यामुळे मोकळाच असायचा.

राहुल एकवीस वर्षांचा होता. राहुल बोधे! त्याचे वडील अर्धांगवायूच्या झटक्यामुळे गेली सहा वर्षे घरातच होते. मात्र त्याची आई एका लायब्ररीत काम करायची. सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी तीन तीन तास! त्यांना महिना अठराशे मिळायचे. लायब्ररीत असूनही! तसेच वडिलांचे काही पैसे होतेच! तसे बरे चालायचे. राहुल डिप्लोमा झाला असल्याने त्याला आता चांगला जॉब मिळणारच याबद्दल रास्ते वाड्याला खात्री होती. राहुलला एक मोठी बहिण होती. शैला! ती बावीस वर्षांची होती व एका केमिस्टकडे संध्याकाळी काम करायची. तिलाही आठशे रुपये महिना मिळायचे. तिला आत स्थळे बघत होते जोरात!

आणि.... 'तुम्हे याद हो के न याद हो' चा नायक... उमेश! उमेश राईलकर! वय वर्षे वीस! शिक्षण बी ए पास! नोकरी मिळेपर्यंत बेकार राहण्याचे ध्येय! घरात आई अरुणा, वडील अनंत, आजोबा मल्हार आणि लहान बहीण, क्षमा! वडील आयसेन फार्मा मध्ये कामाला! पगार तीन हजार! आई एका पतपेढीवर कामाला! पगार पंधराशे! क्षमा बारावीला! ती वर्षाच्या बरोबर असल्याने ती व वर्षा चांगल्या मैत्रिणी होत्या. विद्या लहान होती. नववीला!

एकंदरीत! भुमकर काकूंच्या मोठ्या मुलीवर, वर्षावर, विनितचे प्रेम, तिच्याबरोबर असलेली क्षमा ही उम्याची धाकटी बहिण! अप्पाचा मोठा भाऊ संसारात अडकलेला व अप्पापेक्षा बराच मोठा! राहुलची मोठी बहिण शैला ही अप्पाच्या बरोबरची! तिला स्थळ बघत होते. आणि अप्पा, राहुल, विनित व उम्या ही रास्ते वाड्यातील एकमेव चांडाळ चौकडी! भुमकर काकू आणि अक्कांचा उभा दावा! अप्पाच्या वहिनीचे अप्पाशी रोज भांडण! आणि उमेशच्या धाकट्या बहिणीशी विनितची निखळ मैत्री कारण वर्षा तिची वाड्यातील चांगलि मैत्रीण म्हणून!

अनेकदा वर्षा काहीतरी वाचत असल्याप्रमाणे वरच्या कॉमन गॅलरीत बसून यांचे क्रिकेट व त्यातल्यात्यात विनितने केलेली 'हाप्पीच - एक टप्पा आऊट' गोलंदाजांची वाड्याच्या मर्यादेतील धुलाई बघून सुखवायची. आत्ताही ती सुखावलेली होती कारण विनितने स्वतःच्याच आईला म्हणजे अक्कांना ओरडून आत जायला सांगितले होते आणि पुढेमागे या मुलाशी आपले लग्न झालेच तर सासुरवास हा मोठा प्रश्न येणारच नाही यावर वर्षाच्या मनात त्याही वयात स्वतःचेच स्वतःशीच एकमत झालेले होते.

अप्पा - च्यायला आता फोर अन सिक्स इकडे मारले तरच मोजता येणार...

विनित - का??

अप्पा - इकडे कोणतरी खडुस राहायला येणार असं दिसतंय...

विनित - कशावरून??

अप्पा - देव्हारा बघ की केवढाय! गायीच्या पोटापेक्षाही मोठा..

राहुल - आपण.. कचकड्याचा..

विनित - गप्प????? गSSSSप्प बस.. माझ्या प्रेमाचा पार सातारा होईल..

राहुलला कधीपासून कचकड्याच्या बॉलने खेळायचे असायचे कारण त्याला टेनिस आणि रबरी बॉलची लेदरच्या बॉलइतकीच भीती वाटायची. आजवर त्याने एकही कॅच घेतलेला नव्हता. अगदी एक टप्पा आऊट असूनही!

आणि कचकड्याच्या बॉलने खेळायला लागले तर वर्षा कशाला वरून पाहतीय??

विनितचा प्रॉब्लेम हा होता.

उम्या - मला वाटते आपण तिकडून बॉलिंग करत जाऊ आता.. इकडच्या बाजूला काय.. गोदाताईच आहेत..

अप्पा - नाही रे.. त्यांचे आता वय झाले आहे... बॉलच्या आवाजाने त्रासतील..

विनित - मी काय म्हणतो?? रात्री प्यासाला नकाशाच काढू ना?? टोटल पॉलिसी ठरवून टाकू..

अप्पा - नशेत डिसीजन नीट घेता येत नाहीत... आत्ताच एक कागद आणि पे....

'पेन' हा शब्द अर्धाच राहिला.. कारण सामान येत असताना आत्ता जी वस्तू आत आली ती पाहून तिघेही दिग्मूढ झालेले होते..

सायकल???????

रंगीत?????

लेडिज??????

इतकी नाजूक?????

विनितने तर वरच्या मजल्याकडे पाहणेच बंद केले...

अप्पा ती सायकल घराच्या आत पोचेपर्यंत टक लावून पाहात होता... राहुल रास्ते वाड्याच्या दाराकडे... अजून काही येतंय की काय हे पाहायला.. खरे म्हणजे.. त्या सायकलची मालकीण येतीय का हे पाहायला..

आणि उम्या??

उम्या - लेडिज सायकल.. मेलात तुम्ही सगळे आता.. आता रोज प्यासा बिसा वाड्यातच तुमचं..

अप्पा - का रे?? तू नाही का 'त्यातला'??

उम्या - मी त्यातलाच आहे.. पण मी वासनेने पिसाटलेला युवक नाही...

अप्पा - भडव्या.. सायकल पाहून इतके डायलॉग??

राहुल - मला वाटते क्षमाच्या वयाची असावी... तुझ्या बहिणीसारखी असणार उम्या..

उम्या - हा नाती जोडायला बसला सुद्धा... लेको पन्नाशीचं बांडगुळ चालवत असेल ती सायकल..

विनित - पण मी काय म्हणतो...

अप्पा - तुला तर मधे बोलायचा हक्कच नाहीये..

विनित - का??

अप्पा - तुझं आधीच जमलेलं आहे वर्षाशी...

विनित - त्याबाबत मी अजून तितकासा गंभीर नाहीये..

अप्पा - कानाखाली आवाज काढीन.. तू गंभीर आहेस आणि ती आहे की नाही या चर्चेवर आपण प्यासाचे तीन आठवडे बिल भरतोय..

विनित - मला असे वगळलेत तर तुमच्या आयुष्याला एका ब्राह्मणाचा शाप लागेल ब्रह्मचर्याचा..

अप्पा - आम्ही तिघे ब्राह्मणच आहोत... तुझा कसला घंट्याचा शाप..

उम्या - च्यायला सायकलवरून प्रेमापर्यंत पोचलात तुम्ही?? काय लाजा बिजा काही??

राहुल - तू गप रे...

अप्पा - राहुल्या.. त्या माणसाला विचार रे आडनांव??

राहुल - ओ... ओ काका...

काका - ???

राहुल - कुणाचं सामान आहे??

अप्पा, विनित आणि उमेश तिघेही फस्सकन हासले. सामान या शब्दाचा तसा अर्थ घेतला जात आहे हे पाहून काका सटकले पुढचं सामान आणायला...

अप्पा - ल्येका?? शिफ्ट कोण होतंय असं तरी विचारायचस.. म्हणे कुणाचं सामान आहे...

राहुल - आता बॅगा, कपाटं याला काय म्हणायचं मग?

अप्पा - नाय बरोबरे बरोबरे... सामानच आहे तेही..

उम्या - तुम्ही सगळे रास्ते वाड्याची इमेज घालवता..

राहुल - बोडक्याची इमेज आहे आपल्या वाड्याला..

उम्या - आडनांब काय आहे विचार राहुल्या..

राहुल - तू विचार आता.. तो बघ आला तो काका...

उम्या - ओ काका.. इथे येणारेत त्यांचं आडनांव काय आहे??

काका - का रे बाळ?? तुला का काळजी?? आ?

उम्या - एक आपलं .. माहीत असावं म्हणून विचारलं..

काका - बल्लाळ वासूदेव आपटे.. व्यवसाय पोलिस खाते...

उम्या - पो...

काका - पोSSSलिSSSसSSS

उम्या - ठीके ठीके...

काका हातातील चार बॅगा घेऊन घरात गेले.

राहुल - यड्यांनो.. तिकडे बघणे बंद करा आता... प्रकरण निराळंच निघालं...

हा मुद्दा जवळपास सगळ्यांनाच पटत असताना व सगळेच माना डोलावत असतानाचे एक मंजूळ हाक ऐकू आली..

"अहोSSS... याही बॅगा घ्या ना.. बाकीचं आम्ही आणतो..."

तो काका धावत बाहेर आला..

तोवर त्या मंजूळ आवाजाची मालकीण आत आली.. बॅगा घेऊन.. आवाजाइतकी मुळीच मंजूळ नव्हती ती..

उम्या - लेको.. अरे ती सायकल या बाईची आहे... वजन घटवण्यासाठी हल्ली बायकाही व्यायाम करतात..

पण तोवर अप्पाने सन्नाटा पसरेल असे वाक्य टाकले..

अप्पा - ते जाऊदेत बे.. मुद्दा लक्षात आला का तुझ्या??? आपल्याला जो हमाल वाटत होता तोच इथे राहणार आहे.. बल्लाळ वासूदेव आपटे..

काकाच पोलिस निघालेला पाहून सगळेच हादरले आणि उभे होते तिथून वाड्याच्या बाहेर जायच्या पावित्र्यात असतानाच...

स्तब्ध... थिजलेली.. आठ पावले...

जागच्याजागी थिजलेली...

मंजूळ सनईचे सूर आसमंतात पसरावेत... एका मंद सुगंधाने रास्ते वाडा भरून निघावा... वाड्याच्या पोपडे पडलेल्या भिंतींना सोनेरी झळाळी चढावी.. वसंत नसूनही कोकिळांनी कोमल सुरावटीच्या आग्रहासाठी मोर्चा काढावा.. भाकरी आणि दोडक्याची भाजी असे पान पाहून उठणार तेवढ्यात पानात आम्रखंड पडावे.. वगैरे वगैरे...

तसे झाले ते!

रास्ते वाड्याच्या प्रमुख चौकात जणू चार ऐतिहासिक महत्वाच्या व्यक्तींचे पुतळे असावेत तसे चौघे उभे होते.. नजर हटत नव्हती.. नजर ठरतही नव्हती... नजर मिसळतही नव्हती.. नजर कैद झालेली होती....

चाल है के मौज की रवानी
जुल्फ है या रातकी कहानी
होठ है के आईने कंवलके
आंख है के मयकदोंकी रानी

करायचीच म्हंटली तर सौंदर्याची तुलना फक्त काजलशीच करता येईल... हाफ राईसच्या! तीही थोडीफारच! कारण कदाचित काजल फिकीही पडेल!

तुझे देखा तो ये जाना सनम... प्यार होता है दिवाना सनम..

निवेदिता आपटे!

"हाय"

वार्‍याने बुजगावण्याची मान इकडे तिकडे फिरते तशा चार माना तिच्या त्या घरात तिचे पाऊल पडेपर्यंत वळत राहिल्या आणि काहीही न ठरवताही सगळे काही ठरले असल्याप्रमाणे यांत्रिक हालचाली करत सगळे बोळाच्या एन्डशी असलेल्या अंबिका उपहार गृह नावाच्या अत्यंत मळकट टपरीच्या सर्वात आतल्या बाकड्यावर बसले व आज प्रत्येकी एक विल्स पेटली. जास्त नाही, प्रत्येकी एक! एरवी एकाच विल्सच्या फिल्टरचे ओठाला चटके बसेपर्यंत धूर निघायचा.. तेही चौघांच्या थुंकीने एकच फिल्टर ओला होऊनही..

किमान सहा मिनिटे सदतीस सेकंद इतका विक्रमी कालावधी कुणीही कुणाशीही काहीही बोलत नव्हते..

त्यांच्यासमोर कटिंग चहाचे ग्लास आपटले गेले तरीही कुणी तिकडे ढुंकून पाहिले नाही... प्रत्येकाची नजर शुन्यात लागल्याप्रमाणे हवेत लागलेली होती...

बर्‍याच वेळाने राहुलला तोंड फुटले...

राहुल - अंहं...

अप्पा - काय अंहं??

राहुल - नाही जमणार..

अप्पा - काय नाही जमणार??

राहुल - मला यापुढे तुमच्याबरोबर नियमीतपणे क्रिकेट खेळणे जमेलच असे नाही....

अप्पा - तुला कधीचाच मी म्हणतोय की तू आमच्यात खेळूच नकोस.... एक कॅच घेता येत नाही तुला..

राहुल - अंहं... तू वेगळ्या विश्वात आहेस.. माझे विश्वच वेगळे आहे आता..

अप्पा - का??

राहुल - ती मला 'हाय' म्हणाली.. आता मला निष्ठेने वागलेच पाहिजे तिच्याशी...

विनित - तरी डोळ्याच्या खोबण्या तपासून घे म्हणून केव्हाचा मागे लागलोय मी याच्या...

राहुल - म्हणजे??

विनित - मला 'हाय' म्हणाली ती.. तुला नाही...

अप्पा - तुमची वयं काय आहेत रे??

विनित - अप्प्या भडव्या.. तू फार मोठा नाही आहेस...

अप्पा - अरे पण तीच विशीचीय.. तुमच्यापेक्षा मोठीय ती...

राहुल - मी एकवीस पूर्ण आहे....

विनित - अरे पण वयाचा प्रश्नच कुठे आला??

अप्पा - तू तर पहिलं बोलणंच बंद कर... वर्षाचं काय??

विनित - वर्षाला मी अजून हो म्हणालेलो नाही...

उरलेल्या तिघांना हसून ठसका लागला..

विनित - हसता काय लेकांनो ??

अप्पा - तू वर्षाला हो म्हणायला आधी तिने हो म्हंटलेले असायला हवे ना??

विनित - वर्षा हा टॉपिक मी काही काळ पेंडिंग ठेवत आहे...

राहुल - हे काही फेअर नाही...

विनित - घंट्याचं फेअर... तुम्ही काय फेअर वागताय रे??

उम्या - मी काय म्हणतो???

अप्पा - बका... तुम्ही पाडा उजेड आता..

उम्या - हे सगळं... चहाच पीत बोलायचंय का??

अप्पा - प्यासा अजून उघडायला एक तास आहे...

उम्या - तरी नुसतं तिथे जाऊन थांबायला काय झालं??

अप्पा - चला.. माझं काहीच नाही...

चौकडी चालत चालत प्यासापाशी आली तर ते उघडलेलं होतं... का तर म्हणे केव्हापासूनच सकाळी अकरापासून उघडायला लागलोयत.. तुम्ही आज पहिल्यांदा या वेळेला आलात..

प्यासाचे टायमिंग वाढल्याचे आभार मंडई गणपतीला देत सगळ्यांनी चकणा म्हणून बीअर मागवली आणि ड्रिंक म्हणून जीन!

बीअर आणि जीन असले कॉकटेल कुठल्याही मूर्खाने कधीही करू नये.. एक वेळ बीअर आणि व्हिस्की चालेल..

पण हे चौघे करायचे.. परवडायचं नाही म्हणून.... थोडीशीच घ्यायचे... ज्या दिवशी घ्यायचे त्या दिवशी वाड्याच्या चौकातच झोपायचे.. त्यामुळे कुणाला कळायचंच नाही की हे पिऊन आलेत... आणि कॉकटेलमुळे चढलेली मात्र असायची....

पहिला घोट घशात गेला आणि काही खारेदाणे तोंडात पडले प्रत्येकाच्या... दोन विल्स पेटल्या....

तिसरी पेटवण्याच्या इच्छेत असलेल्या राहुलच्या मनगटावर अप्पाचा फटका बसला.. उरलेला स्टॉक पुरवायला हवाच होता.. परवडतंय कुणाला हे सगळं बेकारीत???

विल्सचा धूर प्यासाच्या छताला पोचला तेव्हा विनितच्या तोंडातून पहिलं वाक्य बाहेर पडलं...

विनित - 'वर्षा' या प्रकरणाबाबत मी खूपदा विचार केला.. पण माझं अन तिचं... एकाच वाड्यात राहून. तेही आमच्या आयांची एवढी भांडणं असताना.. मला तरी शक्य वाटत नाही....

अप्पा - अ‍ॅक्च्युअली... वहिनी कधीच्या मागे लागल्यात.. नोकरी तरी करा ... नाहीतर लग्न तरी करा...

विनित - मग???

अप्पा - मलाही तेच वाटतंय... त्या तरी किती दिवस राबणार माझ्यासाठी...

विनित - हो पण म्हणून काSSय??

अप्पा - नाही.. एखादी चांगली मुलगी बघून.. म्हणजे... जिला आपण आवडतो हे आपल्याल माहीत आहे अशी मुलगी बघून...

विनित - अशी कोण मुलगीय??

अप्पा - आत्ता नाही का आली वाड्यात??

विनित - तुला इतक्यात चढली???

अप्पा - तुझं म्हणणं काय आहे??

विनित - सरळ आहे... ती मला हसून हाय म्हणाली... मी तिला आवडलेलो आहे...

राहुल - विन्या... अनेक वर्षांनी माझं आणि तुझं एकमत झालं...

विनितचा चेहरा उजळला...

विनित - तुलाही पटलं???

राहुल - येस्स... ती अप्पाला हाय म्हणालीच नाही...

विनित - मग??

राहुल - मला म्हणाली...

विनित - तुमच्या एकात तरी तिने हाय म्हणण्यासारखं काय आहे रे??

अप्पा - जे तुझ्यात आहे तेच...

विनित - मी शेवटचं सांगतो... माझ्यात आणि त्या आपटेमध्ये तुम्ही पडू नका.. वाईट होईल...

राहुल - आपटे काSSSSय... नांव नाहीये का तिला???

काहीही अपेक्षा नसताना उमेश हे दिव्य बाळ वदलं...

उम्या - आहे... नांव आहे तिला...

सगळेच हबकून त्याच्याकडे बघत असताना तो पुढे म्हणाला...

उम्या - निवेदिता.... निवेदिता आपटे..

अप्पा - तुला..

विनित - कस्काय रे माहीत???

उम्या - माझ्याबरोबर शाळेत होती... मी दुसरीला.. ती पहिलीत.... नंतर शाळा सोडून गेली... ती एकदम... आजच दिसली...

विनित - नाही नाही... ते ठीक आहे.. पण तुला नांव माहितीय म्हणून काय झालं???

उम्या - नुसतं नाव नाही माहिती मला...

राहुल - मग??

उम्याने दिलेल्या उत्तरातील आत्मविश्वास सच्चा आणि प्रामाणिक होता... त्यामुळेच सगळे आपापल्या ग्लासातील कॉकटेल शांतपणे प्यायला लागले व विषय तेथेच संपला..

उम्या - ती... हाय मला म्हणाली... तिने ओळखले मला..

गुलमोहर: 

येपी नवी कादंबरी.........
क्या बात है? लव स्टोरी.........
सही है बे.फी. लगे रहो..............

अरे वा..... मस्त झाली सुरुवात... शुभेच्छा नवीन भागासाठी,
मायबोलीवर येणं कमी झाल होतं, आता मात्र ठाणं मांडावं लागणार आहे पुर्वीसारखचं..... पु. ले. शु

व्व्व्व्वा !!!!!!!!!!!!!!!
नविन....
वाचायाला घेते लगेच.....

खूप धन्यवाद नानासाहेब, कधीतरी वेळ काढा, आपण दोघेही जाऊयात! मनापासून म्हणतोय. (अर्थात, मी आपला आय डी चेक केलेला नाही, पुण्यात असाल असे गृहीत आहे.)

उम्या - लेडिज सायकल.. मेलात तुम्ही सगळे आता.. आता रोज प्यासा बिसा वाड्यातच तुमचं..

अप्पा - का रे?? तू नाही का 'त्यातला'??

उम्या - मी त्यातलाच आहे.. पण मी वासनेने पिसाटलेला युवक नाही...

अप्पा - भडव्या.. सायकल पाहून इतके डायलॉग??

सावट चा पहिला भाग वाचून डोक्याचा भुगा झाला होता खरा , पण आता बरं वाटतय्.
पुढील सगळे भाग नक्की वाचणार आहे..
सुरूवात आवडली.

तुम्हे याद हो के न याद हो ---- व्वा , हमे सोच रहे थे आज क्या पढे Sad

क्लालिटी आणि क्लांटिटी कादंबर्यांची ---- आप हमेशा याद रहेंगे Happy

काय राव किती भराभर सुचत तुम्हाला, सावट वाचून डोक्याचा भुगा झाला होता आणि आता हलकी फुलकी लव स्टोरी ---- धन्यवाद Happy

कालच तुम्ही चालू केलेला फलक वाचला होता राजन खान यांची मते तुम्हाल आवडली असे लिहिलेत पण तुम्हाला कळत्य का, तुम्ही या चाळ, त्यातली बेकार ,सिग्रेटी फुकनारी , दारू ढोसणारी पोरे, तशाच चाळकरी लैला , ते फडतूस जोक्स या डबक्यातून बाहेर यायला तयार नाही आहात. सगळं तेच ते तेच ते वाटत आहे या पहिल्या पार्ट मधे तरी. कंटाळा कसा येत नाही तेच लिहायला ?नुस्ते भरमसाट लिहण्याने काय मिळते नक्की ? खरच प्रशन पडला आहे.

सर्वांचा आभारी आहे. Happy

ए-मॅन,

माझ्या त्या मर्यादा आहेत. मी यापेक्षा चांगले (हेही चांगले आहे असे म्हणतच नाही आहे) लेखन करू शकत नाही. पण माझ्याकडे वेळ असतो म्हणून अधिकाधिक प्रसिद्ध व्हायच्या उर्मीने (येनकेन प्रकारेण) मी काही ना काही लिहितोच! आपण मोठ्या मनाने सांभाळून घ्यावेत. Happy

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

क्लालिटी आणि क्लांटिटी कादंबर्यांची ---- आप हमेशा याद रहेंगे >>> १००% अनुमोदन
पुढील भाग येउद्यात.

नमस्कार बेफिकिरजी,

मी पण ऐ मैनशी थोडासा सहमत आहे..पण ते कदाचित तुमच्या सगळ्या कान्दबर्या एकदम वाचुन काढल्यामुळे असेल.
खुपच वेगवान आणि खिळवुन ठेवणार लिहिता तुम्हि पण शेवट कधी कधी गन्डतो..

खास तुमच्यासाठि मी मेम्बर झालोय. Happy

बब्बन...

Pages