सावट - ११ - अंतिम भाग

Submitted by बेफ़िकीर on 21 May, 2011 - 04:37

मायबोली प्रशासनाचे मनापासून आभार की ही कादंबरी येथे प्रकाशित होऊ दिली. या कादंबरीची मूळ कल्पना श्री. मंदार जोशी यांची! मला ती कल्पना कितपत जमली ते कृपया कळवावेत. सर्व प्रतिसादक, चुका सांगणारे तसेच सर्व वाचक यांचाही मी ऋणी आहे.

ही कादंबरी (सस्नेह) गगोवरील माझ्या सर्व मित्रांसाठी बहाल!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!
===========================================

बाहेरच्या कुणीही आत्ता आत डोकावून पाहिले असते तर 'हे काय खुळ' म्हणून वैतागून तेथून निघून गेले असते.

एक मोहरीचं वर्तुळ! जे जाणवणारच नाही कारण मोहरी एवढीशी! त्या वर्तुळात अजित कामत बसला आहे. म्हणजे अजित कामतचे शरीर!

आणि वर्तुळाबाहेर एक आजच तीन वर्षांचा झालेला लहान मुलगा!

दोघेही एकटक एकमेकांकडे बघतायत! पापणीही लववत नाही आहेत. आणि आजूबाजूला पडलेल्या वस्तू तर अशा की कुणी सहज म्हणूनही हातात घेणार नाही. कवटी, हाडे आणि एक...

... एक तुटलेला हात!

मात्र!

त्या क्षेत्रातील काहीही ज्ञान असणारी व्यक्ती जर तेथे डोकावली असती... तर अक्षरशः भीतीने पाय लावून किंचाळत पळून गेली असती.

इट वॉज नॉट दॅट सिम्पल!

एक भयानक अघोरी युद्ध चालू होते तिथे! ती फक्त नजरानजर नव्हती.

जिवाच्या आकांताने अजित कामत स्वतःचा होणारा चौफेर पराभव फक्त पाहात होता.

किंचाळत होता, विव्हळायचाही अवधी नव्हता मिळत त्याला!

अजितच्या खोलीत बसलेल्यांना मात्र आता एकही आवाज येत नव्हता. पण नियम तो नियम! जोवर अजित कामत असे म्हणत नाही की बाहेर या, तोवर बाहेर जायचे नाही.

पण अजित कामत आत्ता काहीही म्हणण्याच्या परिस्थितीत नव्हता.

तो फक्त उत्तरे देत होता बर्वेला! किंचाळून वेदना सहन करत. कारण प्रत्येक प्रश्नाला तो नजरेच्या पात्याने अजितच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने बोचावे तशा जखमा करत होता.

बर्वे - किती शरीरे बदललीस??

अजित - सोळा..

बर्वे - किती वर्षात??

अजित - ८२६

बर्वे - आता सांग कोण आहेस तू??

अजित - राजाराम भट..

बर्वे - व्यवसाय??

अजित - आधी पौरोहित्य करायचो.. पण नंतर..

बर्वे - अक्कल आली.. होय ना??

अजित - .....

बर्वे - अक्कल कशी आली??

अजित - दृष्टा.... दृष्टान्त झाला..

असह्य वेदनांनी तळमळत अजित उत्तरे देत होता. त्यातच बर्वे खदाखदा हासून त्याची मजा बघत होता.

बर्वे - काय दृष्टान्त झाला??

अजित - दुष्प्रवृत्तींचा नाश कर..

बर्वेने आणखीन एक वार करून अजितचे नाक कापले. ऐकू आल्याच असत्या तर ऐकवणार नाहीत अशा किंकाळ्या फोडल्या अजितने! जागच्याकागीच तडफडत! कारण हात पाय हालवताच येत नव्हते. पद्मासनामध्येच बसावे लागत होते. बर्वे मात्र हासत होता.

बर्वे - अच्छा.. दुष्प्रवृत्ती काय मी??

अजित - नाही... नाही... माफ करा..

अजितच्या मागे शक्ती असली तरी आत्ता तीही बर्वेच्या सामर्थ्याने स्तिमित झालेली होती. ती मधे पडूच शकत नव्हती.. त्यामुळेच अजितला आतामाफी मागण्याशिवाय काही उपायच राहिलेला नव्हता..

बर्वे - मग?? करतोयस काय माझा नाश??

हासत हासत बर्वेने हा प्रश्न विचारतानाच अजितच्या तुटलेल्या नाकाच्या खोबणीत दाभण घुसवावे तशी स्वतःची नजर घुसवली. आता अजित गुदमरू लागला होता.. काहीही पर्याय राहिला नव्हता आता मृत्यूशिवाय.. एक मृत्यूनंतरचा मृत्यू...

बर्वेने दाभण काढून त्याची घटकाभर सुटका करत विचारले..

बर्वे - ज्ञानेश्वरांना ओळखतोस काय??

अजित - नाही.. मी आत्ताच्या मुंबईच्या भागात होतो...

बर्वे - अच्छा... कुणाकुणाचा नाश केलास??? खरे सांगशीलच म्हणा...

अजित - ११२ जणांची बाधा काढली.. दोघांना असाध्य व्याधीतून सोडवले.. आणि.. १४.. १४ माणसे मारली..

बर्वे - कोणकोणती???

अजित - ती सगळी अठराव्या शतकापर्यंतची होती... तुम्हाला माहीत नसणार..

बर्वे - हं! म्हणजे मी एकटाच विसाव्या शतकातला तर?? अं??

अजित - नाही मारू शकत मी तुम्हाला... पाय धरतो तुमचे... सोडा मला.. मला हे सहन होत नाही... नाही तर नष्ट तरी करा...

बर्वे - मादर**... माझ्या कुटुंबाचा नाश करताना मी धरले का पाय तुझे?? तुझे तेच होणार आहे जे त्या काळी तू माझ्या मुलीचे करायला लावलेस..

अजित भयाने विव्हळत रडू लागला. त्याच्या कल्पनेतही येऊ शकणार नाही असा मृत्यू त्याला मिळणार होता.. बर्वेच्या कुमारिका मुलीवर गावातल्यांनी अत्याचार केलेला होता... त्याच्याच समोर.. तोच मृत्यू अजितला मिळणार होता.. अजितवर अघोरी अमानवी अस्तित्वे तुटून पडणार होती.. बर्वेने त्यांना खास आमंत्रित केल्याचे आजूबाजूला जाणवतच होते.. हिडीसतेची परमावधी! त्या अत्याचारांना सहन करेस्तोवर अजितला अस्तित्व राहणारच होते हेही बर्वेने नक्की केलेले होते... अत्यचारांचा शेवटचा क्षणही त्याला सहन करावाच लागणार होता..

बर्वे - हे घे.. हे घे रक्त...

बर्वेने एका रानटी पक्ष्याचे रक्त अजितच्या अंगावर उडवले.. अ‍ॅसीड पडावे तसा किंचाळला अजित...

बर्वे मात्र हासत होता...

बर्वे - का?? चव आवडत नाही?? मी तरी पितो बाबा?? हे बघ...

अघोरी प्रकार पाहायला मिळाला अजितला! अगदी काका थोरातच्या शरीरात असतानाही त्याने असला पक्षी नियंत्रणात आणलेला होता.. मात्र बर्वे रक्त पीत असताना मिळालेल्या एका क्षणाच्या अवधीत त्याने पटकन त्याच्या शक्तीला स्मरले व पाचारण केले.. अर्थातच बर्वेला ते जाणवले..

त्याने अजितला अद्दल घडवली.. अजितचा एक डोळा गेला त्या प्रकारात.. मात्र त्याला हालताच येत नव्हते.. अशी तडफड त्याने कधीच सहन केलेली नव्हती..

बर्वे - तिची हिम्मत नाही आता माझ्यासमोर यायची.. मी सत्ता करणार आहे सत्ता येथे... तू तर आता नष्ट होशीलच... पण तीही नष्ट होईल..

अजित - सोडा हो मला...

बर्वे - हं! आठशे सव्वीस वर्षे काय! कसा काय जगू शकलास?? हे असले तुटके हात मिळवून??

अजित - हो... होय..

बर्वे - तुझा वंशज नाही का कुणी??

अजित - उत्तर प्रदेशात गेल्या आमच्या पुढच्या पिढ्या...

बर्वे - बोलवायचं का त्यातल्या एकेकाला??? इथे???

अजितने लोळण घेतली बर्वेच्या पायांवर! बाहेरून पाहणार्‍याला अजूनही तो पद्मासनातच असल्याचे दिसले असते.... बर्वेने त्याला तुडवून लांब केले आणि..

एका भयानक अस्तित्वाला तेथे स्वरूप द्यायला सुरुवात केली...

फक्त अजितलाच ते जाणवले.. आपल्याच डोळ्यांनी आपलाच मृत्यू पाहणे त्याला आता सहन करावे लागणार होते...

शेवाळी रंगाचा प्रकाश पसरला त्या खोलीत... नरकातही येणार नाही अशी दुर्गंधी... अजित आता फक्त पाहूच शकत होता... प्रकाशाने खोलीच्या कोपर्‍याकोपर्‍यातून एकवटत एक स्वरूप धारण केले..

हिडीस! हिडीस हा एकच शब्द चपखल होता त्या स्वरुपाला!

ती एक अजस्त्र काळीकभिन्न बाई होती.. शेवाळी रंगाचा आता काळाकुट्ट रंग झालेला होता.. त्या स्त्रीला अनेक भुजा होत्या.. जीभेवर रक्त होते... डोळे अवाढव्य व खोबणीतून बाहेर आल्यासारखे.. चवताळल्यासारखी ती अजितकडे पाहात होती..

बर्वे - हा गोकाकचा एक ब्राह्मण ... मी मारला होता येथेच बसून..पन्नास वर्षे झाली.. ही बाई नाही आहे.. हे स्वरूप मी दिले आहे त्याला.. भोग आता त्याचे अत्याचार.. तो अर्धवट जळला होता मेल्यावर.. त्याचे मन थोडेसे अस्तित्वात होते.. मी त्यावर कब्जा केला आणि असेच जळलेले शरीर त्याला प्रदान केले.. मात्र त्या प्रकारात तो बाईसारखा दिसू लागला.... पन्नास वर्षात पूर्ण अग्नी न मिळाल्याने अघोरी अस्तित्वांच्या उपस्थितीमुळे तो असा भयानक दिसू लागला आहे...

यावेळेस मात्र अजितने फोडलेली किंकाळी त्याच्या खोलीत बसलेल्यांनाही ऐकू आली... नखशिखांत शहारत सगळे एकमेकांकडे बघत होते...

मनूचेही शरीर आता वाढत वाढत बर्वेसारखेच झाले होते.. मात्र चेहरा मनूचाच होता..

बर्वेने आता त्याची पूजा सुरू केली.. आत्तापर्यंत अजितच्या पूजेच्या सामुग्रीवर तो नियंत्रण ठेवून होता..आता त्याने स्वतःची साधने घेऊन पूजा सुरू केली.. तो चवताळलेला गोकाकचा ब्राह्मण अजितवर तुटून पडला.. अजितचा आता आवाजही ऐकू येत नव्हता..

बर्वे पूर्ण रुपात प्रकट झाला होता... मनूच्या रुपातून पूर्ण बाहेर आल्याशिवाय त्याला ती पूजा करताच येणार नव्हती... त्या पूजेचा हेतू होता अजितच्या मागे असलेल्या शक्तीलाही त्या वर्तुळात आणणे..

त्याच शक्तीने बर्वेला सामर्थ्य दिलेले असले तरीही बर्वेने अचाट प्रयत्न करून स्वतःला मूळ शक्तीपेक्षाही मोठे बनवण्यात यश मिळवलेले होते..

आता मनूचा चेहराही राहिलेला नव्हता.. आताबाहेर्न कुणी पाहिले असतेच तर त्याला मनूच्या जागी बर्वे दिसला असता..

बर्वे! तसाच त्या वेळेस झालेला खांद्यावरचा वार! अर्धवट जळलेले शरीर... एका गालात पक्ष्याने चोच खुपसून केलेली जखम तशीच ताजी.. रक्त वाहात आहे.. शरीराचे अनेक तुकडे एकमेकांपासून अशा अंतरावर आलेले आहेत की ते दिसायला एक शरीर वाटावे..

उघड होते... ही पूजा बर्वेच जिंकणार होता... अजित तर आता बर्वेकडे पाहण्याच्याही मनस्थितीत नव्हता.. गोकाकचा ब्राह्मण त्याच्या शरीराचे इतके हाल करत होता की मरत असलेली मेंढी जशी हळूहळू निर्जीव होईल तसा अजित होऊ लागला होता..

आणि त्यातच तो भयानक प्रकार घडला... केवळ सातव्या मिनिटालाच...

अख्खे दिवे गाव त्या आवाजाने हादरले.. स्मशानामागे असलेल्या हाडांच्या तुकड्यांमध्ये जणू जीव आला.. जितके मुडदे आजवर तेथे जाळण्यात आले होते त्या सर्वांना काही वेळासाठी पुन्हा अस्तित्व मिळाले.. थरथर सुरू झाली स्मशानावर... दिवे गावातील एक आणि एक पक्षी स्तब्ध होता.. झाडांची सळसळ थांबलेली होती... कुत्री रडू लागली होती.. आजवर आले नसेल असे एक भयानक सावट अख्ख्या गावाचाच कब्जा करत होते...

आणि त्याचे कारण एकच... ती शक्ती... ती शक्ती एक मरणप्राय किंचाळी फोडून त्या वर्तुळात प्रवेशली होती.. ती आता बद्ध होती.. मोहरीच्या वर्तुळात... अजितप्रमाणेच..

बर्वेचा दुमदुमणारा हास्याचा आवाज आणि त्या शक्तीची ती भयानक किंकाळी मात्र प्रत्येकालाच ऐकू आली.. इतकेच कळले की यातला कुठलाच आवाज मनूचाही नाही आणि अजितचाही!

सकाळच्या केवळ पावणे नऊ वाजता हा प्रकार झाला होता.. दिवे गावात जणू अंधारूनच आले होते..

आणि बर्वेने एका हाडकाने त्या शक्तीला छेडले.. त्या शक्तीला एका स्त्रीचे स्वरूप होते... पण आकार होता बाहुलीइतकाच! बर्वेच्या छेडण्यामुळे असह्य वेदना व्हाव्यात तशी ती बाहुली किंचाळली..

बर्वे - हं! या देवी... या.. तुमचीच वाट पाहात होतो कित्येक दशके... आम्हाला.. या भक्ताला आशीर्वाद द्या.. की मी यशस्वी होईन.. नैवेद्य म्हणून हे रक्त प्राशा.. घ्या हे रक्त...

बाहुली तडफडत किंचाळत होती त्या रक्ताचे थेंब अंगावर पडल्यावर! मात्र ती अजितसारखी सामान्य अस्तित्वाची नव्हती. ती होती अजित आणि बर्वे दोघांची गुरू! तिने त्याच्क्षणी जोरदार प्रतिकार सुरू केला.. इतका.. की तीन चार क्षण बर्वेही भांबावला...

बाहुलीने झाडलेल्या लाथेने बर्वे सटपटला.. पूजाच उधळते की काय अशी अवस्था झाली.. सटपटलेल्या बर्वेने त्याच क्षणी आणखीन थोडे रक्त बाहुलीवर टाकले.. मात्र बाहुलीने सर्व शक्ती एकवटून घनगंभीर आवाजात एक मंत्र म्हंटला... बर्वेला तो मंत्र पाठ नसला तरी तो मंत्र कसला आहे हे त्याला पूर्ण माहीत होते... नाश! विनाशाचा मंत्र! आपला विनाश होणार हे बर्वेला जाणवले! मात्र त्याने धीर धरून खोलीतील एका दुसर्‍या अस्तित्वाला जागे केले.. ते अस्तित्व होते गाणगापूरपाशी राहणार्‍या एका म्हातारीचे.. तिने खदाखदा हासत ती बाहुली उचलली व फेकणार तेवढ्यात बर्वेने तिला जाणीव दिली की मोहरीच्या वर्तुळाबाहेर बाहुली गेल्यास तुझी आणि माझी खैर नाही.. बाहुली मात्र ते ऐकून हसूच लागली.. तिच्या दृष्टीने मोहरीचे वर्तुळ उधळवणे आता एक किरकोळ बात राहिली असावी.. मात्र बर्वेचे ऐकून म्हातारीने बाहुली वर्तुळातच आपटली आणि नख्यांनी बाहुलीला सोलायला सुरुवात केली.. तरीही बाहुलीला वेदना होत नव्हत्या.. उलट अधिक शक्ती लावून तिने मोहरीचे वर्तुळ लाथेने उधळवले.. ते पाहून तर बर्वेसारखा बर्वे हादरला आणि अक्षरशः खोलीबाहेर धावत आला.. हे घाबरणे मात्र मानवि आणि अमानवी याच्या कक्षेबाहेरील असल्याने अजितच्या खोलीत असलेल्या सर्वांना ऐकू आले आणि पाठोपाठ पळण्याचा आवाज काहीसा जवळ आल्यामुळे भीतीयुक्त कुतुहलाने सगळेच एकदम उठू लागले... तरीही त्यांच्या कानात एक वेदनांनी तळमळत असलेला पण परिचित आवाज घुमला..

"नका हालू.. हालू नका अजिबात... आपण पूजा जिंकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.."

दिवे गावाच्या स्मशानाकडे जर आत्ता कुणी पाहिले असते तर त्यांना ते स्मशानही गदागदा हालत असल्यासारखे वाटले असते... इतके अमाप सावट सर्वत्र होते..

बाहेर पळालेल्या बर्वेची गाळण उडालेली पाहून गोकाकचा ब्राह्मण मात्र हादरला आणि त्याने तत्क्षणी स्वतःचे अस्तित्व तेथून नष्ट केले व तोही खोलीच्या बाहेर पळून गेला.. त्याचे ते जाणे मात्र कुणालच जाणवू शकणार नव्हते.. त्यालाही पळता पाहून बर्वे अधिकच घाबरला.. मात्र ही संधी गेली तर आपले काय होईल याची बर्वेला कल्पना असल्याने प्रचंड धीर एकवटून त्याने पुन्हा खोलीत पाऊल टाकताक्षणीच...

एक प्रचंड हल्ला झाला त्याच्यावर... बाहुली आणि अजित दोघांचाही.. फरफटत बर्वे पुन्हा वर्तुळात आणला गेला.. खोलीत आता भीषण हास्याचे प्रतिध्वनी उमटू लागले.. एक इतर फायदा इतकाच की खोलीतले म्हातारीचे अस्तित्व किंचाळत नष्टच झाले आणि इतर अस्तित्वांनी गाशा गुंडाळला..

बाजी पुन्हा पलटली होती...

आता वर्तुळात होता बर्वे... आणि बाहेर होती बाहुली आणि अजित!

थंड! शांत नजरेने बाहुली आणि अजित बर्वेकडे पाहात होते.. त्याला आता पुन्हा मनूचे स्वरूप येणे अशक्य झालेले होते... आता त्याला मारला की मनू मरणारच होता.. हे निश्चीत झालेले होते..

बाहुली वर्तुळाबाहेर तांडव करू लागली.. अती भेदरलेल्या बर्वेच्या घशातून आवाजही निघू शकत नव्हता..

उधळले गेलेले वर्तुळ अजित पुन्हा लावू लागला तसा मात्र बर्वे जिवाच्या आकांताने किंचाळू लागला.. बाहुली अजूनही तांडव करत वर्तुळाभोवती नाचत होती... तिचे ते भयप्रद आविर्भाव आणि डोळ्यांमधून येणार क्रोधाचा लाव्हा पाहून बर्वेला आपला अंत समजून चुकलेला होता..

अपार वेदना सहन केलेल्या अजितच्या चेहर्‍यावर आता एक विकृत स्मितहास्य आले... ते रुंदावत चालले होते... बर्वे पक्डला गेल्याचा आनंद त्याला हळूहळूच व्यक्त करणे शक्य होते.. कारण सुप्रीम पॉवर तेथेच होती... आता अजितच्या हसण्याचा आवाज अधिकाधिक स्पष्ट होऊ लागला तसे अजितच्या खोलीत सर्वांनाच काहीसे बरे वाटले..

बाहुलीने आपला तांडवाचा वेग कमी केला व शेवटी ती स्थिरावली आणि तिने मंत्र पुटपुटायला सुरुवात करताच अजित अत्यानंदाने खोलीत नाचू लागला.. कारण बर्वेचा अंत जवळ आलेला होता... बर्वे बीभत्स आवाजात किंचाळत होता..

मात्र बाहुलीला इतका सोपा प्रकार करायचा नव्हता.. तिला जाणून घ्यायचे होते की बर्वेचा मागे आणखीही कुणी आहे की काय ज्यामुळे तो इतका पुढे पोचला..

बाहुली - कुणाची उपासना???????

बर्वे - समंध..

बाहुली - कोणता???

बर्वे - सावेळ्यात एक जण मेला होता... त्याच्यातून निर्माण झाला होता..

बाहुली - नांव???

बर्वे - जालिंधर ...

बाहुली - कुठे असतो तो??

बर्वे - खलास केला त्याला मी...

बाहुली - कसा??

बर्वे - तु... तुमच्याच शक्तीने..

बाहुलीने पहिला वार केला. लाथेने बर्वेचे पोट ढवळून काढले... बर्वे तिथल्यातिथेच रक्त ओकला..

बर्वे - आणि त्याच्या ताकदीने मला खलास करणारेस??

मगाचची अजितचीच स्थिती आता बर्वेची झाली.. तो माफी मागू लागला.. सुटकेची याचना करू लागला.. मात्र अजितला कितीही राह आला तरी आत्ता कोणतीही अ‍ॅक्शन घेणे त्याला शक्य नव्हते... कारण बाहुली स्वतःच तेथे होती...

बाहेरचे सावट मात्र हळूहळू लोप पावू लागले होते... याची जाणीव पशू पक्षी झाडे यांनाच नाही तर मानवांनाही होऊ लागली होती..

बर्वेचा एक हात बाहुलीने जाळून टाकला तसा मात्र बर्वे भयानक ओरडला..

बाहुली - काय सांगितलं होतं मी?? आठव...

बर्वे - चां... चांगल्या... साठी..च .. वापरायचे सामर्थ्य..

बाहुली - आणि तू काय केलेस??

बर्वे - ना.. ही वा.. परले..

बाहुली - अंत मान्य आहे??

बर्वे - मा... माफी.. हवी आहे.. एकदाच... फक्त एकदा... इथून निघून जाईन..

बाहुली - आणि इतर ठिकाणी तेच करेन..

बर्वे - नाही... अजिबात नाही करणार...

ही प्रश्नोत्तरे चालताना मात्र अजित वेगळाच विचार करू लागला. त्याच्या मनात तो विचार आला हे समजल्याक्षणीच बर्वे आणि बाहुली अचानक स्तब्धपणे त्याच्याकडे क्षणभर पाहू लागले.. त्याच क्षणी अजितने एक मंत्र पुटपुटला आणि ते दोघे मात्र स्तब्धच झाले..

एक निराळेच.... अत्यंत निराळे नाट्यमय वळण लागलेले होते सर्व प्रसंगाला..

अजितच्या मनात आलेला तो विचार कोणता??

तर वर्तुळ सहजपणे उधळवून लावण्याचे सामर्थ्य जर बाहुलीत असेल... तर मुळात ती आधी वर्तुळात येईलच कशी??? येऊन त्रास सहन करेलच कशी?? आपल्याला त्रास होत असताना आणि आपण तिची प्रार्थना करत असतानाच तिच्या सामर्थ्याची चुणूक दाखवून आपल्याला वर्तुळाबाहेर का काढणार नाही???

हे सगळे काय चाललेले आहे???

अभद्रतेची आणि विकृतीची कमाल झालेली होती...

मनीषा काकडेचा हात घेण्याचे धाडसच काका थोरातने करायला नको होते...

कारण त्याला तो हात हवा होता नवीन शरीर मिळवण्यासाठी... आणि नवीन शरीर हवे होते बर्वेला नष्ट करण्यासाठी..

मात्र... तो फसवला गेला होता..

त्याच्यासमोर नाटक वेगळेच केले गेलेले होते..

बाहुली आणि बर्वे... एक होते..

अत्यंत मोठा धक्का होता हा त्याच्यासाठी...

तो आत्ता जो मंत्र म्हणत होता त्याचा उद्देश एकच होता... कोणत्याही अमानवी अथवा अघोरी संकटापासून स्वतःचे पूर्ण संरक्षण करण्यासाठीचा तो मंत्र होता... मगाशी हाच मंत्र तो म्हणणार होता.. वर्तुळात असताना.. पण तेव्हा त्याला बाहुलीच्या आधाराची अपेक्षा होती... हा मंत्र एकदाच म्हणण्याचा मंत्र होता..तो त्याला बाहुलीनेच शिकवला असला तरी त्या मंत्राचा वापर केल्यावर त्याला बाहुली आणि बर्वे काहीच करू शकत नव्हते.. या मंत्रावरही परिणाम करणारा असाही एकच मंत्र होता.. मात्र तो मंत्र तेव्हाच म्हणता येणार होत जेव्हा अजित त्याचा मंत्र म्हणताना श्वास घेण्यासाठी एका क्षणाहून अधिक काळ थांबेल.. हेही माहीत असल्याने अजित अत्यंत त्वरेने मंत्र म्हणत होता.. बाहुली आणि बर्वे स्तब्ध झालेले होते ते त्याचसाठी..

मात्र... संपूर्ण गेस्ट हाऊसवरचे सावट गडद झालेले होते.. वाट पाहात होते त्या एकाच क्षणाची.. जेव्हा अजित श्वास घ्यायला थोडासाच अधिक थांबेल... त्या क्षणी बर्वे आणी बाहुली दोघेही तो मंत्र म्हणू लागणार होते... ते दोघे कसे काय आणि कधी आणि कशासाठी एक झाले हेच अजितला समजत नव्हते.. पण एक नक्की होते... त्याने आजवर एकही दुष्कृत्य केलेले नसल्यामुळे बाहुली ज्या अर्थी बर्वेची साथ देत आहे तय अर्थी बाहुलीही भ्रष्ट झालेली आहे हे त्याला नक्की समजलेले होते...

तीन तास!

तीन तास अव्याहतपणे असा मंत्र म्हणणे.. तेही पाण्याचा एक घोटही न घेता.. कोणत्याही सामान्य माणसाला शक्य नाही... अजिबातच शक्य नाही..

बाहेरचा जर कुणी आत येऊ शकला असताच तर त्याला एक विचित्र दृष्य दिसले असते... ते म्हणजे..

जमीनीवर एक बाहुली उभी आहे.. आणि शांतपणे गोल फिरत आहे स्वतःभोवती.. बर्वे नावाचा एक म्हातारा... अनेक जखमा सहन करतही स्तब्धपणे दुसर्‍या एका माणसाकडे बघत आहे.. आणि तो दुसरा माणूस म्हणजे अजित... काहीतरी पुटपुटत आहे... निश्चलपणे... मधे श्वास घेण्यासाठी जेमतेम अर्धा क्षण थांबला तर सातत्याने.... !!!!!!!!

मात्र.... बाहेरचे कोणीही तेथे येऊच शकत नव्हते... हा भयंकर प्रकार बघणे दूरच.. गेस्ट हाऊसमध्ये पाय टाकणेही कुणाला शक्य नव्हते... मंतरलेली वास्तू होती ती आत्ता पूर्णपणे...

पण.................

...... पण गेस्ट हाऊसवर जे मुळातच होते ते???

त्यांचे काय???

ते धीर धरून... चक्क... कसलाच आवाज येत नाही हे पाहून... त्या खोलीच्या दारात येऊन उभे राहिले होते... त्यांच्यासाठि हा चाललेला प्रकार अगम्य असावा... कारण ते डोळे विस्फारून बघत होते... बाहुली हळूहळू गोलाकार फिरतीय... मनू तर नाहीच आहे????? त्याजागी जखमी झालेला बर्वे स्तब्धपणे अजितकडे बघतोय... अजित पुटपुटतोय... आणि... तिघांनाही जणू या दारात थांबलेल्यांच्या अस्तित्वाची जाणीवच नाही आहे..

अजितने सांगितलेले होते की पूजा चालू असताना आलात तर पूजा उधळली जाईल... पण चार तास?? पहिला भयानक आवाजांचा तास आणि हे पुढचे भीषण शांततेचे तीन तास???

इतका कालावधी झाला तरी काहीही होत नाही... काय चाललंय का??

सगळे जण तेथे आले तरीही पूजा उधळली गेली नाहीच कारण.. पूजा आता केव्हाच संपलेली होती आणि आता चालू होते एक नाट्य... ज्याचा अंत काय होणार हेच समजत नव्हते... मात्र कुणीही अजितला हाकही मारली नाही...

आणि शेवटी एकदाचा तो क्षण उजाडू लागला..

... तो भयानक क्षण.. जेव्हा.. अजित कामतच्या शरीरात असलेल्या अस्तित्वाला त्या शरीराच्या मर्यादांमुळे दम लागू लागला..

बाहुलीचे फिरणे थांबले... बर्वे अ‍ॅलर्ट स्थितीत बसला.. बाहुली एकटक अजितकडे पाहू लागली.. आणि दारातले सगळेच जण आतल्या तिघांकडेही... त्यांना भीतीच वाटेनाशी झालेली होती..

श्वास... !!!

एकेका श्वासासाठी अजित आता धडपडत होता... तरीही मंत्रपुटपुटतच होता...

पण.. मर्यादा... त्यालाही मर्यादा जाणवल्याच... त्याने पटकन दाराकडे बघत दारातल्यांना दारातून बाजूला व्हायच्या खाणाखुणा केल्या.. दम लागत असला तरी तो पुटपुटतच होता..

पण हे दारात असलेले सगळे मूर्ख तरी होते किंवा त्यांना अजित खाणाखुना करत आहे हे बहुधा समजतच नसावे.. ते तिथेच वेड्यासारखे खिळून रहिलेले होते..

आणि ... आला तो क्षण एकदाचा... ज्याची अत्यंत आतुरतेने बाहुली आणि बर्वे वाट पाहात होते..

एका क्षणाहून अधिक अवधी लागला अजितला श्वास पुन्हा फुफ्फुसांमध्ये भरून घ्यायला..

आणि ... सर्व काही संपले..

कारण त्याच क्षणी... बाहुलीने अत्यंत टीपेच्या आवाजात मंत्र सुरू केला... बर्वे त्या आवाजात स्वतःचा आवाज मिसळवू लागला.. मात्र बाहुलीचा आवाज अक्षरशः कर्णकर्कश्श होता.. अजित कामत मात्र आता मंत्र म्हणायचाच थांबला होता... कारण आता त्या मंत्राचा उपयोग काहीच नव्हता...

तो ताडकन उठला...

दारातून कुणीच मूर्खासारखे हालत नसल्याने बेभान होपऊन अत्यंत संतापाने त्याने सतीशला ढकलून दिले.. पण.. त्यची ताकद बहुधा अपुरी पडली असावी.. तो संतप्त होऊन किंचाळत सगळ्यांना म्हणाला..

"बाहेर व्हा... मला बाहेर येऊ देत... "

पण कुणीही हालले नाही... अजित कामत तीव्र धक्का बसल्यासारखा सगळ्यांकडे बघत असतानाच...

... एकच अस्पष्ट... अगदी हलकीशी.. स्मिताची रेषा...

मावशींच्या चेहर्‍यावर पसरली.. याही परिस्थितीत ही बाई हसते कशी काय हा प्रश्न पडत असतानाच आतून बर्वे आणि बाहुलीचा गगनभेदी हासण्याचा आवाज आला..

तोवर... तोवर बुटकी नमा.. हळूच खुसखुसली... पाठोपाठ सतीश..

... आणि शेवटी अर्चना...

अजित कामत सोडून सगळे जण.. प्रत्येक जण आता भीषण हासत होता..

"हे... हे.. काय?? काय हे?????....."

अजितच्या त्या भयातिरेकाने विचारलेल्या प्रश्नावर अर्चनाने भीषण हासत उत्तर दिले...

"तुझ्याच सारखा शक्तीशाली भागीदार हवा होता आम्हाला... बर्वेंच्या साम्राज्यात... तुझे स्वागत आहे... "

गुलमोहर: 

nahi awadla shevat

Mhanje he sagle ekach group madhale hote, ani tyana tya kaka thorat la apalya barobar gheyeche hote mhanu he sagle,

Mag apate na ka marla, ani ti archana ti tar barve chya virodhat pahije na tichya var tyani atyachar kelay,

Nahi shevat jara pan nahi thik vatla, Ani ti bhavali chi upasana kaka thorat karayache ani tich barve barovar ahe.....????

बेफि, मला ही शेवट नाही पटला. उलट त्याचे कुटुंबीय त्याच्या विरोधात उभे राहायला हवे होते. आणि काका थोरात ला मदत करायला हवे होते जी त्याला अनपेक्षीत असेल.

धन्यवाद बेफिकीरजी:

मी नवीन आहे मायबोलीवर त्यामुळे चुकभूल क्षमा असावी
तुमची लेखणी एकदम खासच.....
कथा खूप आवडली पण शेवट नाही रुचला...
फलंदाजाने जशे नवादित आउट झालयावर निराश व्हावे तसेच काहीसे झाले...शतक होता होता राहून गेले...!
पण मजा आली, अभिनंदन....शुभेच्या...

आज प्रथमच वाचली ही कादंबरी. छान लिहीली आहेत, बेफि. ऑनेस्टली, मला शेवट आवडला! सर्वसामान्यपणे दुष्ट शक्तीचा अंत होणं हाच शेवट असतो भयकथांचा. पण तसं न करता एखाद्या इंग्रजी चित्रपटाप्रमाणे केलेला शेवट वेगळा आणि अपीलिंग वाटला. धारपांनीही असे अंत केले आहेत काही काही गोष्टींचे. आणि त्या सुखान्त नसूनही तेवढ्याच फॅन्टास्टिक आहेत.

आज परत एकदा वाचली.आवडलेला शेवट मला..
नाण्याच्या दोन्ही बाजू धरुन चाललेल्या..
मस्तच बेफी.. मी आशुचँपचा प्रतिसाद शोधत होते.. या भागावर दिलाच नाही वाटतं. अनपेक्षितरित्या दक्षिचा प्रतिसाद दिसला मात्र..
परत एकदा पुलेशु (याबद्दल जरा डाऊटच आहे म्हणा)..

संपुर्ण कादंबरी थोडी थोडी करून पुर्ण वाचून काढली. खिळवून ठेवणारं लिखाण जबरदस्त आवडलं. Happy
लेखकांनी जवळून ह्या गोष्टी बघीतलेल्या असाव्यात असं वाटतं.जर तसं असेल तर आणखी बरीच फुलवता आली असती असं वाटतं. (हा आगाऊपणा बरका Wink हवं तर लहान तोंडी मोठा घास म्हणा.) 'मोहर्या आल्या पण 'राळे', 'उद-धूप', 'कापूर', 'काळे तिळ', 'गुलाल' नाही आढळला. 'लिंबं' तर मस्ट आहेत पण तेही नाही आढळले. -'चां*र कुंडाचं पाणी' पण नाही. Sad अजून 'बरंच' काही आहे पण ते राहूद्या. वरचं मात्र यायलाच हवं होतं. बर्वे आणि अजित कामतचे, 'खेळत' असतानाचे संवाद अजून रंगले असते. तसले संवाद ऐकायला मजा येते.

शेवट अन् सगळ्या लोकांचं बर्वेला सामिल असणं याबाबत प्रतिसादकर्त्यांनी, अजित म्हणजेच काका थोरातला शक्तीवान असूनही त्याला कसं कळालं नाही हे म्हणणं यावर प्रकाश टाकतो.
ह्या अघोरी अन् तांत्रिक जगतात जे पोहोचलेले असतात त्यांनी स्वत:ला (स्वत:च्या सामर्थ्याला) बरेचदा hide केलेलं असतं त्यामुळे प्रतिस्पर्ध्याला ताकदीचा एका ठराविक लेवलपर्यंत अंदाज लागत नाही.एकमेकांना अजमवण्यासाठी असं करतात. एखादी लहानशी चुकही सर्वनाश करून समोरच्याचं गुलाम बनवते... शेकडो वर्षांसाठी..(आत्मा शाश्वत आहे.) अघोरी शक्ती अधिक तत्परतेने सक्रिय होतात अन सात्विक शक्तींवर जय मिळवतात तसंच काहीसं शेवटी कथेत दाखवलं गेलंय जे विसंगत नाही. पण अघोरी शक्तींना ही आटोक्यात आणता येतं मात्र त्यासाठी सात्विक शक्ती बाळगणारा तितकाच 'समर्थ' आणि चारित्र्यवान असावा लागतो. मी धारपांच्या सगळ्या कथा वाचलेल्या नाहीत. एकच वाचलेली समर्थांचं पात्र असलेली. पण अशी चारित्र्यवान आणि समर्थ माणसं अगदी जवळून पाहिलेली आहेत. त्यामुळे धारपांचं लेखन वाचून मी वरचं म्हटलेलं नाही.

मला लेखनातलं खुप काही नविन शिकवलं ह्या कादंबरीने. एकंदर आता माझ्यावर, बेफिकीरजींचं...नाही...नाही..त्यांच्या बेफिटच लेखनाचं 'सावट' पडलंय. Lol

....आणि अजून एका नविनच गोष्टीचा उलगडा झाला म्हणजे मला शंका होतीच पण आज आता खात्री झाली. माझ्या आयडी वर जुन्या उडालेल्या मंदार-जोशी ह्या आयडीचंच सावट आहे असं आपले अड्ड्यावरचे जुने डॉक्टर साहेब आहेत त्यांना वाटत होतं ते का ते आता कळालं.

Submitted by आ.रा.रा. on 26 July, 2017 - 13:09
मंदशा जोशात केलेला फुटकळ हल्ला.

नवीन Submitted by आ.रा.रा. on 27 July, 2017 - 21:29
ठेवणीतले र।हुल
<<
मंदार जोशी आहेत ते. बेगड फार दिवस टिकत नाही त्यांचं.

Proud आहे की नाही मज्जाच मज्जा!!! Rofl

गप्पागोष्टी चा संबंध आमच्या कट्ट्याशी (मौजमस्तीवाल्या) लावलाय तर!!

बेफिकीरजी, धन्यवाद आता माझ्या 'पुन्हा कधी' ला आपल्या सावटामुळे संजिवनी मिळेल असं वाटायला लागलंय. Happy
(चु.भु.दे.घे.)

-₹!हुल

शेवट योग्यच आहे, कारण बर्वे ने सर्वांवर सावट आणले होते.
तो सर्वशक्तिमान झाला होता. हिंट - गेल्या भागातील शेवटाला सापडेल.

आता प्रतीक्षा ह्या कादंबरीच्या सिक्वेल ची.

बेफिकीर - प्लीज मनावर घेणे, आणि पुढे काय झाले ते नविन कादंबरी तुन मांडने.

बेफिकर कृपया तुम्ही सावट च्या सर्व भागंचे link दया ना। कारन भाग 1 नंतर डायरेक्ट 4 नंतर 5 न शेवटी 11 दिस्तोय माधले भाग मिसिंग आहेत।।
Please do the needful

अधाश्यासारखी वाचली भयकादंबरी.. पण शेवट अर्धवट राहील्यासारखा वाटतोय. अजुनही पुढे काय झाल असेल? असा विचार मनात डोकवतोय.
सावटचा सिक्वेल यावा हीच इच्छा!

Pages