परंपरा आणि वारसा

Submitted by स्वाती_आंबोळे on 20 May, 2011 - 08:30

मला चांगलं आठवतंय, "परंपरा बरं, परंपरा.." अशी हृदयाला हात घालणारी घोषणा अंजलीने केली होती. मराठी माणूस बाकी काही असेल नसेल पण परंपराप्रिय नाही असं कोण म्हणू शकेल? (खरंतर या वाक्यात ’मराठी’च्या जागी इतर कोणताही शब्द घातला किंवा मुळात ती जागाच काढून टाकली तरी चालू शकेल! पण लेखाचं वजन वाढवायला असल्या सबगोलंकार वाक्यांचं डायेट बरं असतं. शिवाय असली वाक्यं दुसर्‍याची आणि त्यातही शक्य तितकी जुनी असली तर फारच वजन वाढतं! पण ते असो.)

अंजली बराच काळ निरनिराळ्या आयडीज्‌नी मायबोलीवर आहे म्हणे! पण मला कधी दिसली नव्हती. लालूकडच्या "ट्रेन्डसेटर" कल्लोळाला माझी तिची ओळख झाली. लवकरच फोर्बिडन सिटीत तिनेही गाळा घेतला आणि बस्तान बसवलं. ते जे फोर्बिडन सिटीच्या वेशीपाशी भलंमोठं घर दिसतं ना, ते तिचंच. वेशीपाशी जागा मिळायचं कारण तिला अधूनमधून सौजन्याचे झटके येतात. पण त्याबद्दल बोलायची ही जागा आणि वेळ नव्हे.

तेव्हा परंपरेचा ’वास्ता’ देऊन घोषणा केल्यावर वसंतसेनेत नावनोंदणी करणं क्रमप्राप्त होतं. मॉलेक्युलर गॅस्ट्रॉनॉमीच्या बाफवर विशेष आमंत्रण मिळाल्याने माझा लेकही कल्लोळाला यायला उत्सुक होता. बाराचे खंदे वीर विनय आणि झक्की आणि वीरांगना सायो मात्र सलामीतच गारद झाले हे खेदाने नमूद करावं लागतंय. "यू मीन दॅट ओल्ड आजोबा? ही इज नॉट कमिंग? ओह नो! आय लाइक हिम! ही इज सो फनी!" असं माझा लेक म्हणाला. झक्कींची लोकप्रियता स्थळ,काळ,मिती,वयं सगळ्याला ओलांडून सर्वदूर पसरली आहे हे या निमित्ताने पुन्हा सिद्‌ध झालं.

मैत्रेयी आणि भाई यांनी मात्र शेवटपर्यंत ते येणार की नाही याचा कोणालाच पत्ता लागू दिला नव्हता. खरंतर आत्तापर्यंत इष्ट कोस्टावर झालेल्या सर्व ए.वे.ए.ठिं.मधे बाराकरांचा सर्वाधिक संख्येने आणि उत्साहाने सहभाग राहिला आहे. इतका की पूर्ण किनारपट्टीवर कुठेही कोणीही लोक भेटले तरी त्याला बाराचं ए.वे.ए.ठि. असंच म्हणण्याचा प्रघात पडला आहे. या परंपरेत मात्र या वेळी खंड पडला. शिट्टी, फ्लोरिडा, पेनसिल्वेनिया अशा अल्पसंख्यांक बाफकरांनीही शस्त्रं टाकली. आता सेना जमणार कशी आणि कल्लोळ होणार कसा अशी धाकधूक वाटायला लागली. पण मग शोनू येत नाही म्हणता म्हणता आली, पन्ना येते म्हणता म्हणता आली आणि निदान गाडी बुक करण्याइतक्या शिटा जमल्या. पन्नाचा लेक हर्षही यायचा ठरल्याने आदित्य खूश झाला.

त्याची लगबग दोन दिवस आधीच सुरू झाली होती. शाळेतून आल्यावर मॉ.गॅ.ची कुठली रेसिपी करायची ठरवणं, त्यासाठीचं साहित्य मला आणायला लावणं, त्याचं मेनूकार्ड तयार करणं वगैरे फार कामं होती त्याला. मधेच अंजलीचाही फोन येऊन गेला. (ती बहुतेक आम्ही नक्की येतोय की नाही याची चाचपणी करत असावी.)

हा हा म्हणता शुक्रवार येऊन ठेपला. (हा वाक्प्रचार कसा पडला असेल? कोण असं ’हा हा’ म्हणत असतं? असो.) आमच्या ब्यागा सकाळीच भरून तयार होत्या. संध्याकाळ होण्याची वाट बघत दिवसभर कशाबशा दिवसभर पाट्‌या टाकल्या. ठरल्याप्रमाणे बुवा पन्नाला गाडीत घालून माझ्याकडे संध्याकाळी साताच्या ठोक्याला पोचले. सामान गाडीत भरेस्तोवर पन्नाची दाजींशी ठाण्यातली ओळख निघाली. मित्रमैत्रिणींपर्यंत ठीक होतं, पण मग हा भेळवाला, तो मिसळवाला करत आपला बाफ वहायला लागला, तेव्हा त्यात हस्तक्षेप करावा लागला. फिलाडेल्फियातून शोनूला उचलायचं होतं. आधीच तिचे श्रीयुत रात्रीचा प्रवास म्हणून हळवे झाले होते म्हणे. त्यात इथेच उशीर लावून त्यांच्या जिवाला घोर लागला असता. व्हॅनमधे मधल्या दोन शिटा मी आणि पन्नाने अडवल्या, मागच्या शिटांवर बारकं ’सामान’ अंथरुणापांघरुणांमधे गुंडाळून टाकलं आणि ’बाराची गाडी निघाली!’ निघाली काय, (हा हा म्हणता) वेळेत फिलीलाही पोचली. शोनू तिची फेमस मसाले, बी-बियाणे, पुस्तकं वगैरेंनी भरलेली जादुई टरंक घिऊन वेळेत हजर होतीच. तिला किन्नरी केलं. तिने पूर्ण प्रवासभर बुवांना बोलतं ठेवायची कामगिरी चोख बजावली! (’जागं ठेवायची’ म्हणायला हवं. जागे असले की बुवा बोलत असतातच, त्यासाठी विशेष काही करावं लागत नाही.)

बुवा या ट्रिपचे आमची नैया पार लावणारे एकमेव तारणहार वगैरे होते. तसं आम्ही अधूनमधून त्यांना ’आम्ही ड्राइव्ह करतो, तुम्ही आराम करा’ वगैरे सांगून पाहिलं, पण त्यांना सुकाणू सोडवे ना! मग वाटेत बर्‍याच गप्पा झाल्या. (गप्पा हा शब्द मायबोलीकर ’गॉसिप्स’ असाच वाचतात, तेव्हा ते स्पष्ट करायची गरज नसावी.) आदित्य आणि हर्ष ’नगाला नग’ म्हणतात तसे भेटल्याने मागे त्यांचा स्वतंत्र कल्लोळ सुरू होता. मधे आदित्यने आम्हांला मुली विरुद्‌ध मुलगे असे गट करून गाण्यांच्या भेंड्‌या खेळायला लावल्या. शोनूने मधे बोलण्याचा प्रयत्न केला तर तो तिला बिन्धास्त त्याच्याच वयाची समजून दटावत वगैरे होता. थोड्‌याच वेळात रेस्ट एरिया आला आणि भेंड्‌यांतून आमची सुटका झाली. तिथे समोर मांडून ठेवलेली गोळ्या चॉकलेटं घ्यायला मी आणि पन्नाने मातृकर्तव्य म्हणून स्पष्ट नकार दिल्यावर पोरांनी आम्ही बाहेर पडल्यावर ’नयनीश अंकल’कडे वर्णी लावली. गाडीत गॅस आणि पोटात सँडविचेस भरून आम्ही पुढे निघालो. एकदा जीभ चाळवल्यावर तिला थांबवणं अस्सल पार्लेकरांना शोभलं नसतं. त्यामुळे पन्नाने स्वतः रांधून आणलेले रव्याखोबर्‍याचे लाडू, मावाकेक, मग तिखट काहीतरी हवं म्हणून गरवी गुजराथच्या चकल्या, कचोर्‍या असं सत्र सुरू झालं. त्याचं असं आहे, की बोलण्याच्या नादात किती खातोय हे कळत नाही, आणि खाण्याच्या नादात किती बोलतोय हेही!

पोटं भरल्यावर बालचमू झोपून गेला, आणि हळूहळू पन्नाचेही डोळे मिटायला लागले. आता ती ’हेच, हेच मला पटत नाही’ असं म्हणत कधी उठते याची मी वाट पहात होते, पण तो सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी झाला नाही. किंवा झाला असेल तर नेमकी मला तेव्हा डुलकी लागली असेल. डायवर आणि किन्नरीचा मात्र अनुक्रमे दोन रेड बुल आणि दोन कॉफ्यांच्या आहुतीवर अखंड वाग्यज्ञ सुरू होता.

"इतका लांबचा ड्राइव्ह आहे, मधे कंटाळा आला तर व्हर्जिनियात माझ्याकडे या मुक्कामाला" असं लालूने आधीही सांगितलं होतं, पुन्हा फोन करूनही सांगितलं. पण बुवांचा रेड बुलवर दृढ विश्वास होता.

अंजलीच्या ड्राइव्हवेमधे आम्ही गाडी लावली तेव्हा शनिवार पहाटेचे सव्वापाच वाजले होते. तिला फोन केला तर ती आम्ही आत्ता येऊ मग येऊ या उचक्याने जागीच होती. तिच्या त्या (टण्याच्या भाषेत) ’आठशे खिडक्या नऊशे दारं’ असलेल्या घरात आम्ही कुठेच हरवून गेलो! मुलं आणि पन्ना एका बेडरूममधे, डायवरना स्वतंत्र रूम, आणि शोनू आणि मी एका बेडरूममधे असे तांतडीने झोपायला गेलो. जरा तरी झोप घ्यायला हवी होती, नाहीतर ऐन कल्लोळात झापड आली असती! तरी अंजलीने तेवढ्यातही ’चहा ठेवू का’ असं विचारलंच होतं. हे अगत्य पुढे दोन दिवस आम्ही उपभोगलं!

मुलं एव्हाना झोप होऊन ताजीतवानी झाली होती. त्यांनी त्यांच्या रूममधल्या व्हाइट बोर्डवर नाश्त्याबद्दल दिवास्पप्नं रंगवायला सुरुवात केली. एग्ज, वॉफल्स वगैरे चित्रं आणि खाली उजव्या हाताला सहीसाठी जागा सोडली होती. सही कोणी आणि कधी करायची हे काही कळलं नाही.

साडेसहाच्या सुमाराला मला जाग आली, त्यावरून आधी झोप लागली असावी. त्या दिवशी घड्‌याळ या वस्तूशी तेवढाच पहिला आणि शेवटचा संबंध आला. खाली आलो तर उदबत्तीचा मंद दरवळ पसरला होता. अंजली चहा करत होती. पन्ना तेव्हापासून जी तिच्यासोबत ओट्याशी उभी होती ती शेवटपर्यंत! बाहेर नुकताच पाऊस पडून गेल्यावर असते तशी ताजी हवा, दंवात भिजलेलं गवत, अंजलीचं छोटेखानी ’हर्ब गार्डन’ वगैरे बघत होतो तोवर चहाचं बोलावणं आलं. पाठोपाठ लीकारांत नाश्ता आला. (सांबाराची रेसिपी योजाटा.) तो होतोय तो संजय (श्री. अंजली) वेबमास्तरांना विमानतळावरून घेऊन आले. आता वर्‍हाड जमायला लागलं होतं, त्यामुळे पटापट नंबर लावून आंघोळी उरकल्या.

तोवर डीसी कंपू क्रमांक १ पोचला. यात सुमंगलाताई, श्री. जय, त्यांचे थोरले बंधू आणि त्यांचा मुलगा असे सगळे होते. अंजलीने पन्नाला त्यांना नाश्ता द्यायला सांगितला. त्याप्रमाणे तिने डिशेस तर भरल्या, पण कल्लोळाला आलेल्यांइतकीच न आलेल्यांची काळजी असल्याने आधी त्या डिशेसचे फोटो काढले, आणि मगच हातात दिल्या. (हे फोटो कल्लोळाच्या बाफवर तर सापडतीलच, पण अधेमधे बेकरीवरही सापडतील. बेकरीत न झालेल्या कल्लोळांचे वृत्तांत आणि न खाल्लेल्या पदार्थांचे फोटो प्रसिद्‌ध करायची नवीनच परंपरा निर्माण होऊ पाहते आहे. पण आपण इतरांच्या परंपरांच्या उचापती करू नयेत हे बरं.)

यानंतर नितीन आणि रुनि यांच्यासह आद्य कल्लोळकार ऊर्फ़ आद्य मुसंबा ऊर्फ़ आद्य दशकपूर्तीकार लालू यांचे आगमन झाले. मग आद्य पार्लेकर योगेश आला. मग नवमायबोलीकर खालिद आणि न-मायबोलीकर श्री. व सौ. दैत्य आले. सर्वात शेवटी स्थानिक मायबोलीकर मधुरिमा, मोहना, सौ. मांजरेकर इ. मंडळी आली.

फुल्ल कोरम जमल्याचं बघून अंजलीने अ‍ॅपेटायजर्स काढली. मुलं अ‍ॅपेटायजर्स आणि आइस्क्रीम सोड्‍यावर फ़िदा होती. बुवा आणि श्री. संजय यांनी कुठल्या कुठल्या नावांखाली आम्हांला सोडा आणि फ्रूट पंच पिलवला हे सांगायला अतीव दुःखापोटी शब्द फुटत नाहीत! जौद्या झालं!

या दरम्यान दैत्य माबोकर तर नाहीतच, पण मिपाकर आहेत असा शोध लागला. मिपावर दैत्यच नांदत असल्याचा पूर्वापार संशय त्यामुळे बळावला. खाली-द हे "सॅफायर्स ग्रो" करता करता मायबोली वाचतात असा दुसरा अज्ञानमूलक शोध लागला. त्याबद्दल सविस्तर तेच (कधी रोमातून बाहेर आले तर) सांगू शकतील.

ग्रिल पार्ल्याची ज्यूलिया चाइल्ड शोनूच्या ताब्यात होतं. पदार्थांची स-फोटो यादी कल्लोळाच्या बाफवर आहेच.

या दरम्यान सुमंगलाताईंनी मुलांना कसली कसली कोडी घालून गुंतवून ठेवलं होतं. मुलांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला. त्याचे परिणाम नंतर मोठ्‌यांना भोगावे लागले.

पार्ल्यात आम्ही ज्या प्रकारे खाण्यापिण्याच्या गप्पा मारतो त्यावरून समोर खाणं नसलं तर आम्ही काय करू आणि काय नाही अशी अंजलीला भीती वाटली असावी. अ‍ॅपेटायजर्स सगळी चाखून होतात न होतात तोच जेवणाची वर्दी आली. सगळेच पदार्थ मी आधी स्वतंत्र पोस्टमधे लिहिल्यानुसार अत्यंत चवदार होते. तयारी जय्यत होती, आणि अंजलीचा उरकही दांडगा आहे. भराभर भांडी, पदार्थ निघत होते तसं मागचं आवरलंही जात होतं. या साटपपणात पन्ना, शोनू, मधुरिमा, मोहना वगैरे ’गिल्टी बाय असोसिएशन’ होत्या असं म्हणता येईल.

जेवणं झाल्यावर मंडळी ताज्या दमाने गॉसिप्स करायला बसली. वेबमास्तरांना ’निमित्ताने’च्या निमित्ताने खिंडीत गाठायचा प्रयत्न झाला, पण पंधरा वर्षांत अशा बर्‍याच खिंडी त्यांनी सहजी लढवलेल्या असल्याने तो प्रयत्न फसला. (असंच सांगायचं ठरलं होतं ना? :P)

यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्यांचं वर्णन अंजलीच्या वृत्तांतात आलंच आहे. मग पावसात ’वॉक’ घ्यायची टूम निघाली. हा आपला वविला शह. पण फोटो भिजण्याआधीच काढले. ओलेत्या फोटोंची परंपरा वविकरांनाच चालवू देत असं सर्वानुमते ठरलं. (आपण इतरांच्या परंपरांच्या ..इ.इ.)

वॉकवरून परत येतो तोवर मुलांची काहीतरी गडबड चाललेली दिसली. चार खुर्च्यांवर चार ब्राऊन पेपर बॅग्ज ठेवल्या होत्या. त्यावर ’रेन किस्ड’, ’लव्हली लव्हेंडर’ अशांसारखी नावं घातली होती. मंडळी (विशेषतः आईबापं) नाही म्हटलं तरी जरा धास्तावलीच! मग ’पीपल, पीपल..’ अशा प्रकारे आमचं लक्ष वेधत मुलांनी छोट्या छोट्या चिठ्ठ्‌या आणल्या. सर्वांना एकेका चिठ्ठीवर आपलं नाव लिहायला लावलं. मग त्यातून ’सोडत’ काढण्यात आली. चार भाग्यवंतांना (वेबमास्तर, नयनीश, योगेश आणि लालू) प्रत्येकी एक ब्राऊन पेपर बॅग देण्यात आली. त्यांतून ’रेन किस्ड’ वगैरे नावांची लोशन्स / हँड सोप्स वगैरे घालून सुगंधी केलेलं पाणी भरलेले रबरी हँडग्लव्हज निघाले! एवढ्याने भागले नाही म्हणून या चौघांना ’आय अ‍ॅग्री टू पझेस धिस ऑब्जेक्ट फॉर अ यर’ असं ’कॉन्ट्रॅक्ट’ S.A.R. साठी (शिवानी, आदित्य, रेणुका हे 'फाउंडर्स' असलेली कंपनी - अजून तरी नॉन प्रॉफिट!) साइन करावं लागलं. कॉन्ट्रॅक्टखाली ’अमाउंट’ आणि ’सिग्नेचर’ असे दोन रकाने मोकळे सोडलेले होते! आता कसली अमाउंट, आणि ती कोणी कोणाला आणि का द्यायची हे मला नीटसं कळलं नाही. कदाचित योगीबेअर सांगू शकेल. त्याला तुम्हांआम्हां सामान्यांना न कळणारं काय काय कळतं म्हणे!

मधुरिमाकडे जायची वेळ झाली होती. अजून पोटं भरलेलीच असल्याने काय कपाळ डिनर करणार, बिचारीची तयारी वाया जाईल की काय, चालत जावं की काय असा बराच विचारविनिमय झाला. पण प्रत्यक्षात तिच्याकडे पोचल्यावर सर्वांची याददाश्त हिंदी सिनेमाच्या हिरोला लाजवेल इतक्या वेगाने खो गयी! त्याला कारणही तसंच होतं. अगणित प्रकारची अतिशय चविष्ट लोणची आणि चटण्या अशा कटाला बळी न पडणं अशक्य होतं. नाही नाही म्हणत पुन्हा तुडुंब जेवण झालं. शिवाय नाना नेन्यांची भेट झाली! ’हे नाना आहेत’ हे आम्हांला, आणि ’हे सुजन नाहीत!’ हे नानांना- अशी परस्पर ज्ञानप्राप्ती झाली. बुवांना तर गहिवरून आलं.

मुलांचा कल्ला सुरूच होता. ती सगळी इतकी मस्त मिसळून गेली होती की शेवटी आपापल्याच घरी परततील की नाही अशी मला भीती वाटायला लागली! तिथे अस्खलित मराठी बोलणारा मोहना यांचा लेकही भेटला. सुमंगलाताईंचा कंपू मधुरिमाकडेच मुक्काम करणार होता. पण त्यांनी आठवणीने पार्ल्याक्वांसाठी मेंदीचा कोन दिला.

आम्ही बाकीची जनता मधुरिमाकडून परत अंजलीकडे आलो तेव्हा मला वाटतं रात्रीचे दहा वाजले असावेत. पण मॉ.गॅ.ची प्रात्यक्षिकं करण्याचा उत्साह मुलांना होता! वेबमास्तर आणि श्री. संजय त्यांच्यावर देखरेख करत होते. आम्हांला बाकीच्यांना बाहेर घालवण्यात आलं होतं. मग आम्ही आमचा आमचा मेंदीचा आणि गप्पांचा अड्डा जमवला. वेळच अमानवीय बाफची होती, त्यामुळे तेच विषय निघाले. वेबमास्तरांनी बर्‍याच अ.आ.अ. कथा सांगितल्या. घरात ढेकूण झाले तर ’पाहुणे गेले का?’ या एका प्रश्नात त्यांना पळवून लावणार्‍या सिद्‌धपुरुषाची कथा त्यापैकीच. आधी कळलं असतं तर न्यूयॉर्कमधे बोलावता नसतं आलं? अशा लोकांना काय प्रकारचा व्हिसा घ्यावा लागत असेल? तो ’व्हिसा मिळाला का?’ इतकं विचारताच मिळत असेल का? कित्ती प्रश्न!

त्यात बोलता बोलता योगीबेअर हस्तसामुद्रिक जाणतो असा शोध लागला. लागलीच सगळ्या पार्ल्याक्वा (गंमत म्हणून हाँ) मेंदी न लावलेले हात घेऊन पुढे सरसावल्या. काकाही. योगी या क्षेत्रात बराच अधिकारी असावा, कारण त्याने दुसर्‍याच कोणाचातरी हात पाहून मला ’तुला आयुष्यात फार कष्ट आहेत’ असं सांगितलं. हात न दाखवताच अवलक्षण! असो.

एव्हाना एक वाजला होता. दुसर्‍या दिवशी पुन्हा बुवांना दहा तास ड्रायव्हिंग करायचं होतं, त्यामुळे त्यांना झोप मिळणं आवश्यक होतं. तेव्हा नाइलाजाने झोपायला गेलो. वर गेल्यावरही पार्ल्याक्वा लगेच झोपल्या नाहीतच! त्यांच्या गप्पा सुरूच होत्या. त्या सकाळी सहाच्या सुमाराला जाग येऊन कंटिन्यू झाल्या. लहानपणी सुट्ट्यांतून किंवा कार्यांच्या निमित्ताने भावंडं जमून गप्पाटपांत रात्री जागवायचो तसं वाटत होतं. ही मजा काय असते हे आपल्या मुलांना कसं कळणार हा प्रश्न पडायच्या आत आम्हांला मायबोली भेटली हे आमचं नशीब!

आता नाश्त्याला मुलांनी व्हाइटबोर्डवर 'ऑर्डर' केलेला मेनू होता.

दोन दिवस असं माहेरपण अनुभवलं की पाय निघता निघत नव्हता. पण इलाज नव्हता. बाराच्या गाडीची परतीची वेळ झाली होती. मग नेहमीप्रमाणे मसाले, वाल, बी-बियाणी, पुस्तकं यांची देवाणघेवाण झाली. अंजलीने आमच्यासोबत ठेपले, लोणचं, दही, इन्स्टन्ट चहाची पाकिटं (आणि ती उघडता यावीत म्हणून कात्री!!) अशी सगळी शिदोरी बांधून दिली. मोगर्‍याची रोपं दिली. पुनःपुन्हा गळाभेटी घेऊन शेवटी आम्ही मार्गस्थ झालो.

एका ए.वे.ए.ठि.हून निघता निघताच ’आता पुढचं ए.वे.ए.ठि. कधी?’ असा प्रश्न सहसा बुवा विचारतात. त्या दिवशी हा प्रश्न माझ्या लेकाने विचारला!! एकूणात योग्य तो वारसा त्याच्यापर्यंत पोचला या कल्पनेने मला भरून आलं!

परतीचा प्रवास पार्लेकरांना न शोभेलशा भावनाविवश मनःस्थितीत झाला. पण त्याही अवस्थेत आम्ही ठेपले वगैरे खाल्लेच हे नमूद केलंच पाहिजे. किंबहुना 'डिस्मूड' असल्याने एखादा ठेपला सरसच खाल्ला असण्याची शक्यता अधिक.

येतांना ’लास्ट इन फर्स्ट आऊट’ क्रमाने बाराकर पांगले. मी येष्टीतून उतरले तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजले होते. अंजलीला पोचल्याचा फोन केला.
’मग, कसं झालं तुमचं गेट टुगेदर?’ म्हणून दाजींनी विचारलं...

यापुढची कथा सांगत नाही. सद्ध्या तितक्या डाइम्स नाहीत माझ्या हाताशी!

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(हो, कल्लोळाच्या वृत्तांताचा शेवट 'टच्कन पाणी'छाप परिच्छेदाने करायचीही एक परंपरा आहे. ती मीच सुरू केली आहे हे ही नमूद करायला हरकत नसावी. :P)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!!!! पंचेस सहीच Proud

अंजलीचा केया आयडी होता जुन्या माबोवर. तिच्या रवा डोसा/उत्तप्पा रेसिपी मी कितीतरी वेळा फॉलो केली आहे. (वाचतेयस ना अंजली)

::मस्तच::

>>हे फोटो कल्लोळाच्या बाफवर तर सापडतीलच, पण अधेमधे बेकरीवरही सापडतील. बेकरीत न झालेल्या कल्लोळांचे वृत्तांत आणि न खाल्लेल्या पदार्थांचे फोटो प्रसिद्‌ध करायची नवीनच परंपरा निर्माण होऊ पाहते आहे. पण आपण इतरांच्या परंपरांच्या उचापती करू नयेत हे बरं.)>> हा एकदम षट्कारच!!! Lol
लगे रहो!!

Proud
आता हाच वृत्तांत आधी टाकून परांपरा राखायची नाय का? पण हरकत नाही, शेवटी काय जुन्या परंपरा मोडण्यासाठी असतात आणि नविन परंपरा तयार करता येतात Happy तुम्ही सगळे इतक्या प्रेमानं आलात हेच माझ्यासाठी महत्वाचं :).

मस्तच, वृत्तांच्या निमित्ताने ताज्याच स्मृतींना परत एकदा सुखद उजाळा .

घरी येऊन पोचल्यावर मोगरा पाहून ग्रिंच खुश अन स्वातीने दिलेली ' मायबोली चटणी' पाहून लेक खुश झाली .

सासरचे अन माहेरचे ज्ये ना मंगळसूत्र न घालण्यावरुन जितकं घालून पाडून बोलतात त्यापेक्षा जास्त बोलणी जीन्स- टीशर्ट याबरोबर मंगळसूत्र घातल्या मुळे ऐकावी लागली मला :रुसकी बाहुली:

स्वाती, परंपरा आणि वारसा त तु शोनू आणि माझ्या मंगळसुत्राबद्दल लिहिले नाहिस. ते फोटो कुठे आहेत. कुणी पाठवाल का?

फार छान वृत्तांत. अंजली आणि तुम्ही इतके चांगले वृत्तांत लिहीले आहेत की नुसते वाचूनच असे वाटते की कल्लोळाला जास्त मजा की वृत्तांत वाचायला जास्त मजा?
माझी आठवण सुरुवातीलाच काढलीत, बरे वाटले. म्हणतात ना दुर्जनं प्रथमं वंदे.....

"यू मीन दॅट ओल्ड आजोबा? ही इज नॉट कमिंग? ओह नो! आय लाइक हिम! ही इज सो फनी!" असं माझा लेक म्हणाला. झक्कींची लोकप्रियता स्थळ,काळ,मिती,वयं सगळ्याला ओलांडून सर्वदूर पसरली आहे हे या निमित्ताने पुन्हा सिद्‌ध झालं.>>> झक्की नव्हते ते बरंच झालं नाहीतर त्यांनी आदित्यला 'तुमचे बाबा हाफ पँटमध्ये होते तेव्हापासूनच.... ' ऐकवलं असतं. Proud

अरेव्वा! अजून एक व्रुत्तांत!....एकदम मुद्देसुद आणि जागच्याजागी चपखल कोपरखळ्या मारणारा...! Wink

रूनी, व्याकरण्द्रुष्ट्या 'व्रु' सुद्धा अचूक आहे.....!! लहानपणी लो.टिं.ची गोष्ट आठवत असेल तुला....'संत','सन्त', 'सन् त' ह्या एकच शब्द लिहिण्याच्या ३ पध्दती आहेत वगैरे!!!!! Happy

(अजून एक कारण म्हणजे, मी पूर्वी फक्त गूगल ट्रान्सलिटरेशन वापरत असल्याने मला ह्या टायपिंगमध्ये 'वृ' कसा लिहावा ते अजून समजलं नाहीये! समजेल हळूहळू..!)

दैत्य, व्रु आणि वृ सारखे नाहीत बरं का.
व्+र्+उ = व्रु
व्+ऋ = वृ

(मिपावर असलं 'शुद्ध'लेखन चालतं वाटतं? :P)

आवरा....पुन्हा 'द्रु' पण तसाच झाला!! ओ.के., आता प्रयत्नपूर्वक -- 'दृ' , 'वृ' , 'कृ', 'खृ', 'गृ', 'घृ' पृ फृ बृ भृ मृ ....वगैरे वगैरे!

Pages