सावट - ९

Submitted by बेफ़िकीर on 20 May, 2011 - 04:01

"मनू"

अजितच्या तोंडातून हे नांव ऐकल्यानंतर व्हायचे तेच परिणाम झाले. अर्चना किंचाळून ते खोटे आहे हे ठसवायचा प्रयत्न करू लागली. सतीश थक्क होऊन आपण काय ऐकले त्यावर विचार करत अजितकडे खिळल्यासारखा बघू लागला. मावशी आणि नमा दोघींना प्रचंड धक्का बसला. अविश्वसनीय बाब ऐकायला मिळाली होती. पण सर्वात आधी सावरल्या त्या मावशी!

मावशी - तुला... मी.. हाक काय मारायची???

अजित - अजितच म्हणा... तुम्हाला हे शरीर अजित कामत म्हणूनच माहीत आहे..

आपण चक्क एका भुताशी किंवा अमानवीय अस्तित्वाशी बोलत आहोत याचा थरथराट अजूनही होताच मनांमध्ये! त्याच जाणिवेने नमा रडू लागली. पण मावशींनी तिला सावरले. सतीश मात्र भक्कपणे अजितकडे पाहात होता.

मावशी - हे.. तू जे काय सांगितलंस त्यावर माझा विश्वास नाही... मनू एक लहान मुलगा आहे.. आज त्याचा तिसरा वाढदिवस आहे..

सतीश - मी तर खलासच करीन तुला...मनूचं नांव काढलं तर..

सतीशने त्याचा संताप व्यक्त केला.

अजित - मी कधीच खलास झालेलो आहे.. आठशे वर्षे झाली... आणि तुमच्यापैकी कुणीच मला काही करू शकत नाही.. माझ्याशी नीट बोला.. मी तुमची मदत करण्यासाठी इथे आहे..

मावशी - मला आधी यावर विश्वासच का ठेवायचा ते सांग..

अजितने उत्तर दिले..

"तुम्हाला आठवतं मी आधी नमाच्या शरीरात आलो त्या दिवशी मनूच्या डोळ्यांखाली रक्त आलं होतं??"

अर्चना रडणे थांबवून चक्रावून अजितकडे पाहू लागली.. सगळ्यांनाच ते आठवत होते..

आता अजित बोलू लागला..

"ते रक्त माझं होतं.. माझं म्हणजे नमाच्या शरीरातलं.. नमाच्या देहात असलेल्या माझं मनुशी प्रचंड मोठं युद्ध झालं त्या दिवशी... या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी खरे तर अनाकलनीय आणि अविश्वसनीय आहेत.. पण तरी सांगतो... त्याने ऐन वेळेस मला अजिताइवजी नमाच्या शरीरात ढकलण्यात यश मिळवलं.. नमाच्या शरीरात मला राहायचंच नव्हतं.. दुर्बल शरीर होतं ते.. माझ्या अघोरी परंतु चांगल्या हेतूंच्या प्रयत्नांना त्या शरीराची साथ मिळालीच नसती.. मात्र प्रकार असा झाला की मला नमाचे शरीर मिळाल्यामुळे क्षणभर मला असे वाटले की माझ्या शक्तीनेच बर्वेशी संगनमत केले आहे आणि दोघांनी मिळून मला फसवलं... मी माझ्या शक्तीप्रती दाखवलेला हा अविश्वास मला चांगलाच भोवला... माझे हाल हाल झाले त्या दिवशी.... अर्चना जेव्हा बोळातून जात होती तेव्हा तिला खिडकीत बसलेली नमा उदास दिसत होती ती त्याचमुळे... मनीषा काकडेचा हात.. अर्थात तो प्रकार तुम्हाला माहीतच नसेल म्हणा.. मनीषा काकडेचा हात तोडून मी मला बसवला होता.. त्याचमुळे मला दुसरे शरीर प्राप्त करून घेण्याची मुभा मिळाली होती.. नमाचे शरीर मिळाल्यामुळे माझ्याच शक्तीप्रती माझ्या मनात आलेल्या अविश्वासामुळे नमाचा तो हात खरच तुटला... हे प्रत्यक्षात नमाला जाणवले नसेल कारण आजवरची माझी पुण्याई.. मात्र मी वेदनांनी अक्षरशः तडफडत होतो... त्यातच बर्वेने मनूच्या शरीराच्या माध्यमातून माझ्यावर हल्ला चढवला.. हा प्रकार अधिकच भयानक होता.. आधीच हात तुटल्याच्या वेदना.. त्यातच बर्वेचा अघोरी हल्ला.. मला काहीच करता येईना.. शेवटचा उपाय म्हणून मी माझ्या त्या शक्तीची माफी मागीतली व हात परत द्यायला सांगितले... तेव्हा आत स्वयंपाकघरात अर्चनाला तो हात माळ्यावरून परत निघालेला दिसला.. आता त्या हाताने स्वयंपाकघरातले सगळे का आवरून ठेवले हा प्रश्न तुम्हाला पडत असेल.. तर ते केवळ बर्वेने तुम्हाला घाबरवण्यासाठी केलेले होते.. दहशत पसरवणे या एकाच भांडवलावर भुतांचे अस्तित्व टिकून राहू शकते.. जेथे माणसाला भीतीच वाटत नाही तेथे भुते काही करू शकत नाहीत.. तुम्ही अर्थातच सगळे घाबरलात.. मात्र तुम्हालाच काय, नमालाही आत नमाच्या खोलीत काय जीवघेणे प्रकार चाललेले होते याची कल्पना नव्हती... तुम्ही घाबरत होतात क्षुल्लक बाबींना.. आतमध्ये माझ्या शक्तीने माझी माफी स्वीकारून मला पुन्हा बळ देईपर्यंत बर्वेने माझे अगाध हाल केले.. मी निर्जीव झाल्याप्रमाणे केवळ ते सहन करत होतो.. माझ्या रक्ताचे शिंतोडे बर्वेच्या त्या अमानवी अस्तित्वावर उडत होते... तेव्हा प्रत्यक्षात नमा मात्र बेडवर झोपलेली होती... अर्चनाला ती खिडकीत दिसत होती ते केवळ भासमय रूप... आणि मग शेवटी माझी शक्ती माझ्यावर प्रसन्न झाली.. तिने कृपा केली.. आणि बर्वेला तिनेच परतवले.. नमाच्या शरीरात असल्याने व माझ्याच शक्तीवर मीच अविश्वास दाखवल्याने माझे प्रचंड हाल झालेले होते.. त्याचमुळे मी नमाच्या शरीरातून बाहेर पडण्याचा अथक प्रयत्न करू लागलो.. मी तसे करू नये याचसाठी बर्वेने तो हल्ला केलेला होता.. पण सुप्रीम पॉवरपुढे त्याचे काहीच चालले नाही आणि मी वाचलो... पुढे मी नमाच्या शरीरातून बाहेर पडलो आणि ती नॉर्मल, नेहमीसारखी वागू लागली.. मात्र तुम्हाला अजितच्या वागण्यात फरक जाणवला असेल... तुम्हाला हे समजलेही नसेल की नमाच्या शरीरातून बाहेर पडून मी पुन्हाकाका थोरातच्या शरीरात गेल्याने काका थोरातचे प्रेत उठन बसले... आणि त्या शक्तीची दुसरी पूजा करून मी अजितच्या शरीरात कसाबसा प्रवेश मिळवला... आता तुम्हाला सांगायला हरकत नाही.. की त्या रात्री आपण सगळे स्वयंपाकघरात झोपलेलो असताना... मला सव्वाशे वर्षांनंतर प्रथमच एका अशा धडधाकट पुरुषाचे शरीर मिळाले होते की जे काका थोरातच्या शरीराप्रमाणे अघोरी पूजांनी नेस्तनाबूत झालेले नव्हते... ताजेतवाने शरीर होते ते... कित्येक दशकात मी... पुरुषाच्या रुपातून भोग घेतलेला नव्हता... मला त्या परिस्थितीत मोह झाला... मात्र त्याच क्षणी माझ्या शक्तीने तिची कृपा पुन्हा काढून घेतली... तिला ते कदापीच मान्य होणार नाही हे माझ्या लक्षात न येण्यास तो मोहच कारणीभूत होता.. तोच तो क्षण होता.. जेव्हा खरे तर बर्वेने माझ्यावर हल्ला केला असता तर मी नाशही पावलो असतो.. मात्र बर्वेवर संध्याकाळीच त्या शक्तीने केलेल्या परिणांमुळे तो अर्चनावहिनींच्या कुशीतच म्हणजे मनूच्या रुपात माझ्या इतक्या नजीक असूनही त्याला काहीच करता आले नाही... मी त्या मोहाने काही करत आहे हे कुणालातरी समजावे म्हणून त्या शक्तीने मावशींना जागे ठेवले... आणि या सगळ्या प्रकाराची मला दुसर्‍या दिवशी अत्यंत भीषण शिक्षा मिळाली.. त्याच वेळेस तुम्ही दोघी आपटे आजोबांना बोलवायला निघालात.. मात्र आपटे आजोबांना बोलावणे मलाही मान्य नव्ह्ते आणि बर्वेलाही.. मला मान्य नसण्याचे कारण हे होते की आपटे आजोबा या सर्व प्रकारात खलास होणार हे मला माहीत होते.. आणि बर्वेला ते मान्य नव्हते कारण आपटे आजोबा ही दिवे गावातील एकमेव अशी व्यक्ती होती जिला या वास्तूचा इतिहास पूर्ण आठवत होता व त्यात ते स्वतः पोळलेही गेलेले होते... ती व्यक्ती इथे आली तर तिच्या किरकोळ शक्तीने ती मलाही जागृत करेल आणि आम्ही दोघेही एक झालो तर आपण संपणार हे बर्वेला ज्ञात होते... त्याचमुळे त्याने मावशींच्या नाकावर दगड मारला... बर्वे मनूच्या शरीरातून निघून गेल्यानंतर तुम्ही कधीही तपासून बघा.. कितीही वेळा प्रयत्न केला तरी मनूला असा नेम धरून आणि ताकदीने तेवढा दगड मारताच येणार नाही... तर तुमचे आपटे आजोबांना बोलावणे तात्पुरते रद्द झाले.. त्याचा मला व बर्वेला वेगवेगळ्या कारणांसाठी आनंद झाला होता....

नंतरची ती घटना... मी तुम्हाला माझ्या खोलीचे दार उघडून दर्शन दिले... माझ्या शरीरावर असंख्य जखमा होत्या.. ती मला काल रात्री केलेल्या चुकीची मिळालेली शिक्षा होती.... मात्र तुम्ही एक गोष्ट केलीतच.. ते म्हणजे शेजारच्या जोंधळे वहिनींमार्फत आपटे आजोबांना बोलावलेतच...

त्यांना पाहून मी छद्मीपणे हासण्याचे कारण हेच होते की ते आज मरणार आहेत हे मला माहीत होते तरीही त्यांचा आत्मविश्वास टीपेला पोचलेला होता... सामान सौ सालका है... पलकी खबर नही...

आपटे आजोबा माझ्या खोलीत न येण्याचे कारण त्यांना या खोलीत काका थोरात आहे हे माहीत होते...

ते तुम्हा सर्वांशी जसे बोलत होते तसे माझ्याशी बोलू शकत नव्हते हे तुम्हाला कळले असेलच त्या दिवशी.. आपटे आजोबांच्या मनात वेगळीच योजना होती... एवीतेवी काका थोरात येथे आहेच... तर त्याच्या मदतीने आपण बर्वेला संपवूनच टाकू अशी... पण त्यांना हेच माहीत नव्हते की मी मला मिळालेल्या शिक्षेमुळे बद्ध आहे... मला स्वातंत्र्य मिळायला काही अवधी जाणार होता.. तिकडे बर्वे हासत होता.. तुम्हाला वाटत होते मनू गाडी गाडी खेळतोय मस्तपैकी आणि एकटाच हासतोय..

माझ्या शक्तीने मला त्या दिवशी स्वातंत्र्य दिले नाही... आणि त्याचमुळे आपटे आजोबांचा भयानक मृत्यू झाला.. ते मेले आहेत हे तुम्हाला जरी दुसर्‍या दिवशी समजले असले तरी मला ते मरत असतानाच समजत होते....

आता तुम्हाला प्रश्न असा पडेल की आपटे आजोबांनी बर्वेची कहाणी तुम्हा सर्वांना का सांगितली नाही.. तो माझ्या त्या अदृष्य शक्तीचा प्रताप होता... कारण ते जर त्यांनी सांगितले असते तर तुम्हाला सर्वांनाच ती कहाणी कळली असती आणि तुम्हाला कळल्याने बर्वे खूप सावध झाला असता... त्याला बेसावध ठेवण्याचे काम त्या शक्तीने केले.. तो सावध झाला असता तर मी बद्ध असतानाच त्याने असंख्य प्रयत्न करून मला संपवले असते... पण आपटे आजोबांचे तोंड त्या शक्तीने बंद ठेवले...

आपटे आजोबांच्या पूजेत नेमके काय झाले ते तुम्हाला समजलेच नसेल.. ते सांगतो...

आमच्या अघोरी साधनेच्या क्षेत्रात आपटे आजोबा हे एक अत्यंत सामान्य प्यादं होतं... बर्वे माझ्या कितीतरी पुढे आहे.. पण आपटे आजोबा माझ्यासमोर काहीच नाहीत.. ज्या गुरूकडून ते ती पूजा शिकले होते त्याने पुढे काहीतरी गुन्हा केला म्हणून मी त्याला अघोरी शक्तीने नष्ट केलेले होते... हे आपटे आजोबांना ज्ञातही नसेल.. ते तुमच्यानावाने ज्या तुम्हाला हाका मारत होते त्या सर्व हाका माझ्यासाठी होत्या... पण त्या रात्री मी बद्ध होतो... स्वातंत्र्य मिलावे म्हणूनच पूजा करत होतो... पण ती पूजा व्हायलाच दहा तास लागतात..

तर आपटे आजोबा आत गेल्याक्षणीच त्यांना सावट जाणवले.. ते सावट होते पराभवाचे... त्यांच्यातील विजयाचा आत्मविश्वास आत पाऊल टाकल्याक्षणीच नष्ट झाला होता.. पाय टाकताच त्यांच्यावर हल्ला झाला बर्वेचा.. बर्वेपुढे एकट्याने टिकण्याची त्यांची हिम्मतच नव्हती... पूजा करण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवलाच मुळी माझ्या जोरावर होता.. आणि मी तर बद्ध होतो... आपटे आजोबांचे अमानवी हाल झाले त्या रात्री.. त्यांच्या प्रत्येक अवयवावर शस्त्राने वार करण्यात आले... कारण त्यांनी बर्वेचा सहा वर्षाचा मुलगा तलवारीने मारलेला होता... त्या क्रोधात बर्वेने त्यांच्या त्वचेवर तापलेल्या सळईने असंख्य डाग दिले.. त्यांच्याच छातीवर बसून.. ऐंशी वर्षाच्या त्या म्हातार्‍याला हे सहन होणे शक्य नव्हतेच... पण निदान काहीतरी धार्मिक पुण्याई मागे होती म्हणून ते तीन तास तरी टिकले.. तीन तास... ते तीन तास कोणत्याही मानवाच्या नशीबात येऊ नयेत असे... मी माझ्या खोलीत बसूनच ते दृष्य बघत होतो.. बर्वेच्या मेंदूतून काय निघेल याची काहीही खात्री देता येत नाही... त्याने कोंबडी सोलतात तसे आपटे आजोबांना जिवंतपणीच सोलले.. त्यानंतर आगही लावली पण स्वतःच विझवली.. आजोबा सतत बेशुद्ध पडत होते पण तो त्यांना शुद्धीवर आणून पुन्हा छळत होता...

मात्र पहाटे सव्वा दोनच्या सुमारास कधीतरी ... अचानक मी स्वतंत्र होत असल्याचे बर्वेला जाणवले.. हा त्याला बसलेला फार मोठा धक्का होता... कारण आता त्या प्रकारात जर मी पडलो तर आमच्या नियमांचा भंग करून बर्वे त्याच्या मूळ स्वरुपात प्रकट व्हायच्या आतच मी त्याला संपवले असते... बर्वे त्याच्या मूळ स्वरुपात सकाळी आठ वाजता प्रकट होणार आहे.. आत्ता पहाटेचे अडीच वाजलेले आहेत.. बरोब्बर दोनच रात्रींपुर्वी याच समोरच्या खोलीत बर्वेने आपटे आजोबांचा जीव घेतला.. अनन्वीत अत्याचार करून..

मला काहीच करता आले नाही.. मी स्वतंत्र होत आहे हे पाहून बर्वेने त्यांचा गळा नखांनी चिरला व प्रेत जाळून टाकले..

आपटे आजोबा मेल्याचे तुम्हाला दुसर्‍या दिवशी सकाळी कळाले आणि दिवे गावात अभूतपूर्व घटनांचे चक्रही चालू झाले... काका थोरातचे प्रेत मिळेना.. स्मशानावरचा ताना गायब.. आपटे आजोबांचे प्रेत नदीकाठी.. बेसुमार हाहाकार माजलेला होता..

अशातच सरकारी चौकश्या, पोलिस चौकश्या आणि गर्दी, धावाधाव यांना ऊत आला..

मात्र इकडे मी माझ्या सर्व पापकृत्यांमधून मोकळा होऊन स्वतंत्र झालेलो होतो...

आता मनू माझ्याकडे पाहून हादरत होता.. कारण त्यात सुप्तावस्थेत असलेला बर्वे माझ्या स्वतंत्र होण्यातील परिणाम जाणून होता..

तुमचे मात्र वेगळेच चाललेले होते.. तो संपूर्ण दिवस चौकशीतच गेला.. तुम्ही दिवे गावात काही जागांची वगैरेही चौकशी केलीत.. आणि त्या संध्याकाळी मी खोलीतून बाहेर आल्यानंतर... ते आले..

सावट!

सावट जाणवले तुम्हाला सगळ्यांनाच... ते माझ्यामुळे आलेले नव्हते.. मी बाहेर आल्यामुळे मनूने तो पराक्रम करून दाखवला होता.. उद्याच्या उद्या इथून निघायचे अशा तयारीत तुम्ही होतात खरे.. पण रात्री तपासणीसाठी झुंबर, बाजी आणि रामोशी आले..

मला त्यांच्या येण्यात अडचण काहीच नव्हती.. त्यांनी कायदेशीर तपासणी केली तर मी कोण हरकत घेणार?? पण त्यांचा हेतू शुद्ध नव्हता.. त्यांना करायची होती लूटमार... नमाचे गळ्यातले त्यांनी उचलले.. पैसे घेतले.. सतीशकडचेही पैसे घेतले..

मी वाट पाहात होतो मावशींच्या खोलीत कुणीतरी जाण्याची... कारण त्या दोन खोल्यांमध्ये बर्वे चोवीस तास राहतो.. मनूमध्ये तो असला अन मनू बोळात खेळत असला तरी बर्वे सतत त्या खोल्यांमध्ये जात राहतो... कारण तेथेच त्याचे तुकडे करण्यात आले होते.. मावशींना अजून त्याने आपला अमंगळ अनुभव दिलेला नाही कारण तो त्याच्या मूळ रुपात प्रकट होईपर्यंत थांबणार आहे.... त्याला तेवढीच एक भीती आहे.. आणि ती भीतीही नष्ट व्हायला आता पाच सहाच तास राहिलेले आहेत..

तर नेमका झुंबरच मावशींच्या खोलीत गेला.. त्याबरोब्बर मी माझे अस्तित्व कडाडून दाखवले.. मी मनीषा काकडे आणि आपटे आजोबा या स्वरुपांमध्ये बाजी आणि रामोशीला बोळात दिसलो.. अजित कामत या स्वरुपात तुम्हाला बोळात दिसलो.. आणि बर्वेच्या भयानक स्वरुपात झुंबरला..

पण तीच नेमकी माझी चूक झाली.. बर्वेच्या घरच्या मैदानात मी नेमका घोळ घातला होता.. बर्वेने माझ्यावर तीच वेळ साधून भयानक हल्ला केला.. मी कसाबसा वाचून इथे परतलो.. त्याच रागात बर्वेने झुंबरलाही खलास केले..

मात्र ही बर्वेची चूक होतीच.. मूळ रुपात प्रकट होण्याआधीच त्याने त्याच्या सामर्थ्याची चुणूक दाखवल्यामुळे काही ना काही कारणाने मनू रडू लागला.. कारण मनूच्या शरीराला त्या शक्तीने दिलेली ती शिक्षा होती...

तुम्हाला मात्र माझा आधार वाटला कारण मी तिघांना पळवून लावले असे तुम्हाला वाटले..

बर्वेच्या राज्यात गेल्यामुळे मला मात्र मोठी शिक्षा सहन करावी लागली... पण ती शक्तीकडून नाही तर बर्वेकडूनच.. आणि बर्वेने आधीच चुणूक दाखवल्यामुळे त्यालाही शिक्षा सहन करावी लागली... आमच्या क्षेत्रात हेतू अत्यंत शुद्ध असणे व एकही चूक न घडणे याला फार महत्व आहे.. पण चुका होतातच... होतच राहतात..

झुंबरच्या मृत्यूच्या बातमीने मात्र अख्खा जिल्हाच हादरला.... यंत्रणा खडखडून जाग्या झाल्या आणि दिव्यात गस्त सुरू झाली...

आणि दुपारीच तुम्ही घर सोडून निघणार तर अडसुळ अन माने चौकशीसाठी आले.. आणि बर्वेची दुसरी चुणूक मानेंना दिसली... तुम्हाला वाटले माने का घाबरतायत.. पण मनूने त्यांच्याकडे वळून पाहताना जो चमत्कार दाखवला त्यामुळे माने घाबरून पळत सुटले..

मानेंना शू झाली म्हणून मनू हासत आहे असे तुम्हाला वाटत होते.. वास्तविक तो हासत होता या गोष्टीला की त्याचे सामर्थ्य त्याला आता परत मिळालेले आहे.. काल झुंबरला मारण्यामुळे गेलेले सामर्थ्य!

सावट!

ते सावट, जे तुम्हाला सतत जाणवत होते.. ते काल संध्याकाळी.. म्हणजे ही आत्ताची जी पहाट चालू आहे त्या आधीच्या संध्याकाळी तुम्हाला सर्वांना डोळ्यांनी दिसले..

आता काही महत्वाची स्पष्टीकरणे देत आहे.. नीत लक्ष देऊन ऐका..

बर्वे मनूच्याच शरीरात का??

तर लहान मुलांच्या शरीरावर नियंत्रण आणणे हे सर्वात सोपे असते...

मग गावातल्या कोणत्याही मुलाच्या का नाही?? मनूच्याच का??

तर मनू या वास्तूत राहतो...

काका थोरातला असे घर.. जेथे पाच माणसे राहतात पण ती सर्वच एकमेकांची नातेवाईक नाही आहेत.. असे घरच का हवे होते???

तर अशाच घरात बर्वे असणार व त्याचा नायनाट करायचा ही माझी जबाबदारी होती..

बर्वे मनूच्या शरीरात असताना मनू नॉर्मल कसा काय वागतो??

कारण मनू वाटेल तसा वागला तर ही जागा तुम्ही सोडाल.. त्याच्यावर उपचार कराल.. जे बर्वेला अजिबात नको आहे.. त्याला प्रकट व्हायचे आहे मनूच्या तिसर्‍या वाढदिवसाला.. कारण काही विशिष्ट कालावधी त्याला त्या शरीरात राहने बंधनकारक आहे..

बर्वेवर हल्ला केला तर मनूचे काय होईल??

मनू सुखरूप राहील याचा पूर्ण प्रयत्न मी करणार.. पण बर्वे अत्यंत दुष्ट आहे.. तो मरता मरता मनूलाही काहीही करेल... मात्र ते होऊ नये यासाठीच मी आता पूजेला बसणार आहे..

या भानगडीत मी पडलोच नाही तर काय फरक पडेल??

तुमच्यातील प्रत्येक जण आपटे आजोबांसारखाच हाल हाल सहन करून मरेल.. आणि बर्वे या वास्तूवर पुन्हा सत्ता गाजवेल व त्यावेळेस मी पुरा पडेनच असे नाही..

या सर्वावर विश्वास का ठेवायचा??

आत्ता आत जाऊन पाहिलेत तर दिसेल की मनू झोपलेला असूनही त्याचे डोळे मात्र टक्क उघडलेले आहेत व तो आढ्याकडे बघत आहे.. मात्र तो जागाच आहे असे समजू नका कारण त्याला हाक मारलीत तर तो भडकेल आणि काहीही करेल.. आत्ता तो प्रतीक्षा करत आहे त्या क्षणाची ज्या क्षणाला तो प्रकट होऊ शकतो...

मी करणार आहे त्या उपायांऐवजी मनूला डॉक्टरला दाखवले तर काय बिघडेल??

डॉक्टरचा मृत्यू होईल.. आणि डॉक्टरकडे मनूला नेणार्‍याचाही..

या सगळ्या प्रकरणात अजित का मेला??

कारण मनू मला त्यात राहू देत नव्हता.. त्याने अजितच्या मनाला सामर्थ्य प्रदान केले होते मला बाहेर हुसकावण्याचे... आणि मला ते शरीर कोणत्याही परिस्थिती हवेच होते...

या पूजेत मी यशस्वी होईन का?

अजिबात माहीत नाही.. मात्र पूजा करावीच लागणार.. बरोब्बर सकाळी सात वाजता पूजा सुरू होईल.. मावशींच्या दोन खोल्यांमध्ये... आणि आठ वाजता मनूमधून बर्वे मूळ स्वरुपात प्रकट होणार आहे..

या सगळ्या प्रकरणात तुम्ही सगळे का समाविष्ट आहात??

कारण मावशी या मागच्या जन्मीच्या पद्मावती आहेत.. नमा ही बर्वेची कुमारिका मुलगी.. अर्चना ही बर्वेने जबरदस्तीने भोगलेली गावातील एक बाई.. सतीश हा त्या दोन पक्ष्यांमधील एक आहे.. दुसरा आता या गावात जन्माला आलेला नाही..

तुम्ही हे घर सोडून जाऊ का शकत नाही??

मी आणि बर्वे तुम्हाला ते करूच देणार नाही.. दोघांचीही कारणे वेगवेगळी आहेत.. माझे चांगले तर त्याचे वाईट.. पण आम्ही दोघेही हे होऊ देणार नाही..

हे सगळे का होत आहे??

कारण बर्वेला पुन्हा मानवी शरीर प्राप्त करून गावाचा सूड घ्यायचा आहे.. आपटे आजोबांचा सूड त्याने घेतलाही..

पूजा अयशस्वी झाली तर काय होईल??

आपण सर्वजण मरू... मनूसकट...

यशस्वी झाली तर काय होईल??

बर्वे नष्ट होईल.. आणि या वास्तूतले व गावातले सावट कायमसाठी निघून जाईल...

पूजा केलीच नाही तर??

तर तुम्ही सर्व मराल.... मी अजित कामतच्या शरीरात माझे पुढचे प्रयोग व साधना करायला मोकळा होईन.. मात्र मी पूजा केली नाही याची मला भयानक शिक्षा मिळेल व त्या शिक्षेचा परिणाम नष्ट व्हावा म्हणून मला अघोरी तपश्चर्या करावी लागेल..

तुमच्यापैकी कुणी मला पूजेपासून परावृत्त करू शकते का??

मी मनात आणले तर तुमच्यापैकी कुणी जागचे हलूही शकत नाही.. तेव्हा कोणताही वेडेपणा मला नको आहे..

अर्चना आणि सतीशचे मनूवरचे आई बापांचे प्रेम या भावनेल या संदर्भात काही महत्व नाही का??

शून्य महत्व आहे... पूजा यशस्वी झाली नाही तर मनूसकट सगळेच मरणार आहेतच...

पूजा यशस्वी होण्याची अथवा अयशस्वी होण्याची शक्यता किती...

यशस्वी होण्याची शक्यता खूपच... कारण माझ्याबाजूने ती शक्ती आहे.. मात्र.. अयशस्वी फक्त एकाच कारणाने होऊ शकते.... ते म्हणजे... पूजा करताना माझी क्षुल्लक जरी चूक झाली तरी... आणि तशी चूक होऊ नये म्हणून मनूच्या रुपातील बर्वे हजारो प्रयत्न करणार आहे..

पूजा चालू असताना तुम्ही काय करायचेत??

माझ्या आणि फक्त माझ्याच खोलीत बसायचेत.. पाणी प्यायचे नाहीत..अन्नाला स्पर्श करायचा नाही.. मनू किंवा मी कितीही किंचाळलो.. विव्हळलो तरीही लक्षही द्यायचे नाही... मावशींच्या खोलीच्या आसपास जो येईल तो पूजा उधळून लावण्यास कारणीभूत ठरेल... त्याचे परिणाम फार म्हणजे फारच भीषण असतील..

अजून काही शंका?? प्रश्न??"

प्रत्येकजण हादरलेला होता... तोंडातून शब्दही फुटत नव्हता कुणाच्या...

शंका कसली विचारणार??? फक्त यातले काहीच होऊ नये असे मात्र प्रत्येकाला मनात वाटत होते... पण तसे बोलण्याचाही अधिकार कुणाला उरलेला नव्हता आता... अमानवी सावट प्रस्थापित झालेले होते वास्तूत... तेथे मानवाने काहीच बोलण्याची आता शक्यताच उरलेली नव्हती...

तरीही.. कुणीतरी एक शंका विचारलीच... घोगर्‍या आवाजात.....

आणि शंका विचारून झाल्यावर ती व्यक्ती खदखदून हासली... एक आणि एक माणूस भीतीने साकोळलेला होता...

ती शंका होती...

"काय हो महाशय???? मी... आत्ताच प्रकट झालो तर????"

ही शंका विचारून खदखदून हासत मनू त्याच्या खोलीच्या दारात उभा राहून खिजवत होता...

गुलमोहर: 

Danger..aaj serve part vachale........
mahit nahi raati zop yete ki nahi......
next part please...

chaan.....timing utkrusht......shaaant pane adhi kathaa vaachali....magch pratisaad detoy....

मस्तच !!

पण मला आता भीति वाटतेय की तुम्ही काका थोरात अर्थात अजित कामत ला जिंकवणार ....मनु अर्थात बर्वेला ठार मारणार अन नेहमीची टीपीकल एन्डी<ग करणार ...शेवटी सत्याचाच विजय होतो ब्लाह ब्लाह ब्लाह .
.
असो .
.
तुम्ही कसा शेवट करताय हे पहायची प्रचंड उत्सुकता लागुन राहीली आहे !!

तुम्ही कसा शेवट करताय हे पहायची प्रचंड उत्सुकता लागुन राहीली आहे !!

अगदी अगदी मलापण...

बेफी काय बेफाम लिहीले आहे...तुमचे कथानक उगाच कसेही कुठेही वहावत जात नाही याचे एक छान उदाहरण..कथेतल्या प्रत्येक गोष्टीचे एक स्पष्टीकरण आहे..काही ठीकाणी थोडे ओढून ताणून बसवल्यासारखे वाटते पण कथालेखकाचे स्वातंत्र्य म्हणून तेवढी सूट तुम्हाला नक्कीच आहे...

फक्त एकच राहीले..हे सर्व लोक पूर्वजन्मात त्या घटनेशी संबधीत होते. पण तेच बरोबर त्या वास्तूत कसे आले. एकही अशी व्यक्ती नाही का जी त्या घटनेत समाविष्ट नव्हती

<<<फक्त एकच राहीले..हे सर्व लोक पूर्वजन्मात त्या घटनेशी संबधीत होते. पण तेच बरोबर त्या वास्तूत कसे आले. एकही अशी व्यक्ती नाही का जी त्या घटनेत समाविष्ट नव्हती>>>

मला पण हा प्रश्न पडला. पूर्वजन्माची काहि लिंक आहे का? आणि समजा ति नसति तर कथेत काहि फरक पडला असता का?

अगदी प्रत्येक गोष्टी चे स्पष्टीकरण लिह्ले आहे. त्यामुळे छान लिंक लागते आहे. पुन्रजन्म झाला आहे, मावशी आणी मंड्ळींचा हे जरा जास्त वाटते, पण बाकी सुसुत्रता आहे.