एकदा दुपारी!
"शू होतीये!" जोरदार रडण्याच्या आवाजात मधेच किंचाळून एक छोटा मुलगा म्हणाला आणि माझं लक्ष तिकडे वेधलं गेलं.
इथल्याच एका गल्लीतली गोष्ट ही. सुट्टीच्या दुपारची शांत वेळ होती. एक कुटुंब रस्त्यावरून चाललं होतं. आई, बाबा, आईचा हात धरून ४-५ वर्षाचा छोटुकला असे पुढे चालले होते आणि चारपाच पावलं मागे छोटुकल्याचा आठनउ वर्षाचा दादा रडत पाय ओढत मधूनच "शू होतीये!" असं ओरडत चालला होता.
"अति झालंय हं तुझं आता!"
"बोर्डिंगची चौकशी केलीयेत ना हो? तेच बरं. तिथेच जा तू."
"शू होतीये तर जा त्यांच्या घरात आणि जाउन कर!"
असे आणि या अर्थाचे संवाद अधून मधून आईबाबांच्याकडून येत होते. छोटुकल्याला काय करावं सुचत नव्हतं. आईच्या हाताला धरून चालत जाणं एवढंच तो करत होता. मधेच दादाकडे नजर टाकत होता. छोटुकल्याचा दादा मात्र कळवळून रडत ओरडत होता.
'सगळे नियम गेले खड्ड्यात, इतका कळवळतोय तो 'शू लागली' म्हणून. मुलगाच आहे. लहानही आहे. जाउदेत त्याला त्या बाजूच्या कचरापेटीच्या इथे.' असं भोचकपणे सांगायची जाम इच्छा झाली होती मला.
तेवढ्यात गल्ली वळली आणि मी वळताना मला त्या आईचा चेहराही दिसला. असेल माझ्याच आसपासच्या वयाची. जे काय चाललंय त्याची प्रचंड शरम, दु:ख, राग सगळंच होतं तिच्या चेहर्यावर. बाबाच्या चेहर्यावर पण वेगळं काही नव्हतंच.
मग लक्षात आलं मुलाला चुकीच्या वेळेला, चुकीच्या ठिकाणी 'शू लागली' यासंदर्भाने हे सगळं घडत नव्हतंच. जे काय होतं ते बरंच काही आत खोलवर होतं. मुलाला कदाचित खरंच शू लागलेलीही नव्हती. काहीतरी झालं होतं आणि 'शू होतीये' असं रडून ओरडून मुलगा आपला संताप, हतबल होणं सगळंच व्यक्त करत होता. बोर्डींगचा धाक, थोडंफार दुर्लक्ष अशी कुठलीतरी हत्यारं वापरून आईबाबाही तेच सगळं व्यक्त करत होते. कुठेतरी कुणीतरी चुकलं होतं नक्कीच. आईबापांना दोष द्यावा असं वाटलं नाही कारण मुलगा आठनऊ वर्षाचाच जरी होता तरी आईबापही आईबाप म्हणून आठनऊ वर्षाचेच होते. आणि नक्कीच मुलाचा छळ करण्याइतके निर्दय वाटत नव्हते. मुलगा रस्त्यात लाज काढतोय या रागापेक्षा आपण कमी पडतोय याची शरम त्यांच्या चेहर्यावर सहज दिसत होती.
पुढे मी रिक्शा पकडली आणि जिथे पोचायचं होतं तिकडे निघाले. पुढे काय झालं माहित नाही. मी मदत काही केली नाही/ करू शकले नाही. मदत काय करणार होते म्हणा. त्यांच्या कुटुंबात जो काय प्रश्न असेल तो मी तिथे मधे पडून सोडवू शकणार नाहीये हे मला पक्कं उमजलं होतं. आणि बाहेरच्या माणसाने असे नाक खुपसून त्यांना अजून लाजिरवाणं वाटायला लावणं हे काही माणुसकीला धरून वाटत नव्हतं.
मी जरी तिथे काहीच केलं नाही तरी गेला आठवडाभर या एका प्रसंगाला धरून कहाण्याच्या कहाण्या माझ्या मेंदूने विणल्या. अजूनही तो प्रसंग डोक्यातून जात नाही. फुगा घ्यायला नाही म्हणाल्यावर रस्ताभर जोरात भोकाड पसरून आईबाबांना कानकोंडं केल्याच्या आपल्या सगळ्यांच्याच आठवणी असतीलच. त्याने आपल्या आयुष्यावर परिणाम नाही झाला काही. तशीच ही घटना ठरो अशी आशा करणंच उरतं आपल्याकडे.
पण तरी ही गल्ली चांगलीच लक्षात राहील माझ्या आणि हे कुटुंबही.
- नी
मी पैली खरंच आपल्यावरही अशी
मी पैली
खरंच आपल्यावरही अशी वेळ आलेली असेल कधीतरी. त्या त्या वेळी कसं व्यक्त व्हायचं हे नाही कळत अशा अडनिड्या वयात.
त्यांच्या कुटुंबात जो काय
त्यांच्या कुटुंबात जो काय प्रश्न असेल तो मी तिथे मधे पडून सोडवू शकणार नाहीये हे मला पक्कं उमजलं होतं. आणि बाहेरच्या माणसाने असे नाक खुपसून त्यांना अजून लाजिरवाणं वाटायला लावणं हे काही माणुसकीला धरून वाटत नव्हतं.>>>>>>>> पटलं....
बिचार्याला खरंच जोराची शू
बिचार्याला खरंच जोराची शू लागली असेल आणि कुठेतरी बाथरुमपर्यंत पोहोचेपर्यंत कंट्रोल नाही झाली तर त्याच्या आईबाबांना अजूनच शरमिंदं वाटलं असतं.
नी, तो दादा ८-९ वर्षांचा
नी, तो दादा ८-९ वर्षांचा म्हणजे फार मोठा नाही, पण ४-५ वर्षांच्या छोटुकल्याचा मोठा भाऊ झाल्यामुळे त्याच्यावरचं आईबाबांचं लक्ष उडलं, त्याच्यावरच्या नसत्या जबाबदार्या वाढल्या, तू मोठा आहेस, तूच समजून घ्यायचंस असे रुल पण त्याच्यावर घातले जात असतील. तेच त्याला टोचत असेल... आईबाबांचं लक्ष आपल्या अस्तित्वाकडे वेधून घेण्यासाठी तो या प्रकारचे अनेक प्रकार दिवसभरात करत असणार आणि एवढा ८-९ वर्षांचा 'घोडा' झाला तरी याची असली नाटकं अजून संपत नाहीत म्हणून आईबाबा वैतागले असतील. मोठ्या भावडांची दु:खं त्यांनाच माहिती.
अनेक वेळा त्या दादाला तू आता नीट वाग हा, ऐकलं नाहीस तर बोर्डिंगला पाठवीन अशी धमकी पण मिळत असेल.
माझं वैयक्तिक मत असं की, छोट्या भावंडांमुळे मोठ्यांवर बरेचदा आईवडिलांकडून अन्याय होतो नकळत, किंवा कळतही असेल पण त्यांचाही नाईलाज होतो कधीकधी.... तर अशावेळी मोठ्या मुलांच्या जेन्युईन प्रॉब्लेमकडे पण दुर्लक्ष केलं जातं...
नी, तू त्या मुलाच्या
नी, तू त्या मुलाच्या आईवडिलांना सांगायचं होतंस. निदान त्या एवढ्याशा मुलाला असा त्रास जास्तवेळ सहन नसता करावा लागला.
तारे जमीन पर आठवले. एकत्र
तारे जमीन पर आठवले. एकत्र बसून बोलले तर कितीतरी गोष्टी क्लीअर होतात नाही का? काल आम्ही हाच विषय चर्चेला घेतला होता:- समटाइम्स देअर आर नो इश्यूज. डोमेक्सची अश्याच प्रकारची एक जाहिरात मध्ये येत होती.
या निमित्ताने 'वर्हाड
या निमित्ताने 'वर्हाड निघालयं लंडनला' या एकपात्री नाटकातला प्रसंग आठवला. अश्विनीमामी यांना अनुमोदन. जसे चिमुरड्यांचे वय असते त्याप्रमाणे आपणही वागायला हवं. हाच त्यांचा योग्य संगोपनाचा मूलमंत्र आहे असे मला वाटते. 'तारे जमीन पर' वा 'टिंग्या' हि उत्तम उदाहरणं आहेत या विषयावार.
खरी लागलीही नसेल. लहान
खरी लागलीही नसेल. लहान मूलांची ती एक आवडती सबब असते, आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायची.
अश्यावेळी आपल्यासारख्या त्रयस्थाने त्या मूलाकडे चक्क हसून बघायचे किंवा वेडावून दाखवायचे, तो हसला किंवा डिस्टर्ब झाला, तर सबब खोटी असे समजायचे.
आई ग...बिचारं पिल्लू
आई ग...बिचारं पिल्लू
केवळ बघे असं लेबल पत्करूनही
केवळ बघे असं लेबल पत्करूनही मला तिथे कुठल्याही पद्धतीने इंटरअॅक्ट करणं हा एका प्रकारे त्या कुटुंबाच्या प्रायव्हसीचा भंगही वाटला आणि मी काय सांगणार होते त्यांना? मुलाला जाऊद्या शू करायला म्हणून? मला नाही वाटत मुद्दा इतका वरवरचा होता.
मुळात त्याला खरंच जायचं होतं पेक्षा त्या ओरडण्यामागे लक्ष वेधून घेण्याचंच जास्त होतं असं मला वाटलं.
मंसो चा मुद्दा अगदीच मान्य होण्यासारखा. ८-९ वर्षालाच आता तू मोठा आहेस, तुला समजत कसं नाही घोडा झाला तरी इत्यादी गोष्टी जामच प्रेशर आणणार्या. सख्ख्या नाहीतरी इतर सगळ्या भावंडाच्यात मोठी असल्याने कायम समजूतदारपणाचं राज्य माझ्यावर आलेलं होतं असंच आठव्या नवव्या वर्षापासून..
किती साधा प्रसंग मांडलायंस,
किती साधा प्रसंग मांडलायंस, पण तरिही विचार करायला लावणारा आहे.
मुलांच्या ह्या सवयीला 'अटेंशन सिकिंग' असं म्हणतात. पण प्रत्येक वेळेला तेच कारण असेल असंही नाहिये. खरी खरी शू लागलेली असू शकते. निरिक्षण केलंत तर बर्याचश्या घरांमध्ये जेवायला बसलं की लहान मुलं शी-शू लागली म्हणून उठवतात. खरंतर तो एक 'कंट्रोलिंग पेरेंट्स' चा प्रकार आहे. बाकी वेळेला पेरेंट्स त्यांना कंट्रोल करतात... आणि अशा छोट्या गोष्टींमधून मूलं ही प्रयत्न करतात... हा एक भाग..
तसे वर नी ने वर्णन केलेल्या घटनेला दुसरा पैलू ही असेलंच..
मनोगत आवडलं...
एकंदर प्रकार कळला नाही. 'शू
एकंदर प्रकार कळला नाही.
'शू लागलेला मुलगा आणि त्रासलेले पालक' या चित्रावरून मला तरी-
१) गंभीर कौटुंबिक समस्या
२) असमंजस पालकत्व
३) सार्वजनिक प्रसाधन सुविधांचा अभाव
४) 'मोठे भावंड' असण्याचा अन्याय सोसावा लागणे
५) अन्य कुठलाही
यापैकी काहीही निष्कर्ष काढता आला नसता.
इतक्या त्रोटक माहितीवरून निष्कर्षावर येणार्यांच्या क्षमतेचे मला कायमच कौतुक वाटत आले आहे.
यापैकी काहीही निष्कर्ष काढता
यापैकी काहीही निष्कर्ष काढता आला नसता.<<<
कदाचित प्रसंगाचे यथायोग्य वर्णन मला करायला जमले नसेल.
कदाचित त्या आईबाबांचे चेहर्यांमधे मी जरूरीपेक्षा जास्त वाचले असेन.
कदाचित अजून काही.....
मी तिथे होते आणि मला जसं दिसलं तसं मी लिहिलं.. इम्प्रेशनिस्ट मांडणी
त्यावर मला कसं वाटलं तेही लिहिलं .... एक्स्प्रेशनिस्ट मांडणीकडे प्रवास...
अगदी छोटासाच प्रसंग पण खुप
अगदी छोटासाच प्रसंग पण खुप काही सांगून जाणारा,
नी " इम्प्रेशनिस्ट मांडणी "
नी " इम्प्रेशनिस्ट मांडणी " हे पटलं
i agree with you dnyanesh. :
i agree with you dnyanesh. :
'शू लागलेला मुलगा आणि
'शू लागलेला मुलगा आणि त्रासलेले पालक' या चित्रावरून मला तरी-
१) गंभीर कौटुंबिक समस्या
२) असमंजस पालकत्व
३) सार्वजनिक प्रसाधन सुविधांचा अभाव
४) 'मोठे भावंड' असण्याचा अन्याय सोसावा लागणे
५) अन्य कुठलाही
यापैकी काहीही निष्कर्ष काढता आला नसता.>> काही लोकांकडे ते स्किल असते, संवेदनक्षमता असते. भावभावनांची एक भूमिगत ग्रिड असते. ती हातात आल्यासारखे वाट्ते. क्रिएटिव फील्डमध्ये काम करणार्या लोकांना हे जास्त लक्षात येते. फार चांगले लीडर्स, उद्योजक वगैरे सुद्धा बघा एका सेकंदात प्रसंग जोखून वागताना दिसतात. याउलट काहींना पार समोर अगदी ह्रदयद्रावक प्रसंग घड्त असला तरी आपली गाडी लेट होते आहे वगैरे असेच विचार येतात. ह्युमन नेचर
यापैकी काहीही निष्कर्ष काढता
यापैकी काहीही निष्कर्ष काढता आला नसता.>>>>
का काढ्ता येत नाहि निष्कर्ष
त्या कुटुंबात स्वंता: ला बघा
निष्कर्ष काढताच यायला हवा असा
निष्कर्ष काढताच यायला हवा असा काही आग्रह नाही.
मला जे जाणवलं ते मी लिहिलं. प्रत्येकाला वेगळं जाणवू शकतं.
कदाचित मला जे जाणवलंच नाही ते दुसर्या कोणाला तरी जाणवू शकतच.
निष्कर्ष काढताच यायला हवा असा
निष्कर्ष काढताच यायला हवा असा काही आग्रह नाही.
मला जे जाणवलं ते मी लिहिलं.>>> अनुमोदन.
@मामी आणि इतर- असा निष्कर्ष
@मामी आणि इतर-
असा निष्कर्ष काढता येणे हे स्किल आहे, हे मान्यच आहे. माझ्याकडे हे स्किल नसल्यानेच मला इतरांचे कौतुक वाटते, हे नमूद केले.
कदाचित जे "पालक" अवस्थेत आहेत
कदाचित जे "पालक" अवस्थेत आहेत आणि/किंवा ज्यांच्या सहवासात काही लहान मुले आली आहेत त्यांना ह्या प्रसंगातून अनुमान काढणे शक्य आहे.
असा निष्कर्ष काढता येणे हे
असा निष्कर्ष काढता येणे हे स्किल आहे,<<<<
असं काही मला वाटत नाही. खरंच.
निष्कर्ष निघत नसताना उगिच
निष्कर्ष निघत नसताना उगिच काढले, ते स्किल वगैरे थोडं जास्ती होतंय..
त्यापेक्षा कोणत्याही घटनेकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन म्हणा...
चांगली मांडणी. सुरवातीला मला
चांगली मांडणी. सुरवातीला मला पण छोट्या प्रसंगावरून खूप खोल आणि कदाचित विनाकारण गंभीर निष्कर्ष आहे आसं वाटलं. कारण असल्या प्रसंगातून आणि दक्षिणाने म्हटलेल्या जेवतानाच्या प्रसंगातून मी असंख्य वेळा जाते
पण २ मुद्दे पटले. एक्स्प्रेशनिस्ट मांडणीकडे प्रवास आणी कदाचित असूही शकेल काही निराळच कारण.
Try not to read too much into it and take he incident at face value.
आता पुढच्या "मॉमी आय नीड टू गो टू बाथ्रूम " च्या वेळी मी बहुदा जास्त समंजसपणे वागेन.:)
आमच्याकडे तर अभ्यासाला बसले
आमच्याकडे तर अभ्यासाला बसले की हमकास मुलाला आठवते...
बाकी प्रसंग छान मांडलाय
अश्यावेळी आपल्यासारख्या
अश्यावेळी आपल्यासारख्या त्रयस्थाने त्या मूलाकडे चक्क हसून बघायचे किंवा वेडावून दाखवायचे, तो हसला किंवा डिस्टर्ब झाला, तर सबब खोटी असे समजायचे.>>>>>>>>>>>>>>
हे भारी आहे हा दिनेशदा...... एकदा करून बघायला पाहिजे इन फॅक्ट, त्या मुलाच्या आई किंवा वडिलांपैकी कुणी एकाने जरी असं केलं तरी तो मुलगा चक्रावून जाईल की अरे हे असे काय वागतायत आणि मग खरं काय ते कळेल.
मस्त
मस्त