सावट - ८

Submitted by बेफ़िकीर on 19 May, 2011 - 05:14

भूत! अमानवी! मानवाच्या डोळ्यांना दिसेलच असे नाह, कानांना ऐकू येईलच असे नाही अशा बाबी विश्वात, निसर्गात आणि आपल्या आजूबाजूला असतात यावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न!

पण एक गोष्ट मानवाला अजूनतरी अजिबात समजलेली नाही की मेल्यावर काय होते? शरीर मरते म्हणजे काय होते हे वैद्यकीय दृष्ट्या सांगणे शक्य आहे. हृदय बंद पडते. किंवा मेंदू बंद होतो आणि त्यामुळे दोन ते तीन मिनिटात सगळ्याच क्रिय बंद पडतात आणि शरीर मरते. काहीही!

पण शरीर मरते याचा एक अर्थ कुणीच लक्षात घेताना दिसत नाही सहसा! तो म्हणजे त्या शरीरात असे काहीतरी होते, जे कदाचित त्या शरीराबाहेर जायला तयारच नव्हते. मरायचे असते कुणाला? यातून आत्महत्या करणारेही वजा करता येत नाहीत कारण त्यांना 'मरायचे नसते', त्यांना फक्त 'जगायचे नसते किंवा जगता येत नसते'!

मग याचा अर्थ असा की काय, की प्रत्येक शरीरात काहीतरी असे असतेच ज्याला त्या शरीराच्या कोंदणातून बाहेर पडायची इच्छा नसते आणि ते तसेच राहते?

नाही! याचा अर्थ सरळ सरळ तसा होत नाही. माणूस ज्याला 'मन' म्हणतो ते बरेचसे मेंदूत असते आणि बाकीचे त्वचेत, रक्तात व इंद्रियात समान प्रमाणात विभागलेले! त्यामुळेच मेंदू मेला की मन मेले असे बहुतांशी गृहीत धरता येते. पण प्रत्येक माणूस मरण्याआधीच्या क्षणी बेशुद्ध पडलेला असतो. अगदी सूक्ष्मकाल का होईना पण तो बेशुद्ध होतोच! कारण होत असलेल्या वेदना सहन करण्यापलीकडे गेल्या की मेंदूतील माणसाला बेशुद्ध करनारी रसायने पाझरतात व तो बेशुद्ध पडतो. आपल्याला जर एखादा वृद्ध शांतपणे गेलेला दिसला तर त्याचा अर्थ तो शांतपणेच गेलेला असतो असे नाही. तो इतका अशक्त झालेला असतो की त्याच्या मेंदूला आता शरीराचे अस्तित्व व शरीराचा कारखाना चालवणेही शक्य होत नाही त्यामुळे तो मरतो. तरीही मरण्याआधी काही निमिषार्धांपुरता तो बेशुद्ध होतोच, कारण निसर्गाने मानवाला स्वतःचा मृत्यू स्वतः बघ्ण्याची वेदना दिलेली नाही. आपला मृत्यू 'आता होणार आहे' इतपत अंदाज कदाचित येऊ शकेलही, पण 'आत्ता आपला मृत्यू होत आहे' हा अंदाज मानवाला येत नाही.

हा जो बेशुद्ध पडण्याचा क्षण असतो त्या क्षणापासून शरीर पुरते मरेपर्यंतचा क्षण यातील कालावधी अर्धा क्षण ते कितीही तास इतका असू शकतो. मात्र या कालावधीत मानवी जन्मातील सर्वात महत्वाची घटना घडते. आणि ती अगदी ठरल्याप्रमाणे घडतेच, अगदी निमिषार्धातही वेगात घडते.

ही घटना कोणती?

तर मेंदू त्याच्यात स्वतःमध्ये वसलेल्या व त्वचा, इंद्रिये आणि रक्त यात वसलेल्या मन नावाच्या द्रव्याला नष्ट करतो.

मेंदू स्वतः थांबण्यापुर्वी हे कार्य करतोच करतो. त्याला ते करावेच लागते कारण निसर्गाचा नियम आहे तो!

कारण मन जर पूर्न नष्ट झाले नाही तर मनातील इच्छांना पुन्हा शरीराचे भासमय रूप मिळते व त्यांचा वावर सुरू होतो त्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी! हे शरीर मूळ शरीराप्रमाणेच असते, पण जर मूळ शरीर त्या मनाला नकोसे असेल किंवा मिळू शकत नसेल तर ते मन दुसरे शरीर शोधते.

आता प्रश्न असा आहे की मन म्हणजे काय?

मन हे एक रसायन आहे जे आईच्या गर्भात असताना जवळपास नगण्यच असते व केवळ मेंदूत असते. ते द्रवस्वरुपात असते. जन्म झाल्यानंतर जेव्हा पहिली इच्छा पूर्ण होत नाही, मग ती आईच्या बोटातील अंगठी बोचल्यामुळे होणारी वेदना होऊ नये अशीसुद्धा इच्छा असू शकेल, पण जेव्हा कोणतीही पहिली इच्छा पूर्ण होत नाही त्या क्षणी सुप्तावस्थेत असलेले मन जागृत होते व कार्यरत होते. म्हणजेच ते रसायन जागृत होते व कार्यरत होते.

आपल्या पाठीला आईची अंगठी आत्ता बोचली व त्यामुळे झालेल्या वेदना आपल्याला नको आहेत ही जाणीव झाली की मन नावाचे रसायन मेंदूपासून पाझरत त्या बिंदूपर्यंत येऊन थांबते. असेच ते हळूहळू शरीरभर पाझरत राहते.

त्याचे वाहण्याचे माध्यम रक्तच असते. ते हाडांपर्यत, स्नायूंपर्यंत, त्वचेपर्यंत आणि प्रत्येक इंद्रियापर्यंत पोचते. मात्र अगदीच नगण्य स्वरुपात! त्याचे हेडक्वार्टर मेंदूतच असते. आणि त्याचा मास्टर ऑन किंवा मास्टर ऑफही मेंदूतच असतो.

इच्छांची व त्यांच्या पूर्ततेची किंवा पूर्ण न होण्याची साखळी म्हणजे आयुष्य! त्यामुळेच शरीर मरायच्या अगदी आधीच्या पातळीपर्यंत मन जागृतावस्थेतच राहते. लाखो करोडो इच्छा, आशा आकांक्षा, अनुभव, सभोवतालचा निसर्ग, माणसे, नातेवाईक, मित्र, पुढची पिढी, सगळ्यांचे वागणे, उदरनिर्वाहाचा ताण, यशापयशे, सुखदु:खे, जन्ममृत्यू झालेले बघणे या अत्यंत ठळक बाबींव्यतिरिक्तही कोट्यावधी सूक्ष्म तंतूंनी मन बनत जाते, बनत राहते, विस्तारत राहते, मेंदूवरही कब्जा करायला बघते आणि मानवाला विविध चांगली वाईट कृत्ये करण्यास भाग पाडते.

या मन नावाच्या रसायनाशिवाय मानव किंवा एखादा पशू जन्मू शकत नाही कारण नाहीतर तो एखाद्या झाडासारखा बनला असता. त्याचा एखादा हात जरी कोणी तोडून नेला असता तरी त्या वेदना मेंदूने सहन केल्या असत्या व मन नावाच्या रसायनाला त्यात काहीच हरकत असु शकत नसती कारण ते अस्तित्वातच नसते. त्या वेदना मेंदूला सहन झाल्या नसत्या तर त्याने मृत्यू स्वीकारला असता. सहन झाल्या असत्या तर हाताशिवाय शरीर जगले असते. याचे उदाहरण म्हणजे झाड! तुम्ही जर झाडाचे पान तोडलेत, तर त्याचे श्वास घेणारे एक नाक कापलेत असा अर्थ होतो. पण झाड तक्रार करत नाही, इतकेच नाही तर दुसर्‍या दिवशी पुन्हा तुम्ही दिसलात तर ते तिथून पळून जात नाही. कारण झाडाला मन नसते. तरीसुद्धा एक मात्र आहे की सर्वात तातडीने प्रतिक्रिया झाडच देते. मानवापेक्षाही! कारण ते निसर्गाच्या सर्वाधिक जवळ असते.

मानव व पशू मन घेऊनच जन्माला येतात.

आणि मन मेल्याशिवाय शरीर मरत नाही. मेंदूने मन मारल्याशिवाय शरीर मरत नाही.

मात्र... या सगळ्यात एक मोठा तिढा असतो.

मनाचे सामर्थ्य जर अपरिमित वाढले तर मेंदू मनाला मारूच शकत नाही.

मग ते मन म्हणजे केवळ एक रसायन, अस्तित्वात राहतेच!

त्या रसायनात त्या त्या माणसाने घेतलेले सगळे अनुभव, त्याची सर्व कृत्ये, यशापयशे, भीती, सुखदु:ख, सामर्थ्यवान असण्याची जाणीव, हेवेदावे, कुटीलता, क्रोध, मोह, शांतता, तडफड हे सर्व घटक तसेच्यातसेच राहतात.

मनाचे सामर्थ्य इतके कधी वाढते? तर जेव्हा मानवाचा हव्यास इतका वाढतो की त्याला पृथ्वीची सत्ता हवीशी होऊ लागते. यात तुम्ही सिकंदरचे नांव घ्याल, नादिरशहाचे नांव घ्याल! पण यांचा हव्यास मानव व जमीन यावरची सत्ता असा होता. त्यात समुद्र, इतर सर्व पशूपक्षी, झाडे, जमीनीच्या गर्भापर्यंतचे थर आणि पृथ्वीवरील आकाशाचे मंडल यांचा समावेश नव्हता. त्यात हवा नव्हती. त्यात निसर्गावर विजय नव्हता. असेच मन जिवंत राहिलेल्यांवरील विजय त्यात नव्हता.

मनाचे सामर्थ्य इतके वाढण्यास आणखीन एक गोष्ट कारणीभूत ठरते. ती म्हणजे मुळात निसर्गानेच अनवधानाने केलेली चूक! ती म्हणजे चुकून एखाद्याला अधिक सामर्थ्यवान मन देणे! अशा माणसाला इतर माणसांना न दिसणारे घटक दिसू शकतात. याचे उदाहरण तपशीलवार देतो. कुणी मरणार असते तेव्हा कुत्री ओरडतात किंवा रडतात याचा आपण अनुभव घेत असतो. असे का? तर कुत्र्यांना मृत्यूचे सावट आलेले जाणवते. काही पक्ष्यांना भूकंप होणार आहे हे आधीच जाणवते. ते मानवाला जाणवत नाही. मात्र निसर्गाच्या चुकीने एखाद्या मानवात ती शक्ती निर्माण होते. आता वरवर वाटायला असे वाटेल की ही मनाची नसून मेंदुची शक्ती आहे. तसे नसते. त्यांचा मेंदू इतरांसारखाच सामान्य असतो. पण मन नावाचे रसायन हे अत्यंत अतिरिक्त असे संवेदनशील असते. आजूबाजूला घडणार्‍या सूक्ष्मातील सूक्ष्म बाबींचा त्यावर परिणाम होतो व त्याला त्यातील अर्थ समजायला लागतात. असा असा माणूस आपण निर्माण केलेला आहे हे निसर्गाला समजले तरी तो त्याला नष्ट करत नाही. कारण त्याला स्वतःला असा मानव निर्माण होण्यात काहीच धोका नसतो. धोका असतो इतर मानवांना!

हा अती संवेदनशील मनाचा माणूस इतरांपेक्षा अधिक ज्ञानी बनू लागतो. वातावरणातील फरकांमुळे त्याच्या संवेदनशील मनातून त्याच्याच मेंदूला संदेश पोचतात व त्याला पुढचे कळू शकते. मागचे कळू शकते. अस्पष्टपणे का होईना पण कळते! यातील काही विद्वान ठरून ज्योतिषीही बनू शकतात. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून बनलेल्यांपेक्षा ते अधिक थोर असतात. मग ते बुवा समजले जाऊ शकतात. स्वामी, बाबा असे काहीही समजले जाऊ शकतात.

हे झाले मनाची शक्ती चुकून अधिक असण्याचे उदाहरण!

पण या चुकून अधिक मिळालेल्या शक्तीला जर प्रयत्नांची जोड दिली तर ही शक्ती अपरिमित वाढू शकते. हे प्रयत्न म्हणजेच अघोरी विद्या! अनेक प्रकारच्या पूजा ज्या सामान्य मानवाच्या दृष्टीने अत्यंत भीतीदायक, हिंस्त्र, हिडीस व अनाकलनीय असतात. मात्र त्या पूजांचा हेतू काय आहे त्यावर त्या पूजांचे महत्व ठरते. या पूजेत वाट्टेल ते प्रकार केले जातात.

चांगल्या हेतूने केलेल्या पूजांचे परिणाम तर चांगले होतातच, पण त्या मानवाचे सामर्थ्यही शाबूत राहते. मात्र वाईट हेतूने केलेल्या पूजा, प्रयत्न, तप, अघोरी प्रकार या सर्वांमुळे ते सामर्थ्य लयाला जाणार असते. प्रश्न फक्त इतकाच असतो की ते कधी लयाला जाणार??

बर्वेने केलेल्या सर्व पूजांमागे अत्यंत वाईट हेतू होता.

=====================================

अजित कामतच्या रुपातला काका थोरात बोलायचा थांबला तेव्हा रात्रीचे सव्वा वाजलेले होते आणि मनू सोडला तर सगळे टक्क जागे राहून बोळातच बसून काका थोरातचे बोलणे ऐकून अधिकाधिक आश्चर्य व्यक्त करण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हते.

झुंबर गोरे दिसल्यामुळे घाबरून आत आलेल्या प्रत्येकाला काका थोरातने धीर दिला व बोळात बसवले. मनूला झोपव असे अर्चनाला सांगितले व त्याने आज सारी कहाणी सांगणार असल्याचे व घाबरायचे अजिबात कारण नसल्याचेही सांगितले. आत्ता मात्र त्याच्या शरीरावर कुठेही जळल्याची एकही खुण नव्हती. नेहमीचाच अजितचा हासरा चेहरा दिसत असल्याने व बाहेर गेलो तरी बाधित प्रकार आहेतच याची खात्री पटल्यामुळे अगतिकपणे सगळे जण त्याच्यासमोर बसून ऐकत राहिले.

काका थोरातने सांगितलेली कहाणी अशी:

१९३६ सालचा काळ होता तो! आजपासून बरोबर साठ वर्षांपुर्वीचा! आपते आजोबा केवळ सोळा सतरा वर्षांचे होते तेव्हा! दिवे गावात तेव्हा दिवेही नव्हते. लोकसंख्या खूपच कमी होती. कडक थंडी असायची सहा महिने! गावातील प्रत्येक जण काही ना काही शेती करूनच जगायचा. गावात खूप चांगली माणसे होती. गावात शांतता होती. खरे तर तेव्हा सावेळे हे गाव निर्माण होऊ लागले होते. सावेळे हे दिव्यानंतर निर्माण झालेले गाव असले तरी येथे आज सावेळ्यापेक्षा कमी प्रगती दिसते याचेच कारण म्हणजे.. दिवे गावातील बर्वे कुटुंब!

बर्वे हा म्हातारा सत्तरीचा असेल!

एका विशिष्ट कालावधीपर्यंत तो आणि त्याचे कुटुंबीय गावातल्यांना एक आधारच वाटायचे. याच वास्तूत राहायचे सारे! बर्वेला त्या काळात दोन बायका आणि एक ठेवलेली बाई होती. मात्र या प्रकाराचे गावातल्यांना काही वाटत नव्हते कारण तेव्हा प्रत्येकच घरात दोन बायका असणे अगदी सामान्य होते. बर्वे अनेकदा अनेकांना कर्जाऊ पैसे द्यायचा आणि सावकारी करायचा. मात्र त्या मागे माणुसकीचे अधिष्ठान होते. त्याचमुळे तो गावातल्या अनेकांना आधार वाटायचा. गावातले अनेक लोक त्याच्या या वास्तूत नोकर म्हणून राबायचे.

बर्वेच्या पहिल्या बायकोला अपत्य नव्हते. दुसर्‍या बायकोला दोन मुली व एक मुलगा होता. ठेवलेल्या बाईला एक मुलगा व एक मुलगी! अशी एकंदर पाच अपत्ये होती व त्यांच्यात सलोखाही होता व प्रेमही!

बर्वेकडे चिक्कार पैसा होता. मात्र त्याच्याकडे असलेल्या अनेक वस्तूंचे प्रयोजन फक्त त्याला आणि मलाच माहीत होते.

मी तेव्हा स्मशानाच्या मागेच राहायचो. काका थोरातच्या शरीरात!

बर्वे स्मशानावर कायम यायचा. पण अंधारात यायचा! कुणाला माहीत नसायचे. तो अनेक प्रकार, अनेक अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न करायचा. त्याची आणि माझी सामर्थ्य प्रदान करणारी शक्ती एकच होती. त्यामुळे तो गुरुंबंधू आहे असे समजून मी त्याच्याकडे ढुंकूनही पाहायचो नाही. कारण तो काय करतो ते पाहिले की त्याची प्रगती अधिक असल्यास मत्सर वाटणार आणि कमी असल्यास गर्व! या दोन्ही भावना माझ्या प्रगतीत अडथळा आणणार्‍या होत्या. त्यामुळे माझ्या पूजेतील शुद्धता गेली असती व मी मागे पडलो असतो.

पण एक दिवस आमच्या त्या शक्तीनेच मला ते दर्शन घडवले. मी मुळापासून हादरलो होतो ते दृष्य पाहून! बर्वे माझ्या कितीतरी पुढे होता त्या अघोरी साधनेत!

ते दृष्य माझ्या बौद्धिक परीघात बसूही शकत नव्हते.

एका नुकत्याच अर्धवट दहन झालेल्या स्त्रीच्या प्रेताशी बर्वे संभोग करत होता.

अत्यंत घृणास्पद व भीतीदायक दृष्य!

त्या दृष्याने मी उडालोच! मात्र माझ्याच त्या शक्तीने मला सांगितले कानात! या शक्तीला एक तर मी एक अत्यंत अघोरी पूजा करून बोलावू तरी शकतो किंवा तिचे माझ्याकडे काही काम असले तर माझ्या कानात ती संदेश सांगते. तसा संदेश तिने मला सांगितला.

'बर्वे वाईट हेतूने पूजा करत आहे. त्याला गावातील सर्वांवर सत्ता करायची आहे. सर्वात जास्त श्रीमंत, सर्वात जास्त स्त्रिया पदरी बाळगणारा आणि सर्वात सामर्थ्यवान माणूस बनायचे आहे त्याला! तू त्याच्याहीपेक्षा अधिक साधना करून त्याचा तो हेतू साध्य होणार नाही हे बघ! ती साधना कशी करायची हे येत्या अमावास्येला तुला समजेलच'

मी घामाने निथळत होतो. मला ते सहन होत नव्हते. बर्वे आपल्या किती पुढे आहे याची मला कल्पना होती. त्याच्यापुढे जाऊन त्याचा मार्ग रोखणे यासाठी खरे तर काका थोरातचे शरीर तरी पुरेसे आहे की नाही हेही मला ज्ञात नव्हते. पण त्या शक्तीवर माझा प्रगाढ विश्वास असल्याने मी स्वतःला निर्धास्त करत होतो.

आणि ती वेळ आली. अमावास्येला कोणतीही पूजा न करताही ती शक्ती माझ्या गुहेत अवतरली. पहिल्यांदाच दृष्य स्वरुपात ती मला पाहता आली. अत्यंत भयानक असे स्वरूप! पाहूनच गळाठावे असे! पण तिचे माझ्यावर प्रेम असावे. कारण मला त्या क्षणी तरी भीती वाटली नाही.

तिने मला पूजेची सर्व माहिती दिली. हेही सांगितले की तुझ्या हाती तो नष्ट होईलच असे नाही. पण ही पूजा तू सतत करत राहा.

मी नम्रपणे विचारले की आपणच बर्वेला आपल्या सामर्थ्याने नष्ट का करत नाही. त्यावर जे उत्तर मिळाले ते फार वेगळेच होते. बर्वे इतका पुढे गेलेला होता की त्या शक्तीलाही कृपा करण्यावाचून स्वातंत्र्य राहिलेले नव्हते. त्या शक्तीलाही मर्यादा दाखवून देण्याइतके सामर्थ्य बर्वेने मिळवलेले होते. हे ऐकून मी शहारलोच! पण तरी मी विचारले की इतके सामर्थ्य असूनही तो अजून काहीच वाईट वागलेला नाही तर त्याबाबत तुम्हाला असे का वाटते?

त्यावर तिने सांगितले की तो तिलाही बद्ध करून अमर्याद सत्ता प्रस्थापित करण्याच्या विचारात असल्यामुळे ती बद्ध होईस्तोवर तो थांबणार आहे.

मी अत्यंत घाबरलेलो होतो. कारण सरळ होते. मी किती पात्रतेचा आहे ते बर्वेला नक्की माहीत असणार हे मला आता कळलेले होते. म्हणजेच आजवर तोही माझ्याकडे जे दुर्लक्ष करत होता ते गुरूबंधू म्हणून नव्हे तर मी त्याच्यासमोर कस्पटासमान आहे म्हणून! आणि मला आता त्याचे सामर्थ्य वाढले की काय होणार याचा अंदाज आला. त्यामुळे मी वेगाने तयारीला लागलो. ती अघोरी पूजा मी सातत्याने करू लागलो. तयत अनेक विघ्ने यायची ती बर्वेमुळेच! पण आमच्या शक्तीच्या सामर्थ्याने त्याला हे कधीच समजायचे नाही की गावात ही पूजा कोण करत आहे. त्याला माझा संशय यायचाच नाही कारण त्याच्यासमोर स्मशानात मी अत्यंत साध्यासुध्या पूजा करायचो.

आणि ते झाले! कधीतरी १९४० च्या सुमारास, बर्वे अनभिषिक्त सम्राट झाला. माझ्या पूजा करण्याचा काहीही उपयोग अजूनतरी झालेला नव्हता.

बर्वेने आमच्या शक्तीलाही बद्ध केले असावे हे मला लक्षात आले. माझ्याकडे कोणताच इतर उपाय उरलेला नसल्याने मी अधिक वेगाने तीच पूजा करत राहिलो व माझ्या शक्तीवर विश्वास ठेवला.

इकडे बर्वेने आपली कृत्ये व खरा स्वभाव दिवे गावाला दाखवायला सुरुवात केली.

सावकारीच्या व्यवसायाचा फायदा घेऊन त्याने अनेकांना लुबाडले. जमीनी खिशात घालायला सुरुवात केली. खदाखदा हासत तो समोर बसलेल्याला आपला मांडलीक बनवू लागला. नुसत्या नजरेच्या खेळानेच! परिस्थिती अशी व्हायला लागली की जणू सगळे दिवे गाव या बर्वेसाठीच वावरते आहे. त्यातच त्याला स्त्रीसुखाची चटक लागली. गावातील कोणत्याही स्त्रीला तो बिनदिक्कत भोगू लागला. असंतोष पसरत होताच! परिणामतः त्याच्यावर खटले भरले गेले. आरोप केले गेले. अनेक प्रकारांची पोलिस केस झाली. पण त्याच्यावर केस करणारा गावातला माणूस हाल हाल होऊन अचानक मरायला लागला. अशी किमान बारा माणसे मेल्यावर गाव खडबडून जागे झाले. बर्वे हा सैतानाचा अंश आहे हे पटू लागले. रात्रीबेरात्रीच काय तर दिवसाढवळ्याही भूतबधा होऊन माणसे बेशुद्ध पडू लागली. त्यातच त्या दिवशी बर्वेच्या डोळ्यात कधीपासूनच भरलेल्या आपटे आजोबांच्या बहिणीला म्हणजे पद्मावतीला बर्वेने नजरबंदीने स्वतःच्या घरात खेचून आणले. सरळ रस्त्यावरून ति बर्वेच्या मागोमाग चालत त्याच्या घरात जात आहे हे पाहून अनेकांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. पण ती हटली नाही. ती सरळ घरात आली. बर्वेच्या बायकांना व ठेवलेल्या बाईला तसेच त्यांना त्याच्यापासून झालेल्या अपत्याला बर्वेच्या या कृष्णकृत्यांचे सुरुवातीला वाईट वाटत असले तरी त्यांना हळूहळू त्यातील फायदा समजू लागला. गावात त्यांचे महत्व प्रचंड वाढले कारण लोक त्यांनाही घाबरू लागले. त्यामुळे त्यांचेही स्वभाव असेच व्हायला लागले. बर्वेचे आपल्या कुटुंबियांवर मात्र प्रचंड प्रेम होते. तर पद्मावतीला त्याने घरात आणताच बाहेर जमाव जमला. आपटे आजोबा धावत आले व बर्वेच्या घरात शिरले. पण बर्वेने आपल्या अघोरी ताकदीने त्यांना घराबाहेर फेकून दिले व त्यानंतर ते आत येऊच शकले नाहीत. बर्वेने पद्मावतीवर अत्याचार केला. तिला तशीच घराबाहेर सोडून दिली तेव्हा मात्र जमाव प्रक्षुब्ध झाला. जमावाने घरावर हल्ला करण्याचे ठरवले पण बर्वेच्या भयंकर ताकदीमुळे हल्ला करण्याचे मत व्यक्त करणारे तिथल्यातिथे खूप मार लागल्यासारखे जमीनीवर पडून कण्हू लागले. ते पाहून मात्र लोक मागे मागे सरकू लागले तेव्हा बर्वे घराच्या दारात आला आणी सगळ्यांना पाहून हासला व म्हणाला..

"हे गाव आता माझ्या कब्जात आहे.. जो येथे जगेल.. तो फक्त माझ्याचसाठी जगेल... आणि कुणीही गाव सोडून जाऊ शकणार नाही.... नाहीतर प्रत्येकालाच बाधा होईल.. "

हा प्रकार सरकारच्या पोलिस खात्याच्या अखत्यारीतलाही राहिलेला नव्हता..

गावातील लोकांनी धार्मिक उपाय सुरू केले की बर्वे ते उधळून लावू शकत होता... मी काका थोरातच्या शरीरात असहाय्यपणे व गुप्तपणे माझ्या शक्तीने सांगितलेली पूजा करत होतो... बर्वेला ते मात्र समजत नव्हते की ही पूजा कोण करत असावे..

हा शोध घेण्यासाठी तो एकदा सगळ्या गावात फिरला.. पण त्याला काहीच जाणवले नाही.. मग त्याला माझी आठवण आली व तो स्मशानात आला... तेव्हा मला आधीच सूचना मिळाली की तो येत आहे.. मी वेगळीच साधीसुधी पूजा करण्याचे नाटक सुरू केले.. बर्वे चवताळलेला होता.. त्याने मलाच अद्दल घडवली... मला त्याने नुसत्या नजरेनेच पाशवी वार करून जखमा दिल्या.. त्या मी कशा काय कुणास ठाऊक.. पण सहन करू शकलो व तो गेल्यावर त्या नष्टही करू शकलो.. मात्र मला बर्वेचे सामर्थ्य लक्षात आले होते... तो माझ्या कितीतरी योजने पुढे होता व माझ्या आत्ताच्या स्थितीत त्याच्याशी लढाई पुकारणे मला शक्यच नव्हते...

त्यातच आणखीन एक प्रकार करून दाखवला बर्वेने गावाला.. आता तर गावात इतकी दहशत पसरली की कुणाचे तोंडही उघडेना...

गावातल्या एकाची बायको बर्वेने अशीच घरात आणली नजरेने ओढत...

मात्र यावेळेस त्या बाईचा नवरा व दीर.... जे अत्यंत संतप्त झालेले होते... ते कुर्‍हाडी घेऊन बर्वेच्या घरात प्रवेशले... याचा परिणाम असा झाला की बघ्यांनाही बळ आले व तेही लाठ्याकाठ्या घेऊन बर्वेच्या या घरात प्रवेशले..

पाहतात तर ती स्त्री बर्वेच्या पायाशी बसलेली होती व एखाद्या राजासारखा सिंहासनावर बसल्याप्रमाणे बर्वे जमावाकडे बघून खदाखदा हासत होता..

जमावाला काहीच करता येत नव्हते याचे त्याच जमावाला आश्चर्य वाटत होते... त्या स्त्रीलाही तिथे बसण्यात काहीच हरकत नव्हती व ती बर्वेप्रमाणेच सगळ्यांना हासत होती...

परिणामतः तिचा नवरा व दीर कुर्‍हाडी घेऊन बर्वेच्या अंगावर धावले मात्र...

... अख्या दिवे गावाने एक भयानक प्रकार पाहिला...

कानठळ्या बसतील असा किंचाळत बर्वे उभा राहिला.. आणि त्याचा तो आवेष पाहून ते दोघेही जमीनीवर अडखळून पडले.. अचानक बर्वेने त्यांच्याहीवर नजरबंदीचा प्रयोग करून त्यांना खिळवून ठेवले.. जमावालाही.. आणि जवळपास दिड तासाच्या एका पूजेनंतर.. त्या दोघांना अत्यंत रानटी अशा दोन पक्ष्यांचे स्वरूप प्राप्त झाले... मात्र रानटी असले तरीही हिंस्त्र नाहीत... केवळ मांसाहारी असावेत तसे.. माणसाला मात्र घाबरणारे.. ते पक्षी एका भिंतीवरच्या माळ्यावर उडून बसले.. आणि गर्दीतल्या प्रत्येकाला आपले काय होऊ शकते याचा अंदाज झटकन आला..

एकेक जण दहशतीने तिथून पळत सुटला... ते पळत असताना बर्वे त्या जमावाकडे व त्या दोन पक्ष्यांकडे पाहात खदाखदा हासत होता व ती स्त्रीही तशीच हासत होती...

शेवटी त्याही स्त्रीला त्याने भोगले.. गावात हे असेच चाललेले होते...

काय करावे हे कुणालाही समजत नव्हते... हवालदिल झालेले दिवेकर आशेने कोणत्याही देवळात जात होते... कुठल्याही धामिक माणसाला भेटून आपल्या व्यथा सांगत होते.. आणि हे प्रकार बाहेरच्या गावांनाही कळत होते... मात्र दिव्यात येऊन शहानिशा करायची हिम्मत कुणालाच नव्हती... ब्रिटिशांना तर यावर विश्वासच नसल्याने यात काही वाटतही नव्हते..

मात्र एक दिवस तो चमत्कार झाला...

बर्वे त्याच्याच घरातून किंचाळत बाहेर पडला..

माझी पूजा समाप्त झाली होती... तिला हवे ते यश प्राप्त झाले होते... माझी शक्ती.. जी बर्वेने बद्ध केलेली होती... ती मुक्त झाली होती... आणि बर्वे????

बर्वे किंचाळत घराबाहेर पळत सुटला होता... वेळ सायंकाळची.. बर्वे स्वतःच घाबरून पळतोय हे कळूनही कुणी त्याच्यावर हल्ला करू धजत नव्हते.... बर्वे धावत एका विहिरीपाशी गेला आणि तेथे त्याने शक्तीची जमवाजमव करण्यासाठी एक वेगवान पूजा आरंभली..

मात्र तोवर इकडे मी सगळ्यांना हा प्रकार सांगितलेला होता... माझ्यावर हळूहळू लोकांचा विश्वास बसू लागला.. तोवर बर्वे विजयी मुद्रेने स्वतःच्या घरात परतला होता.. त्याला कल्पना नव्हती की त्याच्याकडे ती शक्ती पुन्हा बद्ध झालेली आहे हा त्याचा केवळ एक गैरसमज होता..

आणि.. सूडाच्या भयानक आगीने पेटलेले अख्खे गाव बर्वेच्या घरात घुसू लागले...

कापाकापी.. दिसेल त्याला मारणे.. आपटे आजोबांसारख्या मृदू माणसानेही बर्वेच्या एका सहा वर्षाच्या मुलाला चक्क ठार केले...

लोकांनी सूड म्हणून बर्वेच्याच कुटुंबातील स्त्रियांना त्याच्याचसमोर बेअब्रू केले.. याचा संताप झाल्यामुळे त्याच्याच एका मुलीने त्याच्यावरच वार केला... आता ते दोन पक्षी खिदळत होते.. त्यातील एकाने बर्वेचा गाल फाडला.. कुणीतरी त्याच्या खांद्यावर वार केला.. बर्वे आता उठूही शकत नव्हता.. त्याच्या घरातील द्रव्य लुटले जात होते... बायका हंबरडे फोडून विलाप करत होत्या.. बर्वे आता मरणार हे पाहून एका बायकोने तर बांगड्याही फोडल्या स्वतःच्या...

मात्र बर्वेत अजून रग होती... त्याने उठायचा प्रयत्न केला.. पण ती त्याची शेवटची हालचाल होती...

कारण तेव्हाच... पाच जणांना घेऊन.. मी आलो.. मी म्हणजे काका थोरातच्या रुपात असलेला मी..

मला पाहून बर्वेची गाळण उडाली..

मला पाहून सगळ्यांनाच धीर आला.. त्यातच त्या पक्ष्यांना मूळ मानवी स्वरूप प्राप्तही झाले..

आणि जमावाने बर्वेच्या शरीराचे तुकडे तुकडे केले..

फक्त... एकच गोष्ट कुणाच्या लक्षात आली नाही जी माझ्या लक्षात आली...

ती म्हणजे.. ते तुकडेही एकत्रित रीत्या हेच म्हणत होते... की

"मी परत येईन.. मी परत येईन..."

त्यानंतर गावातले पन्नास टक्के लोक गाव सोडून जायला लागले. त्यांना कोण रोखणार? बर्वे गेला असला तरी त्या भयानक आठवणी कुणालाच नको होत्या. उरलेले लोक आता अस्तित्वात नाहीत. आपटे आजोबा एकटेच उरले होते... पण ... सामान सौ सालक है.. पलकी खबर नही..

त्यांना जाणवले की या वास्तूत बर्वे परत आला आहे.. त्यांना तुम्ही पूजेला पाचारण केलेत तेव्हाच मी जाणले.. हा साधासुधा माणूस फुकट मरणार या प्रकारात...

बर्वे गेल्यानंतर कित्येक वर्षांनी या वास्तूलापुन्हा उर्जितावस्था आली ती या मावशींच्या मिस्टरांमुळे.. आधी ते दोघेच येथ राहिले.. धार्मिक जोडपे... पण नंतर तुम्ही सगळे एकेक जण यायला लागलात आणि.. या वास्तूत बर्वेनेही प्रवेश करण्याचे ठरवले...

पण मला काका थोरातच्या शरीरात राहून आता बर्वेशी लढणे शक्य नव्हते... त्यामुळे मी मनीषा काकडेच्या दहनाच्या वेळेस माझी सर्वात अघोरी पूजा करून अजित कामतच्या शरीराची मागणी केली...

पण बर्वेच्या अदृष्य शक्तीने मला नमाच्या शरीरात बंदिस्त केले.. तिच्यातून बाहेर पडताना मला जो त्रास झाला त्याचे वर्णन तुम्हाला ऐकवणारही नाही....

नमाचा हात तुटलेला दिसणे.. स्वयंपाकघरात माळ्यावरून तोच हात जाताना दिसणे... सर्वांना भीती वाटणे.. आपटे आजोबांची पूजा आणि त्यात त्यांचा झालेला मृत्यू... त्यांचे शरीर जळणे... त्यांना पूजेसाठी बोलवायला जाताना लहानग्या मनूने मावशींच्या नाकावर खच्चून दगड मारणे.. बाजी आणि रामोशीला आपटे आजोबा आणि मनीषा काकडे दिसणे.. इथे आलेला झुंबर गुत्यापाशी मरून पडणे.. मला झालेल्या अनेक जखमा आणि वार.. अडसुळ आणि मानेंना प्रचंड भीती वाटणे आणि नंतर बर्वेचे ते सावट.. जे आजवर फक्त तुम्हाला ऐकूच यायचे.. ते प्रत्यक्ष दिसणे.... आणि तुम्हाला माझ्या खोलीत जायला मी सांगितलेले असूनही तुम्ही नमाच्याच खोलीत गेल्यामुळे तुम्हाला जो धोका होऊ शकत होता तो धोका मी स्वतः स्वीकारणे आणि स्वत:ला जाळून घेणे... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच बर्वेने अजित कामतला मी त्याच्या शरीरात नको असल्याचे शिकवणे व त्यामुळे माझी आणि अजितची प्रचंड लढाई आणि त्यात दुर्दैवाने अजितचा मृत्यू... आणि मी मात्र त्याच्याच शरीराच्या रुपात अस्तित्वात राहणे.......

हे सर्वच बर्वेने केलेले प्रकार होते... तो इथेच आहे नालायक.. त्याल मी संपवणारच आहे..

प्रश्न हा आहे की तो इतकी वर्षे इथे यायचा का थांबला असावा.. पण मला कालच माझ्या शक्तीकडून याही प्रश्नाचे उत्तर मिळाले..

गेली ५६ वर्षे तो मनाच्या स्वरुपात अस्तित्वात होता.. त्याच्या मेंदूने त्याच्या मनाला संपवले नाही... ते त्याच्या मेंदूला शक्यच नव्हते.. आणि त्याचा फायदा घेऊन त्याने गेली ५६ वर्षे पुन्हा अघोरी तपस्या केली..

त्याची ती तपस्या संपायला आता केवळ काही तास राहिलेले आहेत... बहुधा सकाळी आठ वाजता ती तपस्या संपेल.. आणि उद्याचा... म्हणजे खरे तर आजचाच संध्याकाळचा संधीप्रकाश पडला.. की सुरू होईल एक भयानक थैमान...

ज्याच्यात एक तर मी तरी संपेन किंवा त्याचे मन तरी...

तुम्ही इथून निघू जाऊ शकत असतात तर मी तुम्हाला केव्हाच बाहेर काढले असते इथून... पण ते तुम्हाला शक्यच नव्हते...

उद्या त्याची तपस्या संपली की त्याचे मानवी स्वरूप नष्ट होईल.. त्याला स्वरूप लाभेल एका अघोरी शक्तीचे..

आत्ता त्याला मानवी शरीराच्या मर्याद लागू पडत आहेत.. पण.. त्या जरी गेल्या आणि उद्या जरी त्याची ताकद अमर्याद झाली तरीही.. आमच्या नियमाप्रमाणे त्याला तशी शक्ती प्राप्त झाल्यावरच नष्ट करायचे आहे... तेव्हा.. तुम्ही कुणीही घाबरू नका.... आज माझ्याच खोलीत वास्तव्य करा.. मी बोळात उभा राहीना रात्रभर... मला मोठा जप करायचा आहे.. उठा आता.. जा माझ्या खोलीत... "

नि:शब्द! एक नि:शब्द सन्नाटा पसरलेला होता मध्यरात्री दोन वाजता! श्वासांचाही आवाज येत नव्हता कुणाच्या! रक्तही गोठले असावे असे वाटत होते.. काका थोरातच्या लंब्या चौड्या भाषणामुळे उलगडा जरी सगळाच झालेला असला तरीही.... जो काय उलगडा झाला तो अत्यंत भीषण होता.. अंगावर काटा येत होता.. आणि ... कुणीही हालत नव्हते.. झोपायला जा असे सांगूनही...

शेवटी कसेबसे नमाला तोंड फुटले..

नमा - पण..

काका थोरातची मान नमाकडे वळली..

नमा - पण.. म्हणजे अजित कामत आणि काका थोरातच्या शरीरात असलेले तुम्ही मुळात कोण आहात?????

उत्तर ऐकून सर्वांना पहिला धक्का बसला.. दुसरा काही क्षणातच बसणार होता..

"मीही मनच आहे एक.. आठशे वर्षांपुर्वीचं.. "

सगळेच हादरून अजित कामतकडे बघत होते.. त्याची भीती वाटायलाच नको हे कळूणही भीती वाटत होती.. आणि त्या सगळ्यांच्याच मनातले ते विचार वाचल्यप्रमाणे अजित कामत हासत होता..

आणि तब्बल पाच मिनिटांनी मावशींना तो प्रश्न सुचला....

"त्या.. त्या बर्वेला.. मानवी स्वरुप आहे.. म्ह.. म्हणजे काय??? .. कोण आहे तो??"

"आपल्यातच आहे... "

अजित कामतचा थट्टेखोर स्वर आता कुणालाच सोसत नव्हता.. अर्चना कानांवर हात ठेवून किंचाळत म्हणाली..

"कोण आहे??? कोण आहे तो???"

उत्तर ऐकून थरथर कापत होते सगळे... मात्र अर्चनाच्या खोलीतून प्रचंड हुंदक्यांचा आवाज येत होता..

"तू आणि मावशींनी आपटे आजोबांना पूजेसाठी बोलावू नये म्हणून मावशींच्या नाकावर दगड मारणारा... ... मानेला मान फिरवून घाबरवणारा.. मला नमाच्या शरीरात ढकलणारा... मनू.. "

गुलमोहर: 

I m FIRST..................... first time.
मला मनु मध्ये गड्बड वाटतच होती................?
ह्म्म्म्म्म.
लवलवकर लिहा..............

आलं ...आलं ....

बापरे ...म्हणजे २ भुतं...थोरात अन बर्वे ... आहेत तर .... मला वाटत होते की आपटे आजोबाच सर्वात मोठ्ठे भुत असणार !!

असो
पुढील भागाची प्रचंडवाट पहात आहे !!

आजचा भाग छान, पण आधीचे काही पॅरॉग्राफ जाम कंटाळवाणे झालेय. थोडे अपचन झाल्यासारखे वाटतेय, थोडे अनावश्यक, थोडक्यात आटपता येता आले असते.

व्वा........................आता हीरो ची एन्ट्री झाली.................जो खलनायक होता तोच नायक बनला ............

सोलिड ट्विस्ट आहे..............

सुरवात थोडी कंटाळवानी वाटली..पण शेवट अप्रतिम! पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहाणारी बाहुली Happy

एक लघु शंका

१९३६ साली आपटे आजोबा १६ १७ वर्षांचे होते

मग १९४० साली ते २० वर्षांचे असतील
मग त्यांना मुलगी कधी झाली????
आणि ती एवढी कधी मोठी झाली , कि बर्वे तिच्यावर अत्याचार करेल ?
आयला पाशवी दिसतोय हा पण प्रकार Lol

खतरनाक भाग आहे हा.........
पुढे काय होते त्याची उत्सुकता.....
पु. ले. शु.

प्रसन्न अ - तो बदल मी केलाय, संपादीत करून बहिण असे लिहीले आहे. मी लिहिताना विचार करून लिहीत नाही कारण जो एन्ड आणायचा असतो त्याची मला घाई असते. त्यामुळे चुका होतात आणि लोक हासतात. याची मला काळजी घ्यायला हवी. निदान एका ठिकाणीमी ते बहिण केले. आता आणखीन एखाद्या ठिकाणी 'मुलगी ' असा उल्लेख असेल तर बघतो.

त्याचं काय आहे! मायबोलीवर स्मायली फुकट आहेत. आणि प्रतिसादही! फक्त लघुशंका असेल तर ती इतरत्र करावी लागते.

सर्वांचे आभार!

@बेफिकीर

तुम्ही लघु शंकेचा व्यवस्थित पणे दुसरा अर्थ घेतलात Happy

असो यापुढे चुका दाखवून देणार नाही
राहिलं

तसं काहीच नाही, पिंक टाकल्यासारख्या चुका दाखवू नयेत अशी एक किमान अपेक्षा आहे. बाकी दर वेळेस माझ्या लेखनातील चुका दाखवल्यास मी स्वीकारतोच! याचा अनुभव चांगभलं व ए - मॅन यांनी घेतलेला असावा.

बाकी मर्जी तुमची!

हे प्रकरण जरा भलतीकडेच जातयं. असो बे.फी. तुम्हि काळजी घ्या आणि प्रसन्न तुमच्या बारकाव्यांच अभिनंदन.
तुम्ही लिहित रहा बे.फी.
all the BEST.

छान लिहिली आहे कथा........

काही प्रसंग जे आधि च्या कथेत आहेत ते जरा जुळत नाही.........म्हणजे काका खरोखरच मदत करण्यास आला असेल तर काही प्रसंग त्या मदतीच्या संकल्पनेत बसत नाहीत...............

असो..................................................

बाकी खिळावुन ठेवले राव आपण.............. Happy

छान लिहिली आहे कथा........

काही प्रसंग जे आधि च्या कथेत आहेत ते जरा जुळत नाही.........म्हणजे काका खरोखरच मदत करण्यास आला असेल तर काही प्रसंग त्या मदतीच्या संकल्पनेत बसत नाहीत...............

असो..................................................

बाकी खिळावुन ठेवले राव आपण.............. Happy

व्वा....भन्नाट....

तर मेंदू त्याच्यात स्वतःमध्ये वसलेल्या व त्वचा, इंद्रिये आणि रक्त यात वसलेल्या मन नावाच्या द्रव्याला नष्ट करतो.

मेंदू स्वतः थांबण्यापुर्वी हे कार्य करतोच करतो. त्याला ते करावेच लागते कारण निसर्गाचा नियम आहे तो!........मस्तच...

मन आणी मेंदू /मानवीय आणी अमानवीय्/पशु आणी मानव्---------मस्त सान्गड घातलीत आपण्......सुरवातीला जरी कंटाळवानी वाटत असली तरीही शेवटी छान गुम्फन घातलीत ...त्यामुळे बर्याच गोष्टीन्चा उलगडा होताना दिसतोय....
खरच शेवट अप्रतिम.....अगदी नेहमीप्रमाणे.......सरस.....

वाट पहतोय नवीन भागाची...खुप शुभेच्छा....

सावरी

मन आणि त्याचे स्वरूप छान मांडले आहे..पहिल्यांदा वाचले तेव्हा कंटाळवाणे वाटले पण परत एकदा वाचले तेव्हा जास्त भावले..
बाकी या भागात काहीशी गडबड झाल्यासारखी वाटत आहे. काका थोरातचे आत्तापर्यंतचे स्वरूप आणि आत्ताचे सोज्वळ रूप याचा कुठे मेळ बसत नाहीये...हिंदी पिक्चरसारखे झाले हे. ज्याकडे व्हिलन म्हणून पहायचे तो एकदम हिरो निघतो...माफ करा पण हे पटले नाही...
आणि मनूच्या अंगात बर्वे...सॉलीड ट्विस्ट आहे...
धमाल आहे पुढच्या भागात

फुस्स्स्स्स्स्स
अजुन काय प्रतिक्रिया द्यावी ते कळल नाही

मराठी सिरीयल सारख अचानक खल वाटणार पात्र नायक झालय.

कथानक हातातून निसटतय सांभाळा

धक्कातंत्रासाठी वेगळी काहीतरी वाक्यरचना मांडा " आणि ते घडल " हे फार वेळा येताय.

मी udayone, ठमादेवी आणि आशुचँपशी सहमत आहे.

नीट वाचलेत आधीचे भाग तर तएस जाणवणार नाही. प्रत्येक वेळेस मनूमुळेच काहीतर प्रॉब्लेम आलेला आहे. पहिल्या नाही, पण दुसर्‍या भागापासूनच माझ्या मनात मनूबाबत हे असल्यामुळे संदर्भ चुकणार नाहीत.

कथेच्या आधी तुमचं भाषण जरा कमी केलंत तर बरं होईल. बोअर होतं वाचायला.>>>

ठमादेवी,

१. तुमच्या प्रतिसादाचा विचारही करणार नव्हतो. पण तेवढी पात्रता मी त्याला बहाल करतो.

२. नीट समजून घेतलंत तर ते भाषण माझं नसून 'अजित कामतच्या शरीरात असलेल्याचं आहे' हे उमगेल. आणि त्याला ते भाषण या सर्वांना देण्याची नितांत गरज आहे हेही उमगेल! कारण त्या शिवाय बर्वेला पुन्हा अस्तित्व कसे मिळेल हा प्रश्न सर्व भौतिक आधारवर कुणीतरी विचारत राहू शकेल.

एकंदरीत काही प्रतिसादकांसाठी:

आय कॅन अर्न अ‍ॅन्ड एन्जॉय बेटर लाईफ एल्सव्हेअर अ‍ॅन्ड इन माय रिअल लाईफ टू! मी हे जे काही लिहितो ते कुणावरही उपकार नसले तरी वाचाच असा आग्रह मुळीचच नाही व प्रतिसाद गेले तेल लावत! सरळ सरळ चुका काढल्या तर काहीच वाटणार नाही. झोपडपट्टीतले लोक कुठेही उभे असले तरी थुंकतात तसे उगाचच करू नयेत. नीट भाग वाचल्याशिवाय पिंका टाकू नयेत. व पिंका टाकायची खुमखुमी असली तर मला फोन करून ती खुमखुमी जिरवून घ्यावीत. आजवर मी कित्येक असल्या बिनबुडाच्या, फालतू, पुर्वग्रहामुळे दिलेल्या, ड्यु आय डी घेऊन दिलेल्या व अत्यंत बोचर्‍या प्रतिसादांना उद्देशून काहीही लिहीलेले नाही. मात्र आज सकाळपासून 'त्या' कळी, कली वगैरेच्या धाग्यामुळे वैतागून स्पष्ट लिहीत आहे. जे असे प्रतिसाद देतात त्यांच्या धाग्यावर असे प्रतिसाद नसावेत यासाठी ते अ‍ॅडमीनकडे तक्रारींचा ओघ लावतात. मी कुणाची कधी तक्रार करत नाही. जे काय आहे ते लिहून मोकळा होणार्‍यातला आहे मी! मात्र यापुढे असे प्रतिसाद मला आले तर त्यांचा जाहीर समाचार घेणार आहे. मला कसलीही भीती वाटत नाही संकेतस्थळावर!

-'बेफिकीर'!

मस्त वेग पकडलाय. आणि थराराची भट्टी अप्रतिमरीत्या जमली आहे. ह्या कादंबरीचेहि पुस्तक येण्यास हरकत नसावी.

Pages