मला पोलिस पकडतो तेव्हा.... भाग ३

Submitted by मोहना on 16 May, 2011 - 13:09

त्या दिवशी टिकीट पदरात न पडल्याच्या समाधानात घरी आलो. थोडे दिवस गाड्या सरळ धावल्या, म्हणजे चाकाच्या आणि आमच्या वागण्याच्याही. नवर्‍याच्या मागे पोलिस लागतात याचा बायकोला मिळणारा आनंद काही निराळाच. पोलिस पुराव्यानिशी सिद्ध करतात सारं त्यामुळे 'हॅट, काहीतरीच काय' असं म्हणून बायकोला झटकता येतं तसं तिथे करुन भागत नाही. नवर्‍याच्या मते पोलिस विनाकारण त्याच्या मागे लागतात, माझ्या मते सकारण. पण हा नेहमीचाच वादाचा मुद्दा. तोही मी सोडून दिला होता हल्ली. माझा आणि गाण्याचा सुतराम संबंध नसतानाही मी आजकाल खुषीत गाणी गुणगुणायला लागले होते. गाडी वेगाने चालवली तरी पोलिस काही माझ्या वाटेला जायचं धाडस दाखवित नाहीत याचा आनंद गगनात मावेनासा तो मी गाण्यात उतरवत होते :-).

नेहमीप्रमाणे सावळ्या गोंधळात चौकडी गाडीत स्थिरावली. माझ्या हातात सारथ्य होतं. मी ते कुशलतेने पार पाडत होते. जवळजवळ दिड तास सुखरुप पार पडला आणि शत्रुपक्षाने मात केली. अचानक माझ्या मागे लांबवर दिवे चमकायला लागले.

"कोण चालवतय इतक्या वेगात? तू तर बाजूला बसला आहेस. कोण सापडला बकरा सकाळी सकाळी." मी उत्साहाने म्हटलं. वर्षानुवर्ष मी हे दृश्य पहातेय. पोलिस माझ्या गाडीच्या बाजूने दिवे चमकवत जातात. पुढे जावून कुणाला तरी पकडतात. मग मुलगा किंवा नवरा म्हणतो,

"परत येताना तो तुला थांबवणार आहे."

"का?" मनात नसतानाही पटकन प्रश्न तोडांतून बाहेर पडतोच. मग नवरा आणि मुलामध्ये नेत्रपल्लवी. तू सांग, तू सांग असा एकमेकांना दिलेला धीर.

"सावकाश चालवतेस ना म्हणून टिकीट द्यायला. एका दगडात दोन पक्षी पोलिसाला." मुलगा पटकन सांगून टाकतो. प्रत्युत्तर ऐकायचं नसतच, त्यामुळे आपण त्या गावचे नसल्यासारखं करत बाहेर बघायला तयार लगेच. आत्ताही तसंच काहीतरी असणार. पोलिस दुसर्‍या कुणाला तरी पकडणार याची मला शंभर टक्के खात्री. मी आजूबाजूला कोण गाडीला ब्रेक नसल्यासारखं चालवतय ते बघण्यासाठी नजर टाकली.

"यावेळेस बकरा नाही बकरी." नवर्‍याच्या आवाजातल्या गर्भित अर्थाने माझी पाचावर धारण बसली. डावा हात स्टिअरिंगवर घट्ट दाबत, उजव्या हाताने मी त्याला ओढायला सुरुवात केली.

"अग ओढतेस काय मला?"

"तू बस ना माझ्या जागेवर. तुझा अनुभव दांडगा आहे पोलिसांच्या बाबतीतला." त्याच्या अनुभवाला इतकी किंमत दिलेली पाहून नवरा एकदम हळवा हळवा झाला.

"चालत्या गाडीत कसा येऊ मी तिकडे. घाबरु नकोस. मी आहे ना."

माझ्या गुन्ह्याची जबाबदारी नवरा घेत नाही म्हटल्यावर हात, गाडी, पाय सगळं गार गार पडलं.

"अरे, आता करु काय? थांबवू कुठे? कुठे थांबवू गाडी...?" ओरडता ओरडताच मी भररस्त्यात करकचून ब्रेक दाबून गाडी थांबवलीही. मागे लागलेला पोलिस हाताने खुणा करायला लागला. कसं मॅनेज करतात कोण जाणे हे पोलिस. एकाचवेळी कुणाच्या तरी मागे लागायचं, दिवे लावायचे, आवाज सुरु करायचे, खाणाखुणा... पोलिसांचं एकदम कौतुकच वाटायला लागलं मला. गाडीचे चकाकते दिवे, कर्कश्य आवाज, इतक्या लांबून तावातावाने चाललेले हातवारे आणि विचारलेल्या प्रश्नाला कधीही वेळेवर उत्तर न देणारा नवरा... फार काही एकाचवेळी घडत होतं. शेवटी माझ्या लक्षात आलं की गाडी रस्त्याच्या कडेला उभी करण्याच्या त्या खाणाखुणा आहेत. खड्ड्यात जाणार नाही अशा बेताने गाडी थांबवली.

हाय, हाऊ आर यू त्याने मला विचारलं, मग मीही त्याला तेच म्हटलं, विचारलं. पकडायला येतात आणि ख्यालीखुशाली का विचारतात कोण जाणे.

"इज देअर एनी रिझन यु वर स्पिडींग?"

मी रडायलाच लागले.

"मॅम, मॅम..." त्याच्या आवाजातल्या मृदुपणाला दाद म्हणून मी धाय मोकलून रडायला सुरुवात केली. क्षणभर शांतता पसरली मला वाटलं माझं रडणं चांगलं परिणामकारक आहे. तितक्यात त्याने एकदम आवाज चढवला, (ही युक्ति मीही मुलीला ओरडताना वापरते.)

"व्हाय आर यु क्राईंग?"

"अं?" हा तर माझ्या नवर्‍याच्या वरताण निघाला. रडणार्‍या बाईला असं दरडावतात का?.

"यु डिडंट रिअलाईज यु वर स्पीडींग?"

मला पुन्हा एक उमाळा आला. किती बाई मनातलं ओळखलं. तोंड उघडून सांगायचीही आवश्यकता भासली नाही. मी डोळे पुसत हसर्‍या चेहर्‍याने पाहिलं.

"ओल्ड ट्रिक्स मॅम. यु वर १० माईल्स ओव्हर. लायसन्स, रजिस्ट्रेशन प्लीज." कुसकटपणाची हद्दच झाली की. नवर्‍याने पुढे होवून सगळी कागदपत्र त्याच्यापुढे केली.

तो परत आपल्या गाडीत जाऊन बसला. आम्ही न बोलता एकमेकांकडे पहात, ताटकळत. जे काही होणार होतं ते ’तो’ गेल्यावर. बराचवेळ आकडेमोड झाली. एक कागद माझ्या हातात आला.

"हॅव अ नाईस डे" जखमेवर मीठ चोळत महाशय निघून गेले.

कागद उघडून बघितला.

"दोनशे सत्तावीस डॉलर्स दंड." कागदाचा बोळा करुन बाहेर भिरकवावा असं वाटलं. पण बोळे फेकून देऊन दंड भरणं कसं वाचणार?

"कोर्टात जावून विनंती करता येते. पहिलच टिकिट असेल तर फक्त कोर्टाची फी घेवून बाकी माफ करतात." माझं रडणं, उतरलेला चेहरा पाहून नवरोजीनी सल्ला दिला.

"तू बाबाला घेवून जा बरोबर. तो सांगेल तुला नीट." मुलगाही एकदम सुतासारखा सरळ आला आणि अखेर मी कोर्टाची पायरी चढले. आयुष्यात प्रथमच.

कोर्टाची पायरी:

चढण्याची दोन आठवडे जोरदार तयारी केली. नवरा जज्ज, मुलगा वकिल आणि मुलगी माझ्या सोबतीला असा सराव रोज चालायचा घरात. करायचं काय? दोषी म्हणून मान्य करुन दंड कमी करा, इन्शुरन्स कंपनीला कळवू नका अशी विनंती करायची. सराव पूर्ण झाला आता नाटकाचा दिवस. कोर्टात पोचलो तर ही गर्दी. काही माझ्यासारखे बावचळलेले, काही सराईत, काही हातापायावर ट्यॅट्यु असलेले तर काही घसरणारी पॅट सावरणारे. बरेच होते. एकूण सतराशे पन्नास! खरचं, वकिलच म्हणाले आज जरा जास्त गर्दी आहे, सांभाळून घ्या. सर्व तयार ठेवलत तर काम पटापट होईल.

"काय आज काय करुन आलात?" कुणाला तरी तिथल्या पोलिसांनी विचारलं.

बापरे, म्हणजे इथे वारंवार हजेरी लावणारीही माणसं आहेत की काय? तेवढ्यात मलाच कुणीतरी काहीतरी प्रश्न विचारला.

"माझी पहिलीच वेळ आहे हो." मी अनुभवी असल्यासारखं तिला का वाटलं या शंकेने माझा चेहरा नेहमी असतो त्यापेक्षा चिंताक्रांत झाला. 'नो प्रॉब्लेम' म्हणत तिने दुसरीकडे मोहरा वळवला. पोलिसांनी सतराशे पन्नास लोकांच्या तैनातीला चार वकिल असतील, ते नावाप्रमाणे बोलावतील असं सांगिंतलं. नंतर वकिलांनीही बाहेर येवून नावाप्रमाणे आम्ही बोलावू, कागदपत्र, तुमचं म्हणणं तयार ठेवा म्हणून दहावेळा सांगितलं. मी ही जे काही माझ्याकडे होतं ते खरचं दहा दहा वेळा तपासून पाहिलं. आता सर्वांची रवानगी एका मोठ्या खोलीत झाली. नावाप्रमाणे बोलवत होते वकिल, दहा एक लोकांची नावं घेत, मग तेवढ्या लोकांनी उठून जायचं. पण गर्दी खूप. ऐकू येणं कठीणच होतं. जो वकिल जरा थांबेल, अडखळेल तो माझं नाव घेत असणार याची खात्री होती मला. तसंच झालं. कुणीतरी खूप थांबलं तसं मी कान दिले तिकडे. माझंच नाव घ्यायचा प्रयत्न चालू होता. मी उठणार तेवढ्यात अचानक लोकं रांगेत उभे रहायला लागले. मी आपली त्या रांगेत मागे मुखदुर्बळासारखी सर्वात शेवटी जावून उभी राहिले. बर्‍याचवेळाने सगळ्यांना आपण उगाचच उभे आहोत हे समजलं. बसा, बसून घ्या. नाव घेतलं तरच उठा अशी खड्या आवाजातली विनंती झाली तेव्हा. माझा तर नंबरच गेला. तासाभराने परत नावाचा पुकारा झाला.

वकिलमहाशयांनी मला काय काय पर्याय आहेत ते सांगितलं. काय विचारतील, काय उत्तर द्यायचं याचा अंदाज दिला. आता रवानगी दुसर्‍या कोर्टात. तिथे सारं काही शांत शांत. न बोलता मुकाट्याने प्रत्येक जण आत जात होता. बाकड्यावर आता उठवतील की मग अशा अवस्थेत अवघडल्यासारखा बसत होता. सगळीच मंडळी भितीने थंडगार पडल्यासारखी.

मी ही त्यातलीच एक. माझं नाव आलं. गुन्हा वाचला गेला,

"दोषी?" प्रश्न आला. एकाच शब्दात उत्तर द्यायचं होतं. म्हटलं.

"दोषी"

तिथल्या कारकुन महाशयांनी हिरवा कागद हातात दिला. एक भला मोठा उसासा टाकत मी बाहेर आले. बघू बघू करत मुलाने कागद ओढला.

२२७ डॉलर्सचा दंड १६६ झाला होता. किती वाचले याचा हिशोब करत गाडीत बसलो. गाडी चालू केली, मुलाने खांद्यावरुन हात टाकला आणि कानात कुजबूजला.

"आई अगं पोलिस येतोय बघ तुझ्यामागे."

"काय?" मी घाबरुन मागे पाहिलं.

"एप्रिल फूल." त्याच्या टपलीत मारलं आणि मी पुन्हा एकदा कासवाच्या गतीने गाडी चालवायला सुरुवात केली. कितीतरी दिवसांनी.

गुलमोहर: 

>>>उजवा हात स्टिअरिंगवर घट्ट दाबत, डाव्या हाताने मी त्याला ओढायला सुरुवात केली.>>> कसं काय? अमेरिकेत गाडी चालवताना डावा हात स्टिअरींगवर ठेवून उजव्या हाताने नवर्‍याला ओढायला सुरुवात केली असं हवं.

>>२२७ डॉलर्सचा दंड १६६ झाला होता.>> दंड कमी कुठे होतो? उलट वाढतो. Uhoh

अमित अरुण, निवांत धन्यवाद.

सायो - घाबरुन उजव्या हातावरुन डावा हात गेला असेल :-). तुमचं बरोबर आहे.सुधारते ते मी.
कुठला दंड वाढतो म्हणताय? देहाचा की पैशाचा? Happy

कुठला दंड वाढतो म्हणताय? देहाचा की पैशाचा>>> पैशाचा. कोर्टात जाता तेव्हा तुमचे पॉईंट्स काढून मिळतात आणि पेनल्टी वाढते.

सायो, नाही वाढला दंड, कमी करुन मिळाला लिहलं आहे तसा आणि पॉईंट्स घातले गेले नाहीत. कसं ते नाही मला माहित पण.

दिनेशदा - अहो संपले की सर्व भाग, कासवाच्या गतीचं ड्रायव्हिंग परत तिथेच येवून थांबलं ना Happy की संपल्यासारखं वाटतच नाही? पण आता कोर्टात गेल्यावर काय करायचं म्हणून सल्ले विचारायला फोन येतायत. नवरा म्हणतोय आता त्यावर लिही चौथा भाग Happy
अरुंधती, इन्द्रधनु, धन्यवाद!

मोहनाताई, आता मायबोलीकर एवढा आग्रह करताहेत तर त्यांचा मान राखा Wink
मनोगतावर वाचली होती. नवर्‍यानं कुठल्या मित्राच्या मागं गाडी दामटली तेही लिहा Proud

अहो अंजलीताई, तुम्ही नवर्‍याला हाकायला लावा गाडी जोरात मग बिचारा माझा नवरा सापडतो पोलिसांच्या ताब्यात Happy

मस्त लिहिलं आहेत.. गाडी चालवतानाच्या होणार्‍या नवरा बायकोच्या भांडणाचे एकदम सही वर्णन केलं आहेत. शेवटचा भाग सगळ्यात आवडला.

>> कोर्टातील वातावरणनिर्मिती झकास.. अनुमोदन..