बुद्ध पौर्णिमा, मचाण आणि सेन्सस ...

Submitted by सेनापती... on 16 May, 2011 - 06:43

आजच्यासारखाच तो बुद्धपौर्णिमेचा दिवस होता. असेच संध्याकाळचे ५ वाजत आले होते. रात्रीची सर्व तयारी करून मी येऊर फाट्यावर असणाऱ्या उपवनच्या त्या वनखात्याच्या ऑफिसमध्ये नुकताच पोचलो होतो. माझ्यासारखे अजून २-४ उत्साही तरुण तिथे बाजूला उभे होते. आम्ही एकमेकांशी ओळख करून घेतली. काही वेळात ऑफिसच्या आतून उप वनअधीक्षक मुंडे साहेब आणि २ गार्ड बाहेर आले. गार्डसकडे बघत ते म्हणाले,"पवार. तुम्ही या दोघांना घेऊन फणसाच्या पाण्यावर जा. पाटील, तुम्ही ह्या तिघांना घेऊन आंब्याच्या पाण्यावर जा. आणि हो सकाळी ७च्या आत परत या. जास्त उशीर नको. सर्व सामान घेतलाय नं" दोघांनी फक्त मान डोलावली. मी आणि अजून एकजण माझ्या बाईकवरून येऊरच्या दिशेने निघालो. फोरेस्ट गार्ड पवार त्यांच्या सायकलवरून आमच्या मागून निघाले. दुसरे फोरेस्ट गार्ड पाटील देखील बाकीच्या तिघांबरोबर निघाले.

येउरचा परिसर मला नेहमीच आवडत आला आहे. ठाण्याच्या कोलाहलात, गर्दीमध्ये हा एक असा भाग आहे जिथे निवांतपणा अनुभवता येतो. पहाटे किंवा संध्याकाळी इथले वातावरण रम्य असते. अर्थात जे येऊरला गेलेले आहेत त्यांना सांगायला नकोच. १० मिनिटात तो चढता वळणा-वळणाचा रस्ता पार करून आम्ही एअरफोर्सच्या गेटवरून पुढे गेलो आणि डाव्यादिशेने जो रस्ता जंगलाकडे जातो त्या दिशेने निघालो. शेवटच्या टोकाला डांबरी रस्ता संपला की समोर उतरत जंगलात जाणारी वाट दिसते. हीच वाट चेना नाल्यापर्यंत आणि पुढे धबधब्यापर्यंत जाते. आम्हाला मात्र इथून उजवीकडे वळणाऱ्या वाटेने पुढे जायचे होते. टोकाला असणाऱ्या बंगल्याच्या उघड्या आवारात आम्ही बाईक लावली आणि फोरेस्ट गार्ड पवार यांची वाट बघू लागलो. ५-१० मिनिटात ते मागून येऊन पोचले. मग आम्ही निघालो फणसाच्या पाण्यावर.

आंब्याचे पाणी, फणसाचे पाणी हे नेमके काय आहे ते मला समजत नव्हते म्हणून चालता चालता मी पवारांना माहिती विचारू लागलो. तेंव्हा समजले की मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आंब्याचे पाणी, फणसाचे पाणी, उंबराचे पाणी अश्या नावाचे एकूण १८ नैसर्गिक पाणवठे आहेत. त्यांची नावे पाणवठ्याच्या बाजूला असणाऱ्या झाडावरून दिलेली आहेत. पावसाळ्यानंतर जंगलात सर्वत्र मुबलक पाणी उपलब्ध होत असले तरी फेब्रुवारीनंतर ते वेगाने आटू लागते. एप्रिल - मे महिन्यात तर फक्त ह्या १८ ठिकाणी असणाऱ्या नैसर्गिक पाणवठयांवरच पाणी उरलेले असते. तेंव्हा जंगलातले प्राणी तेथे हमखास येतातच. तेंव्हा त्यांना बघायची, मोजायची ही सर्वात योग्य वेळ असते. सूर्यास्त ते सूर्योदय ह्या वेळात पाणवठ्यावर यायची प्रत्येक प्राण्याची वेळ देखील वेगळी असते. आपल्या येथे दरवर्षी चैत्र पौर्णिमा आणि बुद्द पौर्णिमा अश्या २ वेळी प्राण्यांची गणना केली जाते. २ वेळा अश्यासाठी की एका वेळेस कदाचित काही प्राणी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी नाही आला तर... शिवाय पौर्णिमेच्या रात्री प्रकाश सर्वाधिक असल्याने प्राणी मानवी डोळ्याना सर्वाधिक स्पष्ट दिसतात.

जंगलात किती आत गेलो ते मला लक्ष्यात नाही पण बरेच चालून गेल्यावर एका झाडापाशी आम्ही थांबलो. बघतो तर आंब्याचे झाड होते.

मी पवारांना म्हटले,"आपण फणसाच्या पाण्यावर जाणार होतो ना?"

"होय. पण ते बघ ते समोर आहे. आपण इथे आंब्याच्या झाडावरून त्या समोरच्या झाडाखालच्या हालचालीकडे नजर ठेवायची." पवार पाण्यावर नजर ठेवत म्हणाले.

समोरच ५०-६० फुटांवर एक फणसाचे मोठे झाड आणि त्याच्या खाली एक पाणवठा होता. आम्ही पाण्यावर गेलो. पाणवठा फारतर ३ स्क्वेअर मीटर असावा. पवारांनी त्यांच्या सामानातून एक पिशवी काढली आणि 'ही इथली माती भरा' असे आम्हाला सांगितले. फिक्कट तांबड्या भुसभुशीत मातीने ती पिशवी आम्ही ५ मिनिटात भरली आणि परतून आंब्याच्या झाडापाशी आलो. पवारांनी ज्यावाटेने आम्ही गावातून इथपर्यंत आलो होतो त्यावाटेच्या एका भागावर ती माती ओतली आणि नीट पसरवली.

चला, आता वर जाऊन बसुया असे म्हणून ते पुन्हा झाडाकडे निघाले. आंब्याच्या झाडावर एक १०-१२ फुट उंचीवर ३-४ लोकांना बसता येईल असे बांबूचे मचाण बांधलेले होते. मूळ खोड आणि एक मोठी फांदी याच्यामध्ये काथ्याने बांबूचा तराफा सारखा बांधून त्याला अजून २ बाजूंनी टेकू देऊन भक्कम केले होते. उजव्या बाजूला झाडाचा आधार, डावीकडे मोठ्या फांदीचा पसारा, मागे-पुढे वरच्या फांदीचा उतरून आलेल्या फांद्यांचा काही भाग अशाने ते मचाण झाकलेले होते. समोर पानांमधून फणसाचे पाणी दिसायला साधारण २-३ फुटाची जागा होती. सर्वात पहिले पवार वर चढले आणि त्यांनी 'वर या' अशी आम्हा दोघांना खूण केली. सोबत काही विशेष सामान नव्हतेच. जरा गार लागलेच तर अंगावर घ्यायला मी एक जाड फुल टी-शर्ट नेला होता. बांबूवर रात्रभर बसून आपले चांगलेच शेकणार हा विचार मनात येऊन मी तो टी-शर्ट अंथरला आणि त्यावर बसलो. पवारांनी त्यांच्या सामानातून एक छोटा गोणपाट काढला. तो अंथरून त्यावर कागद-पॅड, पेन आणि एक विजेरी ठेवली. त्यांनी आम्हाला काही आवश्यक सूचना दिल्या.

अंधार पडू लागला होता. पुढे काय काय दिसणार ह्याचा अंदाज घेत घेत मी बसलो होतो. अचानक ५-६ माकडांचे टोळके आले आणि मिनिटाभरात पाणी पिऊन निघून गेले. सूर्यास्त होता होता माकडे पाणी पिऊन जातात ती पुन्हा सकाळी येतात हे मला पाहिल्या-वाचल्याचे लगेच आठवले. खरेतर येऊर बाजूस मी आत्तापर्यंत माकडे कधीच पाहिली नव्हती. अगदी चेनापर्यंत जाऊन सुद्धा. मला आता पाण्यावर हरणे येतील असे वाटत होते पण ती काही आली नाहीत. त्यांचा पाणवठा बहुदा हा नसावा. मिट्ट अंधार झाला. डोळे मोठे केले तरी काहीच दिसेना. म्हणून लहान करून पहिले तरी काहीच दिसेना. काही वेळाने झाडाचे आकार, जमिनीचा उतार कळू लागले. थोडे नीट दिसू लागले. बाजूला २ माणसे बसलेली मात्र बोलायची चोरी. मनात बोललो तरी बाहेर आवाज ऐकू जाईल की काय इतकी शांतता. तिथे इतकी शांतता होती की आपण काहीही बोललो तरी आवाज सहज काही अंतरापर्यंत जाईल. अचानक मधूनच सुक्या पानांच्या सळसळण्याचा आवाज येई. बाकी एकदम शांतता.

बाकी पवार एकदम जबरी माणूस होता. गेली ९ वर्ष तो येऊर भागात फोरेस्ट गार्ड म्हणून काम करत होता आणि त्याला त्याच्या गार्ड ऐरियाचा कोपरा अन कोपरा ठावूक होता. तसा तो संपूर्ण उद्यानात बरंच फिरलेला होता आणि त्याच्या भागात वावरणाऱ्या दोन्ही बिबट्यांना ओळखत होता. संध्याकाळी बोलताना त्याने मला सांगितले होते की, जसा प्रत्येक फुलाला गंध असतो तसा प्रत्येक प्राण्याला सुद्धा गंध असतो. माणसाला देखील तो गंध असतोच. प्राणी ज्याप्रकारे एखादा अनोळखी गंध ओळखू शकतात तसाच आपणही प्राणांचा गंध ओळखू शकतो. त्यांचा गंध ओळखायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांची विष्ठा. त्यावरून तो नर आहे की मादी हे देखील आपण सांगू शकतो. मी हे असले ह्याआधी डिस्कव्हरी, एन.जी.सी. वरतीच पहिले होते. मी तुम्हाला खूण करीन तेंव्हा बिबट्या पाण्याच्या आसपास आलेला असेल, असे त्याने आम्हाला सांगितले होते.

बराच वेळ आम्ही बसून होतो. नेमके वाजले किती ते मला समजत नव्हते. हालचाल करायची नाही त्यामुळे घड्याळ बघणे शक्य नव्हते. पण मला भूक लागायला लागली होती त्यावरून मी ताडले की बहुदा १० वाजून गेले आहेत. समोर कसलीच हालचाल नव्हती आणि बसून मी कंटाळलो होतो. रात्री अचानक कसलासा आवाज आला आणि एक रानडुक्कर नजरेस पडले. काहीतरी दिसल्याने उत्सुकता पुन्हा चाळवली गेली आणि डोळे सजग झाले. पुन्हा बराच वेळ कसलीच हालचाल नाही. मला तर पवार आणि बाजूचा तो मुलगा झोपले वगैरे नाहीत ना अशी शंका यायला लागली. उगाच आपण वळावे आणि आपली हालचाल न जाणो नेमकी त्या बिबट्यास दिसली तर सर्वच वाया म्हणून डोके न हलवता मी नुसतेच डोळे फिरवून त्यांच्याकडे बघायचा प्रयत्न करत होतो. पण कसले काय!!!! पुन्हा बराच वेळ गेला. किती वाजले असतील ह्याची काहीही कल्पना मला येत नव्हती.

इतक्यात पवारांनी हलकासा हम्म असा हमिंग आवाज काढला. बिबट्या आसपास असल्याची ती खूण होती. आता काही क्षणात आपल्याला बिबट्या दिसणार ह्या कल्पनेने मी आनंदलो होतो. डोळे पाण्याच्या दोन्ही बाजूस फिरत होते मात्र काहीच दिसले नाही. इतकासाही कसला आवाज नाही. बिबट्या काही पाण्यावर आलाच नाही. त्याला बहुदा आमचा गंध जाणवला असावा. 'उजव्या बाजूने तो पाटलीपाड्याच्या बाजूला निघून गेला' हे पवारांनी गेल्या ६-७ तासात उच्चारलेले एकमेव वाक्य. पुढचे २-३ तास तसेच गेले. ज्याची वाट पाहिली तो आला आणि हूल देऊन गुल झाला. पवारांच्या मते त्याला बघण्याची एकमेव संधी आता होती ती म्हणजे पहाटे ४-५ च्या दरम्यान. त्यावेळेची वाट बघत मी पुन्हा ताटकळत बसलो.

पहाटेच्या सुमारास डाव्या बाजूला झाडीत थोडे दूर कसलीशी हालचाल जाणवली. दिसले मात्र काहीच नाही. पाण्यावर तर काही म्हणजे काहीच आले नाही. अखेर उजाडायला सुरवात झाली आणि आम्ही निघायची तयारी देखील केली.

'काही फार दिसले नाही पण चांगले बसला होतात. चला जरा जंगलात एक फेरी मारून येउया. काही खाणा-खुणा दिसतात का बघुया' - पवारांनी उगाच आमचे मन राखायचा प्रयत्न केला. आम्ही गुमान त्यांच्या मागून चालू लागलो. पाण्यावर गेलो आणि थोडे आसपास भटकून आलो. मला आता 'उजव्या बाजूने तो पाटलीपाड्याच्या बाजूला निघून गेला' हे वाक्य म्हणजे पवारांनी मारलेली मोठीच थाप वाटत होती. नव्हे मला तशी खात्रीच झाली होती.

आम्ही पुन्हा पाटोणपाड्याच्या दिशेने निघालो. जिथे पवारांनी माती पसरविली होती तिथे येऊन बघतो तर काय!! पायाचे ठसे त्यात स्पष्टपणे उमटलेले होते. ते बिबट्याचे होते हे मी नि:संशयपणे सांगू शकत होतो. त्या वाटेवरून तो जवळ-जवळ ८ पावले चालून आमच्या दिशेने आला आणि मग बहुदा चाहूल लागल्यामुळे दुसरीकडे निघून गेला असावा. पहाटेच्या सुमारास डाव्या बाजूला झाडीत थोडे दूर कसलीशी हालचाल जाणवली ती ह्याचीच असावी बहुदा. जंगलातून चालत बाहेर गावाकडे आलो. बाईक काढल्या आणि नाश्ता करायला येऊर गावात पोचलो. पहाटे गावात बिबट्या येऊन १ कूत्र खाऊन गेल्याची बातमी आम्हाला तिथेच मिळाली. आम्ही पवारांकडे पहिले. रात्रभर जाऊन, वाट बघून बिबट्याने दर्शन दिलेले नसले तरी त्याच्या पायाचे ठसे आम्हाला बघायला मिळाले होते. तरी सुद्धा 'उजव्या बाजूने तो पाटलीपाड्याच्या बाजूला निघून गेला' हे वाक्य म्हणजे १०० टक्के थाप होती हे मला कळून चुकले होते.

काही वेळात आम्ही येऊर वरून उपवन आणि मग मी तिथून घरी पोचलो. रात्रभर झोप झाली नव्हती त्यामुळे सरळ ताणून दिली. संध्याकाळी मला अजून एक बातमी पाटलीपाड्याच्या मित्राकडून कळली. तिथे सुद्धा बिबट्याने कूत्र उचलून नेले होते. मला चटकन पवारांचे वाक्य आठवले.

'उजव्या बाजूने तो पाटलीपाड्याच्या बाजूला निघून गेला'

याही पेक्षा मला पुढचा विचार आला तो म्हणजे त्या रात्रीत थोड्याच वेळेच्या अंतरावर आम्हाला दोन्ही बिबट्यांनी एकामागून एक हूल दिली होती. एक रात्री उजव्या बाजूने पाटलीपाड्याला तर दुसरा डाव्या बाजूने पहाटे गावातून जंगलात सटकला होता.

एक आठवण म्हणून ती रात्र माझ्या थरारक अनुभवांमध्ये जोडली गेली होती...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुपर्ब! काय मस्त अनुभव आहे. पण ते एका जागी आख्खी रात्र बसणं म्हणजे सोप्प नसणारच!

>>>>> डोळे मोठे केले तरी काहीच दिसेना. म्हणून लहान करून पहिले तरी काहीच दिसेना.

बराच वेळ आम्ही बसून होतो. नेमके वाजले किती ते मला समजत नव्हते. हालचाल करायची नाही त्यामुळे घड्याळ बघणे शक्य नव्हते. पण मला भूक लागायला लागली होती त्यावरून मी ताडले की बहुदा १० वाजून गेले आहेत.

मला तर पवार आणि बाजूचा तो मुलगा झोपले वगैरे नाहीत ना अशी शंका यायला लागली. उगाच आपण वळावे आणि आपली हालचाल न जाणो नेमकी त्या बिबट्यास दिसली तर सर्वच वाया म्हणून डोके न हलवता मी नुसतेच डोळे फिरवून त्यांच्याकडे बघायचा प्रयत्न करत होतो. पण कसले काय!!!!

>>> Rofl डोळ्यापुढे आणून खुप हसले.

वॉव मस्तच रे !
< डोळे मोठे केले तरी काहीच दिसेना. म्हणून लहान करून पहिले तरी काहीच दिसेना.> Lol

निवांत... एका जागी असे रात्रभर 'निवांत' बसून राहणे खरच कठीण काम आहे... Happy

सावली, मामी... मलापण लिहिताना तो प्रसंग डोळ्यासमोर येत होता आणि हसायला येत होते. Lol

मस्त रे रोहन.. जबरी अनुभव Happy
मी ठाण्यात राहतो पण एकदा पण येऊरला गेलो नाही ... कधी जाशील असा अनुभव घ्यायला तर मला नक्की सांग.. आवडेल मला Happy

रोहित... आज वेळ असेल तर जाऊन बघ... कदाचित आज पण तुला असा अनुभव घेता येईल... आज बुद्ध पौर्णिमा आहे.. >>> कोणी गेला होता का?

पक्का भटक्या - द जिम कॉर्बेट ऑफ मायबोली
जंगलात कधी तु वाघ पाहीलास का? पाहीलास तर अनुभव सांग.