गावठा

Submitted by शाबुत on 13 May, 2011 - 09:25

गावठा

"आता जाता-जाता शेवटच्या दिवसात, मले ह्या गावात हेही पाहावं लागींन असं वाटलं नव्हतं!" आपल्या तोंडात शेवटचे दाठीचे पाच-सहा दात बाकी असलेला, सार्‍या अंगावरचे केस पांढरे झालेला म्हातारा, गावठ्यावर पाच-सहा जण पाहुन बोलला. म्हातार्‍यानंच सुरवात केली म्हटल्यावर, आपलं धोतर सावरत तो एका दगडाला रेटुन जमिनीवरच बसला, कारण दगडावर बसणं आता त्याच्या प्रकुतीला परवडणारं नव्हतं, तसचं मागच्या कितीतरी वर्षापासुन हि जागा त्याच्याच नावावर होती.

"अरं पण, दिल्लीपासुन गल्लीपर्यत चालणारं राजकारण, तसचं चालत घरात जाईन अन् तेही आपल्या गावात होईन असं तर मला सपनातही वाटलं नव्हतं!" आपल्या अर्ध्या पांढर्‍या दाढीला खाजवत, अंगात पांढरा कुर्ता-पयजामा घातलेला, दगडावर बसलेला माणुस बोलला.

"कधीही राजकारणात काही मुद्दे असतात, काही हितसंबध जपावे लागतात, कधी तत्वांचा प्रश्न निर्माण होतो. आता आपल्या गावात सरपंचाच्या निवडणुकीत, पोरगा बापाच्याच विरोधात उभा राहला म्हणजे कमालच झाली म्हणायची!" त्याच गावातली चवथी शिकलेला, आपला एक पाय दगडावर ठेऊन उभा असलेला युवक बोलला.

"आजची तरुणपिढी सुशिक्षित आहे, आता त्यानींच पुढे येऊन राजकारणाची धुरा सांभाळायला पाहीजे. या गोष्टीची सुरुवात मात्र आपल्याच गावातुन होत आहे, हे जरा पचायला जड जात आहे!" चांगला पॅन्ट-शर्ट घातलेला, याच वर्षी तालुक्याच्या कॉलेजात एफ.वायला असलेला तरुण बोलला.

आज सकाळीच गावाच्या गावठ्यावर हि चार माणसं चर्चा करायला उभी राहली, त्याच्या बाजुला चर्चा ऐकण्यासाठी इतर मंडळी. आता चोघांच्याही चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह, त्या गावठ्यावर एकदम स्मशान शांतता, त्या गावातल्या तणावपुर्ण वातावरणाचा हा उच्चाकं. इथचे सगळेच रिकामे आता एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते, जसं पुढं बोलायला कोणालाच काही सुचत नव्हतं. क्षितिजावरचा सुर्य मात्र वर चढत, आपलं काम करत होता, गावठ्यावरचं वातावरण तापवत होता.

"काय बी झालं तरी गावातली आताची तरुण मंडळी किसनाच्याच मागे उभे राहतील, एवढ मात्र नक्की!" मागच्या मंडळीतुन आवाज आला.

"अरे, कुठवर उभे राहतील? त्यांचे गुढगे दुखेस्तवरच ना!" स्थळ, काळ, परिस्थिचीचं भान नसलेला एक वात्रट मधेच बोलला.

आता गावठ्यावरची सर्व मंडळी हसायला लागली. इथं कोणालाही काहीही बोलायला मुभा असते, ठरवुन दिलेल्याच विषायावर बोलायला हा काही परिसंवाद नव्हता. कोणीही काहीही वाकडं-तिकडं बोलतं राहतं, कधीतर अशा बोलण्यातुनच भांडण जुंपतं.

माणसं सकाळचं गोठ्यातलं शेण-पाणी करुन, काही बायकोला मदत म्हणुन विहिरीचं पाणी भरुन, कोणी घरातला स्वंयपाक होईपर्यंत, रोजच्यासारखा 'टाईमपास' म्हणुन गावठ्यावर बसायला येत होते.

गावात पुढच्या महीन्यात सरपंचाच्या पदासाठी निवडणुक होणार होती, चार दिवसापुर्वीच तालुक्यावरुन तशी काही नोटिस आली होती. गावात अजुन निवडणुकीचं वारंही भिनलं नव्हतं तरी कालच संध्याकाळी एकाच घरातले दोन उमेदवार उभे राहणार आहेत असं ऐकायला येत होतं. बरं, ते दोघं भाऊही नव्हते की त्याचं घरात काही कारणानं पटत नसावं. ते तर बाप-लेकं होते, महादु अन् त्याचा पोरगा किसना.

आता सुरुवातीच्या बोलणार्‍यांना वाटलं कि, आपण काढलेला अतिशय महत्वाचा विषय असाच भरकटत तर जाणार नाही. विषयाची गाडी रुळावर आणण्यासाठी अर्ध्या दाढीवाला बोलला, "अरं, महादु कालच संध्याकाळी मला म्हणत होता की तो जर सरपंच झाला तर आपल्या गावात दुध देअरीचं केंद्र आणीण म्हणतो."

"आरं, मी माह्या घरात महीण्याभरापासुन दुध पाहीलं नाही." - पहिला.
"आपल्या गावात तेवढ्या गायी-म्हशी नाहीत, मग डेअरीसाठी दुध कुठुन आणणार," - दुसरा.
"रानात गायी-म्हशीनां चरायला आता पळीतं राहीलं नाहीत." - तिसरा.
"गावात गायी-म्हशीनां प्यायला पाणी नाही." - चौवथा.
"आता गावात दुधात टालायलाही पाणी नाही." - पाचवा.

या शेवटच्या वाक्यानं मधेच बोलणारे एकदम जोरात हसायला लागले. गावात नवीन काही होऊ द्यायचं नाही, तसचं स्वता:ही काही करायचं नाही. कधीतरी कोणी काही करायचं म्हटलं, तसं कोणी बोललं तरी त्याची खिल्ली उडवणारे हे लोक.

महादुचा निवडणुकीचा जाहीरनामा सर्वांना डेअरीच्या पांचट दुधासारखा वाटला, त्याने त्याची तोंडं विटली. आता महादुचा पोरगा किसना काय म्हणतो, हे ऐकल्याशिवाय तिथुन कोणीच हलणार नव्हतं. तसं जर कोणी घरी गेलं असतं तर त्याला सकाळचं जेवणच गेलं नसतं.

"माझा मित्र किसना गावाचा सरपंच झाल्यावर, गावच्या सर्वांगिण विकासाचं धोरण राबविणार आहे." एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्यासारखा पॅन्ट-शर्ट घातलेला तरुण बोलायला लागला.

"ह्या गावाचा सर्वांगिण विकास म्हणजे नक्की काय करणार रे बाळु?" आतापर्यंत गप्प बसलेला म्हातारा हातातली काठी उचकत बोलला.

"आबा मधेच बोलु नका, ... तर किसना हा तरुण, तडफदार, सुशिक्षित, सज्जन आणि सपंन्न असा उमेदवार आहे, तेव्हा 'बाप से बेटा भला' या तत्वाने ..........! " तो तरुण आताच्या भाषणासाठी काँलेजातलं सगळं ज्ञान वापरत होता.

"अरे, तो किसना घरचे गवताचे भारे पाठीवर वाहुन पाठीत वाकला अन् त्याची छाती आत गेली, आता तो तरुण कसा?" - पहीला.
"गोठ्यातलं शेणपाणी करायलाच तो सुर्य डोक्यावर आणतो, तो तडफदार कसा?" - दुसरा.
"त्याचा वावरातलं कामाचा अन् बैलामागे फिरण्याचा करण्याचा अनुभव काय कामाचा!" - तिसरा.
"तो गावातल्या शाळेत चौथीपर्यतही पोहचला नाही, तो सुशिक्षित कसा?" - चौवथा.
"आपल्या गावात कोण सज्जन आहे? तो किसनाही त्याच्या मायच्या चोरुन कधीतरी थोडीफार घेतोच. त्याच्या पैशाचा आपल्याला काय उपयोग? तुमीच मले सांगा!" - पाचवा.

गावठ्यावर अचानक गगुंबाई हजर झाली, तेव्हा बोलणार्‍यांची वाचाच गेली. गगुंबाई म्हणजे महादुची बायको म्हणुनच किसनाची आई. तिचा कोणत्याही कारणावरुन भांडण्याच्या बाबतीत गावात नंबर एक होता, त्यामुळे तिची गावात धास्ती अन् घरात दरारा होता. गगुंबाईला विचारल्याशिवाय तिच्या अंगणातल्या झाडाचं पान हलवायला हवाही येऊ शकत नव्हती. आजपर्यत ती सार्‍या गावाला पुरुन उरली होती. समजा जर महादु किंवा किसना यापैकी कोणीही एक सरपंच झालं तर गावात काय करायचं हे ते ठरवणार होते, तेव्हाच त्यांनी घरात काय करायचं हे गगुंबाईच ठरविणार होत्या.

आता गावठा एका महान संकटाला जात होता. गंगुबाईचं रोद्ररुप पाहतात तिथच्या मंडळीचं आतापर्यतचं हासणं- खिदळणं एका क्षणात हवेत विरुण गेलं. आता काहींनी समोर उभ्या ठाकलेल्या संकटाला घाबरुन हळुहळु माघार घ्यायला सुरुवात केली, कारण तिथं गंगुबाईचा एकपात्री प्रयोग चालु झाला होता.

"काय रे हरामखोरांनो! आता सांगा, माह्या किसना कधी दारु पिला अन् त्यानं कोणा-कोणाला पैसे वाटले? तुमच्या बापाचा हरामाचा माल हाय काय तो! ...............आता त्या बाप-लेकांना घरातली काम कमी पडली वाटतं? .......... अन् तुमी सगळे बसले वावरातले कामं करायचे सोडुन गावठ्यावरचे दगड झिजवत!"

गंगुबाईचे शेवटचे वाक्य ऐकायला गावठ्यावर एकटाच म्हातारा उरला होता, कारण त्याला काठीच्या आधारानं लवकर उठता आलं नाही. बाकीची सारी मंडळी आपापल्या घरी पसार झाली होती. आता सारा गावठा सुन्न झाला होता, कारण नेहमीप्रमाणे आजही गंगुबाईनचं बाजी मारली होती. आता गावठ्यावर ऐकणारं कोणीच उरलं नाही म्हटल्यावर गंगुबाई घ्रराच्या दिशेने महादु आणि किसनाचा समाचार घ्यायला निघाली.

आज सकाळी-सकाळी गावठ्या महादु-किसनाचं नाव निघायला कारणंही तसचं घडलं. काल सकाळी महादु आणि गंगुबाई या नवरा-बायकोत घरात झाडु कोणी मारावा म्हणुन वाद झाला. तसा आजपर्यंत घरात झाडु गंगुबाईचं मारत होती पण "गोठ्यात, अंगणात तुमीच झाडु मारता तेव्हा आजपासुन घरातही तुमीच मारला तर काय फरक पडणार हाय!" असा युक्तीवाद गंगुबाईनं महादुजवळ केला.

महादु गंगुबाईला म्हणाला की "हा शेजारचा दाम्या घरातलं एकही काम करत नाही, वावरातही इकडची काडी तिकडे करत नाही. तालुक्याच्या गावावरुण आला की सरळ गावठ्यावर जाऊन बसतो. मी सकाळी तुले विहीरीचं पाणी भरुन देतो, गोठाही मीच साफ करतो, तसचं दिवसभर वावरातही राबतो. आता तु मले म्हणतं की घरात झाडुही मारत जा! हे बाकी अतीच झालं. त्या दाम्यासोबत मी गल्लीत गोट्या खेळलो अन् आमी एकाच वर्गात शाळेत शिकलो होतो."

" अवं, आता परिस्थीती वेगळी हाय! दामोदरभाऊ गावाचे सरपंच आहेत. तुमच्या काम करणं जिवावर आलं अशिल तर तुमीबी सरपंच होऊन दाखवा अन् इकडची काडी तिकडे करु नका!" गंगुबाई नवर्‍याला हिनवत बोलली.

घरातलं नवरा-बायकोचं भांडण त्यांचा पोरगा किसना चोरुन ऐकत होता. आता त्याच्याही मनात सरपंच होण्याची इच्छा बळकावली, कारण तोही रोजच्या गोठ्यातल्या-वावरातल्या कामाला कंटाळला होता. त्याला शेणाचा वास येत होता अन् वावरतल्या कामानं घाम येत होता. किसनानं परवाच ऐकलं होतं की, आता महीन्याभरानं सरपंचाची निवडणुक होणार आहे. किसनाला सरपंच होण्यासाठी बापाच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागणार होतं. किसनं विचार केला की नाहीतरी दोन-चार दिवसातुन कामावरुन त्या दोघांत भांडण होत राहतच, आता तेच घरातलं भांडण गावासमोर येईल इतकंच.

किसनाला वाटलं की मी सरपंच म्हणुन निवडुन आलो की, सगळ्या कामपासुन तर सुटका होईलच तसचं सरकारी पैशानं मला तालुक्याच्या चकराही मारता येतील. त्याला कोणत्याही कामात घिसघिस करणार्‍या अन् नेहमीच तुटकपणे वागणार्‍या बापाचा राग आला होता. हि गोष्ट त्यानं आपल्या पँन्ट-शर्टवाल्या मित्राला बोलुन दाखवली. त्याच्या मित्राने किसनाच्या प्रचाराची नैतिक जबाबदरी स्विकारली अन् तो लगेच कामाला लागला.

महादुनंही गंगुबाईचं आवाहन आपल्या मित्राला वावरात तंबाखु चोळत सांगितलं, वरुण तो त्याला असंही म्हणाला की "सरपंच झाल्यावर सगळ्यात आधी मी तुयचं काम करत जाईलं!" महादुनं त्या मित्राला ती तंबाखुची भरलेली पुडी भेट दिली. संध्याकाळी वावरातुन घरी आल्यावर त्या पुडीतली तंबाखु चघळत सार्‍या गावात महादुच्या नावानं बोंब उठवली.

रात्रीच्या जेवणापर्यंत घराघरात हा विषय पोहचला तेव्हा चुलीजवळ स्वयंपाक करतांना बायका नवर्‍यांना विचारत होत्या, "काय हो, मी ऐकलं ते खरं आहे काय? गंगुबाईच्या घरातले दोन माणसं ऐकांमेकांच्या विरोधात उभे राहणार आहेत?" त्यावर नवरा त्यांना उत्तर देत असे की "मीही तसचं ऐकलं पण उद्या सकाळी गावठ्यावर जावुन खात्री करुन घेतो."

अशा प्रकारे कोणत्याही गावातल्या कोणत्याही विषयाला वाच्या फोडण्यासाठी गावठा हेच एकमेव व्यासपिठ असतं. तिथंच बरेचसे निकाल लागतात, कारण दररोज सकाळ-संध्याकाळ तिथं बरीच माणसं जमतात. चार गावं फिरुन आलेले शाहणे माणसं तिथंच आपले विचार व्यक्त करायला येतात, वात्रट-चावट माणसांचा अड्डाही तोच असतो, शेवटी गावातल्या आळशी, कामचुकार माणसांची कर्मभुमीही गावठाच असते.

गावठ्यावर टाईमपास करायला फक्त शब्दांचं भांडवल लागतं. गावातली काही आळसी माणसं बसुन-बसुन तिथचे दगड झिजतात, पण त्यांच्या गप्पा सरत नाहीत. गावठ्यावर विषयाला कोणतही बंधन नसतं, त्यांना काहीही विषय चालतो. गावातल्या कोणत्यही प्रश्नाला पहील्यांदा तिथचं वाचा फुटते, मग सरपंच पदाचा गावासाठी एवढा महत्वाचा विषय कसा निघणार नाही.

*********

गुलमोहर: 

शामराव,
छान आवडलं.

तुम्ही मुक्तपीठावर आहात काय ? साधारण दीडेक वर्षांपूर्वी मी एक ललित लिहीलं होतं. त्यात गावातल्या एका दिवसाचं वर्णन होतं. त्यात गावातला पार, पारावरचा म्हातारा आणि तरून मुलांचा संवाद गावातली निवडणूक, दोन घराण्यातलं वैर हे अगदी असंच्या असंच होतं. मुक्तपीठावर माझं सगळं लिखाण तांत्रिक कारणाने गेलं खरं पण हा लेख वाचून ते सर्व आठवलं. धन्यवाद !

सोनवनेसाहेब मुक्तपीठ काय भाडगड आहे, मला अजुन माहीती नाही, त्याबद्द्ल मला जरुर सांगा. एवढ्यातच मी मायबोलीचा मेंबर झालो आहे, मायबोली आधी मी कुठही- काहीही लिहलं नाही, बरे असो. प्रतिसादाबद्द्ल आभारी.