हंसध्वनी ...!

Submitted by चैतन्य दीक्षित on 12 May, 2011 - 23:39

भावना बोलकी, शब्द झाले मुके
जाणिवांच्या पुढे दाटलेसे धुके !

स्पर्श-आल्हाद हे,जीव जीवा कळे
धुंद एकांत हा,विश्व हे आगळे !

या म्हणा भोग वा, ही समाधी-स्थिती !
वा अधःपातही वा म्हणा उन्नती !

वेस ओलांडली- देह संपे जिथे
शुद्ध आनंद हा फक्त नांदे तिथे

वाजती श्वासही पावरी होउनी
ऐक्य हे उमटवी मुक्त 'हंस'ध्वनी !

-चैतन्य

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

फार आवडली!!!

वाजती श्वासही पावरी होउनी
ऐक्य हे उमटवी मुक्त 'हंस'ध्वनी !>>> हे वाचायला फार छान वाटलं, पण अर्थ उमगलाय असं वाटत नाही... पावरी म्हणजे बासरी का? 'हंस'ध्वनी म्हणजे काय?

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!

सानी,
होय, पावरी म्हणजे बासरीच पण छोटी बासरी/पावा.
''ऐक्य हे उमटवी मुक्त हंसध्वनी'' यात दोघांचे श्वास एक झालेत असं म्हणायचं आहे.
आपल्या पुराणादींमध्ये- आपल्या श्वासाचा हंस असा आवाज येतो आणि उच्छ्वासात सोऽहं असा आवाज येतो/असतो असे मानतात.
दोघांचे श्वास एक झाले आणि त्या एक झालेल्या श्वासांतून 'हंस'ध्वनी ऐकू येऊ लागला असं काहीसं म्हणायचं आहे Happy