माझ्या प्रियकरांना..

Submitted by मी मुक्ता.. on 12 May, 2011 - 01:46

(असं म्हणतात की, The best love stories in your life happen when you dont know anything about love. Well, I still dont think I know anything about love. पण नक्की आठवतय 'नंदा प्रधान' वाचताना जे झालेलं माझ्या मनाचं ते.. आणि त्यानंतर भेटलेल्या, न भेटलेल्या अगणिक लोकांविषयी वाटलं ते.. त्या सर्वांसाठी..)
**************************************************
नातं बनतं म्हणजे काय?
नातं तुटतं म्हणजे तरी काय?
कोणतंही नातं बनत नाही..
तुटत तर त्याहून नाही...
जिग्-सॉ पझलसारखच वाटायला लागतं आयुष्य कधी कधी,
सगळ्या गोष्टी असतात,
त्या फक्त शोधुन जागच्या जागी बसवायच्या..
तसच काहीसं होतं का नात्यांचं?
आपल्या मनात सगळ्याच नात्यांची काही काही रुपं असतात,
आणि मग माणसं बघुन ती भरायची..
अपेक्षेपलीकडची नाती कधी असतात का?
घटना बदलतील कदाचित,
मतितार्थ मात्र तोच..!

आयुष्याचा कॅनव्हास इतका मोठा झालाय,
कसं रहायचं मर्यादित प्रेम करत?
प्रत्येक मित्रात सापडलेला थोडा थोडा प्रियकर
आणि प्रत्येक प्रियकरातला खूपसारा मित्र..
आणि काही काही तर अगदीच कधीही न भेटलेले पण..
कुणाचा धीरगंभीर स्वभाव आणि गाईचे डोळे,
कोणी उत्साहाचा झरा,
कोणाच्या कुंचल्यात जादू,
कोणाच्या गळ्यात..
कोणी प्रचंड आदराला पात्र,
आणि कोणासाठी उगीचच दाटुन आलेली माया..
कोणी नुसते निर्मळ..
कोणी समजुतदार आणि प्रेमळ..
कोणाचा निर्हेतुक खमकेपणा,
तर कोणाचा सहेतुक थंडपणा..
माझं मलाच कळतय आज प्रेम किती प्रकारे करता येवु शकतं..
आणि कदाचित पुढेही कळत राहिल अजून किती प्रकारे?

तुम्ही मला प्रिय होतात..
इतरांपेक्षा प्रिय झालात..
प्रियतम.. प्रियतर...!
'प्रियकर'???
हे लेबल लागलं की नाही,
याने खरच कितीसा फरक पडतो..
प्रत्येकासाठीचा माझा पदर वेगळा होता..
प्रत्येकासाठी माझ्यापाशी असलेलं दानही वेगळं होतं..
प्रश्न, उत्तरं, व्याख्या आणि बंधनं याच्या पार कधीच पोहचलेलं असतं मन...
आपण का व्याख्या मिळवायच्या नादात माणसं हरवुन बसायचं?
शेवटी व्याख्या आली म्हणजे तिचं अपूर्णत्वही आलं,
अपवादही आले..
त्यापेक्षा शब्दांपलीकडचं सगळच कसं पर्फेक्ट.. परिपूर्ण..
काय फरक पडला आपल्या नात्यात, कबुली दिली गेली किंवा नाही त्याचा..
काय फरक पडला, तुम्हाला माहिती होतं तरी की नाही त्याचा..
आणि काय फरक पडला असता,
अजून काही घोटवलेल्या वाक्यांची पुनरावृत्ती झाली असती तर त्याचाही?
खरंतर, नात्याच्या व्याख्येची खरी गरज तिसर्‍याच माणसाला असते..
कोणत्याही व्याख्येत न गुंतता प्रेम करु शकले,
म्हणुनच कदाचित तुम्हालाही खूप कौतुक वाटलं त्याचं..

पण तुमच्यापैकी ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांच्याबद्दल कधी कधी वाटतं,
कदाचित कोणीच सर्वांगाने जाणलं नाही मला..
त्याचं वैषम्य वाटावं असंही काही नाही म्हणा..
हत्ती आणि आयुष्याच्या रुपकाप्रमाणे
करतच रहातो आपण चूक
कोणत्याही माणसाला जोखण्याची..
कदाचित मला स्वतःचा थांग अजून लागला नाहीये
त्यामुळे मी शिकलेय कोणाला ओळखल्याचे दावे न करायला..
पण तुम्ही?
तुम्हाला तरी पटलीये का ओळख स्वतःची खरच..?
आणि माझीही? पूर्ण नाही पण पुरेशी तरी?
त्यामुळे, ज्यांनी मला एकाच कोनातून जोखलं,
त्यांच्या वाट्याला दु:ख आलंही असेल..
ह्म्म...
तुम्हाला समजलं की नाही हे मला माहित नाही,
पण तुम्ही कोणी कधीच नव्हतात एकमेकांच्या रीप्लेसमेंट्साठी..

माझ्या प्रिय प्रियकरांनो,
शेवटी आज मी जी काही आहे ती तुमच्यासकट आहे,
कोणाला.. अगदीच कोणालाही न वगळता...
माझ्या असण्यात जितकी मी आहे,
तितकेच तुम्हीही आहात...
शेवटी माझी तुमच्यापासून सुटका नाहीच..
जिथे स्वतःपासूनच सुटका नाही तिथे तुमच्यापासून कशी?
(तशी माझी सुटका तुमच्यापासून नव्हतीच कधी..
कारण मला बांधुन घालणारेही तुम्ही नव्हताच..
इथे स्वतःच्याच निर्दय तावडीत सापडलेय मी..)

असो.. तुम्ही भेटलात,
मी अजून भेटले स्वत:ला..
स्वतःच्या स्वतःकडे चाललेल्या प्रवासातल्या काही वाटा,
अधिक मोहरल्या असतील कदाचित,
सुकर वाटल्या असतील कदाचित,
उलट बर्‍याचदा तुमचा उत्प्रेरक म्हणुन फायदाच झाला
त्या वाटा जोखताना...
मला माझ्याच आयुष्यात असं मुरवत नेल्याबद्दल
तुमचे आभार..
**************************************************

गुलमोहर: 

खरं सांगायचं तर..

ही कविता आहे की ललित? हा प्रश्न प्रथम मला पडला होता.. कविता आहे तर ही फारच लांबलीय, असं वाटतं...

कविता थोडीबहूत कळाली बरीचशी नाही कळाली.

अमित.

हा प्रश्न मलाही पडला होता. पण हे मुक्तक आहे. म्हणुन कविता विभागातच टाकलं.. अर्थात थोडं मोठं आहेच पण इतकं सगळं अजून कमी शब्दांत बसवणं मला नाही जमलं. आणि काय समजलं नाही हे सांगाल तर प्रयत्न करीन स्पष्ट करायचा..

प्रतिसादाबद्दल धन्यवाद..! Happy

chhaan aahe.....laanb aahe pan sagake priyakarancha ullekh asayla hava naa.....mi hi lihilo asato ashich....pan jaau dyaa...100 peksha jaast bhaaganchi kaadambarich lihavi lagali asati.... Happy

sagalyach maitrinin madhe preyasi disate.... Happy

कविता,मुक्तक जे असेल ते.. आवडलं.. कारण या दृष्टीने पाहिले तर कोणतेच नाते तुटण्याचे भय उरणार नाही.. Happy
मला माझ्याच आयुष्यात असं मुरवत नेल्याबद्दल
तुमचे आभार..>> मस्त सकारात्मक

सुंदर आणि मोकळेपणानी लिहिली आहे कविता फार आवडली, मलाही खूप दिवस या विषयावर काहीतरी लिहायचं होतं, हे वाचून मला फायदाच होईल.

मुक्ता अभिनंदन!
'स्व' च्या शोधयात्रेत सर्वात महत्त्वाचा वाटा असतो ते आयुष्यात सगळ्यात जवळ आलेल्या, येऊ दिलेल्या, येऊ शकणा-या (फक्त शक्यता याच अर्थी नव्हे) अशा सगळ्याच माणसांचा! ज्या माणसांचं आयुष्यात येणंच नाही तर त्यांचं जाणंदेखील खूप काही देऊन जातं. खरं तर हे नातं इतकं नाजूक, सुंदर आणि भव्य असतं की आयुष्याचा कॅनव्हास कितीही मोठा असला तरी ह्या नात्याचं स्वतःचं असं अवकाश खूप ज्यास्ती खोल असतं...आणि त्या अवकाशाचं म्हणून एक आयुष्य असतं! हवंनकोसं वाटण्याच्या कुठल्याशा अज्ञात टप्प्यावर आपलं आयुष्य मात्र चोख वळण घेत राहतं...कारण, "हे असले करणे ही काळाची अगाध कला! (की कळा??)" Happy
फक्त मनुष्यजन्मातच शक्य आहे अशा ह्या विलोभनीय नात्याचा मुळापर्यंत वेध घेत स्वतःमधल्याही प्रेयसाशी केलेला हा intimate संवाद खूप छान रेखाटला आहे. अभिनंदन! Happy

मुक्ता, कविता म्हणून नाही, मी ललित म्हणूनच वाचलं. भावना अगदी थेट पोहोचली. मला आवडलेली प्रत्येक व्यक्ती, या अर्थाने माझी प्रियकर झालेली आहे.

मला खूप खूप आवडली आणि भावलीही. त्या त्या नात्यांत त्या त्या वेळी आपण प्रामाणिक असतोच आणि मग त्या सगळ्या सगळ्या नात्यांचा अंश आपल्याबरोबर बाळगतच असतो. खूपच धीटपणे आणि छान मांडल्यास तुझ्या भावना. आणि सगळ्यात चपखल शब्द वाटला तो - उत्प्रेरक. अगदी अचुक शब्द. शुभेच्छा.

धन्यवाद..! सगळ्यांचे खूप खूप आभार.. Happy

विशाल,
मी वर जे म्हटलं तेच.. हे सगळं अजून कमी शब्दांत व्यक्त करणं नाही शक्य झालं मला.. Happy प्रतिसादाबद्दल धन्यवाद..!

रामकुमार.. Happy

चेतना, कवितेचा शेवट हीच तर खरी सुरुवात आहे ना याबाबतीत.. Happy आणि प्रवासाची सकारात्मक सुरुवात कदाचित प्रवासही योग्य घडवेल ही अपेक्षा.. Happy धन्यवाद..

सुमित, शेवटी कितीही वाचलं तरी आपले अनुभव वेगळेच रहातात.. नाही का? कदाचित याच सार्‍या भावना तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने मांडाल.. Happy

झाड, सुंदर प्रतिक्रिया..

दिनेशदा, कविता, ललित की मुक्तक या संभ्रमात मीही होते आणि शेवटी कवितेत म्हटल्याप्रमाणे व्याख्येत मांडायचा अट्टहास सोडावाच लागतो काही बाबतीत. कदाचित या लेखनाच्या बाबतीत तेच लागु होईल. लेखनाच्या प्रकारापेक्षा भावनाच महत्वाच्या झाल्या मला इथे.. आपला प्रतिसाद पाहुन खूप छान वाटलं. सहसा कवितांवर प्रतिसाद नसतात आपले.. Happy धन्यवाद..!

मामी, Happy अगदी अगदी... सगळ्याच नात्यांचा अंश.. कारण या इतक्या व्याख्येत न बसवता येणार्‍या उत्कट नात्यांत काही मैत्रीणी पण आहेत माझ्या.. Happy दिनेशदांना पण हेच म्हणायचं आहे.. "मला आवडलेली प्रत्येक व्यक्ती, या अर्थाने माझी प्रियकर झालेली आहे." हेच मांडायचं होतं. नीट पोचलेलं पाहुन आनंद वाटला..

पुनश्च खूप खूप आभार.. Happy

मुक्ता मी बहुतेक कविता वाचतो. पण थेट भिडल्याशिवाय प्रतिसाद देत नाही. इथे अनेक वर्षे वाचतोय कविता, पण विषयात फार नवे काही दिसत नाही. शिवाय अनेक कविता, मला कळतही नाहीत.

कोणतंही नातं बनत नाही..
तुटत तर त्याहून नाही...>> इथेच जिंकलसं, अप्रतिम!!!
'तू खुदा है, न मेरा इश्क फरिश्तों जैसा,
दोनों इंन्सा है, फिर क्यूं इतने हिजाबों मिले'

बरं झालं प्रस्तावना लिहीलिस. नाहीतर उगाचच गूढ झाली असती.
भावनांचं रेखाटन मस्तपैकी जमलय.. सगळे रंग छटांसहित उतरलेत असं वाटतंय.. .

पुरूषाला असा खोल विचार करायला जमतं ? डोण्ट नो

खरे सांगायचे तर ...
एके काळचे प्रियकर (एकांगी का असेनात) त्यांनी आयुष्य enrich केले असेल असे मला वाटत नाही.
ते तिरस्कार करत असावेत आज ... मे बी. (Normal human psychology )

अवांतर: त्यांच्या पैकी कोणी हा लेख वाचला तर त्यांना नेमके कसेच वाटेल बरे ?
नोट: मला लेख आवडलाय ... आगाऊशी सहमत

दिनेशदा,
hmm.. Happy

आगाऊ, खूप खूप आभार.. Happy

गब्बर.. आपापल्या दृष्टीकोनावर अवलंबून.. Happy

अंजली, धन्यवाद.. इतकं थेट समजून घेतल्याबद्दल.. Happy

लब्बाड.. पुरूषाला असा खोल विचार करायला जमतं >> नक्कीच.. Happy आणि अवघड असेल तर स्त्री-पुरुष दोघांसाठीही अवघड आहे..

निळूभाऊ,
त्यांनी आपल्याला एनरीच करणं यापेक्षा आपण शिकत एनरीच होत जाणं जास्त महत्वाचं आहे. ते जमलं पाहिजे स्वत:चं स्वत:ला. आपल्या एनरीच होण्या-न होण्याला सर्वस्वी आपणच जबाबदार असतो. अनुभव सगळ्यांना येतात. त्यातून कोण काय घेईल हे सर्वस्वी व्यक्तीसापेक्ष असतं.

ते तिरस्कार करत असतील>> या प्रश्नाचं उत्तर माझ्यासाठी तरी देते मी. नक्की नाही. २००% नाही.. Happy ही नाती वेगळी असतात हो. नुसतेच एकत्र आले, फिरले आणि एकमेकांवर आरोप करुन, भांडुन सोडुन गेले असं काही नाही यांत.. बघा इमॅजिन होतात का ही नाती.. बर्‍याचदा खूप सुंदर नाती काळाच्या ओघात निसटत जातात. काही कारण नसतं, काही तक्रार नाही, भांडणं नाही,.. बरं, पुन्हा आपण होऊन जवळ जावं असही काही वाटत नाही. वाटतं आठवणीत आहे तेच आणि तसंच राहु द्यावं. कोण जाणे आपण बदलत गेलोय तसा समोरचा माणुसही बदलत गेला असेल. कदाचित आता जे नातं निर्माण होईल ते तितकं निख्ळ, नैसर्गिक नसेल.. सांगता येत नाही. खूप गुंतागुंत आहे.. Happy

प्रतिसादाबद्दल धन्यवाद..! Happy

पुन्हा एकदा सर्वांचे खूप आभार..!

"आपण बदलत गेलोय तसा समोरचा माणुसही बदलत गेला असेल. ..."

एका प्रतिसादाला उत्तर देताना तुम्ही व्यक्त केलेला हा विचार परिस्थितीशी कळत-नकळत जुळवून घेण्यास नक्कीच सहकार्य करतो. सोमवारी ज्याच्याबरोबर/जिच्याबरोबर जे ओढ लावणारे नाते निर्माण झाले होते ते मंगळवारी तसेच राहिले नाही तर बुधवारपासून दोघेही आपापल्या रस्त्याने आयुष्याची परिक्रमा करीत राहतील. नात्यातील हा बदल म्हणजे कटुता नसून ती एक अपरिहार्यता असते आणि मनी जखमा झाल्या असतीलच तरी त्या काळाच्या ओघात भरून निघतातच....कदाचित नव्या नात्यांच्या सहवासाचाही परिणाम होऊ शकतो.

[का कोण जाणे पण मला राहूनराहून वाटते की कवितेपेक्षा या विचाराला ललित लेखनाचे रूप दिले असते तर तुम्हालाही हा तसा हळवा विषय विस्तृतपणे मांडता आले असते. अर्थात कविता छानच उतरली आहे, हेही सांगणे गरजेचे आहे.]

सुरेख! समुद्रासारखं खोल आणि अथांग काव्य.

" प्रत्येक मित्रात सापडलेला थोडा थोडा प्रियकर आणि प्रत्येक प्रियकरातला खूपसारा मित्र.." ही ओळ अबाव्ह and बियॉंन्ड आहे.

खरच धाड्सी, मनातील विचारांच्या व्यापारांची सुंदर मांड्णी, शेवट्ची ओळ अप्रतीम.

ही कविता नाही वाटली मला..
आणि
अगदी खरं सांगायचं तर, काही नाती, काही गोष्टी अशा असतात, त्यांच्या व्याख्या, त्यांचं व्यापलेपण अव्यक्त राहण्यातच मजा असते.. शब्दरूप देऊन गढूळ कशाला करायचं त्यांना? आणि माझ्या मते, प्रियकराचं नातं हेही असंच.. its between self and him/her. ते तसंच राहू द्यावं.. त्यांना उलगडण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात त्या मागच्या भावनांनी श्रीमंत झालेले क्षण उसवण्याचा धोकाच अधिक असतो.. अर्थात, नातं तेवढं खमकं असेल तर कध्धीच उसवत नाही वगैरे युक्तिवाद मंजूर आहेच. पण त्यांचं खमकेपण आभाराच्या भारापुढे अगदीच कमकुवत असतं असं मला वाटतं!
शुभेच्छा! Happy

are you taking temp. exit from Maabo???? kavita faar emotional vatli... pan changla prayatna.

धन्यवाद सशल.. Happy

प्रतीक, Happy ललित की कविता की मुक्तक हा प्रश्न होताच. पण जे आहे त्यापेक्षा अधिक गद्य लिहायचं नव्हतं आणि पद्य लिहायला जमलं नसतं.. मग जे आहे तसं लिहिलं. आणि ते कुठे पोस्टावं कळेना म्हणुन इथेच टाकलं. माझा हक्काचा विभाग आहे ना हा.. Wink

ललित, खूप खूप आभार.. Happy

सहेलि, Happy

आनंदयात्री, Happy

vinayakparanjpe, नाही हो.. आहे इथेच.. Happy धन्यवाद..!

सुंदर उत्तर ... Happy
आणि पटेल असेही !
तुमचा दृष्टीकोन चांगला वाटला ..
कोण जाणे आपण बदलत गेलोय तसा समोरचा माणुसही बदलत गेला असेल >>> हे कळणे खरेच गरजेचे आहे .. भरपूर लोकांना हे कळत नाही.
पुढील लेखनास शुभेच्छा.

मुक्ता... नावाप्रमाणेच मुक्तपणे स्वत:ला एक्स्प्रेस केलंयस या मुक्तकातून...
झाड ने अगदी माझ्या मनातलं लिहिलंय, हे लेखन वाचताना अगदी तस्संच तस्संच वाटत गेलं.. आणि खाली झाडची प्रतिक्रिया... Happy

आयुष्यात बरीच माणसं येतात अशी ज्यांच्या मधली एखादी गोष्ट खूप भावते.. पण त्या नात्याला नाव नक्की काय द्यावं, असा संभ्रम पडलेल्यांना तुझं हे मुक्तक म्हणजे एक दिलासा ठरेल. Happy

माझ्या आवडत्या १०त... Happy
तु लिहितेस सुंदरच, त्यामुळे पुलेशु!!

Pages