दादाची वासरी

Submitted by मास्तुरे on 11 May, 2011 - 15:12

आम्हाला नुकतीच दादाची गुप्त खाजगी वासरी वाचायला मिळाली. (दादा म्हणजे आपला सौरभदादा हो. आधीच सांगितलेलं बरं नाहीतर कोणाला तरी दादा म्हणजे आपले तरूण, तडफदार, स्पष्टवक्ते, स्वच्छ, कार्यक्षम, प्रामाणिक, महाराष्ट्राचे तारणहार . . . इ. बिरूदे मिरविणारे अजितदादा वाटायचे). आम्ही दादाचे खूप जुने फॅन. त्याची वासरी वाचल्यावर आम्हाला भरून आलं आणि इतरांसमोर त्याची व्यथा मांडलीच पाहिजे असं वाटलं. वाचल्यावर तुम्हाला सुध्दा भरून येईल.

__________________________________________________

सुटलो बुवा एकदाचा. शेवटी एकदाची आयपीएलची मॅच खेळायला मिळाली. आयपीएलचा लिलाव झाल्यापासून माझा डोळ्याला डोळा लागत नव्हता. मी कधीचा गुडघ्याला बाशिंग . . . बाशिंग नाही . . . आपली पॅड्स बांधून बसलो होतो. पण कोणीच मला विकत घेईना. कलकत्त्याची टीम माझ्याशिवाय होणारच नाही अशीच मला खात्री होती. शाहरूख पण म्हणाला होता की याही सीझनला दादाच आमचा कॅप्टन. दादाशिवाय कलकत्त्याची टीम म्हणजे म्हणजे म्हशीशिवाय रेडा. पण झालं भलतंच . . . मला त्या शाहरूखड्यानी विकत घेतलंच नाही. भलतेच कोणीतरी प्लेयर घेतले. आणि हाईट म्हणजे गौतमसारख्या कालच्या पोराला भरपूर पैसे देऊन विकत घेतलं आणि त्याला चक्क कलकत्त्याचा कॅप्टन केलं.

च्यायला . . . मला ३ वर्षांत जेवढे पैशे दिले नाहीत तेवढे एका वर्षात गौतमला . . . हा काय पोरखेळ आहे का मला खिजवायला बघतोय? गेला खड्ड्यात. ह्यानं नाही घेतलं तर इतरांची रांग लागेल मला घ्यायला.

पण इतर टीमनी पण मला घेतलं नाही. मी म्हणे अरोगंट आहे. अरोगन्सी नको दाखवू तर काय लक्ष्मण, सचिनसारखा न बोलता गप्प राहू? मी म्हणे कलकत्त्याच्या टीमला फार पुढं नेलं नाही. नसेल कलकत्ता जिंकले. म्हणून काय झालं? स्टेडियम तर भरलेलं असायचं ना. आणि दिल्ली, पंजाबच्या टीम तरी कुठे पुढे आल्या? हरामखोरांनी अगदी कालच्या फालतू पोरांना देखील भरपूर पैसे देऊन घेतलं आणि माझ्यासारख्या ऑलराउंडरला मात्र हाकललं. तो गिलख्रिस्ट, वॉर्न हे तर माझ्यापेक्षाही वयस्कर. पण त्यांना मात्र डिमांड आणि मला घ्यायला कोणी गिर्‍हाईकच नाही. तसा मी अजून तरूणच आहे. पण मी काही कमी मासे खाल्लेले नाहीत. माझ्या कलकत्त्याच्या फॅननी पहिल्या २-३ मॅचवर बहिष्कार टाकल्यावर त्या शाहड्याचे डोळे उघडले आणि नंतर उपरती झाल्यासारखा मला टीम मॅनेजरचा रोल द्यायला निघाला.

मी का म्हणून मॅनेजर होऊ? वाघ म्हातारा झाला म्हणून काय गवत खातो? मी म्हातारा झालो म्हणून काय मासे सोडून दूधभात खाऊ? आणि मी तर अजून म्हातारा झालेलोच नाही. ३८-३९ वर्षाच्या माणसाला कोणी म्हातारा म्हणतात का? मी मॅनेजर व्हायला साफ नाही म्हटलं. साले सगळेच माझ्याविरूध्द कट करत होते. मी कॅप्टन असताना मुद्दाम घाण खेळून हारले आणि आता मी नसताना मात्र कलकत्तावाले सगळ्या मॅच जिंकताहेत. हा कट नाही तर काय आहे?

काही नाही तर निदान मला कॉमेंट्री तरी करायला मिळाली. पण तिथं रवी शास्त्रीच्या मांडीला मांडी लावून बसताना मला कसंतरीच होत होतं. रव्याच्या बरोबरीने कॉमेंट्रीला बसवून तिथेही माझी हेटाई करायचा ह्या आयपीएलवाल्यांचा कट होता. माझ्या जाहिराती पण बंद झाल्या आता. मला पार अगदी मोडीतच काढला ह्यांनी. निदान आता उशीरा का होईना पण पुण्याच्या टीमनी मला घेतलं आणि मी खेळलेली पहिलीच मॅच आम्ही जिंकलो. हा माझा पायगुण नाही तर दुसरं काय! आम्ही जिंकल्यावर शर्ट काढून गरागरा फिरवायला माझे हात नुसते शिवशिवत होते. पण करणार काय? डोक्यावर हेल्मेट आणि हातात ग्लोव्ह्ज आणि बॅट असल्यामुळे गुंड्या काढून शर्ट काढायला जरा त्रासच झाला असता. आणि डोक्यावर हेल्मेट असताना माझा उघडाबंब अवतार जरा विचित्रच दिसला असता. पुढच्या मॅचला आम्ही चुकूनमाकून जिंकलो तर नक्कीच शर्ट काढीन.

आणि अजून एक बरं झालं. पुण्याची टीम आधीच नॉकआउट होऊन बाहेर पडलेली आहे आणि मी कॅप्टन पण नाही. त्यामुळे माझ्यामुळे हरले असं कुणीच म्हणू शकणार नाही.

मला आयपीएल मध्ये न घेतल्यामुळे बेजान दारूवाला किंवा इतर ज्योतिषांकडे माझ्याबद्दल माझे घरचे विचारायला गेले होते हे बाहेर कसं पसरलं खुदा जाने!

गुलमोहर: 

Happy

काल चांगला खेळला दादा. युवराज, सेहवाग, भज्जी हे खरे त्याचे चेले. काल यातीलच एका चेल्याच्या कप्तानपदाखाली गुरू खेळला. आम्हाला माहीत असलेला दादा २००८ मधे ऑसीज विरूद्ध शतक मारून निवृत्त झाला. हा सगळा आता टाईमपास.

लिखाण चांगलं आहे मास्तुरे...
( मत मतांतरे असायचीच...आपण आपलं विनोदाला दाद द्यावी )

सॉरी मास्तर, पण नाही आवडलं! म्हणजे हे लिखाण विनोदी कॅटॅगरीत बसण्याइतकं विनोदी नाहीये असं मला वाटतं!

I am fan of Dada...he is there to proof himself again, he has done the same in SA, AUS. sometime before....