DARFUR - एक अस्वस्थ करणारा चित्रपट

Submitted by दिनेश. on 11 May, 2011 - 04:32

दारफ़ूर या चित्रपटाने मला खूप अस्वस्थ केले, त्याबद्दल मी इथे लिहिणार आहे, पण भावनाप्रधान (हायपर सेंन्सीटीव्ह) लोकांनी हे वाचू नये, अशी विनंति. तसेच या चित्रपटाबद्दल हि स्पॉयलर वॉर्निंगही..

=========================================

सुदान नावाचा एक देश आफ़्रिकेच्या ईशान्य भागात आहे, याची आपल्याला शालेय भूगोलातून साधारण कल्पना आलेली असते. हा देश येमेनच्या दक्षिणेला, रेड सीच्या काठावर आहे. पण त्यापेक्षा जास्त काही मला तरी माहीत नव्हते.

पुढे कमर्शियल जिओग्राफ़ी शिकताना, पण या देशाचा खास काही उल्लेख वाचण्यात आला नव्हता. पण मस्कतमचे माझा एक सहकारी, आदील एहमद, हा सुदानचा होता. त्याची आणि माझी मैत्री जमली होती. त्याच्याकडून शिकून घेतलेले काही पदार्थही मी इथे लिहिले होते.

या आदिलशी दोस्ती व्हायचे एक कारण म्हणजे त्याला उत्तम मराठी येत असे. तो पुण्याला शिकलेला होता, त्यामूळे त्याला मराठी येत असे.

पण त्यावेळीदेखील एक गोष्ट मी नोंदवली होती, ती म्हणजे स्थानिक ओमानी लोक, हे त्याच्यापेक्षा मला जास्त जवळचा मानत. सुदानची भाषा अरेबिकच. या भाषेमूळे व त्याच्या कायद्याच्या पदवीमूळे तो आमच्या कंपनीत होता, तरीही ही भाषा न येणारा मी, ओमानी लोकांना रफ़िक, म्हणजे दोस्त वाटत असे.

मस्कतमधे सुदानी लोक भरपूर दिसायचे, आणि ते सहज वेगळे ओळखूही यायचे. सुदानी पुरुष, जो पांढरा फ़ेटा बांधतात तो बराचसा आपल्या फ़ेट्यासारखाच असतो. सुदानी बायका, साडीसारखे काहीतरी गुंडाळतात. बुरखा घेत नाहीत पण डोक्यावर पदर असतो. त्यांचे नेसू जरा बेंगरुळ वाटते, कारण त्यांना ते वस्त्र सतत सावरत रहावे लागते. दुसरा एक लक्षात राहण्याजोगा फरक म्हणजे त्यांची उंची. बायकासुद्धा सहा फ़ूटाच्या आसपास उंच असत. रंगाने अर्थातच ते काळे असत. पण तरी त्यांचे डोळे तेजस्वी असत. त्याकाळात इमेल वगैरे नसल्याने. आदिलचा आणि माझा संपर्क राहिला नाही. पण तो स्वत:च्या कुटुंबाबाबर, खार्टूम शहराबाबत कधीच काही बोलत नसे. पुण्याच्या मात्र आठवणी काढत असे.

माझा एक मराठी मित्र मला सांगत असे, कि छत्रपति शिवाजी महाराजांच्या सोबत जे हबशी लोक होते, ते मूळचे सुदानचे. (मला नीट माहित नाही.) आणि आदिलचा उल्लेख, तो हबशी म्हणूनच करत असे. त्या काळात आदीलशी, इस्लाम धर्माबाबत मी बरेच बोलत असे. त्याची काहीकाही मते, मला अजून लक्षात आहेत. त्याला श्रीदेवी खुप आवडायची. तिचे नाच तो तल्लीन होऊन बघायचा. मी त्याला विचारले, कि काय रे, तूमच्याच असे नाचत नाही का ? तर तो म्हणाला होता, कि आमचे नाचणे केवळ आमच्या आनंदासाठीच असते.

पुढे मला अधूनमधून सुदानमधे राहिलेले लोक भेटायचे, पण तिथल्या परिस्थितीबाबत ते फ़ार काही बोलायचे नाहीत.

पुढे इजिप्तायन मधे मी वाचले कि ऐतिहासिक काळात, इजिप्तमधे जो सोन्याचा प्रचंड साठा केला गेला, तो बहुतांशी सुदानमधून लुटून आणला होता. माझ्या केनयन मैत्रिणी मला सांगायच्या कि सुदानी बायका, मेंदी फ़ार छान काढतात. पण त्यांची डीझाईन्स मला आपल्या डीझाइन्सपेक्षा खुपच वेगळी वाटायची. मग तसा सुदान देश विस्मरणातच गेला होता. आणि काल एकदम हा दारफूर नावाचा चित्रपट बघितला. तो बघितल्यावर कालची पूर्ण रात्र मी जागून काढलीय.

दारफूर हे सुदानमधील एक गाव. त्या गावातील घडलेल्या घटनांवर आधारीत हा चित्रपट. या घटना सत्य आहेत, असा दावा लेखक दिग्दर्शक करत नाहीत. त्या सत्य नसाव्यात, असे आपल्यालाही वाटत राहते. पण कधीकाळी सत्य बाहेर आलेच तर ते त्याहून भयाण असण्याची शक्यता आहे.

संपुर्ण सुदान देश हा मुस्लीम धर्म पाळतो. त्यांची भाषा अरेबिकच आहे. इंग्रजीदेखील अनेक जणांना येते. पण त्यांच्यामधे दोन प्रमुख गट आहेत. एक आहे गोर्‍या, देखण्या अरबांचा तर दुसरा काळ्या वर्णांच्या मूळ आफ़्रिकन वंशातील लोकांचा. या दोन गटात प्रचंड तेढ आहे. समान भाषा आणि समान धर्म, त्यांना एकत्र आणू शकत नाही.

त्यांच्यात सतत संघर्ष चालू असतो. यू एन आणि आफ़्रिकन युनियन या दोन्ही संस्था इथे कार्यरत आहेत. पण त्यापैकी कुणालाही यावर तोडगा काढता आलेला नाही. त्या संस्था तसा प्रयत्नही करत नाहीत, असा कयास आहे.

तर हा चित्रपट सुरु होतो, ते तीन पत्रकारांच्या रडण्याने. ते यू एन तर्फ़े आलेले असतात. आणि काल जे काही घडले ते बघून, त्या देशांत त्याना क्षणभर देखील थांबायचे नसते. आणि मग आपल्याला काल काय घडले ते दाखवण्यात येते.

एकंदर सहा पत्रकार त्या देशांत आलेले असतात. त्यापैकी एक स्त्री असते. काही जण मुलाखत घेणार असतात, एक स्टील फ़ोटोग्राफ़ी करणारा, एक मुव्ही कॅमेरावाला. आफ़्रिकन युनियनच्या सहकार्याने त्यांना तिथल्या एका खेड्यातल्या लोकांना भेटायचे असते. त्यांच्यासाठी आणलेली मदत त्यांना द्यायची असते.
आफ़्रिकन युनियनचा नायजेरियन अधिकारी, त्यांना तसे करु नका असे विनवत असतो. पण त्यांचा हट्ट कायम असतो. तो अधिकारी तर त्यांनी तो देश सोडून लवकरात लवकर निघून जावे, असा आग्रह करत असतो.

शेवटी अगदी अनिच्छेने त्यांना एका गावात घेऊन जायचे तो कबूल करतो. पण तिथून तासाभरातच परत निघायचे, हि अट घालतो. त्याला ते पत्रकार तयार होतात. एका विस्तिर्ण निर्जन प्रदेशातून, ए यू च्या गाड्यातून त्यांचा एका खेड्याच्या दिशेने प्रवास सुरु होतो.

वाटेत त्यांना एका खड्ड्यात त्यांना मानवी सांगाड्याचे अवशेष दिसतात. त्यांच्यापैकी एक पत्रकार तिथे थांबायचा आग्रह करतो. तो नायजेरियन अधिकारी, तसे करु नका, म्हणून वारंवार विनंति करतो. पण त्यांच्यापैकी एक पत्रकार रेडीओद्वारे मुख्यालयात रिपोर्ट करतो. त्यामूळे तो नायजेरियन अधिकारी नाईलाजाने तिथे गाड्या थांबवतो.

ती जागा जणू एक सामुदायिक कब्रस्थान असते. एका खोलगट भागात, अनेक मानवी कवट्या आणि हाडे, तूटक्या फ़ुटक्या अवस्थेत दिसतात. त्यातल्या अनेक तर लहान मुलांच्याही असतात. तिथले फ़ोटो घेतले जातात. पण पुढच्या खेड्यात पोहोचायला उशीर होईल, म्हणून ते तिथे न रेंगाळता, पुढे निघतात. बघितलेल्या दृष्यांने ते खुपच डिस्टर्ब झालेले असतात.

मग आपल्याला त्या खेड्यातील काही दृष्ये दिसतात. बायकांची कामे चालू आहेत. लोहार, शिंपी आपल्या जूनाट हत्यारांने काहीबाही काम करताहेत. पुरुषमंडळी गोट्यांचा एक खेळ खेळत आहेत. आणि लहान मूले काहीतरी खेळायचा प्रयत्न करत आहेत. पण त्या गावावर असलेले एक सावटही आपल्याला जाणवत राहते.

दूरवर त्यांच्या गाड्या येताना दिसल्याबरोबर, तिथल्या बायका पटापट मूलांना लपवतात. स्वत:देखील आडोश्याला लपून बसतात. आणि लपायलादेखील धड आडोसा कुठे असतो. कुडाच्या भिंती आणि मातीची घरे. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर प्रचंड दडपण.

गावचा मुख्य आणि काही पुरुष उसन्या अवसानाने त्या सर्वांना सामोरे जातात. तो नायजेरियन अधिकारी, त्यांच्या येण्याचे प्रयोजन सांगतो. गावातले लोक हळु हळु बाहेर येतात. आणलेली मदत त्यांना देण्यात येते. गावचा मुख्य सांगतो तूमचे या खेड्यात स्वागत आहे. कुणाशीही बोला.

ती स्त्री पत्रकार, तिथल्या स्त्रियांशी बोलायचा प्रयत्न करते. अत्यंत दबल्या आवाजात त्या स्त्रीया प्रतिसाद देतात. एक म्हणते कि माझा नवरा, आई वडील, भाऊ सगळेच मारले गेलेत. माझे या जगात कुणीच नाही. दुसरी म्हणते, माझ्यावर बलात्कार करणार्‍याने, आता तूला एड्स देतो, असे सांगत बलात्कार केली. मला एड्स झालाय का ते मला माहित नाही. मी मेले तर ते कळेल.

दुसरी म्हणते ते कधीही येतील आणि आमची मुले पळवतील. त्या मुलांना जबरदस्तीने त्यांच्यासारखे बनवतील. दुसरी म्हणते आम्ही किती काळ जिवंत राहू सांगता येत नाही. ती पत्रकार प्रत्येकीचे सांत्वन करते. त्यांच्या पाठीवरुन मायेचा हात फ़िरवते. त्यातले पुरुष पत्रकार देखील, या कहाण्यांनी रडवेले होतात.

तेवढ्यात त्यांना दूरवर घोड्यावरुन अरब लोक येताना दिसतात. त्या स्त्रियांपैकी एकीचे तान्हे बाळ, ती एका पत्रकाराच्या हातात जबरदस्तीने देते आणि त्याला अमेरिकेत घेऊन जा, असे विनवते. तो नायजेरियन अधिकारी, त्यांना तिथून निघायची विनंती करतो. स्त्री पत्रकार म्हणते, ते तिथे थांबले तर कदाचित गाववाल्यांवर हल्ला होणार नाही. तेवढ्यात ते अरब लोक तिथे हजर होतात. तो नायजेरियन अधिकारी त्यांना सामोरा जातो. आपण कोण, का आलोत हे सांगायचा प्रयत्न करतो. तो अरब
त्याचे काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो. एक पत्रकार त्याची मुलाखत घ्यायचा प्रयत्न करतो, त्यालाही तो अरब तयार होत नाही. त्यांनी पाच मिनिटाच्या आत तिथून निघावे, असे शेवटचे तो सांगतो.

तेवढ्यात त्या टोळीपैकी एकाला, गाडीतल्या तान्ह्या बाळाचे रडणे ऐकू येते. त्याबरोबर तो त्या बाळाला खेचून बाहेर काढतो, आणि जमिनीवर फ़ेकून देतो. ते पत्रकार काहितरी बहाणे करुन, तिथे थांबायचा प्रयत्न करतात. पण तो अरब, त्यांच्यासमोरच एका लहान मूलाला गोळी मारतो. त्या पत्रकारांना तिथून निघून जाणे भाग पडते.

वाटेत त्यांना त्यांच्या मागे काय चालले असेल, याची दृष्ये डोळ्यासमोर दिसू लागतात. त्यापैकी ज्याच्याकडे त्या बाईने बाळ दिलेले असते तो भयंकर अस्वस्थ होतो (ते बाळ तो आणू शकलेला नसतो.) गाडी थांबवायला तो भाग पाडतो. मला परत तिथे जायचेच असा हट्ट करतो, तो अधिकारी आणि बाकीचे पत्रकार त्याला विरोध करतात.

तो त्या अधिकार्‍याकडे शस्त्राची मागणी करतो, नव्हे त्याची बंदुक हिसकावूनच घेतो. आणि पायीपायीच त्या गावाकडे निघतो. मग दुसर्‍या एका पत्रकारालाही राहवत नाही, आणि तोही त्याच्यामागे निघतो. शेवटी तो अधिकारीही गाडी घेऊन त्यांच्यासोबत जायला निघतो. बाकिचे पत्रकार मात्र तिथे जात नाहीत.

लपून छपून ते त्या गावात शिरतात. गावात हिंसाचाराचे थैमान चाललेले असते. इथे हिंसाचार दाखवताना, दिग्दर्शकाने तूमच्या कल्पनाशक्तीला अजिबातच त्रास दिलेला नाही. कदाचित तूम्ही कल्पनाही करु शकणार नाही असा पराकोटीचा हिंसाचार त्याने तूमच्या तोंडावर फ़ेकलाय.

बलात्कार दाखवताना, स्त्री शरीर न दाखवताही त्याने तो इतक्या भयानक रितीने चित्रीत केलाय, कि तूम्हाला स्वत:चीच चीड येते. त्या स्त्रीचा, विव्हळ चेहरा, अस्फ़ुट किंकाळ्या आणि कॅमेराची जोरकस मागेपुढे हालचाल याचा एकत्र परिणाम इतका भयंकर आहे, कि आपणच पाशवी बलात्कार करत असल्याची भावना मनात निर्माण होते.

या थैमानात, ते दोघे पत्रकार किती पुरेसे पडणार ? तरीही ते शर्थीने तो रोखण्याचा प्रयत्न करतात. आपण मारलेल्या अरबाचे, शस्त्र घेऊन ते चालवावे एवढेही भान त्यांना नसते. तो अधिकारी मारला जातोच. तरीही तो पत्रकार ते तान्हे बाळ ताब्यात घेतो.

पण त्याच्याकडच्या गोळ्या संपल्याने तो घायाळ होतो. दुसरा पत्रकार ते बाळ घेऊन पळण्याचा प्रयत्न करतो तर त्यालाही घायाळ केले जाते.

आपल्या छातीखाली रेतीत खड्डा करुन त्यात तो त्या बाळाला ठेवतो, आणि त्यावर पालथा पडतो. आणि अर्थातच गोळीला बळी पडतो. पहिल्या घायाळ पत्रकाराला अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात येते, पण त्या आधी गोर्‍या लोकांनी भूतकाळात केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला जातो. या हिंसाचारातूनही वाचलेल्या लहान मूलांना एका झोपडीत कोंडण्यात येते. आणि लुटारुंपैकी एका काळ्या माणसालाच. त्या झोपडीला आग लावण्यास भाग पाडण्यात येते. तो बिचारा विचारतो, कि हे केलेच पाहिजे का, तर त्याला उत्तर मिळते, आज त्यांना जिवंत ठेवले तर उद्या तूझा सूड घेतला जाईल.

गावात पिण्याच्या पाण्याची एकमेव विहिर असते. कदाचित गाव वसण्याचे तिच कारण असेल. तिच्यात प्रेते टाकून, गाव परत कधीही वसणार नाही, याची सोय केली जाते.

बाकीचे पत्रकार अत्यंत व्याकूळ झालेले असतात. त्या स्त्री पत्रकाराला तर रहावत नाही. ती परत त्या गावात येते. गावात प्रेताशिवाय काहीच नसते. प्रेतांवरसुद्धा वार केलेले असतात. काही तासांपुर्वीच ज्यांचे सांत्वन केले होते, त्या सर्व स्त्रीया मृत होऊन पडलेल्या असतात. ती अनेक प्रेतांजवळ जाऊन बघते, कुणीच जिवंत नसते. पण तिच्या सहकार्‍याच्या प्रेताखाली ते तान्हे बाळ जिवंत असते. त्याला
जवळ घेऊन ती निघते. तिचा काळा ड्रायव्हर त्या बाळाला, आपल्याकडचे पाणी पाजतो. इथे चित्रपट संपतो.

मग आपल्याला कळते कि अशा रितीने शेकडो, हजारो नव्हे तर तब्बल चार लाख सुदानी लोकांची हत्या झाली आहे. हा आकडा २ वर्षांपुर्वीचा आहे.

आपण आजवरही ते थांबवू शकलेलो नाही.
---------------------------------------------------------------------------------
हा चित्रपट बघून मी प्रचंड अस्वस्थ झालो आहे. कालची पूर्ण रात्र मी जागून काढलीय.

नेटवर वाचताना या चित्रपटाबद्दल आणखी कळले ते म्हणजे. हा चित्रपट सुदानमधे चित्रीत न करता, केप टाऊनमधे चित्रीत केलाय.

त्या गावचा सेट उभारताना, त्या गावातीलच एका निर्वासिताला बोलावण्यात आले होते आणि त्याला त्याच्या भावना आवरणे कठीण झाले. एका मुस्लीम व्यापार्‍याच्या भुमिकेत असणार्‍या व्यक्तीचे कुटुंबीय, असेच मारण्यात आले होते.

सुदानी लोकांच्या भुमिका दक्षिण आफ़्रिकेतील, सुदानी निर्वासितांनीच केल्या आहेत.

आणि या चित्रपटाचे संवादच लिहिण्यात आलेले नव्हते, कलाकारांना ऐनवेळी जे सूचले, तेच संवाद ते बोलले आहेत.

---------------------------------------------------------------------

हिंदी काय किंवा इंग्रजी काय. चित्रपटातील हिंसाचार मला नवीन नाही. तो बघायला आवडतो असे नाही, पण तो बघताना कायम एक भावना मनात असते कि हे सगळे खोटे आहे. कॅमेराची करामत आहे. किल बील मधला प्रचंड हिंसाचार तर विनोदी वाटतो.

शिंडलर्स लिस्ट मधला हिंसाचार बराच सौम्य आहे तर हॉटेल रवांडा मधे तर तो टाळलाच आहे.
पण हा चित्रपटातला हिंसाचार (असाच लेबनॉन या चित्रपटातला ) अंगावर येतो असे लिहिणे पण सौम्य ठरेल.

माझ्यासारख्या माणसांवर इतका परिणाम करणारा चित्रपट कदाचित सुदानमधल्या अरबांना करमणुक करणारा वाटू शकेल.

माणसांचा एक गट, दुसर्‍या गटाचा इतका कमालीचा दुस्वास करु शकतो, हे मला कधी पटतच नाही. ते तूमच्यापासून वेगळे पाडणारे काय घटक असतात, ते मला कळत नाही.

अगदी लहानपणापासून माझे मन असे घडले आहे. कंसाने देवकीच्या मूलांचा घेतलेला बळी हे मला ना कधी गोष्ट म्हणून आवडले ना त्याचे चित्रपटातले दृष्यरुप बघायला आवडले.

एका गणेशोत्सवात, लालबागच्या एका मंडळाने जरासंधाच्या वधाचा देखावा उभा केला होता. त्याची फ़ोडलेली मांडी, आणि त्या रक्ताने भीम द्रौपदीची वेणी घालतो आहे, असा देखावा होता. तो क्षणभरदेखील मी बघू शकलो नाही.

आम्हाला विद्याधर पुंडलिकांची, "चक्र" हि एकांकीका अभ्यासाला होतॊ. तिच्यात द्रौपदीच्या तोंडी अशी वाक्ये आहेत. कि संपुर्ण महाभारत ही एक सुडाची कहाणी आहे.

मयसभेतील फ़जितीला द्रौपदी हसली म्हणून तिचा सूड, भरसभेत तिची विटंबना झाली म्हणून पांडवानी घेतलेला सुड, मग तिची मूले मारली म्हणून तिने अश्वथाम्याचा खेचून काढायला लावलेला मणि... त्या काल्पनिक एकांकीकेत ती अश्वथाम्याच्या जखमेत तेल घालते, असा शेवट होता. खरेच जर महाभारत असे घडते, तर बुद्धाला जन्म घ्यावा लागला नसता.

पण त्याने जन्म घेऊनदेखील, आम्ही होतो तिथेच आहोत.
---------------------------------------

हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला असण्याची शक्यता कमीच आहे. तो सीडिवर उपलब्ध असेल, याचीची शक्यता कमी आहे. आणि असला तरी बघायचा सल्ला मी देणार नाही.

गुलमोहर: 

असावे. आता तिचे नाव गुगलुन पाहिले तेव्हा हे सापडले. -

http://en.wikipedia.org/wiki/Waris_Dirie

तिच्या नावाचा अर्थ desert flower आहे Happy एडेनियम पाहिले की मला डेझर्ट फ्लॉवर आठवते नी मग वारिसही आठवते.

मी कित्येक लेख वाचुन विसरुनही गेले पण वारिसला कधीही विसरु शकले नाही आणि विसरणे शक्यही नाही. तिच्यासारख्या हजारो बायका काय भयाण आयुष्य जगताहेत हा विचार मनात आला की डोळ्यात पाणी जमा व्हायला लागते.
>>>
अगदी खरय.. प्रचंड परिणामकारक लेख होता तो.. माझ्या आठवणीप्रमाणे डायजेस्टच्या बूक सेक्शनमध्ये शेवटी जवळपास २५ एक पानांचा लेख होता हा..

साधना अगदी अगदी. मी पण ते वाचले होते.

रच्याकने:
ते बुक सेक्षन चांगले असायचे आरडीचे. जुने आरडी फार मस्त होते. आतात्यात दम नाही. तेव्हा मी रद्दी दुकानातून ५० मासिके आणून वाचली आहेत.

मुळात इथल्या स्त्रीयांना आपल्यावर अन्याय होतोय याचीच कल्पना नाही. (हे मी आधी लिहिले होते.)
इथल्या समाजव्यवस्थेत, वेश्या हि सर्वात वरच्या स्थानावर असते. कारण ती आकर्षक असून अनेक पुरुषांना आकर्षित करु शकते. कॉनक्यूबाईन हि त्यापेक्षा खालच्या दर्ज्याची, कारण ती लग्न झालेल्या पुरुषाला आकर्षित करु शकते. केनयाच्या शाळेत, कॉनक्यूबाईन नावाचे पुस्तक अभ्यासाला आहे.
एकाच पुरुषाशी निष्ठावान राहणारी पत्नी हि सर्वात खालच्या स्तरावर असते.

मूळ मुद्द्याकडे परत येताना, इथल्या लोकांनी हे आपले प्राक्तन असा समज करुन घेतला आहे. (वरच्या सिनेमात, गावातील लोक क्षीणसाही प्रतिकार करत नाहीत. आणि त्या अरब आणि पत्रकारात बाचाबाची होत असताना, जेव्हा ती स्त्री पत्रकार काही बोलू बघते, त्यावर दोन पुरुष बोलत असताना, स्त्रीने मधे बोलायचे नसते, हे तिला माहित नाही का, असे तो अरब विचारतो. ) आणि या सर्वातून कधी ना कधी, जिझस येऊन आपली सुटका करणार आहे, यावरही त्यांचा ठाम विश्वास आहे.

जगातील सर्वात मोठे चर्च, कॅननलँड हे नायजेरियात आहे. तिथल्या रस्त्यावर सार्वजनिक वाहनांची बोंब असताना, या चर्चकडे २,५०० अद्यावत बसेस आहेत. त्या भरभरुन भक्तगणांना दर रविवारी तिथे आणले जाते.

दिनेश तू या परिस्थितीवर एक लेखमाला लिही. त्याची गरज आहे. वरील सामाजिक परिस्थितीमुळेच सिंगल मदर्स हा जगातील सर्वात मोठा असहाय व गरीब वर्ग आहे अशी अवस्था आहे.

त्यावर दोन पुरुष बोलत असताना, स्त्रीने मधे बोलायचे नसते, हे तिला माहित नाही का, असे तो अरब विचारतो>> मला जर असे कोणी म्हटले तर फार राग येइल. व अपमान वाटेल.

दिनेश ही जरा सर्वच जास्त जनरलाइझ उदाहरणे होत आहेत.. मुळात टोगो, गिनी, सिएरा लिओन इथे घडणार्‍या गोष्टी, धर्म ते इजिप्त,सिरीया, लिबिया इथली परिस्थिती, ते नायजेरिया/केनिया, चाड, CAR इथले वास्तव, दक्षिण भागातला आफ्रिका हे सर्व वेगळे आहे..

>> या सर्वातून कधी ना कधी, जिझस येऊन आपली सुटका करणार आहे, यावरही त्यांचा ठाम विश्वास आहे.<<

इतका गंभिर विषय असूनही हे वाक्य वाचून हसू आले. अजूनही ते याच समजात आहेत Sad

दारफोर/ दारफुर मध्ये अजूनही हा प्रकार सुरू आहे का?

टण्या, इथे प्रत्येक देशाची परिस्थिती वेगळी आहे हे खरे आहे. मी केनया / नायजेरियाच्या संबंधातच लिहिले आहे. पण तरीही माध्यमात दिसणारे चित्र (काहि सन्माननीय अपवाद वगळता ) वास्तवापेक्षा वेगळे असण्याचीच शक्यता जास्त आहे.

अश्विनी, अगदी हेच वाक्य, माझ्या हरयानवी मित्राने, त्याच्या वधूबद्दलच्या अपेक्षा सांगताना उच्चारले होते. माझ्या परिचयातल्या, कुठल्याही मूलीला मी तूझ्याशी लग्न करु देणार नाही. असे मी त्याला सांगितले होते.
पण त्याला तशी मुलगी मिळेलच म्हणा.

अमि, पॅस्टर हा या नायजेरियातला सर्वात मोठा व्यवसाय आहे. आमच्या चर्चमधे आलात तर जिझस लवकर येईल, अशा आशयाच्या जाहिराती / बोर्ड नायजेरियात सर्रास दिसतात. रविवारी सकाळच्या वेळी चर्चमधे जाणे, किंवा मोकळ्या मैदानात जिझसची गाणी म्हणत, बेभान होऊन नाचणे, हे केनयात काय आणि नायजेरियात काय, अगदी कॉमन आहे. मी बाकी कुठल्याही विषयावर त्यांची मस्करी करू शकतो, पण हा विषय माझ्यासाठी तबू आहे.

बापरे भयानक आहे हे ,
गावच्या जत्रा नवसाचा बोकड कापला पण ते बोकड कापतांना त्याचे चार पाय मला धरायाला सांगीतले करीम चिच्याने कसले मंत्र पुटपुटन बोकडाच्या मानेला सुरी लावली ते बिचारे निरागस बोकड बे , बे , ओरड होते , रक्ता च्या चिळकांड्या उडुन माझ्या अंगावर आल्या मी पाय सोडले , तर करीम चिच्या क्या लक्ष्या सिटी मे रहके तेरे ताकत नही रही अन फिदी फिदी हासायला लागला .
अन्याय , बलत्कार , हिंसा , अत्याचार , ही ताकतवर माणवाकडुन , प्राण्याकडुन दुरबला वर होते म्हणुन
मला नेहमी एकच वाक्य आवडते " जुल्म करणे वालोसे , जुल्म सहने वाला ज्यादा गुन्हगार होता है "

दारफुर वर NBC च्या अ‍ॅन करीची न्युज स्टोरी बघितली तेव्हा हे किती भयानक आहे ते जाणवले. ही स्टोरी http://www.hulu.com/watch/5133/nbc-news-specials-crisis-in-darfur-with-a... इथे आहे.

watched The Dessert Flower on youtube...great movie...superb acting.. last 10 mins of movie.. I cried a lot.. i m still shivering...

काल टाइम्स मध्ये वाचलं एक तासात ४८ बायकांवर बलात्कार होतो कांगोत. काय करता येइल? पहिले हा एक ह्युमन अब्युज प्रश्न म्हणून त्याला चव्हाट्यावर तरी आणले पाहिजे. बाईची मनःस्थिती, आरोग्य,
इच्छा वगैरे दूरचे, हा तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. तितकाच धोका लहान मुलग्यांनाही आहे. ही अ‍ॅटेक करण्याची मेंटॅलिटि कुठून येते? असे तर प्राणी देखील वागत नाहीत.

असे तर प्राणी देखील वागत नाहीत

अश्विनी कृपया पक्ष्या नी प्राण्यांशी माणसांची तुलना करु नकोस. ती पृथ्वीवरची सभ्य मंडळी आहेत. माणसे ही वेगळीच जमात आहे.

तेच तर साधना, अश्या व्रूत्तीचे काय करायचे? त्या बायका मुले कसे सामोरे जात असतील नाही का?
सलग अत्याचार सोसणे शक्य नाही.

काही पक्ष्यांमधे ही बलात्काराची प्रवृत्ती दिसते (संदर्भ. मीना प्रभू ) पण तो वेगळा विषय आहे.
इथल्या मिडीयामधे स्थानिक बातम्या (निदान त्या देशातल्या, त्या देशात तरी ) येतच नाहीत. गेल्या महिन्यात निवड्णुकीत झालेला हिंसाचारामूळे, नायजेरियात ५०० माणसे मारली गेली. पण त्याची कल्पनाही माझ्या तिथल्या मित्रांना नव्हती.
केनयातल्या पेपरमधेही विच डॉक्टर (मांत्रिक), जादूटोणा यांच्याच बातम्या जास्त असतात. भारतीय बुवांच्या जाहीराती (काळी जादू उतरवणे, धंदा, बायको...... वगैरे ) रेडीओवर, पेपरमधे भरपूर असतात.
इथल्या एफ एम वर, अगदी पूजा बेदीच्याही वाढदिवसाची दखल घेतली जाते. पण या खंडातल्या बातम्या, अगदी त्रोटक असतात. बीबीसी तर्फे काही वैचारीक मासिके प्रसिद्ध होतात, पण ती फारच कमी लोक वाचतात.
इथे अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहे, पण हा सगळा व्याप त्यांचाही आवाक्याबाहेरचा आहे. सामाजिक चळवळी इथे अगदी अभावानेच दिसतात.
बाहेरील जगातील मिडीयात, इथल्या घडामोडींचे क्वचितच प्रतिबिंब पडत असावे. उदा. गेल्या महिन्यात टांझानियात एका वैदूने, एड्स, कॅन्सर, डायबेटीस वर हमखास उपाय मिळाल्याचा दावा केला होता. एका झाडाच्या मूळीचा एक कपभर काढा प्यायल्याने हे रोग समूळ नष्ट होतात, असे तो सांगत असे. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्याने या उपचारानंतर केलेल्या वैद्यकीय तपासणीचे पण दाखले दिले होते. अर्थात तिथे भली मोठी रांग लागली होती. लोक ५/५ दिवस रांगेत उभे रहात असत. गाड्यांची देखील रिघ लागली होती. आठवडाभर इथल्या टीव्हीवर सतत तेच दाखवत होते. त्या रांगेत उपचाराला उशीर झाल्याने काही रोगी दगावल्याच्याही बातम्या आल्या. मग सरकारने त्याच्यावर बंदी आणली. तिथे जाण्याचा मार्ग अतिशय दुर्गम भागातून जात होता...
यापैकी काहीही तूम्हाला वाचायला मिळाले नसेल. हो ना ?

नाही, वाचायला असले काहीच नाही मिळाले. आम्ही सध्या कान्सला रेड कार्पेटवर कोण काय घालुन बागडतेय ते वाचतोय Proud

मात्र आजच्या पेपरात एका बंगाली बाबाला मुंबई पोलिसांनी आत केल्याचे वृत्त आलेय. २६ वर्षांचा तो भोंदुबाबा इतके कमावत होता की दर महिन्याला केबलवाल्याला रु १ लाख फक्त जाहिरातीसाठी देणे त्याला परवडत होते. त्याच्या पॉश ऑफिसाचे भाडे वेगळेच. महिन्याला रु २ लाख खर्च करत होता तो, यावरुन त्याची कमाई किती त्याचा अंदाज येईल. दिवसाला १२-१५ गि-हाईके, त्यांना महिनाभरात रु २०हजार पर्यंत लुटायचा. त्याने म्हणे अजमेरला 'लोकांना कसे फसवायचे' याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले होते. सांताक्रुझसारख्या जरा ब-यापैकी भागात जर त्याला दिवसाला १०-१५ बकरे मिळत होते तर मुंब्रा-कळवा इथे गेला असता तर काय झाले असते? आणि नायजेरीयात गेला असता तर आतापर्यंत फोर्ब्सच्या top 10 richest people in the world मध्ये पहिल्या नंबरवर पोचला असता.

डेझर्ट फ्लावर वाचल्यावर आठवडाभर काही सुचत नव्हतं. आपल्याइतक्या लहानच खरंतर मुलींचं आयुष्य असं ही असतं ही जाणीवच भयंकर होती.
मुळात एक माणुस दुसर्‍या माणसाशी इतकं भयंकर कसं वागु शकतो? अशानं नक्की काय मिळत असेल? काय लिहावं हेपण सुचेनासं झालय मला. Sad

महिन्याला रु २ लाख खर्च करत होता तो, यावरुन त्याची कमाई किती त्याचा अंदाज येईल. दिवसाला १२-१५ गि-हाईके, त्यांना महिनाभरात रु २०हजार पर्यंत लुटायचा.
साधना,
अगदी चांगले शिकलेले लोक देखील अशा भोंदु लोकांच्यावर विश्वास ठेवतात आणि फसतात.
मला दिवसाला १२-१५ नको, फक्त २-३ जरी असे बकरे मिळत असतील तर नोकरी करायची गरज नाही.

चित्रपट आणि त्यावरची चर्चा वाचून सुन्न झाले आहे. City of God या महाभयानक चित्रपटाची आठवण झाली. यात मुलाच्या पायाला मारलेल्या गोळीचे चित्रण पाहून तर कित्येक दिवस अस्वस्थ होते. काळ्या (सो कॉल्ड निग्रो) लोकांचे, विशेषतः स्त्रीयांचे जीवन फारच वाईट... आपल्याच लोकांकडून त्यांना भयानक त्रास होतोच... पण बाहेरही त्यांना वांशिक अत्याचाराला सामोरे जावे लागते. त्यांच्यावर होणार्‍या पराकोटीच्या अन्यायाचे वर्णन करणार्‍या मरियम मकेबा चे 'काळे गाणे' हे मराठी अनुवादीत आत्मचरित्र वाचून अशीच प्रचंड अस्वस्थ झाले होते... कधीही हे पुस्तक मला अचानक आठवते आणि गलबलून येत असते. Sad

Pages