दारफ़ूर या चित्रपटाने मला खूप अस्वस्थ केले, त्याबद्दल मी इथे लिहिणार आहे, पण भावनाप्रधान (हायपर सेंन्सीटीव्ह) लोकांनी हे वाचू नये, अशी विनंति. तसेच या चित्रपटाबद्दल हि स्पॉयलर वॉर्निंगही..
=========================================
सुदान नावाचा एक देश आफ़्रिकेच्या ईशान्य भागात आहे, याची आपल्याला शालेय भूगोलातून साधारण कल्पना आलेली असते. हा देश येमेनच्या दक्षिणेला, रेड सीच्या काठावर आहे. पण त्यापेक्षा जास्त काही मला तरी माहीत नव्हते.
पुढे कमर्शियल जिओग्राफ़ी शिकताना, पण या देशाचा खास काही उल्लेख वाचण्यात आला नव्हता. पण मस्कतमचे माझा एक सहकारी, आदील एहमद, हा सुदानचा होता. त्याची आणि माझी मैत्री जमली होती. त्याच्याकडून शिकून घेतलेले काही पदार्थही मी इथे लिहिले होते.
या आदिलशी दोस्ती व्हायचे एक कारण म्हणजे त्याला उत्तम मराठी येत असे. तो पुण्याला शिकलेला होता, त्यामूळे त्याला मराठी येत असे.
पण त्यावेळीदेखील एक गोष्ट मी नोंदवली होती, ती म्हणजे स्थानिक ओमानी लोक, हे त्याच्यापेक्षा मला जास्त जवळचा मानत. सुदानची भाषा अरेबिकच. या भाषेमूळे व त्याच्या कायद्याच्या पदवीमूळे तो आमच्या कंपनीत होता, तरीही ही भाषा न येणारा मी, ओमानी लोकांना रफ़िक, म्हणजे दोस्त वाटत असे.
मस्कतमधे सुदानी लोक भरपूर दिसायचे, आणि ते सहज वेगळे ओळखूही यायचे. सुदानी पुरुष, जो पांढरा फ़ेटा बांधतात तो बराचसा आपल्या फ़ेट्यासारखाच असतो. सुदानी बायका, साडीसारखे काहीतरी गुंडाळतात. बुरखा घेत नाहीत पण डोक्यावर पदर असतो. त्यांचे नेसू जरा बेंगरुळ वाटते, कारण त्यांना ते वस्त्र सतत सावरत रहावे लागते. दुसरा एक लक्षात राहण्याजोगा फरक म्हणजे त्यांची उंची. बायकासुद्धा सहा फ़ूटाच्या आसपास उंच असत. रंगाने अर्थातच ते काळे असत. पण तरी त्यांचे डोळे तेजस्वी असत. त्याकाळात इमेल वगैरे नसल्याने. आदिलचा आणि माझा संपर्क राहिला नाही. पण तो स्वत:च्या कुटुंबाबाबर, खार्टूम शहराबाबत कधीच काही बोलत नसे. पुण्याच्या मात्र आठवणी काढत असे.
माझा एक मराठी मित्र मला सांगत असे, कि छत्रपति शिवाजी महाराजांच्या सोबत जे हबशी लोक होते, ते मूळचे सुदानचे. (मला नीट माहित नाही.) आणि आदिलचा उल्लेख, तो हबशी म्हणूनच करत असे. त्या काळात आदीलशी, इस्लाम धर्माबाबत मी बरेच बोलत असे. त्याची काहीकाही मते, मला अजून लक्षात आहेत. त्याला श्रीदेवी खुप आवडायची. तिचे नाच तो तल्लीन होऊन बघायचा. मी त्याला विचारले, कि काय रे, तूमच्याच असे नाचत नाही का ? तर तो म्हणाला होता, कि आमचे नाचणे केवळ आमच्या आनंदासाठीच असते.
पुढे मला अधूनमधून सुदानमधे राहिलेले लोक भेटायचे, पण तिथल्या परिस्थितीबाबत ते फ़ार काही बोलायचे नाहीत.
पुढे इजिप्तायन मधे मी वाचले कि ऐतिहासिक काळात, इजिप्तमधे जो सोन्याचा प्रचंड साठा केला गेला, तो बहुतांशी सुदानमधून लुटून आणला होता. माझ्या केनयन मैत्रिणी मला सांगायच्या कि सुदानी बायका, मेंदी फ़ार छान काढतात. पण त्यांची डीझाईन्स मला आपल्या डीझाइन्सपेक्षा खुपच वेगळी वाटायची. मग तसा सुदान देश विस्मरणातच गेला होता. आणि काल एकदम हा दारफूर नावाचा चित्रपट बघितला. तो बघितल्यावर कालची पूर्ण रात्र मी जागून काढलीय.
दारफूर हे सुदानमधील एक गाव. त्या गावातील घडलेल्या घटनांवर आधारीत हा चित्रपट. या घटना सत्य आहेत, असा दावा लेखक दिग्दर्शक करत नाहीत. त्या सत्य नसाव्यात, असे आपल्यालाही वाटत राहते. पण कधीकाळी सत्य बाहेर आलेच तर ते त्याहून भयाण असण्याची शक्यता आहे.
संपुर्ण सुदान देश हा मुस्लीम धर्म पाळतो. त्यांची भाषा अरेबिकच आहे. इंग्रजीदेखील अनेक जणांना येते. पण त्यांच्यामधे दोन प्रमुख गट आहेत. एक आहे गोर्या, देखण्या अरबांचा तर दुसरा काळ्या वर्णांच्या मूळ आफ़्रिकन वंशातील लोकांचा. या दोन गटात प्रचंड तेढ आहे. समान भाषा आणि समान धर्म, त्यांना एकत्र आणू शकत नाही.
त्यांच्यात सतत संघर्ष चालू असतो. यू एन आणि आफ़्रिकन युनियन या दोन्ही संस्था इथे कार्यरत आहेत. पण त्यापैकी कुणालाही यावर तोडगा काढता आलेला नाही. त्या संस्था तसा प्रयत्नही करत नाहीत, असा कयास आहे.
तर हा चित्रपट सुरु होतो, ते तीन पत्रकारांच्या रडण्याने. ते यू एन तर्फ़े आलेले असतात. आणि काल जे काही घडले ते बघून, त्या देशांत त्याना क्षणभर देखील थांबायचे नसते. आणि मग आपल्याला काल काय घडले ते दाखवण्यात येते.
एकंदर सहा पत्रकार त्या देशांत आलेले असतात. त्यापैकी एक स्त्री असते. काही जण मुलाखत घेणार असतात, एक स्टील फ़ोटोग्राफ़ी करणारा, एक मुव्ही कॅमेरावाला. आफ़्रिकन युनियनच्या सहकार्याने त्यांना तिथल्या एका खेड्यातल्या लोकांना भेटायचे असते. त्यांच्यासाठी आणलेली मदत त्यांना द्यायची असते.
आफ़्रिकन युनियनचा नायजेरियन अधिकारी, त्यांना तसे करु नका असे विनवत असतो. पण त्यांचा हट्ट कायम असतो. तो अधिकारी तर त्यांनी तो देश सोडून लवकरात लवकर निघून जावे, असा आग्रह करत असतो.
शेवटी अगदी अनिच्छेने त्यांना एका गावात घेऊन जायचे तो कबूल करतो. पण तिथून तासाभरातच परत निघायचे, हि अट घालतो. त्याला ते पत्रकार तयार होतात. एका विस्तिर्ण निर्जन प्रदेशातून, ए यू च्या गाड्यातून त्यांचा एका खेड्याच्या दिशेने प्रवास सुरु होतो.
वाटेत त्यांना एका खड्ड्यात त्यांना मानवी सांगाड्याचे अवशेष दिसतात. त्यांच्यापैकी एक पत्रकार तिथे थांबायचा आग्रह करतो. तो नायजेरियन अधिकारी, तसे करु नका, म्हणून वारंवार विनंति करतो. पण त्यांच्यापैकी एक पत्रकार रेडीओद्वारे मुख्यालयात रिपोर्ट करतो. त्यामूळे तो नायजेरियन अधिकारी नाईलाजाने तिथे गाड्या थांबवतो.
ती जागा जणू एक सामुदायिक कब्रस्थान असते. एका खोलगट भागात, अनेक मानवी कवट्या आणि हाडे, तूटक्या फ़ुटक्या अवस्थेत दिसतात. त्यातल्या अनेक तर लहान मुलांच्याही असतात. तिथले फ़ोटो घेतले जातात. पण पुढच्या खेड्यात पोहोचायला उशीर होईल, म्हणून ते तिथे न रेंगाळता, पुढे निघतात. बघितलेल्या दृष्यांने ते खुपच डिस्टर्ब झालेले असतात.
मग आपल्याला त्या खेड्यातील काही दृष्ये दिसतात. बायकांची कामे चालू आहेत. लोहार, शिंपी आपल्या जूनाट हत्यारांने काहीबाही काम करताहेत. पुरुषमंडळी गोट्यांचा एक खेळ खेळत आहेत. आणि लहान मूले काहीतरी खेळायचा प्रयत्न करत आहेत. पण त्या गावावर असलेले एक सावटही आपल्याला जाणवत राहते.
दूरवर त्यांच्या गाड्या येताना दिसल्याबरोबर, तिथल्या बायका पटापट मूलांना लपवतात. स्वत:देखील आडोश्याला लपून बसतात. आणि लपायलादेखील धड आडोसा कुठे असतो. कुडाच्या भिंती आणि मातीची घरे. प्रत्येकाच्या चेहर्यावर प्रचंड दडपण.
गावचा मुख्य आणि काही पुरुष उसन्या अवसानाने त्या सर्वांना सामोरे जातात. तो नायजेरियन अधिकारी, त्यांच्या येण्याचे प्रयोजन सांगतो. गावातले लोक हळु हळु बाहेर येतात. आणलेली मदत त्यांना देण्यात येते. गावचा मुख्य सांगतो तूमचे या खेड्यात स्वागत आहे. कुणाशीही बोला.
ती स्त्री पत्रकार, तिथल्या स्त्रियांशी बोलायचा प्रयत्न करते. अत्यंत दबल्या आवाजात त्या स्त्रीया प्रतिसाद देतात. एक म्हणते कि माझा नवरा, आई वडील, भाऊ सगळेच मारले गेलेत. माझे या जगात कुणीच नाही. दुसरी म्हणते, माझ्यावर बलात्कार करणार्याने, आता तूला एड्स देतो, असे सांगत बलात्कार केली. मला एड्स झालाय का ते मला माहित नाही. मी मेले तर ते कळेल.
दुसरी म्हणते ते कधीही येतील आणि आमची मुले पळवतील. त्या मुलांना जबरदस्तीने त्यांच्यासारखे बनवतील. दुसरी म्हणते आम्ही किती काळ जिवंत राहू सांगता येत नाही. ती पत्रकार प्रत्येकीचे सांत्वन करते. त्यांच्या पाठीवरुन मायेचा हात फ़िरवते. त्यातले पुरुष पत्रकार देखील, या कहाण्यांनी रडवेले होतात.
तेवढ्यात त्यांना दूरवर घोड्यावरुन अरब लोक येताना दिसतात. त्या स्त्रियांपैकी एकीचे तान्हे बाळ, ती एका पत्रकाराच्या हातात जबरदस्तीने देते आणि त्याला अमेरिकेत घेऊन जा, असे विनवते. तो नायजेरियन अधिकारी, त्यांना तिथून निघायची विनंती करतो. स्त्री पत्रकार म्हणते, ते तिथे थांबले तर कदाचित गाववाल्यांवर हल्ला होणार नाही. तेवढ्यात ते अरब लोक तिथे हजर होतात. तो नायजेरियन अधिकारी त्यांना सामोरा जातो. आपण कोण, का आलोत हे सांगायचा प्रयत्न करतो. तो अरब
त्याचे काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो. एक पत्रकार त्याची मुलाखत घ्यायचा प्रयत्न करतो, त्यालाही तो अरब तयार होत नाही. त्यांनी पाच मिनिटाच्या आत तिथून निघावे, असे शेवटचे तो सांगतो.
तेवढ्यात त्या टोळीपैकी एकाला, गाडीतल्या तान्ह्या बाळाचे रडणे ऐकू येते. त्याबरोबर तो त्या बाळाला खेचून बाहेर काढतो, आणि जमिनीवर फ़ेकून देतो. ते पत्रकार काहितरी बहाणे करुन, तिथे थांबायचा प्रयत्न करतात. पण तो अरब, त्यांच्यासमोरच एका लहान मूलाला गोळी मारतो. त्या पत्रकारांना तिथून निघून जाणे भाग पडते.
वाटेत त्यांना त्यांच्या मागे काय चालले असेल, याची दृष्ये डोळ्यासमोर दिसू लागतात. त्यापैकी ज्याच्याकडे त्या बाईने बाळ दिलेले असते तो भयंकर अस्वस्थ होतो (ते बाळ तो आणू शकलेला नसतो.) गाडी थांबवायला तो भाग पाडतो. मला परत तिथे जायचेच असा हट्ट करतो, तो अधिकारी आणि बाकीचे पत्रकार त्याला विरोध करतात.
तो त्या अधिकार्याकडे शस्त्राची मागणी करतो, नव्हे त्याची बंदुक हिसकावूनच घेतो. आणि पायीपायीच त्या गावाकडे निघतो. मग दुसर्या एका पत्रकारालाही राहवत नाही, आणि तोही त्याच्यामागे निघतो. शेवटी तो अधिकारीही गाडी घेऊन त्यांच्यासोबत जायला निघतो. बाकिचे पत्रकार मात्र तिथे जात नाहीत.
लपून छपून ते त्या गावात शिरतात. गावात हिंसाचाराचे थैमान चाललेले असते. इथे हिंसाचार दाखवताना, दिग्दर्शकाने तूमच्या कल्पनाशक्तीला अजिबातच त्रास दिलेला नाही. कदाचित तूम्ही कल्पनाही करु शकणार नाही असा पराकोटीचा हिंसाचार त्याने तूमच्या तोंडावर फ़ेकलाय.
बलात्कार दाखवताना, स्त्री शरीर न दाखवताही त्याने तो इतक्या भयानक रितीने चित्रीत केलाय, कि तूम्हाला स्वत:चीच चीड येते. त्या स्त्रीचा, विव्हळ चेहरा, अस्फ़ुट किंकाळ्या आणि कॅमेराची जोरकस मागेपुढे हालचाल याचा एकत्र परिणाम इतका भयंकर आहे, कि आपणच पाशवी बलात्कार करत असल्याची भावना मनात निर्माण होते.
या थैमानात, ते दोघे पत्रकार किती पुरेसे पडणार ? तरीही ते शर्थीने तो रोखण्याचा प्रयत्न करतात. आपण मारलेल्या अरबाचे, शस्त्र घेऊन ते चालवावे एवढेही भान त्यांना नसते. तो अधिकारी मारला जातोच. तरीही तो पत्रकार ते तान्हे बाळ ताब्यात घेतो.
पण त्याच्याकडच्या गोळ्या संपल्याने तो घायाळ होतो. दुसरा पत्रकार ते बाळ घेऊन पळण्याचा प्रयत्न करतो तर त्यालाही घायाळ केले जाते.
आपल्या छातीखाली रेतीत खड्डा करुन त्यात तो त्या बाळाला ठेवतो, आणि त्यावर पालथा पडतो. आणि अर्थातच गोळीला बळी पडतो. पहिल्या घायाळ पत्रकाराला अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात येते, पण त्या आधी गोर्या लोकांनी भूतकाळात केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला जातो. या हिंसाचारातूनही वाचलेल्या लहान मूलांना एका झोपडीत कोंडण्यात येते. आणि लुटारुंपैकी एका काळ्या माणसालाच. त्या झोपडीला आग लावण्यास भाग पाडण्यात येते. तो बिचारा विचारतो, कि हे केलेच पाहिजे का, तर त्याला उत्तर मिळते, आज त्यांना जिवंत ठेवले तर उद्या तूझा सूड घेतला जाईल.
गावात पिण्याच्या पाण्याची एकमेव विहिर असते. कदाचित गाव वसण्याचे तिच कारण असेल. तिच्यात प्रेते टाकून, गाव परत कधीही वसणार नाही, याची सोय केली जाते.
बाकीचे पत्रकार अत्यंत व्याकूळ झालेले असतात. त्या स्त्री पत्रकाराला तर रहावत नाही. ती परत त्या गावात येते. गावात प्रेताशिवाय काहीच नसते. प्रेतांवरसुद्धा वार केलेले असतात. काही तासांपुर्वीच ज्यांचे सांत्वन केले होते, त्या सर्व स्त्रीया मृत होऊन पडलेल्या असतात. ती अनेक प्रेतांजवळ जाऊन बघते, कुणीच जिवंत नसते. पण तिच्या सहकार्याच्या प्रेताखाली ते तान्हे बाळ जिवंत असते. त्याला
जवळ घेऊन ती निघते. तिचा काळा ड्रायव्हर त्या बाळाला, आपल्याकडचे पाणी पाजतो. इथे चित्रपट संपतो.
मग आपल्याला कळते कि अशा रितीने शेकडो, हजारो नव्हे तर तब्बल चार लाख सुदानी लोकांची हत्या झाली आहे. हा आकडा २ वर्षांपुर्वीचा आहे.
आपण आजवरही ते थांबवू शकलेलो नाही.
---------------------------------------------------------------------------------
हा चित्रपट बघून मी प्रचंड अस्वस्थ झालो आहे. कालची पूर्ण रात्र मी जागून काढलीय.
नेटवर वाचताना या चित्रपटाबद्दल आणखी कळले ते म्हणजे. हा चित्रपट सुदानमधे चित्रीत न करता, केप टाऊनमधे चित्रीत केलाय.
त्या गावचा सेट उभारताना, त्या गावातीलच एका निर्वासिताला बोलावण्यात आले होते आणि त्याला त्याच्या भावना आवरणे कठीण झाले. एका मुस्लीम व्यापार्याच्या भुमिकेत असणार्या व्यक्तीचे कुटुंबीय, असेच मारण्यात आले होते.
सुदानी लोकांच्या भुमिका दक्षिण आफ़्रिकेतील, सुदानी निर्वासितांनीच केल्या आहेत.
आणि या चित्रपटाचे संवादच लिहिण्यात आलेले नव्हते, कलाकारांना ऐनवेळी जे सूचले, तेच संवाद ते बोलले आहेत.
---------------------------------------------------------------------
हिंदी काय किंवा इंग्रजी काय. चित्रपटातील हिंसाचार मला नवीन नाही. तो बघायला आवडतो असे नाही, पण तो बघताना कायम एक भावना मनात असते कि हे सगळे खोटे आहे. कॅमेराची करामत आहे. किल बील मधला प्रचंड हिंसाचार तर विनोदी वाटतो.
शिंडलर्स लिस्ट मधला हिंसाचार बराच सौम्य आहे तर हॉटेल रवांडा मधे तर तो टाळलाच आहे.
पण हा चित्रपटातला हिंसाचार (असाच लेबनॉन या चित्रपटातला ) अंगावर येतो असे लिहिणे पण सौम्य ठरेल.
माझ्यासारख्या माणसांवर इतका परिणाम करणारा चित्रपट कदाचित सुदानमधल्या अरबांना करमणुक करणारा वाटू शकेल.
माणसांचा एक गट, दुसर्या गटाचा इतका कमालीचा दुस्वास करु शकतो, हे मला कधी पटतच नाही. ते तूमच्यापासून वेगळे पाडणारे काय घटक असतात, ते मला कळत नाही.
अगदी लहानपणापासून माझे मन असे घडले आहे. कंसाने देवकीच्या मूलांचा घेतलेला बळी हे मला ना कधी गोष्ट म्हणून आवडले ना त्याचे चित्रपटातले दृष्यरुप बघायला आवडले.
एका गणेशोत्सवात, लालबागच्या एका मंडळाने जरासंधाच्या वधाचा देखावा उभा केला होता. त्याची फ़ोडलेली मांडी, आणि त्या रक्ताने भीम द्रौपदीची वेणी घालतो आहे, असा देखावा होता. तो क्षणभरदेखील मी बघू शकलो नाही.
आम्हाला विद्याधर पुंडलिकांची, "चक्र" हि एकांकीका अभ्यासाला होतॊ. तिच्यात द्रौपदीच्या तोंडी अशी वाक्ये आहेत. कि संपुर्ण महाभारत ही एक सुडाची कहाणी आहे.
मयसभेतील फ़जितीला द्रौपदी हसली म्हणून तिचा सूड, भरसभेत तिची विटंबना झाली म्हणून पांडवानी घेतलेला सुड, मग तिची मूले मारली म्हणून तिने अश्वथाम्याचा खेचून काढायला लावलेला मणि... त्या काल्पनिक एकांकीकेत ती अश्वथाम्याच्या जखमेत तेल घालते, असा शेवट होता. खरेच जर महाभारत असे घडते, तर बुद्धाला जन्म घ्यावा लागला नसता.
पण त्याने जन्म घेऊनदेखील, आम्ही होतो तिथेच आहोत.
---------------------------------------
हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला असण्याची शक्यता कमीच आहे. तो सीडिवर उपलब्ध असेल, याचीची शक्यता कमी आहे. आणि असला तरी बघायचा सल्ला मी देणार नाही.
सुन्न
सुन्न
भयानक. तुमच्या साठी ही लिंक
भयानक.
तुमच्या साठी ही लिंक :-
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/93999.html?1164906631
(जुन्या हितगुज वर दर्फुर वर झालेली चर्चा.)
धन्स
धन्स. मी वाचली नव्हती ती.
धन्स.
मी वाचली नव्हती ती. सिनेमा २००९ सालचा आहे. आणि अजूनही जैसे थे परिस्थिती आहे.
ह्याच प्रश्नाशी निगडीत दाउद
ह्याच प्रश्नाशी निगडीत दाउद हरी नामक सुदानी माणसाचे The Translator नावाचे पुस्तक जरूर वाचावे.
मी इ- वर्तमान पत्रासाठी काम
मी इ- वर्तमान पत्रासाठी काम करत होते तेव्हा हे दारफुर जिनोसाइड बद्दल वाचून माझेही असेच झाले होते. अतिशय सुन्न करणारा अनुभव. आता तर बघूच शकणार नाही. सुदान्/दारफुर मधील बलात्कारित स्त्रीयांची स्थिती फार वाइट आहे कारण त्या दोन्ही बाजूंनी धोक्यात आहेत आक्रमण करणारे व देशातील त्यांचे लोक. बीबीसी न्यूज वर या प्रश्नाची खूप चर्चा व कवरेज आहे. अगदी लहान मुलींनाही सोडत नाहीत.
(No subject)
बापरे. मी अॅकलं होतं. पण हे
बापरे. मी अॅकलं होतं. पण हे एवढं भयानक असेलं असं वाटलं नव्हतं. खरचं सुन्न
बापरे, कल्पनेपलिकडचे आहे हे
बापरे, कल्पनेपलिकडचे आहे हे सगळे.
बीबीसी न्यूज वर या प्रश्नाची
बीबीसी न्यूज वर या प्रश्नाची खूप चर्चा व कवरेज आहे. अगदी लहान मुलींनाही सोडत नाहीत. <<< अनुमोदन अश्विनीमामी.
बापरे >>माणसांचा एक गट,
बापरे
>>माणसांचा एक गट, दुसर्या गटाचा इतका कमालीचा दुस्वास करु शकतो, हे मला कधी पटतच नाही. >> अनुमोदन.
(No subject)
बापरे कसले भयानक लोक आहे....
बापरे कसले भयानक लोक आहे....
ह्म्म्म्म.. फारच विचित्र आणि
ह्म्म्म्म.. फारच विचित्र आणि भयानक प्रकार आहे..
असाच एक चित्रपट आठवल्याशिवाय राहत नाही, तो म्हणजे Cannibal Holocaust. अर्थात हा चित्रपट सत्य घटनांवर आधारीत नाही, परंतु त्या चित्रपटात हिंसाचाराची परमोच्च पातळी गाठली आहे.
IMDB वरची ही कॉमेंट वाचूनच अंदाज येवु शकतो.
"Cannibal Holocaust has been named numerous times as the most graphic and controversial movie ever made. It is banned completely in several countries due to the ridiculous amount of violence and disturbing sexual content."
या चित्रपटाचं एक वैशिष्ट्य(?) म्हणजे - यात जे काही प्राणी मारले आहेत, (माकड, कासव आणि इतर..) ते सर्व खरंखुरं शुटींग आहे. सीन जमला नाही, तर पुन्हा मारण्यात आले आहेत..
हा चित्रपट १९८० साली बनवला गेला होता. चित्रपटाला अर्थातच NC-17 रेटिंग आहे. कुतुहूल म्हणून पाहिला होता, आणि नंतर पश्चाताप झाला.
दिनेशदा सारखंच मी पण कुणालाच हा मूवी पाहण्याचा सल्ला देणार नाही.
भयानक.. या देशाचा आणी इतर
भयानक.. या देशाचा आणी इतर काही दुर्दैवी देशांचा इतर जगाला विसरच पडलाय..
खूप खूप धन्यवाद हा विषय
खूप खूप धन्यवाद हा विषय मांडल्याबद्दल.
शेवटचा भाग आवडला नाही. (अगदी लहानपणापासून माझे मन असे घडले आहे.तो क्षणभरदेखील मी बघू शकलो नाही. वगैरे)...
माफ करा, पण त्यात 'आत्मप्रौढी' चा एक सूर दिसतो एक प्रकारचा.
पण त्याने जन्म घेऊनदेखील, आम्ही होतो तिथेच आहोत. >> अनुमोदन. हे वाक्य आवडले.
एका मुसलमानाची अमेरिकेतल्या
एका मुसलमानाची अमेरिकेतल्या विमानतळावर इतरांसारखीच तपासणी झाली तर आमच्या माथी
"माय नेम इज खान" मारण्यात आला आणि आमचे गृहमंत्री तिकीट काढून तो बघायला गेले. वर त्याला कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली.
बांग्लादेशातल्या आणि भारतातील काश्मीरमधल्या हिंदूं स्त्रीया आणि मुली यांच्यावर लेखात उल्लेख केल्याप्रमाणेच बलात्कार झाले. त्यावर चित्रपट कुणी काढेल का? नाही!
काश्मिरी पंडितांना तर गावातल्या लाऊडस्पिकरवरून धमक्या दिल्या गेल्या..... तुम्ही निघून जा आणि जाताना तुमच्या मुलींना मागे सोडून जा. त्यावर चित्रपट कुणी काढेल का? नाही!
निवडुंग, आता तर चित्रपटासाठी
निवडुंग, आता तर चित्रपटासाठी वापरलेले प्राणी योग्य रितीने हाताळण्यात आले होते असे प्रमाणपत्र चित्रपटाच्या शेवटी देतात ना. मधे मी बघितले होते. पण त्यानंतरच्या काही चित्रपटात (उदा लाँग विकेंड )मधे प्राणी क्रूरपणे मारताना दाखवलेय.
रैना, या कथा मला कृष्णलीला म्हनुनही कधी आवडल्या नाहीत, स्वतःबद्दल केलेले प्रत्येक विधान, हे आत्मप्रौढी असते असे मला वाटत नाही. पण प्लीज हा विषय आणखी ताणून मला या बीबीचा रोख बदलायचा नाही. त्यामुळे माझ्यातर्फे पूर्णविराम.
होय, आजकाल ते प्रमाणपत्र
होय, आजकाल ते प्रमाणपत्र देतात चित्रपटात, नाहीतर PETA वगैरे संस्था आक्षेप घेतात. लाँग वीकेंड बद्दल माहिती नाही, पण कॅनिबाल होलोकॉस्ट मध्ये खरे प्राणी मारले गेलेत, आणि ते जसंच्या तसं शूट करून चित्रपट बनवलाय. अगदीच किळसवाणा प्रकार आहे तो. जेव्हा तुम्हाला माहिती असतं की हे खरंखरं आहे, तेव्हा ती तडफड तुम्ही पाहूच शकत नाही, अक्षरशः ओकारी येते..
!
!
बाप रे फारच भयानक.
बाप रे फारच भयानक.
दिनेशदा, खरच काळीज पिटाळुन
दिनेशदा,
खरच काळीज पिटाळुन टाकणारी कथा आहे.
माझ्या मते काही प्रत्यक्ष अनुभव घेतलेली माणसांचा सहभाग असला की असा चित्रपट,अशी कथा किंवा अशी अप्रतिम गुणवत्ता दिसुन येत असेल.
वाचताना तुम्ही अगदी शेवटपर्यंत खिळवुन ठेवलयं.
आपल्या
आपल्या वासनेसाठी/बदल्यासाठी/धर्मासाठी केलेलं कुठलही क्रौर्य वाईट! लहान अजाण मुला/मुलींचं शोषण तर अतिशय घॄणास्पद. एकाद्या छोट्या मुलीला किंवा मुलाला हात लावताना, ह्यांना आपली मुलं डोळ्यासमोर येत नाहीत?
(No subject)
मी अशी अपेक्षा करतो की
मी अशी अपेक्षा करतो की जितक्या लोकांनी हळहळ व्यक्त केली ते चिकन्/मटण खाणारे नसावेत...
निष्पाप मुक्या जनावराचा जीव घेण्यात काय असुरी आनंद मिळतो तेच कळत नाही ..
बाकी दिनेशदा वाचुन खुपच वाईट वाटले.. नो वे मी असले पिक्चर बघेल.. ब्लड डायमंड बघितला होता त्यानंतर कधीच असे चित्रपट नाही पाहु शकलो.
(No subject)
सुन्न झालो. असंच काहीसं
सुन्न झालो.
असंच काहीसं टीअर्स ऑफ सन हा ब्रुस विलिस चा साहसपट पहाताना झालं होतं.
मी अशी अपेक्षा करतो की
मी अशी अपेक्षा करतो की जितक्या लोकांनी हळहळ व्यक्त केली ते चिकन्/मटण खाणारे नसावेत...
निष्पाप मुक्या जनावराचा जीव घेण्यात काय असुरी आनंद मिळतो तेच कळत नाही
मी एकदा बेलापुर गावातल्या अनधिकृत मटनशॉपसमोर मटण घेण्याच्या उद्देशाने उभी असताना खाटकाने गळा अर्धवट चिरुन मरायला टाकलेला बकरा बघितला. (मुसलमान लोक असेच कापतात, हिंदु लोक एका फटक्यात मुंडके तोडतात, पण हिंदु खाटीक खुपच कमी आहेत) त्यानंतर जवळजवळ वर्षभर मी मटण किंवा चिकन खाऊच शकले नाही. नंतर हळुहळू परत चिकन खायला लागले पण आजही मटण म्हटले की हातपाय झाडत असलेला तो काळा बकरा नजरेसमोर येतो. खायचे म्हटले तरी जीवावर येते आणि नको म्हटले तर मग याआधी आपल्या दृष्टीआड तेच होत होतेच ना, मग आता केवळ दृष्टीसमोर घडले म्हणुन का उबग यावा अशा प्रश्न पडतो.
वरती अश्विनीने स्त्रीच्या
वरती अश्विनीने स्त्रीच्या शोषणाचा मुद्दा मांडलाय. आफ्रिकन स्त्री, हि काय तर्हेची पिळवणुक सहन करते, ते तूम्हाला वाचवणार नाही. तरीपण लिहितोच.
इथे स्त्रीला मूल झाल्याशिवाय ती विवाहयोग्य मानली जात नाही. म्हणजेच तिचा बॉयफ्रेंड तिचा पुरेपुर उपभोग घेणार, तिला मूल जन्माला घालणे भाग पाडणार, आणि मग त्याला वाटले तर तो तिच्यासोबत राहणार. मूलाची पूर्ण जबाबदारी आईवरच असते. अगदी १५/१६ वर्षांच्या मूली, पाठीवर लहान मूल बांधून वावरताना दिसतात. इथल्या हवामानामुळे मूली लवकर वयात येतात. आणि मी हे काही फक्त गरीब कामगार वर्गातील स्त्रीयांबद्दल लिहित नाही. माझ्या ऑफिसमधील सर्वच मूली, या एक दोन मूलांच्या माता आहेत आणि एकीचेही लग्न झालेले नाही, कि त्यांच्या मूलांचा बाप त्यांच्या सोबत रहात नाही.
नायजेरियातील ग्रामीण भागात आजही, स्त्रीला पुरुषासमोर उभे रहायला बंदी आहे. तिला घरात जमिनीवर सरपटतच वावरावे लागते.
अनेक भागात स्त्रियांची सुंता जबरदस्तीने केली जाते. असे केल्याने त्यांना कामेच्छा होत नाही, असा समज आहे. याबाबतीत वापरली जाणारी हत्यारे कधीच निर्जंतूक केलेली नसतात. (दगड, काच काहीही वापरतात.) आणि हे मुलगी तान्ही असतानाच केले जाते. कदाचित यामूळेच इथल्या बायका प्रचंड स्थूल असतात, असे मी वाचले होते. यावर नायजेरियात एक नाटक सादर केले जाते. (त्याचा उल्लेख शोभा बोंद्रे यांनी त्यांच्या लेगॉसचे दिवस या पुस्तकात केला आहे. )
बायकांना मूले किती हा प्रश्ण विचारणे असभ्यपणाचे मानले जाते. मूले मोजली तर ती कमी होतात, असा समज आहे. गर्भपाताचा अधिकार त्यांना नाही.
दिनेशचे वरील सर्व पोस्ट खरे
दिनेशचे वरील सर्व पोस्ट खरे आहे. अनुमोदन. आपण इथे एका संसारात दुसरी स्त्री आली विबासं तर बावचळून जातो आफ्रिकेत फायडॅलिटी ही कल्पनाच फारशी नाही. एकेकाच्या किती ही स्त्रीया अस्तात. स्त्री हक्क ही संकल्पनाच तिथे रुजविलेली नाही.
मुले, जनावरे अश्या निष्पाप जीवित परावलंबींचा अब्युज करणे अगदी क्रूर आहे. त्यात वरील प्रमाणे आया झालेल्या/ बलात्कारित स्त्रीया अनेक रोगांनाही बळी पड्तात. त्यांच्या बाजून उभे राहिले पाहिजे. त्यांना आवश्यक ती मदत मिळाली पाहिजे. दारफुर कॉन्फ्लिक्ट, अमेरिकेचे इराक वरील आक्रमण, हुतू तुत्सी वाद व जिनोसाइड ह्यात अपार क्रौर्य झाले आहे व त्याचा शाप ही बालके, तरूण मुली भोगत आहेत.
ब-याच वर्षांपुर्वी रिडर्स
ब-याच वर्षांपुर्वी रिडर्स डायजेस्टमध्ये वारिस नावाच्या एका आफ्रिकन मॉडेलचा लेख वाचलेला. तिने तिच्या एकुणच आयुष्याबद्दल लिहिलेले आणि त्यात अर्थात तिची सुंता केली त्याबद्दल होते. जे लिहिलेले ते प्रचंड भयानक होते. ती तेव्हा ५ वर्षांची होती. एका जिप्सी बाईने एका झोपडीत तिची सुंता केली, मग रुढीप्रमाणे तिला तसेच झोपडीत टाकुन देण्यात आले. औषध/उपचार काहीच नाही. तिन दिवसांनंतर हिची आई देवाचे नाव घेत हिला बघायला आली तेव्हा ही जिवंत होती. नशिबाने हिचा जीव वाचला. गेला असता तरी काहीही बिघडले नसते. आईने काही दिवस मनातल्या मनात शोक केला असता आणि मग पुढच्या मुलाच्या तयारीला लागली असती. आयुष्यभर या बायकांना लघवीसारखा नैसर्गिक विधीही निट करता येत नाहीत, त्यातही प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पण धर्माच्या आणि रुढीच्या बंधनांनी स्त्री आणि पुरूष दोघेही जीव जाईतो करकचलेले आहेत. पुढे जीव जगवण्यासाठी आफ्रिकेतुन ती घरेलु कामगार म्हणुन लंडनमध्ये गेली, तिथे एका फोटोग्राफरच्या नजरेस पडली आणि त्याने तिला मॉडेल म्हणुन पुढे आणले. पण स्वतःबद्दलची ही व्यक्तीगत बाब ती कोणालाही सांगु शकली नाही. मनाची प्रचंड तयारी करुन, जवळजवळ वर्ष-दिड वर्ष धीर गोळा करुन शेवटी तिने एका डॉक्टरला कन्सल्ट केले. त्याने ऑपरेशन केल्यास तिचा त्रास नाहीसा होईल असे सुचवल्यावर ती एका हॉस्पिटलात ऑपरेशनसाठी दाखल झाली. तिथल्या डॉक्टर्सना तिची अवस्था पाहुन धक्का बसला आणि आफ्रिकेत तिच्यासारखा हजारो/लाखो बायका कित्येक वर्षे वावरताहेत यावर त्यांचा विश्वासही बसेना. त्याचवेळी त्या हॉस्पिटलात काम करत असलेल्या तिच्या देशातल्या दोघा/तिघांनी तिच्यावर 'आपल्या देशातली गुप्त गोष्ट अशी जगासमोर मांडली' याबद्दल तिच्यावर शिव्यांचा वर्षाव केला. शेवटी एकदाचे ऑपरेशन पार पडल्यावर ती जेव्हा पहिल्यांदा टॉयलेटमध्ये गेली तेव्हा आयुष्यातली एक साधी, नैसर्गिक गोष्ट अजिबात त्रास न होता करण्यातले सुख पहिल्यांदा अनुभवले.
मी कित्येक लेख वाचुन विसरुनही गेले पण वारिसला कधीही विसरु शकले नाही आणि विसरणे शक्यही नाही. तिच्यासारख्या हजारो बायका काय भयाण आयुष्य जगताहेत हा विचार मनात आला की डोळ्यात पाणी जमा व्हायला लागते.
Pages