सावट - ३

Submitted by बेफ़िकीर on 11 May, 2011 - 03:12

नेमके कोणत्या कारणावरून नमाला हाकलून द्यावे हेच लक्षात येत नव्हते. खिडकीत बसणे यात गैर काहीच नाही. तिचा एक हात तुटलेला होता असे अर्चनाला वाटणे यात अर्चनाला भास झालेला असण्याची शक्यता खूपच! तसेच स्वैपाकघरातही अर्चनाला तो तुटलेला हात माळ्यावरून चालताना दिसणे यातही तिला भास झालेल्या असण्याची शक्यता खूपच! स्वैपाकघरातले आवरले कुणी हा प्रश्न आणि मनूच्या डोळ्यांपाशी रक्त कसे काय आले होते हा दुसरा प्रश्न, हे दोन प्रश्न जर सोडले तर बाकी अर्चनाला झालेले भास म्हणून मनातून काढून टाकणे शक्य होते.

मात्र अजित आणि सतीश घरी आल्याआल्या अर्चनाने सतीशला घट्ट मिठी मारली आणि ती स्फुंदुन स्फुंदुन रडली. काय झाले हेच दोघांना समजत नव्हते. मात्र हळू हळू तिला धीर आल्यावर तिने दुपारपासूनचे प्रकार पुन्हा एकदा समोर मांडले सगळ्यांच्या! की काहीच कारण नसताना मनूच्या डोळ्यांपाशी रक्त का यावे? नेहमी रक्त पाहिले की घाबरून रडून आकांडतांडव करणारा मनू डोळ्यांपाशी रक्त येऊनही काहीच कसा काय म्हणाला नाही? हे माझे रक्तच नाही असे कसे काय म्हणाला?

दुसरे म्हणजे आजच मला बोळातून चालताना भीती का वाटावी? ती नमा दुपारपासून कशी भयंकर आवाजात बोलत होती हे पाहिले नाहीत का? ती खिडकीत बसून माझ्याकडे कशी पाहात होती हे सांगून तुम्हाला समजणार नाही. तिचा हात तुटलेला होता. तो तुटका हातच माळ्यावरून चालत गेला. मावशी घराच्या बाहेर गेलेल्या असताना स्वयंपाकघर कसं काय आवरलं गेलं? की मलाच एकटीला भूतबाधा झाली आहे? तुम्हाला कुणाला काहीही समजत नाही?

यावर मात्र सर्वच चूपचाप झालेले होते.

स्वैपाकघरात गंभीर वातावरण निर्माण झाले होते. माळ्याकडे वारंवार सगळ्यांचे लक्ष जात होते. अर्थात आता भीती कुणालाच वाटत नव्हती कारण सगळे एकत्रच होते. सतीश मनूलाही तिथेच घेऊन आला होता. नमाचे दार वाजवून तिला बाहेर बोलवावे आणि काय ते विचारावे असा एक विचारही ठरला.

अजितने जाऊन तिच्या खोलीचे दार वाजवले. जवळपास पाच मिनिटे तो दार वाजवत होता. आता सगळेच त्याच्या मागे येऊन थांबलेले होते. नमा दर उघडत नव्हती. चिंताक्रान्त चेहर्‍याने सर्वांनी एकमेकांकडे पाहिले. पुन्हा सगळे किचनमधे आले.

मावशी - अजित.. आता रे काय?

अजित - दार फोडायचे का??

मावशी - अरे पण.. ती अशी कशी गाढ झोपेल?? आत्ता तर खोलीत गेली..

अजित - काय प्रकार चाललेत समजत नाही.. तिकडे ते प्रेत उठून गेले.. काका थोरातचे.. घाबरून पब्लिक पळत होतं.. ही रेटारेटी.. गर्दीतच दोघे तिघे मेले असतील..

मावशी - ते जाऊदेत रे... पण हे काय चालले आहे?? काय करूयात??

सतीश - डॉक्टरांना बोलवायचे का? त्या मुलीला तपासण्यासाठी...

अर्चना - ती पेशंट नाही आहे हो... ती.. भूत आहे ती... डॉक्टर कसले बोलावताय?? आणि दार उघडलं तर तपासणार ना??

अजित - मावशी... तुम्ही जरा हाका मारा ना तिला..

मावशी - मारल्या की आता ... कितीतरी हाका मारल्या..

सतीश - पोलिसांना कळवूयात??

मावशी - नको रे बाबा.. गेस्ट हाऊस बदनाम झले की पुन्हा कुणी यायचे नाही... इथे भुताटकी आहे असे समजले की संपले सगळे.. मला गावात कुणी आधारही देणार नाही... लोकांना वाटेल मलाच बाधा झाली आहे..

अजित - असं.. असं कुणी आहे का??.. जे.. म्हणजे.. असं भूत वगैरे... काढणारे??

मावशी - मग तोच होता ना काका थोरात.. तोच गेला ना आज..

अजित - मला तर ते बघण्याचीच हिम्मत होत नव्हती मावशी.. लांबूनच पाहात होतो मी.. पण अचानक ते प्रेत उठून बसलं.. ही पळ्ळापळ्ळ... आणि ते प्रेत सरळ चालायला लागलं..

मावशी - उद्या सकाळपर्यंत थांबायचं का??

अर्चना - हो पण आपण सगळे इथेच बसू रात्रभर.. वेगवेगळे नको झोपायला बाई...

सतीश - घाबरट आहे नुसती...

अर्चना - तुम्हाला काय होतंय थट्टा करायला?? मगाशी बोळात असतात तर तुमचीही बोबडीच वळली असती... आजवर मला इथे असलं काही वाटलं नव्हतं.. पण ही बया भयंकर आहे.. कुठून आलीय कुणास ठाऊक..

मावशींना या वाक्याचा राग आला काहीसा! कारण नमा त्यांच्याकडचीच होती. त्यांना राग आल्याचे समजताच अर्चना म्हणाली....

अर्चना - रागवू नका हो मावशी.. मला फार भीती वाटली म्हणून असे म्हणाले..

मावशी - असुदेत.. तू काहि अशी बोलत नाहीस कधी.. मला माहीत आहे.. बरं मग आता काय करायचंय??

अर्चना - इथेच थांबू आपण सगळे.. अहो.. तुम्ही आणि अजित भावजी अंथरुण पांघरुण घेऊन या इथेच सगळी आपली..

सतीश आणि अजित उठले. अंथरायला सतरंज्या आणि पांघरुणे आणायला जाताना त्यांनि आणखीन एकदा नमाचे दार वाजवून पाहिले.. काहीही प्रतिसाद नाही..

चकित होऊन दोघे आपापल्या खोलीत गेले...

आणि त्याच वेळेस... स्मशानाच्या मागच्या गुहेमध्ये.. अत्यंत भेसूर सुरात काका थोरातचे प्रेत रडत होते.. त्याच्या समोरच ताना आडवा झालेला होता.. तो जिवंत होता... वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली अशा अवस्थेत तो भेदरून काका थोरातच्या समोर बसलेल्या प्रेताकडे पाहात होता...

काका थोराते काल जिवंत असताना स्वत:च्याच शरीराचे अपरिमित हाल केलेले होते. कारण सव्वाशे वर्षांचे ते शरीर आता त्याला सोडता येणार होते. त्यामुळे त्या जुनाट शरीराचा असलेला तिरस्कार त्याने त्या शरीराचे हाल हाल करून व्यक्त केला होता. पण परिस्थिती अशी झाली होती की मावशींच्या गेस्ट हाऊसमध्ये अजितच्या शरीराचा ताबा घ्यायला गेला त्या क्षणी एका भयानक सामर्थ्यवान शक्तीने त्याला नमाच्या शरीरात घुसवला होता. आणि ते शरीर त्याला नको होते. एक साडे चार फुटी अशक्त शरीर घेऊन तो अनेक प्रयोग करूच शकणार नव्हता. त्याला हवे होते एक खणखणीत तरुण पुरुषाचे शरीर! मात्र नमाच्या शरीरात अडकल्यानंतर त्याला काहीच करता येईना! कितीही प्रयत्न केला तरी तो त्यातून बाहेर पडू शकत नव्हता. त्या घरात एक अशी शक्ती होती जी त्याला जखडून ठेवत होती. काका थोरातची नमाच्या शरीरात नुसती घालमेल चाललेली होती.

ती घालमेल सहन न होऊन त्याने भुतांना करता येण्यासारखी जी एकमेव गोष्ट असते ती करण्याचा निर्णय शेवटी घेतला होता. ती म्हणजे सामान्य माणसांना भय दाखवणे! कारण ती एकच वाट होती स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची! मला हे शरीर नको आहे, मला हे अस्तित्व नको आहे हेच सांगण्यासाठी भुते माणसाला घाबरवत असतात.. मात्र माणूस इतका घाबरतो की त्याला बाधाच होऊ शकते..

काका थोरातने म्हणूनच खिडकीत बसून अर्चनाला दर्शन दिले.. तुटलेला हात दाखवून जरी त्याने अर्चनाला घाबरवले असले तरी त्याला चेहरा नकारार्थी हालवण्यातून हे सुचवायचे होते की तू स्वयंपाकघरात जऊ नकोस.. तेथेच ती शक्ती आहे जी मला विरोध करत आहे या शरीरातून बाहेर पडायला.. आणि तू तिकडे गेलीस की तूही त्याच शक्तीचा भाग होशील.. मग मी आणखीन असहाय्य होईन.. मला या शरीरातून बाहेर पडायचे आहे..

मात्र अर्चनाला या आविर्भावांचे आणि तुटलेल्या हाताचेच भय इतके वाटले की ती कोसळली आणि नंतर मावशींबरोबर स्वयंपाक्घरात जाऊ शकली. तेथे तिला हाताचा उरलेला तुटका भाग दिसला आणि त्यामुळे ती आणखीनच घाबरली. वास्तविक पाहता तो जरी हाताचा भाग असला तरी ती होती एक शक्ती, जी काका थोरातला नमाच्या शरीरात्य अ‍ॅरेस्ट करत होती...

आणि.. त्याचवेळेस ते झाले..

स्वतःच्या खोलीत नमाच्या शरीरात काका थोरात बसलेला असताना त्याने कालच मनीषा काकडेसंदर्भात केलेल्या अघोरी प्रयोगाचा फायदा त्याला मिळाला. नमाच्या डाव्या कानातून काका थोरात बाहेर पडला. केवळ निमिषार्धात! आणि लावलेल्या दाराच्या खालून एखाद्या ठिपक्याच्या आकाराचा होत घरातून पळून गेला. त्या स्वरुपात असताना त्याला जर एखाद्या पालीने जरी मारले असते तरी तो खलास होऊ शकला असता. कारण ती त्या देहाची मर्यादा होती. दहाच मिनिटात स्मशानात असलेल्या सव्वाशे वर्षे जुन्या काका थोरातच्या निर्जीव देहात त्याने प्रवेश मिळवला आणि ते प्रेत उठून बसले. त्याच क्षणी प्रचंड धावाधाव झाली. त्यानंतर पाच दहा मिनिटातच अजित आणि सतीश घरी परतले व आता सगळे स्वयंपाकघरात बोलत बसलेले होते.

आपल्या घरातून नमाच्या देहात असलेले भूतस्वरुपी जे काय होते ते केव्हाच निघून गेलेले आहे याची इथे कुणाला कल्पनाच नव्हती. काका थोरातच्या येण्याने आणि जाण्याने प्रचंड शारिरीक धक्का बसून नमा जमीनीवर बेशुद्ध होत कोस़ळलेली होती. त्यामुळे तिला दारावर मारलेल्या थापांचे आवाज ऐकूच आले नव्हते.

आणि काका थोरात मात्र आपल्याला त्याच जुन्या शरीरात पुन्हा यायला लागले या दु:खात भेसूर रडत होता आणि काही वेळातच तो तानाचा सूड घेणार होता कारण तानाला प्रेताची विटंबना करायची होती हे त्याला समजलेले होते.

ताना गलितगात्र होऊन नुसता आडवा पडलेला होता. त्याच्या तोंडात आता बोलण्याचीही ताकद नव्हती. रडता रडताच काका थोरातची ती लालभडक भयंकर नजर तानावर पडली. ताना आता शाहरूही शकत नव्हता. तो आता केवळ जिवंत शरीर उरलेला होता.

काका थोरात तानाकडे पाहून रडायचा थांबला आणि हळूच त्याच्या ओठांवर स्मिताची एक अस्पष्ट रेषा चमकली. हळूहळू ती रेषा रुंद होत गेली.

"ताना... "

काका थोरातची ती हाक म्हणजे विकृतीची पराकोटी होती. ताना अक्षरशः भयाने वितळू लागला होता.

काका थोरातने हातत एक लहानसे पाते घेतले आणि तानाला काही कळायच्या आतच तानाचा डावा हात मनगटापासून कापला..

तानाने खच्चून मारलेली किंकाळी गुहेच्या बाहेरही गेलेली नव्हती. गावाच्या दृष्टीने ताना चालते प्रेत पाहून भिऊन गावातून पळून गेलेला होता. तो पुन्ह गुहेत ओढला गेला होता हे कुणालाही समजलेले नव्हते.

नारळ फोडल्यावर त्याचे पाणी भांड्यात घेण्यासाठी करवंटी जशी भांड्यावर धरतात तसे काका थोरातने तानाचे डावे मनगट स्वतःच्या तोंडावर धरले. गरम गरम रक्ताचे तुषार घसा भिजवून खाली गेले तेव्हा कका थोरातला हातभट्टी झक मारेल अशी नशा झाली. ताना वेदनांनी बेशुद्ध झालेला पाहून काकाने त्याला पाणी मारून शुद्धीवर आणले.

कुठून माहीत नाही, पण काका थोरातने एक मोठा सरड्यासारखा प्राणी आणला. तो प्राणी तानाचे तुटलेले मनगट चावू लागला. ताना आता ओरडूही शकत नव्हता. तोवर काकाने हातातील पात्याने तानाचे दुसरे मनगट कापले व तसेच तोंडावर धरले. आता तो प्राणी भूक भागल्यामुळे निघून गेला होता. ताना पुन्हा बेशुद्ध झाला. काकाने बेशुद्ध पडलेल्या तानाचे लिंग जेव्हा कापले तेव्हा मात तो एकदाच किंचाळला आणि त्याने प्राण सोडला. काकाने ते लिंग हातात धरून कोणत्यातरी अदृष्य शक्तीला ते समर्पीत केले. त्यानंतर खदाखदा हासला काका! एक बळी दिला गेल्यामुळे त्याला आता एक संधी प्राप्त होणार होती. पण असा वाट्टेल तेव्हा वाट्टेल त्याचा बळी देण्यास त्याला परवानगी नव्हतीच! नाहीतर त्याने रोजच माणूस मारला असता. जेव्हा त्याच्या संदर्भात कुणी एखादा भयानक अपराध करेल तेव्हाच त्या माणसाचा बळी घेण्याची परवानगी होती. पुरुषाचाच बळी लागायचा त्या शक्तीला! पौरुषत्वाचे चिन्ह एकमेवच असायचे! ते म्हणजे लिंग! कापलेले लिंग त्या शक्तीला समर्पीत केले तरच ती शक्ती काका थोरातला एक संधी द्यायची. कसलीही संधी! काकाची एक इच्छा पुरी व्हायची. आज काकाने एका पुरुषाचे लिंग त्या शक्तीला समर्पीत केलेले होते. आणि ते होताच त्याच्या देहात वीज खेळलेली होती. त्याचा अर्थ काकाला समजला होता. त्या शक्तीने तो नैवेद्य स्वीकारलेला होता व काकाला एक इच्छा पूर्ण होईल असा वरही दिलेला होता. म्हणूनच काका थोरात खदाखदा हासत होता.

रात्रीचे पावणे बारा वाजलेले होते. काकाने लगबगीने जमीनीवर सांडलेले तानाचे रक्त हाताने पुसुन घेऊन ते चाटून टाकले. जमीन जर स्वच्छ झाल्यावर त्याने पटकन पद्मासन लावले आणि त्याच्या पुढच्याच क्षणी तो ध्यानात गेला...

आत्ता जर कुणी काका थोरातला पाहिले असते तर नुसते पाहूनच माणूस भयाने मेला असता. संपूर्ण विवस्त्रावस्थेत पद्मासन घालून बसलेला काका आता ध्यानात असूनही त्याचे डोळे संपूर्ण बाहेर आलेले होते खोबण्यांमधून! ती त्या शक्तीच्या आगमनाची चिन्हे होती. जीभ लटकत होती. शरीरावरचा प्रत्येक केस ताठ उभा राहिलेला होता. काकाचे स्वतःचे पौरुषत्वाचे चिन्ह त्याच्या पोटात आत गेलेले होते.. ते बाहेर दिसत नव्हते.. काका आता गदागदा हालत होता.. त्याच्या डोळ्यांमधून आता रक्ताच्या धारा लागल्या होत्या.. काकाचे ते भयानक हालणे पाहून गुहा देखील थरथरत असावी.... गुहेच्या बाहेरचा वारा अचानक थांबला.. त्यात एक निर्जीवता आली.. स्तब्धता आली... एक कुबट वास गुहेत प्रवेशला.. काकाच्या हालण्यातून आता घंटेसारखा ध्वनी येऊ लागला.. आणि बरोब्बर बारा वाजता गुहेत अमाप प्रकाश पसरला.. हा प्रकाश सामान्य माणसाला दिसलाच नसता.. त्याच क्षणी काका थोरातची बुबुळे खाली त्याच्याच मांडीवर पडली.. डोळ्यांच्या नुसत्या खोबणीच राहिल्या.. अंगातून रक्त पाझरू लागले.. जीभही खाली पडली...आणि गुहेत आवाज घुमला...

"काSSSSSSSय..... काSSSSSSSय.. काय पाहिजे???"

काकाच्या मांडीवर पडलेली त्याचीच बुबुळे आता गुहेच्या प्रवेशद्वाराकडे भयातिरेकाने पाहात होती... काकाची खाली पडलेली जीभ वळवळली आणि त्या जीभेतून कर्कश्श किंकाळी यावी तसा आवाज आला..

"अजीSSSSSSSSत... अजीत कामSSSSSSSSSत... "

"दिलाSSSSSSS"

त्या आवाजाने काका थोरातला अजित कामतचे शरीर भेट म्हणून दिलेले होते.. काकाने आनंद सहन न होऊन स्वतःच्या कानांवर हात दाबत एक भयानक किंकाळी फोडली आणि त्याचे शरीर मृतवत झाले...

नमा अचानक स्वयंपाकघरात आलेली पाहून अर्चना किंचाळलीच! नमा रडत रडत मावशींना बिलगली. मावशींना तो स्पर्श जाणवला. एका माणसाचा, एका लहान मुलाने आईला बिलगावे तसा स्पर्श..

नमा - मावशी.. मी.. मला काय झालं होतं हो?? आता मला मोकळं मोकळं वाटतंय.. पण.. मगाचपसून काय होत होतं तेच समजत नाही हो... मला डॉक्टरकडे नेता का??

सगळेच हादरून पाहात होते. नमा अत्यंत नॉर्मल होती आत्ता!

मावशींनी तिला जवळ घेतले..

मावशी - बेटा.. आता सव्वा बारा वाजलेत.. आता डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आपण सकाळी जाऊ हां?? आणि मला सांग.. नक्की काय होत होतं तुला??

नमा अजूनही मुसमुसतच होती. मावशींना बिलगून ती म्हणाली..

नमा - काहीतरी आलं होतं.. ते गेलं.. आता ते कधीच येणार नाही असंही ऐकू आलं मला मावशी.. पण ते फार भयंकर काहीतरी होतं... माझी हाडेसुद्धा खेचून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं ते.. आणि ते.. ते माझ्यात मावतंच नव्हतं गं मावशी.... त्याने माझा ताबा घेतलेला होता.. हे बघ.. हे बघ माझ्या डाव्या कानाला काय झालंय.. पण ते झालं आणि मला हायसं वाटलं मावशी..

नमाच्या डाव्या कानाला छिद्र पडावे तसे काहीसे झालेले होते... आत्ता नमा अगदी नॉर्मल होती...

हळूहळू चर्चा सुरू झाली.... नमा खूपच नॉर्मल आहे हे जाणवू लागलं तसे सगळेच तिला काही ना काही प्रश्न विचारून भंदावून सोडू लागले.. मनू लहान असल्याने झोपलेला होता आईच्या मांडीत...

शेवटी मावशीनी रामरक्षा म्हणायला सुरुवात केली.... सगळे चूपचाप बसले... मात्र मावशींच्या आवाजाने मनू जागा होण्याची चिन्हे दिसू लागली तसा मावशींनी आवाज कमी केला... आता त्या फक्त पुटपुटत होत्या.. लाईट चालूच ठेवलेले होते.. नमा मावशीच्या मांडीवर डोके ठेवून निजलेली होती.. मावशी तिला थोपटत होत्या... सगळेच शांत झाले होते आता... एक मोठं संकट टळलेलं होतं..

अंगात भूत असताना नमा जेवली होती.. ते सोडले आणि मनूने थोडा वरण भात खाल्ला हे सोडले तर कुणीही जेवलेले नव्हते... अर्चनाचे अर्धवट पानही त्या तुटक्या हाताने आवरलेले दिसत होते... अजूनही सगळ्यांचे लक्ष नमाकडेच होते... अचानक हिला काही होते की काय...

जवळ जवळ दिड वाजता सगळ्यांनाच झोपावेसे वाटायला लागले.. सगळे आडवे झाले..

मावशी मग नमा... नमाच्या शेजारी चक्क अर्चना.. मगाचचे सगळे प्रसंग माहीत असूनही ती नमाच्या शेजारी झोपायला तयार झाली.. तिच्या कुशीत मनू झोपला होता.. शेजारी सतीश.. आणि पलीकडे अजित भावजी..

लाईट चालूच होते.. पण कधीतरी अर्ध्या पाऊण तासाने सतीश डोळ्यांवर प्रकाश येतो म्हणून वैतागला आणि त्याने उठून दिवा बंद केला... अंधार झाला पण कुणालाही जाग आली नाही...

कधीतरी अडीच वाजता ते झाले..

.. अचानक मनूने काहीशी हालचाल केल्यामुळे अर्चनाला जाग आली.. मनूला थोडेसे थोपटून तिने अंग अवघडले म्हणून कूस बदलली... शेजारी सतीश आहे हे तिला माहीत होते.. त्यातच सतीशचा हात तिच्या अंगावर पडला... येथे सगळे आहेत म्हणून आणि प्रचंड झोप आली आहे म्हणून अर्चनाने तो हात झिडकारला.. सतीशने पुन्हा हात टाकला तशी ती वैतागली आणि डोळे उघडून कुजबुजली..

"आत्ता काय?? कळत नाही का?? "

आणि.... आजवर हादरली नसेल अशी हादरली अर्चना...

तो सतीश नव्हता... अजीत होता... त्या अंधारातही त्याचे डोळे कधी नव्हे इतके मोठे झाले होते.. चेहर्‍यावर हसू होते... आणि बेदरकारपणे तो अर्चनाकडे हसून पाहात होता..

अर्चना किंचाळणार तेवढ्यात काहीतरी झाले... अजितच्या पुन्हा अंगावर पडलेल्या हाताच्या स्पर्शात काहीतरी विचित्र होते.. जे तिला खेचत होते... किंचाळू पाहणारा तिचा चेहरा बदलत बदलत हासरा झाला.. आणि आजूबाजूच्या कुणाचेच लक्ष नाही हे तपासून.. अर्चना सरळ अजितच्या मिठीत शिरली....

दोघांनाही हे माहीत नव्हते... की दोन डोळे त्यांच्यावर आत्ताही रोखलेले आहेत...

मावशी मागून टक लावून दोघांकडे पाहात होत्या...

गुलमोहर: 

मलाही हा भाग जरा अतिरंजीत वाटला.

मागच्या दोन्ही भागातल्यासारखा तुटलेला हात दाखवणे, त्याने घरातली कामे आवरणे, सरड्यासारखा प्राणी आणणे, नमाच्या कानातून पळणे, बुब्बुळं मांडीवर पडणे, जीभ गळून पडणे इ.. ... या गोष्टी खटकल्या. त्या टाळल्या असत्या तर बरं झालं असतं.

पण या भागातला शेवट छान आहे. उत्कंठा वाढलीय..

Pages