सौरभ

Submitted by ऋतुजा घाटगे on 10 May, 2011 - 14:03

उमललेली लक्ष फुले घेऊन जा
सौरभ मागे दरवळू दे,
काट्यांच्या घायाळ वेदना मला एकटीलाच साहू दे.

मधाळ चांदण्यातील गोडवा
कणाकणांनी वेचून ने,
खिन्न अंधाराच्या जंगलात मला एकटीलाच हरवू दे.

अथांग जनसागरातला
एक बिंदू बनून जा,
लांबण्या-या सावल्यांचे भीषण खेळ मला एकटीलाच पाहू दे.

जाताना उत्साह
येताना आनंद घेऊन ये,
विषण्णतेच्या वाळवंटात मला एकटीलाच भटकू दे.

मायेचे रेशमी पाश
तुला वेढूनच राहू दे,
एकाकीपणाच्या ज्वालेत मला एकटीलाच होरपळू दे.

फुलण्या-या जीवनाचा
स्निग्ध आस्वाद हळूवार घे,
मरणातली आसन्नता मला एकटीलाच अनभवू दे.

उंच भरा-या घेत जा
दैव अपुले उजळून घे,
नशीब मंजुर माझे मला, अशी अभागीच राहू दे!

गुलमोहर: