सावट - २

Submitted by बेफ़िकीर on 10 May, 2011 - 07:09

सावेळ्याच्या मनीषाच्या अपघाती निधनाची बातमी अजून पचलीही नाही तोवर दुसर्‍याच दिवशी संध्याकाळी सावेळे आणि दिवे गावांमध्ये दुसर्‍या ब्रेकिंग न्यूजने कहर माजवला.

काका थोरात गेला.

ही दोनच गावे काय, तर आजूबाजूच्या गावांमधील किमान दोनशे पब्लिक तिथे लोटले. दिवे गावात आजवर इतकी गर्दीच कधी झालेली नव्हती. म्हणजे इतकी माणसे आली तर त्यांच्यासाही सोय करण्याची कुवतच नव्हती या लहानश्या गावाची! त्यामुळे नुसतेच टुकूटुकू पाहात राहणे इतकेच काम दिवेकर करत होते.

ताना! स्मशानाचा अधिकारी! त्यानेच पहिल्यांदा ही बातमी गावाला सांगितली. केवळ दोन तासात ती बातमी वार्‍यासारखी फिरली आणि रात्री दहा वाजता स्मशानापाशी दिड हजार जमाव होता. तानाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्याला त्या जमावाला सांगायचे होते की काका थोरात हा एक अत्यंत भयंकर माणूस होता. जो केवळ एक मिनिटापुर्वी स्वतःचाच डावा हात स्वतःच्याच उजव्या हाताने तोडून पुन्हा मला एका हाताने गुहेत खेचू शकत होता. त्या वेदना सहज सहन करू शकत होता. काका थोरात हे एक प्रकारचे भूत होते, अमानवी प्रकार होता आणि त्याच्या प्रेताची वासलात एका सामान्य माणसाच्या दहनविधीप्रमाणे न करता, त्याच्या प्रेताची विटंबना करायला हवी होती. मानवजमातीवर तो एक कलंक होता. त्याच्यामुळेच गावात भयानक प्रकार घडत होते.

खरे तर ताना हे दिसेल त्याला पटवूनही देत होता. 'कालच काका थोरातने स्वत:च स्वतःचा हात तोडला आणि तानाला गुहेत खेचले आणि आज तो मेलाही, तसेच मनीषा काकडेच्या प्रेताचा डावा हात तोडायची त्याने तानावर जबरदस्ती केली व करणी करण्याची धमकी घातली' ही तानाची विधाने ऐकून गावकरी बुचकळ्यात पडत होते खरे!

मात्र मनीषाच्या प्रेताचा हात तोडला ही बातमी हळूहळू पसरू लागली तसे काकडे लोक स्मशानाच्या दिशेने सरकू लागले. तानावर हल्ला करण्यासाठी! आणि अचानक तानाच्या भोवती चार, सहा जणांचे कडे झाले. तानाला न भुतो न भविष्याती अशी मारहाण सुरू झाली. किंचाळत असलेल्या तानाच्या हंबरड्याने जमावातील अनेकांचे मन द्रवले आणि त्यांनी मारहाण करणार्‍यांना बाजूला खेचले! ताना अजून शुद्धीत होता. एक हाड मोडले असावे. त्याला उठता येत नव्हते. पण पडूनच तो बोलू शकत होता. आपली बाजू मांडू शकत होता. काही जाणते ज्येष्ठ त्याच्यापाशी जमले. तानाने काल झालेला गुहेतला भयंकर प्रकार सांगितला. काही निधड्या छातीच्या तरुणांना घेऊन ते जाणते लोक मागच्या बाजूला गेले. काही वेळाने गुहा सापडली खरी! पण गुहेत काहीच नव्हते. म्हणजे कित्येक वर्षात तेथे मानवी अस्तित्व नसणार हे सहज समजत होते. ताना चक्क खोटे बोलत आहे असा समज झाला त्यांचा! तानाकडे आता एकच पुरावा उरलेला होता. तो म्हणजे काका थोरातच्या प्रेताचा डावा हात! तो हात पुरुषी नव्हताच! कितीही कुजलेला असलेला तरी उजव्या हातापेक्षा पूर्ण भिन्न आहे इतके सहज समजत होते.

लोकांनी तानावर आणखीन एक मिनिट विश्वास ठेवला व दुर्गंधी येत असतानाही तोंडाला फडके बांधून काका थोरातचे प्रेत तपासले.

खरोख्खर! खरोख्खर तो हात काका थोरातच्या शरीराचा नव्हताच! काळा ठिक्कर पडला असला तरी त्याचा बायकी आकार आणि उजव्या हाताचा थोराड आकार यातील फरक सहज समजत होता.

काकडे कुटुंबियांनी आता प्रेतालाच लाथा घातल्या. त्याने काय होणार होते म्हणा? पण तानाला समाधान मिळाले. तो वेदनांनी ओरडतच सर्वांदेखत काकडे कुटुंबियांना म्हणू लागला..

"आई *** तुमची.. मला मारताय होय *****... सांगतो ते खरे वाटत न्हाय.. आ?? .. माझी हाडं तुटलीन... म्येलोय मी हितं... गावासामने ठोकलायत मला.... पाटलाकडं खटला करनार मी.."

काकडे कुटुंबिय आता हादरले. ज्या सावेळ्यात गेले पन्नास वर्षांहून अधिक त्यांच्या घराण्याचे वास्तव्य होते व सावेळ्यात जे सर्वात चांगल्या स्वभावाचे खानदान म्हणून परिचित होते त्यांनी भावनेच्या भरात हाफ मर्डर केलेला होता.

ते आता तानापाशी येऊन त्याची समजूत घालू लागले. ताना ओरडतच होता. त्याला काकडेंनी उपचार करण्याची तयारी आहे व नुकसान भरपाईचीही तयारी आहे हे सर्वांदेखत चार वेळा सांगितले तेव्हा तानाने आकडा सांगितला..

"ईस हज्जार... ईस हज्जा पायजंल.. "

"देऊ ताना.. लय येळा देऊ..."

"आनि एक मागनी हाये.."

"आनि एक??... कसली??"

"काका थोरातला अग्नी द्याचा न्हाय.. त्याचं तुकडं करून नदीकाठावं फ्येकायचं.."

"का?"

"गावाला शाप व्हता त्यो... गावावं त्याची अभद्र छाया व्हती... असल्यांना अग्नी द्याचा नस्तु..."

आता सगळेच चपापले.

चपापण्याचे महत्वाचे कारण होते.

सावेळा, दिवे आणि आजूबजूच्या गावांमध्ये किमान शंभर घरातली भूतबाधा आजवर काका थोरातने यूं घालवलेली होती. उगाच इतकी गर्दी नव्हती जमली! काका थोरात हा अनेक अंधश्रद्धांळूंचा मानसिक आधार होता. तसेच त्याच्या गरजा काहीच नव्हत्या. भूत उतरवण्याच्या बदल्यात दोन बाटल्या आणि एक मटनाचे पातेले मिळाले की तो खुष असायचा. त्याला नाही कपडे लागायचे ना पैसे! तरातरा यायचा, बाधा झालेल्या व्यक्तीचे भडक डोळ्यांनी काही क्षंण निरिक्षण करायचा आणि हा प्रकार झाड धरण्यातलाच आहे की काही वेगळा हे प्रामाणिकपणे सांगायचा. त्यामुळेच विश्वास होता त्याच्यावर गावकर्‍यांचा! त्यातही, झाडानेच धरलेले असेल तरीही तो स्वत;च्या क्षमतेत तो प्रकार आहे की नाही हेही स्पष्टपणे सांगायचा. ज्या वेळेस काकाने असे सांगितले असेल की हा प्रकार झाडाचा नाही, त्यावेळेस वैद्यकीय उपचारांनी व्यक्ती बरी होण्याची किमान पाच उदाहरणे होती. आणि काका जेव्हा असे म्हणेल की हे झाड आहे, तेव्हा भले भले डॉक्टर हात टेकायचे पण काका ते भूत काढायचाच! काका जेव्हा असे म्हणेल की हे भूत माझ्या आवाक्याच्या बाहेरचे आहे तेव्हा व्यक्ती दगावली अशी तीन उदाहरणे होती गावात! अन्यथा दिवे सारख्या टीचभर गावात हजार बाराशे माणसे जमलीच नसती. काका थोरात गेला ही बातमी सगळ्यांनाच हादरवून सोडणारी होती. आणि आता ताना म्हणत होता की त्याच्या प्रेताची विटंबना करायची.

काहीच समजेनासे झालेले होते. कुणालाच काही समजत नव्हते. ज्या काकाने आजवर कित्येक लोकांना नॉर्मल बनवले त्याच्या प्रेताची विटंबना? आणि ज्याने कित्येक लोकांचे भूत उतरवले त्याने मनीषा काकडेच्या मृतदेहाचा हात तोडायला लावून तो हात स्वतःच्या डाव्या हाताच्या जागी लावावा? तेही स्वतःच स्वतःचा दावा हात तोडून? हा कसली भयानक प्रयोग? ही कसली अभद्र सिद्धी? काय साध्य करायचं होतं त्याला? तो ज्या गुहेत राहायचा असे ताना म्हणतोय त्या गुहेत तर माणूस कधी पोचलाही नसावा असे वाटत आहे. पण मग खरोखर काका थोरात राहायचा कुठे? स्मशानाच्या मागून येताना तर दिसायचा! मग मागे नेमका कुठे राहायचा तो?

काका थोरात संत ठरणार की राक्षस हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावत होता. जमावाचे तर स्पष्ट मत होते. या माणसाने कुणालाही कधीही कसलाही त्रास दिलेला नाही. इतकेच काय तर तो कुठे राहायचा, कसा जगायचा याची गावाला कधी काळजीही करावी लागलेली नाही. आणि त्याचे कर्तृत्व विचाराल तर त्याने आमच्या डोळ्यांदेखत भलेभले झाडाने धरलेले लोक शांत केलेले आहेत. आणि त्याच्या बदल्यात त्याने मागीतले काय आहे तर फक्त दारू आणि मटन! जगातल्या कोणत्याही संतापेक्षा त्याचे कार्य मोठे आहे कारण त्याने निरपेक्षपणे असे प्रश्न सोडवले आहेत जे संशोधनाने कितीतरी पुढे पोचलेल्या वैद्यकीय शास्त्रालाही सोडवता आलेले नाहीत.

पण उत्तम काकडेने गर्जना केली की काका थोरातचा अंत्यविधी सामान्यपणे होणे याला त्याचा विरोध असून तो ते कधीच होऊ देणार नाही. काका थोरातच्या प्रेताची विटंबनाच व्हायला हवी.

मोठाच तिढा होता हा! काकड्यांना विरोध करून गप्प बसवणे गावकर्‍यांना अशक्य नव्हते. पण काका थोरातचा डावा हात बायकी आहे हा धक्का काकडेंचे म्हणणे मान्य करावे असे सुचवू लागला होता. ताण वाढू लागला होता. हा माणूस, काका थोरात, जो कधी कुणाला दिसायचाही नाही, कसा जगतो ते कळायचेही नाही, तो आता मेल्यावर हिरो ठरू लागला होता. आणि एकाही गावकर्‍याला कल्पना नव्हती की मेले ते काका थोरात नावाच्या एकशे तेवीस वर्षांपुर्वीच्या माणसाचे शरीर! काका थोरात म्हणून आपण ज्याला ओळखायचो तो मावशीच्या गेस्ट हाऊसस्वरुपी घरात नमा नावाच्या मुलीच्या रुपाने पोचलेलाही आहे.

ताण वाढू लागला तसा एक जाणत्यांचा गट बाजूला झाला. त्यात एक ब्राह्मण होता ज्याला पौरोहित्याची जबाबदारी सगळ्या गावातच पार पाडावी लागायची. एक शिक्षक, एक डॉक्टर, तीन ज्येष्ठ अनुभवी माणसे, एक पुढारी, त्याचे दोन सहकारी, पोलिस पाटलांचा स्थनिक सहकारी आणि एका मुक्कामी एस टीचा ड्रायव्हर असा एक गट बाजूला जाऊन चर्चा करू लागले. इकडे गावकरी आणि काकडे यांच्यात आता ताण वाढू लागला होता.

इकडे गेस्ट हाऊसवरून सतीश आणि अजित स्मशानावर आले होते. आज दिवे गावात काका थोरात गेल्याने प्रचंड गर्दी आहे हे पाहून ते उत्सुकतेने चालत स्मशानावर आले होते. त्यांना दिवे गावात राहायला येऊन दिड ते दोन वर्षेच झालेली असल्याने काका थोरात हे नांव काही वेळा ऐकलेले असले तरी ती इतकी महान हस्ती असेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. मावशींनी मात्र सांगितले होते की काका थोरात हे अनाकलनीय प्रस्थ आहे. तो भूत काढतो हे खरे आहे पण तो कुठे असायचा, काय करायचा काही कळत नाही. सतिश आणि अजित स्मशानावर पोचले तर त्यांना हा तिसराच वाद सुरू असलेला दिसला. येताना त्यांची दुपारच्या, नमाच्या प्रसंगावरूनच चर्चा चाललेली होती. 'नमा राहायला येत नाही आहे' असे तिच्या आईचे पत्र आले आणि तरीही ती कशी काय आली हा प्रश्न मावशींनी सर्वांदेखत तिला विचारला तेव्हा सर्वांना धक्काच बसला. नमाचा आवाज अगदी बायकी, नेहमीसारखा होता. हासत हासत ती म्हणत होती की आईने ते पत्र पाठवले अन नंतर माझे यायचे पुन्हा ठरले. मग पुन्हा पत्र पाठवत बसलो नाहीत आम्ही! त्यावर सतीशने विचारले की बाहेरच्या किराणावाल्याकडे फोन आहे की, तुम्ही पत्रापत्री का करत होतात! त्यावर ती म्हणाली की तिथला नंबर बहुधा बदलला असावा, आमच्याकडे असलेला नंबर लागत नव्हता. हे बोलताना मावशींना नमा अगदी पुर्वीसारखीच भासत होती. अजिबात पांढरी फटक नाही, चांगली तब्येत असलेली, डोळ्यात प्रेमळ आणि नॉर्मल भाव आणि आवाज अगदी पुर्वीसारखाच! दुपारी तिला काहीतरी होत असेल असे म्हणून सगळ्यांनी त्या प्रकाराकडे शेवटी दुर्लक्ष केले आणि वामकुक्षी घ्यायला गेले. आणि संध्याकाळी जेवायला बसणार तर ही बातमी! काका थोरात गेला. मावशींनी सरळ सांगितले. स्मशानावर जायची काहीच गरज नाही. एक तर भुते खेते नसतातच! तो काका म्हणे भुते काढायचा. मुळात ही अंधश्रद्धा आहे. आता तो मेल्यावर आपण कशाला जायला हवं आहे? पण सतिश आणि अजित बघत होते की सगळे गावच तिकडे लोटत होते. गंमत तरी बघून येतो असे मावशींना सांगून ते दोघेही निघाले आणि त्याच क्षणी नमा तिच्या खोलीतून जेवायला बाहेर आली. सतीश आणि अजित दारातून बाहेर पडताना ती अगदीच नॉर्मल होती.

पण दोन एक मिनिटांनी मावशी सहज म्हणाल्या अर्चनाला...

"जेवायच्या वेळेला गेले दोघे अगदी... काय जरूर आहे असल्या माणसाच्या अंत्यविधीला जायची??"

अर्चनाने होकारार्थी मान हालवेपर्यंत नमाने प्रश्न टाकलाच!

"कुणाची अंत्ययात्रा???"

मावशींनी पोळ्या लाटतानाच मागे वळून पाहिले आणि म्हणाल्या..

"गावात एक काका थोरात म्हणून होता... भुतंखेतं काढायचा म्हणे.. तो मेलाय... त्याच्या अंत्ययात्रेला गेलेत दोघे..."

शॉक! मावशी आणि अर्चना... दोघींनाही जबरदस्त शॉक लागला. कारण ते ऐकतानाच नमाच्या दोन्ही मुठी वळल्या गेल्या होत्या. आणि उजव्या हातात असलेला साधेवरण भाताचा घास दाबला गेला होता. त्यातून बोटांच्या फटीतून साधेवरण आणि भाताची शिते बाहेर येऊ लागली होती. नमाच्या चेहर्‍यावर अपार वेदना झाल्यासारखे भाव होते जे क्षणाक्षणाला सौम्य होत होते. आणि चवथ्या वा पाचव्या क्षणी ते भाव सौम्य होऊन एक मोठाच फरक पडला. एखादा अत्यंत दर्जेदार किंवा अती मजेशीर विनोद ऐकावा तशी नमा खदाखदा हासू लागली. हे तिचे हासणे सरळ सरळ पुरुषी थाटाचे होते. डोळे प्रचंड विस्फारलेले, जणू त्यात ते हासणे मावतच नाही आहे असे! जबडा हासण्यासाठी पूर्ण फाकलेला आणि मागे पुढे जोरजोरात डोलत नमा भेसूर हासत होती. भेसूर म्हणजे तिच्यामते अगदी नेहमीसारखीच, पण दिसायला अत्यंत भेसूर वाटत होते ते हास्य!

थरकाप उडालेल्या मावशींनी धसका घेतल्यासारखे विचारले..

"काय गं?? काय झालं???"

तोवर प्रचंड घाबरलेली अर्चना तिच्या खोलीत धावत निघून गेली. तिचा मुलगा मनू तिला रडताना दिसला. तिने त्याला जवळ घेऊन विचारले तर तो म्हणाला भिंतीवर पाल होती म्हणून रडलो.

इकडे मावशींनी देव्हार्‍यातून हनुमानाची लहान मूर्ती काढून नमाच्या समोर ठेवली. तिचे हासणे हळूहळू बंद झाले. अजूनही दचकलेल्या मावशींनी विचारले..

"काय झालं ग?"

चिरक्या आवाजात भेदरट असल्याप्रमाणे त्यांच्याकडे बघत नमा म्हणाली...

"काका थोरात केव्हाच मेला होता... सव्वाशे वर्षं झाली...."

विस्फारलेल्या डोळ्यांनी मावशी नमाकडे बघत होत्या. नमामध्ये काहीतरी सिरियस प्रॉब्लेम आहे हे त्यांना खात्रीलायक वाटू लागले होते. तिला काका थोरात माहीत असणेच शक्य नव्हते. आपल्या घरात मोठे संकट आलेले आहे याची मावशींना जाणीव झाली.

नमावर कसला तरी परिणाम झाला असावा असे वाटून मावशींनी तिच्याकडे लक्ष ठेवतच पोळ्या करायला सुरुवात केली. प्रचंड घबरलेल्या होत्या खरे तर त्या! त्यांनी ठरवले होते की उद्याच हिच्या आईला फोन करून काय ते विचारायचे आणि ताबडतोब निर्णय घ्यायचा. त्यातच त्यांनी ती हनुमानाची मूर्ती तिच्या खोलीत हळूच नेऊन ठेवली. आत्ताच्या आत्ता तिला हाकलून देणे चुकीचे ठरणार होते. काही झाले तरी मगाशी ती व्यवस्थित वागलेली होती. हे झटके कशामुळे येत असावेत ते शोधायला हवे होते. तिच्यात नॉर्मल वागण्याची कुवत नक्कीच आहे हे त्यांना माहीत होते.

तिकडे अर्चना कधी एकदा सतीश येतोय असा विचार करत होती. ती जेवण सोडून तशीच उठली होती. अर्धे पान तसेच होते. सरळ होते की सतीश आल्याशिवाय ती आता पुन्हा स्वयंपाकघरात जेवायला येणारच नव्हती. पळून येऊन आता दहा मिनिटे झाली असावीत. तिलाही लाज वाटली. आपण एकट्याच पळून आलो, मावशी बिचार्‍या तिथेच थांबल्या. काय झले असेल तिथे?

अर्चनाने मनुचे लक्ष इतरत्र गुंतलेले आहे हे पाहून हळूच खोलीच्या बाहेर पाऊल टाकले. पण तेवढ्यात मनुने हाक मारली "आई"! अर्चना पुन्हा बेडपाशी आली. मनुला जवळ घेऊन थोपटले आणि म्हणाली "आत्ता आलेच हं मी?"! पण मनूने तिचा पदर धरला. त्यची समजूत घालून तो पदर त्याच्या हातातून काढताना अर्चनाला एकदम घेरीच आली. पलंगाचा आधार घेऊन ती कशीबशी बसली. दोन तीन मिनिटांनी तिला बरे वाटल्यावर उठली. तेव्हा मनू तिच्याकडे फक्त बघत होत. त्या चिमण्या जीवाला कळलेच नव्हते की आत्ता आईला बाऊ झलेला होता. पुन्हा त्याला थोपटून अर्चना खोलीच्या बाहेर आली.

अंधार्‍या बोळाच्या पलीकडे स्वयंपाकघराचा प्रकाश पडलेला होता. आवाज फक्त भांड्यांचेच येत होते. बहुधा नमाचे जेवण झाले असावे असे व ती तिच्या खोलीत गेली असावी अर्चनाला वाटले. जपून एकेक पाऊल टाकत ती स्वयंपाकघराकडे जाऊ लागली.

तिच्या खोलीच्या पुढे अपोझिट साईडला अजितची खोली होती व त्या खोलीची खिडकी बोळातच उघडत होती. अजितच्या खोलीपुढे नमाची खोली व तिलाही तशीच खिडकी! नमाच्या खोलीसमोर, म्हणजे सतीश व अर्चनाच्या खोलिच्य शेजारी एक रिकामी खोली होती व ती बाहेरून बंद होती. बोळ संपल्यावर स्वयंपाकघर व त्याच्या मागे मावशींच्या दोन खोल्या! स्वयंपाकघराचा अर्धवट प्रकाश व मावशींची चाहुल इतकाच काय तो जिवंतपणाचा भास होता. बाकी सर्व काळोख आणि शांतता! नमाच्या खोलीच्या खिडकीच्या दाराच्या गॅपमधून मंद प्रकाशाची एक तिरीप येत होती. ती पाहून अर्चनाला समजले की नमा आता खोलीत गेलेली आहे.

अर्चना स्वयंपाकघरात चालली होती कारण तिला हे बघायचे होते की मावशींना भीती तर वाटलेली नाही ना! आपण एकट्याच धावत निघून आलो हे बरे केले नाही असे तिला वाटत होते. एकदा असेही मनात आले की मावशींच्या सोबत स्वयंपाकघरातच थांबूयात! पण मनूला त्या नमासमोर घेऊन जायची अर्चनाला फार भीती वाटत होती. दुपातीच जो प्रकार झाला तो अजून कुणालाच समजलेला नव्हता. मनूच्या डोळ्यांभोवती आलेले रक्त आले कुठून याचा छडा लावायचा प्रश्न बाजूलाच राहिला होता कारण नमा अचानक व्यवस्थित वागू लागली होती. पण अर्चनाचे मन आईचे होते! आपल्याबाळाच्या डोळ्यांखाली रक्त आलेच कसे हा प्रश्न तिला छळत होता. नमा या वास्तूत असूच नये हे मावशींना पटवणे इतकेच हातात होते व ते कसेही करणारच होती.

त्या बोळात तिने पहिले पाऊल टाकले आणि तिला जाणीव झाली. आपण कशात तरी प्रवेश केलेला आहे. आजवर या बोळात रात्री बेरात्रीही जायला तिला काहीच वाटायचे नाही. कॉमन बाथरूम असल्यामुळे मनूला घेऊनही जावे लागायचे. पण तेव्हा काहीच वाटायचे नाही. आज पहिले पाऊल टाकल्यावरच तिला असे वाटले की हवेमध्ये एक अशी लहर आली आहे जी आपल्याला असह्य बोचतीय आणि पुढे जाऊ द्यायला विरोध करतीय! अर्चनाला मावशींची अधिकच काळजी वाटू लागली. तिने धीराने दुसरे पाऊल टाकले आणि हाक मारली..

"मावशी???... अहो मावशी... "

पण तिला असे वाटले की तिचा आवाज तिला स्वतःला तरी ऐकू आला की नाही!

पुढे जावे की नाहीहेच समजत नव्हते. थंड हवेतही तिला जाणीव झाली की घाम फुटत आहे. भीती! भीतीची पहिलीवहिली जाणीव आज त्या घरात होत होती. आजवर जे अजितभावजींच्या विनोद बुद्धीने हसत असायचे, मावशींच्या शांत मुद्रेने तेवत असायचे आणि मनूच्या किलबिलाटाने मोहरत असायचे ते घर आज भीतीच्या सावटाने शहारत होते, थरारत होते. मनाचेच खेळ की काय असाही विचार अर्चनाने करून पाहिला. ही तीच भिंतीतली खुंटी जिचा आधार आपण घेतो अंधारात चालताना! आज आपल्याला ही खुंटी अशी मधेच आल्यासारखी का वाटतीय?

अर्चनाने खुंटीवरून मान फिरवली आणि प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून नमाच्या खिडकीतून येणार्‍या प्रकाशाच्या मंद परंतु गूढ तिरिपेकडे मान वळवली.

पाणी! पाणी पाणी झाली अर्चना! थिजल्याप्रमाणे! आपण जिवंत आहोत इतकीच जाणीव उरलेली होती.

नमाच्या खिडकीचे दार आता लावलेले नव्हते. ते उघडे होते. आणि खिडकीत... खिडकीत नमा बसलेली होती... चेहर्‍यावर एका वेडाची झाक.. ओठांवर अभद्र हास्य.. जे पाहून धाय मोकलून रडावेसे तरी वाटेल किंवा पळून जावेसे वाटेल.. आणि... ती नजर... जणू अर्चना म्हणजे भक्ष्यच आहे अशी अर्चनाकडे लालसेने पाहणारी नजर... हेही... हेही ठीक होते... ती तशीच वागत होती दुपारपासून.. पण ... पण सांगत काय होती ती??? नमा मान हालवून काहीतरी सांगत होती... नको जाऊस.. नको जाऊस... स्वयंपाकघरात नको जाऊस.. प्लीज नको जाऊस..

अर्चना! आत्ता त्या काळोखामध्ये अर्चनाला चार पावले मागे असलेल्या आपल्या स्वतःच्या खोलीतून आपल्या निरागस बाळाचा, मनूचा आवाज येत नव्हता.. समोर काही फुटांच्या अंतरावर असलेल्या स्वयंपाकघरातून कसाबसा सांडत असलेला प्रकाश दिसत नव्हता... तिला स्वत्वाची जाणीव उरलेली नव्हती... तिचा झाला होता पुतळा... ज्याचे पाय जमीनीत घट्ट रोवले गेले आहेत.. एक हात शेजारच्या भिंतीला टेकवलेला आहे... नजर नमाच्या चेहर्‍यावर खिळलेली आहे.. दुसरा हात स्वतःच्या कंबरेशेजारी लटकतो आहे आणि संपूर्ण शरीर घामाने निथळलेले आहे...

नको जाऊस... तिकडे नको जाऊस तू...

नमा अजूनही अभद्र चेहरा करून नकारार्थी मान हालवून तेच सुचवत होती.. आणि खिळलेली, थिजलेली अर्चना तिच्याकडे फक्त पाहण्याशिवाय काहीही करू शकत नव्हती.. नमा बोलत नव्हतीच... पण मान हालवून जाऊ नकोस असे ठामपणे सांगत होती.... अचानक अर्चनाने रोखलेला श्वास कसाबसा बाहेर आला.. भीतीने तो बाहेरही पडत नव्हता.. धपापल्यासारखी अर्चना अचानक भराभर श्वास घेऊ लागली.. आता ती किंचाळणार होती.. अगदी नैसर्गीकपणे.. कारण नमाच्या चेहर्‍यावरचे ते भाव, ती तिची खिडकीत बसलेली आकृती आणि नको जाऊस नको जाऊस अशी भीतीदायक मागणी... अर्चनाने आपले दोन्ही हात तोंडावर धरले.. पण तोंडातून आवाजही फुटत नव्हता.. नमाही खिडकीतून हालत नव्हती.. हे सगळे दहा सेकंद असेच चाललेले होते... डोळे प्रचंड विस्फारून अर्चना घशातून किंकाळी फोडण्याचा शेवटचा निर्वाणीचा प्रयत्न करणार तोच...

... ते नको ते.. भयानक... भयानक दृष्य तिला दिसले... तेवढे व्हायला नको होते... नाहीतर ती घाबरून बोळात खाली पडली नसती... पण पडलीच... तिला ओरडता आलेच नाही.. नमाने ती सोय बरोब्बर केलेली होती.. किंचाळूच शकली नाही अर्चना.. कारण तिने ते पाहिले होते.. जे नमाने दाखवले होते तिला..

नमाने खिडकीत बसून आपला डावा खांदा वर केला होता... आणि ... आणि तिच्या त्या डाव्या दंडाला... कोपराच्या पुढे.. काहीच नव्हते.. काहीही नव्हते... तिथे होती एक ओली जखम..मांसाचा एक लटकता लगदा.. ठिबकणारे रक्त... कोपराचे हाड अर्धवट तुटलेले.. आणि असे असूनही.. नमाच्या चेहर्‍यावर मात्र एक अभद्र हसू...

हे कधी झाले?? हिचा हात कधी तुटला?? कसा काय तुटला?? हे प्रश्नही अर्चनाच्या मनात येऊ शकले नाहीत.. ती खाली कोसळली... पण बेशुद्ध झाली नाही.. कोसळल्यावरही तिची नजर नमाच्या खिडकीवरच खिळलेली राहिली...

पण अचानक.. अचानक नमाने घाबरून केल्याप्रमाणे खिडकी लावून टाकली. त्याच क्षणी बोळातले अभद्र सावट हवेतून निघून गेल्याची जाणीव अर्चनाला झाली. आता ती ओरडणार होती. स्वतःच्या बळावर उभी राहणार होती... ती उभी राहिलीही... आणि खच्चून ओरडण्यासाठी घशाच्या शिरा ताणल्या.. त्याच क्षणी..

"काय गं?? इथे काय करतीयस??"

मावशी घराच्या बाहेरच्या दारातून आत आल्या होत्या..

थिजलेली अर्चना हादरून मावशींकडे बघत होती. मावशींनी तिला धरून गदागदा हालवले व एकदा नमाच्या खिडकीकडेही पाहिले..

मावशी बाहेरून कशा काय आल्या हे अर्चनाला समजेना.. त्या आत स्वयंपाकघरात आवरत असताना आपण बोळात आलो.... मग त्या बाहेर गेल्या कधी??

पण ते विचारायची तिची आत्ता परिस्थितीच नव्हती...

मावशींना समजले की काहीतरी प्रकार झालेला आहे.. त्यांनी गदागदा हालवत अर्चनाला स्वयंपाक घरात नेले.. लहान मनूसमोर नको ते प्रकार नकोत म्हणून तिच्या स्वतःच्या घरात न्यायच्या ऐवजी स्वयंपाकघरात नेले..

"अर्चना????? अगं काय.... काय झालं काय??? हे.. पाणी घे.. पाणी घे.. काय झालं??? काय पाहिलंस तू??? "

"ती... न.. खिडकीत.. न.. मा .. होती.. "

मावशीही शहारल्या त्या वाक्याने! वास्तविक नमा तिच्या खिडकीत दिसणे यात काही विशेष नव्हतेच! पण अर्चना ज्या पद्धतीने घाबरलेली होती त्यावरून मावशींना तो प्रकार साधासुधा नसणार हे जाणवलेले होते..

"हनुमान ठेवलाय मी तिच्य खोलीत.. घाबरू नकोस.. झालं काय ते सांग.. "

"ती.. खिड.. नमा.. खिडकीत होती... "

अर्चनाच्या चेहर्‍यावरील भाव आत्ता एखाद्या लहान मुलीसारखे होते.

"काय केलं तिनी तुला??? "

मावशी अर्चनाला कुशीत घेऊन गदागदा हालवत विचारत होत्या..

अर्चनाने चेहर वर करून मावशींकडे पाहिले...

"का... ही.. काहीच.. नाही.. "

"अगं मग घबरलीयस का एवढी?? काय झालं काय?? "

"तिचा हात.. डावा.. "

"हं?? काय झालं तिच्या हाताला??"

"तु... टला.."

"काय तुटला??"

"ति... चा डावा हा.. त तुटलाय..."

धाडकन मावशींनी अर्चनाला स्वतःपासून लांब ढकलले. आणि स्वतःच्या दोन्ही कानांवर हात ठेवत ओरडल्या..

"अगं काय बोलतीयस??? काय बोलतीयस काय तू?? .. "

अर्चनाला आता जे सांगायचे ते सांगून झाल्यामुळे श्वास घेता येऊ लागला.. धाप कमी झाली.. आता ती स्वयंपाकघराच्या फरशीवरच पडून आक्रंदू लागली..

मावशी डोळे फाडून अर्चनाकडे पाहात होत्या..

"काय बोलतीयस अर्चना??..."

"ख... र्रच.. मावशी.. अहो.. डावा... हात कोपरापा...सून.. नुसतं रक्त.. आणि मांस... मावशी.."

मावशी ताडकन उठल्या. त्या नमाकडे जाणार असा अंदाज आल्याबरोब्बर अर्चनाने सर्व शक्तीनिशी त्यांना पकडले. आणि रडत रडत सांगितले.

"नको.. तिचे दार नका उघडायला लावू आता.. मनू.. माझा मनू.. दुपारी तिच्यामुळेच काहीतरी झालंय त्याला.. मावशी.. मला घरी सोडा हो.. मलामनूकडे जायचंय.. वाटेत ती आहे.. खिडकीत.. मला जाऊदेत.. सोडता का घरात?? तुम्हीही तिथेच थांबा... "

मावशी अर्चनाला चुचकारत होत्या. काही क्षणांनी म्हणाल्या..

"घाबरू नकोस.... पवित्र घर आहे हे.. चल.. कही होत नाही.. मी सोडते तुला तुझ्या घरी.. आत्ता सतीश अन अजित येतील.. चल्ल.. उठ.. "

अर्चना कशीबशी मावशींच्या आधाराने उठली... तेवढ्यात मावशींनी ते वाक्य टाकले... जे ऐकून अर्चना गळाठलीच...

"आणि मी आवरलं असतं की गं सगळं स्वयंपाकघरातलं.. तू तेवढ्यासाठी कशाला आलीस इथे मनूला सोडून... "

अर्चना मृतवत नजरेने मावशींकडे पाहात होती. स्वयंपाकघर लख्ख आवरून ठेवलेले होते. आणि मावशींनी आवरलेलेच नव्हते.. त्या घरच्याबाहेर होत्या.. कचरा टाकण्यासाठी गेल्या होत्या..

अर्चनाला आणखीन एक धक्का बसला... ती अजून जमीनीवर बसलेलीच होती.. मावशी तिला उठवण्यासाठी उभ्या राहिलेल्या होत्या.. मावशींकडे हतबुद्ध नजरेने पाहात अर्चना म्हणायचा प्रयत्न करू लागली..

"मी.. मी.. कुठे... काय आव.. र..."

'मी कुठे काय आवरलंय' हा तिचा प्रश्न पूर्ण फुटलाच नाही तोंडातून.. कारण.. एक हादरवणारे दृष्य तिला दिसले होते...

मावशींकडेवर मान करून बघत असतानाच तिची नजर माळ्याकडे गेली होती... आणि त्या माळ्यावरून..

... तो चाललं होता.. स्वयंपाकघरातले सगळे आवरून परत मूळ स्थानाकडे चालला होता तो... ..

एक रक्ताने लडबडलेला.. कोपरापासूनचा हात ... फक्त हात.. !!!

भयाने अर्चना बेशुद्ध पडली.. तेव्हाच अजित आणि सतीश स्वयंपाकघरात आले आणि आत काय झाले आहे हे बाहेरून दिसत नसतानाच उंबर्‍याबाहेरून अजित जोरात म्हणाला..

"मावशी.. अहो धक्कादायक प्रकार झाला.. काका थोरातचे प्रेत उठून उभे राहिले.. लोक पळून गेले.. "

गुलमोहर: 

सानी, कल्याणी व रोहित राव,

मनापासून आभारी आहे.

सानी - वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

भन्नाटच चाललीय कादंबरी.
आवडली.
पुढिल भागांच्या प्रतिक्षेत.

छान भाग!! झक्कास, आवडले , खुप दिवसांनी माबो वर आले आणि अचानक हे दोन भाग दिसले --- काय वाचू हा प्रश्नच उरला नाही Happy

अहो मी माझी ऑफिसची कामे सोडून तुमच्या या गोष्टी वाचते..आणि साहेबाच्या शिव्या खाते... >>>> अनुमोदन

चर्चाही खुप आवडली! आघोरी विद्येचे प्रकार वाचून अंगावर सरसरून काटा आला... >>>> आघोरी विद्या चांगल्यासाठी वापरली तर खरेच चांगले आहे शेवटी ती ही एक विद्याच आहे

धन्यवाद बेफीकीरजी, वेगवेगळे विषय हाताळल्या बद्द्ल Happy

बेफिकिर
<<<
मला माझ्यापेक्षा कमी कालावधिच्या सदस्याकडून आलेला प्रतिसाद हा ड्यु आय चा आरोप होण्याचे पोटेन्शियल असलेला वाटतो.

सच्चे प्रतिसाद देणारेही त्यामुळे बिथरतात असा अनुभव आहे. लोभ असू द्यावात!
>>>>

हे काहि समजले नाहि मला.

Pages