मला पोलिस पकडतो तेव्हा.....भाग १

Submitted by मोहना on 9 May, 2011 - 17:23

चौकात गाडी उभी केली. लाल दिवा हिरवा व्हायची वाट पहात होते. गाडीत पोरं (म्हणजे दोनच बरं का) आणि नवरा भरलेली. हीऽऽऽ बडबड प्रत्येकाची. काय झालं कुणास ठाऊक पण डावीकडे वळण्याचा दिवा चमकत होता आणि मी गाडी नेली सरळ.

"आई.....लाल वरुन नेलीस गाडी"

"पकडलं तुला कॅमेर्‍यात."

"आता येईल तुला पत्र, भरा पैसे." नवरा आणि मुलगा दोघांच्या आवाजात आनंद मावत नव्हता. एकाच्या मनात सुडाचा आनंद, तर एकाला फुकट करमणुक असा मामला.

"अरे गाढवानो, अपघात नाही झाला ते सुदैव समजा. मला टिकीट (बस टिकीट नव्हे, चुकीच्या कृत्याबद्दल दंड) मिळणार याचाच आनंद तुम्हाला." हे माझं पहिलच टिकीट असणार होतं त्यामुळे नव‍र्‍याला मिळालेल्या टिकीटांचा पाढा माझ्यावर गाडी घसरायच्या आधीच मी घडाघडा म्हटला.

"तुझ्यामुळे इन्शुरन्स वाढला आहे."

"आता तू भर घालते आहेस. आणि सारखी माझ्या ड्रायव्हिंगच्या नावाने खडे फोडायचीस ना. आता बघू या तुझी मजा." त्याच्या हातात चांगलच कोलीत मिळालं होतं.

"बघू, येवू दे तर पत्र, नंतर बोल तुला काय बोलायचं ते."

दुसर्‍या दिवसापासून माझा बराचसा वेळ पोस्टमन कधी येतो त्याची वाट पहाण्यात जायला लागला. धावत पळत जावून पत्रपेटी उघडायची ही घाई उडे. महिना झाला तरी प्रेमपत्र काही आलं नाही. नवरा आणि मुलगा दोघांनाही फार दु:ख झालं. नवरा तर तिकीट देणार्‍या माणसांना शोधायलाही निघाला. कसंबसं थोपवलं त्याला तरी म्हणालाच,

"कासवाच्या गतीने चालवतेस म्हणून मिळत नाही कधी तुला टिकीट. ही एक संधी होती तीही घालवली या लोकांनी. कॅमेरे नीट तपासत नाहीत लेकाचे"

"माझी गती काढू नकोस, तू सशाच्या गतीने जातोस आणि मग लागतात पोलिस मागे."

"मी बाकीच्या गाड्या जेवढ्या वेगात जात असतात त्यांच्यामागून जातो."

"पण पोलिस तुलाच का पकडतो? बाकिच्या गाड्यांना का नाही?"

"ते तू पोलिसांना विचार."

"तू सगळ्या गाड्यांच्या पुढे जात असशील. मागून वरात गाड्यांची. लिडींग द ट्रॅफिक म्हणतात त्याला." जास्त वाद घालण्याच्या फंदात न पडता कधी ना कधी बायकोला टिकीट मिळेल या आशेवर त्याने तो विषय सोडून दिला.

मध्ये बरेच दिवस गेले आणि एका सुप्रभाती आम्ही सफरीला निघालो. मी नवर्‍याच्या वाहनचालन कौशल्याचे इतके धिडवडे काढलेले आहेत की असं कुठे लांबवर जायचं तर तो माझ्या हातात किल्ली देवून मोकळा होतो.

"एक पंधरा वीस मिनिटं उशीर होईल पोचायला." किल्ली देताना हे म्हणायची काही गरज?

"मी कासवाच्या गतीने चालवते." असं म्हणायचं आहे ना तुला? नवरा ऐकून न ऐकल्यासारखं करण्यात पटाईत आहे. ते तो माझ्याकडूनच शिकलाय असं त्याला वाटतं. आत्ताही तसंच केलं त्याने. पण मुलगा खो, खो करुन हसला.

"धर तू चालव." हातातली किल्ली मुलावर फेकून मारावी असं वाटत होतं. आवाजावरुन गर्भित धमकी जाणवली असावी त्याला. त्याने पटकन माघार घेतली. (नवरा केव्हा शिकणार हे?)

"नको तूच चालव. आणि तू सावकाश चालवतेस त्यामुळे भितीही नाही वाटत." ही मगाचच्या खो खो हसण्यावरची सारवासारवी.

सगळे गाडीत बसलो. जरा रागातच गाडी मागे घेतली आणि सुळक्कन रस्त्यावर आणली. वहातूक फार नव्हती. दोन तासात इच्छीत स्थळी पोचणार होतो. रस्त्यावर वाहनच नाहीत म्हटल्यावर मला चेव चढला. नाही तरी कधीतरी सशाची गती मलाही दाखवून द्यायचीच होती. मी गाडीचा वेग एकदम वाढविला. नवरा अचंबित झाला, मुलगा ताठ होवून बसला. मुलीने देहाभोवती आवळलेला पट्टा हाताने घट्ट धरला.

"अगं सावकाश चालव. घाई नाही आपल्याला."

"आता का? कासवाची गती ना माझी?" पुन्हा मी पाय जोरात दाबला. गाडी जीव घेवून पळायला लागली. पाचावर धारण बसल्यासारखी शांतता गाडीत पसरली. आजूबाजूच्या थोड्याफार गाड्या किती सावकाश जातायत असा तुच्छ कटाक्ष प्रत्येक गाडीला देत मी मैलांचा हिशोब करत होते. अजून दहा मैल. थोडा वेग वाढवला तर पाच मिनिटात नेवून सोडीन गाडीतल्या जनतेला. दोन तासाचं अंतर दिड तासापेक्षाही कमी वेळात. त्यानंतर बहुधा सर्वाचाच डोळा लागला. घाबरुन की थकून...? कोण जाणे. पण माझा आत्मविश्वास दुणावला. सशाची गती माझ्यातही येवू पहातेय या कल्पनेनेच मी खुष झाले.

क्रमश:

गुलमोहर: 

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
ammi - 'पण पहिला भाग लवकर संपवला....' लांबण लागली आहे असं नको व्हायला नं म्हणून.
परदेसाई - तंगवत ठेवलं आहे हे कसं कळणार ना मग :-).
विशाल, वर्षू नील - शुक्रवारपर्यंत टाकते पुढचा भाग