आई - तुमची आमची

Submitted by SHANKAR_DEO on 9 May, 2011 - 07:50

लख्ख वाळवंटात फुलून यावी जाई
अशीच असते बाबांनो तुमची आमची आई

आभाळ पडावे थिटे अशी तिची माया
क्षणाक्षणाने मनाचा तीच रचते पाया
प्रेमाचा झारा तिचा अटत कधी नाही
अशीच असते बाबांनो तुमची आमची आई

तिच्याजवळ असतात गोष्टी आणि गाणी
आपल्या पायी काटा की तिच्या डोळ्यात पाणी
कळत नही तिच्यासंगे दिवस कसा जाई
अशीच असते बाबांनो तुमची आमची आई

स्पर्ष तिचा असा की दु:ख जाते दूर
मुलांसाठी मनी सदा आनंदाचाच पूर
स्वर्गामधले सूर ती गळ्यामधून गाई
अशीच असते बाबांनो तुमची आमची आई

कृष्णाचे मोरपीस जणू तिचा हात
धम्मकलाडू देताना रडत असते आत
मुलांचे सारे करताना थकत कधी नाही
अशीच असते बाबांनो तुमची आमची आई

मुले झाली मोठी तरी तिला वाटतात छोटी
भरल्याडोळी लेकीची भरत असते ओटी
थरथरत्या हाताने हात ठेवते डोई
अशीच असते बाबांनो तुमची आमची आई

थकली आता बिचारी सा-यांचे करून
नातवंडात रमणे तिला पावते भरून
उम-यात अडला पाय
दुरुन डोळे भरुन पाही
अशीच असते बाबांनो तुमची आमची आई

- शंकर पु. देव

गुलमोहर: 

आवडली Happy

छान