कोकण : नदीची नजाकत.

Submitted by भाऊ नमसकर on 8 May, 2011 - 01:04

कोकणातल्या मला भावलेल्या कांही सौंदर्यस्थळाना व वैशिष्ठ्याना माझ्या कच्च्या चित्रकलेने व जमेल तशा भाषेत मी इथं उजाळा देण्याचा प्रयत्न केला. त्याला मिळालेल्या भरीव प्रतिसादाने प्रोत्साहित होऊन [ भुरकटून जावून, हें अधिक योग्य ] मला खूपच आपुलकी असलेल्या कोकणाच्या आणखी एका पैलूवर मी एक-दोन 'पोस्ट' टाकण्याचं धार्ष्ट्य दाखवत आहे; मायबोलीकराना एवढाच दिलासा कीं या विषयावरचा हा माझा शेवटचाच आगाऊपणा असेल.
234_0.JPG

मराठी साहित्यात, नाटक-सिनेमात कोकणातील नद्या व खाड्यांशी निगडीत जीवनावर फारसं लिहीलं, चित्रीत केलं गेलेलं नाही, असं आपलं मला वाटतं [ चिं.त्र्य., मधु मंगेश कर्णिक इ. अपवाद वगळता]. कोकणात सदा 'गाज'त असलेल्या समुद्राच्या अथांग भव्यतेनेही नद्या- खाड्यांच्या मोहक नजाकतीवर तसा अन्यायच केला आहे. पूर्वी मी बोटीने गोव्याला गेलो तेंव्हां माडवीच्या पात्रात बोट शिरल्यावर डेकवरून दुतर्फा जो नजारा दिसला त्याची आठवण आजही मनावरची मरगळीचीं धूळ झटकायला मी वापरतो. सिंधुदुर्गातल्या कर्ली नदीवर मी अगदी लहानपणापासून मनस्वी प्रेम केलं, करतो व करतच रहाणार आहे; म्हणून तिलाच प्रातिनिधीक समजून कोकणातील नद्यांविषयीं माझं हे हितगुज.

वसई, धरमतर, दाभोळ इथल्यासारख्या कांही मोठ्या खाड्या सोडल्या तर माल वाहतुकीला कोकणातल्या नद्या-खाड्या खास सोईच्या नाहीत हे मान्य करूनही त्यांचा व्हावा तितकाही उपयोग करून घेतला जात नाही हे मात्र मला खटकतं. पूर्वी कर्ली नदी-खाडीतून अगदी नेरुरपार, वालावलपर्यंत मोठी होडकी मालवणहून गलबतांतून आलेला माल [ विशेषतः मंगलोरी कौलं ] घेऊन येत. वेगवेगळ्या गांवच्या आठवड्याच्या बाजारात 'दुकान' लावणारे व्यापारीही माल नेण्या-आणण्यासाठी नदीचा वापर करत. नदीकांठची कुटूंबंही नारळ, नारळाची झापं, गवत, लग्नाची वर्‍हाडं इ.च्या जवळपासच्या वाहतूकीसाठी होडीचा उपयोग करतही. पण माझ्या लहानपणीसुद्धा मी कर्लीची खाडी होड्या- जहाजानी गजबजलेली कधी पाहिली नाही. मग तर रस्ते, पूल व एस्टी आल्या व नदी-खाडीचा हा किरकोळसा वापरही बंद होत आला. ऐलतीर व पैलतीर जोडणारी 'तर' सोडली तर कोकणातल्या, विशेषतः सिंधुदुर्गातल्या, नद्यांवर प्रवासी वाहतुक होताना दिसत नाही. दुतर्फा नारळी-पोफळीच्या बागा असलेल्या तिथल्या स्वच्छ नदी/ खाड्यातून प्रवास करणं हा बर्‍याच ठीकाणी इतका सोईचा व आनंददायी अनुभव असूनही, स्थानिक लोकांत त्याबद्दल आकर्षण दिसून येत नाही याचं मला नेहमीच आश्चर्य वाटत आलेलं आहे [कदाचित,याचं कारण, मालवणी म्हणच वापरायची तर, ' जवळची व्हकाल खुरडी ', हें असूं शकेल; अर्थ : नेहमीच्याच पहाण्यातील मुलगी ही 'नवरी मुलगी' म्हणून नजरेत नाही भरत ! ]. आत्तां पर्यटकांसाठी यांत्रिक व सजवलेल्या होड्या, हाऊस बोटीही, नदीपात्रात मिरवायला लागल्यावर मात्र स्थानिकानाही त्याचं असं बाहेरून आयात झालेलं आकर्षण खुणवायला लागलंय, हेही खरं !

इथल्या नद्या/खाडीत दिसणार्‍या होड्यांत फार विविधता नसली तरी त्यांच्या आकारानुसार त्यांची खास ओळख असतेच. साधारणपणे ह्या होड्या झाडाच्या मोठ्या फांद्या किंवा खोड कोरूनच केलेल्या असतात. [गलबतासारख्या लाकडाच्या आडव्या फळ्या जोडून नव्हे ]. आंब्याचं जुनं झाड याकरता उत्तम मानलं जातं. रूंद पाठीच्या होडीला 'पगार', लांबलचक मोठ्या व जड होडीला 'सौदा', होडीच्या वरच्या बाजूला फळ्य्या जोडून मालवाहतुकीसाठी सोईस्कर बनवलेल्या होडीला 'होडकं' इ. स्थानिक नावं प्रचलीत आहेत. मुख्यतः प्रवासी वाहतूक करणार्‍या 'तरी'च्या होड्याना सुरक्षिततेसाठी एक जोड दिली जाते त्याला 'उलांडी' म्हणतात. [ माझ्या रांगड्या चित्रकलेचा वापर करून या होड्यांची 'सँपल्स' दाखवण्याचा प्रयत्न खाली केला आहे ]. मासेमारीसाठी वापरल्या जाणार्‍या होड्या अतिशय चिंचोळ्या,हल़क्या, वळवायला सोप्या व चालीला जलद असतात; सरावाशिवाय त्यांत बसणंही कठीण. अति चपळ व सर्रकन दिशा बदलणार्‍या माशांच्या थव्यांचा पाठलाग करून नेमकी जाळेफेंक करायला अशाच होड्यांची गरज असते.
boats23.JPG

नदी/खाडीतल्या होड्या शीडाचा किंवा होडीलाच मागच्या बाजूला जोडलेल्या सुकाणूचा फारसा वापर करत नाहीत. हलक्या व लहान होड्या वल्ह्याचा व जड होड्या लांब बांबूच्या काठीचाच याकरता वापर करतात; पण वार्‍या ऐवजी भरती- ओहोटीच्या वेळा साधून समुद्राकडून व समुद्राकडे असणार्‍या पाण्याच्या ओढीचा वापर वल्ह्याच्या साथीला ह्या होड्या करून घेतातच . अर्थात, नदी /खाडीतून तट्ट शीड फुगवून, पाणी कांपत जाणार्‍या क्वचितच दिसणार्‍या होडक्याचा रुबाब कांही आगळाच !

सिंधुदुर्गातील नद्या/खाड्या तशा नशीबवानच म्हणायला हव्यात; रायगडातल्या पाताळगंगा, अंबा [ व त्या मिळतात ती धरमतरची खाडी], कुंडलिका [ रोहा], सावित्री [महाड] व रत्नागिरी जिल्ह्यातली वशिष्ठी [चिपळुण] या नद्यांसारखं औद्योगिक प्रदूषणाचं गटार होण्याचं दुर्भाग्य तरी त्यांच्या वाट्याला नाही आलेलं - निदान अजून तरी ! त्यामुळे येथील नदी/खाडीतील स्वच्छ, चविष्ट मासे हेही अजून एक मोठं आकर्षणच असतं. कांहीशी वर्दळ इथल्या नद्यांवर जाणवते ती या मासेमारीमुळेच . इथले मुख्य मासे म्हणजे - मुडदुश्या [ सुळे, रेणव्या, ], गुंजल्या [ बोय, बोयट्या], तांबोशी, काळिंद्र, मोदकं [येरल्या ]व कोळंबी इ.इ. शिवाय , तिसर्‍या, मुळ्ये हे 'शेल फिश'ही इथं मुबलक मिळतात. नदीच्या उगमाजवळच्या, खाडीच्या खारेपणाच्या आवक्याबाहेरच्या भागात गोड्या पाण्यातील मासेही आपली मक्तेदारी टिकवून आहेतच.

या पाल्हाळिक प्रस्तावनेनंतर, दिवसा-रात्री व ऋतुमानानुसार बदलणारे नदीचे 'मूड' पहुया पुढच्या भागात !

[क्रमशः]

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वा ! भाऊ, काय मस्त लिहिलंत !
शोभा १२३, मी प्रतिसाद वाचत असताना , जे मी लिहिणार होते ते सर्व तुच लिहिलेस, त्यामुळे आता फक्त मी तुझ्या प्रतिसादाला "मम" असे म्हणते.

<<माका अहो-जाहो करु नकात, माझ्या नावाच्या शेवटी 'जी' लाव नकात... माका खूप लाजल्या सारख्या होता... >>
भाऊ काकानु ,तुम्ही कायव लिवलास तरी प्रतिसादात हयो वरचो प्रतिसादात ठरलेलोच आसा वाटता. Lol

भाऊनु, तुमच्या 'कुंचल्या'प्रमाणे 'लेखणी' पण मस्त चलता. वाट बघतो पुढ्च्या लिखाणाची.>>>> अगदी. अगदी.

छानच लेख, पण शेवटी आवरल्यासारखा का वाटला? पुढल्या वेळी आणखी लिहा. आमच्यासारख्या शहरात लहानाचे मोठे झालेल्यांना हाच एक मार्ग आहे ह्याबद्दल वाचायचा. Sad

Pages