कोकण : नदीची नजाकत.

Submitted by भाऊ नमसकर on 8 May, 2011 - 01:04

कोकणातल्या मला भावलेल्या कांही सौंदर्यस्थळाना व वैशिष्ठ्याना माझ्या कच्च्या चित्रकलेने व जमेल तशा भाषेत मी इथं उजाळा देण्याचा प्रयत्न केला. त्याला मिळालेल्या भरीव प्रतिसादाने प्रोत्साहित होऊन [ भुरकटून जावून, हें अधिक योग्य ] मला खूपच आपुलकी असलेल्या कोकणाच्या आणखी एका पैलूवर मी एक-दोन 'पोस्ट' टाकण्याचं धार्ष्ट्य दाखवत आहे; मायबोलीकराना एवढाच दिलासा कीं या विषयावरचा हा माझा शेवटचाच आगाऊपणा असेल.
234_0.JPG

मराठी साहित्यात, नाटक-सिनेमात कोकणातील नद्या व खाड्यांशी निगडीत जीवनावर फारसं लिहीलं, चित्रीत केलं गेलेलं नाही, असं आपलं मला वाटतं [ चिं.त्र्य., मधु मंगेश कर्णिक इ. अपवाद वगळता]. कोकणात सदा 'गाज'त असलेल्या समुद्राच्या अथांग भव्यतेनेही नद्या- खाड्यांच्या मोहक नजाकतीवर तसा अन्यायच केला आहे. पूर्वी मी बोटीने गोव्याला गेलो तेंव्हां माडवीच्या पात्रात बोट शिरल्यावर डेकवरून दुतर्फा जो नजारा दिसला त्याची आठवण आजही मनावरची मरगळीचीं धूळ झटकायला मी वापरतो. सिंधुदुर्गातल्या कर्ली नदीवर मी अगदी लहानपणापासून मनस्वी प्रेम केलं, करतो व करतच रहाणार आहे; म्हणून तिलाच प्रातिनिधीक समजून कोकणातील नद्यांविषयीं माझं हे हितगुज.

वसई, धरमतर, दाभोळ इथल्यासारख्या कांही मोठ्या खाड्या सोडल्या तर माल वाहतुकीला कोकणातल्या नद्या-खाड्या खास सोईच्या नाहीत हे मान्य करूनही त्यांचा व्हावा तितकाही उपयोग करून घेतला जात नाही हे मात्र मला खटकतं. पूर्वी कर्ली नदी-खाडीतून अगदी नेरुरपार, वालावलपर्यंत मोठी होडकी मालवणहून गलबतांतून आलेला माल [ विशेषतः मंगलोरी कौलं ] घेऊन येत. वेगवेगळ्या गांवच्या आठवड्याच्या बाजारात 'दुकान' लावणारे व्यापारीही माल नेण्या-आणण्यासाठी नदीचा वापर करत. नदीकांठची कुटूंबंही नारळ, नारळाची झापं, गवत, लग्नाची वर्‍हाडं इ.च्या जवळपासच्या वाहतूकीसाठी होडीचा उपयोग करतही. पण माझ्या लहानपणीसुद्धा मी कर्लीची खाडी होड्या- जहाजानी गजबजलेली कधी पाहिली नाही. मग तर रस्ते, पूल व एस्टी आल्या व नदी-खाडीचा हा किरकोळसा वापरही बंद होत आला. ऐलतीर व पैलतीर जोडणारी 'तर' सोडली तर कोकणातल्या, विशेषतः सिंधुदुर्गातल्या, नद्यांवर प्रवासी वाहतुक होताना दिसत नाही. दुतर्फा नारळी-पोफळीच्या बागा असलेल्या तिथल्या स्वच्छ नदी/ खाड्यातून प्रवास करणं हा बर्‍याच ठीकाणी इतका सोईचा व आनंददायी अनुभव असूनही, स्थानिक लोकांत त्याबद्दल आकर्षण दिसून येत नाही याचं मला नेहमीच आश्चर्य वाटत आलेलं आहे [कदाचित,याचं कारण, मालवणी म्हणच वापरायची तर, ' जवळची व्हकाल खुरडी ', हें असूं शकेल; अर्थ : नेहमीच्याच पहाण्यातील मुलगी ही 'नवरी मुलगी' म्हणून नजरेत नाही भरत ! ]. आत्तां पर्यटकांसाठी यांत्रिक व सजवलेल्या होड्या, हाऊस बोटीही, नदीपात्रात मिरवायला लागल्यावर मात्र स्थानिकानाही त्याचं असं बाहेरून आयात झालेलं आकर्षण खुणवायला लागलंय, हेही खरं !

इथल्या नद्या/खाडीत दिसणार्‍या होड्यांत फार विविधता नसली तरी त्यांच्या आकारानुसार त्यांची खास ओळख असतेच. साधारणपणे ह्या होड्या झाडाच्या मोठ्या फांद्या किंवा खोड कोरूनच केलेल्या असतात. [गलबतासारख्या लाकडाच्या आडव्या फळ्या जोडून नव्हे ]. आंब्याचं जुनं झाड याकरता उत्तम मानलं जातं. रूंद पाठीच्या होडीला 'पगार', लांबलचक मोठ्या व जड होडीला 'सौदा', होडीच्या वरच्या बाजूला फळ्य्या जोडून मालवाहतुकीसाठी सोईस्कर बनवलेल्या होडीला 'होडकं' इ. स्थानिक नावं प्रचलीत आहेत. मुख्यतः प्रवासी वाहतूक करणार्‍या 'तरी'च्या होड्याना सुरक्षिततेसाठी एक जोड दिली जाते त्याला 'उलांडी' म्हणतात. [ माझ्या रांगड्या चित्रकलेचा वापर करून या होड्यांची 'सँपल्स' दाखवण्याचा प्रयत्न खाली केला आहे ]. मासेमारीसाठी वापरल्या जाणार्‍या होड्या अतिशय चिंचोळ्या,हल़क्या, वळवायला सोप्या व चालीला जलद असतात; सरावाशिवाय त्यांत बसणंही कठीण. अति चपळ व सर्रकन दिशा बदलणार्‍या माशांच्या थव्यांचा पाठलाग करून नेमकी जाळेफेंक करायला अशाच होड्यांची गरज असते.
boats23.JPG

नदी/खाडीतल्या होड्या शीडाचा किंवा होडीलाच मागच्या बाजूला जोडलेल्या सुकाणूचा फारसा वापर करत नाहीत. हलक्या व लहान होड्या वल्ह्याचा व जड होड्या लांब बांबूच्या काठीचाच याकरता वापर करतात; पण वार्‍या ऐवजी भरती- ओहोटीच्या वेळा साधून समुद्राकडून व समुद्राकडे असणार्‍या पाण्याच्या ओढीचा वापर वल्ह्याच्या साथीला ह्या होड्या करून घेतातच . अर्थात, नदी /खाडीतून तट्ट शीड फुगवून, पाणी कांपत जाणार्‍या क्वचितच दिसणार्‍या होडक्याचा रुबाब कांही आगळाच !

सिंधुदुर्गातील नद्या/खाड्या तशा नशीबवानच म्हणायला हव्यात; रायगडातल्या पाताळगंगा, अंबा [ व त्या मिळतात ती धरमतरची खाडी], कुंडलिका [ रोहा], सावित्री [महाड] व रत्नागिरी जिल्ह्यातली वशिष्ठी [चिपळुण] या नद्यांसारखं औद्योगिक प्रदूषणाचं गटार होण्याचं दुर्भाग्य तरी त्यांच्या वाट्याला नाही आलेलं - निदान अजून तरी ! त्यामुळे येथील नदी/खाडीतील स्वच्छ, चविष्ट मासे हेही अजून एक मोठं आकर्षणच असतं. कांहीशी वर्दळ इथल्या नद्यांवर जाणवते ती या मासेमारीमुळेच . इथले मुख्य मासे म्हणजे - मुडदुश्या [ सुळे, रेणव्या, ], गुंजल्या [ बोय, बोयट्या], तांबोशी, काळिंद्र, मोदकं [येरल्या ]व कोळंबी इ.इ. शिवाय , तिसर्‍या, मुळ्ये हे 'शेल फिश'ही इथं मुबलक मिळतात. नदीच्या उगमाजवळच्या, खाडीच्या खारेपणाच्या आवक्याबाहेरच्या भागात गोड्या पाण्यातील मासेही आपली मक्तेदारी टिकवून आहेतच.

या पाल्हाळिक प्रस्तावनेनंतर, दिवसा-रात्री व ऋतुमानानुसार बदलणारे नदीचे 'मूड' पहुया पुढच्या भागात !

[क्रमशः]

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भाऊंनू...

असा काय???...

या विषयावरचा हा माझा शेवटचाच आगाऊपणा असेल...>>> ह्यां वाक्य कशासाठी???... तुम्ही काढलेल्या प्रत्येक चित्राक आणि सोबतच्या निवेदनाक प्रत्येकान जमात तशी दाद दिलेली असताना, तुम्ही मनात अशी गोष्ट कशाक आणतास???... तुमची प्रत्यक्ष भेट झालेली नसताना देखिल, तुमची चित्रकला आणी सोबतच्या ओघवत्या निवेदना वरसून तुमच्या वडीलकीचो माझ्या सारख्याक अंदाज येता... बरां, तुमचां सादरीकरण 'सगळे करतत तर मीच कशाक नको?', ह्यां प्रकारतलां नाय आसा... तुम्ही स्वत: अनुभवलेलां कोकण आणि कालाप्रमाणे तेच्यात होत जाणारो बदल हेच्यावरचां भाष्य (कधी सरळ-सरळ, तर कधी अदृष्यपणे व्यक्त केलेलां...) आमच्या सारख्यांक बरीच म्हायती देवन जाता... तेव्हा मनात ईलेली ह्यी गोष्ट काढुन टाका आधी...

तुमच्या चित्राबद्दल आणी सोबतच्या म्हायती बद्दल, मी आणिक काय लिव?...

एकाच गोष्टीचो मनापासुन आनंद झालो - सगळ्यात शेवटी [क्रमशः] लिवल्यात ह्यां उत्तम केल्यात... :स्मित:...

एक नम्र विनंती - माका अहो-जाहो करु नकात, माझ्या नावाच्या शेवटी 'जी' लाव नकात... माका खूप लाजल्या सारख्या होता... अहो, तुमच्या पुतण्या सारखोच मी... :स्मित:...

पूर्वी होडक्याचे लाकूड न कुजता दीर्घकाळ टिकावे म्हणून त्याला बाहेरून उंडेलाचा(उंडिणीच्या फळांच्या तेलाचा) लेप लावीत असत. ऐनाची साल पाण्यात भिजवून ठेवून मग ती कुटून कुटून त्याचा रस काढीत. या लाललाल रसाचाही लेप होडक्यांना लावला जाई. पूर्वी पागारी(मासे पागण्याची जाळी) सुताची असत.तीही पाण्यात कुजू नयेत म्हणून या रसात बुडवून ठेवत.

हीरा...
भाऊंच्या 'सचित्र-लेखा'च्या निमित्ताने तुमच्या जवळची महत्वाची माहिती बाहेर आली... त्या बद्दल भाऊंना आणी तुम्हाला देखिल धन्यवाद!...
माझ्या माहिती प्रमाणे 'ऊंडिला'च्या तेला सोबत/ प्रमाणेच 'काजु'च्या कडक टरफलांचे तेल लावुन देखिल होडक्या/ सौदी/ पगारा च्या लाकडाची पाण्यापासून जपणूक केली जायची... अजूनही बर्‍याच ठिकाणी हेच उपाय करुन लाकडाची जपणूक केली जाते... मासेमारीच्या जाळ्यां बाबत मात्र मला माहीत नव्हते, ते तुमच्या पोस्ट वरुन पहिल्यांदाच कळले... :स्मित:...

भाऊंनूं...
बघितल्यात मां!!!... त्या निमतान काय होयना, पण महत्वाची म्हायती मा.बो. करांक समाजली... :स्मित:...

<< म्हणून त्याला बाहेरून उंडेलाचा(उंडिणीच्या फळांच्या तेलाचा) लेप लावीत असत. >> खरंय, हीरा. पावसाच्या आधी आमची होडी जमिनीवर ओढून आणून हे तेल-मालिश करणं, हा प्रकार केलाय आम्ही भावंडानी ! ऐनाच्या सालीचं मात्र पाहिल्याचं नाही आठवत. छान माहिती दिलीत. धन्यवाद.
<< या विषयावरचा हा माझा शेवटचाच आगाऊपणा असेल.. >> असं लिहीणं हाच अजाणतेपणी आगाऊपणा झाला का माझ्याकडून ? क्षमस्व, बेफिकीरजी ,विवेक व छाया देसाई.
<< कुंचल्याला (की माऊसला >> होय, रैना व नंद्या, हे 'माऊस'चेच प्रताप आहेत ! धन्यवाद.

<< 'काजु'च्या कडक टरफलांचे तेल लावुन देखिल होडक्या/ सौदी/ पगारा च्या लाकडाची पाण्यापासून जपणूक केली जायची.. >> होय, विवेक. शिवाय, होडी 'करपां'वर [ खाडीतील दगडांवर 'कॉरल्स'सारखी झालेली धारदार वाढ] घासून जर चर पडला तर तो भरून काढायला हा रामबाण उपाय होता. धन्यवाद.

भाऊ,
तूमच्याशी गप्पा माराव्याश्या वाटताहेत हो. प्रत्यक्ष भेटू तेव्हा भेटू, आज इथे पण जरा लिहितोच.
आमचे घर होते ते मेढ्यात, त्यामूळे लहानपणी कोकणातल्या नदीशी कधी संबंध आला नाही. पण तूम्ही दाखवल्यात त्या होड्या, मालवणला पण दिसायच्या. त्यातल्या बहुतेक प्रकारातून मी प्रवास केला आहे.
कांबळींच्या नाटकात एक विनोद होता, एप्रिल मे महिन्यात कोकणातल्या नद्यांत जीव देण्याइतके पण पाणी नसते.
शिवाय नदी म्हणजे कोल्हापूरची पंचगंगा, किंवा माझ्या आजोळची शाळी नदी. या दोघींना मे महिन्यातही भरपूर पाणी असे.
गोव्यातल्या वास्तव्यात मात्र मी आणि गिरीराजने अनेक नद्या ढूंढाळल्या. मांडवी (महादायी) तर मी रोज ओलांडत होतो. झुआरी चे विशाल पात्र डोळ्याचे पारणे फेडत असे. सांखळीच्या घाटावर पाण्यात पाय सोडून आम्ही तासंतास गप्पा मारल्या. तिलारीच्या खळखळणार्‍या पाण्यात चार चार तास उताणे पडून राहिलो. गोव्यात प्रत्येक विभागाची हद्द नदीने ठरवली आहे जणू.
मांडवी / झुआरी तर वाहतुकीसाठी राजमार्गच आहेत.

मग हळूहळू कोकणातल्या नद्यांची पण ओळख होऊ लागली. माझ्या नित्यप्रवासात या नद्या सोबत करत असत. महाडची काळ नदी. परशुराम घाटाच्या एका वळणावरुन दिसणारी वसिष्टी, चिपळूण गावातून वाहणारी एक नदी, या सगळ्या ओळखीच्या झाल्या. पण सगळ्यात जिव्हाळ्याची वाटली, ती राजापूरची अर्जूना नदी. माझ्या वडीलांचे बालपण इथेच गेले होते. ते पट्टीचे पोहणारे होते, पण पहिली सुरवात इथेच केली असेल आणि तिच्या काठवरचे उन्हाळे.
त्यांच्य हयातीत कधीच तिथे जाणे जमले नव्हते, पण गिरीराजच मला तिथे घेऊन गेला होता, आणि ते सगळे खुप ओळखीचे वाटू लागले.
तूम्ही म्हणाता तसे, या नद्यांचा उत्तम उपयोग करुन घेता आला असता. जगभरातील महत्वाची शहरे नदीकाठीच वसली आहेत. अगदी मुंबई, कोलकता, दिल्ली, लंडन, पॅरिस, मॉस्को सगळीच. परदेशात नद्यांचा वाहतूकीसाठी उत्तम उपयोग करुन घेतला जातो. (मुंबईचाच अपवाद)
पण आजही तूम्ही रे रोड ला गेलात तर तिथे, रेती बंदर, हे बंदर, ब्रिक बंदर, दाणा बंदर दिसतील. त्या त्या मालासाठी ती बंदरे तयार केली होती. १९८५ पर्यंत तरी तिथे या मालाचे पडाव दिसत असत.

एक अगदी पर्सनल आठवण सांगायची तर मला नदीचे खुप आकर्षण आहे. समुद्रापेक्षा मला नदीत डुंबायला
आवडते. (समुद्राच्या पाण्याचा त्रास होतो मला ). आणि हि आवड कधीपासून त्याचा एक किस्सा सांगतो.
माझ्या मावशीचे लग्न, देवरुखला झाले. त्यावेळी मी चार वर्षाचा होतो. आणि त्या लग्नात मी हरवलो होतो.
कुणाच्या लक्षातच आले नाही. गावातल्या एका माणसाला मी एकटाच नदीवर सापडलो. (ती नदी घरापासून खुप लांब होती) लग्नघरातला असेन, म्हणून अंदाजानेच त्या माणसाने मला घरी आणून सोडले.
मी तिथे कसा गेलो असेन, कुणी नेले असेल तेच माहित नाही. मोठेपणी मी मुद्दाम ती जागा बघून आलो.

माझी ही आवड लक्षात घेऊन, माझे गोव्यातले मित्र मला अनोख्या जागी घेऊन जायचे. नद्यांचे निर्मळ पाणी, धुंद करणारा निसर्ग आणि अजिबात वर्दळ नसलेल्या जाग होत्या त्या.
प्रतिसाद म्हणून अर्जूना नदीचा, पावसाळ्यातला फोटो देतोय. कुणाला या फोटोत खास काही दिसणार नाही. तसे नदीकाठचे अनेक फोटो आहेत पण याच ठिकाणी माझ्या वडीलांनी पाण्यात सूर मारले असतील, आणि आजी इथेच उभी राहून करवादली असेल, असे मला उगाचच वाटते.

[ माझ्या रांगड्या चित्रकलेचा वापर करून या होड्यांची 'सँपल्स' दाखवण्याचा प्रयत्न खाली केला आहे ] >>> हॅटस ऑफ भाऊ !!!! काय कमाल तुमच्या माउसची नि माउसला चालवणार्‍याची !!! तुम्ही ह्या सगळा लिवूक घेतला ता आमचा नशिब.. मस्तच माहिती वाचुक गावतला..

आता पुढच्या भागाची वाट बघीत बसतय !

दिनेशदा,ठाणे जिल्ह्यातली वसई,भिवंडी,ठाणे ही गावे एकेकाळी सलग जलमार्गाने जोडलेली होती .उल्हास नदी याच परिसरात खाडीला मिळत असे. या मार्गाने प्रवासी आणि मालवाहातूक होत असे. या परिसरातल्या जंगली आणि इमारती लाकडाला बाहेर खूप मागणी असे. समान लांबीरुंदीचे मोठमोठे ओंडके तराफ्याप्रमाणे एकत्र बांधून त्यांवर खुणेचे क्रमांक किंवा चिह्ने लिहीत आणि ते भरती ओहोटीनुसार प्रवाहात सोडत. वसईला सोडलेले तराफे भिवंडीला पाण्यातून खेचून घेतले जात. विश्वास असल्यामुळे तराफ्यावर माणसांची गरज नसे. हे अगदी १९३०/४० पर्यंत सुरू होते अशा आठवणी ऐकलेल्या आहेत. गंगाधर गाडगीळांच्या एका पुस्तकात मुंबईच्या एका गवर्नरने उन्हाळ्याच्या सुट्टीत वज्रेश्वरीला कँपिंग्(तंबूवास्तव्य) केले त्याचे बहारदार वर्णन आहे. त्याचा मोठ्या लवाजम्यासह गलबतांतून आणि खुष्कीच्या मार्गाने केलेला प्रवास मोठा मजेशीर आहे.

हीरा, ते वरचं काजीच्या तेलाचं आणि उंडिचे मी पण वाचले होते. मालवणला किनार्‍यावर पुर्वी या तेलाचा वास येत असे (आता कुजलेल्या माशांचा येतो.) तशी उल्हास नदीत अजून वर्दळ असते पण ती रेती काढणार्‍या होडींची इतकी वर्षे, इतकी रेती काढूनही.. अजून संपली नाही ती.
मुंबईची मिठी नदी, कधीकाळी नक्कीच गोड असणार. वज्रेश्वरीला काही वर्षांपूर्वी गेलो होतो, भयानक दुर्गंधी होती कुंडांच्या आसपास. पाऊलसुद्धा टाकावेसे वाटले नाही. त्यामानाने राजापुरचे उन्हाळे स्वच्छ आहे.

दिनेशदा, अप्रतिम प्र.चि. ! नदीचं तांबडं पाणी, किनार्‍याने पांघरलेली हिरवी शाल व जांभ्या दगडाच्या गालावर चढलेली लाली यावरून तीचं हे पावसाळ्यातलं रूप आहे हे सांगायलाच नको !!
झुआरी, मांडवी सारख्याच वैनगंगा, प्राणहिता अशा महानद्या नद्या महाराष्ट्राच्या अंतर्भागातही [ चंद्रपूर जिल्ह्यात] आहेत. पण त्या प्रकाशझोतात येतच नाहीत [ मला वाटतं त्या शेवटी गोदावरीत विलीन होतात]. त्या नद्यांचाही, माझ्या माहितीनुसार, वाहतुकीसाठी वापर मात्र नाहीच होत.
आपल्यासारख्यांच्या कांही हृद्य आठवणी जाग्या व्हाव्या यातच ह्या 'पोस्ट'चं सार्थक झालंय .
मनीष, यो रॉक्स, हीरा, व मुक्ता - धन्यवाद.

भाऊ, विवेक, हीरा आणि दिनेशदा, माहितीबद्दल खूप धन्यवाद.

भाऊनु, तुमच्या 'कुंचल्या'प्रमाणे 'लेखणी' पण मस्त चलता. वाट बघतो पुढ्च्या लिखाणाची. Happy

भाऊनु, माझ्या आजोळचा चित्रं हो... इतक्यात थांबूच नुकात... तुमची चित्रा, लिखित, सुंदर असा.
तुमच्या द्रिष्टिन कोकण बघुक गावला तर कोणाक नको आसा? (त्याचो पत्तो द्येवा फक्तं Happy )
मिया मुद्दाम वाचुक येतलयच.

भाउनु तुमका दंडवत. काय भारी चित्रा आणि वर्णन असा. माका रत्नागिरी आणि भाट्ट्याच्या खाडी ची याद इली. ह्या होड्क्यातून लय येळा रत्नागिरीक गेलेलय.
मायबोलीकराना एवढाच दिलासा कीं या विषयावरचा हा माझा शेवटचाच आगाऊपणा असेल.>>>ह्या कित्याक लिवलात ता? असो काय एक इचार करूचो नाय. नायतर आमका ह्या सगळा बघूक कसा गावतला? तुमच्या कोकणाच्या चंचीत काय काय असा ता भायेर काढा बघू. वाट बघतय.
दिनेशदा, मनापासून आभार. खरं सांगू, हा पूराचा फोटो पाहून डोळे भरून आले. बालपण आठवल.
आम्ही रहात असलेलं घर नदीकाठी उंचावर होत. नदी खूप मोठी होती. त्यात ऊंच आणि खूप मोठे काळे खडक होते. [सुट्टीत आलेला माझा भाऊ बहुतेक वेळ शेजारी रेडिओ (छोटा)तिथेच (त्या खडकांवर)झोपलेला असायचा.]पावसाळ्यात ही नदी गढूळ पाण्याने तुडूंब भरुन वहायची. त्यात मोठी झाडे, साप, वगैरे जे काही जाता जाता हाताला लागेल ते ती नदी घेऊन जायची त्यात आमचा मोड्का-तोडका साकवही असायचा. पण त्याच वेळी महापूरे झडे जाती तेथे लव्हाळे रहाती. याचा प्रत्यय मात्र नेहमी यायचा. आमच्या दारात ऊभ राहून, तर कधी थोडं पुढे जाऊन नदीच ते भयंकर रूप पहायचो. आज तुमच्या ह्या फोटोमुळे ते नदीच रूप डोळ्याअसमोर उभ राहील. पुन्हा एकदा धन्यवाद.
पूर्वी होडक्याचे लाकूड न कुजता दीर्घकाळ टिकावे म्हणून त्याला बाहेरून उंडेलाचा(उंडिणीच्या फळांच्या तेलाचा) लेप लावीत असत. >>>बरोबर. हा वास पण खूप वेळा अनुभवलाय.

<<एप्रिल मे महिन्यात कोकणातल्या नद्यांत जीव देण्याइतके पण पाणी नसते.>> ह्या मात्र बरोबर लिवलास दिनेशदा तुम्ही. आम्हीव मे म्हयन्यात आमच्या नदियेतसून(खाडी) चलत पलिकडे जाताव.(पण फक्त सुकती असल्यावरच.:हाहा:)माका नदिचा काय म्ह्यात नाय.आमच्या गावात नदी नाय हा खाडी आसा.

<< माका रत्नागिरी आणि भाट्ट्याच्या खाडी ची याद इली >> शोभा१२३, खरंय. भाट्याची खाडी छानच आहे. रत्नागिरीच्या "साळवीं"च कुलदैवत असलेलं गांव आहे ना तिथं ? नांव विसरलो , पण मी गेलोय तिथं दोन-तीनदा; भाट्या खाडीच्या कांठावरून जातो त्या रस्त्याने.
<<एप्रिल मे महिन्यात कोकणातल्या नद्यांत जीव देण्याइतके पण पाणी नसते.>> मच्छिंद्र कांबळींच्या नाटकामुळे हा समज कोकणातल्या सगळ्याच नद्यांबद्दल रुजलाय; पण, कांबळींच्या नाटकातल्या 'जगबुडी'ला 'उन्हाळ्यात जीव देण्याइतके पण पाणी' नसलं तरी खेड-चिपळूणजवळच्या खर्‍या 'जगबुडी'ला बारमाही पाणी असतंच ! कर्लीच्याही नदीत व खाडीत उन्हाळ्यातही पाणी असतंच. उन्हाळ्यात एक मात्र होतं; वरच्या गोड्या पाण्याचा जोर कमी झाल्याने खाडीचं खारं पाणी नदीत वरवर सरकतं.

भाउ अप्रतिम लेख!!!
आणि आता थांबू नकाच! आगाउपणा तो काय करायला म्या हाईच की Wink
प्रतिसादही बेष्ट आहेत.

<< आगाउपणा तो काय करायला म्या हाईच की >> Wink
मी आधीच तुम्हाला सांगितलंय, तुमच्या लिखाणाशी तुम्ही घेतलेली आय.डी. विसंगत आहे म्हणून !

माझी ही आवड लक्षात घेऊन, माझे गोव्यातले मित्र मला अनोख्या जागी घेऊन जायचे. नद्यांचे निर्मळ पाणी, धुंद करणारा निसर्ग आणि अजिबात वर्दळ नसलेल्या जाग होत्या त्या.

दिनेशदा,
खरच तुमच्या या अशा शब्दांनी सगळं चित्र,त्या आठवणी डोळ्यांसमोर उभ राहतं
Happy

व्वा! भाऊ, खूपच सुंदर.... रसाळ माहिती, आठवणी व रेखाचित्रांनी सजलेलं हे ललित छानच आहे. आणखी येऊ द्यात.

Pages