इ.स. १०००० - भाग ११ - अंतिम भाग

Submitted by बेफ़िकीर on 7 May, 2011 - 04:14

नमस्कार मित्रांनो! इसविसन १०००० चा हा अंतिम भाग! ही कादंबरी प्रकाशित करू दिल्याबद्दल मायबोली प्रशासनाचा मी ऋणी आहे. तसेच, काहीसे रखडलेल्या या कादंबरीला प्रतिसाद देऊन मला प्रोत्साहन दिल्याबद्दल मी सर्व वाचक, प्रतिसादक यांचा मनापासून आभारी आहे.

रखडण्याबाबत - इतर काही लेखन मध्येच केल्यामुळे म्हणा किंवा इसविसन १०००० मध्ये कुणी गुंतावे इतपत कदाचित ही कादंबरी नसल्यामुळे म्हणा, मला स्वतःलाच जरा निरुत्साह वाटत होता. तसेच, इसवीसन १०००० या कादंबरीला एस एस एस, एच आर डी एम किंवा गुड मॉर्निंग मॅडम प्रमाणे काही विशिष्ट कथानक असे नव्हते. हे वर्णन होते मानवी प्रगतीचे! पूर्णपणे काल्पनिक! पहिल्यांदाच कादंबरी लिहिताना मी काही संदर्भांचा अभ्यास केला असेल! विशिष्ट कथानक नसल्यामुळे ही कथा नेमकी कुठे आणि कशी संपावी याबाबत द्विधा होतो. माझ्यामते या भागात झालेला शेवट अधिक नैसर्गीक व वास्तव आहे. बघा आपल्याला कसा वाटतो. सर्वच प्रकारच्या मतांचा पूर्ण आदर! कुठे हार्ड कॉपी स्वरुपात प्रिन्ट काढल्या गेल्यास (काढल्या गेलेल्या आहेत हे मला ज्ञात असल्यामुळे लिहीत आहे) ही कादंबरी कल्पना चावलाला नम्रपणे समर्पीत असे नोदवावेत. ती घटना मनात फार राहिली आहे.

यापुढे मंदार जोशींनी दिलेल्या आव्हान कम आवाहनाचा विचार करत आहे. भयकथा लिहिण्याचे मनात आहे. Happy

पुन्हा धन्यवाद!

-'बेफिकीर'!

==============================================

मीटिंगमध्ये कुणाचेच पॉईंट्स गेले नाहीत व सुखी शेवट झाल्यामुळे मीटिंगमध्ये हजर असलेल्या प्रत्येकाचे पाच-पाचशे पॉईंट्स वाढवले गेले.

आनंदीआनंद नुसता!

आज मंगळावर रोषणाई करण्यात आली. फटाके नुसतेच रस्त्यावर आणून ठेवण्यात आले. उडवले तर प्रदुषण होते म्हणून! पण पृथ्वीवर एक फटाक्यांचा कारखाना थोडेफार फटाके नुसतेच बनवायचा. सेललिब्रेशनला जशी फुले, लायटिंग वगैरे असायचे तसेच 'न उडवायचे' फटाकेही ठेवायची प्रथा होती.

पृथ्वीवरून दोन एजंट्स या सेलिब्रेशनसाठी आलेले होते.

इ.स. २०० मध्ये सेलिब्रेशन करताना गोड खाल्ले जायचे असे गोप म्हणाला. त्यावर कुणीतरी त्याला सांगितले की आजही आम्ही गोडच खातो. एक गोळी असते, जी गोड असते पण कॅलरीज वाढत नाहीत. ती गोळी खाल्ली की एक दिवसभर जे काही खाल ते गोडच लागते. ती गोळि स्वतःही गोडच असते.

गोपला त्या अतीयांत्रिकपणाचा खरे तर वैताग आलेला होता. त्याला आठवत होते त्याचे घर आणि आशा! इसवीसन २०० मध्ये परत जाणे आता अशक्य होते. तस घर बांधणेही अशक्यच होते कारण त्याचे घर दक्षिण गोलार्धात होते वे तेथे आता पृथ्वीवरील तमाम पशु पक्षी व वृक्ष वेली होत्या.

गेल्या पाच एक दिवसांमध्ये गोपला जे विलक्षण अनुभव आले होते ते त्याच्या आधीच्या चाळीस वर्षातही त्याला आलेले नव्हते. तो महाराष्ट्राच्या बाहेरही गेलेला नव्हता. मात्र गेल्या पाच दिवसात तो गुरू ग्रहाच्याही जवळ जाऊन आला. पृथ्वी एखाद्या ठिपक्यासारखी दिसू शकते हा अनुभव घेतला त्याने! आत्ताही तो मंगळावर होता.

या पाच दिवसात थरारक अनुभव आले होते. केवळ तीन तासात मंगळ, मंगळून घेणे, येथला युनिफॉर्म, खाद्यपदार्थांचे वेगळेच प्रकार, स्पेस प्लॅटफॉर्म, अत्यंत मनोहारि अशा अवकाशाचे दर्शन, लांबून पृथ्वीचे दर्शन आणि पुन्हा मंगळ! यातच १६९९ कडून जीवाची भीती असणे, अतीश्रेष्ठ मानव ठरण्याचा आनंदही मिळणे, आकाशगंगा ६४१ येथून एक रुबाबदार दहा फुटी माणूस येऊन सूक्ष्म रुपातून पळून जाणे असले भयंकर प्रकारही त्याने अनुभवले होते. गंमत म्हणजे तो फारच कमी झोपला होता. इ.स. २००० मध्ये तो आठ तास झोपायचा रोज! या गेल्या चार पाच दिवसात तो केवळ सहा ते सात तास झोपला असावा. अर्थात, ८००० वर्षे झोपलेला असल्याने बहुधा त्याला ते जाणवतच नव्हते की काय कुणास ठाऊक!

आत्ता त्याच्या मनात फार महत्वाचे घोळ होते. एक म्हणजे तो महान मानवाचा अंश आहे हा समज पसरलेला होता, त्या बाबीचा फायदा घेत राहावे की खरे ते सांगावे हे त्याला समजत नव्हते. दुसरे म्हणजे त्याला आता मरण हवे होते. वेदनाहीन मरण मिळेल का हे कुणाला विचारावे हे त्याला कळत नव्हते. त्याला कुणीच मरू दिले नसते. त्याला मरायचे यासाठी होते की या जगात त्याचे कुणीही नव्हते. या जगात भावना असल्या तरी त्या चीपवर समजत होत्या. पाठीवरून हात फिरवून धीर देण्याची या जगात गरजच नव्हती कारण वाईट काही घडतच नव्हते. ऐंशी ऐंशी, नव्वद नव्वद वर्षे वय असणारी माणसेही अत्यंत रुबाबदार व देखणी होती. मरण्यापुर्वी जस्ट एक वर्षभर त्यांना वृद्धापकाळ सोसावा लागणार होता. ही सर्व माणसे गुण मिळवण्याच्याच मागे लागलेली होती.

या जगात प्रत्येक माणसाची प्रत्येक बाब, प्रत्येक विचार, इच्छा, भावना, वासना आणि कृत्ये कुठे ना कुठे रेकॉर्ड होत होती. चित्रगुप्ताचे डिपार्टमेंट ६४२ मध्ये शिफ्ट झाल्यासारखा प्रकार होता हा! या जगात लपवून काहीही करणे शक्यच नव्हते. खासगी आयुष्य नावाचा प्रकारच उरलेला नव्हता. तंत्रज्ञानाच्या अती प्रगतीमुळे आता प्रत्येक गोष्ट संगणकावर रेकॉर्ड होत होती. माणसाच्या शरीरावर अनेक चीप्स होत्या. कम्युनिकेशन, प्रवास या गोष्टी इतक्या किरकोळ होत्या की शुक्रावर गेलेला एखादा माणूस युरेनसवर अभ्यास करण्यासाठी गेलेल्या मानवाशी सहज गप्पा मारू शकत होता. अख्खी ६४२ म्हणजे जणू एक लहानशी पृथ्वीच झालेली होती. कुणीही कुठेही जाऊ शकत होता. आपल्याजवळचे हजार पॉईंट्स दिले तर ज्याला काहीही अधिकार नाही तो माणूसही पृथ्वीवरून गुरूपर्यंत फिरून येऊ शकत होता. पृथ्वीवर गुरूदर्शन असे यान दर तासाला सुटत होते. शनीदर्शन असे यान फक्त शनिवारी जायचे कारण शनी फारच लांब होता. ते शनिवारी निघायचे आणि सोमवारपर्यंत परत यायचे. रविवारी सगळ्यांना फक्त पाच किलोमीटर इतक्या कमी अंतरावरून शनीचे दर्शन व्हायचे. मात्र त्यासाठी प्रचंड यंत्रणा कार्यरत असायच्या. जवळपास ७२ तास टिकेल इतका प्राणवायूचा साठा, शनीवरील अनेक वायूंपैकी कशानेच बाधा होऊ नये यासाठीची यंत्रणा आणि मुख्य म्हणजे एक अल्ट्रासॉनिक इंजिन जे एरवी बंद असायचे ते न्यावेच लागायचे बरोबर! कारण मागे एकदा शनीपाशी गेलेले एक मानवविरहीत यान अचानक बाहेर फेकले गेले आणि त्याच्या ठिकर्‍या उडाल्या. त्यावरून शनीवर जगू शकणारे काही जीव असावेत असा अंदाज आधी मांडण्यात आला होता. मात्र हळूहळु प्रयोग म्हणून काही मरायला टेकलेले मानव यानातून तेथे पाठवण्यात आले. तसे जाण्याची त्या मानवांचीही इच्छा होतीच. कारण मग त्यांना मरताना प्रचंड पॉईंट्स मिळाले असते. मात्र तेमानव न मरता व कोणताही प्रॉब्लेम न होता सुखरूप परत आले होते. ते शनीपासून केवळ हजार किलोमीटरवर जाऊन आले होते. मग हळूहळू अल्ट्रासॉनिक वेगाने नेणारे इंजिन जोडलेले यान घेऊन काही संशोधक हळूच अधिक जवळ जाऊन आले. ते काही फेकले वगैरे गेले नाहीत. तसेच त्यांना शनीवर काही जीवांश असावा असेही जाणवले नाही. नंतर एकदा असेच एक यान आणखीन जवळ गेले. शनीपासून फक्त शंभर किलोमीटर! मात्र ते यान परत आलेच नाही. शनीच्या अफाट गुरुत्वाकर्षणामुळे खेचले जाणे अवघड होते कारण त्या यानात तशी ताकद होती. पण नक्कीच काहीतरी रहस्यमय घटना घडली असावी व त्यात तीन चांगले संशोधक बळी गेले. त्यानंतर अतिशय जोरात शनी मोहीम हाती घेण्यात आली. त्याचे रिझल्ट्सही चांगले आले. हळूहळू शनी अगदी विमानातून पाहता यावा तितक्या जवळ मानव जाऊ लागला व एक दिवस तो शोध लागला. धुळीच्या महाभयंकर वादळामध्ये जर यान अडकले तर ते अदृष्य होते. हे वादळ कधी येऊ शकेल व कधी येऊ शकणार नाही याचे अंदाज आता परफेक्ट मांडता येत होते. त्याचमुळे आता शनीदर्शन अशि फेरी मारणे शक्य झाले होते.

मात्र युरेनस व नेपच्यून येथे आम आदमी जाऊ शकत नव्हता. कितीही पॉईंट्स दिले तरीही! तेथे जाण्यासाठी अधिकारी संशोधकच आवश्यक होता. कारण युरेनस व नेपच्यून येथील तापमान व वातावरण इतके तीव्र टोकाचे होते की त्याची पूर्ण जाण असल्याशिवाय कुणीही जाणे शक्यच नव्हते.

आणि शेवटी नेपच्युनच्या पुढे असलेली ती ६४२ ची बॉर्डर!

भारत पाकिस्तान! ६४२ - ६४१! या बॉर्डरच्या पलीकडे आत्तापर्यंत तीनच मानव जाऊन आले होते. १६२२, एक एजंट आणि एक मानवजमातीचा सर्वाधिकारी, एजंट्सचा चीफ! मात्र त्याच्यापुढे जाणे अशक्य होते. कारण तेथे सुरू होत होती ६४१, जेथील मानव ६४२ मानवांपेक्षा कितीतरी सामर्थ्यवान होते. ते जाग आपले जगच नव्हते.

६४२ भर सर्वत्र संचार करणार्‍या मानवाने एकच गोष्ट जिंकली नव्हती. सूर्य!

सूर्यापाशी पोचू शकेल व टिकू शकेल असा एकही धातू मानवाला कोणत्याही ग्रहावर मिळालेला नव्हता. फार फार तर ५००० डिग्रीज सेल्शियसला वितळेल असा एक धातू गुरूवर मिळाला होता. पण तो बुधापासून पन्नास हजार किलोमीटर गेले तरी वितळणार होता. सूर्यापाशी काय पोचेल!

गोपला या सर्व प्रकारात आता काडीचा रस नव्हता. मात्र हे सर्व विचार करत असतानाच तो तोंडाने रामरक्षा मात्र पुटपुटत होता. कारण त्यामुळे त्याचे विचार अत्यंत असंबद्धपणे इतरांच्या चीपवर पोचत होते व त्याच्या मनात काय चाललेले आहे याचा काहीही सुगावा लागू शकत नव्हता.

मात्र गोप सतत इकडे तिकडे बघत होता. मरायची कोणती संधी चांगली याचा विचार करत होता.

या जगात त्याचे कुणीही नव्हते. त्याला कितीही महत्व मिळत नसले तरी या जगात मन रमू शकतच नव्हते. येथे चंद्रावर कविता नव्हती. चंद्रावर वस्ती होती. भांडणे होती. चंद्रवासियांची पृथ्वीवासियांशी! लोक एका तासात चंद्रावर पोहोचू शकत होते. पुण्याहून पिंपरीला जावे तसे!

येथे पत्रिकेत मंगळ आहे म्हणून शांती करावी लागत नव्हती. पत्रिका बघून लग्ने होत नव्हती कारण लग्नेच होत नव्हती. प्रजननापुरते नागरिक एकत्र येत होते. पत्रिकेत मंगळ असणे यापेक्षा ६४२ मध्ये मंगळ असणे हे अधिक ज्ञात होते.

येथे शुक्रतारा मंदवारा हे गीत म्हणणे शक्य नव्हते. कारण पहाटे आकाशात दिसणारा शुक्रतारा हा ६४२ चा एक क्षुल्लक ग्रह होता व त्यावर वस्ती होती. लोक येऊन जाऊन होते शुक्रावर!

प्रियंगुकलिका शामं रुपेणा प्रतिमं बुधं
सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम

हा श्लोक म्हणता येत नव्हता. बुध या ग्रहावर जाणे शक्य असल्यामुळे व तो सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह असल्यामुळे सौम्य वाटणे शक्यच नव्हते.

पृथ्वीच्या व्हॉल्युमपेक्षा गुरू ग्रहाचा व्हॉल्युम तेराशेपट अधिक आहे या माहितीला आता काहीही अर्थ नव्हता. कारण इ.स. २००० मध्ये गुरू कोणता हे सामान्यांना आकाशात बघून समजायचेच नाही आणि आता गुरू हाकेच्या अंतरावर असल्यासारखा झाला होता.

६४२ मध्ये आता कुणालाही साडे साती असू शकत नव्हती. कारण शनी ग्रह सहज पाहून येता येत होता.

तसेच राहू आणि केतू आता ग्रासत नव्हते. उलट ६४१ च्या सततच्या आक्रमणांनी ते ग्रह ६४१ च्या तब्यात जातात की काय याची भीतीच मानवाला होती.

धिस वर्ल्ड वॉज एन्टायरली डिफरन्ट!

म्हणूनच गोपला मरायचे होते.

आपण ८००० वर्षे का जिवंत राहिलो असे त्याला वाटत होते. तो केवळ एक ऑब्जेक्ट झाला होता आता! जरी सर्वश्रेष्ठ मानव ठरलेला असला तरीही एक ऑब्जेक्ट! ज्यात त्याचे विचार कुणालाही कळू शकत होते. ज्यात तो स्वतः अत्यंत अप्रगत असूनही सर्वश्रेष्ठ असल्याचे बर्डन वागवावे लागत होते.

नुकतेच त्याने प्रथम १६९९ ला आणि नंतर १६२२ ला वाचवलेले असले तरी त्या दोघांनी आभार मानण्यापलीकडे काहीही केलेले नव्हते. पोकळ आणि फॉर्मल आभार! ज्यात भावना असल्या तरी त्या विशिष्ट प्रकारे चॅनेलाईझ करूनच व्यक्त होत होत्या. मनाला अनेक फिल्टर्स होते. मनात खरे काय आहे हे समजणे अशक्य होते.

१६९९ बाबत सुरुवातीला वाटणारे आकर्षण गोपला आता अजिबात वाटत नव्हते. ती ऐंशी वर्षांची होती म्हणून नव्हे, तर ती स्वभावाने अत्यंत वाईट आहे हे समजल्यामुळे! त्याला भेटायचे होते आशाला! आणि आशाला मेल्याशिवाय भेटणे शक्य नव्हते.

१६९९ ने अजूनही 'गोप हा एक सामान्य मानव असून मी त्याला ८०-११ चा अंश समजण्यास मानवजातीला भाग पाडले' हे रहस्य फोडलेलेच नव्हते. यात तिचा स्वार्थ होता. ते रहस्य तिने सांगितले तर याही क्षणी गोपचेही न ऐकता १६९९ ला भयानक अंत दिला असता एजंट्सनी! आणि त्यानंतर गोपला परिस्थितीचा गैरफायदा घेतला या आरोपाखाली नष्ट केले असते. स्वतःला मरायचे नाही म्हणून १६९९ ते गुपित, गुपितच ठेवलेले होते. त्यामुळे गोपचाही फायदा होत होता. आणि मुख्य म्हणजे तो जर खरे बोलला असता की मी असा कुणीही महान मानवाचा अंश नाही, तर कदाचित खरे सांगितल्याबद्दल त्याला निर्दोष सोडून १६९९ ला मारलेही असते लोकांनी! पण त्यानंतरचे गोपच आयुष्य अत्यंत खराब गेले असते. तो एक विनोदाचा, थट्टेचा विषय झाला असता आणि पूर्णतः परावलंबी झाला असता. प्रयोग म्हणून त्याला कुठेही पाठवण्यात आले असते. अगदी ६४२ च्या सीमेबाहेरही फेकून पाहण्यात आले असते की त्याला मारायला ६४१ वाले येतात का म्हणून!

आणि हेच गोपला नको होते. त्याला मरायचे होतेच, पण मरण लांबवत लांबवत नाही, तर स्वेच्छेने! त्याला एक प्रयोगासाठीचा स्पेसिमेन म्हणून हाल सहन करायचे नव्हते तर शांतपणे मरायचे होते. म्हणूनच तो ते रहस्य फोडत नव्हता.

तो शोधत होता संधी! .. मरायची.. ! आणि हे करत असताना सतत रामरक्षा म्हणत होता जेणेकरून त्याचे विचार अगदी एजंटांनाही समजू नयेत.

आजूबाजूला सेलिब्रेशनची जय्यत तयारी झालेली होती. कुणीतरी घशातून एका वाद्याचा आवाज सहज काढत होते. गायल्याप्रमाणे! त्यावर अनेक मानव विशिष्ट पद्धतीने डोलून नाचत होते. त्या नाचण्यात बेभानता नव्हती. शिस्त होती. ही एजंटांनी मंगळवासियांना दिलेली पार्टी होती. मानव नाचताना एकदम तालात एकासारखे एक नाचत होते. त्यामुळे ती एक प्रकारची कवायतच वाटत होती. गोप तो खुळेपणा पाहून मनातल्या मनात हासत होता. त्यातच त्याला कुणीतरी विचारले..

"आदरणीय ८०-११ चे अंश ४६३४४, आपण थोडे नृत्य करून मानवांची मनस्थिती अधिक उंचावाल काय??"

कसला टुकार प्रश्न होता हा! गोप तुच्छ हासला आणि हो म्हणाला. धावाधाव झाली. अनेक हजार वर्षांनी गोपला नाचता येणार होते. पुर्वी तो अनंतचतुर्दशीला, आशाच्या वाढदिवसांना, स्वतःच्या लग्नात व एकदा प्रमोशन झाले तेव्हा नाचलेला होता. त्यानंतर आजच! का तर म्हणे १६२२, १६९९ हे निरपराध ठरले आणि ४६३४४ सुखरूप मंगळावर पोचले.

गोप त्या कवायतवाल्यांपाशी गेला आणि तोंडातून वाद्यासारखे आवाज काढणार्‍याला त्याने आधी गप्प बसले. नृत्य कम कवायत थांबली. गोपने इकडे तिकडे पाहिले. सगळे त्याच्याचकडे पाहात होते.

महान मानव ८०-११ यांचा अंश ४६३४४ आता कसा नाचणार याची तीव्र उत्सुकता सर्वत्र दिसत होती.

गोप मैदानात मधोमध थांबला...

सगळे स्टॅन्डस्टिल!

आणि अचानक जमीनीकडे पाहात गोप जोरात उद्गारला..

"अरे भंग का रंग जमा हो चकाचक... ?????..... फिर लो पान चबायेSSSS...???"

सुनसान शांतता पसरलेली असतानाच १६२२ ने आनंदाने उडी ठोकली व एजंटांकडे पाहात अत्यानंदाने म्हणाले...

"सर... सर हिंदी... हिंदी बोलतोय हा... आता तर कित्येक गोष्टी समजतील सर आपल्याला..."

एकच कल्ला झाला सगळीकडे! महान मानव ४६३४४ ला चक्क हिंदीही येत होते.

"अरे ऐसा झटका.... लगे जियापे... पुनरजनम हुई जाSSSSSSSये... ???"

हृदयावर हात ठेवून आनंदावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत ती तमाम मानवजात या ८०४० वर्षाच्या मानवाच्या कलात्मक नृत्याकडे पाहात होती..

"अबे नाचा की बे?? तिच्यायला परेड जमते होय नुसती???"

गोपचा हा डायलॉग मराठीत असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले. गाणे संपले की काय?

१६२२ ने विचारले..

"सर.. कु... कुणाच्या आईला नुसती परेड जमते..???"

१६२२ ला तिच्यायला या शब्द शब्दशः घ्यावासा वाटला याचे गोपला हसू आले.

"हासतायत सर ते... त्यावेळेस असे हसायचे.."

१६२२ ने एजंटांना सांगितल्यावर त्यांनी स्वतःचे ओठ वरखाली करून आनद व्यक्त केला.

"ए दारू बिरू नाय का रे मंगळावर???"

सर्व मानवांचे चेहरे गोंधळून एजंटांकडे वळले. मात्र १६२२ ला तो प्रश्न समजलेला होता. त्याने एजंटांना सांगितले...

"सर... ते अल्कोटॅब मागतायत... "

मंगळ ग्रहही चक्रावून पाहात असावा गोपकडे!

इतक्या महान मानवाने सर्वांदेखत चक्क अल्कोटॅब मागावी??

काय ही घसरलेली नीतीमत्ता! त्या मानवजमातीत अल्कोटॅब ही नशेची गोळी गुप्तपणे मिळायची. त्यासाठी स्वतःचे दोनशे पॉईंट्स द्यावे लागायचे.

आणि आज चक्क ४६३४४ ती गोळी मागतो??

एकमेकांकडे एजंट व काही लोक बघतच बसले. मिळाली तर सर्वांनाच हवी होती..

एक एजंट गोपला म्हणाला...

"सर... त्यासाठी... प्रत्येकाला... दोनशे गुण द्यावे लागतात...."

"अरे हाSSSSSड... कसले गुण?? .. माझे गुण कापा अन प्रत्येकाला एकेक पेग द्या..."

जल्लोष झाला. गोपचे गुण कोण कापणार? कंट्रोलरेट ऑफ ह्युमन बिहेवियर अ‍ॅन्ड पॉईंट्स अकाउन्ट्स या संस्थेच्या खजिन्यातून प्रत्येकी दोनशे गुण सगळ्यांना खास वाटण्यात आले. ते गुण प्रत्येकाने एका भिंतीवरच्या चीपवर आपली चीप दाबून पुन्हा देऊन टाकले आणि .... अल्कोटॅब्ज मिळवल्या.

आणि त्याचक्षणी... जस्ट जराजराशी नशा पसरतीय मेंदूवर तेवढ्यात... ४६३४४ ने गीत सुरू केले..

"लो खईके... लो खईके???... लो खईके पान बनारसवाला.. खुलजाये बंद अकल का ताला... फिर लो ऐसा करे धमाल... के सीधी कर दे सबकी चाल.. ओ छोरा.... गंगा किनारे वाला.. ओ छोरा..."

अफाट! गोपचे नृत्यच अफाट होते. कवायतीसारखे बिनडोक नृत्य करणार्‍या मानवाला अमिताभ बच्चनसारखे तालबद्ध नृत्य पाहून स्वतःचीच लाज वाटू लागली....

गोप या महान मानवाचा तो अत्यंत आकर्षक आणि महान नृत्याविष्कार पाहून सगळी मानवजमात स्तब्ध झाली होती... आपणही नाचायला हवे हेच विसरून गेलेली होती.. मात्र एकाला ते लक्षात आले.. कुणीतरी २२४१४ की काहीतरी होता... तो दचकत बिचकत गोपच्या जवळ आला व गोपसारख्याच हालचाली करून पाहू लागला.. गोपला आणखीन आनंद झाला... त्याने २२४१४ चा हात आपल्या हातात घेतला आणि त्यालाही नाचवायला सुरुवात केली...

अल्कोटॅबमुळे सगळेच हळूहळू धाडसी होणार हे निश्चीत होते..

१६९९ कडे हात करत गोप गाऊ लागला..

"ओ इक कन्या कुंवारीSSSSS... हमरे चक्करमे पड गयी.. हाय हाय.... हाSSSय... ओ इक मीठी कटारीSSSS हमरे दिलमे उतरगयी हाय.. हाय .. हाSSSSय..."

गोपचा हात १६९९ कडे आहे हे पाहून तमाम पब्लिक कौतुकाने १६९९ कडे पाहू लागले. ऐंशी वर्षाच्या वाईट स्वभावाच्या १६९९ चा उल्लेख गोपने 'इक कन्या कुंवारी' असा केला होता. १६९९ प्रचंड लाजली. मात्र गालांवरून बोटे फिरवू नाही... तर चक्क गाल लाल करून... तिला प्रथमच समजले की असे लाजायचे असते... तिची ती अदा पाहून अनेकांच्या चीप्स वाजल्या व प्रत्येकाच वीस पॉईंट्सही गेले.. त्यामुळे अत्यानंद झाला १६९९ ला...

आता दहा मानव गोपसह नाचू लागले. कुणालाच त्याच्याइतके सहज नाचता येत नव्हते. त्यामुले ते दृष्य भीषण विनोदी दिसत होते. एक मानव मस्त नाचतोय आणि बाकीचे दहा लडखडत त्याच्याकडे बघत कसेबसे नाचतायत...

गोपचा आवाज खरबरीत असला तरी तो महान मानवाचा आवाज म्हणून सगळ्यांनाच आवडून घ्यावा लागत होता.

दुसरे गीत सुरू झाले..

'सपनेमे मिलती है... ओ कुडी मेरी सपनेमे मिलती है... सारा दिन घुंघटेमे बंद गुडियासी.. आखियोंमे खिलती है.... सपनेमे मिलती है.."

कसे कुणास ठाऊक, पण या गाण्याचे ता'ल'तंत्र काहींना जाणवले. आता ते नाचायला आले. त्यांचे मात्र पाय बरोब्बर पडू लागले कारण त्यांना तो ताल लक्षात आला होता. सोपा होता अगदीच!

'सारा दिन रस्तेपे खाली रिक्षेसा पीछे पीछे फिरता है..." ला गोप १६९ च्या मागे जाऊन तालात चालत येऊ लागला.. त्यामुळे पहिल्यांदा भीती वातून ती काही पावले पळाली.. नंतर कौतुक वाटून थांबली.. आणि पुढच्या क्षणी... चक्क.. १६९९ नृत्यात सहभागी झाली..

एजंट आणि १६२२ बघतच बसले.. तमाम मानव बघत बसले... १६९९ चा हात हातात घेऊन गोप नाचत होता... दोघे बेभान होऊ लागले होते.. त्यातच १६९९ ने तिची अल्कोटॅब खाऊन टाकली.. आता कशाचाच कशाला धरबंध राहणार नव्हता...

"एक दो तीन.. चार पाच छे सात आठ नौ.. दस ग्यारा... बारा तेरा... "

गोपला फार कमी गीते माहीत होती. त्यातही नृत्य करण्यालायक तर फारच कमी! त्याच्या जमान्यात आयटेम सॉन्ग्जही फार झालेली नव्हती. त्यामुळे त्याला शीला की जवानी आणि मुन्नी बदनाम हुई ही गाणीच माहीत नव्हती. कारण तेव्हा तो बेशुद्ध होता. जस्ट बेशुद्ध झालेला होता.

मात्र आत्ता १६९९ बेभान होऊन नाचू लागली..

आणि हळूहळु तमाम मानव नाचू लागले.. कोणत्यातरी क्षणी १६२२ ही सहभगी झाला तसा मात्र जल्लोष प्रचंड झाला... अचानक मंगळावर काही याने दिसू लागली... ते पृथ्वीवरील मानव होते जे हा सोहळा पाहयला आलेले होते.. चंद्राच्या सर्व अ‍ॅन्टेनाज मंगळाकडे झुकलेल्या होत्या... लाईव्ह टेलिकास्ट होता अख्या ६४२ मध्ये...

आणि गोपने गाणे बदलले...

"ओये ओये SS... ओये ओये??.. ओये ओहो ओवा.. ओये ओहो ओवा..."

हा ताल काही लक्षात येईना पब्लिकच्या.. पण गोपला दिसले... एका एजंटाने हळूच पाय हालवले होते...

गोपने कुणाचीही भीडभाड न बाळगता चक्क एजंटचा हात धरून त्याला तिथे आणले...

आणि अख्या ६४२ ला आपल्या टीव्हीवर ते लाईव्ह दिसले...

तमाम मानवजातीचे सर्वाधिकारी असलेल्या संस्थेतील एक एजंट... एका मानवासहित... नाचत आहे..

'गझलने किया है इशारा.... घडीभर का कहै खेल सारा... तमाशाही बनजायेंगे खुद तमाशा.. बदलजायेगा ये नजारा... ओSSSS बदलजायेगा ये नजारा.... गझरने किया है इशारा... ओये ओये.... ओये ओये.."

स्टॅन्डस्टिल!

मंगळावरचे सर्व मानव, मंगळाच्या आकाशात जम झालेली सर्व याने, पार नेपच्यूनपासून बुधापर्यंत असलेली तमाम मानवजमात.. त्या क्षणी ४६३४४ आणि एजंट यांचे जोडीनृत्य पाहात होते... जसा गोप नाचत होता तसाह एजंटही...

"जमानेका दस्तूर क्या है... मुहब्बत को मंजूर क्या है.. भला पास क्या दूर क्या है.. कमी कुछ न रखेंगे हसकर सहेंगे सितम पर सितम हम तुम्हारा... ओहो... सितम पर सितम हम तुम्हारा... "

यावेळेस टिचक्या नाहीत की काही नाही.. इ.स. दहा हजारच्या मानवाने प्रथमच टाळ्या वाजवल्या.. कडकडाट केला... गोप आणि एजंट बेभान झालेले होते....

दहा मिनिटे! मंगळाची दहा मिनिटे इतका काळ दोघेही नाचले...

टाळ्या संपतच नव्हत्या...

शेवटी दम लागला गोपला! म्हातारा होत बिचारा वय वर्षे ८०४०!

बसला एका जागी हासत हासत! ओठांवर हसू आणि डोळ्यात पाणी! गझरने किया है इशारा... घडीभरका है खेल सारा... तमाशाही बनजायेंगे खुद तमाशा.. बदलजायेगा ये नजारा...

समोरचा नजारा ८००० वर्षात कितीतरी बदललेला होता.. कुणीच आपलं नव्हतं... तमाशाही स्वतःच तमाशा झालेले होते... होणार होते.. होतच राहणार होते.. या १०००० सालच्या मूर्ख मानवाला जग जिंकल्याचा आनंद होत होता... पण आयुष्य क्षणभंगुर आहे ही बाब काही पचनी पडत नव्हती.. पापपुण्य या संकल्पनांना गुण मानून बिचारे जगत होते.. नशेची गोळी, भुकेची गोळी, तहानेची गोळी आणि सेलिब्रेशनचीही गोळीच! दुर्दैवी मानव! गोपला नको होता हा घडीभरका खेल.. त्याला जयचे होते अनंताच्या प्रवासाला...

सगळे अचंब्याने गोपकडे पाहात होते... आता बोलायलाच हवे होते.. गोपला वाटले.. या सगळ्यांना आपले मत समजायलाच हवे...

तो उभा राहिला... आणि म्हणाला...

"मित्रांनो... मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय.... "

ताबडतोब त्याच्यापुढे अनेक चीप्स ठेवण्यात आल्या.. संपूर्ण ६४२ मध्ये गोपचा अ‍ॅड्रेस लाईव्ह टेलिकास्ट होणार होता....

सर्वांची तीच इच्छा होती की या महान मानवाने दोन शब्द बोलावेतच...

गोप बोलू लागला...

"प्रथम मी १६२२ साहेबांचे आभार मानतो की मला गेली काही वर्षे त्यांनी जिवंत ठेवले... नहीतर हे जग कसे बघता आले असते?? मी बेशुद्धावस्थेतच मेलो असतो.. खरे तर मुळात १६२२ साहेबांना मी सापडेपर्यंत मी कसा प्रिझर्व्ह झालो तेच समजत नाही.. आपण समजता त्याप्रमाणे ८०-११ या दैवीशक्तीचा तो प्रताप असावा.. मित्रांनो.. भाषण सुरू करण्यापुर्वी मी सर्व एजंट्स व त्यांच्या सर्वाधिकार्‍यांना नमन करतो कारण मानवी जीवनात ज्या मूल्यांना सर्वाधिक महत्व असायला हवे त्यांनाच ते आजही देत आहेत व त्यामुळेच मानव जमात टिकून आहे..

इसवीसन २००० मध्ये मी होतो मित्रांनो.. माझी बायको आशा होती.. ती भूकंपात गेली असावी.. आमचे खूप प्रेम होते एकमेकांवर... गरीब होतो आम्ही.. पण सुखात होतो.. तेव्हा भूक लागली की ती भाजी, पोळी, आमटी आणि भात करून वाढायची.. मी जेवताना माझ्या जवळच बसायची.. हसून आग्रह करायची.. पोट तर त्या आग्रहानेच भरायचे.. काय चव असायची तिने केलेल्या एकेक पदार्थाला.. आज तुम्ही देत असलेली ही भुकेची गोळी खाऊन... माझी शारिरीक भूक भागते मित्रांनो.. पण मानसिक तहान नाही भागत.....

पुस्तकात आम्हाला मंगळ, गुरू, शनी अशी चित्रे असायची... त्यावरचे वातावरण कसे आहे याची आम्ही परिक्षेत उत्तरे द्यायचो.. आज तुम्ही सारे प्रत्यक्ष या ग्रहांवर आहात.. येत जात आहात.. अवकाशातून आपलीच पृथ्वी सहज पहात आहात... पूर्ण आकाशगंगाच तुम्ही व्यापलेली आहेत.... मात्र मित्रांनो.. आजही तुम्हाला मंगळून घेतल्याशिवाय मंगळावर वावरता येत नाहीच... प्रत्येक ग्रहासाही असलेला स्पेशन युनिफ्र्म घातल्याशिवाय त्या ग्रहावर पायही ठेवता येत नाही....

आज तुम्ही वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत तरुण दिसता... सगळेच्या सगळे एकजात देखणे आणि रुबाबदार... पण माहितीय??? ... आजीच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावरचे आपल्या नातवाबद्दलचे प्रेमळ भाव आणि तिच्या थरथरत्या हातांनी आपल्या पाठीवर फिरताना आपल्याला केलेला मायेचा स्पर्श... हे तुमच्या मानवजमातीत नाहीच... कुणालाही आजी नाही.. कुणालाही आई नाही.. वडील नाहीत... तुमच्याकडे मुले जन्माला घालणे हे कर्तव्य असते.. म्हणूण त्यातही प्रगती करून तुम्ही मानवाचे प्रजनन केवळ एका महिन्यावर आणलेले आहेत.. तुम्हाला काय कळणार ती मजा... जी एक जीव आपल्या घरात जन्माला येणार म्हणून नऊ महिने चाललेली असते.. तो सोहळा तुमच्या युगात नाही मित्रांनो....

पॉईंट्स... जो बघावा तो या एकाच गोष्टीसाठी जगतोय जणू... जगण्याचे कारण काय तर म्हणे पॉईंट्स... तुम्हाला माहीत आहे का की ही पॉईंट्स हीनेमकी काय बाब आहे?? आम्ही त्याला पाप आणि पुण्य म्हणायचो... पुण्य केले गुण मिळायचे... पाप केले की जायचे... या सर्वाचा हिशोब स्वर्ग आणि नरकाच्या दारावर असलेल्या चित्रगुप्त राजाच्या दरबारात व्हायचा... यम नावाचा त्याचा एक एजंट एखाद्या मानवाला पृथ्वीवरून घेऊन जायचा... याला 'मरणे' असे म्हणायचे.. यम त्या मानवाला घेऊन आला की चित्रगुप्ताच्या वहीत असलेल्या नोंदींप्रमाणे त्या मानवाचे किती प्लस आणि किती मायनस गुण झाले ते जाहीर व्हायचे.. त्याप्रमाणे त्या मानवाचे तीन पर्यांयांपैकी एकाप्रमाणे स्थित्यंतर व्हायचे.. प्लस गुण खूप असतील तर स्वर्ग.. मायनस गुण खूप असतील तर नरक आणि सगळे नलिफाय झालेले असले तर जन्ममृत्यूच्या फेर्‍यातून सुटका.. तुम्ही पण हेच करत आहात हे पाहून खरे तर खूप आनंद झाला.. पण एक सांगू का?? तुमच्या युगात अत्यंत पारदर्शक नियम असल्यामुळे व मनातील विचार दुसर्‍याला समजणे किंवा आपले विचार दुसर्‍याला न समजणे या सोयी असल्यामुळे लोक पाप करत नाहीत.. म्हणजे मायनस गुण होत नाहीत लोकांचे.. पारदर्शकता जर नसती तर??? तुम्ही कधी एखाद्याच्या मनात किती पापे करायची इच्छा झली याचा हिशोब केलात?? त्याच्यावर गुण ठरवले तर तुम्ही सगळे आज मायनसमध्ये जाल.. कारण मनाच्या पातळीवर अनेकांना वाईट वागायचे असते याचा मी नुकताच अनुभव घेतलेला आहे मित्रांनो...

मन समजणारी चीप.. ही चीप हा तुमच्या युगाला लागलेला मोठा शाप आहे ... वरदान नव्हे... तुमचा गैरसमज काढून टाका.. हे वरदान नसून शाप आहे.. का माहीत आहे?? कारण अतिरिक्त पारदर्शकतेमुळे भावनाहीनता आलेली आहे... एखाद्या मुलीबद्दल आपल्याला मानसिक पातळीवर आकर्षण वाटणे हीगोष्ट या चीपमुळे विनयभंगाच्या सदरात मोडू लागलेली आहे.. गालांवरून बोटे फिरवणे म्हणजे लाजणे, ओठ खालीवर करणे म्हणजे हासणे, इचक्यावाजवणे म्हणजे रागावणे या सर्व भावनाशुन्य हालचाली आहेत... हे नैसर्गीक नाही.. आणि निसर्गापासून मानव दूर जाऊच शकत नाही.. म्हणून तर आत्ता हा एजंट नाचू शकला.. १६९९ लाजू शकली.. हे सगळे तुम्ही मुळातच करू शकता पण ते दडपून ठेवता तुम्ही.. तुमचे जग भावनाशुन्य आहे.. त्यात फक्त जीवन लांबवणे, तारुण्य व सौंदर्य लांबवणे व अधिकाधिक गुण मिळवणे इतकीच कर्तव्ये व मनीषा रहिलेल्य आहेत... त्यात जीवनातील लहान लहान आनंद नाहीतच..

झोप.. झोप हा प्रकार तुम्ही किती करता?? तर बावीस मिनिटे.. सोळा मिनिटे... का? कारण तितकी झोप पुरेल अशी औषधे तुमच्याकडे आहेत.. आणि मी?? मला आठ तास झोप लागते.. पृथ्वीवरचे आह तास.. हो.. हल्ली तेही सांगावे लागते.. मी कोणत्याही औषधांविना जगू शकतो.. तुम्ही तसे जगू शकत नाही...

निसर्गाच्या खूप जवळ असलेली आमची पिढी होती मित्रांनो.. आणि निसर्गापासून खूप दूर असूनही निसर्गानेच नद्ध असलेली तुमची पिढी आहे...

येथे मीमनात विचार केला तर तो तुम्हाला समजतो.. तुमच्या मनातले विचार मला समजू शकतात.. येथे मला हसायचे असेल तर दोन बोटांनी ओठ हालवावे लागतात.. सर्वच कृत्रिम... तुमच्याजगात आनंद एकच... ते म्हणजे गुण मिळाले.. दुख एकच.. ते म्हणजे म्हातारपण अधिक लांबवता आले नाही..

तुमच्या जगात लहानपण, प्रेम, शाळा, कॉलेज, ट्रीप, लग्न, दु:ख, प्रवास, नोकरी या बाबीच नाहीत..

शाळा का नाही?? कारण मूल जन्माला आले की त्यात चीप्स इन्सर्ट केल्या जातात.. मानवाला असायला हवे ते किमान ज्ञान त्याला वयाच्या पहिल्याच वर्षी असू शकते.. व्वा! वा रे वा प्रगती..

म्हणजे ते बाळ दूध मागायचे असले तरी गंभीरपणे मागणार.. त्याने पहिले पाऊल टाकायच्या आधीच त्याला स्वतःला माहीत असणार कि अजून काही दिवसांनी आपण चालू शकू.. त्याच्या पहिल्या पौलाकडे कौतुकाने कुणीच बघणार नाही... व्वा व्वा!

मला तुमचे हे निसर्गापासून दूर असलेले जग नको आहे मित्रांनो.. मला ८०-११ चा आदेश आलेला आहे.. तुझे कर्तव्य संपले... फक्त एकच.. मला पृथ्वीवरील दक्षिण गोलार्धात जेथे माझे घर होते... तेथेच मरायचे आहे...

तेथेच माझा देह निष्प्राण होईल.. यासाठी मला तुमची मदत हवी आहे..

करणार ना???"

तमाम ६४२ स्तब्धपणे ऐकत होती. कुणाचा श्वासही ऐकू येत नव्हता. पृथ्वीवरून आलेली याने एकाच जागी आवाज न करता स्वतःच्या शक्तीचा व मंगळाच्या गुरुत्वशक्तीचा इक्विलिब्रियम साधून स्तब्ध झालेली होती...

आणि ते झाले...

हुंदका...

इसवीसन १०००० चा पहिला मानव होता तो... हुंदका देणारा.. स्वतः १६९९...

आपोआपच इतरांच्या डोळ्यांमधून पाणी आले.. त्यांनाही असे पाणी येण्याचा अनुभव नवीनच होता..

तोवर १६९९ जोरात धावून जात गोपला बिलगली.. तिच्या आलिंगनातून ती त्याच्यावर केलेल्या सर्व अत्याचारांची माफी मागत होती... इच्छा असती तर आत्ता गोपने सांगितलेही असते की १६९९ अशी अशी वागली.. पण शेवटच्या क्षणीही त्याने तिला वाचवले.... हेच त्याने केले असते तर १६९९ ने नुसता थयथयाट केला असता गुणांसाठी... पण हामहामानव होता.. खराखुरा महामानव!

दोनच तासांनी स्पेशल यानातून गोप मंगळावरून पृथ्वीच्या अंधारलेल्या दक्षिण गोलार्धाकडे आलेला होता...पृथ्वीपासून केवळ तेरा किलोमीटर अंतरावर.. म्हणजे किंगफिशरच्या एखाद्या फ्लाईट इतके अल्टिट्यूड फार तर!

उतर गोलार्धावर आत्ता उजेड असणार! गोपच्या मनात विचार आला..

त्याने यानातूनच हात जोडून आपल्या धरतीमातेला नमस्कार केला..

यानातील दोन तज्ञांनी तोवर अक्षांश व रेखांशांच्या मदतीने गोपचे २००० मधले घर कुठे होते ते स्क्रीनवर दाखवायला सुरुवात केली...

गोपने त्यांना थांबवले व म्हणाला...

"पृथ्वीपर्यंत पोचायची गरज नाही मित्रांनो... तेथे आता माझे घर नसेल.. तेथे असेल एखादे झू किंवा एखादे जंगल.. मला आशाची कोणतीही खुण तेथे दिसणार नाही.... "

"म.. मग??"

"मला इथूनच सोडा.... "

संपूर्ण ६४२ अवाक होऊन ते दृष्य लाईव्ह पाहात होती.. यानातल्या असंख्य चीप्स वाजल्या.. यानातील तंतज्ञांनी ४६३४४ चा रेकॉर्डेड मेसेज ऐकवून सर्वांना सिद्ध करून दाखवले की ही त्यांचीच इच्छ होती...

आणि... गोपचा... ४६३४४ चा देह... धरतीमातेच्या गुरुत्वाकर्षणामुळे... प्रचंड वेगाने.. दक्षिण गोलार्धाकदे झेपावत होता...

घडीभरका खेल है सारा... ८०४० वर्षे जहली असली तरीही.. घडीभरकाच...

त्याहीवेळेस गोपच्या मुखातून तेच शब्द बाहेर येत होते..

"आशा.. लवकरच भेटू आता..."

१६९९ च्या चेहर्‍यावरचे तारुण्याचे कसेबसे टिकवून ठेवलेले भाव लुप्त होऊन तेथे हिंस्त्र व जख्खड म्हातारीचे भाव आलेले होते.. ती भेसूर विलाप करत होती.... अचानक तिचे सगळेच गुण कसे काय गेले असतील हेच कुणाला समजत नव्हते...

आणि त्याच क्षणी.... धरतीमाता आपल्या दुरावलेल्या बाळाला.. आपल्यात सामावून घेत होती...

घडीभरका खेल समाप्त झालेला होता...

गुलमोहर: 

व्वा मस्त! सुंदर शेवट भुषणराव Happy

नृत्य कम कवायत थांबली. >>> Lol

"ए दारू बिरू नाय का रे मंगळावर???">>> Biggrin

"अरे हाSSSSSड... कसले गुण?? .. माझे गुण कापा अन प्रत्येकाला एकेक पेग द्या...">>> Rofl

***

भुषणराव, कादंबरी मनात नसताना लवकर संपवली, असे दिसत आहे. या भागाच्या लिखाणावरुन तरी असे दिसुन येत आहे की, कधी या 'कादंबरीला' आपण शेवट देत आहात.., हाच विचार इतके दिवस आपल्या मनात घोळवत असावा.

विशिष्ट कथानक नसले तरी.., लेख प्रत्येक वळणावर रंगात आणणे हे खरे लेखकाचे 'कसब' होय, आणि ते आपल्या प्रत्येक लिखाणातु दिसुन येतेच.

काही कादंबर्‍या वर्षानु वर्षे अपुर्ण राहतात भुषणराव.. कारण, काही विषय असे असतात की लेखकाला पुढच्या परिस्थीतीचे वर्णन तिला साजेसे असे 'तत्काल' करणे जमत नाही. कालांतराने कोणत्यातरी वर्षात कधीतरी अचानक लेखक त्या कथेशी पुन्हा एकरुप होतो. आणि लेख पुर्ण होतो.

आपण दिलेला शेवट 'वास्तव' आहे.. कारण, वाचकांच्या अतीघाईमुळे तुम्ही हा दिला आहे. पण नैसर्गिक नक्कीच नाही असे माझे वैक्तिक मत आहे (भा.अं.आपलेही असावे), आणि कधीतरी आपण तो द्यालच असा विश्वास सुध्दा.

तरी आपल्या कल्पनाशक्तीची प्रशंसा करावी तेवढी कमी.., आपण ही इतक्या अनोख्या विषयाची कादंबरी यशस्वीरीत्या इथ पर्यंत आणली आणि शेवट पर्यंत वाचकांचा उत्साह टिकवुन ठेवला.

आपण 'भय कथा' हा विषय आपल्या लेखनात घेत आहात, हे जाणुन खुपच आनंद झाला आहे.

खुपखुप शुभेच्छा भुषणराव. Happy

धन्यवाद!*

छान झाला शेवट. पण या वेळी फार रटाळ झाली उशीर झाल्याने. सवय झाली आहे ना रोज ची. आता पुडची लवकर येउ देत.

पु. ले. शु.

chaan aahe....pan kiman shevati tari prashnanchi uttare dyaa ...?

1699....asha ch hoti...?

काय बेफिकीर , कै च्या कै गुंडाळलात
शेवटचा भाग...
असो..

पुढची भय कादंबरी...
वॉव, वाट बघतोय

काय लिहिलेय राव! यत्ता ४थ ड तल्या कुणा पोराकडून तरी डीटेल्स चेक करुन घ्यायचे आधी निदान.
हा हिरो भारतात रहात होता ना? दक्षिन गोलार्धात कस काय मग?
आणि सगळ्यात कॉमेडी प्रकार म्हनजे "गोप मंगळावरून पृथ्वीच्या अंधारलेल्या दक्षिण गोलार्धाकडे आलेला होता...पृथ्वीपासून केवळ तेरा किलोमीटर अंतरावर.. म्हणजे किंगफिशरच्या एखाद्या फ्लाईट इतके अल्टिट्यूड फार तर!

उतर गोलार्धावर आत्ता उजेड असणार! गोपच्या मनात विचार आला.. " Rofl
अहो दिवस - रात्र फरक दक्षिनेकडून उत्तरेकडे नाही पूर्व - पश्चिम मधे फरक पडतो हो. उत्तर गोलार्द आणि दक्षिण गोलार्धात एकाच वेळी दिवस असू शकतो. तोक्यो आणि सिडनी साधारण एकच टाइम असतो Happy सायफाय लिहायची म्हणजे दारू पिवुन बरळण्याइतके सोपे नसते हो.

Happy

चातकराव, कुची, उदयवन, अखी, मानसी, प्रसन्न, ए मॅन

सर्वांचा मनापासून आभारी आहे.

लोभ असू द्यावात.

-'बेफिकीर'!

बेफिकीरजी,
हा भाग पण आवडला.
विशेष करून गोपने सर्वांना दिलेले स्पीच - छानच मांडलेत. आवडले..
शुभेच्छा. आणि, पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.

बेफिकीरजी,
हा भाग पण आवडला.
विशेष करून गोपने सर्वांना दिलेले स्पीच - छानच मांडलेत. आवडले..
शुभेच्छा. आणि, पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.

हा भाग पण छान होता.खर म्हणजे हा विषय चांगला होता.अजुन खुलवता आला असता... शेवट लवकर संपवलाय.पण असो तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम...
पुढच्या कांदबरीच्या प्रतिक्षेत Happy

संपली कादंबरी? Happy बरीच कोडी न उलगडता गुंडाळली गेलीये, असे वाटले...शेवटी किमान इ.स. १०००० मध्ये पृथ्वी कशी असते, हे पहायला मिळेल असे वाटले होते, तिथले लोक, गोपच्या राहत्या घराच्या जागी तुम्ही म्हणालात तसा झू किंवा जंगल वगैरे आहे का? हे समजायला हवे होते. १६९९ नक्की आशा होती की नाही हे गुपीत पण उलगडले नाही.तिचे सगळे गुण कसे गेले, हे ही समजले नाही.

मानसीला अनुमोदन! गोपचे स्पीच मात्र खुप आवडले! शेवटच्या भागासाठी अगदी समर्पक!!! Happy

कल्पना चावलाला ही कादंबरी का समर्पित केलीत, हे शेवटी समजले...

आता भयकथेची उत्सुकता आहे! भारी विषय सुचवल्याबद्द्ल मंदारचे आभार! Happy

घाबरण्याच्या तयारीत सरसावून बसलेले आहे. Happy

आता पुढे काय?
हा माझा तुमची प्रत्येक कांदबरी संपल्यावरचा प्रतिसाद असतो.
पु.ले.शु.
धन्स for your every new कांदबरी.

भुषणराव...... मजा आलि. गोपच भाषण खुप आवडल आणि भावल.
थोडा वेळ लागला ईन्व्हाल व्हायला कारण खुप खुप दिवसांनि वाचलि म्हणुन.
Happy

Happy

कसा इथे मी तरून जातो तुम्हास सांगू?
अजून माझी जुनीच कीर्ती दिगंत आहे

धन्यवाद परेशराव, आपल्या प्रतिसादांनी नेहमीच बळ मिळते. Happy

-'बेफिकीर'!

१६९९ नक्की आशा होती की नाही हे गुपीत पण उलगडले नाही.तिचे सगळे गुण कसे गेले, हे ही समजले नाही.?????????

ओके

अ फा ट लिहिता राव तुम्ही... खरच कसं सुचतं देव आणि तुम्हीच जाणे....
सरस्वती तुम्हावर अशीच प्रसन्न राहो..
अजुन काय बोलणार...