राख

Submitted by कौतुक शिरोडकर on 6 May, 2011 - 04:48

सिगरेटच्या एका घ्रुवावर जळता निखारा
आणि दुसर्‍या घ्रुवावर घुमसता मी,
भरकटलेल्या विचारांची वावटळ
मेंदूचा कण न कण
गरगरवणारी.... बिन पात्याच्या पंख्यासारखी.
पोळलेला अर्क एका झुरक्यानिशी
शरीराच्या रंध्रारंध्रात...
नंतर गुदमरून वाटा शोधत
धुरांची वलये हवेत विरलेली,

पण निखार्‍याला कवेत घेऊन बसलेली राख.... ??
मटेरीएलिस्टिक राखेला फार जपतो ना आपण.. ?
कधी एशट्रे,
कधी कलशात,
तर कधी होमकुंडात.....
घराच्या कोणत्याही कोपर्‍यात
तिचा मागमूस न ठेवता..
मग मात्र दूर कुठेतरी विसर्जित.
पण अशा कैक निखार्‍यांसोबत
जळून राख झालेल्या स्वप्नांच काय ?

आशेच्या धुरात घुसमटत राहते
गुंडाळलेलं अस्तित्व आणि
श्वासावाटे पुन्हा नसनसात
गुठळ्या होऊन जगते
चहुवर भिरभिरणारी
स्वप्नांची राख.

गुलमोहर: 

जबरी...
>>>पण अशा कैक निखार्‍यांसोबत
जळून राख झालेल्या स्वप्नांच काय ?<<< सॉलिड !

स्वप्नं, आशा ------> जळणे/स्वप्नभंग -----> राख ------> पुन्हा आशा, स्व्प्नं

निसर्गातल्या अनेक चक्रांप्रमाणेच मानवी जीवनातलं हे अव्याहत सुरू असलेलं चक्र ….
...... छान मांडलत.

हे वाचून मला माझीच काही काळापुर्वीची मनःस्थिती आठवली.
असंच काहीसं आत्ताही खूप लिहावसं वाटतं, पण नाही लिहीत, कारण सध्या लाइफमधे जाम खुशीत आहे मी.
पण असं वाचायला आवडतं, मनापासून आभार! पुलेशु. Happy

ट्यागो, तुझा री वाचुन मला बळ आलंय... अगदी थोटुक किंवा ग्लास नसतो हातात पण मानसिक अवस्था अशीच काहीतरी Sad चलो अच्छा है. मतलब एक दिवस मीही जाम खुशीत असेन Happy

ग्रेट एक्स्प्रेशन .
ट्यागो ,पल्ली आणि सर्वाना ऑल द बेस्ट .नेहमीच खुशीत रहा ,आयुष्य खुशीत रहाण्यासाठीच असत .

मस्तच रे कौतुक!!
आवडली कविता....
मटेरिएलिस्टिक राखेला फार जपतो ना आपण..?? >> हे एक नंबर..!

आशेच्या धुरात घुसमटत राहते
गुंडाळलेलं अस्तित्व आणि
श्वासावाटे पुन्हा नसनसात
गुठळ्या होऊन जगते
चहुवर भिरभिरणारी
स्वप्नांची राख.

कमालीची अभिव्यक्ती! आवडली कविता.

कौत्या, खरं तर त्या दिवशी फोनवर जेव्हा बोललो आपण या कवितेबद्दल तेव्हाच ठरवलं होतं की नाही वाचायची. पण नाही राहवलं..... Happy

सिगरेटच्या एका घ्रुवावर जळता निखारा
आणि दुसर्‍या घ्रुवावर घुमसता मी,
भरकटलेल्या विचारांची वावटळ
मेंदूचा कण न कण
गरगरवणारी.... बिन पात्याच्या पंख्यासारखी.
पोळलेला अर्क एका झुरक्यानिशी
शरीराच्या रंध्रारंध्रात...
नंतर गुदमरून वाटा शोधत
धुरांची वलये हवेत विरलेली,

काय नेमकं वर्णन कलंयस बॉस !! की गुरू ?? अं हं गुरूच !!! वा गुरू..............त्रिवार सलाम Happy

@rutuved : कौत्याने जेव्हा ही कविता फोनवर ऐकवली होती अगदी अर्थासहीत तेव्हा माझी पहिली रिअ‍ॅक्शन अगदी हिच होती. Happy