तुम्ही हापूस आंबे खात नाही??? मग तुम्ही आजवर काय जगलात? ह्या प्रश्नाइतकाच जिव्हाळ्याचा प्रश्न तुम्ही मलाही नक्कीच विचारु शकाल... सारं जग क्रिकेटवर फिदा आणि तुला ते आवडत नाही? कसं शक्यय? तुझ्या जीवनाला काय अर्थ आहे??? पण नाही, लोकहो! मी एकटीच नाहीये क्रिकेट न आवडणारी. एकतर सारं जग क्रिकेटवर फिदा नाहीच. बरंचसं जग फुटबॉलवर फिदा आहे, टेनिसवर फिदा आहे आणि ज्यांना क्रिकेटमध्ये किती खेळाडू असतात हे ही माहिती नाही, असे प्रगत राष्ट्रातलेसुद्धा लोकही आहेत!!! दचकायला होतं ना? अहो खरंच! माझ्या एका युरोपियन मित्राने कधीही क्रिकेटचा 'क' पण पाहिला नव्हता...
पण ते जाऊ दे! मी ही उदाहरणे कशाला द्यावी? आणि ह्या लोकांशी स्वतःची तुलना कशाला करावी? मी इतकेच म्हणेन, की क्रिकेटसाठी वेड्या असलेल्या लोकांच्या एका देशात... आपल्या भारत देशात माझ्यासारखेपण काही काही 'ऑड' लोक असतात, ज्यांचे क्रिकेटवेडाने भारलेल्या काळात फार हाल होतात... जिकडे तिकडे क्रिकेटचे वारे वहात असतात आणि ते आम्हाला झोंबत असतात. तर अशा ह्या मायनॉरिटी ग्रुपमधल्या माझे आणि माझ्यासारख्या काहींचे क्रिकेट दरम्यानचे हे किस्से!
क्रिकेट ना आवडणार्या माझ्यासाठी एक भाग्याची गोष्ट म्हणजे ही नावड मला अनुवांशिकच लाभली आहे, असे म्हणायला हरकत नाही. माझ्या बाबांना एकेकाळी क्रिकेट आवडायचे, पण नंतर त्यातला रस निघून गेला. मग बाकीचे लोक क्रिकेट बघत असतांना प्रचंड कंटाळलेले माझे बाबा नेहमी भारताच्या विरुद्ध टिमची बाजू घेऊन क्रिकेट बघतात आणि त्यांच्या टिमचे खेळाडू जिंकल्यावर, त्यांनी चौकार, षटकार मारल्यावर टाळ्या वाजवणे, दाद देणे असे गंमतीशीर प्रकार करतात. मग जे क्रिकेटचे दर्दी आजूबाजूला बसून मॅच एन्जॉय करत असतात, ते माझ्या बाबांकडे रागाचे कटाक्ष टाकतात आणि आमचे प्रचंड मनोरंजन होते... ही नेहमीचीच परिस्थिती.
नाही म्हणायला, मला तो ही दिवस चांगलाच आठवतोय....... काही वर्षांपूर्वी ज्या दिवशी विश्वकरंडक सामन्याच्यावेळी भारत फायनलला येऊन हरला होता. ती मॅच मी अगदी सिरियसली पाहिली होती. अगदी रडलेही होते! अख्खेच्या अख्खे सामने पाहण्याचा संयम माझ्यात नाही. सेमी फायनल-फायनलला भारत आला असेल, तर मी अधूनमधून असे सामने पहाते. तर तो सामना आम्ही सर्वांनीच अगदी गांभीर्याने पाहिला होता.
आता भारतापासून दूर असल्यावर क्रिकेटच्या वेडाच्या लाटांपासून मी दूर असते. त्यात नवर्यालाही क्रिकेटमध्ये काडीमात्र रस नाही, हे माझे अजून एक मोठे भाग्य!
तेंव्हा क्रिकेटचे सामने बघण्याची जबरदस्ती माझ्यावर करणारे कोणीही नाही. पण झाले असे, की ह्या वर्षीच्या विश्वकरंडकाच्यावेळी आमच्या मित्र-मैत्रिणींनी उपान्त्यफेरीचा भारत-पाकिस्तान सामना एकत्र पाहण्याचे ठरवले आणि भारत जिंकला, तर अंतिम फेरी पण एकत्रच पाहू हे ही एकमताने ठरले... मग काय? मला आणि नवर्याला गेट-टुगेदर तर हवे पण सामना मात्र नको! अशी मानसिकता... तशाच मानसिकतेतून एकत्र भेटायचे ठरले. माझी मैत्रिण 'बटाटेवडे करु या' म्हणाली. तिच्याच घरी भेटायचे ठरले होते. मी म्हणाले, 'मला सामन्यात रस नाही... तू कामात वेळ ना घालवता तोच बघत बस, मी घरून भाजी बनवून आणते. वडे तेवढे तुझ्या घरी आल्यानंतर तळू.' ती आनंदाने तयार झाली. तेवढेच मला आणि नवर्याला जरा उशीरा जायला निमित्त मिळाले.
तरीही, ज्यावेळेला आम्ही पोहोचलो, त्यावेळेला शेवटच्या २० ओव्हर्स बाकी होत्याच... माझे बाबा क्रिकेटचे सामने बघतांना काय मजेशीर प्रकार करतात, याचे किस्से मी नवर्याला अजिबात सांगितलेले नसूनही त्याने अगदी त्यांच्याचसारखे कसे काय केले? ही माझ्यासाठी मोठीच आश्चर्याची बाब होती!!! क्रिकेटची नावड असणारे सगळेच असेच वागत असतील का? असा प्रश्न त्यावेळी मला पडला... पण तिथे कंटाळलेल्या मला माझ्या नवर्याचे मजेशीर वागणे हाच एक विरंगुळा होता... पाकिस्तानच्या बाजूने टाळया वाजवणार्या त्याला फार मोठ्या रोषाला तोंड द्यावे लागले होते!!! पण माझी भक्कम साथ असल्याने, तो घाबरुन गेला नाही 
अर्थातच, भारत जिंकल्यावर आम्ही सर्वांनी मनापासून तो आनंद गरमगरम बटाटेवडे खात साजरा केला, हे वेगळे सांगायची गरज नाहीच...
अंतिम सामना आमच्याच घरी पहायचे ठरले. म्हणजे मग गेट-टुगेदर तर होईल आणि आम्ही कंटाळणारपण नाही असा दुहेरी आनंदाचा भाग होता. मॅचचा ब्रेकनंतरचा भाग आमच्याघरी पहायचे ठरले. मी आणि नवर्याने सगळा वेळ सगळ्यांसाठी स्वयंपाक करत घालवायचे ठरवले... नवर्याच्या गंमतीशीर कॉमेंट्स सहन करण्याची शक्ती आमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये नव्हती, त्यामुळे त्यांनी आनंदाने आम्हाला स्वयंपाकघरात ढकलले! भारताची बॅटिंग सुरु झालेली होती आणि आम्ही संध्याकाळचा चहा घेत होतो. तेंडूलकर बॅटिंग करत होता. नवरा उगीचच म्हणाला, मला वाटतंय, आता तेंडुलकर आऊट होणार! सगळे त्याच्यावर प्रचंड चिडले... मुख्य म्हणजे, त्यात मी ही होते... मी सांगितले ना, उपान्त्य आणि अंतिम सामन्यांच्यावेळी मी थोडीफार सिरियस असते. तर झाले असे, की बोलाफुलाची गाठ म्हणा की कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली म्हणा.... पण तेंडूलकर खर्र्च्च्च्च्च आऊट झाला!!!! झालं... घरातलं वातावरण एकदम टेन्स झालं. मग मी नवर्याला खेचूनच स्वयंपाकघरात घेऊन गेले. त्याला ह्यापुढे एकही कॉमेन्ट करायची नाही, अशी ताकिदच दिली सगळ्यांनी. जी त्याने पाळली. न पाळून सांगतो कुणाला? ह्यावेळी माझीपण साथ नव्हतीच ना!
गंमत म्हणजे, आमचा एक श्रीलंकन तमिळ मित्र पण मॅच पहायला आला होता. आता ह्याच्यासमोर आपण भारत जिंकला तर आनंद किंवा हरला, तर दु:ख कसं व्यक्त करायचं ? हा आम्हाला प्रश्नच पडला होता. जो मी झटक्यात निकालात काढला. त्याला म्हणाले, " श्रीलंकेत तमिळ आणि सिंहाली यांच्या प्रश्नाच्यावेळी आम्ही तुम्हा तमिळीयन्सची बाजू घेऊ, तू ह्या सामन्यात भारताकडून रहा!" त्याला माझं डील चक्क आवडलं!!!
तर अशाप्रकारे आम्ही भारत-श्रीलंका यांच्या दरम्यानचा अंतिम सामना कुठलेही विघ्न न आणता सर्वांना पाहू दिला आणि भारत जिंकल्यावर तो आनंदही मिळून साजरा केला!!!!!!!!!!!!!! 
छान लिहील आहेस. मला ही पुर्वि
छान लिहील आहेस.
मला ही पुर्वि क्रिकेट खुप आवडायच. अगदी बारावीच्या पेपरच्या वेळीही मी मधुन मधुन क्रिकेट वर झलक मारायचे. पण काही दिवसांतच मॅचफिक्सिंगच प्रकरण बाहेर पडल आणि तेंव्हापासुन मी मॅच पाहणच सोडून दिल. ह्यावर्षीची वर्ल्डकपची फायनल मी शेवटी शेवटी पाहीली.
'कोणते घोळ'? ते भारतातील ४
'कोणते घोळ'?
ते भारतातील ४ मे रोजी दुपारच्या आत लिहीन.
-'बेफिकीर'!
मास्तुरे बेफींना आठवण करुन द्या
मला क्रिकेट आवडतो...पण
मला क्रिकेट आवडतो...पण हसतखेळत लिहिलेला हा लेखसुद्धा आवडला !
धन्स सर्वांना!!! रुणूझुणू,
धन्स सर्वांना!!!
रुणूझुणू, तुझा प्रतिसाद मला खुप आवडला...
हा लेख वाचून सर्वांचे निखळ मनोरंजन व्हावे, हेच मला मनापासून वाटते... तसेच होवो अशी इच्छा!
>>> 'कोणते घोळ'? ते भारतातील
>>> 'कोणते घोळ'? ते भारतातील ४ मे रोजी दुपारच्या आत लिहीन.
बेफिकीरराव,
अहो तुम्ही काल लिहीणार होता ना?
आत्ता लिहितो मास्तुरे!
आत्ता लिहितो मास्तुरे!
पुढच्या प्रतिसादात!
धन्यवाद!
मास्तुरे, उशीर झाल्याबद्दल
मास्तुरे,
उशीर झाल्याबद्दल क्षमस्व!
माझी मते नोंदवत आहे.
===================================================
फिक्सिंग हे व्यक्तिगत पातळीवर शक्य आहे. म्हणजे एखादा खेळाडू ठरवून वाईट खेळू शकेल किंवा आलेले झेल सोडू शकेल. पण एखाद्याच्या व्यक्तिगत खेळामुळे संपूर्ण सामन्याचा निकाल फिरविता येणे जवळपास अशक्यच वाटते. >>>
माझ्यामते अकरापैकी एकावेळेस दोन किंवा तीन खेळाडूही भ्रष्ट होऊ शकतात. या शिवाय, अनेक लहानश्या घटकांमुळे मॅच फिरलेली आपण पाहिलेली आहेच. १९८३ मध्ये रिचर्ड्सचा झेल कपिलने घेतला तेथे काहिशी मॅच फिरणे हे एक उदाहरण! याच विश्वचषकातील फायनल मध्ये खालील तीन प्रकार घडले.
१. श्रीलंकेच्या पहिल्या वीस ओव्हर्समध्ये जेमतेम ८० ते ९० धावा झालेल्या असतानाही दुसर्या स्पेलसाठी प्रख्यात असलेल्या झहीरने व इतरांनी इतक्या धावा दिल्या की २७४ टोटल झाली.
२. ९५ वर असताना गंभीरने मारलेला एक जोरकस फटका पाहून धोनी त्याच्याकडे गेला व रागारागाने काहीतरी पुटपुटला. गंभीरचे शतक झाले असते तर तो सामन्याचा मानकरी ठरला असताच.
३. संपूर्ण मालिकेत ज्याच्या कप्तानकीचे गोडवे गाण्यात आले त्य धोनीला फलंदाजीचा सूर बरोब्बर श्रीलंकेविरुद्धच सापडला.
जे म्हणायचे आहे ते असे की एका खेळाडूमुळेही बरेच काही होऊ शकते असे मला तरी वाटते. दुसरे म्हणजे साहेबांचे ८५ धावांमध्ये पाकिस्तान्यांनी जे झेल सोडले त्यावरून एकाहून अधिक खेळाडू सहभागि असू शकतात इतके मान्य व्हायला हरकत नसावी. आता या सर्व बाबी फिक्सिंग नव्हत्याच असे म्हणणे जितके शक्य आहे तितकेच होत्याच असे म्हणणेही आहे असे आपले मला वाटते.
त्यासाठी दोन्ही संघातील सर्व २२ खेळाडूंचा सहभाग हवा. फिक्सिंग घडवून आणणारे ते प्रेक्षकांना मजा यावी म्हणून करत नसावेत. ते सामन्यावर झालेल्या बेटिंगवर ठरवत असणार.>>>
सहमत आहे की बेटिंगवर ठरत असणार! पण सध्या क्रिकेट हा खेळ भारतीय प्रेक्षकांच्याक्रिकेट वेडावर जगतो आहे. या प्रेक्षकांच्या मनासारखे झाले की अतीप्रचंड उलाढाल होते सेलेब्रशनची! या उलाढालीत बेटिंगवाल्यांना वेगळि पोळी भाजून घेता येते. तसेच, या प्रेक्षकांची निराशा झाली तर क्रिकेटला जगात वाली कोण हा प्रश्न काही अंशी तरी निर्माण होऊ शकतो. तसेच, बेटिंगही सर्वात जास्त भारतातच होते कारण हा खेळ जगतोच आहे भारतावर! त्यामुळे बेटिंगवाल्यांनी भारत जिंकण्यासाठी इतर खेळाडुंना विकत घेणे हे नैसर्गीक असावे. मात्र आपले 'सर्व बावीस खेळाडुंचा सहभाग असावा ' हे वाक्य मात्र मला पटले नाही.
२०११ च्या स्पर्धेतला कोणताही सामना फिक्स होता असे मला वाटत नाही. पाकड्यांनी सचिनचे ठरवून झेल सोडले असे काही जणांचे मत आहे. पाकिस्तानचे खराब क्षेत्ररक्षण जगप्रसिध्द आहे. त्यामुळे त्यांनी झेल सोडल्याचे कोणाला फारसे आश्चर्य वाटलेले नाही. जर ठरवून झेल सोडले असते तर वेगवेगळे ४ खेळाडू यात सहभागी होते असे म्हणले पाहिजे.>>>>
अक्रम कर्णधार असतानाच्या विश्वचषकातही अब्दुल रझाकने सचिनचाच मिड ऑनला झेल सोडला. त्यानंतर सचिनने ९८ धावा कुटल्यामुळे व द्रविडची भिंत उभी राहिल्यामुळे तो सामना आपण जिंकलो. पाकचेच काय, आपलेही क्षेत्ररक्षण अत्यंत खराब असतानाही ते फायनलल तुफान सुधारले अचानक!
जर तो सामना पाकड्यांना मुद्दामहून हरायचा होता तर वहाब रियाझला ५ बळी घेण्याची गरज नव्हती. उलट वेडीवाकडी गोलंदाजी करून भारताला त्याने भारताला ३५० च्या पुढे जाऊन द्यायला पाहिजे होते.>>>
असा नियम लावला तर सर्वच पाक खेळाडुंनी सुमार खेळ करायला हवाहोता असेही म्हणता येईल. एक दोन खेळाडुंना फिक्स करून सामना फिरवता येतो असे मला वाटते. आपल्याला तसे वाटत नाही.
श्रीलंकेने सुध्दा अंतिम सामना ठरवून हरला अशी एक अफवा आहे. ते खरे वाटत नाही. हरायचेच होते तर २७४ धावा करण्याऐवजी ते २०० धावांच्या आतच बाद झाले असते आणि महिला जयवर्धने, संगक्कारा, थिसारा परेरा, कुलसेकरा, दिलशान इं. नी चांगली फलंदाजी केली नसती. भारताने फिक्सिंगमुळे तो किंवा स्पर्धेतले इतर काही सामने जिंकले असे म्हणणे हा चांगला खेळ केलेल्या भारतीय खेळांडूवर अन्याय आहे.>>>
अन्याय आहे हे मान्य आहे. पण तोपर्यंत जोपर्यंत त्यातले खरे काय ते बाहेर पडत नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यातही सचिन २४ वर सुमार झेल देऊन बाद झाला. याहीवेळेस बाद झाला. आताहे असे बोलणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे आहे हे मान्य आहे. पण आपले वाटले तसे! आणि साहेबांनी क्रुशल गेममध्ये लवकर बाद होण्याचाही एक विक्रम केलेला आहेच. (स्टॅटिस्टिक्स माईट टेल अदरवाईझ टू, बट एव्हरीवन नोज)
फिक्सिंगमध्ये काही खेळाडू व्यक्तिगत पातळीवर सहभागी असल्याचे यापूर्वी काही वेळा उघडकीला आले आहे. परंतु संघातले सर्व ११ खेळाडू त्याच्यात सहभागी असणे अशक्य वाटते.
>>>
सहमत आहे. सगळे सहभागी असणे जवळपास अशक्यच आहे. तसेच, धक्कादायक निकाल लागणे हे काही क्रिकेटला नवीन नाही म्हणा! याहीवेळेस इंग्लंड कुणाशीही हारत होते. पण एक बाब आपणही विचारात घ्यावीत असे मला वाटते. की क्रोनिएने जाहीर कबुली दिली होती की एका पार्टीत मी काहीजणांना पीचचा अंदाज सांगीतला होता. आता यावरून जर त्याच्यावर कारवाई होत असेल, तर एखाद्या खेळाडुने झेल सोडणे किंवा धावा देणे हे किती महत्वाचे ठरत असेल!
मास्तुरे,
आपली मते मला खरोखरच मान्य करायचा मोह होत आहे. शंकाच नाही. पण भीती अशी वाटते की दुर्दैवाने ती चुकीची निघाली तर? काही दिवसांनी हे बाहेर पडले तर?
बाकी गैरसमज नसावा. काही चुकले माकले तर क्षमस्व!
-' बेफिकीर '!
बेफिकीरराव, मी माझ्या परीने
बेफिकीरराव,
मी माझ्या परीने प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो. क्रिकेट सामन्यातल्या प्रत्येक घटनेकडे प्रत्येकजण आपल्या चष्म्यातून बघून काही निष्कर्ष काढतो. एखादा फलंदाज जेव्हा बाद होतो, तेव्हा काही जणांना फलंदाज मुद्दाम ठरवून बाद झाला असे वाटू शकते, तर, काही जणांना ती गोलंदाजाची करामत वाटते. आपापल्या परीने ते दोघेही बरोबर वाटू शकतात.
>>> १. श्रीलंकेच्या पहिल्या वीस ओव्हर्समध्ये जेमतेम ८० ते ९० धावा झालेल्या असतानाही दुसर्या स्पेलसाठी प्रख्यात असलेल्या झहीरने व इतरांनी इतक्या धावा दिल्या की २७४ टोटल झाली.
शेवटच्या ८-१० षटकांत भरपूर धावा होतातच. श्रीलंकेने आपला शेवटचा पॉवरप्ले शेवटच्या ५ षटकांत घेतला. ४५ षटके संपल्यानंतर त्यांचे ४ च गडी बाद झाले होते. त्यामुळे त्यांना धोका पत्करून खेळता आले कारण खाली मारामारी करणारे बरेच फलंदाज शिल्लक होते व शेवटची ५ च षटके शिल्लक होती. हाच पॉवर प्ले ३६ व्या किंवा ४१ व्या षटकात घेतला असता तर पूर्ण ५० षटके खेळून काढण्याच्या दडपणामुळे एवढ्या धावा झाल्या नसत्या. पॉवर प्ले मुळे फक्त ११ पैकी ८ क्षेत्ररक्षक ३० यार्डांच्या आत उभे होते. त्यामुळे चौकार/षटकार मारायला भरपूर संधी होती. नॉर्मली पॉवर प्ले च्या ५ षटकांत ४०-५० धावा होतातच. अंतिम सामन्यात थोड्या जास्त म्हणजे ६३ झाल्या. याचे अजून एक कारण म्हणजे खेळपट्टी इतर सामन्यांप्रमाणे संथ नसून पूर्ण निर्जीव होती. या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे ६३ धावा झाल्या व श्रीलंकेला २७४ ची मजल गाठता आली. दुसरा स्पेल फक्त झहीरच (इतर गोलंदाज फारसा चांगला टाका नव्हते) चांगला टाकत होता. पण या सामन्यात त्याची शेवटच्या ३ षटकात धुलाई झाली. यात निव्वळ त्याचे अपयश कारणीभूत नसून श्रीलंकन फलंदाजांच्या कौशल्याचाही वाटा आहे.
>>> ३. संपूर्ण मालिकेत ज्याच्या कप्तानकीचे गोडवे गाण्यात आले त्य धोनीला फलंदाजीचा सूर बरोब्बर श्रीलंकेविरुद्धच सापडला.
असे पूर्वी अनेकवेळा झाले आहे. जयवर्धनेने देखील या स्पर्धेत प्रमुख संघांविरूध्द फारश्या धावा केल्या नव्हत्या. पण त्याला अंतिम सामन्यात बरोबर सूर सापडला. याउलट जबरदस्त फॉर्मात असलेल्या थरंगा व सचिनला फारश्या धावा करता आल्या नाहीत. क्रिकेटमध्ये सरासरीचा नियम बहुतेक वेळा सिध्द होतो. २००३ (पहिल्या १० सामन्यांत ६ अर्धशतके + १ शतक, पण अंतिम सामन्यात फक्त ४ धावा) व २०११ (पहिल्या ८ सामन्यात २ शतके + २ अर्धशतके) मध्ये स्पर्धेत भरपूर धावा केलेल्या सचिनला नेमका अंतिम सामन्यात सूर गवसला नाही तो याच कारणामुळे. याच कारणामुळे आधी फारश्या धावा न केलेल्या धोनीने अंतिम सामन्यात ९१ धावा केल्या. याची अजून काही कारणे म्हणजे (१) खेळपट्टी पाटा होती, (२) कोहली व गंभीरने योग्य त्या गतीने धावा करून धावगती कधीच सहा-सव्वासहाच्या पलीकडे जाउन दिली नाही व त्यामुळे कोहली बाद झाल्यावर फक्त टिकून राहणार्या फलंदाजाची गरज होती जी धोनीने पूर्ण केली. त्यामुळे धोनीला अंतिम सामन्यात सूर गवसला याचे मला तरी आश्चर्य वाटले नाही. अंतिम सामन्यापूर्वी मी एका प्रतिसादात लिहिले होते की सरासरीच्या नियमामुळे दिलशान, थरंगा व सचिन बहुतेक अयशस्वी होतील व जयवर्धने भरपूर धावा करेल. ते बरेचसे खरे ठरले (दिलशान - ३३, थरंगा - २, सचिन - १८ व जयवर्धने - १०३).
>>> अक्रम कर्णधार असतानाच्या विश्वचषकातही अब्दुल रझाकने सचिनचाच मिड ऑनला झेल सोडला. त्यानंतर सचिनने ९८ धावा कुटल्यामुळे व द्रविडची भिंत उभी राहिल्यामुळे तो सामना आपण जिंकलो.
सचिन बाद झाला असता तरी कैफ, द्रविड व युवराजच्या फलंदाजीमुळे तो सामना आपण नक्कीच जिंकला असता.
>>> एक दोन खेळाडुंना फिक्स करून सामना फिरवता येतो असे मला वाटते. आपल्याला तसे वाटत नाही.
एक दोन खेळाडूंनी खराब खेळ करून सामन्याचा निकाल बदलता येत नाही. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. जसे एखाद्या खेळाडूच्या जीवावर सामना जिंकता येत नाही तसेच एखाद्या खेळाडूच्या कामगिरीमुळे सामना हरता देखील येत नाही. संघातल्या बहुसंख्य खेळाडूंच्या कामगिरीवर संघाची कामगिरी अवलंबून असते.
>>> आणि साहेबांनी क्रुशल गेममध्ये लवकर बाद होण्याचाही एक विक्रम केलेला आहेच. (स्टॅटिस्टिक्स माईट टेल अदरवाईझ टू, बट एव्हरीवन नोज)
सचिन अंतिम सामन्यात अनेक वेळा लवकर बाद झालेला आहे. तसेच अनेक वेळा अंतिम सामन्यात त्याने चांगली कामगिरी केलेली आहे. याविषयी अनेकवेळा लिहून झालेले आहे तसेच आकडेवारी देखील दिलेली आहे. मी फक्त मला चटकन आठवणारी उदाहरणे देतो.
(१) १९९८ मध्ये शारजा येथील अंतिम सामन्यात सचिनने १४२ धावा केल्या. हा सामना भारताने जिंकला होता.
(२) २००३ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात सचिनने ४ धावा केल्या (निकाल - भारत पराभूत)
(३) २०११ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात सचिनने १८ धावा केल्या (निकाल - भारत विजयी)
(४) २००८ च्या तिरंगी स्पर्धेतल्या २ अंतिम सामन्यात सचिनने पहिल्या सामन्यात १११ व दुसर्या सामन्यात ९१ धावा केल्या (निकाल - दोन्ही सामन्यात भारत विजयी). पहिले दोन्ही सामने जिंकल्यामुळे तिसरा सामना झालाच नाही.
(५) २००१ च्या लक्ष्मण व भज्जीने गाजवलेल्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी असताना तिसर्या कसोटीत सचिनने शतक केले होते. तो सामना भारताने जिंकून २-१ अशी मालिका जिंकली.
सचिनने अंतिम सामन्यात चांगला खेळ करून सुध्दा भारत पराभूत किंवा भारत विजयी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. तसेच त्याने अंतिम सामन्यात वाईट खेळ करून सुध्दा भारत विजयी किंवा भारत पराभूत झाल्याची देखील अनेक उदाहरणे आहेत. सचिन अंतिम सामन्यात कायम फेल जातो हा चुकीचा निष्कर्ष असल्याचे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. सचिनने अंतिम सामने खेळण्याचाही विक्रम केला असल्यामुळे त्यात लवकर बाद होण्याचाही विक्रम त्याच्या नावावर येणारच. क्रिकेट हा सांघिक खेळ असल्यामुळे एकट्या सचिनच्या कामगिरीवर सामन्याचा निकाल अवलंबून नसतो.
>>> आपली मते मला खरोखरच मान्य करायचा मोह होत आहे. शंकाच नाही. पण भीती अशी वाटते की दुर्दैवाने ती चुकीची निघाली तर? काही दिवसांनी हे बाहेर पडले तर?
काही दिवसांनी हे बाहेर पडले तर मला निश्चितच धक्का बसेल. कदाचित माझे क्रिकेटवेड कायमचे नष्ट होईल.
>>> बाकी गैरसमज नसावा. काही चुकले माकले तर क्षमस्व!
अहो मला उगाच लाजवू नका. क्षमा कसली मागताय!
धन्यवाद मास्तुरे, प्रतिसाद
धन्यवाद मास्तुरे, प्रतिसाद खूप आवडला.
माझी मानसिकता बदलायचा प्रयत्न करतो आता.
अजून काही चर्चा करावीशी वाटली तर आपल्याशी याच धाग्यावर करेन, आशा आहे की आपल्याला आवडेल!
सानी, सेम पिंच... आमच्या अगदी
सानी, सेम पिंच... आमच्या अगदी डिट्टो परिस्थिती आहे..
मार्को पोलो मास्तुरे आणि
मार्को पोलो
मास्तुरे आणि बेफिकीर यांचे प्रतिसाद वाचून हेल्दी डिस्कशन कसे असू शकते, याचे चांगले उदाहरण पहायला मिळाले.
लेख चांगला झालाय. मी मात्र
लेख चांगला झालाय.
मी मात्र दुसर्या गटात. वेळ वाया जातो वगैरे कितीही मान्य असले तरी क्रिकेट बघितले जातेच. यावेळी मी इंग्लंडचे आणि भारताचे सगळे सामने बघितले. भारत वि इंग्लंड सामन्यात कोणाच्या बाजूने व्हावे हे ठरत नव्हते. तर सामना व्यवस्थित बरोबरीत सुटला.
फिक्सिंग वगैरे कितीही असले तरी एकेक चेंडू, फटका, झेल बघायला मजा येते.
आजच वाचलेला हा फिक्सिंगचा लेख.
डायल एम
Pages