आणखी एक राधिका

Submitted by मंदार-जोशी on 2 May, 2011 - 06:05

८ मार्च २०११ रोजी सगळा देश - नव्हे - अखिल विश्व जागतिक महिला दिन साजरा करत असतानाच राजधानी दिल्लीत राधिका तन्वर या कॉलेज तरुणीला एका युवकाने गोळी घालून ठार केल्याच्या वृत्ताने सगळा देश हादरला.

"सगळा देश हादरला" असं लिहीण्याची पद्धत असते. कारण असले प्रकार आजकाल इतके सर्वसामान्य झाले आहेत की कुणी हादरत वगैरे नाही. एका सहकर्मचार्‍याची प्रतिक्रिया अगदी प्रातिनिधिक म्हणावी लागेल. "असेल काहीतरी प्रेमाबिमाचं लफडं, सोड यार".

सुदैवाने चार दिवसांत पोलीसांनी यशस्वी(!) तपास करुन खुन्याला अटक केली. विजय उर्फ राम सिंग हा तो खूनी. पोलीसांनी नेहमीच्या पद्धतीने चौदावं रत्न दाखवून त्याची चौकशी केली तेव्हा जे उघड झालं ते समजल्यावर मात्र हा विषय डोक्यातून जाईना.

उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील राम सिंग हा राधिकाच्या घराजवळच असणार्‍या एका शिवणकाम कारखान्यात कामाला होता. राधिकाचा पाठलाग करणे आणि तिला छेडणे हा त्याचा आवडता छंद होता. तसंही मुलींना अशा प्रकारे त्रास देणे हे प्रकार नवीन नव्हते, पण त्याचा राधिकावर विशेष "जीव" असावा. असाच एकदा राधिकाचा पाठलाग करत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतानाच राधिकाने धावत रस्त्यातच उभ्या असलेल्या काही लोकांना गाठले आणि "तो माणूस मला छेडतोय" अशी आरोळी ठोकली. एखादा चोर, मुलींना छेडणारा नि:शस्त्र गुंड असे कोणी तावडीत सापडले की हात साफ करायला लोक टपलेलेच असतात. अर्थातच त्या लोकांनी मग "लडकी को छेडता है" किंवा तत्सम डायलॉग मारत त्याला बेदम चोप दिला. अशा अनेक गोष्टी कानावर आल्याने राम सिंगला कामावरुन काढून टाकण्यात आले. असेच काही दिवस गेले पण राम सिंग राधिकाचा पाठलाग करणे आणि तिने स्पष्ट नकार दिल्यावरही तिच्याकडे आपल्या एकतर्फी "प्रेमाची" कबूली देणे सोडेना.

नोकरी गेल्याने राम सिंगने मुंबई गाठली आणि तिथे रोजगार शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्याच्या विकृत डोक्यातून राधिकाचा विचार जाता जाईना. त्याने वारंवार दिल्लीला येऊन राधिकाच्या मागावर राहणे सोडले नाही. एकदा राधिका बस मधून उतरून पादचारी पुलावरून जात असताना पुन्हा त्याने राधिकाला गाठले आणि त्याच्याशी लग्न करण्याची गळ घातली. तिच्याही मनात त्याच्याविषयी 'प्रेमभावना' असल्याचा त्याचा समज होता. तसं बोलून दाखवल्यावर राधिकाने तिथेच त्याच्या श्रीमुखात भडकावली. आता हा आपल्याला त्रास देणार नाही अशा समजूतीत असलेल्या राधिकाला मात्र राम सिंगच्या मनात भडकलेल्या सूडाग्नीची कल्पना कशी असावी?

विजय उर्फ राम सिंगने आपला सूडाग्नी शमवण्यासाठी राधिकालाच संपवण्याचा घाट घातला. त्याने सरळ गुरगाव गाठले आणि तिथून दोन हजार रुपये देऊन एक 'कट्टा' उर्फ गावठि पिस्तूल विकत घेतले. गंमत म्हणावी की दैवदुर्विलास, आपल्या देशात डि.व्ही.डी प्लेअर आणि पिस्तुल या दोन वस्तू एकाच किंमतीत आणि सहजतेने विकत घेता येतात.

पिस्तूल घेऊन पूर्ण तयारीने तो पुन्हा दिल्लीला आला आणि एके दिवशी संधी साधून त्याने राधिकाला गाठले. पुन्हा त्याला झिडकारून राधिकाची पाठ वळताच त्याने खिशातून पिस्तुल काढले. पण लगेच न चालवता जिना सुरू होण्याच्या जराच आधी त्याने तिच्यावर झाडून जिन्यावरुन उतरुन पळ काढला. पुलावर बर्‍यापैकी वर्दळ असल्याने काही क्षण कुणाला काय झाले ते समजेना. ह्याच गोंधळाचा फायदा घेऊन राम सिंग तसाच पिस्तूल हातात घेऊन पळाला आणि दिल्लीच्या गर्दीत दिसेनासा झाला.

पोलीसांनी तिच्या घरच्यांकडे आणि महाविद्यालयातील मित्रपरिवाराकडे आधी चौकशी केली. मग इतर तपास सुरु झाला आणि राम सिंगच्या खोलीत राहणार्‍या मित्रांकडून माहिती मिळाल्यावर तपास वेगाने करुन त्याला मुंबईतून अटक केली. राम सिंगला त्याच्या कृत्याविषयी अजिबात पश्चात्ताप नव्हता "माझी बायको नाही झाली तर आता इतर कुणाचीही होणार नाही" असले विकृत समाधान त्याच्या चेहर्‍यावर झळकत होते.

मला सर्वात जास्त क्लेषकारक वाटलेली बाब म्हणजे राधिकाच्या घरच्यांच्या चौकशीत पोलीसांना जी धक्कादायक बाब समजली ती होय. असे काही प्रकार अनेक दिवस सुरू असल्याचे राधिकाने तिच्या घरच्यांना सांगितलेच नव्हते! मग त्याचं नावही ठाऊक असणं दूरच राहिलं. राम सिंगला जेव्हा अटकेनंतर तिच्या घरच्यांनी पाहिले तोपर्यंत त्यांनी त्याला त्यांच्या घराच्या आसपास बघितलेही नव्हते!! राधिकाने जरी फक्त तिच्या घरच्यांना 'एक माणूस आपला पाठलाग करत असतो आणि आपल्याला छेडत असतो" असं नुसतं सांगितलं असतं तरी पुढची कारवाई करुन पुढची अप्रिय घटना टाळता आली असती.

हे समजल्यावर मनात असंख्य प्रश्नांचे मोहोळ उठले. असे का झाले असावे? याला घरचे वातावरण कारणीभूत असावे का? शक्य आहे. कारण असले प्रकार घडल्यावर "तुझीच काहीतरी चूक असेल" अशी मुक्ताफळे उधळणारे पालक आहेतच की. मुलांना आई-वडीलांची इतकी भीती वाटावी, की छेडछाड आणि पाठलागासारख्या गंभीर बाबीही त्यांना सांगायला संकोचावे? मुलांना - आणि विशेषतः मुलींना) धाकात ठेवण्याच्या प्रयत्नात आपण त्यांना आपल्यापासून दूर करत आहोत ह्याची जाणीव पालक म्हणून आपल्याला राहिली नाही असे झाले आहे का? मुले आणि आई-वडील/एकूणच घरातले यांच्यातला संवाद इतका हरवत चालला आहे का, की आपल्या अब्रू आणि जिवाला असलेल्या धोक्याबाबतही घरच्यांशी बोलावेसे मुलांना वाटू नये? की राधिकाला वाटलं तशी ही बाब गांभीर्याने घेण्याजोगी वाटत नाही अनेक मुलांना? बाहेर घडणारं सगळं आपल्या आई-वडिलांना सांगणारी मुले आहेत, मान्य. पण अगदी काहीच न बोलणारी, थोडंच सांगणारी, किंवा नेमकं महत्वाचं तेच न सांगणारीही मुलं आहेतच की.

विकृत मंडळी जागोजागी असणारच, पण मग मुले असले प्रकार घरी का सांगत नसावीत? काहीही झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असा विश्वास आपण आपल्या मुलांच्या मनात निर्माण करण्यात अपयशी ठरतोय का?

अशा अनेक राधिका या आधी झाल्या आहेत. पुढेही होतील. पण मुलांच्या मनात विश्वास निर्माण करण्याच्या दिशेने — जेणेकरुन त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सकारात्मक पावले टाकता येतील — आपल्याला काय करता येईल?

गुलमोहर: 

तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असा विश्वास आपण आपल्या मुलांच्या मनात निर्माण करण्यात अपयशी ठरतोय का? >> नाक्की हेच कारण आहे.
अरे हो पण आई वडील तरी तसल्या मानसिकतेचे असले पाहीजे ना...? हेके खोर पालकांनी तसेच अतीसंवेदनशील पालकांनी आपल्या मुलांना घाबरवुनच जास्त ठेवले असते. अनेक पालकांना तर आपल्या पाल्याशी मैत्री जमवणेच अपमानास्पद आणि फोलपणा चे वाटते.

अशीच घटना नुकतीच नागपुरात घडुन गेली... मोनिका किरणापुरे नावाच्या मुलीची... पण पोलिसांचे असे मत आहे की तिच्या मैत्रीणीवर एक तर्फी प्रेम करणारा व्यक्ती त्याने सुपारी दिली होती तर त्या व्यक्तींनी चुकुन हिला मारले... आता काय म्हणावं याला.. :स्मितः बाकी छान लिहलेस.. :स्मितः

मन बधीर करुन टाकणारी घटना आहे. शेवटचे प्रश्न तर अंतर्मुख करणारे... घरात सुसंवाद नसल्याने अशा कित्येक घटना मुली आपल्या मनातच दाबून टाकत असतील, नाही का? ह्या घटनेत राधिकाचा खून झाला नसता तर न जाणो ती मुलगी आयुष्यभर राम सिंग च्या मानसिक छळाला तोंड देत राहिली असती...

चांगला विषय मांडला आहेस मंदार...

राधिकाला घरी न सांगावेसे वाटणे, ह्याच्या मागे मुलींनी अशा प्रकारच्या तक्रारी केल्यावर त्यांच्याच चारित्र्याला दोष दिला जातो, हेच महत्वाचे कारण वाटतेय... किंवा तिला असे काही सांगायची प्रचंड लाज वाटत असावी...

दुर्दवी घटना! Sad

लेख आवडला मंदार!

एकंदर परिस्थिती तुम्ही म्हणता तशी भयावह आहेच. कारणेही अनेक असतील. आणि उपायही!

आपल्या संस्कृतीतील स्त्री मुळात स्वतःला अबला समजते हा तो प्रॉब्लेम आहे की काय कोण जाणे!

मंदार, मुलं घरी सांगत नाहीत हा प्रॉब्लेम आहेच. पण त्याचबरोबर स्त्रीला आपली मालमत्ता समजणं, माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणजे तिचं मत काहीही असो, तिने माझी मालकी मान्य केली पाहिजे, हा जास्त मोठा प्रश्न आहे.
रिंकू पाटील ते राधिका आणि आता आणखी पुढे, ही मालिका संपवण्यासाठी अशा प्रकारच्या पुरुषांची मनोवृत्ती बदलणं, नकार पचवायला शिकवणं जास्त आवश्यक नाही?

मी शाळा-कॉलेजमधे असताना बर्‍याच मुली छेड-छाडीचा त्रास, एखादा मुलगा पाठिशी लागणे वगैरे घरी सांगत नसत. घरी कळले तर घराबाहेर पडणे बंद होईल, शिक्षणच थांबेल ही भीती असे त्यांच्या मनात. घरी सांग म्हणून कितीही पाठिशी लागले तरी ऐकत नसत. Sad

अशी विकृत माणसं कितीही प्रयत्न केले तरी समजा १०० पैकी ५० असतील तर ती संख्या १०० पैकी १० वर येईल. पण असली माणसं ही प्रत्येक संस्कृतीत, देशात असणारच. प्रमाण कमी-जास्त असेल कदाचित.
आणि अशा प्रकारात मुलंही (male) सापडू शकतात. माझा प्रश्न मुलं किंवा मुली या भेदापलीकडचा आहे. प्रश्न असा आहे की मुलांमधे आणि पालकांमधे हरवत चाललेला सुसंवाद कसा सुधारता येईल.

विकृत मंडळी जागोजागी असणारच, पण मग मुले असले प्रकार घरी का सांगत नसावीत? >> हा प्रश्न् आजच्या तरुणांनांच विचारल्यास योग्य उत्तर मिळण्याची शक्यता आहे. नाही तर वादीत आहे.

एकतर्फी प्रेमातून घडलेली ही एकमेव घटना नाहीए. (भर रस्त्यात मुलीच्या अंगावर अ‍ॅसीड फेकणे... वगैरे) Sad

पण खरचं राधीकेने आपल्या घरी हे सांगितलं असतं तर पुढील जीवघेणा प्रसंग टळला असता.

तू मांडलेला पालक-मुलांच्या संवादाविषयीचा मुद्दा पटला.

पुरुषांची मनोवृत्ती बदलणं>> नेमके हेच अजिबात होऊ शकत नाही म्हणून इस्लामी कायदे यावेत की काय असे वाटते. चोरी केलीस? हात तोडतो. छेडलंस कुणालातरी? शंभर फटके!

पालकांना सांगून नेमके काय होणार ते माझ्या लक्षात येत नाही आहे. तो माणूस वागायचा तसाह वागणार ना? फार तर काही वेळा पालक लक्ष ठेवतील किंवा तिच्या वावरावर बंधने आणतील. पण कधी ना कधी तो संधी साधणारच ना? पालकांनी तक्रार नोंदवली तरीही 'समज देणे' व 'काही प्रमाणात शिक्षा' या पलीकडे फारसे काही होणार नाही व त्यामुळे उलट त्या गुन्हेगाराच्या मनातील सूडाची भावना वाढेलच!

म्हणजे पालकांना सांगूच नये असे मला म्हणायचे नसून असे म्हणायचे आहे की मुलात ती प्रवृत्तीच तशी असल्यामुळे भीती वाटेल अशा शिक्षा ठेवणे हाच उपाय दिसतो.

बेफी, आपल्या देशात कसाबला अजून फाशी होत नाही तिथे नुसतं कडक शिक्षा ठेऊन काय उपयोग. त्याची अंमलबजावणी होत नसेल तर उपयोग काय?
फक्त आपल्या हातात काय आहे यावर विचार करावा असं वाटतं.

हे का होऊ शकत नाही? आणि हे मान्यच करून चालायचं म्हणजे इथेच तालिबान होईल की!
असा विकृत समाज निर्माण होऊच नये यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.

विषयाला अनुसरून म्हणायचं तर पालकांनी थोडा पेशन्स दाखवणं, मुला/मुलीला मोकळं वातावरणं देण, त्यांचं ऐकून घेणं आणि आम्ही तुझ्यासोबत आहोत हा विश्वास त्यांना देणं खूप आवश्यक आहे.

पालकांना सांगीतले असताही जर त्याने तिला रस्त्यात घाठुन मारले नसते कशाहुन
मुलांना सध्या जास्त मोकळीक दिली जाते, म्हणजे मुला, मुलींना सुध्दा यातुन असे प्रमाद घडतात. त्यांना शिकविणारे शिक्षक हे चांगले नसणे कधी तर शिक्षकच मुलीच्या प्रेमात पडल्याचे उदाहरण पहावयास मिळते. यात पाश्चात्य अंधानुकरण फोकावले आहे.

पालकांना सांगीतले असताही जर त्याने तिला रस्त्यात घाठुन मारले नसते कशाहुन
मुलांना सध्या जास्त मोकळीक दिली जाते, म्हणजे मुला, मुलींना सुध्दा यातुन असे प्रमाद घडतात. त्यांना शिकविणारे शिक्षक हे चांगले नसणे कधी तर शिक्षकच मुलीच्या प्रेमात पडल्याचे उदाहरण पहावयास मिळते. यात पाश्चात्य अंधानुकरण फोकावले आहे.>>. सहमत आहे.

मंदार तुझा मुद्दा पटेबल आहे की, पालक आणि मुलांचे मैत्री पुर्ण नाते..,पालकांनी मुलांना समज दिली पाहिजे हे चुक ते बरोबर हे असं ते तसं वगैरे वगैरे फलां फलां........पण मुळ पालकांमध्ये अशी समज असली पाहीजे ना..? म्हणजे मुली आणी मुलं दोघेही संमंजस बनतात. नाहीतर...

['गोडाउन में ही लोचा रहेगा तो सँपल भी वैसाही रहेगा ना...?']

मंदार, या प्रश्नावर संवाद आत्ताच हरवलाय असे नाही. पूर्वीही असे प्रकार घरी सांगितले जात नसत. सुदैवाने गोष्टी फार टोकाला जात नसत एवढेच. काही झाले तरी तुला आम्ही दोष देणार नाही हे मुलांना सांगणे आणि कृतीतून दाखवणे महत्वाचे. वर ठमा म्हणते तसे नकार पचवायला शिकवणे आवश्यक आणि त्याची सुरुवात १२-१३ वर्षीच व्हायला हवी. आणि एवढे करुनही रस्त्यावरच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे काय करायचे हा प्रश्न आहेच.

बलात्कार्‍यास फाशी नाही... जिवंत ठेवावे पण ....अगदी असाह्य जीवन जगत ठेवावे त्याला.
मुलगा असो वा मुलगी .. बाहेरच्या दुनियेत त्याला त्रास आहेच.. रॅगिंग छेड छाड हे प्रकार बिनदिक्क्त चालु आहे..
तरी आईवडिलांनी मुलांना विश्वासात घेऊन बोलते केले पाहिजे..आणि मुलांनी जरी घरी सांगीतले तरी आईवडिलांनी न रागवता त्यांना सहाय्यता करावी.., काही ठिकाणी पोलीसांची मदत घेणे आवश्यक आहे ...

पालकांना सांगीतले असताही जर त्याने तिला रस्त्यात घाठुन मारले नसते कशाहुन>>> पूर्ण अनुमोदन! नकार पचवता न येण्याची, बदला घेण्याची ही विकृत प्रवृत्ती त्याच्यात असल्याने, त्याने कसेही करुन डाव साधला असताच... राम सिंगशी या विषयावर बोलणारा, त्याचे मन मोकळे होईल अशा पद्धतीने त्याच्याशी गप्पा मारणारा एखादा मित्र त्याला असता, तरच हे टळले असते... राम सिंगशी राधिकाची डील करण्याची पद्धतही जरा वेगळी असती,तर परिस्थिती वेगळी असती...जे लोक आपला संताप मनातच दाबून ठेवतात, त्यांच्या संतापाला अशीच काहीतरी विकृत वाट फुटते... त्यामुळे ह्या घटनेकडे केवळ एका मुलीवर मुलाकडून झालेला हल्ला इतक्या मर्यादित पद्धतीने पाहून चालणारच नाही...

राम सिंगची जेव्हा अटकेनंतर मानसिक चाचणी केली गेली तेव्हा त्याला obsessive-compulsive disorder असल्याचे निश्पन्न झाले असे म्हणतात.

हो ना???? आणि असा एक मानसिक आजारी रस्त्यावरुन सर्वसामान्यांप्रमाणे फिरत होता... आपल्याकडे मानसिक आजार ओळखण्यासंदर्भातही जनजागृतीची आवश्यकता आहे, हा ही मुद्दा त्यानिमित्ताने पुढे आला....

चांगला लेख मंदार. पालकांशी संवाद साधूनही कदाचित राधिकाचा प्रश्न सुटला नसता, कारण ते काही २४ तास तिच्यासोबत राहू शकत नाहीत. एकतर्फी प्रेमा(?)तून घडणार्‍या ह्या हत्या कशा आणि कधी थांबतील, कोणास ठाऊक!

पालक व मुलांमधला सुसंवाद कसा राखता येईल किंवा अधिक चांगला करता येऊ शकेल, घरी मुलं मोकळेपणाने बाहेरच्या आपल्या आयुष्यातील घटना सांगू शकतील असे वातावरण कशा प्रकारे निर्माण करता येऊ शकेल ह्याविषयी इतरांचे विचार / कल्पना/ अनुभव वाचायला आवडतील.

माझे स्वतःचे निरीक्षण व अनुभव असा आहे की मुलांशी रोज अगदी जेवायच्या वेळी का होईना, घरातील सर्वांनी एकत्र बसून मोकळा संवाद - गप्पा साधल्या गेल्या पाहिजेत. त्या वेळी मोबाईल / टीव्ही / पुस्तक / वर्तमानपत्र इत्यादी किंवा इतर व्यवधाने हे सर्व बाजूला ठेवावे. रात्रीचा हा एक तास जरी आपल्या मुलांसोबत घालवता आला तरी मुलांशी केलेल्या गप्पांमधून त्यांना मोकळेपणे बोलण्यास प्रवृत्त करता येते... जर ते जमले नाही तर मुलांसोबत बसून त्यांची चौकशी, त्यांच्या दिनक्रमाची आपुलकीने चौकशी एवढे तरी व्हावे.

राधिकाने घरच्यांना टेन्शन नको म्हणूनही हे सांगितले नसेल एखादे वेळीस. आपल्या आईवडिलांच्या प्रकृतीच्या काळजीनेही आपले प्रश्न आईवडिलांपासून लपविणार्‍या मुली / मुलगे आहेत.

रस्त्यावरच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे काय करायचे हा प्रश्न आहेच.>> दहशतवाद्यां मध्ये दहशत बसणे हाच एकमेव उपाय आहे. दया दाखवणे म्हणजे १० वर्षा नंतर होणार्‍या बॉमस्फोटाला आताच सुलगावणे. त्यांच्यात माणुसकी शिल्लकच नसते.

Pages