वर्तुळ

Submitted by सरिविना on 5 July, 2008 - 08:59

नेहेमीप्रमाणे जवळच्या किल्लीने तिने दरवाजा उघडला. त्याची काहीच चाहूल लागली नाही. तिला आश्चर्य वाटलं. खरं तर ती आज जरा लवकरच आली होती. अजून त्याचं रेकॉर्डिंग चालु असेल ह्या विचाराने तिने दारही अलगद उघडलं. तो बेडरूममधे नव्हता. टेपरेकॉर्डेर टेबलावर होता पण नेहेमीप्रमणे कागद आणि पेन नीट रचून ठेवलेले नव्हते. ती जरा हबकली. गेल्या दोन वर्षांत असं झालं नव्हतं. त्याला शोधत ती गॅलरीत गेली. तो गॅलरीत फेर्‍या मारत होता. ती गॅलरीच्या दारात उभी होती पण रोजच्यासारखी त्याला तिची चाहूल लागली नव्हती. आज पहिल्यांदाच तिला खाकरावं लागलं होतं. तो एकदम दचकला. कोण?? अरे तू? ...

अजुन रेकॉर्डिंग व्हायचयं का? की आज काही सुचलं नाही?
नाही तसं नाही. मी जरा समोरच्या बागेतुन फिरुन येतो. तू कागद घे कपाटातुन...
तो तरातरा चालायला लागला. तो दारापाशी पोचला आणि ती पळत आली. सर, काठी..
हो खरंच की..... तो थांबला.. काठी घेऊन जिना उतरायला लागला आणि अचानक तिच्या कानावर शब्द आले. हो.. काठीशिवाय आंधळा म्हणजे अगदी बिन कपड्यातला माणूस, नाही? ती चमकली. हा जोक होता की सरकॅस्टिक शेरा. जाउदे. ही लेखक मंडळी अशीच लहरी असायची.. असा विचार करत तिने कागद पेन हातात घेतले आणि टेप ऑन केला......

...ही कथा आहे, आत्मचरित्र की स्फुट हे मला सांगता येणार नाही. पण बहुदा हे माझं शेवट्चं लिखाण असेल्..कदचित हे धगधगतं सत्य लिहिण्याआधी सराव म्हणूनच मी आधीचं लिखाण केलं असेल. मी "कदचित" ह्यासाठी म्हणतोयं की माणसाचा एक कप्पा त्यालाही अनभिज्ञ, अनोळखी असाचं असतो. गेली पाच वर्ष मी प्रयत्न करतोयं... माझ्या ह्या कप्प्याची ओळख व्हावी.. किमान तिथल्या प्रकाशाचा, अंधाराचा अंदाज यावा ह्याची..

आंधळ्याला प्रकाश दिसेल? हा आतला प्रकाश कसा असेल?बाहेरच्या उजेडापेक्षा वेगळा? 'उजेड'... मी शब्द फक्त लिखाणात वापरू शकतो... पण माझ्या अंतरात प्रकाश आहे की तिथेही फक्त अंधार खोल, गुढ.. एखादी तिरिप प्रकाशाची दिसावी म्हणून कसून शोध घेतोय मी गेले पाच वर्ष..

मला स्प्ष्ट ऐकू येतात.. अजूनही तिचे चित्कार. नाही.. नाही मला जाउदे. नाही जमणार मला..एकदम ओरडलो होतो मी. का? पैसे फेकतोयं मी.. तोच धंदा आहे ना तुझा?.... सॉरी व्यवसाय म्हणायला हवं होतं ना, मी कडवटपणे म्हणालो. ती रडत भेकत राहिली. पण मी माझी पकड सैल नाही केली.. त्यानंतर जे घडलं.. समागम, शरीरक्रिया की बलात्कार..?

बलात्कार.. एका कॉलगर्लवर्..एका आंधळयाने केलेला बलात्कार... ह्याचसाठी केला होता अट्टहास...ज्यासाठी जीवाचं रान केलं, रात्र न् रात्र जागून काढली. तो अनुभव हवाच्.. असा का बरं अट्टहास होता माझा? खूप विचार केला मी.. हो.. माझं पौरुष मला सिद्ध करायचं होतं.. आंधळा ही पुरुष असतो हो..ओरडून सांगायचं होतं मला जगाला..का कदाचित मी आहे ह्याचीच मला कोणालातरी तीव्र, वेदनामय जाणीव करुन द्यायची होती? सूड घ्यायचा होता मला सगळ्या जगाचा.. मला नाकारणार्‍या..माझी कीव करणार्‍या पण जवळ येऊ न देणार्‍या..

तारुण्यसुलभ उत्सुकता होती सुरुवातीला..पण रेवतीने नाकारल्यानंतर.. मी अंध व्यक्तीबरोबर पूर्ण आयुष्य काढू शकत नाही सांगितल्यावर मी डिवचला गेलो होतो. मग तो अनुभव हवाच आणि तोही डोळस व्यक्तीबरोबर.. जणु ध्यासच घेतला मी. खूप विचार केला, बरेच मार्ग पडताळून पाहिले. शेवटी एका मित्राकडून एका कॉलगर्लचा नंबर मिळवला..तिला पत्ता दिला...

आणि आणि असा हाता तोंडाशी आलेला घास मी ती नाही म्हणतीये म्हणून सोडू? मी आंधळा आहे म्हणून नाही म्हणते? स्स्..संतापाने अधिकच् आंधळा झालो मी. भान हरपलं होतं माझं. मी इतका वाईट माणूस होतो? माझ्यातल्या सैतानाने माणसाचा ताबा घेतला, इतक्या सहज? मी निपचित पडून होतो. थोड्या वेळात ती उठली आणि मुसमुसत दाराकडे निघाली. मला चाहूल लागली. ते पैसे ठेवले आहेत तिथे, टेबलवर.. मी ओरडलो. दाराचा आवाज आला. मी तसाच पडून होतो. त्याही स्थितीत विचार आला, ती पोलिस कम्प्लेंट करेल का? कॉलगर्ल आणि पोलिस कम्प्लेंट? परिणामांच्या विचारांनी माझी मला लाज वाटली. धिक्कार असो माझा.. स्वतःला सृजनशील, सहृदय समजतो मी. असं घडू शकतं माझ्या हातून?... पण ती कॉलगर्ल होती आणि आपण त्यासाठीच बोलावलं होतं तीला.. तीही राजीखुषीने आली. मी मनाची समजूत काढत होतो.. आणि हो.. पैसे मोजले आपण.. तिने सांगितले त्यापेक्षा दुप्पट.. पाकीट जागेवर ठेवायला म्हणून मी टेबलवर हात फिरवला. पैसे तिथेच?? ती पैसे न घेता गेली? आंधळ्याचे पैसे नको म्हणून कि मी बळजबरी केली म्हणून? अस्वस्थता संपण्यासाठी मला तो अनुभव हवा होता अन् तो आयुष्यभरासाठी अस्वस्थता पदरी देउन गेला.. का केलं मी असं? तिला काय वाटलं असेल? पुन्हा संपर्क साधण्याची माझी हिम्मत झाली नाही. मी अंतर्बाह्य हबकलो होतो. माझा मलाच मी अनोळखी झालो होतो. कधी कधी पेटून उठायचो. तिनेही आपला अपमान करावा? वर पैसे ही न घेउन? चीड यायची.. सगळ्या जगाची.. अन् मग स्वतःचीही... मी इतक्या थराला जाऊ शकतो की माझ्याकडून बळजबरी व्हावी?

दरम्यान माझं लिखाण प्रसिद्ध होतच राहीलं अन् माझं नावही होत होतं. केवळ माझं लिखाणच मला सृजनशील, सहृदय, संवेदनाशील व्यक्ती सिद्ध करू शकत होतं. मी झपाटल्यासारखा लिहित होतो. एका पातळीवर माझा शोध चालुच होता.. आतल्या प्रकाशाचा.. आता मात्र मी थकलो. एकही तिरिप दिसली नाही मला अजुनही.. त्या घटनेच्या विचारांनी अजुन मी तितकाच अस्वस्थ होतो. माफ नाही करु शकत मी स्वतःला. म्हणूनच हा सृजनशील लेखकाचा मुखवटा असह्य होतंय मला.. आता बस्स !!!

कॅसेट संपली.. खट्ट आवाज आला अन् ती दचकली. विमनस्क अवस्थेत ती किती वेळ बसून राहिली तिचे तिलाही भान नव्हते. यांत्रिकपणे ती उठली. तिने कॅसेट उलटी केली. ती बाजू कोरीच होती.. त्याने तेवढेच रेकॉर्ड केले
होते तर...कुठल्याशा आवेगात तिने 'रेकॉर्ड' चे बटण दाबले.

..... हो.. नाही घेतले पैसे मी.. तो प्रसंग जीवघेणा, असह्य होता माझ्यासाठी.. माझ्या स्त्रीत्वाचा अपमान केला होतास तू. मला मान्य आहे शरीरविक्रय धंदा होता माझा. पण त्यातून मन हा फॅक्टर मी पूर्णपणे वजा करु शकत नव्हते. तू फोन केलास तेंव्हा मला कल्पना नव्हती की तू अंध आहेस्..तुला पाहिल्यावर मात्र मला अस्वस्थ वाटू लागलं होतं. मला पूर्ण पुरूष हवा होता. जो 'तू' आहेस असं त्याक्षणी तरी मला वाटलं नाही. हो, अगदी शरीरविक्रयाच्या त्या क्रियेतूनही स्वसुखाची माझी अपेक्षा होतीच. आणि म्हणूनच मी माझा नकाराचा अधिकार बजावला.

नंतर जे घडलं ते आक्रित होतं. कधीही न पुसला जाणारा ओरखडा.. जमेल त्या प्रकारे तुला संपवावं असही वाट्लं मला. पण मान्य करते.. नंतर मलाही तुझी कीव आली. मी निघुन गेले पैसे न घेताच्. कारण तो एक व्यवहार होता हे समाधान मला तुला मिळू द्यायचं नव्हतं. अस्वस्थ होते मी.. त्या प्रसंगाच्या आठवणींना कसं सामोरं जावं हेच कळत नव्हतं. राग, तिरस्कार, अपमान ह्याच भावना सुरुवातीला प्रबळ होत्या. मग हळूहळू तुझी जास्तीच कीव येऊ लागली. मी तुला काहीही इजा न करता निघुन आले तेव्हापेक्षाही जास्त.. का केलं असावसं तू असं? हे मला अचानक जाणून घ्यावसं वाटू लागलं. त्याच वेळी एका पातळीवर माझा नकार बरोबर की चूक हाही विचार चमकून गेला. हळूहळू मी त्रयस्थ होउन त्या घटनेचा, आपल्या दोघांच्याही भूमिकांचा विचार करू लागले..

अन् एकदा पेपरमधे ती जाहिरात दिसली. तोच पत्ता.. एका अंध लेखकाला लेखनिक हवी होती. पहिला विचार चमकून गेला.. प्रतिशोधाचा..पण मग शांत झाले. वाटलं जर तू मला तुझी लेखनिक म्हणून निवडलंस तर मला तूला थोडफार समजून घेण्याची संधी मिळेल, सहवासाने माझ्या अपमानाची धारही थोडी बोथट होईल, कदाचित.. म्हणून मग मी तुला भेटले. तू म्हणालासही की हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय.. नंतर आपलं रुटीन सेट झालं. सुरुवातीला तू दिसलास की चीड यायची, जाब विचारावासा वाटायचा. पण मग माझ्या नकाराचं स्पष्टीकरण ही द्यावं लागलं असतं जे मलाही पूर्णपणे पटत नव्हतं.

तो ओरखडा अजुनही आहेच..तितकाच तीव्र.. खोलवर.. पण आज मी त्याकडे एक अपघात म्हणून बघते. अरे, आपण दोघेही समदु:खी. जगाने नाकारलेले.. तुझी समाज कीव करतो अन् माझा धिक्कार.. मी तुला नकार दिला अन् तू पेटलास.. माझं स्त्रीत्व, माझा नकाराचा अधिकार यांना तू नाकारलसं... दोन्ही नकार एकमेकांना भिडले आणि तो अपघात घडला. पण आज त्याही पलिकडे एक सृजनशील, संवेदनाशील कलाकार म्हणून मी तुला ओळखते. तो ओरखडा तिथेच राहिला तरी आसपास स्वच्छ प्रकाश दिसतोय मला..

मला वाटतं आता बस्स.. आपलं वर्तुळ आता पूर्ण झालयं. आता आपण दोघही एकमेकांचा निरोप घेऊया.. एका नव्या वर्तुळाच्या शोधात..

गुलमोहर: 

तुम्ही ही कथा कधी सह्याद्री वाहिनीला दिली होतीत का?
कारण मी यावर एक छोटं नाटक पाहिलं होतं २-३- वर्षांपूर्वी..तुषार दळवी आणि चिन्मयी सुर्वे..

फक्त थोडा फरक होता..अपघाताने आलेलं अंधत्व..मग लग्नाला झालेला विरोध्..पण तरी त्यालाच साथ द्यायचा तिने घेतलेला निर्णय्..त्याला कुणाचीही सहानुभूती नको म्हणून त्यानेच तिला सोडून जाणं आणि आपली संपूर्ण ओळख बदलून तिने त्याची लेखनीक होणं..आवाजातलं साम्य महीत असूनही..

गैरसमज करून घेऊ नका हं विचारलं म्हणून,प्लीज!

कथा मात्र खूप आवडली!

..प्रज्ञा

प्रज्ञा, नाही मी नव्हतं पाहिलं हे नाटक. ही कथा मी साधारण ३ एक वर्षांपूर्वी खरडली होती. वर लिहिल्याप्रमाणे नकाराचा अधिकार आणि तोच नाकारणे असं काहीसं डोक्यात आलं आणि हे लिहिलं... अगं गैरसमजाचा प्रश्नच नाही.. खरं तर जी कल्पना आपल्याला आपली, नवी, ताजी वाटते ती कुठेतरी वापरली गेली असु शकते. कारण शेवटी आपण सगळेच 'माणसं' आहोत. विचारांत साम्य असुच शकतं ना?? Happy

वाव!! वाचताना मजा आली.....
खुप दिवसांनंतर वाचली पण मस्त आहे.....
Happy योगेश Happy
======

कथा खूप आवडली. मलापण वाटलं कि छोटी असल्यामुळे जास्त परिणामकारक झाली. सारीविना पु.ले.शु.

इतक्या सगळ्यांनी कौतुक केलय ते काय उगाच? छानच आहे.
बापू करन्दिकर

Pages