भरारी

Submitted by सांजसंध्या on 29 April, 2011 - 23:48

भरारी

घनदाट जाळीमधे
किनखापी पर्णराजी
किरणांची किरमिजी
लगबग झाली

रंगावली ची भूनक्षी
उन सावलीचा मेळ
आकारांचे हे खेळ
प्रसवूनि गेले

नक्षीतूनी दोन पंख
ल्येऊन मी भरारले
अंबराशी धडकले
पडले रडले..

मग उचलले हळु
क्षितिजाचे तू आंगण
आणि विश्वाचे प्रांगण
मज केलेस खुले..

- संध्या

गुलमोहर: 

माझ्या चष्म्यातून..

दाट जाळीतून कोवळे तांबूस प्रकाशकिरण प्रवेश करीत असताना जमिनीवर नक्षी उमटते. दाट जाळी ही तर निराशा..चैतन्याच्या स्पर्शाने निराशेने व्यापलेल्या मनात निरनिराळे आकार उमटू लागले असावेत.
ऊन सावली अर्थात आशा निराशेचा हा खेळ चाललाय.

नक्षीच्या आकारात अनेक शक्यता असतात. तांबूस कोवळ्या चैतन्याने शक्यता जागवल्या म्हणूनच पंख लेवून (प्रतिभेची ) भरारी माराविशी वाटली..

आणि ही भरारी मारताना जाणवलं ते काय कि आकाश सुद्धा बंधन वातू लागलंय.. आपलीच आपल्याला ओळख पटताना, आपल्या क्षमतेबद्दल विश्वास होताना मग त्या मार्गदर्शकाला सुद्धा अमर्याद शक्यतांचं भांडार उघडून द्यावंस वाटलं असावं..