या खेळावर!

Submitted by नीधप on 28 April, 2011 - 23:24

एक जुनाच शब्दखेळ
---------------------------
अर्थहीन सुरावटींना पाय फुटले,
रूणझुणत भिंगोरल्या त्या
याच्या कानावर,
त्याच्या बोटांमधे

आडवळणाची लय त्यांची
घुमघुमत उगवत गेली
तुझ्या गाभ्यावर
माझ्या मनावर

मनावर लयीचे लाखो धुमारे
सरसरत पेटत राह्यले
ह्या देहावर
त्या वळणावर

देहाची वळणे पाकळी पाकळी
रिमझिम कोरत गेली
इथल्या हवेवर
या घटीकेवर

जिथे तिथे बहरलेल्या सुरावटी
मंद मंद झुळकत बसल्या
या खेळावर
या अर्थावर

- नी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

शेवटचं कडवं खास.
सगळी मऊ पायवाट चालून यावी नि शेवटी एखाद्या मोठ्या झाडाच्या सावलीत निवांत टेकावं तसं वाटलं शेवटचं कडवं.
आवडी मेरेको.

कवितेची सुरुवात आणि शेवट यांत १८० अंशाचा फरक आहे आणि तो कसा कसा घडला हे त्या रसग्रहणात होतं. आता ते रसग्रहण परत नाही गं लिहू शकत. तुझ्याकडे ही कविता तेव्हाच्या प्रतिक्रियांसकट सेव्ह्ड असेल तर वाच.

मला आत्ताच लक्षात आलंय, मला तुझ्या कविता जाम लक्षात राहतात.
थोड्यावेळाने पाठही होऊन जातील इतक्या.
शब्द फार फार मस्त निवडतेस गं तू!

आवडली. लंगडी घालत 'त्या'ला पकडण्यासारखं फील आलं. कधी या कोपर्‍यात, लगेच त्या कोपर्‍यात. सारखं तोल जाईल का अशी धाकधूक. मग 'तो' गवसल्यावर थकून शांत बाजूला बसायचं.

प्रामुख्याने कविता स्वत:शी कनेक्ट करता आली कीच जास्त भावते, त्यामुळे, पण खूप वेळा वाचूनही, या कवितेच्या बाबतीत नाही जमलं ते मला! पोचली नाही! अजून तेवढी पात्रता यायची असावी!!

अर्थात, लिहिणार्‍या नीधप आहेत, ज्यांच्या लेखनाबद्दल एक mindset निर्माण झाला आहे, म्हणून ही निगेटिव्ह प्रतिक्रीयाही लिहितोय. एरवी काहीच न बोलता ''पुढल्या दारी'' गेलो असतो! Happy

शक्य आहे रे. रिलेट नाही होत कधी कधी गोष्टी. मी पण ही तशी शब्दखेळ म्हणूनच लिहिली होती. कवितेच्या डोक्यावर बघ.
आणि असा कुठे नियम आहे की मी लिहीन ते प्रत्येक आवडलेच पाहिजे. किंवा मी प्रत्येक लिहिते ते बरंच लिहिते असाही काय नियम नाहीये... Happy