कायापालट.....

Submitted by स्वरुप on 4 July, 2008 - 15:01

घाव स्वताचे अभिमानास्तव मिरवत गेले
हाल भोगले स्वताच आता गिरवत गेले...
तीर तटीचे उभ्याउभ्या बावचळुन गेले
पाणी नदीचे रंग हजारो बदलत गेले...
जो आला तो रमला येथे रहाता झाला
नवे नकाशे जुन्या वेशींना हाकलत गेले...
भाव लावले इथे स्वताचे तुम्ही नि आम्ही
कुणी फिरंगे तिकडुन बोली चढवीत गेले...
मावळला हा सुर्य तरीही सकाळ झाली
चाकरमानी मुकाट ओझी वहात गेले...
स्पर्धेपुढती गहाण पडली नातीगोती
वीण मनाची आतुन सारे उसवत गेले...
वधारता हा रुपाया सारे हबकुन गेले
कुणास ठाउक कोण कुणाला फसवत गेले...

-स्वरूप

गुलमोहर: 

अरे वा! छानच आहे कविता.

व्वा! ओळ अन ओळ सहीच.
>>तीर तटीचे उभ्याउभ्या बावचळुन गेले
पाणी नदीचे रंग हजारो बदलत गेले...
जो आला तो रमला येथे रहाता झाला
नवे नकाशे जुन्या वेशींना हाकलत गेले...

छान!

कवितेच्या वाटेला मी सहसा जात नाही. नविन लिखाण म्हणुन टिचकी मारावी आणि ती कविता असली की मी धुम ठोकते. पण तुमची कविता आवडली. वेगळा विषय आहे.

तेजस, चिन्नु आणि सिन्ड्रेला....
अभिप्रायाबद्दल आभार!

>> नवे नकाशे जुन्या वेशींना हाकलत गेले...
क्या बात है !

अरे, ही बघितलीच नव्हती... छान म्हणजे छानच, स्वरूप. सगळीच मस्तं... त्यातही, बेहद्द आवडलेले.....
.....तीर तटीचे उभ्याउभ्या बावचळुन गेले

.....नवे नकाशे जुन्या वेशींना हाकलत गेले...

भाव लावले इथे स्वताचे तुम्ही नि आम्ही
कुणी फिरंगे तिकडुन बोली चढवीत गेले...

मावळला हा सुर्य तरीही सकाळ झाली
चाकरमानी मुकाट ओझी वहात गेले...

लिहा हो, मस्तच लिहिताय.... अजून लिहा, वाचायला आवडेल, खरच.

संदीप ,दाद... तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार!
दाद तुमची दाद अगदि नावाला साजेशी!
सुचेल आणि वेळ मिळेल तसा लिहित राहीनच इकडे......

...अप्रतिम.. विचार करायला लावणारी..
--सुभाष

स्पर्धेपुढती गहाण पडली नातीगोती
वीण मनाची आतुन सारे उसवत गेले...
वधारता हा रुपाया सारे हबकुन गेले
कुणास ठाउक कोण कुणाला फसवत गेले...

सॉलिड!

आवडली ! सगळ्याच ओळी सुंदर आहेत.

'कुणास ठाउक कोण कुणाला फसवत गेले...' हा फायनल स्ट्रोक पण मस्त !

सुभाष, मानसी, अलका, परेश.... तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

@मानसी
एका डॉलरच्या बदल्यात मिळणार्‍या रुपयांच्या हिशोबाचा संदर्भ आहे तिथे....
रुपायाच्या वाढणार्‍या किमतीचा आनंद न होता आता एका डॉलरच्या मोबदल्यात कमी रुपये मिळणार म्हणुन चिंतित होणार्‍या MNC जगताला उद्देशुन आहे ते!