सामान्य...!

Submitted by चैतन्य दीक्षित on 27 April, 2011 - 11:47

लावुन काळा चष्मा, करतो माझ्यापुरता ताप कमी,
उतरवुनी अन् विमा, उद्याची मनात मी मानतो हमी ।

सामान्यच मी, असेच आहे जगणे माझे नित्याचे
मला कसे हो जमेल करणे, 'प्रयोग माझे सत्याचे'?

चालविते मज गरजच माझी, नसे प्रेरणा वा स्फूर्ती
(मला सोसणे नको, नको अन् सोसण्यातली सत्कीर्ती ! )

पाय पाहुनी निवडुन घेतो अंथरूण माझ्यापुरते
बायकोस मी गजरा घेतो, सुख नाही मज यापरते ।

बिचकत जातो मी रस्त्याने, जिवात नसतो जीव कधी,
कधी स्वतःवर हसतो, रडतो, आणिक करतो कीव कधी ।

तरी उद्याची थोडी आशा माझ्या हृदयी मिणमिणते
आणि देवळामधली घंटा माझ्या कानी किणकिणते ।

सामान्याला, जगण्या-मरण्यामधले अंतर- आयुष्य...
उरते कोठे सामान्याच्या मरणानंतर आयुष्य?

-चैतन्य.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आह !!!

बिचकत जातो मी रस्त्याने, जिवात नसतो जीव कधी,
कधी स्वतःवर हसतो, रडतो, आणिक करतो कीव कधी । >>>> जबरा ...

मस्त कविता !!!

पुन्हा एकदा मस्त कविता..... 'मी मोर्चा नेला नाही....' ची आठवण झाल्यासारखे झाले.
<<चालविते मज गरजच माझी, नसे प्रेरणा वा स्फूर्ती
(मला सोसणे नको, नको अन् सोसण्यातली सत्कीर्ती ! )>>
उत्तम..... Happy
<<सामान्याला, जगण्या-मरण्यामधले अंतर- आयुष्य...
उरते कोठे सामान्याच्या मरणानंतर आयुष्य?>>
फारच उत्तम..... Happy

"बिचकत जातो मी रस्त्याने, जिवात नसतो जीव कधी,
कधी स्वतःवर हसतो, रडतो, आणिक करतो कीव कधी ।"

छानच लिहिलंयस ......

<<पाय पाहुनी निवडुन घेतो अंथरूण माझ्यापुरते
बायकोस मी गजरा घेतो, सुख नाही मज यापरते ।<<

मस्त चैतन्य! सामान्य माणसाचं आयुष्य छान मांडलयस!!