संकल्प

Submitted by उमेश कोठीकर on 26 April, 2011 - 06:46

मृत्यूमधला जन्म कळावा
जगण्यामधला मोह गळावा
करूणेच्या नवलाख कळांनी
'मी'मधला हा 'मी'च जळावा

असे काहीसे करून जावे
दु:ख जगाचे हृदयी घ्यावे
बहीण माझी, माझा भाउ
दु:खाला विसरून हसावे

या मातीतून असे रूजावे
फुलाफुलांतून असे फुलावे
करूणेचा मधुपर्क साठण्या
आयुष्याचे पराग व्हावे

या रूधिराचे पाणी व्हावे
तहानलेल्या कामी यावे
बीज होऊनी धरतीमध्ये
या देहाचे अन्न बनावे

कणकण माझा सार्थक व्हावा
मला जन्म ना पुन्हा मिळावा
धरती, सागर, जीवांमधूनी
आत्मा माझा वाहत ह्रावा
............................(इतरत्र प्रसिद्ध;येथे उशीरा पोस्ट करतोय)

गुलमोहर: 

मृत्यूमधला जन्म कळावा
जगण्यामधला मोह गळावा
करूणेच्या नवलाख कळांनी
'मी'मधला हा 'मी'च जळावा

व्वा Happy