मायबोलीच्या संपर्कातुन समाजसेवा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 April, 2011 - 05:53

दिनांक २२ जानेवारी २०११ रोजी आम्ही रोटेरियन्सच्या पत्निंनी व रोटरी महीला कुटुंब सदस्यांनी उरण मध्ये इनरव्हिल क्लब ऑफ उरण चालू केला. क्लबची सेक्रेटरी म्हणून मला निवडण्यात आले. इनरव्हिल ही जागतीक पातळीवरील एन्.जी.ओ. संस्था आहे. अर्थातच हा क्लब रोटेरियन्सच्या मदतिने चालू झाला. नाव कमावण्याच्या मागे लागण्या पेक्षा जास्तित जास्त जनतेच्या उपयोगी पडतील असेच प्रोजेक्ट करायचे हा आमच्या क्लबचा मुख्य उद्देश्य आहे.

उपक्रम राबवायचे म्हणजे फंड हवाच. सध्या आम्ही आमच्या जमलेल्या फी वर व रोटेरियन्स स्पॉन्सर करत असलेल्या रकमेवर उपक्रम चालवतोय. त्यामुळे कमी खर्चात आणि जनतेच्या फायद्याचे असे उपक्रम आम्ही शोधत असतो.

आमच्या क्लबच्या उद्घाटनाच्याच दिवशी रोटरी आणि इनरव्हिलचा जॉईंट प्रोजेक्ट झाला. त्या दिवशी दोन अपंगांना रोटरीच्या सहाय्याने व्हिल चेअर्स देण्यात आल्या. त्याच दिवशी आम्हाला इनरव्हिलच्या डिस्ट्रीक्ट प्रेसिंडेंटने उपक्रमांना सुरुवात करण्यासाठी लहान मुलांना पोलिओ बुथवर वाटण्यासाठी शिट्या, कॅप, कार्टून मास्क दिले. लगेच २३ जानेवारीलाच पोलिओ डोस असल्याने आम्ही त्या वस्तुंचे वाटप जवळच्या पोलिओ बुथवर आलेल्या लहान मुलांना केले. फेब्रुवारी मध्ये आम्ही प्रत्येक मेंबरच्या घरचे व आजुबाजुच्या कुटुंबातील लोकांचे जुने कपडे गोळा करुन वेशवी ह्या कातकरी वाडीत खाउ सकट वाटले. हे वाटताना अक्षरशः झुंबड पडली होती. त्या लोकांना गरजच होती. त्यामुळे आम्हाला हा कमी पैशातील मौल्यवान प्रोजेक्ट वाटला आणि क्लबचा उद्देश्य सफल होतोय असे वाटू लागले.

क्लब सेक्रेटरी असल्याने ओझे माझ्याच खांद्यावर जास्त आहे. म्हणून मी नविन नविन प्रोजेक्ट कमी पैशात होणारे शोधताना एक दिवस निसर्गाच्या गप्पांवर डॉ. कैलास ह्यांनी दिलेली पोस्ट वाचली. त्यांनी येणार्‍या रविवारच्या पोलीओचा डोस आपल्या बाळांना अवश्य पाजा अशी पोस्ट टाकली. हया व्यक्तीचा समाज कार्यात रस दिसतो असे मला ह्या पोस्ट वरुन लगेच जाणवले. मी ताबडतोब त्यांना मेल केला. की आम्ही नविन क्लब चालू केला आहे तर तुम्ही वैद्यकिय पातळीवर आम्हाला काही मदत करु शकाल का ? त्यांनी लगेच ५ मिनीटांत रिप्लाय पाठवला, आपण महिलांसाठी मोफत आरोग्यतपासणी शिबीर करु शकतो. त्यात त्यांचे हिमोग्लोबिन चेकअप करु शकतो तसेच गर्भाशयाच्या कॅन्सरचीही तपासनी करता येईल. माझ्या मनात फायनांन्सची चिंता होती. त्यांना विचारल त्यासाठी किती खर्च येइल ? (माझ्या मनात डॉ. फी, औषधांसाठी खर्च, वस्तूंची जमवाजमव करण्यासाठी लागणारा खर्च घोळू लागला) डॉ. कैलास ह्यांनी लगेच सांगितल की काहीच नाही. फक्त आमच्या जेवणाची सोय तुम्ही करायची बाकी औषधे, तपासणी, लागणारे साहित्य सगळे आम्हीच आणु. शिवाय महिलांची तपासणी आहे म्हणुन महिला डॉक्टरांनाच आणु सांगितल्यावर मी अजुन खुष झाले.

येणार्‍या मिटिंगमध्ये मी हा प्रस्ताव कमिटीसमोर मांडला सगळ्यांनी तो आनंदाने स्विकारला. मी डॉ. ना लगेच दुसर्‍यादिवशी सांगितले की आम्हाला ते शिबिर करायचे आहे. आम्ही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्याची तारिख पण फिक्स केली. डॉ. नी शिबिराबाबत चर्चा करण्यासाठी क्लिनिकवर बोलावले. परंतू त्या महीन्यात गडबड असल्याने मेंबर्स तसेच मलाही जाणे जमले नाही म्हणून १७ मार्च ही तारीख आम्ही धरली. त्या महीन्यातील मिटींगमध्ये गर्भाशयाच्या तपासणीबाबत शंका कुशंका निघु लागल्या. त्या म्हणजे दोन वर्षा पुर्वी ही तपासणी एका सेवाभावी व्यक्तीने आयोजीत केली होती त्याच्या आई कॅन्सरने मरण पावल्याने दुसर्‍या महिला जागरुक व्हाव्यात ह्या उद्देश्याने त्या व्यक्तीने ही तपासणी आयोजित केली होती. पण त्याला फार कमी रिस्पॉन्स आला फक्त ५-६ महिलांनी ती चाचणी करुन घेतली. मग आपल्या बाबतीतही तसेच झाले तर ? एवढ्या डॉक्टरांच्या टिमला आपण बोलावणार आणि जर महिलाच जमल्या नाही तर त्या डॉक्टरांना काय वाटेल ह्या उद्देशाने आम्ही गर्भाशयाची तपासणी रद्द करुन हाडांची चाचणी व हिमोग्लोबिनची तपासणी करु असा निर्णय घेतला.

मी लगेच दुसर्‍या दिवशी फोन करुन डॉक्टरांना निर्णय कळवला. तेंव्हा डॉक्टरांनी मला समजाऊन सांगितले की महीला कमी आल्या तरी आम्हाला चालेल. आम्ही प्रोजेक्टरवर माहीती देऊ. त्यामुळे ज्या महिला उपस्थित असतील त्या इतर महिलांना ह्या तपासणीचे महत्व सांगतील व पुढच्यावेळी जास्त महीला ह्या सेवेचा लाभ घेतील. गर्भाशयाचा कर्करोग हा हल्ली जास्त प्रमाणात वाढत चालला आहे. तुम्हाला जर सोशल अवेअरनेस करायचा असेल तर ही तपासणी जास्त योग्य आहे. मला ही गोष्ट पटली व परत मी दुसर्‍या मिटिंगमध्ये माझ्या पद्धतीने मांडली. सगळ्यांनाच ही गोष्ट पटली तसेच काही सदस्यांना आधिपासुनच इतर थातुर मातुर तपासण्या होण्यापेक्षा हीच तपासणी व्हावी अशी इच्छा होती. त्यामुळे परत गर्भाशयाच्या कर्करोगाची व हिमोग्लोबीनची तपासणी करायची असे ठरले. मग एक दिवस डॉक्टरांना आपण दोन तिन सदस्या मिळून जायचे असे ठरले. पण आज एकीला वेळ आहे तर दुसरीला नाही , मुलांच्या परिक्षा चालु झाल्या अशी कारणे समोर येउन आठवडा निघुन गेला आता इतक्या थोड्या दिवसांत आपल्याला सगळी तयारी करता येणार नाही म्हणुन पुन्हा तारीख बदलली. डॉ. कैलास ह्यांना तारिख बदलण्यासाठी मला वारंवार डिस्टर्ब कराव लागत, आता जी तारीख येईल ती फायनल असे मी सगळ्यां सदस्यांना सांगितले. आणि शेवटी २४ एप्रिल ही तारीख फिक्स झाली.

डॉ. कैलास सुद्ध मी एखादी तारीख त्यांना सांगितली की लगेच त्यांच्या टिमला कळवुन तो दिवस फिक्स करायचे. पण ते कधीच मी त्याना तारिख बदलते सांगितल्यावर ओरडले नाहीत किंवा नाराजी व्यक्त केली नाही. उलट ते उत्साहाने सांगायचे. आमच्याकडून डॉ. रत्नेश म्हात्रे व त्यांची गायनॅक पत्नी डॉ. सारीका म्हात्रे ह्या उरणच्याच गावच्या आहेत. ते दोघ तर आनंदाने उरणला शिबिर करण्यासाठी तयार आहेत. ऐकुन अजुन बर वाटायच. डॉक्टरही माझा उत्साह वाढवायचे.

आता पुन्हा डॉक्टरांना भेटायला जायचा प्रश्न होताच. डॉ. कैलास ह्यांच आरोग्य केंद्र आहे सि.बी.डी. ला आणि त्यांची वेळ सकाळी ९ ते दुपारी ३. पण त्यांनी मला सांगितल की तुम्ही येणार असाल तर मी ५ वाजेपर्यंत वाट पाहु शकतो. पण आमच्या सदस्या महिला असल्याने घरगुती कारणांनी व काही सर्विसवाल्या असल्याने तो योग जुळून आला नाही. मग मात्र आता काही केल तरी लवकरात लवकर डॉ. कैलास ह्यांना भेटावच लागेल नाहीतर पुन्हा तारखेचा गोंधळ होईल. डॉक्टरांचा विश्वास आपल्यावरुन उडून जाईल अशी मला शंका वाटु लागली. माझे पती रोटेरियन्स असल्याने ते सतत आमच्या प्रोजेक्टची विचारपुस करायचेच. मग तेच म्हणाले चल आपण जाऊ त्यांच्याकडे. माझ्या मिस्टरांचे पाठबळ मला खुप मोलाचे ठरते अशावेळी. एका शनिवारी आम्ही डॉ. कैलास ह्यांच्या आरोग्या केंद्रात जायला निघालो. सिबीडीत गेलो आणि डॉक्टरांना पत्ता विचारण्यासाठी फोन केला पण डॉ. काही फोन उचलत नाहीत लावुन लावुन थकले. शेवटी साधनाला फोन केला आणि विचारल तुला माहीत आहे का आरोग्य केंद्र ? ती म्हणाली थांब मी त्यांच्या प्रोफाईलवर जाऊन शोधते. ती शोधण्याच्या आत आम्ही विचारत विचारत आरोग्यकेंद्रावर पोहोचलो. २ मिनीटे त्यांच्या केबिनच्या बाहेरच पेशंट सारखे थांबलो. मग माझ्या मिस्टरांनी प्रवेश केला आणि विचारल डॉ. कैलास गायकवाड आपणच ना ? ते म्हणाले हो मिच बोला. मी आणि माझ्या मुलीने लगेच पाठुन प्रवेश केला. मी बोलले मी प्रजक्ता ते जरा विचारात पडले - हा कुठला पेशंट ? मग मी म्हणाले मी जागु त्याबरोबर ते अर्थवट उठुन हा जागु लगेच बसा बसा केले. माझ्या नवर्‍याने आणि त्यांनी आपआपली ओळख करुन घेतली, इकडचे तिकडची माणसे बोलण्यातुन परिचयाची निघाली त्यावर त्यांची चर्चा झाली. काही मायबोलिकरांच्याही आम्ही आठवणी काढल्या. मग मी डॉ. गझल रचतात हे सांगितल्यावर माझ्या नवर्‍यानेही सांगितले की त्यालाही गझल आवडतात शिवाय त्यांच्याकडे गझलची काही पुस्तकेही आहेत. ही सगळी चर्चा होत असतानाच डॉक्टरांच्या कडे कामाला असणार्‍या मावशी चहा घेउन आल्या. डॉ. त्या मावशिंबरोबर एकदम मस्त आगरी भाषेत बोलत होते. ते पाहुन मला व माझ्या नवर्‍याला खुप कुतुहल वाटले. मग आरोग्यतपासणीबाबत आम्ही चर्चा चालु केली. तेंव्हा परत डॉ. नी सांगितले की महिला कमी असल्यातरी चालतील. पण तीच तपासणी करणे गरजेचे आहे. त्यांनी तपासणीसाठी ते आणणारे साहित्य व आम्हाला पुरवावे लागणारे साहित्य ह्याबाबतची माहीती दिली. मी त्यांना ह्याची डिटेल माहीती मला मेल करण्याची रिक्वेस्ट केली व थोड्याच वेळात आम्ही तिथुन निघालो.

दोन दिवसांनी तातडीची मिटींग मी बोलावली. पण तेंव्हापासुन डॉक्टरांचा फोन त्यांच्यावर रागावला होता. खुप प्रयत्न करुन लागतच नव्हता. मग मी मेल करुन त्यांना डिटेल्स पाठवण्याची पुन्हा रिक्वेस्ट केली कारण ते डिटेल्स मला मिटिंगमध्ये सादर करायचे होते. तरी एक दिवस डॉ. कैलास ह्यांचा रिप्लाय नव्हता. ते बाहेर गेले होते बहुतेक. मिटिंगच्या दिवशी मी पुन्हा मेल केला तेंव्हा दुपारी त्यांचा मेल आल्यावर माझा जीव भांड्यात पडला. डॉ. कैलास ह्यांनी जी टिम शिबिरासाठी येणार आहे त्यांची नावे व गर्भाशयाच्या तपासणीचे महत्व व पद्धत थोडक्यात सांगितली होती.

आमची बॅनर छापण्याची व पत्रके छापण्याची घाई झाली. त्यातही बर्‍याच तांत्रीक अडचणी आल्या. पण आम्ही धिर सोडला नव्हता. अगदी लग्नाची आमंत्रणे देतात तशी आम्ही तिन चार सदस्या प्रत्येकाच्या घरी जाऊन पत्रके वाटत होतो. शिबिराच्या आदल्या दिवशीच्या वर्तमान पत्रातही ९०० पत्रके आम्ही वाटली.

तारीख जवळ आली पण डॉ. कैलास ह्याचा फोन अजुन रागावलेलाच. मी मुलिची तब्बेत बरी नसल्याने दोन दिवस माहेरी गेले होते. तिथे नेट नाही, डॉ. ना फोन लागत नाही. ४ ते ५ दिवस राहिले होते शिबिराला. मग मी परत साधनाला फोन केला आणि सांगितले की डॉ. कैलास ह्यांना विपु करुन मी फोन करायला सांगितले सांग. तसाच निरोप जिप्सिलाही सांगितला. जिप्सिने दुसरा नंबर ट्राय केला त्यांचा पण तोही नाही लागला. साधनाचा विपु वाचुन डॉ. मला फोन करत होते पण नेमकी माझा फोन रेंज मध्ये नव्हता. मग दुसर्‍या दिवशी मी कामावर आले तेंव्हा जिप्सिला फोन करुन त्यांच्या दुसर्‍या नंबर विषयी विचारले तेंव्हा तोही लागत नाही, ते गप्पागोष्टीवर भेटतील असे सांगितल्यावर मी लगेच गप्पगोष्टिच्या धाग्यावर गेले. डॉ. कैलास तिथे गप्पा मारतच होते. मग तिथे संपर्क झाल्यावर त्यांनी मला लगेच ऑफिसमध्ये फोन केला. मी त्यांना २४ तारखेची आठवण करुन दिली. ते नेहमीच्या उत्साहातच बोलले अरे म्हणजे काय करायचच आहे आपल्याला शिबिर. माझी टिम पण रेडी आहे. मी शनिवारी ज्या ठिकाणी शिबिर ठेवायचे आहे त्या जागी येतो असे सांगितले. मग मी त्यांना आधी माझ्या घरीच बोलावले. ते येताना शिबिरासाठी लागणारे अर्धे साहित्य आणणार होते. त्यातले एक्झामिनेशन टेबल त्यांच्या गाडीत मावत नसल्याने त्यांनी उरणच्या म्युनसिपाल्टी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या ओळखिच्या माणसाला फोन करुन ते अ‍ॅरेंज केले.

डॉ. कैलास ह्यांनी शनिवारी दुपारी १२ च्या नंतर येतो म्हणून सांगितले फोनवर. मी जेवायला येण्याचा आग्रह केला पण त्यांना आधीच जासई ह्या गावातुन आग्रहाचे आमंत्रण होते. मग मी पन्हे करण्याचे ठरवले. आहोंनी कलिंगड आणले. डॉ. घरी आल्यावर परत सगळ्या माबोकरांच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यात दिनेशदांचे डॉ. कैलास व माझ्या आहोंनी खुप कौतुक केले. मग साधना, जिप्सि, भुंगा, बेफिकिर, कोमल, यो रॉक्स व गिर्यारोहण प्रेमिंच्या आठवणी निघाल्या. डॉक्टरांना मी बुलबुलचे नर्सिंगहोम (झुंबर) दाखवले, ढोलिंचे आंब्याचे झाड दाखवले. थोड्याच वेळात निघुन आम्ही शिबिर आयोजित करण्यासाठी जी शाळा निवडली होती त्या शाळेवर गेलो. तिथे पाहणी करुन डॉ. घरी गेले. थोड्याच वेळात परत डॉ. कैलास ह्यांचा फोन आला की एक्झामिनेशन टेबल मिळत नाही हॉस्पिटल मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. उरणच्याच एका गायनॅककडून घ्या नाहीच मिळाला तर मी उद्या टेंपो करुन आणतो. संध्याकाळची वेळ आणि ही गोष्ट मला आणि माझ्या नवर्‍यालाच माहीत. रोटरीचे सेक्रेटरी माझ्या मिस्टरांचे जिवलग मित्र हे डॉक्टरांच्या भेटीला उपस्थित होते. त्यांचेही आम्हाला मोलाचे सहकार्य लाभले आहे. पण त्यांच्या मुलाचा बड्डे असल्याने त्यांना डिस्टर्ब करणे बरोबर नाही. म्हणून मग माझ्या मिस्टरांनीच धावपळ सुरु केली. उरणमधिल डॉ. काळे ह्यांना फोन केला त्यांनी टेबल घेउन जा पण तुम्ही काढून न्या असे सांगितले. आम्ही बड्डे उरकुन लगेच हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉ. काळेंनी मेडीकल दुकन असणार्‍या मनोज ह्यांची मदत घेण्यास सांगितले. मनोज आणि माझे मिस्टर तो टेबल काढण्याचा प्रयत्न करत होते पण दरवाजा छोटा व टेबल मोठा त्यामुळे तो निघतच नव्हता. मनोजची केस मिस्टरांकडे असल्याने तो जास्त आपलेपणाने मदत करत होता. त्याने परत त्याच्या ओळखिने म्युन्सिपाल्टी हॉस्पिटल मधले टेबल देण्याचे कबुल केले. त्याच दरम्यान चर्चेत समजले की तो डॉ. कैलास ह्यांना ओळखत होता. त्यांच्याच गावातील तो रहिवाशी आहे. मग आमचा मोर्चा रात्री ११.३० ला म्युनसीपाल्टी हॉस्पिटलमध्ये वळला. तिथे मनोजच्या ओळखिवर एक्झामिनेशन टेबल मिळाले. टेबल मिळाला हे सांगण्यासाठी आम्ही रात्री डॉ. कैलास ह्यांना फोन करत होतो. परत डॉ. कैलास ह्यांचा फोन बंद. मग सकाळी उठुन पहीला त्यांना मेसेज पाठवला. गडबड झाल्याने रात्री नीट झोपही लागली नाही. मिस्टरांनी सकाळी ७ वाजता म्युन्सिपाल्टी हॉस्पिटलमधुन टेबल खटारा भाड्याने करुन त्यात शाळेवर पोहोचवला.

दिनांक २४ एप्रिल २०११ आमच्या मायबोलीच्या ओळखितुन घडणार्‍या आरोग्य शिबिराचा दिवस उजाडला.
आम्ही ९.३० ला शाळेवर पोहोचलो. तोपर्यंत आम्ही पत्रक वाटून अ‍ॅड करतच होतो. धाग धुग होती बायका जमतील की नाही ? आपले शिबिर यशस्वि होईल की नाही ? पण आम्ही पोहोचताच डॉ. व आमच्या सगळ्या सदस्या यायच्या आधीच तिन महिला तपासणी व लेक्चर साठी उपस्थित होत्या. मी धडाधड सगळ्यांना फोन केले लवकर येण्यासाठी. डॉ. कैलास ह्यांना फोन केला तेंव्हा ते जासईपर्यंत आहोत असे म्हणाले. तेवढ्यात त्यांच्या टिमचे उरणला जत्रेसाठी राहायला आलेले डॉ. रत्नेश म्हात्रे व डॉ. सौ. सारिका म्हात्रे ह्यांचे १०.०० वाजता आगमन झाले. आम्ही त्यांचे स्वागत केले व डॉ. इतक्यात येतीलच असे सांगितले. डॉ. सारिका ह्यांचीही आमच्या नात्यामधे ओळख निघाली. त्यामुळे त्या आम्हाला आमच्यातल्याच वाटल्या. हळुहळू बर्‍याच १०-२० बायका जमल्या. आम्हाला आनंद झाला. तोपर्यंत क्लब मेंबर्सही गोळा झाल्या. पण डॉ. १०.३० झाले तरी डॉ. कैलास ह्यांचा पत्ता नाही. फोनही नेहमीप्रमाणे लागत नव्हता. १० ते ३ शिबिराची वेळ दिली होती. १०.३० ते ११.३० ही माहीती देण्याची वेळ ठेवली होती. लेक्चरची माहीती डॉक्टरांच्या पेनड्राइव्ह मध्ये होती.

मी बाहरेच वाट पाहत फोन ट्राय करत थांबले शेवटी ११ वाजता निर्णय घेतला की डॉ. सारिका ह्यांनी आता लेक्चरला सुरुवात करावी. कारण सगळ्या बायका कंटाळल्या होत्या. माझ्या मिस्टरांनी डॉ. दांपत्याची ओळख करुन दिली.
medial.JPGmedical1.JPG

इतक्यात डॉ. कैलास ह्यांचे आगमन झाले आणि आम्हाला बरे वाटले. क्लबच्या अध्यक्षांनी दोन शब्द बोलून, माझ्या मिस्टरांनी डॉ. कैलास आणि त्यांची टिमची ओळख करुन झाल्यावर सगळ्या पुरुषांनी बाहेर जाण्याचे ठरुन डॉ. सारिका ह्यांनी गर्भपिशवीच्या कर्करोगाची व हिमोग्लोबिनच्या गरजेची खुप मोलाची माहीती दिली. लेक्चर संपल्यावर तपासणीला सुरुवात झाली. डॉ. कैलास ह्यांच्या नेतृत्वाखाली त्यांची टिम तपासणी करत होती. एका स्पेशल रुम मध्ये डॉ. सारिका व डॉ. शबिना ह्या गर्भाशयाची तपासणी करत होत्या तर काही इतर किरकोळ आजारांच्या शंका डॉ. कैलास सांभाळून घेत होते. हिमोग्लोबिनची तपासणी सौ अर्चना पाटील ह्या एका रुम मध्ये करुन डॉ. कैलास गरजेनुसार कमी हिमोग्लोबिन असलेल्या बायकांना मोफत गोळ्या वाटत होते.

डॉ. कैलास हे त्यांच्याकडे येणार्‍या पेशंटना प्रेमळ भाषेत गोळ्या घेण्याविषयी व पालेभाज्या व ज्यामुळे हिमोग्लोबीन वाढेल असे पदार्थ खाण्यास सांगत होते.

डॉ. रत्नेश व सारीका ह्याच्या गावची जत्रा होती. त्यांना लवकर जायचे होते. पण महिलांचे प्रमाण वाढतच चालले होते. मग जवळ जवळ १.० ला डॉ. कैलास ह्यांनी डॉ. रत्नेश व डॉ. सारिका ह्यांना रजा देउन डॉ. शबिना ह्यांच्यावर गर्भाशयाच्या पुर्ण तपासणीची जबाबदारी टाकली.

डॉ. सारिका व डॉ. रत्नेश ह्यांचे आम्ही आमच्या क्लब तर्फे भेटवस्तु देउन व जत्रा असुनही आमच्यासाठी वेळ काढून आल्याबद्दल आभार मानले.

डॉ. कैलास ह्यांनी डॉ. शबिना ह्यांचे बिपी चेक करण्याचे व वजन मोजण्याचे काम बाहेरच्या पॅसेजमध्ये हाती घेतले. बिपी चेक करतानाही ते पेशंटना बेटा टेन्शन घ्यायचे नाही असा सल्ला देतच होते.
medical3.JPG

इतकी चांगली टिम, डॉक्टरांचा चांगुलपणा पाहून काही स्त्रियांनी त्यांच्या गावात असे शिबीर आम्हाला आयोजित करण्यास सुचना दिली आहे.

हळु हळु गर्दी मावळत चालली होती. आम्ही डॉ. कैलास ह्यांच्या अर्ध्या टिमला जेउन घ्यायला सांगत होतो. पण कोणीच वेगवेगळे जेवण्यास तयार नव्हते. आम्ही एकत्रच बसु असा सगळ्यांचा आग्रह होता. मग आम्ही महीलांना थोडावेळ थांबण्यास सांगुन भोजनसमारंभ आटोपुन घेतला. भोजनात बिर्याणी मागवली होती. जेवणावर बसताच डॉ. कैलास ह्यांनी त्यांच्या टिमला मी वेगवेगळ्या माश्यांच्या रेसिपिज बनवते हे सांगितले.

जेवण आटोपुन उरलेल्या १० - १२ पेशंट तपासुन बाहेरचे पेशंट संपले. मग आम्ही इनरव्हिल मेंबर्सनी हिमोग्लोबीनची तपासणी करुन घेतली. आमचा आकडा ७० वर गेला. डॉ. कैलास तसेच आम्हा क्लब मेंबर्सना खुप आनंद झाला. जिथे १०-१२ बायका आम्ही अपेक्षीत केल्या नव्हत्या ती जागा ७० आकड्याने भरुन काढली होती. ३१ बायकांनी गर्भपिशवीची तपासणी करुन घेतली तर ७० स्त्रियांनी हिमोग्लोबिनची तपासणी करुन घेतली. वैयक्तीक आमंत्रण दिलेल्या बायका जास्त होत्या. ३-४ बायका पत्रके वाचुन आल्या होत्या. पण त्यामुळे आम्ही पत्रके काढल्याचे सार्थक झाले. शिवाय आमचा बॅनर पाहुन व माझ्य मिस्टरांनी दिलेल्या आगावु सुचनेनुसार लोकल मिडीयावाली व्यक्तिही कॅमेरा घेउन पोहोचली होती.

शिबिर संपल्यावर आम्ही डॉ. कैलास व त्यांच्या टिमचे आभार मानताना मी डॉक्टरांना मिळालेल्या नविमुंबई पुरस्काराची व राजस्थान येथील ८००० लोकांची तपासणी केल्यामुळे डॉ. कैलास ह्यांना मिळणार असणार्‍या राजीव गांधी पुरस्काराची माहीती मेंबर्सना दिली. डॉ. कैलास ह्यांचे व्यक्तिमत्व आमच्या सगळ्या क्लब मेंबर्सना आवडले. डॉ. कैलास हे गझल प्रेमी आहेत व ते गझल करतात व त्यांनी एक गझल पेश करावी असाही मी आग्रह धरला होता. पण त्याचबरोबर डॉ. कैलास ह्यांनीही आमची मायबोलीची ओळख कशी झाली, माझ्या रेसिपीजची माहीती सगळ्यांना दिली. आमच्या मेंबर्सनाही हे माहीत नव्हते ह्याची त्यांनी कबुली दिली. मायबोलिचेही कौतुक करण्यात आले.

अशीही मायबोलीच्या संपर्कामधुन घडलेली समाजसेवा आमच्या आठवणींत कायमची राहील.

चु.भु.द्या.घ्या.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

जागू, तुझे अभिनंदन. खुप खुप चांगल काम करतियेस मनापासुन शुभेच्छा.
आणि डॉक्टरांबद्दल काय बोलू. त्यांच्यासारखा अजातशत्रु माणुस नसावा कुणी. कुणालाही मदत करायला अगदी एका पायावर तयार असतात.

जागू, तुझे मनापासून कौतुक आणि अभिनंदन! खूप छान काम केलंत गं. तुला आणि डॉ. ना अजूनही असे काम करण्यासाठी शुभेच्छा.

व्वा... जागु! छान सामाजिक उपक्रम हाती घेतलेय्स! Happy
तुझे आणि डॉक्.चे अभिनंदन आणि तुमच्या या कार्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

जागू,

तुमचा उपक्रम स्तूत्य आहे आवडला. मनःपूर्वक शुभेच्छा!

डॉक्टर कैलास यांचेही त्यांच्या समाजसेवेखातर हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा!

जागू आणि डॉ. केलास , दोघांचेही खूप कौतुक आणि हार्दिक अभिनंदन !
नुसती इच्छा असणे आणि खरेच असे काही उपक्रम करणे यात खूपच फरक आहे, त्यामुळे तुम्हा दोघांचे खूपच कौतुक वाटतेय. आणि तुमच्या मिस्टरांचेही, इतकी साथ दिल्याबद्दल. Happy

ग्रेट गं जागु... एक कार्यक्रम करताना काय धडपड करावी लागते...

तु नोकरी आणि संसार सांभळून हाही उद्योग करतेस हे अगदी कौतुकास्पद.

तुझ्या समाजकार्याला शुभेच्छा.. आणि डॉक्टरांचेही अभिनंदन.

सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
मवा नवर्‍याचे पाठबळ असल्यामुळेच मी हे सगळ करु शकते.

जागु तुमचं आणि डॉक्टर कैलास यांच अभिनंदन.
खुप चांगलं काम करत आहात तुम्ही सगळे. जागु तुमच्या पतिदेवांचही अभिनंदन.
डॉक्टर तुम्ही सच्चे कलावंत शोभता ,तुमच्या पुढील उपक्रमास शुभेच्छा.

खरंय जागू, अश्या गोष्टींमध्ये दोघांचा प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष सहभाग असतो. डॉक्टरांच्या पत्नीचेही खरेतर अभिनंदन करायला हवे , त्यांना समाजकार्य करण्यासाठी वेळ घेऊ देतात यासाठी.

हाच खरा मायबोलीचा उद्देश असावा का? या प्रश्नांचं उत्तर अश्या सामाजिक कार्यातून वेळोवेळी मिळत आलं आहे. मायबोलीच्या पुस्तकात आणखी एक सोनेरी पान पहायला मिळालं. जागूताई आणी डॉ. तुमचं मनापासून अभिनंदन. तुमचं हे वेड असंच दिवसेनदिवस वाढत जावो. Happy

तसेही ठाण्याजवळचे उरण,पालघर, डहाणू , कर्जत जवळच्या दुर्गम भागातली गावे, पश्चिम महाराष्ट्रातली धरण क्षेत्रातली येणारी अविकसित आणि कमी लोकसंख्या असलेल्या गावात या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे.

छान. उत्तम.

जागु आणि डॉ. कैलास या दोघांचेही त्यांच्या समाज कार्याबद्दल हार्दीक अभिनंदन आणि दोघांनाही शुभेच्छा.

जागु आणि डॉ. कैलास या दोघांचेही त्यांच्या समाज कार्याबद्दल हार्दीक अभिनंदन आणि दोघांनाही शुभेच्छा.:-)

Pages