१९८३ आणि २०११ - मास्तुरे

Submitted by विकवि_संपादक on 26 April, 2011 - 01:43

२५ जून १९८३ आणि २ एप्रिल २०११ . . . भारताच्या क्रिकेट इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे हे दोन दिवस . . . भारतातील सर्व क्रिकेटवेडे हे दोन सोनेरी दिवस आपल्या आयुष्यात कधीही विसरणार नाहीत . . .

1983_Team1.jpg
(१९८३ चा विश्वचषक विजेता भारतीय संघ)
खुर्चीवर बसलेले (डावीकडून):
दिलीप वेंगसरकर, सय्यद किरमाणी, कपिल देव (कर्णधार), मोहिंदर अमरनाथ (उपकर्णधार), सुनील गावसकर, मदनलाल
उभे (डावीकडून) - संघ व्यवस्थापक, यशपाल शर्मा, कृष्णम्माचारी श्रीकांत, बलविंदर सिंग संधू, रवि शास्त्री, संदीप पाटील, रॉजर बिन्नी, कीर्ति आझाद, सुनिल वॉल्सन

2011_Team.jpg(२०११ चा विश्वचषक विजेता भारतीय संघ)

भारताने जवळपास २८ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा जिंकली. नाही म्हणायला २००३ मधल्या स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोहोचला होता. पण तिथे ऑस्ट्रेलियाने आपल्याला सपाटून मार दिला.

१९८७ मध्ये आणि १९९६ मध्ये सुध्दा भारत उपांत्य फेरीत पोहोचला होता. पण भारताची ती कामगिरी भरवश्याच्या म्हशीला टोणगा अशी झाली. २००७ च्या स्पर्धेत तर भारताला बांगलादेशासारख्या लिंबूटिंबूकडून पराभूत होऊन पहिल्याच फेरीत बाहेर पडावे लागण्याची मानहानी पत्करावी लागली होती.

१९७५ मध्ये जेव्हा भारत आपला पहिलावहिला विश्वचषकातला सामना खेळला, तेव्हा इंग्लंडच्या ६० षटकांतल्या ३३६ धावांच्या डोंगराविरूध्द भारताला संपूर्ण ६० षटके खेळून १५० धावा देखील करता आल्या नव्हत्या. त्यात सुनील गावसकरने सलामीला येऊन संपूर्ण ६० षटके खेळून नाबाद ३६ धावा केल्या होत्या. (त्याच सुनीलने आपल्या क्रिकेट कारकीर्दीतल्या शेवटून दुसर्‍या सामन्यात म्हणजेच १९८७ च्या विश्वचषक स्पर्धेतल्या उपांत्य सामन्यात केवळ ८५ चेंडूत शतक झळकावले होते). तर १९७९ च्या स्पर्धेत भारताला प्राथमिक फेरीतल्या तीनही सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी आजच्या कॅनडाच्या दर्जाच्या असलेल्या श्रीलंकेच्या लिंबूटिंबू संघाने देखील आपल्याला हरवले होते. १९९६ मध्ये देखील उपांत्य फेरीत पराभूत होताना निराश झालेल्या संतप्त प्रेक्षकांच्या दंगलीमुळे भारताला नामुष्की पत्करावी लागली होती.

२०११ मध्ये देखील प्राथमिक फेरीत इंग्लंड, द. आफ्रिका व वेस्ट इंडिज विरूध्दच्या सामन्यात फलंदाजी करत असताना भारताचा डाव अतिशय चांगल्या अवस्थेतून पार कोसळला होता.

एकंदरीत भारताची विश्वचषकातली आतापर्यंतची कामगिरी बरीचशी बेभरवशाची व सातत्य नसलेली राहिलेली आहे.

या पार्श्वभूमीवर २०११ चा महाविजय अतिशय खुलुन दिसतो. १९८३ चा विजेता संघ व २०११ चा संघ यातील तुलना अपरिहार्य आहे. दोन्ही संघात बरेच फरक आहेत. दोन्ही संघांच्या प्रतिस्पर्ध्यांत देखील खूप फरक आहे. एवढेच नव्हे तर स्पर्धेचे स्वरूप, नियम, षटकांची संख्या, फलंदाजांनी आपली कल्पनाशक्ती लढवून शोधलेले नवीन फटके, चेंडू, खेळाडूंचे कपडे, प्रक्षेपणाची व्यवस्था, क्षेत्ररक्षणाचे नियम यात देखील खूप फरक आहे. एकच गोष्ट १९८३ व २०११ मध्ये समान आहे. ती म्हणजे भारतीयांचा उत्साह आणि विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीयांनी केलेला जल्लोष!

2011_public.jpg(२०११ चा विश्वचषक जिंकल्यानंतरचा क्रिकेटवेड्यांचा जल्लोष)

1983_Captain.jpg(१९८३ - कपिलदेव विश्वचषक उंचावताना)

03dhoni1.jpg(२०११ - महेंद्रसिंग धोनी गेटवे ऑफ इंडियासमोर विश्वचषक उंचावताना

१९८३ मधल्या स्पर्धेतले सामने हे ६० षटकांचे असत तर १९८७ पासून ५० षटकांचे सामने सुरू झाले. १९८३ पर्यंत खेळाडू कसोटी सामन्यासारखे पांढरे कपडे घालून लाल चेंडूने खेळत. आता तर मैदानावर रंगीबेरंगी जत्रा असते. २० षटकांचा पॉवर प्ले, ३० यार्डच्या आत कमीतकमी ४ क्षेत्ररक्षक ठेवण्याचा नियम, नोबॉलवरची फ्री हिट, UDRS, तिसर्‍या पंचाचे निर्णय, वाईड/ बाउन्सर इ. चे सध्या असलेले कडक नियम, इ. १९८३ मध्ये नव्हते. त्यामुळे अर्थातच १९८३ मधल्या सामन्यांत धावा कमी होत असत. त्यावेळी ६० षटकांत २५० धावा हा विनिंग स्कोअर समजला जायचा. आता ५० षटकांत २७५ धावा सुध्दा पुर्‍या पडत नाहीत. आताचे बरेचसे नियम फलंदाजांना भरपूर टोलेबाजी करता यावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आखलेले आहेत. पण १९८३ मध्ये एकदिवसीय सामन्याचे बरेचसे नियम हे कसोटी सामन्याच्या नियमांसारखेच होते. मात्र १९८३ मध्ये आता प्रमाणेच एका गोलंदाजाला एकूण षटकांच्या एक पंचमांश षटकेच टाकायची परवानगी होती.

१९८३ चा भारताचा विजेता संघ असा होता.

सलामीची जोडी : सुनील गावसकर व श्रीकांत
मधली फळी : मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, यशपाल शर्मा (हा कामचलाऊ यष्टीरक्षण सुध्दा करायचा)
यष्टीरक्षक : सय्यद किरमाणी
अष्टपैलू : कीर्ति आझाद, कपिलदेव (कर्णधार), मदनलाल, रॉजर बिन्नी, बलविंदर सिंग संधू
राखीव : दिलीप वेंगसरकर (मधल्या फळीतला फलंदाज), रवि शास्त्री (डावरा फिरकी गोलंदाज), सुनिल वॉल्सन (डावरा मध्यमगती गोलंदाज)

Binny_Kirty.jpg(१९८३ - अंतिम सामन्यात डेस्मंड हेन्सचा झेल घेताना रॉजर बिन्नी आणि मागे आनंदाने पळत येतोय तो कीर्ति आझाद)

यातला कीर्ति आझाद हा उजव्या हाताने ऑकब्रेक गोलंदाजी करत असे. पण त्याचा रोल कामचलाऊ गोलंदाजाचा होता. बाकी सर्वजण मध्यमगती गोलंदाज होते. मोहिंदर अमरनाथ फारसा स्टार्ट न घेता अतिशय कमी गतीने धावत येऊन मध्यमगती गोलंदाजी करायचा. त्याच्या अॅक्शनच्या मानाने त्याचे चेंडू फारच वेगात यायचे व गतीचा अंदाज न आल्याने फलंदाज पायचित व्हायचे. अंतिम सामन्यात खेळलेले सर्व ११ खेळाडू उजव्या हाताने फलंदाजी करायचे. हा एक प्रकारचा तोटाच होता. राखीव असलेले दिलीप वेंगसरकर आणि रवि शास्त्री सुध्दा उजव्या हाताने फलंदाजी करायचे. सुनिल वॉल्सन कोणत्या हाताने फलंदाजी करायचा याची कल्पना नाही कारण या संपूर्ण स्पर्धेत तो एकही सामना खेळला नाही! या स्पर्धेनंतरही त्याचे नाव फारसे ऐकू आले नाही. एकंदरीत त्याला विश्वचषकाची लॉटरीच लागली म्हणायची. वेंगसरकर व शास्त्री या स्पर्धेतले ८ पैकी २ सामने खेळले, पण ते दोन्ही सामने भारत हरला झाला होता.

kirmani.jpg(१९८३ - यष्टीरक्षक सय्यद किरमाणी)

सर्वात महत्वाचे म्हणजे १९८३ च्या संघात श्रीकांत, यशपाल शर्मा व रॉजर बिन्नी हे ३ उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होते तर आताच्या संघात युवराज, कोहली व रैना हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत.

२०११ चा संघ जास्त समतोल वाटतो. या संघात गंभीर, युवराज व रैना असे ३ डावरे फलंदाज आहेत. तसेच झहीर व युवराज हे डाव्या हाताने गोलंदाजी करणारे खेळाडू देखील संघात आहेत. हरभजन सिंग या प्रमुख फिरकी गोलंदाजाला साथ द्यायला युवराज, सचिन व रैना हे देखील फिरकी गोलंदाज आहेत. तर झहीरच्या बरोबरीने मुनाफ व श्रीशांत हे उजव्या हाताने गोलंदाजी करणार मध्यमगती गोलंदाज देखील आहेत. एकंदरीत २०११ चा संघ हा डावर्‍या व उजव्या खेळाडूंचे समतोल मिश्रण आहे.

सलामीची जोडी

SunilG.jpg(१९८३ - भारताचा सलामीचा महान फलंदाज - सुनील गावसकर

१९८३ मध्ये भारताच्या फलंदाजीची सुरवात गावसकर व श्रीकांत करायचा तर २०११ मध्ये सचिन व सेहवागने सलामीची धुरा सांभाळली होती. श्रीकांत हा सेहवागप्रमाणेच धडाकेबाज फलंदाज होता. त्याचे टायमिंग अतिशय उत्कृष्ट होते. अंतिम सामन्यातल्या सर्वाधिक धावा (३८) ह्या त्याच्याच नावावर आहेत. सध्याच्या, फलंदाजांना अनुकूल नियम असलेल्या काळात, जर श्रीकांत खेळत असता तर तो सेहवाग इतकाच, कदाचित त्याच्यापेक्षा कांकणभर जास्तच, स्फोटक झाला असता.

Shrikant.jpg(सेहवाग आणि श्रीकांत)

मात्र सचिन व गावसकरची तुलना करणे अशक्य आहे. ४४० सामन्यांत ८५ पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने ४६ शतके करून १७ हजारांहून अधिक धावा केलेला सचिन, हा, १०८ सामन्यात ६२ च्या स्ट्राइक रेटने फक्त १ शतक केलेल्या व ३०९२ धावा केलेल्या सुनीलपेक्षा खूपच पुढे आहे. पण केवळ आकडेवारीने तुलना करणे योग्य ठरणार नाही. सुनीलच्या काळात भारतातले एकदिवसीय क्रिकेट हे अत्यंत बाल्यावस्थेत होते. ६० षटकांत नेहमीपेक्षा काहिसे वेगाने खेळले जाणारे कसोटी क्रिकेट असेच त्याचे स्वरूप त्यावेळी होते. त्यात भर म्हणजे बाउन्सर, वाईड, इ. चे नियम २०११ एवढे कडक नव्हते. पॉवर प्ले, क्षेत्ररक्षकांवरची बंधने इ. नियम त्यावेळी अजिबात नव्हते. म्हणूनच १९८३ मधल्या सामन्यांत ३ स्लिप, गली, फॉरवर्ड शॉर्ट लेग अशी क्षेत्ररचना आढळते.

sehwag_Gamn.jpg(सेहवाग आणि गंभीर)

sachin3.jpg(मास्टर ब्लास्टर - सचिन)

वेस्ट इंडिजची अतिशय वेगवान गोलंदाजी सुनील व इतर बहुतेक सर्व खेळाडू अजिबात हेल्मेट न वापरता खेळत असत. गार्नर, होल्डिंग, रॉबर्टस, मार्शल इ. सातत्याने ९० मैल प्रतितास पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज आताच्या कोणत्याही गोलंदाजापेक्षा भयानक होते. एकदिवसीय क्रिकेटचे तंत्र पुरेसे आत्मसात करेपर्यंत गावसकरच्या कारकीर्दीची अखेर जवळ आली होती. याउलट सचिनने पदार्पण केले तेव्हा भारताने हे तंत्र बरेचसे आत्मसात केले होते व उत्तरोत्तर भारतीय त्यात अधिक कुशल होत गेले.

sachin4.jpg(१९९२ पासून लागोपाठ ६ विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा सचिन तेंडुलकर - पॅडल स्वीप मारताना)

१९८३ मध्ये तिसर्‍या क्रमांकावर मोहिंदर अमरनाथ खेळायचा. तो अतिशय उपयुक्त असा अष्टपैलू खेळाडू होता. तो नांगर टाकून खेळायचा तसा वेळप्रसंगी फटकेबाजीपण करायचा. १९८३ च्या स्पर्धेतल्या उपांत्य व अंतिम सामन्यात त्याला त्याच्या अष्टपैलू खेळामुळे सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. उपांत्य सामन्यात त्याने ४६ धावा करताना १२ षटकांत केवळ २८ धावा देऊन २ बळी मिळविले होते तर अंतिम सामन्यात २८ धावा करताना प्रतिपक्षाचे ३ गडी बाद केले होते. तो अतिशय संथ धावत येऊन संथ हालचाल करून मध्यमगती गोलंदाजी करायचा. त्याच्या हालचालीच्या मानाने त्याचा चेंडू बराच वेगात यायचा कारण तो खांद्यातून गोलंदाजी करायचा. २०११ च्या संघातल्या युवराजशी त्याची तुलना होऊ शकते. युवराज हा मोहिंदर पेक्षा नक्कीच जास्त आक्रमक आहे. त्याचे क्षेत्ररक्षण सुध्दा उत्कृष्ट आहे. त्याची फिरकी गोलंदाजी २०११ मध्ये अतिशय उपयुक्त ठरली. पण मोहिंदर अतिशय वेगवान तसेच दर्जेदार फिरकी गोलंदाज खेळण्यात वाकबगार होता. तो उंचावरून आलेले झेल कधीच सोडत नसे.

Mohinder_Amarnath.jpg(१९८३ - भारताचा उपकर्णधार आणि उपांत्य व अंतिम सामन्याचा मानकरी - मोहिंदर अमरनाथ)

मात्र युवराज हा मॅचविनर खेळाडू आहे. २०११ च्या स्पर्धेत त्याने जबरदस्त अष्टपैलू कामगिरी करताना २०११ च्या स्पर्धेतल्या ९ पैकी तब्बल ४ सामन्यात सामनावीराचा किताब मिळविला आहे.

yuvaraj.jpg(२०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील मालिकावीर - अष्टपैलू युवराज सिंग)

२०११ च्या संघातला गौतम गंभीर व १९८३ चा यशपाल शर्मा यांची थोडीफार तुलना होऊ शकते. यशपालने १९८३ च्या वेस्ट इंडिजविरूध्द्च्या पहिल्याच सामन्यात ९० धावा करून सामनावीर हा किताब मिळविला होता. उपांत्य सामन्यात सुध्दा त्याने सर्वाधिक ६० धावा केल्या होत्या. त्याचे क्षेत्ररक्षण व रनिंग बिटवीन द विकेट चांगले होते. मात्र तो स्थिरावण्यास बराच वेळ घ्यायचा. गंभीरच्या नावावर २०११ विश्वचषक स्पर्धेत ४ अर्धशतके जमा आहेत. परंतु युवराज, सचिन, झहीर, सेहवाग इं.च्या तुलनेत त्याची कामगिरी काहिशी झाकोळली गेली. माझ्या दृष्टीने तोच अंतिम सामन्याचा सामनावीर होता. पण सामनावीराचा पुरस्कार धोनीला मिळाला. अंतिम सामन्यात त्याने (गंभीरने) सर्वाधिक ९७ धावा करताना दुसर्‍या विकेटसाठी ३१ धावांची, तिसर्‍या विकेटसाठी ८३ धावांची आणि चवथ्या विकेटसाठी तब्बल १०९ धावांची भागीदारी करताना भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले होते. त्याची खेळी इतकी महत्वपूर्ण होती की तो बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी ५४ चेंडूत फक्त ५२ धावा हव्या होत्या. इतक्या सुस्थितीत भारताला नेल्यावरच तो बाद झाला. गंभीरप्रमाणेच, १९८३ मध्ये मोहिंदर, श्रीकांत, रॉजर बिन्नी, मदनलाल, कपिलदेव यांच्या कामगिरीपुढे यशपालची कामगिरी काहिशी झाकोळली गेली.

gamb.jpg(२०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतातर्फे सर्वाधिक ९७ धावा करून भारताला विजयाच्या दारात नेऊन ठेवणारा - गौतम गंभीर)

सुरेश रैना प्रमाणेच तडाखेबंद फलंदाज म्हणजे संदीप पाटील. इंग्लंडमध्ये १९८२ मधल्या कसोटी मालिकेत त्याने बॉब विलीसच्या एका षटकात लागोपाठ ६ चौकार मारून फटकेबाजीचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक दाखविले होते. त्यापूर्वी १९८१ मध्ये ऑस्ट्रेलियात गावसकर, विश्वनाथ, वेंगसरकर असे सर्व प्रमुख फलंदाज अपयशी ठरले असताना त्याने डेनिस लिली, लेन पॅस्को इ. तुफानी गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली होती. तो अत्यंत आक्रमक फलंदाज म्हणून संघात आला पण विनोद कांबळीप्रमाणेच त्याने क्रिकेटव्यतिरिक्त इतर गोष्टीतच जास्त रस घेतल्याने (चित्रपटात काम करणे, साप्ताहिक चालविणे इ.) तो फार काळ संघात टिकला नाही. १९८३ च्या उपांत्य व अंतिम सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली होती. उपांत्य सामन्यात त्याने पुन्हा एकदा बॉब विलिसची गोलंदाजी फोडून काढताना त्याच्या एकाच षटकात ४ चौकार मारले होते. तो कामचलाऊ गोलंदाजी पण करायचा पण त्याचे क्षेत्ररक्षण फारसे खास नव्हते.

sandip.jpg(१९८३ - स्फोटक संदीप पाटील)

त्याच्या मानाने सुरेश रैनाने २०११ च्या स्पर्धेत ४ पैकी फक्त दोनच सामन्यात चांगली फलंदाजी केली. पण त्याचे क्षेत्ररक्षण अतिशय उच्च दर्जाचे आहे. कामचलाऊ गोलंदाज म्हणून सुध्दा त्याचा उपयोग होतो. तो आणि विराट कोहली हे भारताचे पुढील ८-१० वर्षातले आधारस्तंभ आहेत.

raina.jpg(२०११ - उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व फटकेबाज - सुरेश रैना)

२०११ च्या संघात विराट कोहली सारखा एक अतिशय आक्रमक फलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता. त्यामानाने १९८३ च्या संघातला कीर्ति आझाद खूपच सामान्य वाटतो. कीर्ति आझादचे संघातले स्थान अष्टपैलू खेळाडूचे होते. तो आक्रमक फलंदाज व कामचलाऊ ऑफस्पिन गोलंदाजी करायचा. तो रणजी व दुलीप करंडक स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजी करायचा. एका रणजी स्पर्धेत ८२ वर खेळत असताना त्याने लागोपाठ ३ षटकार मारून आपले शतक पूर्ण केले होते. नंतरही १९८४ मध्ये एका पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यात भारताचे ७ गडी बाद झालेले असताना व जिंकण्यास १३ षटकात ९५ धावा हव्या असताना मदनलालच्या साथीने फटकेबाजी करून भारताला विजय मिळवून दिला होता. १९८३ च्या स्पर्धेत त्याने फारसे काही केले नाही. परंतु उपांत्य सामन्यात नेहमी पार्ट टाईम गोलंदाज म्हणून गोलंदाजी करणार्‍या कीर्ति आझादने इतकी चांगली गोलंदाजी केली की कपिलदेवने त्याला पूर्ण १२ षटके गोलंदाजी दिली. त्याने १२ षटकात केवळ २९ धावा देऊन इयान बॉथमला त्रिफळाबाद केले होते तर दुसर्‍या बाजूने मोहिंदर अमरनाथने १२ षटकात फक्त २८ धावा देऊन २ बळी मिळविले होते. त्या सामन्यात इंग्लंडला ६० षटकात फक्त २१३ धावात रोखण्यामध्ये या दोघांचे अतिशय महत्वपूर्ण योगदान होते. कीर्ति फार काळ भारतीय संघात टिकला नाही. पण विराट कोहलीचे भवितव्य सध्यातरी उज्ज्वल वाटते.

धोनीच्या तुलनेत १९८३ च्या संघातला यष्टीरक्षक सय्यद किरमाणी फिका वाटतो. किरमाणीचे यष्टीरक्षण चांगले होते. त्याची फलंदाजीही बर्‍यापैकी होती. पण धोनी एक चांगला यष्टीरक्षक आहेच, तसेच तो तडाखेबंद फलंदाजही आहे. अंतिम सामन्यात तो कप्तानाची इनिंग खेळला. २००७ चा T20 व २०११ चा एक दिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकण्यामध्ये त्याच्या अतिशय थंड डोक्याने केलेल्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. आयपीएल मध्ये सुध्दा त्याच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ २००८ मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता तर २०१० मध्ये चेन्नईच्या संघाने विजेतेपद मिळविले होते. २००५ मध्ये भारतीय संघात आलेल्या धोनीची सुरूवात एक अत्यंत तडाखेबंद फलंदाज म्हणून झाली होती. श्रीलंकेविरूध्द एका सामन्यात त्याने नाबाद १८३ धावा करताना तब्बल १० षटकार मारले होते. कालांतराने त्याने आपल्या फलंदाजीत संयम आणला. प्रशिक्षक ग्रेग चॅपेलने २००५ ते २००७ या काळात भारताच्या संघाची वाट लावल्यामुळे आधी गांगुली व नंतर द्रविडला कर्णधारपदावरून पायउतार व्हायला लागले. त्यावेळी निवडसमितीसमोर कर्णधारपदासाठी ३ पर्याय होते. सचिन, सेहवाग व युवराज. सचिनने पूर्वीच्या कटु अनुभवांमुळे कर्णधारपद स्वीकारायला नकार दिला. त्यावेळी उतावळा सेहवाग व बेभरवशाचा युवराज यांच्या तुलनेत निवड समितीने कर्णधारपदाची माळ धोनीच्या गळ्यात घातली व धोनीने मिळालेल्या संधीचे सोने केले.

dhoni.jpg(२०११ - महेंद्रसिंग धोनी - अंतिम सामन्यातला विजयी षटकार)

धोनी व कपिलच्या बाबतीत बरीच साम्यस्थळे आढळतात. दोघेही अत्यंत आक्रमक फलंदाज म्हणून अगदी सुरवातीपासूनच नावारूपाला आले. १९७९ ते १९८३ या काळात सुनील गावसकर हा भारताचा कर्णधार होता. काही काळ गुंडाप्पा विश्वनाथने देखील कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती. कर्णधार म्हणून गावसकर हा फारसा आक्रमक नव्हता तर विश्वनाथ जेमतेम २ कसोटी सामन्यात कर्णधार होता. या कालखंडात भारताने इंग्लंडविरूध्द भारतात मालिका जिंकली तर इंग्लंडमध्ये पराभव पत्करला. १९७९ मध्ये ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानविरूध्द भारतात मालिका जिंकली. पण १९८१ मध्ये ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरूध्द पहिल्या सामन्यात डावाने पराभव व दुसर्‍या सामन्यात कसाबसा पराभव वाचविण्यात यश मिळविलेल्या भारताने तिसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या डावात केवळ ८३ धावात गुंडाळून मालिका अनिर्णीत ठेवण्यात यश मिळविले होते. यात ५ बळी घेतलेल्या कपिलचा मोठा वाटा होता. पण नंतर लगेचच झालेल्या न्यूझीलँडविरूध्द भारताचा पराभव झाला होता. पण नंतर १९८२ मध्ये पाकिस्तानात झालेल्या ६ सामन्यांच्या मालिकेत भारताचा ३-० असा दणदणीत पराभव झाला होता. इम्रानखानने तब्बल ४० बळी मिळविताना भारताची फलंदाजी कापून काढली होती. त्या मालिकेत ६ वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन केलेल्या मोहिंदर अमरनाथने ३ शतके झळकावून जबरदस्त कमबॅक केला होता.

त्या दारूण पराभवानंतर निवडसमितीने आश्चर्याचा धक्का देत २४ वर्षीय कपिल देवला कर्णधारपदी निवडले. तर धोनी भारताच्या २००७ चा विश्वचषक स्पर्धेत झालेल्या मानहानीनंतर भारताचा कर्णधार झाला तेव्हा तो फक्त २५ वर्षांचा होता. कपिलच्या लढाऊ वृत्तीमुळेच त्याची कर्णधारपदी निवड झाली असावी. तो कर्णधार असलेल्या पहिल्याच मालिकेत वेस्टइंडिजमध्ये वेस्ट इंडिजविरूध्द भारताला २-० अशी हार पत्करावी लागली. खरं तर त्या ५ सामन्यांच्या मालिकेत भारताचा ५-० असा पराभव झाला असता इतका वेस्टइंडिजचा संघ जबरदस्त होता. सर्वात महत्वाचे म्हणजे भारताने इतिहासात पहिल्यांदाच एका एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करून आपल्या पुढील विजयाची नांदी केली. त्या सामन्यात भारताच्या ४७ षटकातील २८१ धावांचा पाठलाग करताना (सुनील - ९०, कपिल - ७५), विंडीजला फक्त २३० धावा करता आल्या होत्या.

कपिल व धोनी हे दोघेही खंदे लढवय्ये. कपिल मात्र स्वत: आघाडीवर राहून नेतृत्व करत असे. तो अत्यंत आक्रमक कर्णधार समजला जायचा. १९८३ मधली त्याची १७५ धावांची तडाखेबंद खेळी तर जगप्रसिध्द आहे. त्याच स्पर्धेत ऑसीजविरूध्दच्या एका सामन्यात त्याने ५ बळी मिळविले होते. १९८१ मध्ये ऑसीजचा ८३ धावांत खुर्दा करताना अंगात ताप असताना सुध्दा वेदनाशमक इंजेक्शने घेऊन त्याने ५ बळी मिळविण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली होती. १९८३ च्या स्पर्धेत कपिलची कामगिरी खूपच चांगली होती. त्याने स्पर्धेत ८ सामन्यात एकूण १२ बळी मिळविताना झिम्बाब्वे विरुध्दचा सामना ५ बाद १७ अशा शोचनीय अवस्थेतून एकहाती जिंकून दिला होता.

श्रीकांतने एक आठवण सांगितली आहे. अंतिम सामन्यात भारताचा १८३ धावात डाव आटोपल्यावर ड्रेसिंगरूममध्ये सुतकी वातावरण असताना कपिल संघाला उद्देशून म्हणाला, "जीतना मुश्किल है, लेकिन फाईट तो कर सकते है". या वाक्याने नवीन संजीवनी मिळालेल्या भारताने पुढील ४ तासात इतिहास घडविला.

त्यामानाने धोनीने २०११ मध्ये अंतिम सामना वगळता इतर सामन्यात फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. अंतिम सामन्यात मात्र त्याने कर्णधाराला साजेसा खेळ करून भारताला विजय मिळवून दिला.

गोलंदाजांच्या विभागात १९८३ च्या संघात कपिलदेव हाच सर्वार्थाने चांगला गोलंदाज भारताकडे होता. बाकी सर्वजण त्याच्याइतकी चांगली गोलंदाजी करत नसत. बलविंदर सिंग संधू हा मुनाफ पटेल सारखाच स्विंग गोलंदाजी करायचा. अंतिम सामन्यात भारत फक्त १८३ धावांचे आव्हान ठेवून क्षेत्ररक्षणाला उतरला तेव्हा वेस्ट इंडिजचा विजय ही फक्त औपचारिकता आहे असेच बहुतेक सर्वांचे मत होते. गॉर्डन ग्रीनिज व डेसमंड हेन्सने विंडिजचा डाव सुरू केला. गॉर्डन ग्रीनिज हा अत्यंत महान फलंदाज होता. १९८४ मध्ये इंग्लंडमध्ये इंग्लंडविरूध्द एका कसोटी सामन्यात ५ व्या दिवशी विजयासाठी केवळ ५ तासात ३४२ धावा करायच्या असताना त्याने जबरदस्त फटकेबाजी करून नाबाद २१४ धावा करून विंडिजला जबरदस्त विजय मिळवून दिला होता. कपिलबरोबर संधूने गोलंदाजी सुरू केली आणि त्याच्या दुसर्‍याच षटकात एक चेंडू बाहेर जाईल या समजुतीने गॉर्डन ग्रीनिजने सोडून दिला. पण तोच चेंडू झपकन आत येऊन त्याचा त्रिफळा उडाला व भारताच्या आशा प्रज्वलित व्हायला सुरूवात झाली. नंतर संधूने फाउद बॅकसला सुध्दा बाद करून आपला दुसरा बळी नोंदवला.

Greenidge_Bowled_Sandhu.jpg(१९८३ - हाच तो क्षण ज्यावेळी विंडीजच्या गॉर्डन ग्रीनीजने बलविंदर सिंग संधूचा एक चेंडू बाहेर जाईल अशा समजूतीने सोडून दिला आणि तोच चेंडू झपकन आत येऊन त्याचा त्रिफळा उडाला. याच चेंडूने भारताची विजयाकडे वाटचाल सुरू झाली.)

त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या व्हिव्हियन रिचर्डसने एकापाठोपाठ एक चौकार मारत सामना जिंकण्याची घाईच त्याला झाल्याचे दाखवून दिले. काही वेळातच त्याच्या केवळ २८ चेंडूत ३३ धावा झाल्या. मदनलालच्या एका चेंडूचा नीट अंदाज न घेता त्याने मिडविकेट सीमारेषेवर चेंडू उचलला आणि कपिलने चेंडूवरची नजर काढून न घेता जवळपास ३०-४० पावले मागे पळत जाऊन अप्रतिम झेल घेतला आणि भारताच्या विजयातला सर्वात मोठा अडथळा दूर झाला.

452_madan_lal.jpg(१९८३ - जिगरबाज मदनलाल)

१९८३ च्या स्पर्धेत रॉजर बिन्नीने ८ सामन्यात १८ तर मदनलालने ८ सामन्यात १७ बळी मिळविले होते. हे दोघे मध्यमगती गोलंदाज होते. ते चेंडू फारसा स्विंग करत नव्हते. त्यांचा वेगही अत्यंत कमी होता. भारतात त्यांना इतके यश कधीही मिळाले नव्हते. पण इंग्लंडमधल्या स्विंगला अनुकूल असलेल्या वातावरणाचा या दोघांनी जबरदस्त फायदा उठविला. अंतिम सामन्यात मदनलालने ३ तर बिन्नीने क्लाईव्ह लॉईडचा महत्वाचा बळी मिळविला होता.

त्याआधी प्राथमिक फेरीतल्या ५ सामन्यानंतर भारताच्या नावावर ३ विजय व २ पराभव लागले होते. ऑसीजने २ सामने जिंकले होते व ३ सामने हारले होते. शेवटचा सामना या दोघात होता. हा सामना ऑसीज जिंकले असते तर धावगतीच्या जोरावर तेच उपांत्य फेरीत गेले असते. या दोघातला पहिला सामना ऑसीजने मोठ्या फरकाने जिंकल्यामुळे मानसिक दडपण भारतावरच होते. या ६ व्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ६० षटकांत २४७ धावा केल्या. ऑसीजने आपल्या पहिल्या सामन्यात भारताविरूध्द २८१ धावा केल्या होत्या. त्यामुळे या सामन्यात २४७ धावांचे लक्ष्य त्यांना फारसे अवघड नव्हते. पण त्या सामन्यात बिन्नीने भन्नाट गोलंदाजी करून ऑसीजचे ४ बळी टिपले (८-०-२९-४) व ऑसीजला केवळ १२९ धावात गुंडाळून भारताला उपांत्य फेरीत नेले होते. त्या सामन्यात तोच सामनावीर होता.

१९८३ मध्ये भारतीय संघात एकही प्रमुख फिरकी गोलंदाज नव्हता. कपिलदेव, संधू, मदनलाल व बिन्नी हा मध्यमगती मारा, मोहिंदरची मध्यमगती गोलंदाजी आणि कीर्ति आझादची कामचलाऊ फिरकी ही भारताची गोलंदाजी होती. पण २०११ मध्ये हरभजन ह्या प्रमुख फिरकी गोलंदाजाला अत्यंत यशस्वी ठरलेल्या अष्टपैलू युवराजच्या फिरकीची साथ होती. वेळ पडल्यास सचिन व रैना हे कामचलाऊ गोलंदाज देखील होते. त्यांच्या बरोबरीला जबरदस्त फॉर्मात असलेला झहीर खान, मुनाफ पटेल व श्रीशांत हे मध्यमगती गोलंदाज होते.

zaheer.jpg(२०११ - भारताचे ब्रह्मास्त्र - स्पर्धेत सर्वाधिक २१ बळी घेणारा झहीर खान)

एकंदरीत तुलना केली तर १९८३ च्या संघापेक्षा २०११ चा संघ जास्त समतोल व बलाढ्य वाटतो. १९८३ च्या संघात एकही डावखुरा फलंदाज व गोलंदाज नव्हता. २०११ च्या संघात मात्र गंभीर, युवी व रैना हे डावखुरे फलंदाज व झहीरखान आणि युवराज हे डावरे गोलंदाज होते.

१९८३ च्या संघात श्रीकांत, बिन्नी व यशपाल शर्मा हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होते तर २०११ च्या संघात रैना, युवराज व कोहली हे तितकेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होते.

फलंदाजीत २०११ चा संघ खूपच तगडा वाटतो. सेहवाग, सचिन, गंभीर, कोहली, युवराज, रैना व धोनी ही फलंदाजांची भिंत गावसकर, श्रीकांत, मोहिंदर, संदीप पाटिल, यशपाल शर्मा, कपिल, कीर्ति आझाद व किरमाणीच्या तुलनेत चांगलीच भक्कम वाटते.

2011_Team1.jpg(२०११ - उपांत्य सामन्यात पाकिस्तानला हरविले)

एका बाबतीत मात्र १९८३ चा संघ २०११ च्या संघापेक्षा चांगला होता. १९८३ च्या संघात अनेक अष्टपैलू खेळाडूंचा भरणा होता. मोहिंदर अमरनाथ, कपिल देव, कीर्ति आझाद, संधू, मदनलाल, बिन्नी हे सर्वजण चांगले अष्टपैलू खेळाडू होते. संदीप पाटील व श्रीकांत हे देखील कामचलाऊ गोलंदाजी टाकू शकत होते. सर्वात महत्वाचे म्हणजे १९८३ च्या संघातील जवळपास सर्व खेळाडू (श्रीकांत व कीर्ति आझादचा अपवाद वगळता) अतिशय तंत्रशुध्द होते. तंत्राच्या बाबतीत २०११ च्या संघातले सचिन व काही प्रमाणात गंभीर हेच फक्त त्यांच्या जवळपास जाऊ शकतील.

१९८३ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्याचा धावफलक

India innings (invited in to bat first) :-
Batsman Runs Balls 4s 6s
Sunil Gaवaskar c Dujon b Roberts 2 12 0 0
Krish Srikanth lbw b Marshall 38 57 7 1
Mohinder Amarnath b Holding 26 80 3 0
Yashpal Sharma c Logie (sub) b Gomes 11 32 1 0
Sandeep Patil c Gomes b Garner 27 29 0 1
Kapil Dev c Holding b Gomes 15 8 3 0
Kirti Azad c Garner b Roberts 0 3 0 0
Roger Binny c Garner b Roberts 2 8 0 0
Madan Lal b Marshall 17 27 0 1
Syed Kirmani b Holding 14 43 0 0
Balvinder Sandhu not out 11 30 1 0

Extras (20) byes=5, lbyes=5, wides=9, noball=1

Total = 183 allout in 54.4 overs.

Bowlers :- Overs Mdns Runs Wickets Extras
Andy Roberts 10 3 32 3
Joel Garner 12 4 24 1
Malcom Marshall 11 1 24 2
Michael Holding 9.4 2 26 2
Larry Gomes 11 1 49 2
Vivian Richards 1 0 8 0

West Indies innings (target = 184 from 60 overs) :-
Batsman Runs Balls 4s 6s
Gordon Greenidge b Sandhu 1 12 0 0
Desmond Hayes c Binny b Madan Lal 13 33 2 0
Vivian Richards c Dev b Madan Lal 33 28 7 0
Clive Lloyd c Dev b Binny 8 17 1 0
Larry Gomes c Gawaskar b Madal Lal 5 16 0 0
Faoud Bacchus c Kirmani b Sandhu 8 25 0 0
Jeffery Dujon b Amarnath 25 73 0 1
Malcom Marshall c Gawaskar b Amarnath 18 51 0 0
Andy Roberts lbw b Dev 4 14 0 0
Joel Garner not out 5 19 0 0
Michael Holding lbw Amarnath 6 24 0 0

Extras (14) bye=0, lbyes=4, wides=10, noball=0

Total = 140 allout in 52 overs.. lost by 43 runs.

Bowlers :- Overs Mdns Runs Wickets Extras
Kapil Dev 11 4 21 1
Balvinder Sandhu 9 1 32 2
Madan Lal 12 2 31 3
Roger Binny 10 1 23 1
Mohinder Amarnath 7 0 12 3
Kirti Azad 3 0 12 0

जर १९८३ च्या संघातले खेळाडू आणि २०११ च्या संघातले खेळाडू यातले ११ निवडून एक संयुक्त संघ बनवायचा असेल तर तो असा असेल -

सलामीचे फलंदाज - वीरेंद्र सेहवाग, के श्रीकांत
मधली फळी - सचिन तेंडुलकर, संदीप पाटिल, सुरेश रैना
यष्टीरक्षक व कर्णधार - महेंद्रसिंग धोनी
अष्टपैलू - मोहिंदर अमरनाथ, युवराज सिंग, कपिल देव
गोलंदाज - झहीर खान, हरभजन सिंग

जागतिक क्रिकेटच्या इतिहासातला हा अजिंक्य संघ असेल !

सध्या क्रिकेटचे पूर्ण व्यावसायिकरण झालेले आहे. आयपीएल सारख्या जत्रेमध्ये तंत्रशुध्द फलंदाजांना फारसे स्थान राहिलेले नाही. वाटेल तशी बॅट फिरवा पण धावा करा या मागणीमुळे या नेत्रदीपक खेळाचे सौंदर्य हरवेल की काय अशी भीति वाटत आहे. भरपूर धावा करण्यासाठी केलेल्या पाटा खेळपट्ट्या गोलंदाजांच्या मुळावर आलेल्या आहेत.

पण तरीसुध्दा १९८३ व २०११ च्या विजयाने तमाम क्रिकेटवेड्यांना अपार आनंद दिलेला आहे. १९८३ ला कोणाच्या खिजगणीतही नसलेला भारत जगज्जेता झाला तर २०११ मधल्या विजयाने २००७ च्या स्पर्धेत झालेली मानहानी भरून निघाली.

- मास्तुरे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मास्तुरे, मस्त लिहिलाय लेख !
कपिल आणि धोनीची तुलना छान.. कपिल नेहमी भडकलेलाच आहे असं त्याच्या एकूण देहबोली, हालचालीतून वाटायचं.. कधी कधी त्याची आक्रमकता खूप आवडायची.. गांगुलीच्या आधी अरे ला कारे करणारा कोणी असेल तर तो कपिलच.. तर धोनी नेहेमीच अतिथंड असतो.. त्याची आक्रमकता त्याच्या देहबोलीतून न दिसता निर्णयांमधून दिसते...
बाकी सगळी तुलनाही छान..

अप्रतिम लिहिलय. मला नीट आठवत असेल तर १९८३ ला खेळाडूंच्या शर्टावर नावे लिहिलेली नसत
आणि दूरदर्शनवरचे प्रक्षेपणही गचाळ असे. क्लोज अप्स फारसे नसत, त्यामूळे गावस्कर उंचीमूळे, सिद्धू पगडीमूळे, किरमाणी टकलामूळे आणि संदीप पाटील दाढीमूळे ओळखावा लागत असे. त्या वयातली एक खट्याळ आठवण !

मास्तुरेजी, खूपच अभ्यासपुर्वक लिहीलेला छान लेख ! तुम्ही लिहीणार आहात हे माहीत असतं तर मी त्याच विषयाला हात घालण्याचा आगाऊपणा तरी केला नसता ! !

मास्तुरे,

मस्तच... एकदम अभ्यासपूर्ण... तसं पाहता १९८३ व २०११ मधिल तुलना करणे अवघड आहे पण तुम्ही ज्या प्रकारे तुलनात्मक विश्लेषण केले आहे ते बहुतांशी पटते.

मस्त छान लेख...
खर म्हणजे १९८३ आमचा जन्म सुद्धा नव्हता झाला.त्यामुळे तुमच्या लेखातुन त्या काळात फिरुन आलो.
धन्यवाद... Happy

मस्त लेख ! खूपच अभ्यासपूर्ण.
<< त्यामूळे गावस्कर उंचीमूळे, सिद्धू पगडीमूळे, किरमाणी टकलामूळे आणि संदीप पाटील दाढीमूळे ओळखावा लागत असे.>> दिनेशदा Lol

>>त्यामूळे गावस्कर उंचीमूळे, सिद्धू पगडीमूळे, किरमाणी टकलामूळे आणि संदीप पाटील दाढीमूळे ओळखावा लागत असे.>>

दिनेशदा,
अगदी.. Happy त्यातही लोचा म्हणजे जवळ जवळ सर्वच जण ती "पांढरी गोल" टोपी घालायचे त्यामूळे अजून घोळ व्हायचा. त्यातही शास्त्री आणि वेंगसरकर असे टोपी घालून आले की घोळ व्हायचा..

मला दोन संघातील एक प्रकर्षाने जाणवलेला फरक म्हणजे १९८३ मधील बहुतांशी खेळाडू चांगले ५-१/२ फूटापेक्षा जास्त ऊंच होते (सन्नीभाय, किरमाणी, मदनलाल, किर्ती बुटके होते). २०११ मध्ये बहुतांशी बुटकेच आहेत (युवी, युसूफ, मुनाफ, नेहरा, भज्जी हे ऊंच आहेत).
खेरीज पहिल्या दोन फोटो वरून विशेष करून दोन संघांतील अजून एक फरक लक्षात येतो:
१९८३- सज्जन, २०११- टपोरी Happy
बाकी आजवरच्या यच्चयावत भारतीय संघातील खालील दोन खेळाडू मात्र त्या एका "विशीष्ट अवयव" मूळे कधिही वेगळे लगेच ओळखता येतातः
एक फलंदाजीला ऊभा असताना, दुसरा गोलंदाजी करताना: दादा आणि बिन्नी Happy

>>> त्यामूळे गावस्कर उंचीमूळे, सिद्धू पगडीमूळे, किरमाणी टकलामूळे आणि संदीप पाटील दाढीमूळे ओळखावा लागत असे.

तुम्ही बलविंदर सिंग संधूच्या ऐवजी चुकून सिध्दूचे नाव लिहिले का? १९८३ च्या भारताच्या विश्वचषकाच्या संघामध्ये नवज्योतसिंग सिध्दू नव्हता. त्या स्पर्धेनंतर लगेचच विंडीजचा संघ भारतात आला होता. त्यांच्या एका स्थानिक संघाबरोबर झालेल्या सामन्यात सिध्दूने शतक केल्यामुळे त्याला एका कसोटी सामन्यात निवडले होते. त्यात त्याने फारसे काही केले नव्हते. त्यामुळे त्याला डच्चू मिळाल्यानंतर एकदम १९८७ च्या स्पर्धेच्या वेळी तो भारतीय संघात आला व नंतर जवळपास एक दशक तो संघात होता.

>>> बाकी आजवरच्या यच्चयावत भारतीय संघातील खालील दोन खेळाडू मात्र त्या एका "विशीष्ट अवयव" मूळे कधिही वेगळे लगेच ओळखता येतातः एक फलंदाजीला ऊभा असताना, दुसरा गोलंदाजी करताना: दादा आणि बिन्नी

अगदी! दोघेही लगेच ओळखू यायचे.

अजून लेख वाचायचाय पण,

१९८३- सज्जन, २०११- टपोरी स्मित

>>> योग, ह्यात खेळाडूंचं सरासरी वय, ८३ चा सामना इंग्लंड मध्ये (राणीच्या राज्यात) आणि २०११ चा मुंबईत ह्याही गोष्टींचा हातभार असावा .. Happy