होळी भाग २

Submitted by नितीनचंद्र on 23 April, 2011 - 23:58

http://www.maayboli.com/node/25235 होळी भाग १

बाजार पेठेत होळीची वर्गणी मागायला निघताच राज्या पुढ झाला. पण आता त्याच्या हातात हलगी नव्हती. केसांची झुलपे व उडवुन त्याने नीट केली कारण आता पहिल दुकान रज्जीच लागणार होत. रज्जी म्हणजे रजनी त्याच्याच वयाची. दोघेही दहावी एकदम पास झाले. दोन वर्षांपुर्वी राज्याने ११ वीला प्रवेश घेतला आणि रज्जीचा बाप म्हणतो आता काय करायच शिकुन ? १८ वर्षाची झाली की देतो बार उडवुन, तोवर बस दुकानात मला मदत कर. रज्जीच्या बाप म्हणजे रमणशेठ. त्याच किराणामालाच दुकान आहे. अनेक पिढ्यांपुर्वी मेहता, बुटाला, शेठ, तलाठी, गुजर या आडनावाचे गुजराथी महाराष्ट्राच्या काही भागात आले. काही कोकणात काही देशावर स्थिरावले. आपली मुळची भाषा विसरुन मराठी बोलु लागले. घरात मात्र चपात्या पोळ्या ऐवजी दशम्या, तीळ्कुटाची चटणी असे खास गुजराथी पदार्थ, व्यापारी वृत्ती आणि स्त्रियांच्या गुजराथी पध्दतीच्या साड्या या इतरापेक्षा वेगळेपणा दाखवणार्‍या छटा तेव्हड्या शिल्लक राहील्या होत्या.

रज्जी दुकानावरच होती. राज्याला पहाताच ती गोड हसली. "राज्या, तुझ सामान हसल रे" एका मुलान आवाज टाकला. मुलाच्या घोळक्यात साधारण ३-४ मोठी मुल होती ज्यांना ही नजरेची भाषा समजत होती आणि कोड मधे इशारे पण देता येत होते. राज्या पण मनापासुन खुलला. दोन्ही हात आडवे करुन त्याने सगळ्या मुलांना मागेच थोपवल आणि एकटाच रज्जीच्या दुकानाकडे गेला. मोठी मुल हसत होती.

"च्यायला ही रज्जी या राज्यावर येवढी का फ़िदा आहे ?" बबन्या बाब्याला विचारत होता. " घे ! हे मला रे काय माहित ? जा त्या उस्मान्याला विचार. चार पोरी फ़िरवल्यात. सगळ्याच्या सगळ्या आपल्या पोरी. एकही त्याच्या जातीची नाही. आपल्याकड पोरी बघतच नाही राव अजुन आपला सातबारा अजुन कोराच हाये बबन्या."

रज्जीच्या दुकानात शिरुन राज्यान तिचा बाप कुठ आहे ते नजरेने शोधल. "भाई दुकानात नाहीयेत." ती हसुन म्हणाली. "मला वाटल माझ्याकडे आलास तु" जा सांग आत जाऊन भाईंना मी आलोय म्हणाव". कशाला आलाय म्हणुन विचारल तर काय सांगु ? रज्जीला जरा त्याची मस्कारी करायची लहर आली. "

होळीला गवर्‍या पाहिजेत म्हणाव" " अस्स ? मला वाटल...... " काय वाटल तुझा हात मागयला आलो ? त्याला वेळ आहे. हा तोवर तुझ्या वडीलांनी दम काढला पाहिजे नाहीतर बघतील एखादा बनीयनवर दुकानदारी करणारा शेठजी".
हलगी वाजवण्यापेक्षा काय वाईट आहे दुकानदारी ? हनुवटीवर बोट ठेवत मधुबालाच्या स्टाईलमधे आपले मोठ्ठे डोळे उघडझाप करत रज्जी म्हणाली.

अस्स ? मग नको कोण म्हणतय ? हसत हसत राज्या तिला म्हणाला.

"जरा भेट की जरा निवांत एकदा मग ठरव शेटजी का भटजी."

राज्याने लाकडी फ़ळ्यांचे दरवाजे असलेल्या दुकानात जिथे मधोमध बीजागरीच्या फ़ळ्या एकत्र होऊन आडोसा तयार होतो अशी जागा निवडुन रज्जीशी संवाद साधला होता. रमणशेठ दुकानाच्या मागच्या बाजुला असलेल्या घरात गेले होतो. रज्जी ज्या प्रमाणे खुलुन बोलत होती त्यावरुन तरी ते यायला वेळ लागणार होता. ही संधी घ्यायला योग्य जागा सापडली होती कारण दुकान रस्त्यावर होत तरी मुलांना आत काय चाललय ते दिसत नव्हत.

च्यायला हा राज्या काय करतोय ? मुका घेतो का काय तीचा ?"हे राज्या चल लवकर" पोरांनी आवाज दिला.

हे घे वर्गणी म्हणुन रज्जीन रुपया गल्ल्यातुन काढुन दिला.तो रुपया घेताना रज्जीचा हात राज्याने धरुन ठेवला. रज्जीला पण हात सोडवायची घाई दिसत नव्हती.

भाईंना न विचारता रुपया दिलास ? हिशोब नाही लागला तर झोप येणार नाही त्यांना. राज्या हसत म्हणाला.
" आपण सगळ्याच गोष्टी जणु भाईंना विचारुन करतो ?" रज्जीचा इशारा राज्याच्या हाताकडे होता.
अस्स ! मग पळवुनच नेतो तुला. जर मी तुला पळवली तर भाईंना कायमचा निद्रानाश होईल.

"तोंड बघ आरशात स्वत:च, म्हणे पळवणार".
जरा थांब, शिक्षण संपवुन नोकरी लागली म्हणजे पळवतोच तुला.

ए चल की रे राज्या. पोरांचा पुन्हा आवाज आला.

पोरांचा आरडा ओरडा ऐकुन राज्याने "चल येतो, भेट लवकर नेहमीच्या ठिकाणी" म्हणुन तीला डोळा मारला.

राज्याला निरोप देताना रज्जी पुन्हा गालातल्या गालात हसली.

राज्या दुकानाच्या बाहेर आला तसा त्याचा हसरा चेहरा बघुन उस्मान्या म्हणाला "सेटींग लागल काय रे राज्या" गप रे उस्मान्या, राज्याने त्याला दटावले. बबन्या वाजवरे हलगी उस्मान्याने आवाज दिला आणि पोर पुढच्या दुकानात गेली. गंध लावलेला छ्बुशेठ गल्ल्यावर बसला होता. छ्बुशेठच कपड्याच दुकान होत. त्याच्या दुकानाच्या दरवाज्यात पुन्हा एकदा हलगी घुमली आणि पाठोपाठ "व्हळीला गवर्‍या , पाच पाच" चा आवाज घुमला.
" ए पोरांनो, गवर्‍या नाहीत आमच्याकडे," खाली सरकलेला चष्मा न सावरत छ्बुशेठ म्हणाला.
"गवर्‍या नाहीत तर रुपया वरगणी द्या" बाब्याने आवाज दिला.
" तुम्हाला गवर्‍या द्या वर्गणी द्या वरुन तुम्ही चोर्‍या पण करणार.
" कुणी केली चोरी शेठ ?" उस्मान्याने जरा जोरात विचारले.
"चार वर्षामाग मागच्या दारान घुसुन आमच्या संडासाची दार होळीच्या रात्री पळवली".
" आम्ही लहान होतो तेव्हा छ्बुशेठ, ही असली काम मोठी माणस करायची."राज्याने जरा समजुतीच्या भाषेत बोलायला सुरवात केली तोच "कोण्च्या संडासाची दार पळवली जरा दाखवा" इतका वेळ गप्प असलेला गोविंदा बोलला.
"कशाला परत तेच करायला ? त्यापेक्शा घरी जा आणी तुझ्या वडीलांना म्हणाव थकलेली उधारी द्या." गोविंदाला सर्व मुलांच्या देखत हा घाव वर्मी बसला. " काय शेठ आम्ही होळी च्या गवर्‍या मागायला आलो आणि तुम्ही उधारी काढली त्यांची " राज्या पुन्हा नरमाईच्या सुरात बोलला.

"शेठ नसल द्यायची वरगणी तर तस सांगा. बघुन घेऊ" बाब्याने आवाज दिला.
"काय रे काय करणार? मागच्या होळीला संडासचा दरवाजा नवीन करायला हनु सुताराला बारा रुपये लागले. तरी लाकडाच्या फ़ळ्या घरच्या होत्या म्हणुन त्याचे पैसे नाही लागले. कोण देणार हे पैसे. ?"

"चला रे जाउ द्या रे, जास्त बोंबाबोंब नको नाहीतर पुढचा शेठ नाट लावायचा" राज्याने आवाज देताचा पुन्हा हलगी घुमली आणि आता छ्बुशेठ न म्हणता "छब्याचा बैलाला" म्हणुन एकाने आवाज दिला. " घोSSSS" चा प्रतिसाद घुमला आणि मुल पुढे सरकली.

संध्याकाळचे सात वाजले उद्या होळी होती. साधारण हजार गवर्‍या जमल्या होत्या. वर तीनशेच्या आसपास रुपये जमले होते. "चला रे बास झाल. आता घरी जाऊन जेवा आणि या होळीच्या जाग्यावर. रात्री गवर्‍या नीट रचुन ठेऊ नाहीतर होळीच्याच गवर्‍या कोणी ढापल्या तर समजणार नाही.
राज्या अन झाड कधी तोडायची ? एका लहान मुलाने विचारले ? उद्या होळी पेटल्यावर.

व्हुई आवाज देत लहान मुल पळाली. "च्यायला राज्या, ह्या वसंताभाऊ ने आपल्याला गवर्‍या- वरगणीच्या कामाला लावल. हजार गवर्‍या तर जमल्या अजुन शंभर रुपयाला पाचशे गवर्‍या मिळतील. मग उरलेल्या दोनशे च काय करायच ? सगळ्या पोरांनी नेवाळ्याची मिसळ पाव डब्बल हाणला तरी दिडशे रुपये राहतील."
समजा वाळलेली झाड नाही मिळाली तर वखारीतुन ओंडके आणु दोन चार, ते काय फ़ुकट येणारेत ? राज्याने सर्वांना विचारले.

"झाड मिळणार नाहीत ? अस कस होईल ? संस्थानचा मळा उद्या सकाळी पालथा घालु आणि वाळलेली, वीज पडलेली झाड हेरुन ठेऊ. कुर्‍हाडी मात्र सकाळीच धार लाऊन ठेवा. रात्री अंधारात धार काढता येत नाही. अन नाहीच झाड मिळाली तर छ्बुशेठच्या संडासाची दार आहेतच की. टाळीला हात पुढे करत गोविंदा म्हणाला. त्याच्यायला त्याच्या. ये म्हणाव होळीला निवद दाखवायला. चांगली बोंब मारु त्याच्या नावान.

"जाउ द्या रे, दोन चार लोक भेटायचे असे. त्याच काय येवढ." राज्या म्हणाला.
"बर राज्या हे पैसे तुझ्याकड ठेव उस्मान्या म्हणाला. माझ्या बाच्या हाती लागले म्हणजे त्याच्या बा आला तरी मिळणार नाहीत."
उस्मान्याने मोजुन तीनशे आठ रुपये मोजुन राज्याच्या हाती ठेवले. बर वसंताभाऊने विचारल तर १२५ रुपये सांगायचे बर कारे राज्या. नाहीतर सांगशील खर आणि तोच पैसे खाउन बसल. आपण ठरवु काय करायच उरलेल्या पैशाच. राज्याने पैसे जवळच्या दुकानातुन बंदे करुन घेतले आणि व्यवस्थीत ठेवले.

मोठी मुल पांगली आणि आपल्या घरी गेली. रात्री जागुन होळीच्या गवर्‍याची राखण करायला परत आपपला बिछाना घेऊन उस्मान्या, राज्या, बाब्या, बबन्या आणि दिल्या जमले. भैरवनाथाच मंदिर आणि चांगला बांधलेला दगडी चौकोनी पार याच्या मधे होळीची पारंपारिक जागा होती. दगडी चौकोनी पार हा अनेक पिढ्यांचा होता. तो कोणी बांधला याच्या उल्लेख कुठच नव्हता. होळीच्या दरवर्षीच्या जागेवर लहान मुले गवर्‍या रचत होती. मधे थोडिशी जागा सोडुन त्याच्या बाजुला गोल गोल रचना चालली होती. मधेच उरलेल्या गवर्‍या पाहुन मोठी मुले गवरीचा आणखी एक गोल बाहेरच्या बाजुला वाढवायच्या सुचना देत होते.

साधारण रात्री दहाला एक हजाराच्या आसपास गवर्‍या रचुन झाल्या उरलेल्या पाचशे उद्या लावायच्या ठरल्या. लहान मुल आपापल्या घरी निघुन गेली. साडे दहाला दगडी पारावर फ़क्त ही पाच मोठी मुल आणि आजुबाजुला भटकी कुत्री इतकीच राहीली. "काय रे दिल्या आणली का शिग्रेट ?" बाब्याने विचारले.
"ए बाब्या ही शेवटची. माझ्या बाला जर कळल तर शिग्रेट पेटवुन खाली लावल. अर मग लेका त्यात काय येव्हड ? अर दोस्ता साठी येक शिग्रेट नाय ढापु शकत ? माझ्या बाच पानाच दुकान असत तर अख्ख पाकिट मारल असत.
"बर बर मार दम. सेकंड शिफ़्टची माणस घरला परत यायच्या आधी काम उरक. दिल्याने बाब्याच्या हातात एक सिगारेट असलेल पाकीट आणि एकच काडी असलेली काड्याची पेटी दिली.

हा दिल्या याच्या बापासारखा निघाला. वरुन पाकिट ब्रिस्टॉलच अन आत चारमिनार. काड्याच्या पेटित एकच काडी अन नाई पेटली एका काडीत तर रे ? दुकानात माल भरला आहे हे गिराईकाला दिसाव म्हणुन या दिल्याच्या बापान जी पाकिट दुकानात रचलीत त्यातली निम्मी रिकामी. त्याच्या जोकवर सगळी पोर हसली. दिल्या हिरमुसला. बाब्याला अजुन जोर चढला.

दिल्याचा बा याच्या आईलापण रोज एकच काडी देतो स्टो पेटवायला. मागच्या जल्मी मारवाडी व्हता का काय म्हनायच तुझा बा ? आता मात्र दिल्या पिसाळला.
ए बाब्या, तु लई झागीरदार हैस का ? मंग ही शिग्रेट मला कशाला मागतोस ती बी फ़ुकटची ? कंदि मिसळ खायला घातली रे भाड्या ?

उस्मान्याला पण कश मारायचा होता. त्याने बाब्याच्या हातुन शिग्रेट घेतली तोंडात धरली, पेटी घेऊन काडी घासली पण पुर्ण पेटायच्या आधीच काडी विझली. तोंडातली शिग्रेट सिगारेट उस्मान्याने काढली तवर दिल्या शांत झाला होता.

कधी नवत आलेला शिग्रेट ओढायचा चान्स हातचा जाणार म्हणल्यावर बाब्या उस्मान्यावर चिडला.

याला म्ह्णणतात आधीच उपाशी अन त्यात झाली काशी.

चोरीचा मामला आहे जरा हळु बोंबला राज्याने सगळ्यांना आठवण करुन दिली. ए बाब्या समोर मारुतीच्या देवळात दिवा दिसतो बघ पेटलेला. जा तिथ जा अन आण पेटवुन सिगारेट. बबन्याने आयडीया काढली.

लई शाना हैस. आता ही शिग्रेट घेऊन मारुतीच्या मंदीरात जाऊ म्हंतोस ? अन ही काडी दिव्यावर धरुन पेटवु म्हणतोस ? तुझ्या मायला अन कुणी पायल मग रे ? बाब्याला ही आयडीया पसंत नाही पडली.

काय रे काय करता हिथ ? अचानक गल्लीतला रामराव सायकलवरुन पुढ आला आणि मुलांना पाहुन थबकला.
"काई नाई काई नाही ह्या होळीच्या गवर्याची राखण करतोय." सिगारेट पेटीची लपवा लपव करत उस्मान्या बोलला. बर बर अस म्हणत रामरावाने सायकलच्या पायडलवर जोर देणार तवर उस्मान्या म्हणाला " रामराव तुमच्या पेटीतल्या चार काड्या द्या ना ? रामराम बीड्या ओढतो हे सगळ्या गावला माहित होत. सगळी पोर अचानक उस्मान्याने रामरावच्या पेटीतल्या काड्या मागीतल्यावर गारठली.

कशाला रे ? शिग्रेटी ओढायला ? नाही नाही रामराव. सकाळी गारवा पडतो. दोन गवर्‍या पेटवल्या की उब येते.

उस्मान्याने दिनवाणा चेहरा करुन रामरावांकडे पाहिल. उस्मान्या पक्का कलाकार. त्याच्या तोंडाकडे पाहिल्यावर तो थापा हानतो हे त्याच्या बापाला कधी समजल नाही.

रामरावान त्याच्या जवळच्या काड्यापेटितल्या चार काड्या दिल्या आणि रामराव गेला.

बाब्या रामराव दिसेनासा व्हायची वाट पहात होता. जसा तो गेला तवर उस्मान्याने पहिला कश मारला. शिग्रेट बाब्याच्या हातात देऊन उस्मान्या म्हणाला "राज्या, त्या खानदेशी पोरांना म्हनालास घोटा पाजु त्याच रे कस करायच ? त्याच्यात काय आहे, सगळा माल त्यांच्याच खोलीवर पोचवायचा आणि त्यांनाच बनवायला लावायचा घॊटा." च्यायला, चार लीटर दुध, चार केळी, बदाम, खसखस आणी बुटी सगळा माल धा रुपयाचा होतो का वीस रुपयाचा हे काय ठाव नाय. अन ती खानदेशी पोर वर्गणी देणार धाच रुपड. मग आपल्याला काय रे फ़ायदा ? वरुन आपले व्हळीचे पैसे जानार तिकड.

"मग आपण काय घोटा पिल्याशिवाय रहाणार का ? बाब्याने विचारले. पण एक काम करायच, तांब्याचा पैसा लावायच्या आधी आपण घोटा लावायचा. अस म्हणत्यात तांब्यांचा पैसा उगाळुन घोट्याला लावला की नशा दोन दोन दिवस राहती. या व्हळीला काय काय नाटक व्हणार कुणाला ठाव. त्याच्यात ही घोट्याची नश्या लै बैक्कार नशा. नसती बोंब व्हायची आपल्या नावान.

तु घोटा पिणार कारे राज्या ? राज्याकडे वळुन कश मारत बाब्या म्हणाला. त्याच्यात काय वशाट असतय ? काय रे राज्या ? बबन्या म्हणाला. अन जणु काय हा बामण सोवळा राहिलाय ? दिल्या म्हणाला. बाळ्याच्या घरी मांडी घालुन रस्सा ओरपताना मी पाहिलाय याला.

राज्या गालात हसत म्हणाला "तुमच्या बाच काय जातय?" आता तुमच्या बरोबर राह्यच म्हणजे तुमी खाल ते खायला नको ? हे बाकी खर गड्या. या बामण आळीत या राज्याला एक बामण मित्र नाही. दिल्या म्हणाला.

ए संपली का तुझी कांडी. चला गुमान झोपारे. उस्मान्या जांभई देत म्हणाला. या उस्मान्याची झोपायची घाई अन सकाळी उठायची पण घाई.
सकाळी संस्थान वाड्यात नगारा वाजवायला जायला लागत . आमच्या आज्या- पणज्यान मरताना येव्हडीच झागीर ठेवली हाये. तुमी झोपा कवा बी म्हणुन उस्मान्याने हथरायाची गोधडी काढली. जरा सारखी करुन वर पांघरायची गोधडी ओढुन तो आडवा झाला. बघता बघता एकेक आडवे झाले.

राज्याला मात्र बराच वेळ झोप लागत नव्हती. आज चेष्टा करताना रज्जी जे बोलली ते काही त्याच्या डोक्यातुन जात नव्हत. खरच जर भाईंनी रज्जीच लग्न दुसर्‍या कुणाबरोबर लावल तर या कल्पनेन त्याचा जीव हैराण झाला. बारावीची परिक्षा नुकतीच आटोपली होती. वय १८ व्हायला अजुन सहा महिने होते. हे काय आपल्या लग्नाच वय आहे ? रज्जी अजुन दोन चार वर्षांनी लहान असायला पाहिजे होती. केवळ तिच्या लग्न लागाव म्हणुन आत्तापासुन नोकरी करावी?. बारावीच्या शिक्षणावर नोकरी तरी काय मिळणार? आणि बी.कॉम करायच मनात आहे त्याच काय. विचार करता करता राज्याला कधी झोप लागली कळलच नाही.

क्रमशः

गुलमोहर: 

दोन्ही भाग एकत्रित वाचले...कथा ओघवती आहे, आवड्ली.
काही किरकोळ शब्दचुकाही आहेत पण नगण्य.

चातक,

धन्यवाद, चुका दाखवयला हरकत नाही. कथा लिहुन झाली की संपादनाला लागणारा पेशन्स रहात नाही. त्यातही ही कथा मधे मधे निवेदकाच्या हातात जाते तेव्हा मलाही प्रश्न पडतात की आता ग्रामीण मराठी लिहु की नागरी. माझ्या मागील काही कथा सुमोनिष आणि नुतन ने सुचना करुन त्या सुधारल्या आहेत. मला त्यात वाईट वाटत नाही.

केसांची झुलपे व उडवुन त्याने नीट केली>> केसांची झुलपे वर उडवुन त्याने नीट केली

रामराम बीड्या ओढतो हे सगळ्या गावला माहित होत.>> 'रामराव' बीड्या ओढतो हे सगळ्या गावला माहित होत.

वाटल >> वाटलं
अस कस होईल ?>> असं कसं
त्याच काय येवढ." >> त्याचं काय येवढं. असे अनेक शब्द ज्यांत शेवटच्या शब्दावर 'टिंब' आलाच पाहीजे. (वाचताना अडगळल्या सारखे होते.)

माझ्याही लिखाणात भरपुर चुका असु शकतात(होतातच) मी काही लेखक नाही पण..,
आपली शिकाउ वृत्ती आवडली. Happy

धन्यवाद!

नितिनचंद्र, छान ओघ अहे कथेला. तुमची शैलीही आवडली.
त्या काही व्याकरणाच्या चुका वगैरे बघणार का? अजूनही संपादन करू शकता. इतक्या सुंदर कथेला तितकही गालबोट राहू नये असं वाटतय.