वारीचं आकर्षण तसं खुप लहानपणापासूनच होतं. वारीसोबत पंढरीला जाऊन आलेल्या तरण्या-ताठ्यांच्या फुशारक्या अन म्हातार्या-कोतार्यांचे 'अगा मी ब्रम्ह पाहिले' च्या थाटातल्या गप्पा अगदी गुंगवून टाकायच्या. आजच्या तुलनेत दळणवळणाची साधने तेव्हा थोडी कमी असल्यामुळे अंतराचंही अप्रुपच. ही लोकं इतक्या दुर पायी जाऊन काय मिळवत असतील, असं वाटून जायचं. मग कधीतरी दोन-तीन आज्ज्यांचा शेवट वारीच्या वाटेवर झाला, अन त्यांना गावात जवळजवळ देवस्थान मिळालं, तेव्हा लक्षात आलं, की हे एवढं सोपं प्रकरण नाहीये. वारीच्या भोवती मनात असं विशिष्ठ वलय तयार झालं- ते असं न-कळत्या वयातच.
शाळेच्या पुस्तकांतून हळूहळू ज्ञानेश्वर-तुकाराम कळू लागला. विठ्ठल हे महाराष्ट्राचं आद्य दैवत असल्याचंही मग समजलं. पण ते तिथंपर्यंतच. विठ्ठलाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला तो थेट नोकरीतल्या कामाच्या निमित्ताने पंढरपूर जवळील एका कारखान्यात जावं लागलं, तेव्हा विठ्ठलाचं दर्शनही उरकून घेतलं. कोणत्याही देवाचा मी काही फार मोठा भक्त नव्हे, पण नास्तिक मुळीच नाही. ज्या अगम्य ओढीमुळे वारकरी २-३ आठवडे पायी चालत जातात, त्यामुळे 'पायी वारी' चं आकर्षण राहिलं ते राहिलंच. त्यानंतर दरवर्षी वारी आली, गेली अन 'पायी-वारी' करण्याचं राहून गेल्याची खंत वाटत राहिली.
या वर्षी मात्र कुठल्याही परिस्थितीत सासवड पर्यंत तरी जायचंच, असं ठरवलं. आपला स्वतःचाच निश्चय मोडू नये म्हणून इतर चौघांना आठ दिवस आधीच तयार केलं. आठवडाभर रोज त्यांना फोन करताना मलाच 'जायचंय' हे बजावत राहिलो..! कारण २-४ मैल वगैरे ठीक. पण २५-३० किमी पायी चालायचा प्रयोग अजून तरी केला नव्हता. मी अगदीच 'पाप्याचं पितर' नसलो, तरी माझ्या एकंदर शारिरिक क्षमतेकडे बघून आमचे मित्र या आठ दिवसात 'हम्म..' करीत माना डोलावत होते, त्यामुळे हे प्रकरण शेवटास नेण्याची नैतिक जबाबदारी आपसूकच अंगावर येऊन पडली होती. कार्यक्रमाचे 'प्रोमो' आठेक दिवस आधीच केल्यामुळे परतीचे दोर कापल्यात जमा होते, हे एक बरंच झालं म्हणायचं..!
रविवार उजाडला, अन स्वारगेटला सकाळी ७ वाजता एकत्र भेटल्यावर आम्ही 'पुंडलिक वरदे' चा गजर केला, एक अनामिक उत्साहात चालायला सुरूवात केली..
***
पायी चालण्यासाठी डावी बाजू, निरनिराळ्या वार्यांसोबतचे ट्र्क्स-टेंपो अन इतर वाहने यांना उजवी बाजू अशी व्यवस्था होती. सकाळचा ताजा दम सगळ्यांत होता, त्यामुळे नामा-तुका-माऊलीचा गजर अन अभंग जोरात सुरू झाले. रस्त्याच्या कडेला सोय होईल तिथं अजूनही मंडळी आंघोळ वगैरे करताना दिसत होती. गावोगावच्या वार्यांनी पुण्यात ठिकठिकाणी मांडलेले मुक्काम आवरून मुख्य रस्त्याला येऊन मिळायला सुरूवात केल्यामुळे गर्दी वाढू लागली. दुरपर्यंत पांढर्या टोप्या अन भगवे ध्वज यांचं मनोहारी दृष्य दिसायला लागलं. कित्येक वेळा गाडीने पार केलेला गाडीतळापर्यंतचा हा रस्ता पायी जाताना अनेक आजपर्यंत न दिसलेल्या गोष्टी दिसल्या, अन त्याचंही नवल वटत राहिलं. दैनंदिन कामात असताना आपण आजूबाजूचं निरीक्षण करण्याची शक्तीही गमावून बसतो- याची खंत वाटून गेली.
गाडीतळापर्यंत येईस्तोवर साडेआठ झाले होते. इथून उजवीकडे वळल्यावर इतर गाड्यांची गर्दी कमी होऊन फक्त वारीसोबतच्या गाड्या राहिल्या. ९ किमी उत्साहात चालल्यावर आता तो थोडासा मावळला होता. पुढे फुरसूंगी समोर दिसू लागल्यावर कळलं- आपलं ओढून-ताणून आणलेलं चंद्रबळही संपलंय; इथून पुढे आता परीक्षा!
एकमेकांच्या तोंडांकडे पाहिल्यावर 'दिल की बात लबपे' झालं अन खाण्यापिण्यासाठी एका हॉटेलात बस्तान मांडल्यावर स्वर्गीय आनंद झाला.
***
प्रत्येक वारीसोबत एक गाडी. म्हणजे 'केअरटेकर'च म्हणा की. यात सगळं मुक्कामाचं सामान. तंबू, लग्नकार्यात बघतो तशी मोठी स्वयंपाकाची-जेवण्याची भांडी, वारकर्यांची अंथरुणं-पांघरुणं अन जास्तीचं सामान, पाण्याची भांडी, वाद्य, ध्वज, पताका, भाजीपाला, दुखापती अन आजाराचं उपचारसाहित्य अन बरंच काय काय. वारीची काळजीवाहू मंडळी याच ट्र्कमध्ये. म्हणजे असं, की पुढल्या मुक्कमाच्या ठि़काणी हे आधी पोचणार. सर्वांचे तंबू लावणार. पाण्याची, स्वयंपाकाची तयारी (अन स्वयंपाकही) वगैरे व्यवस्था करणार. वारीला विशिष्ठ ठिकाणी आमंत्रण असेल तर आधीच जाऊन को-ऑर्डिनेट करून आपले लोक वाट चुकणार नाहीत, हे बघणार. यात अडचणी आल्या, तर वारकरी मुक्कामास येण्याच्या आतच त्या सोडवायचं आव्हान. तंबू उभारण्यात अडचणी, हत्यारं न मिळणं, पाणी दुरवरून आणायला लागणं, नेहमीचीची मुक्कामाची जागा घाण किंवा राड्या-रोड्यामुळे उंचसखल झालेली असणं किंवा काही तर कल्पनाच न करता येण्यासारख्या अशा अडचणी.
त्यामुळे पायी चालणार्यांजवळ अगदी मोजकं सामान. त्यातूनही एखादी खमकी म्हातारी स्वतःचं जास्तीत जास्त सामान 'गठुड्यात' बांधून, ते पाठीवर अन डोक्यावर आलटून पालटून पेलत अटीतटीने चालत असलेली दिसायची. काही गावांतनं मोजकीच मंडळी निघाल्यामुळे किंवा स्वतंत्र गाडी न परवडल्यामुळे असंच काहीतरी करताना किंवा नजीकच्या गाववाल्यांबरोबर 'टाय्-अप' करून चाललेली. अनेक बायांच्या डोक्यावर तुळशी. म्हणजे अगदी वृंदावनासकट. कपड्याची 'चुंबळ' डोक्यावर अन त्यावर हे वृंदावन हात न लावता झपझप चाललं तरी अजिबात हलणार नाही अशी व्यवस्था. काहींचं पिढ्यानपिढ्यांचं तांब्या-पितळाचं. इतरांची मातीची. एका बयेला थांबवून विचारल्यावर 'इट्टलाच्या गळ्यात तुळशीची माळ आस्ती न्हवं का.. हे डोक्यावर घेऊन जायला मिळणं हा मानच म्हणायचा बाबा!' अशी माहिती मिळाली.
रस्त्यात गाणी, अभंग अन भजनांसोबत इतर करमणूकही. एक म्हातारा कडेला 'वाईच' थांबून विठ्ठल शिंदेच्या एका गाण्यावर अगदी बारीक ताल धरून, कंबर नाजूकपणे हलवत नाचत असलेला. सर्वांकडून दाद मिळत असल्यामुळे आणखीच फॉर्मात आलेला. एक चक्क विठ्ठलाचा मुखवटा तोंडावर घेऊन कंबरेवर हात ठेऊन 'विटेवरी' उभा. लोक त्याला चक्क नमस्कारही करत होते. एकीनं वडाची पारंबी पकडून भलेमोठे झोकेच चालू केलेले. एक तरणाताठा एखाद्या दाढीमिशांवाल्या मुनीसारख्या दिसणार्या एका वडाच्या पारंब्या पकडून सरसर वर जाऊन तिथनं सर्वांना नमस्कार करतोय. आम्ही थोडा प्रयत्न केला, पण पोटाला कळ लागली, अन हातही सोलले. काही ठिकाणी फुगडी रंगात आलेली. आवाजाचं वरदान लाभलेल्या मंडळीची गाणी जोरदार रंगात आलेली.
फुरसूंगीपासनं अन्न अन इतर साहित्य कडेला उभ्या केलेल्या गाड्यांमधून मोफत वाटप चालू झालं. यात साबूदाण्याची खिचडी, वरीचा शिरा, राजगिर्याचे लाडू-वड्या, केळी, दाण्याची चिक्की, चहा असे अनेक पदार्थ; शिवाय प्लास्टिक पॅकिंगच्या कागदापासून बनवलेले पावसात पुर्ण अंग झाकू शकतील असे टोपडे, पायांना लावण्याची ऑइंटमेंट्स-तेले, आय्-ड्रॉप्स, अभंगांची पुस्तकं असं बरंच काही. काही ठिकाणी रांगही. हे सर्व मोफत वाटत असलेल्या व्यक्ती-संस्थेचा त्या-त्या ठिकाणी बोर्ड, बॅनर, जाहिरात इ.
आम्ही खायचं वाटताहेत, तेही कसंय बघू म्हणून घेतलं तर ते खरोखर चांगलं होतं. एका ठिकाणी विकत घेतलेला चहा अगदीच गचाळ निघाला म्हणून वाटपातला घेतला, तर त्यात चक्क आलं, सुठ, इलायची वगैरे. जणू नफा कमवायचाच नाही असं एकदा ठरल्यावर आपल्या दानतीत येणारी चव बहूधा त्या चहात उतरली होती..!
***
'आजी, दरवर्षी येता काय वारीला?'
'गेल्या दोन सालांपास्नं. म्हातारा चुकवीत नव्हता. तो गेल्यानंतर कुणीतरी करायला नको? होतंय तोवर जायचं. वारीतच म्हातार्यापाशी जायला मिळालं तर भाग्य.'
'तुमच्या घरातनं फक्त तुम्हीच?'
'कामाची माणसं कशी येणार बाबा? थोरल्यावरच सारं शेतीचं हाय. पाऊस पडला नाही, पण वाट बाघायची. आहे तेवढ्या जमिनीत कायतरी टाकलं, तरच सालभर घर खाईल. धाकला सोसायटीत नोकरीला. दोनी बायांना पण पोरांकडे पाहायला लागतंय. मलाच एक काम नाही. घरात आतबाहेर करन्यापरास हे बरं ..'
***
'दादा, कशीय खिचडी?'
'झकास. असलं खायला देणं पुण्याचं काम.'
'एकादशी नेहमी करता काय?'
'करतो. पण असलं काही खायला मिळत नाही. अनेक उपास घडतात. त्यातलाच एक एकादशीचा समजावा.'
'घरी शेती-भाती नाही वाटतं?'
'अर्ध्या-एक एकर कोरड जिमिनीवर आठ-दहा पोटं कशी भरणार बाबा? गरिबी पाचवीलाच आमच्या. महिना-महिना बंदा रूपया बघायला मिळत नाही. हे बरं. विठ्ठल भेटतोय. त्याशिवाय आख्ख्या वर्सात खाल्लं नसंल, इतकं चांगलं खायला मिळतंय. गावोगावी मान हुतोय. पुन्यासारख्या मोठ्या शारात कोण आणंल आमाला? पण आता येतो. झाक गाणी-अभंग गात दोन दिवस राहतो. पाहूणचार मिळतो. सालभरातनं एवढंच आमचं फिरणं. पण लई बरं वाटतं'
***
'मावशी, कोण गाव?'
'बारामतीजवळ, भाऊ'
'कोण आणि सोबत?'
'म्हातारा अन माजा मोठा हाय सोबत. बाकीची गावातली'
'सुन नाही आली?'
मावशीनं तोंडाचा पट्टा चालू केला. घरात कशी सुखानं खाऊ देत नाही, ते बैजवार सांगू लागली. असली सुन असल्यापरीस नसलेली बरी, हे सांगितलं. नातवंडं कशी खा-खा करतात अन घरात सळो की पळो करून सोडतात, मुलगा चांगलाय, पण 'हिनं' भरवलं, की 'फिरतोय' हेही सांगून झालं.
मावशीचा आवाज वाढला, तसा तिचा लेक जवळ येऊन गुरकावला, तशी मावशी खाली आली, पण कुरबूर चालूच. मग तो आमच्याकडे मारक्या नजरेने पाहत तिच्यावर खेकसला, तशी आम्ही तोंडं लपवली..
***
'नमस्कार, गुरूजी. कुठनं आलाय?' प्राथमिक शाळेचा मास्तर असावा, हा आमचा अंदाज अगदी खरा निघाला. यवतमाळजवळच्या कुठल्या छोट्या वाडीहून आलेला.
'विठ्ठलावर फारच भक्ती दिसतेय..' पाढरा स्वच्छ नेहरू शर्ट-पायजमा, गळ्यात टाळ, कपाळावर बुक्का, अष्टगंध अन चंदनाने बनविलेला 'यु' आकाराचा टिळा, हातात भगवा झेंडा- अशा खास 'वैष्णव-ड्रेस-कोड' मध्ये तो होता.
'हो. ती तर आहेच. विठ्ठलच आमचा कर्ता-धर्ता. पण यानिमित्ताने जरा बाहेर पडतो. चार गावं बघायला मिळतात. चार डोक्यांचे विचार ऐकायला मिळतात. माझी जिथं बदली आहे, ती एक ओसाडवाडीच आहे. भयानक दारिद्र्यातही ती लोकं अंगावर काटा येईल इतक्या शांतपणे जगतात. वर्षानुवर्षे तिथं काहीच घडत नाहीत. अगदी एकमेकांसारखे दिवस जातात. करमणूक काही नाही. बसून धड बोलावं असा सुरता माणूस नाही. संध्याकाळी सहा वाजता जेवणं अन सातला गाव चिडीचूप होतं. कधी हे गाव अक्षरशः खायला उठतं. त्यामुळे ही वारी म्हणजे आम्हाला सण-समारंभांसारखीच वाटते..'
मास्तर आणखी बरंच काय-काय बोलत होता. विठ्ठलनामाच्या जयघोषाच्या पार्श्वभुमीवर ते ऐकत पायाखालची वाट कशी सरतेय, ते कळत नव्हतं..
***
एव्हाना पावसानं आपलं काम चालू केले होतं, अन अजून दिवेघाट दुरच दिसत होता. मनाशी हिशेब केला-घाट दोन-तीन किमी तरी अजून दिसतोय. घाटाची लांबी चार-पाच किमी, अन घाट चढल्यावर सासवड नऊ किमी! सगळे एकमेकांकडे बघत कसंनुसं हसत होते, पण खरं तर पाय प्रचंड दुखायला लागले होते- म्हणजे पायात कोणत्या ठिकाणी स्नायू आहेत, कुठे हाडे, अन ती कुठे एकमेकांना जोडली आहेत- हे अगदी लख्ख कळत होतं. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अजून खुप मागे होती, अन संबंध दिवस अजून हातात होता, त्यामुळे कळ सोसेनाशी झाली की टेका थोडावेळ- हा प्रकार चालू झाला. बाजूला नाचत-गात जाणारी म्हातारी-कोतारी बघितली, की लाज वाटे अन थकवा झटकून पुन्हा सारे चालू लागत.
घाट चालू झाला अन सोबत पावसाचा लपाछपीचा खेळही. पण आता पश्चात्तापही वाटायला लागला- बुट घालून आल्याचा. पायाची बोटे एकमेकांना घासली जाऊन असा त्रास चालू झाला की पाय ठणकणे परवडले, असं वाटू लागलं! शेवटी बुट-सॉक्स काढून सरळ हातात घेऊन चालायला लागलो, तेव्हा बरं वाटलं. पायाला खडे टोचत होते, पण मघाच्या त्रासापेक्षा परवडलं.
पुन्हा चहा प्याल्यावर थोडा उत्साह आला अन एक दिंडीत प्रवेश करून सरळ नाचायलाच सर्वांनी चालू केलं. एकाच्या गळ्यातले टाळ, एकाचा झेंडा, अन एक छोटी ढोलकी असं सगळं मिळवलं अन दिंडीच्या पुढेच सर्वांनी गजर चालू केला. वारकरी लोकही कौतूकाने बघू लागले. एका बाजूला डोंगर, दुसर्या बाजूला दरी, मध्ये रस्त्यावर सगळे एकाच दिशेने शिस्तीत जाताहेत, हे दॄष्य भारून टाकणारं होतं. टाळ, झेंडा वगैरे आलटून पालटून एकमेकांच्या हातात देत आम्ही पुढे जात होतो. शेवटी आमच्यातल्या एकाने टाळाचा कब्जा घेतला अन आमच्याकडे फिरूनही न बघता नाचत-नाचत तो जो निघाला, तो पार दिसेनासा होईपर्यंत. एवढ्या गर्दीत ह्याला शोधावा कसा, हा एक प्रश्नच होता. सर्वांच्या मोबाईलवर रेंजची बोंबच होती. हा पठ्ठ्या आम्हाला दोनेक तासांनंतर सापडला तो पार घाट चढून वरती पोचल्यावर- तेही बरीच फोनाफोनी पार पाडल्यावर.
घाट चढून आल्यावर नि:श्वास टाकला. समोर मैदानात अन रस्त्यावर सर्व थांबलेले दिसत होते. हा माऊलींचा 'विसावा'. (एकोणिसावा कसा दिसला नाही अन पुढे एकविसावा आहे का, वगैरे पीजेही करून झाले.). मोफत वाटपाचं पुन्हा पीक आलं. आता खायची गरज होतीच, त्यामुळे आम्हीही त्यात घुसलोच.
या अन्नवाटप व इतर मदत करणार्यांना आळंदीला पालखी प्रमुख, ट्रस्ट वगैरेंची आधी परवानगी घ्यावी लागते- ही नवीन माहिती मिळाली. हे तर पाहिजेच. कारण लाखोंच्या संख्येने येणार्या या भाविकांना दान केलेल्या पदार्थांतून कुणी दगाफटकाही करू शकतो- हे टाळावं म्हणून या दान करणार्यांची व्यवस्थित नोंद ट्रस्टच्या दप्तरात केली जाते.
पोट भरल्यावर नव्या दमानं चालायला सुरूवात केली, पण आता निराळाच प्रकार चालू झाला. 'विसावा' उरकल्यावरही अन्नाचं दानधर्म संपेना. सर्वांची पोटं आता भरलेली, अन चालवलं जावं म्हणून हे अधिकातलं मोफत वाटप प्रत्येक जण टाळू लागला. पण वाटपवाले स्वयंसेवक अक्षरशः वारकर्यांचा रस्ता अडवून ' माऊली, खिचडी घ्या', 'माऊली केळी खा', 'माऊली, गरम चहा प्या'- असा आग्रह करू लागले. हा प्रकार आम्हाला नवीनच होता. आतापर्यंत खाद्यपदार्थांचे रिकामे द्रोण अन चहाचे रिकामे कप रस्त्यावर पायदळी तुडवले जात होते. आता भरलेले द्रोण पायाखाली येऊ लागले. पुढे तर रस्त्याच्या कडेला तशाच भरलेल्या द्रोणांचे ढीगचे ढीगच दिसू लागले. पण कार्यकर्त्यांचा हा जीवघेणा आग्रह कमी होईना. काही तर चक्क हाताला धरूनच ओढत होते..
हे सगळं सहन न होऊन शेवटी एका मग्न कार्यकर्त्याला आम्ही सांगितलं, 'कशाला वाया घालवतोस? कुणीच खात नाहीये, अन रस्त्याच्या कडेला भरलेल्या द्रोणांचा ढीग लागलाय ठिकठिकाणी..' पण एकवार आमच्याकडे पाहून पुन्हा 'माऊली- या, घ्या, खा, प्या-' चा जयघोष चालू केला.
चकित होऊन आम्ही त्याच्याकडे बघत राहिलो, तर शेजारच्या एकानं माहिती पुरवली- 'तो थांबणार नाही. त्याच्या पक्षाचा बोर्ड बघताय ना त्याच्या गाडीवर? तिथून त्याला अमुक एक द्रोण खपवायचं टार्गेट मिळालंय. फेकलं गेलं तरी बेहत्तर, पण ते टार्गेट तो पुर्ण करणारच. बहूतेक इंसेंटिव्हही असेल त्याला!'
आम्ही आ-वासून ही अनमोल माहिती देणार्याकडे पाहत राहिलो. दर दहा फुटांवर कोणत्या तरी पक्षाचे किंवा कंपनीचे काम करणारे 'स्वयंसेवक' मात्र रस्त्यावरून ग्यानबा-तुकारामचा घोष करत जाणार्या वारकर्यांना आपल्याजवळील जिन्नस खाण्या-पिण्यासाठी बळजबरीने ओढतच होते..!!
***
पाय असल्याची जाणीव एव्हाना तीव्र झाली होती, पण एक अनामिक ओढ सासवडकडे खेचत होती, हेही खरं. आजूबाजूला चालणार्यांकडे बघून पाय पुढे पडत होते, पण मध्ये-मध्ये थांबण्याचं प्रमाणही आता वाढलं होतं. एका मैलाच्या दगडावर पाय धरून बसलो, तर एक मावशी हसून म्हणाली, 'उठ बाळा, चालू लाग. थोडं दुखंल, पण सकाळी पुन्हा ताजातवाना होतोस की नाही बघ! पंढरीनाथ जास्त कुणाला दुखणं देत नाही.. चला आता!'
वारं भरल्याप्रमाणे पुन्हा उठलो तेव्हा जाणवलं, ही श्रध्दाच माणसाला बळ देत असावी. परमेश्वर आहे की नाही, यावर वाद घालण्याइतके आपण तज्ज्ञ नाही हे खरं. पण परमेश्वराचं अस्तित्व नाकारून त्याला रिटायर करा म्हणणार्यांना सांगावसं वाटलं- बघ बाबा, ही सामान्य माणसं. अनंत प्रश्न अन दुखणी घेऊन जगणारी. अर्ध्या भाकरीचा प्रश्न कुणाला कितीही छोटा वाटला, तरी तोच त्यांचा यक्षप्रश्न. त्यांना जगायचं बळ परमेश्वराच्या श्रध्देतनं मिळत असेल, तर कशाला त्यांना सांगायचं, की देव नाहीच म्हणून? या अपार भक्तीच्या जोरावर जगणार्या एखाद्याला देव नसल्याचं पटवून देण्यात यशस्वी झालासही, तरी तो उन्मळून पडेल अक्षरशः! देव मानू नकोस, म्हणजे हे आयूष्य जगू नकोस- असं सांगण्यासारखंच आहे की..
खेड्यांतल्या वार्यांसोबतच काही छोट्या अन मोठ्या शहरांतल्या वार्याही दिसत होत्या. पर्यावरण, वाहतूक, लोकसंख्या, पाणी, शिक्षण, मुलींबद्दलचा दृष्टीकोन असा काहीतरी विषय घेऊन जनजागृतीच्या दृष्टीने पाट्या-बॅनर्स घेऊन वारीत चालण्याचा कौतूकास्पद उपक्रमही काही सुशिक्षित मंडळी करत होती. हे छान. वारी म्हणजे वेळेची नासाडी असं म्हणणार्यांना ही सणसणीत चपराकच म्हटली पाहिजे. ही लोकं शेकडो गावांतून जाणार, अन लाखो लोक हे सर्व पाहणार असा विचार करता, वारीचा 'टीआरपी' अशा शहाणपणानं वापरून लोककल्याणाच्या कामाकरिता वापरण्याला 'वेळेची नासाडी' म्हणणारा चांडाळच ठरेल नाही तर काय! सरकारनेही याबाबत विचार केला म्हणजे थोरच! महाराष्ट्र ऊर्जा विकास महामंडळाची एक मस्त सजवलेली गाडीही वारीसोबत. तीवर सौर्य-ऊर्जेवरील उपकरणे अतिशय आकर्षकपणे मांडलेली- म्हणजे सोलर सिस्टिम्स, सोलर कुकर, सोलर लँटर्न्स, सोलर बॅटरीज वगैरे. शहरांमध्ये सोलर माहिती असलं तरी ग्रामीण भागांत बोंबच आहे, त्यादृष्टीने लाखो ग्रामीण लोकांची गर्दी होणार्या या वारीचा असा उपयोग म्हणजे ग्रेट. लांबूनच लक्ष वेधून घेणारी ही गाडी बघायला प्रत्येकजण तिच्या जवळ जाऊन बघत होता अन सोलर हा शब्द तरी लोकांपर्यंत पोचवण्याचाही हेतूही तिथंच सफल होत होता. (खाली प्रतिसादात या गाडीचं एक छायाचित्र आहे.)
वारीचा या पध्दतीने आणखी काय उपयोग करता येईल याचा साहजिकच मनात विचार चालू झाला..
***
मागे, म्हणजे हडपसर संपल्यानंतर, फुरसूंगीच्या आसपास अन त्याही पुढे नैसर्गिक विधी वाटेल तिथं करताना लोक दिसले, महिला वर्गाची कुचंबनाही होताना दिसली तेव्हा खुप वाईट वाटलं होतं. आता घाट चढून दोनेक किमी आल्यावर, पडदे लावून 'चराची स्वच्छतागृहे' एका संस्थेने उभारलेली दिसली तेव्हा कौतूक वाटलं. खाण्यापिण्याचं (अगदी वाया जाईपर्यंत, पायदळी येईस्तोवर) अन इतर वस्तू वाटण्यापेक्षा हे केवढं अवघड काम! चर खणून त्याचा वापर झाल्यावर, म्हणजे वारी पुढे सरकल्यावर ते पुन्हा बुजायचे अशी बहूधा कल्पना असावी. या संस्थेचं खरंच कौतूक करावं वाटलं. पुण्यात, अन नागरी वस्ती असते तिथे हा प्रश्न आणखीच गंभीर होतो. तिथं अशाच काही प्रकारची सुविधा करता येईल का, याचा विचार वाया जाणारं वाटणार्यांनी केला पाहिजे, असं वाटून गेलं.
पदयात्रा पुढे सरकत होती, अन सासवडच्या खुणा दृष्टीपथात येत होत्या. सोबत ऊन-पावसाचा खेळ अन चालत थांबणं, उठून चालणं हे चालूच होतं. सासवडकर उलट्या दिशेने चालत येऊन पालखीचे दर्शन, स्वागत वेशीपाशीच व्हावे या दृष्टीने घाई करताना दिसत होते (पालखीला 'घ्यायला' चाललोय- म्हणत होते..!). एव्हाना वारीच्या मुक्कामाचे तंबू-राहुट्या दिसायल्या लागल्या होत्या. त्या त्या दिंडीच्या 'केअर-टेकिंग टीम'नं पुढे येऊन ही सर्व तयारी केलेली.
आता मात्र थांबायचं ठरलं. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गावात मुक्कामाला थांबते तिथे जाऊन तोबा गर्दीत जाऊन चेंगरवून घेण्यापेक्षा रस्त्यातच पालखीचं दर्शन घेऊन परतीच्या वाटेला लागायचं असा विचार केला. मग एका कट्ट्याला टेकून पाच-दहा मिनिटं होतायत तोच पावसानं दहा-वीस सेकंदातच मोठ्या प्रेमाने भिजवलं. आसरा शोधत शोधत धावपळ झाली. मग नजीकच असलेल्या एका वारीच्या तंबूचाच आसरा घ्यावा लागला..
***
एका रांगेत पाच-सहा तंबू (वारकर्यांच्या मुक्कामासाठी) अन समोर मैदानात एका ट्रकलाच एका बाजूला मोठे कापड (ताडपत्री किंवा प्लास्टिक कोटेड असावे- पावसासाठी. सगळ्या तंबूंसाठीही हेच वापरलेले) लावून तयार केलेला आणखी एक- हा स्वयंपाकासाठी. पावसातनं घुसलो- ते थेट याच तंबूत. तिथून सर्व तयारी बघितल्यावर आतापर्यंत या 'केअरटेकर टीम'नं किती काम करून ठेवलं होतं, ते लक्षात आलं. घाण, चिखल, उकिरडे बाजूला करून ती जागा सखल करणे, भल्यामोठ्या लोखंडी खिळ्यांच्या साह्याने तंबू उभारणे, प्रत्येक तंबूच्या चारही बाजूंनी पाणी वाहून जावे, म्हणून चार्या तयार करणे, सगळं सामान त्यांत लावणं, हे सर्व झाल्यावर पाणी अन स्वयंपाकाची तयारी करणे हे सगळं उरकून झालं होतं; अन आम्ही आसर्याला म्हणून शिरलो, तर तिथले तिघे कांदे, बटाटे, मिरच्या, कोथिंबीर कापत बसले होते. त्या कापण्याच्या पध्दतीवरनं स्पष्ट कळत होतं, हे हाडाचे स्वयंपाकी आहेत. बोलणं आपसूकच चालू झालं..
'कुठली दिंडी?'
'शाहूवाडी- कोल्हापूर. हे पोतं घ्या खाली बसायला. खालची जमीन थोडी ओली झालीय खरी. पण इथं काय लोक झोपणार नाहीत. ही जागा फक्त स्वयंपाकाची.'
'किती लोक आहेत तुमच्या दिंडीत?
'शहात्तर. अन आम्ही पाच. गेली २० वर्षे येतोय. त्याआधी वडील यायचे. आम्ही करतो, हे सुध्दा पायी चालण्याइतकंच अवघड काम हो. त्यांचं काम पुढे चालू ठेवायचं म्हणून हे स्वयंपाक अन तंबू लावणं वगैरे शिकून घेतलं. होतंय तोवर करणार.'
'इथनं शे-पन्नासच तंबू दिसताहेत. बाकीच्या दिंड्या कुठे थांबतात?'
'जागा मिळेल तिथं. खरं सांगू? प्रत्येक दिंडीची जागा ठरलेली असते. नाहीतरी एवढ्या लाखो लोकांच्या गर्दीमधनं आपला मुक्काम लोक कसा शोधणार? म्हणजे असं, की आता तुम्ही बघताय, ही जागा गेले चाळीस वर्षे आमच्याच दिंडीची. त्याआधीही असेल. पण आता ही समोरची भली मोठी कंपनी बघताय का? (समोर इलेक्ट्रॉनिका मशिन टुल्सचा मोठा कँपस दिसत होता.) त्या कंपनीनं ही जागा विकत घेतलीय. त्यांनी आजच आम्हाला सांगितलंय- हे शेवटचं वर्ष. पुढच्या वर्षी मुक्काम हलवा! कुठे जाणार आम्ही? याच जागेची आठवण करत आम्ही वारी जगलो. वर्षभर त्या आठवणी पुरवत संसार केला, पांडूरंगाचं गाणं गात पोरं मोठी केली, मार्गी लावली. आता हे म्हणतात- इथं येऊ नका. एकच तर मुक्कामाचा प्रश्न आहे. थकले भागले वारकरी टेकणार कुठे? माऊलींच्या पादूकांमध्ये आमचा प्राण आहे- आम्ही भुतागत पालखी सोडून दिवेघाटात राहायचं का? कसं करायचं, तुम्हीच सांगा.'
तो बरंच काय काय बोलत होता. त्यातलं काही कळत होतं तर काही अजिबात नाही. अन कळलेल्या प्रश्नांना उत्तर आमच्याकडे नव्हतंच..
***
शाहूवाडीकरांच्या तंबूत टेकल्याने अंमळ शांत शांत वाटल्यागत झालं. पण पाऊस शांत व्हायला तयार नव्हता. समोर रस्त्यावर पुर आलेल्या नदीगत एकाच दिशेने सारखी माणसे वाहताना दिसत होती. गजर, नाचणं, गाणं, भजनं चालूच होतं. पालखी केव्हा आपल्यासमोर येणार, अन ही माणसांची नदी केव्हा संपणार, असं विचारल्यावर शाहूवाडीकर म्हणाला- सात वाजेच्या सुमारास पालखी सासवडात प्रवेश करते खरी, पण माणसांची नदी रात्रभर चालूच राहते! कुठून ना कुठून लोक येतच राहतात. रात्री झोपेतनं केव्हाही उठून बघितलं तरी तुरळक का होईना लोक रस्त्यावरनं जाताना दिसतच असतात!
आता साडेसहा वाजले होते. आम्ही कोल्हापुरकरांचा निरोप घेऊन बाहेर निघालो, अन ठरवलं- आता उलट्या दिशेने निघायचं- पालखीला भेटण्यासाठी. बाहेर निघालो, तर प्रचंड थंडीनं काकडलोच. तशातच निश्चय करून पुढे चालायला लागलो. रस्त्यात पालखीचं दर्शन घेऊन येणार्या सासवडकरांना 'पालखी अजून किती मागे आहे' ते विचारत पुढे सरकत राहिलो. सासवड नगरपालिकेने उभारलेल्या स्वागत मंडपाजवळच थांबायचं ठरलं.
गावोगावच्या दिंड्या संपून आता पालखीसोबतच्या अधिकॄत दिंड्या सुरू झाल्या. या दिंड्यांची शिस्त पाहून चकितच व्हायला झालं. एकतर ड्रेसकोड! दुसरी गोष्ट आडवी रांग अगदी कटाक्षाने पाळणे, अन त्यातही प्रत्येकाच्या जागा ठरलेल्या. प्रत्येक दिंडीसोबत 'पालखीच्या मागे की पुढे' अन 'अमूक नंबर' असा बोर्ड किंवा पाटी घेतलेली माणसं. कुठेही गोंधळ नाही, बेशिस्त नाही, रांग मोडणं, अन थकलो- म्हणून थांबणंही नाही! आणखी एक माहिती मिळाली- ही पालखीसोबतची अधिकृत दिंड्यांवाली माणसं रस्त्यात मोफत वाटपातलं काहीही घेत नाहीत, खात नाहीत. अधिकृत थांबा किंवा 'विसावा' (आता विसाव्याचं महत्व कळलं) जिथे असेल, तिथेच ते थांबतात, अन त्यांच्यासाठी केलेलं अन्न खातात! हे म्हणजे थोरच. फक्त चांगलंचुंगलं खायला मिळतं म्हणून काही लोक वारीला येतात, या आमच्यापैकी काही जणांच्या मतांवर या लोकांनी प्रश्नचिन्हच उभं केलं..
माऊलींचे अश्व आले, अन नगरपालिकेच्या स्वागतमंडपावर एकच गडबड उडाली. पालखी थोडीच दुर राहिल्याची ही खुण होती. दिंड्याची दाटी आता वाढतच चालली होती, अन त्यासोबत स्टेजवरच्या पुढार्यांची माईकवरची बडबडही. पालखी दुरूनच येताना दिसली, तेव्हापासूनच रेटारेटी चालू झाली, अन पालखी जवळ आल्यावर ती प्रचंड वाढली.
आली आली, पालखी आली- चा गजर झाला; अन मंडपावर धमालच उडाली. पालखीसोबतच्या पोलिसांचे गर्दी आवरता आवरता नाकी नऊ आले. त्यातही मोठमोठ्या फुलांच्या माळा दुरवरून पालखीवर, पालखीच्या आत फेकताना पाहून थोडं विचित्र वाटलं. कित्येक लोक एकाच वेळी माऊलींच्या पादूकांना कमीत कमी स्पर्श व्हावा, म्हणुन जीव तोडू लागले. तो सोहळा डोळ्यांत साठवण्याच्या आतच पालखी पुढे मार्गस्थ होताना दिसली, तेव्हा आपल्याला स्वप्न पडलं की काय- असं वाटायला लागलं!
आता आमचा प्रवास उलट पावली चालू झाला. गजर करत, अन नाचत- पाठमोरे वारकरी जाताना बघितले, अन काही तरी चुकल्यागत वाटलं. जेमतेम बारा-चौदा तासांचा ऋणानुबंध, पण जीवा-भावाचं काहीतरी सोडून जातंय असं वाटून घसा दाटल्यागत झाला.
आम्ही थकल्या पावलांनी नि:शब्द होऊन पाठमोर्या वारीला हात हलवत निरोप देत होतो. अन वारी हजारो वर्षांची रीत असल्यागत आमच्याकडे न पाहता, आम्हाला मागे टाकून विठ्ठ्लाच्या भेटीच्या ओढीनं दुप्पट उत्साहाने पुढे वाहत होती..
वारी कसली, वाहती रीतच होती ती..!!
***
संपुर्ण
***
'वाहती रीत' हा शब्दप्रयोग स्लार्टीचा. इतका भावला की लिहायला घेतल्यावर दुसरं शीर्षकच सुचलं नाही..
साजिरा,
साजिरा, खूप छान अनुभव लिहिले आहेत. आणि फोटो पण छान अहेत. वारीला जावंसं वाटायला लागलं वाचून!!
- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/
क्या बात
क्या बात है! साजिरा, अगदी त्यांच्यातले एकच झाला होतात! स्फूर्तीदायक वर्णन, फोटोंमुळे जास्त जवळचे वाटले लिखाण. धन्स!

टण्या, केदार तुमची माहितीही पूरक.
साजिरा, सासवडला घेऊन चला लवकर!
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
कुणाचा
कुणाचा आवाज कसाही असो, कधी गाणं म्हणलं असो की नसो. पण प्रेमाने 'रुप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी..' म्हणायला लागल की बाकीचे अशी काही साथ देतात की गाणं गोडच होतं. साथ नुसती वरवरची नाही अगदी मनाच्या गाभार्यातून आपल्या श्रद्धास्थानाला घातलेली साद असते ती.
.
वारीच्या दिंडीची रचना जरा अभ्यासली तर लक्षात येईल की दिंडीत बाहेरच्या म्हणजे रस्त्याच्या बाजूला पुरुष वारकरी आणि मध्यभागी बायका वारकरी चालत असतात. एकंदरीतच पालखीच्या गर्दीचा फायदा घेऊन टवाळक्या करायला आलेल्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांपासून रक्षण व्हावं अशी रचना. पुरुष आणि बायका एका गोलात नाचत असतानाही सगळे व्यवस्थित आपल्या संस्कृतीचा आब सांभाळून असतात. एक लयबद्ध साधी हालचाल आणि टाळी, त्यातही पुरुष आणि बायका एकत्र.. म्हणजे एक पुरुष मग एक बाई असं नाही. हे सगळे नियम कुठे लिहीलेले कुणी सांगितलेले नाहीत तर वर्षानुवर्ष परंपरेसारखे अंगात मुरलेले.
.
दिंडीत ठराविक ठीकाणी सामिल होणारे लोक दिंडीत सामील होण्याआधी आपण देवळाच्या पायरीवर हात लावून जसा नमस्कार करतो तसा करतात. फुगडी खेळून झाली की खेळणारे एकमेकांना नमस्कार करतात / मिठी मारतात. असं बघत राहीलं की प्रेम वाटत निघालेत जणू असंच वाटत राहतं. कोण कुठले अनोळखी जीव दोन क्षण एकमेकांसोबत रमतात आणि एकमेकांमधल्या चैतन्याचा आदर करावा तसा नमस्कार करतात.
.
हडपसर पुढे एक बरीच म्हातारी बाई पालखीच्या दर्शनाला आली होती. वारीला जाणार नसावी. पण तिच्यासमोरुन जाणार्या प्रत्येक वारकर्याच्या चिखल भरल्या पायांना हात लावून भक्तीभावाने नमस्कार करत होती. आमच्या ओळखीतले एक काका आहेत बायपास सर्जरी झालीये. गेले पाच वर्ष नियमीत वारी करतात. याही वर्षी होते.
.
अगदी सुशिक्षीत, उच्च शिक्षीत, अशिक्षीत सगळे असतात वारीत. त्यांच्या शिक्षणानी काय फरक पडणार म्हणा.. भक्तीमार्गावर डिगरीची आवश्यकताच नाही. आणि basic qualification असंही काही नाही.
~~~~~~~~~

~~~~~~~~~
साजिरा, एकद
साजिरा,

एकदम छान लिहीलेस रे...
फोटो मस्त!
आणखी खुप खुप लिही..
ओफ्फ!!!!! कसं
ओफ्फ!!!!!
कसं पुर्ण केलं, कुणास ठाऊक. दोन दिवस लावले, माफ करा. बघितलं, भावलं, ते तसंच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. हे अर्धवट असतानाच वरच्या प्रतिसादातल्या अनेक सिध्दहस्तांकडून, तज्ज्ञांकडून कौतूक मिळालं- पण ती अक्षरशः वारीची कृपा!
वरच्या अनेक मायबोलीकरांनी अतिशय छान अन माहिती देणारं लिहून, हे लिखाण थोडंफार परिपुर्ण करण्यात मोठा वाटा उचलला- त्या सर्वांचे नाव न घेता सप्रेम आभार.
आणखी एक सांगायचं राहिलं-
या लिखाणात वारीच्या वा पालखीच्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या रीती-भाती-परंपरांचा अभ्यास करण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. तेवढा अनुभव, अधिकार अन शहाणपण माझ्याकडे नसल्याचं नम्रपणे सांगू इच्छितो. तो एक प्रचंड मोठा विषय होऊ शकतो, अन खुप वर्षे वारीसोबत चालल्यावर अन अभ्यासल्यावर त्यावर मला कदाचित लिहिता येईलही. आता वारीच्या निमित्ताने फक्त तीतला 'माणूस' शोधण्याचा प्रयत्न केलाय- जो तुमच्या आमच्यासारखाच सामान्य आहे- जो हसतो, रागावतो, सुखदु:खे सांभाळून असतो, भक्तीने भारावतो, अन रडतोही..
***
शेवटी- पालखीला निरोप दिल्याचे काही फोटो टाकून तुमचा निरोप घेतो..
***
अंधार पडतोय, माऊली अजून दुरच दिसतेय..










माऊलींचे अश्व आले. पालखी आता आलीच..
आली आली, पालखी आली..
पालखी तिच्या वाटेनं अन आम्ही आमच्या. पण मनातली 'वाहती रीत' थांबली नाही!
***
नमस्कार.
अप्रतिम
अप्रतिम साजिरा. अगदी प्रत्यक्ष वारीत जावुन आल्यासारखा अनुभव दिलात तुमच्या लिखानातुन. दर वेळी पुण्यातुन वारी जातांना पाहिली की वाटायच की एकदा तरी आपण जावुन अनुभव
घेवुन बघायला पाहिजे. आता परत तसच वाटायला लागलय तुमचे लिखान वाचुन. धन्यवाद इतका चांगला अनुभव सगळ्यांसाठी मायबोलीवर लिहिल्याबद्दल.
हा दुसरा
हा दुसरा भाग लिहिलात तो अधिक सुंदर वाटला. पुण्याला माझ्या घरावरुनच पालख्या जातात. वारीला जायचा योग आजपर्यंत नशीबात आला नसला तरी, पालख्यांच्या दर्शनाचा योग, आणि थोड्या अंतरासाठी का होईना, पण वारीसोबत २ पावलं टाकण्याचा योग नशीबाने दर वर्षी येत होता. वाहती वारी पाहणंही एक विल़क्षण अनुभव असतो!! ही २ एक वर्ष बंगलोरमध्ये असल्याने वारीचं अन पालख्यांचं दर्शन चुकलय
पण मन मात्र तिथे घोटाळत राहत....
अप्रतिमच
अप्रतिमच लिहिल आहे.

छायाचित्रे सुंदर.
.............................................................
>>त्यांना
>>त्यांना जगायचं बळ परमेश्वराच्या श्रध्देतनं मिळत असेल, तर कशाला त्यांना सांगायचं, की देव नाहीच म्हणून? या अपार भक्तीच्या जोरावर जगणार्या एखाद्याला देव नसल्याचं पटवून देण्यात यशस्वी झालासही, तरी तो उन्मळून पडेल अक्षरशः! देव मानू नकोस, म्हणजे हे आयूष्य जगू नकोस- असं सांगण्यासारखंच आहे की..
अप्रतीम.... खुप खुप छान. ह्या पलीकडे शब्दच नाही.........
साजिरा तुझ
साजिरा
तुझ लिखाण वाचून माझा भाउ अभयचा भास झाला.तोपण असाच फिरुस्ता आहे.वर्णन सुपर्ब कर्तो.कीप इट अप
साजिरा,
साजिरा, तुझा लेख अतिशय सुंदर झालाय. फार नेटकं चित्रण केलंयस तू!! चित्रण च वर्णन नाही म्हणणार मी त्याला! कारण त्या वर्णनाने डोळ्यांसमोर चित्र उभं राहतं.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा
साजिरा, बरे
साजिरा,
बरेच दिवसांनी मायबोली वर आले आणी लेख वाचून भरून पावले.
अप्रतिम लेख आणी अनुभव! खरच तुमचा हेवा वाटतोय!
अन्जलि
आम्हा
आम्हा समस्त जनांच्या मनात वारीला जाण्याची ओढ निर्माण केलीत, ह्या साठी धन्यवाद !
विलोभनीय वर्णन केलय तुम्ही ......
छान
छान लिहिलय!!!!
साजिरा,
साजिरा, खुप छान लेख लिहिला आहे. लेख वाचतानाच ईतक समाधान वाटत होत तर प्रत्यक्ष वारीचा अनुभव अद्वितियच असेल. नशिबवान आहत तुम्हि. पाहु कधी योग येतोय तो वारित सहभागी होण्याचा.
छान
छान लिहिलंत साजिरा.
हा सुखसोहळा पहातच लहानाचा मोठा झालोय मी. हडपसर गाडीतळाजवळच घर असल्यानं वारिच्या दिवशी पहाटे टाळ्म्रुदंगाच्या आवाजानेच जाग यायची. आजही आम्ही पालखीतल्या एका दींडीला सकाळचा फराळ देतो. साधारण ५०० वारकर्यांनी घर जेव्हा भरुन जाते ना तेव्हा 'आज मी ब्रम्ह पाहीले" असंच होउन जातं. या वर्षी उसगावात असल्याने वारी चुकली पहील्यांदा. पण मन काही मानायला तयार नव्हते. म्हणुन दर अर्ध्या तसाने असा रात्रभर फोन करुन दींडी अनुभवत होतो मी. मन कुठंच लागत नव्हतं. सारखे डोळे भरुन येत होते. बहीणीला हातात तिचा फोन तसाच धरुन ठेवायला सांगत होतो जेणे करुन टाळ म्रुदंगाचा आवाज मला ऐकु येइल. घरी येणार्या सगळ्या वारकरी भक्तांबरोबर अतुट असं नातं जोडलं गेलं आहे. सगळयांनी आवर्जून आठवण केली माझी. फोनवरुनच सगळ्यांना नमस्कार केला यावर्षी.
.
मी सुध्धा अनेक वेळा वारीला सासवड पर्यंत चालत गेलो आहे. तुमचे अनुभव वाचताना हे सगळं जणू काही मीच लिहीलं आहे असं वाटलं. माझी आजी, वय वर्षे ८० फक्त, एखाद्या तरुणाला लाजवेल अशा जोशात वारीत चालत जाते. तीची खुप आठवण आली.
.
सुखालागी करिसी तळमळ
तरी तु पंढरीसी जाय एक वेळ
मग तु अवघासी सुखरुप होसी
जन्मोजन्मीचे दु:ख विसरसी
मग तु अवघाची सुखरुप होसी ||
.
लोटांगण घालिता महाद्वारी
कान धरुनी नाचसी गरुडपारी
मग तु अवघासी सुखरुप होसी
जन्मोजन्मीचे दु:ख विसरसी
मग तु अवघाची सुखरुप होसी ||
.
नामा म्हणे उपमा काय द्यावी
माझ्या विठोबाची अलाबला घ्यावी
मग तु अवघासी सुखरुप होसी
जन्मोजन्मीचे दु:ख विसरसी
मग तु अवघाची सुखरुप होसी ||
छानच
छानच लिहिलं आहे. मागल्या वर्षी माझी आई आणि काकू लोणंद ते पंढरपूर गेल्या होत्या वारीबरोबर. त्यांनी सांगितलेल्या वर्णनाची कथांची आठवण झाली.
परागकण
सुंदर!
सुंदर! वारी प्रत्यक्ष घडवलीत...
साजिरा,
साजिरा, अप्रतीम अगदी!
आमच्या वारीच्या संकल्पाला पाठबळ मिळालय तुमच्या नितांतसुंदर लेखाने. व्यवस्थापनातल्या बर्याच गोष्टी माहीत नव्हत्या, त्या पण समजल्या.
वारीचे फार वेगवेगळे पदर उलगडून दाखवलेत काही प्रातिनिधीक उदाहरणे घेऊन. सुंदरच!!!
साजीरा,
साजीरा, खरच खूप सुरेख, अगदी वारी घडवणारं चित्रण.
जैसा भाव
जैसा भाव प्रचिति तैसी
खुप छान.
खुप छान.
>जणू नफा
>>जणू नफा कमवायचाच नाही असं एकदा ठरल्यावर आपल्या दानतीत येणारी चव बहूधा त्या चहात उतरली होती..!
मान गये उस्ताद !!! काय लिहीलं आहे. अप्रतिम.
बहुतेक जणांची अशी वारीला जायची इच्छा असते बरेचदा .... पण ती प्रत्यक्षात काही येत नाही. खरं म्हणजे एकदा 'ठरवल्यावर' दुसरा काही अडथळा येऊ शकत नाही ... पण ते ठरवणच जमत नाही. फारच थोडे असे असतील की इच्छा कृतीमधे आणत असतील.
ती इच्छा नुसती कृतीतच नाही आणलीस तर त्याचा सगळ्यांना आस्वाद दिल्याबद्दल तुझे आभारच मानायला पाहीजेत. बरीच माहीती पण मिळाली ... पण एक प्रश्न मनात आहे. खरं म्हणजे हा फारच बालिश प्रश्न आहे ... पण वर नमुद केल्याप्रमाणे माझीही गेली अनेक वर्ष वारीबरोबर जायची इच्छा आहे ... ती कधी पुर्ण होतेय बघु ... तत्पुर्वी थोडी माहीती असावी म्हणुन विचारले. तुम्ही कुठल्या वारीत सहभागी झाला होता ? किंबहुना ... एखाद्या वारीत सहभागी व्हायचे असेल तर काय करावे लागते ? का नुसते गर्दीबरोबर चालत रहायचे असते ?
=== I m not miles away ... but just a mail away ===
मिहिर,
मिहिर, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तु म्हणालास, त्याचं कोणाला हसूही येईल; पण अगदी खरं सांगायचं तर मी तेच केलं- लोकांसोबत चालत राहिलो. तेवढंच आपल्या हातात असतं. नव्यानं गेलेल्या माणसाला तर त्यातूनच इतकं काही मिळतं, की त्याची अक्षरशः 'घेता किती घेशील दो कराने' अशी अवस्था होते. इतके कलंदर लोक अन इतक्या जगावेगळ्या रीती- पध्दती बघायला मिळतात, की आपल्याला आश्चर्य वाटतं..
तु देशात आहेस का? दर आषाढात आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी असते. कार्तिकातही असते, पण ती तिला आषाढी वारीची सर नाही. तुकाराम महाराजांची अन ज्ञानेश्वर महाराजांची अशा दोन पालख्या निघतात- वेगवेगळ्या मार्गांनी. त्यातली दुसरी, जास्त लोकप्रिय. आळंदी-पुणे-दिवेघाट-सासवड अशी जाणारी. त्याच पालखीसोबत दिवेघाटापर्यंत म्हणजे जेमतेम २५-३० किमी अंतर आम्ही पायी चाललो- त्याचा हा अनुभव. ही अंदाजे २५० किमी ची वारी पुर्ण एकदा चालून बघायची आहे, पण तो सुदिन उगवेल तेव्हा खरा!
--
या प्रतिसादाच्या निमित्ताने-
खरं तर वारी सारख्या विषयावरच्या लिखाणाकडे लोक ढुंकून तरी बघतील की नाही, या बद्दल साशंकता होती, पण वारी लिहिल्यानंतर अवघ्या काही तासांतच हा समज खोटा ठरला. प्रतिसादातील अनेक लोक मायबोलीचे जुने-जाणते सभासद आहेत, वरच्या योग्यतेचे आहेत. त्यांचे प्रतिसाद म्हणजे या लेखाचे भाग्यच आहे. या सर्वांचे यानिमित्ताने मी आभार मानतो.
कृती तर पाहिजेच, पण विचारांचे आधिष्ठान नसेल, तर ती वायफळच! आपल्यासारखे विचार करणारे आहेत, तोपर्यंत तरी 'महाराष्ट्र धर्म' बुडाल्याचा कांगावा करणार्यांचे मनसुबे सफल होणार नाहीत, हे नक्की..!!
पुन्हा आभार व नमस्कार.
***
शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन, शब्दें वाटू धन जनलोकां..
पुंडलीक
पुंडलीक वरदे...., साजिरा! किती किती सुंदर लिहिलयस. ह्या लेखाला मिळालेले प्रतिसाद हे लेखाचं भाग्य नसून तू जाणं, अनुभवणं, आणि नेटाने लिहिण.... हा तुझा लेख मायबोलीकरांचं भाग्य ठरलाय.
मला आवडलेली गोष्टं म्हणजे, ह्यात नुस्ता तुझा अनुभव नाही तर इतर वारकर्यांचं गुजही आहे... त्यामुळे खरच त्यांच्याबरोबर चाललो, बोललो असं वाटतय.... खास शैली आहे, राव.
छानच.
पहिल्यान्
पहिल्यान्दाच मायबोलिवर रजिस्तर केले आणी पहिलाच लेख वाचला तोही माउलीचा.वारीला एकदातरी पायी जाण्याची मनोकामना पून्हा प्रबल झाली .बोलके फोटो आणी वाहती भाशा.....आभार.
काय सुंदर
काय सुंदर लेख आहे! "पालखी" चे दर्शन घेउन बरीच वर्षे झाली. ही वारीची प्रथा सात आठशे वर्षे चालू आहे असे वाचले होते. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे "मॅनेजमेंट" सगळे मिळून आपोआप करतात की कोणी एक माणूस किंवा संस्था हे नियम किंवा संकेत ठरवते माहीत नाही.
फोटोही सुंदर आहेत. दिवेघाटातील फोटो तर पूर्वी दरवर्षी बघितलेल्या अशा फोटोंची आठवण करून देतो.
बरीच माहिती पहिल्यांदाच कळाली. धन्यवाद साजिरा एवढा चांगला लेख लिहील्याबद्दल.
आजच वाहती
आजच वाहती रीत!!! वाचली आणि खरचं वाहवत गेलो.... पुण्यात होतो तेव्हा संधी असुनदेखील जाता आले नाही ही रुखरुख पुन्हा एकदा राहीली. अतिशय सुन्दर आणि वाहता प्रवाह असतो वारी म्हणजे आणि तो तुमच्या लिखानात देखील दिसला.... साजिरा......वाह वाह..... नंतर एकदा खास दिवेघाटात गेलो होतो "विसावा" बघण्यासाठी. सगळं आठवतंय....
======
साजिरा,
साजिरा, खुपच छान लिहीलं आहे. जिवंत वर्णन आहे.
फारच सुरेख
फारच सुरेख वर्णन ! एकदम भावल. अन्नाची नासाडी मात्र वाचवली नाही
Pages