वाहती रीत!

Submitted by साजिरा on 3 July, 2008 - 07:03

वारीचं आकर्षण तसं खुप लहानपणापासूनच होतं. वारीसोबत पंढरीला जाऊन आलेल्या तरण्या-ताठ्यांच्या फुशारक्या अन म्हातार्‍या-कोतार्‍यांचे 'अगा मी ब्रम्ह पाहिले' च्या थाटातल्या गप्पा अगदी गुंगवून टाकायच्या. आजच्या तुलनेत दळणवळणाची साधने तेव्हा थोडी कमी असल्यामुळे अंतराचंही अप्रुपच. ही लोकं इतक्या दुर पायी जाऊन काय मिळवत असतील, असं वाटून जायचं. मग कधीतरी दोन-तीन आज्ज्यांचा शेवट वारीच्या वाटेवर झाला, अन त्यांना गावात जवळजवळ देवस्थान मिळालं, तेव्हा लक्षात आलं, की हे एवढं सोपं प्रकरण नाहीये. वारीच्या भोवती मनात असं विशिष्ठ वलय तयार झालं- ते असं न-कळत्या वयातच.

शाळेच्या पुस्तकांतून हळूहळू ज्ञानेश्वर-तुकाराम कळू लागला. विठ्ठल हे महाराष्ट्राचं आद्य दैवत असल्याचंही मग समजलं. पण ते तिथंपर्यंतच. विठ्ठलाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला तो थेट नोकरीतल्या कामाच्या निमित्ताने पंढरपूर जवळील एका कारखान्यात जावं लागलं, तेव्हा विठ्ठलाचं दर्शनही उरकून घेतलं. कोणत्याही देवाचा मी काही फार मोठा भक्त नव्हे, पण नास्तिक मुळीच नाही. ज्या अगम्य ओढीमुळे वारकरी २-३ आठवडे पायी चालत जातात, त्यामुळे 'पायी वारी' चं आकर्षण राहिलं ते राहिलंच. त्यानंतर दरवर्षी वारी आली, गेली अन 'पायी-वारी' करण्याचं राहून गेल्याची खंत वाटत राहिली.

या वर्षी मात्र कुठल्याही परिस्थितीत सासवड पर्यंत तरी जायचंच, असं ठरवलं. आपला स्वतःचाच निश्चय मोडू नये म्हणून इतर चौघांना आठ दिवस आधीच तयार केलं. आठवडाभर रोज त्यांना फोन करताना मलाच 'जायचंय' हे बजावत राहिलो..! कारण २-४ मैल वगैरे ठीक. पण २५-३० किमी पायी चालायचा प्रयोग अजून तरी केला नव्हता. मी अगदीच 'पाप्याचं पितर' नसलो, तरी माझ्या एकंदर शारिरिक क्षमतेकडे बघून आमचे मित्र या आठ दिवसात 'हम्म..' करीत माना डोलावत होते, त्यामुळे हे प्रकरण शेवटास नेण्याची नैतिक जबाबदारी आपसूकच अंगावर येऊन पडली होती. कार्यक्रमाचे 'प्रोमो' आठेक दिवस आधीच केल्यामुळे परतीचे दोर कापल्यात जमा होते, हे एक बरंच झालं म्हणायचं..!

रविवार उजाडला, अन स्वारगेटला सकाळी ७ वाजता एकत्र भेटल्यावर आम्ही 'पुंडलिक वरदे' चा गजर केला, एक अनामिक उत्साहात चालायला सुरूवात केली..

***

पायी चालण्यासाठी डावी बाजू, निरनिराळ्या वार्‍यांसोबतचे ट्र्क्स-टेंपो अन इतर वाहने यांना उजवी बाजू अशी व्यवस्था होती. सकाळचा ताजा दम सगळ्यांत होता, त्यामुळे नामा-तुका-माऊलीचा गजर अन अभंग जोरात सुरू झाले. रस्त्याच्या कडेला सोय होईल तिथं अजूनही मंडळी आंघोळ वगैरे करताना दिसत होती. गावोगावच्या वार्‍यांनी पुण्यात ठिकठिकाणी मांडलेले मुक्काम आवरून मुख्य रस्त्याला येऊन मिळायला सुरूवात केल्यामुळे गर्दी वाढू लागली. दुरपर्यंत पांढर्‍या टोप्या अन भगवे ध्वज यांचं मनोहारी दृष्य दिसायला लागलं. कित्येक वेळा गाडीने पार केलेला गाडीतळापर्यंतचा हा रस्ता पायी जाताना अनेक आजपर्यंत न दिसलेल्या गोष्टी दिसल्या, अन त्याचंही नवल वटत राहिलं. दैनंदिन कामात असताना आपण आजूबाजूचं निरीक्षण करण्याची शक्तीही गमावून बसतो- याची खंत वाटून गेली.

गाडीतळापर्यंत येईस्तोवर साडेआठ झाले होते. इथून उजवीकडे वळल्यावर इतर गाड्यांची गर्दी कमी होऊन फक्त वारीसोबतच्या गाड्या राहिल्या. ९ किमी उत्साहात चालल्यावर आता तो थोडासा मावळला होता. पुढे फुरसूंगी समोर दिसू लागल्यावर कळलं- आपलं ओढून-ताणून आणलेलं चंद्रबळही संपलंय; इथून पुढे आता परीक्षा!

एकमेकांच्या तोंडांकडे पाहिल्यावर 'दिल की बात लबपे' झालं अन खाण्यापिण्यासाठी एका हॉटेलात बस्तान मांडल्यावर स्वर्गीय आनंद झाला.

***

प्रत्येक वारीसोबत एक गाडी. म्हणजे 'केअरटेकर'च म्हणा की. यात सगळं मुक्कामाचं सामान. तंबू, लग्नकार्यात बघतो तशी मोठी स्वयंपाकाची-जेवण्याची भांडी, वारकर्‍यांची अंथरुणं-पांघरुणं अन जास्तीचं सामान, पाण्याची भांडी, वाद्य, ध्वज, पताका, भाजीपाला, दुखापती अन आजाराचं उपचारसाहित्य अन बरंच काय काय. वारीची काळजीवाहू मंडळी याच ट्र्कमध्ये. म्हणजे असं, की पुढल्या मुक्कमाच्या ठि़काणी हे आधी पोचणार. सर्वांचे तंबू लावणार. पाण्याची, स्वयंपाकाची तयारी (अन स्वयंपाकही) वगैरे व्यवस्था करणार. वारीला विशिष्ठ ठिकाणी आमंत्रण असेल तर आधीच जाऊन को-ऑर्डिनेट करून आपले लोक वाट चुकणार नाहीत, हे बघणार. यात अडचणी आल्या, तर वारकरी मुक्कामास येण्याच्या आतच त्या सोडवायचं आव्हान. तंबू उभारण्यात अडचणी, हत्यारं न मिळणं, पाणी दुरवरून आणायला लागणं, नेहमीचीची मुक्कामाची जागा घाण किंवा राड्या-रोड्यामुळे उंचसखल झालेली असणं किंवा काही तर कल्पनाच न करता येण्यासारख्या अशा अडचणी.

त्यामुळे पायी चालणार्‍यांजवळ अगदी मोजकं सामान. त्यातूनही एखादी खमकी म्हातारी स्वतःचं जास्तीत जास्त सामान 'गठुड्यात' बांधून, ते पाठीवर अन डोक्यावर आलटून पालटून पेलत अटीतटीने चालत असलेली दिसायची. काही गावांतनं मोजकीच मंडळी निघाल्यामुळे किंवा स्वतंत्र गाडी न परवडल्यामुळे असंच काहीतरी करताना किंवा नजीकच्या गाववाल्यांबरोबर 'टाय्-अप' करून चाललेली. अनेक बायांच्या डोक्यावर तुळशी. म्हणजे अगदी वृंदावनासकट. कपड्याची 'चुंबळ' डोक्यावर अन त्यावर हे वृंदावन हात न लावता झपझप चाललं तरी अजिबात हलणार नाही अशी व्यवस्था. काहींचं पिढ्यानपिढ्यांचं तांब्या-पितळाचं. इतरांची मातीची. एका बयेला थांबवून विचारल्यावर 'इट्टलाच्या गळ्यात तुळशीची माळ आस्ती न्हवं का.. हे डोक्यावर घेऊन जायला मिळणं हा मानच म्हणायचा बाबा!' अशी माहिती मिळाली.

रस्त्यात गाणी, अभंग अन भजनांसोबत इतर करमणूकही. एक म्हातारा कडेला 'वाईच' थांबून विठ्ठल शिंदेच्या एका गाण्यावर अगदी बारीक ताल धरून, कंबर नाजूकपणे हलवत नाचत असलेला. सर्वांकडून दाद मिळत असल्यामुळे आणखीच फॉर्मात आलेला. एक चक्क विठ्ठलाचा मुखवटा तोंडावर घेऊन कंबरेवर हात ठेऊन 'विटेवरी' उभा. लोक त्याला चक्क नमस्कारही करत होते. एकीनं वडाची पारंबी पकडून भलेमोठे झोकेच चालू केलेले. एक तरणाताठा एखाद्या दाढीमिशांवाल्या मुनीसारख्या दिसणार्‍या एका वडाच्या पारंब्या पकडून सरसर वर जाऊन तिथनं सर्वांना नमस्कार करतोय. आम्ही थोडा प्रयत्न केला, पण पोटाला कळ लागली, अन हातही सोलले. काही ठिकाणी फुगडी रंगात आलेली. आवाजाचं वरदान लाभलेल्या मंडळीची गाणी जोरदार रंगात आलेली.

फुरसूंगीपासनं अन्न अन इतर साहित्य कडेला उभ्या केलेल्या गाड्यांमधून मोफत वाटप चालू झालं. यात साबूदाण्याची खिचडी, वरीचा शिरा, राजगिर्‍याचे लाडू-वड्या, केळी, दाण्याची चिक्की, चहा असे अनेक पदार्थ; शिवाय प्लास्टिक पॅकिंगच्या कागदापासून बनवलेले पावसात पुर्ण अंग झाकू शकतील असे टोपडे, पायांना लावण्याची ऑइंटमेंट्स-तेले, आय्-ड्रॉप्स, अभंगांची पुस्तकं असं बरंच काही. काही ठिकाणी रांगही. हे सर्व मोफत वाटत असलेल्या व्यक्ती-संस्थेचा त्या-त्या ठिकाणी बोर्ड, बॅनर, जाहिरात इ.

आम्ही खायचं वाटताहेत, तेही कसंय बघू म्हणून घेतलं तर ते खरोखर चांगलं होतं. एका ठिकाणी विकत घेतलेला चहा अगदीच गचाळ निघाला म्हणून वाटपातला घेतला, तर त्यात चक्क आलं, सुठ, इलायची वगैरे. जणू नफा कमवायचाच नाही असं एकदा ठरल्यावर आपल्या दानतीत येणारी चव बहूधा त्या चहात उतरली होती..!

***

'आजी, दरवर्षी येता काय वारीला?'
'गेल्या दोन सालांपास्नं. म्हातारा चुकवीत नव्हता. तो गेल्यानंतर कुणीतरी करायला नको? होतंय तोवर जायचं. वारीतच म्हातार्‍यापाशी जायला मिळालं तर भाग्य.'
'तुमच्या घरातनं फक्त तुम्हीच?'
'कामाची माणसं कशी येणार बाबा? थोरल्यावरच सारं शेतीचं हाय. पाऊस पडला नाही, पण वाट बाघायची. आहे तेवढ्या जमिनीत कायतरी टाकलं, तरच सालभर घर खाईल. धाकला सोसायटीत नोकरीला. दोनी बायांना पण पोरांकडे पाहायला लागतंय. मलाच एक काम नाही. घरात आतबाहेर करन्यापरास हे बरं ..'

***

'दादा, कशीय खिचडी?'
'झकास. असलं खायला देणं पुण्याचं काम.'
'एकादशी नेहमी करता काय?'
'करतो. पण असलं काही खायला मिळत नाही. अनेक उपास घडतात. त्यातलाच एक एकादशीचा समजावा.'
'घरी शेती-भाती नाही वाटतं?'
'अर्ध्या-एक एकर कोरड जिमिनीवर आठ-दहा पोटं कशी भरणार बाबा? गरिबी पाचवीलाच आमच्या. महिना-महिना बंदा रूपया बघायला मिळत नाही. हे बरं. विठ्ठल भेटतोय. त्याशिवाय आख्ख्या वर्सात खाल्लं नसंल, इतकं चांगलं खायला मिळतंय. गावोगावी मान हुतोय. पुन्यासारख्या मोठ्या शारात कोण आणंल आमाला? पण आता येतो. झाक गाणी-अभंग गात दोन दिवस राहतो. पाहूणचार मिळतो. सालभरातनं एवढंच आमचं फिरणं. पण लई बरं वाटतं'

***

'मावशी, कोण गाव?'
'बारामतीजवळ, भाऊ'
'कोण आणि सोबत?'
'म्हातारा अन माजा मोठा हाय सोबत. बाकीची गावातली'
'सुन नाही आली?'
मावशीनं तोंडाचा पट्टा चालू केला. घरात कशी सुखानं खाऊ देत नाही, ते बैजवार सांगू लागली. असली सुन असल्यापरीस नसलेली बरी, हे सांगितलं. नातवंडं कशी खा-खा करतात अन घरात सळो की पळो करून सोडतात, मुलगा चांगलाय, पण 'हिनं' भरवलं, की 'फिरतोय' हेही सांगून झालं.

मावशीचा आवाज वाढला, तसा तिचा लेक जवळ येऊन गुरकावला, तशी मावशी खाली आली, पण कुरबूर चालूच. मग तो आमच्याकडे मारक्या नजरेने पाहत तिच्यावर खेकसला, तशी आम्ही तोंडं लपवली..

***

'नमस्कार, गुरूजी. कुठनं आलाय?' प्राथमिक शाळेचा मास्तर असावा, हा आमचा अंदाज अगदी खरा निघाला. यवतमाळजवळच्या कुठल्या छोट्या वाडीहून आलेला.
'विठ्ठलावर फारच भक्ती दिसतेय..' पाढरा स्वच्छ नेहरू शर्ट-पायजमा, गळ्यात टाळ, कपाळावर बुक्का, अष्टगंध अन चंदनाने बनविलेला 'यु' आकाराचा टिळा, हातात भगवा झेंडा- अशा खास 'वैष्णव-ड्रेस-कोड' मध्ये तो होता.
'हो. ती तर आहेच. विठ्ठलच आमचा कर्ता-धर्ता. पण यानिमित्ताने जरा बाहेर पडतो. चार गावं बघायला मिळतात. चार डोक्यांचे विचार ऐकायला मिळतात. माझी जिथं बदली आहे, ती एक ओसाडवाडीच आहे. भयानक दारिद्र्यातही ती लोकं अंगावर काटा येईल इतक्या शांतपणे जगतात. वर्षानुवर्षे तिथं काहीच घडत नाहीत. अगदी एकमेकांसारखे दिवस जातात. करमणूक काही नाही. बसून धड बोलावं असा सुरता माणूस नाही. संध्याकाळी सहा वाजता जेवणं अन सातला गाव चिडीचूप होतं. कधी हे गाव अक्षरशः खायला उठतं. त्यामुळे ही वारी म्हणजे आम्हाला सण-समारंभांसारखीच वाटते..'

मास्तर आणखी बरंच काय-काय बोलत होता. विठ्ठलनामाच्या जयघोषाच्या पार्श्वभुमीवर ते ऐकत पायाखालची वाट कशी सरतेय, ते कळत नव्हतं..

***

एव्हाना पावसानं आपलं काम चालू केले होतं, अन अजून दिवेघाट दुरच दिसत होता. मनाशी हिशेब केला-घाट दोन-तीन किमी तरी अजून दिसतोय. घाटाची लांबी चार-पाच किमी, अन घाट चढल्यावर सासवड नऊ किमी! सगळे एकमेकांकडे बघत कसंनुसं हसत होते, पण खरं तर पाय प्रचंड दुखायला लागले होते- म्हणजे पायात कोणत्या ठिकाणी स्नायू आहेत, कुठे हाडे, अन ती कुठे एकमेकांना जोडली आहेत- हे अगदी लख्ख कळत होतं. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अजून खुप मागे होती, अन संबंध दिवस अजून हातात होता, त्यामुळे कळ सोसेनाशी झाली की टेका थोडावेळ- हा प्रकार चालू झाला. बाजूला नाचत-गात जाणारी म्हातारी-कोतारी बघितली, की लाज वाटे अन थकवा झटकून पुन्हा सारे चालू लागत.

घाट चालू झाला अन सोबत पावसाचा लपाछपीचा खेळही. पण आता पश्चात्तापही वाटायला लागला- बुट घालून आल्याचा. पायाची बोटे एकमेकांना घासली जाऊन असा त्रास चालू झाला की पाय ठणकणे परवडले, असं वाटू लागलं! शेवटी बुट-सॉक्स काढून सरळ हातात घेऊन चालायला लागलो, तेव्हा बरं वाटलं. पायाला खडे टोचत होते, पण मघाच्या त्रासापेक्षा परवडलं.

पुन्हा चहा प्याल्यावर थोडा उत्साह आला अन एक दिंडीत प्रवेश करून सरळ नाचायलाच सर्वांनी चालू केलं. एकाच्या गळ्यातले टाळ, एकाचा झेंडा, अन एक छोटी ढोलकी असं सगळं मिळवलं अन दिंडीच्या पुढेच सर्वांनी गजर चालू केला. वारकरी लोकही कौतूकाने बघू लागले. एका बाजूला डोंगर, दुसर्‍या बाजूला दरी, मध्ये रस्त्यावर सगळे एकाच दिशेने शिस्तीत जाताहेत, हे दॄष्य भारून टाकणारं होतं. टाळ, झेंडा वगैरे आलटून पालटून एकमेकांच्या हातात देत आम्ही पुढे जात होतो. शेवटी आमच्यातल्या एकाने टाळाचा कब्जा घेतला अन आमच्याकडे फिरूनही न बघता नाचत-नाचत तो जो निघाला, तो पार दिसेनासा होईपर्यंत. एवढ्या गर्दीत ह्याला शोधावा कसा, हा एक प्रश्नच होता. सर्वांच्या मोबाईलवर रेंजची बोंबच होती. हा पठ्ठ्या आम्हाला दोनेक तासांनंतर सापडला तो पार घाट चढून वरती पोचल्यावर- तेही बरीच फोनाफोनी पार पाडल्यावर.

घाट चढून आल्यावर नि:श्वास टाकला. समोर मैदानात अन रस्त्यावर सर्व थांबलेले दिसत होते. हा माऊलींचा 'विसावा'. (एकोणिसावा कसा दिसला नाही अन पुढे एकविसावा आहे का, वगैरे पीजेही करून झाले.). मोफत वाटपाचं पुन्हा पीक आलं. आता खायची गरज होतीच, त्यामुळे आम्हीही त्यात घुसलोच.

या अन्नवाटप व इतर मदत करणार्‍यांना आळंदीला पालखी प्रमुख, ट्रस्ट वगैरेंची आधी परवानगी घ्यावी लागते- ही नवीन माहिती मिळाली. हे तर पाहिजेच. कारण लाखोंच्या संख्येने येणार्‍या या भाविकांना दान केलेल्या पदार्थांतून कुणी दगाफटकाही करू शकतो- हे टाळावं म्हणून या दान करणार्‍यांची व्यवस्थित नोंद ट्रस्टच्या दप्तरात केली जाते.

पोट भरल्यावर नव्या दमानं चालायला सुरूवात केली, पण आता निराळाच प्रकार चालू झाला. 'विसावा' उरकल्यावरही अन्नाचं दानधर्म संपेना. सर्वांची पोटं आता भरलेली, अन चालवलं जावं म्हणून हे अधिकातलं मोफत वाटप प्रत्येक जण टाळू लागला. पण वाटपवाले स्वयंसेवक अक्षरशः वारकर्‍यांचा रस्ता अडवून ' माऊली, खिचडी घ्या', 'माऊली केळी खा', 'माऊली, गरम चहा प्या'- असा आग्रह करू लागले. हा प्रकार आम्हाला नवीनच होता. आतापर्यंत खाद्यपदार्थांचे रिकामे द्रोण अन चहाचे रिकामे कप रस्त्यावर पायदळी तुडवले जात होते. आता भरलेले द्रोण पायाखाली येऊ लागले. पुढे तर रस्त्याच्या कडेला तशाच भरलेल्या द्रोणांचे ढीगचे ढीगच दिसू लागले. पण कार्यकर्त्यांचा हा जीवघेणा आग्रह कमी होईना. काही तर चक्क हाताला धरूनच ओढत होते..

हे सगळं सहन न होऊन शेवटी एका मग्न कार्यकर्त्याला आम्ही सांगितलं, 'कशाला वाया घालवतोस? कुणीच खात नाहीये, अन रस्त्याच्या कडेला भरलेल्या द्रोणांचा ढीग लागलाय ठिकठिकाणी..' पण एकवार आमच्याकडे पाहून पुन्हा 'माऊली- या, घ्या, खा, प्या-' चा जयघोष चालू केला.

चकित होऊन आम्ही त्याच्याकडे बघत राहिलो, तर शेजारच्या एकानं माहिती पुरवली- 'तो थांबणार नाही. त्याच्या पक्षाचा बोर्ड बघताय ना त्याच्या गाडीवर? तिथून त्याला अमुक एक द्रोण खपवायचं टार्गेट मिळालंय. फेकलं गेलं तरी बेहत्तर, पण ते टार्गेट तो पुर्ण करणारच. बहूतेक इंसेंटिव्हही असेल त्याला!'

आम्ही आ-वासून ही अनमोल माहिती देणार्‍याकडे पाहत राहिलो. दर दहा फुटांवर कोणत्या तरी पक्षाचे किंवा कंपनीचे काम करणारे 'स्वयंसेवक' मात्र रस्त्यावरून ग्यानबा-तुकारामचा घोष करत जाणार्‍या वारकर्‍यांना आपल्याजवळील जिन्नस खाण्या-पिण्यासाठी बळजबरीने ओढतच होते..!!

***

पाय असल्याची जाणीव एव्हाना तीव्र झाली होती, पण एक अनामिक ओढ सासवडकडे खेचत होती, हेही खरं. आजूबाजूला चालणार्‍यांकडे बघून पाय पुढे पडत होते, पण मध्ये-मध्ये थांबण्याचं प्रमाणही आता वाढलं होतं. एका मैलाच्या दगडावर पाय धरून बसलो, तर एक मावशी हसून म्हणाली, 'उठ बाळा, चालू लाग. थोडं दुखंल, पण सकाळी पुन्हा ताजातवाना होतोस की नाही बघ! पंढरीनाथ जास्त कुणाला दुखणं देत नाही.. चला आता!'

वारं भरल्याप्रमाणे पुन्हा उठलो तेव्हा जाणवलं, ही श्रध्दाच माणसाला बळ देत असावी. परमेश्वर आहे की नाही, यावर वाद घालण्याइतके आपण तज्ज्ञ नाही हे खरं. पण परमेश्वराचं अस्तित्व नाकारून त्याला रिटायर करा म्हणणार्‍यांना सांगावसं वाटलं- बघ बाबा, ही सामान्य माणसं. अनंत प्रश्न अन दुखणी घेऊन जगणारी. अर्ध्या भाकरीचा प्रश्न कुणाला कितीही छोटा वाटला, तरी तोच त्यांचा यक्षप्रश्न. त्यांना जगायचं बळ परमेश्वराच्या श्रध्देतनं मिळत असेल, तर कशाला त्यांना सांगायचं, की देव नाहीच म्हणून? या अपार भक्तीच्या जोरावर जगणार्‍या एखाद्याला देव नसल्याचं पटवून देण्यात यशस्वी झालासही, तरी तो उन्मळून पडेल अक्षरशः! देव मानू नकोस, म्हणजे हे आयूष्य जगू नकोस- असं सांगण्यासारखंच आहे की..

खेड्यांतल्या वार्‍यांसोबतच काही छोट्या अन मोठ्या शहरांतल्या वार्‍याही दिसत होत्या. पर्यावरण, वाहतूक, लोकसंख्या, पाणी, शिक्षण, मुलींबद्दलचा दृष्टीकोन असा काहीतरी विषय घेऊन जनजागृतीच्या दृष्टीने पाट्या-बॅनर्स घेऊन वारीत चालण्याचा कौतूकास्पद उपक्रमही काही सुशिक्षित मंडळी करत होती. हे छान. वारी म्हणजे वेळेची नासाडी असं म्हणणार्‍यांना ही सणसणीत चपराकच म्हटली पाहिजे. ही लोकं शेकडो गावांतून जाणार, अन लाखो लोक हे सर्व पाहणार असा विचार करता, वारीचा 'टीआरपी' अशा शहाणपणानं वापरून लोककल्याणाच्या कामाकरिता वापरण्याला 'वेळेची नासाडी' म्हणणारा चांडाळच ठरेल नाही तर काय! सरकारनेही याबाबत विचार केला म्हणजे थोरच! महाराष्ट्र ऊर्जा विकास महामंडळाची एक मस्त सजवलेली गाडीही वारीसोबत. तीवर सौर्य-ऊर्जेवरील उपकरणे अतिशय आकर्षकपणे मांडलेली- म्हणजे सोलर सिस्टिम्स, सोलर कुकर, सोलर लँटर्न्स, सोलर बॅटरीज वगैरे. शहरांमध्ये सोलर माहिती असलं तरी ग्रामीण भागांत बोंबच आहे, त्यादृष्टीने लाखो ग्रामीण लोकांची गर्दी होणार्‍या या वारीचा असा उपयोग म्हणजे ग्रेट. लांबूनच लक्ष वेधून घेणारी ही गाडी बघायला प्रत्येकजण तिच्या जवळ जाऊन बघत होता अन सोलर हा शब्द तरी लोकांपर्यंत पोचवण्याचाही हेतूही तिथंच सफल होत होता. (खाली प्रतिसादात या गाडीचं एक छायाचित्र आहे.)

वारीचा या पध्दतीने आणखी काय उपयोग करता येईल याचा साहजिकच मनात विचार चालू झाला..

***

मागे, म्हणजे हडपसर संपल्यानंतर, फुरसूंगीच्या आसपास अन त्याही पुढे नैसर्गिक विधी वाटेल तिथं करताना लोक दिसले, महिला वर्गाची कुचंबनाही होताना दिसली तेव्हा खुप वाईट वाटलं होतं. आता घाट चढून दोनेक किमी आल्यावर, पडदे लावून 'चराची स्वच्छतागृहे' एका संस्थेने उभारलेली दिसली तेव्हा कौतूक वाटलं. खाण्यापिण्याचं (अगदी वाया जाईपर्यंत, पायदळी येईस्तोवर) अन इतर वस्तू वाटण्यापेक्षा हे केवढं अवघड काम! चर खणून त्याचा वापर झाल्यावर, म्हणजे वारी पुढे सरकल्यावर ते पुन्हा बुजायचे अशी बहूधा कल्पना असावी. या संस्थेचं खरंच कौतूक करावं वाटलं. पुण्यात, अन नागरी वस्ती असते तिथे हा प्रश्न आणखीच गंभीर होतो. तिथं अशाच काही प्रकारची सुविधा करता येईल का, याचा विचार वाया जाणारं वाटणार्‍यांनी केला पाहिजे, असं वाटून गेलं.

पदयात्रा पुढे सरकत होती, अन सासवडच्या खुणा दृष्टीपथात येत होत्या. सोबत ऊन-पावसाचा खेळ अन चालत थांबणं, उठून चालणं हे चालूच होतं. सासवडकर उलट्या दिशेने चालत येऊन पालखीचे दर्शन, स्वागत वेशीपाशीच व्हावे या दृष्टीने घाई करताना दिसत होते (पालखीला 'घ्यायला' चाललोय- म्हणत होते..!). एव्हाना वारीच्या मुक्कामाचे तंबू-राहुट्या दिसायल्या लागल्या होत्या. त्या त्या दिंडीच्या 'केअर-टेकिंग टीम'नं पुढे येऊन ही सर्व तयारी केलेली.

आता मात्र थांबायचं ठरलं. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गावात मुक्कामाला थांबते तिथे जाऊन तोबा गर्दीत जाऊन चेंगरवून घेण्यापेक्षा रस्त्यातच पालखीचं दर्शन घेऊन परतीच्या वाटेला लागायचं असा विचार केला. मग एका कट्ट्याला टेकून पाच-दहा मिनिटं होतायत तोच पावसानं दहा-वीस सेकंदातच मोठ्या प्रेमाने भिजवलं. आसरा शोधत शोधत धावपळ झाली. मग नजीकच असलेल्या एका वारीच्या तंबूचाच आसरा घ्यावा लागला..

***

एका रांगेत पाच-सहा तंबू (वारकर्‍यांच्या मुक्कामासाठी) अन समोर मैदानात एका ट्रकलाच एका बाजूला मोठे कापड (ताडपत्री किंवा प्लास्टिक कोटेड असावे- पावसासाठी. सगळ्या तंबूंसाठीही हेच वापरलेले) लावून तयार केलेला आणखी एक- हा स्वयंपाकासाठी. पावसातनं घुसलो- ते थेट याच तंबूत. तिथून सर्व तयारी बघितल्यावर आतापर्यंत या 'केअरटेकर टीम'नं किती काम करून ठेवलं होतं, ते लक्षात आलं. घाण, चिखल, उकिरडे बाजूला करून ती जागा सखल करणे, भल्यामोठ्या लोखंडी खिळ्यांच्या साह्याने तंबू उभारणे, प्रत्येक तंबूच्या चारही बाजूंनी पाणी वाहून जावे, म्हणून चार्‍या तयार करणे, सगळं सामान त्यांत लावणं, हे सर्व झाल्यावर पाणी अन स्वयंपाकाची तयारी करणे हे सगळं उरकून झालं होतं; अन आम्ही आसर्‍याला म्हणून शिरलो, तर तिथले तिघे कांदे, बटाटे, मिरच्या, कोथिंबीर कापत बसले होते. त्या कापण्याच्या पध्दतीवरनं स्पष्ट कळत होतं, हे हाडाचे स्वयंपाकी आहेत. बोलणं आपसूकच चालू झालं..
'कुठली दिंडी?'
'शाहूवाडी- कोल्हापूर. हे पोतं घ्या खाली बसायला. खालची जमीन थोडी ओली झालीय खरी. पण इथं काय लोक झोपणार नाहीत. ही जागा फक्त स्वयंपाकाची.'
'किती लोक आहेत तुमच्या दिंडीत?
'शहात्तर. अन आम्ही पाच. गेली २० वर्षे येतोय. त्याआधी वडील यायचे. आम्ही करतो, हे सुध्दा पायी चालण्याइतकंच अवघड काम हो. त्यांचं काम पुढे चालू ठेवायचं म्हणून हे स्वयंपाक अन तंबू लावणं वगैरे शिकून घेतलं. होतंय तोवर करणार.'
'इथनं शे-पन्नासच तंबू दिसताहेत. बाकीच्या दिंड्या कुठे थांबतात?'
'जागा मिळेल तिथं. खरं सांगू? प्रत्येक दिंडीची जागा ठरलेली असते. नाहीतरी एवढ्या लाखो लोकांच्या गर्दीमधनं आपला मुक्काम लोक कसा शोधणार? म्हणजे असं, की आता तुम्ही बघताय, ही जागा गेले चाळीस वर्षे आमच्याच दिंडीची. त्याआधीही असेल. पण आता ही समोरची भली मोठी कंपनी बघताय का? (समोर इलेक्ट्रॉनिका मशिन टुल्सचा मोठा कँपस दिसत होता.) त्या कंपनीनं ही जागा विकत घेतलीय. त्यांनी आजच आम्हाला सांगितलंय- हे शेवटचं वर्ष. पुढच्या वर्षी मुक्काम हलवा! कुठे जाणार आम्ही? याच जागेची आठवण करत आम्ही वारी जगलो. वर्षभर त्या आठवणी पुरवत संसार केला, पांडूरंगाचं गाणं गात पोरं मोठी केली, मार्गी लावली. आता हे म्हणतात- इथं येऊ नका. एकच तर मुक्कामाचा प्रश्न आहे. थकले भागले वारकरी टेकणार कुठे? माऊलींच्या पादूकांमध्ये आमचा प्राण आहे- आम्ही भुतागत पालखी सोडून दिवेघाटात राहायचं का? कसं करायचं, तुम्हीच सांगा.'

तो बरंच काय काय बोलत होता. त्यातलं काही कळत होतं तर काही अजिबात नाही. अन कळलेल्या प्रश्नांना उत्तर आमच्याकडे नव्हतंच..

***

शाहूवाडीकरांच्या तंबूत टेकल्याने अंमळ शांत शांत वाटल्यागत झालं. पण पाऊस शांत व्हायला तयार नव्हता. समोर रस्त्यावर पुर आलेल्या नदीगत एकाच दिशेने सारखी माणसे वाहताना दिसत होती. गजर, नाचणं, गाणं, भजनं चालूच होतं. पालखी केव्हा आपल्यासमोर येणार, अन ही माणसांची नदी केव्हा संपणार, असं विचारल्यावर शाहूवाडीकर म्हणाला- सात वाजेच्या सुमारास पालखी सासवडात प्रवेश करते खरी, पण माणसांची नदी रात्रभर चालूच राहते! कुठून ना कुठून लोक येतच राहतात. रात्री झोपेतनं केव्हाही उठून बघितलं तरी तुरळक का होईना लोक रस्त्यावरनं जाताना दिसतच असतात!

आता साडेसहा वाजले होते. आम्ही कोल्हापुरकरांचा निरोप घेऊन बाहेर निघालो, अन ठरवलं- आता उलट्या दिशेने निघायचं- पालखीला भेटण्यासाठी. बाहेर निघालो, तर प्रचंड थंडीनं काकडलोच. तशातच निश्चय करून पुढे चालायला लागलो. रस्त्यात पालखीचं दर्शन घेऊन येणार्‍या सासवडकरांना 'पालखी अजून किती मागे आहे' ते विचारत पुढे सरकत राहिलो. सासवड नगरपालिकेने उभारलेल्या स्वागत मंडपाजवळच थांबायचं ठरलं.

गावोगावच्या दिंड्या संपून आता पालखीसोबतच्या अधिकॄत दिंड्या सुरू झाल्या. या दिंड्यांची शिस्त पाहून चकितच व्हायला झालं. एकतर ड्रेसकोड! दुसरी गोष्ट आडवी रांग अगदी कटाक्षाने पाळणे, अन त्यातही प्रत्येकाच्या जागा ठरलेल्या. प्रत्येक दिंडीसोबत 'पालखीच्या मागे की पुढे' अन 'अमूक नंबर' असा बोर्ड किंवा पाटी घेतलेली माणसं. कुठेही गोंधळ नाही, बेशिस्त नाही, रांग मोडणं, अन थकलो- म्हणून थांबणंही नाही! आणखी एक माहिती मिळाली- ही पालखीसोबतची अधिकृत दिंड्यांवाली माणसं रस्त्यात मोफत वाटपातलं काहीही घेत नाहीत, खात नाहीत. अधिकृत थांबा किंवा 'विसावा' (आता विसाव्याचं महत्व कळलं) जिथे असेल, तिथेच ते थांबतात, अन त्यांच्यासाठी केलेलं अन्न खातात! हे म्हणजे थोरच. फक्त चांगलंचुंगलं खायला मिळतं म्हणून काही लोक वारीला येतात, या आमच्यापैकी काही जणांच्या मतांवर या लोकांनी प्रश्नचिन्हच उभं केलं..

माऊलींचे अश्व आले, अन नगरपालिकेच्या स्वागतमंडपावर एकच गडबड उडाली. पालखी थोडीच दुर राहिल्याची ही खुण होती. दिंड्याची दाटी आता वाढतच चालली होती, अन त्यासोबत स्टेजवरच्या पुढार्‍यांची माईकवरची बडबडही. पालखी दुरूनच येताना दिसली, तेव्हापासूनच रेटारेटी चालू झाली, अन पालखी जवळ आल्यावर ती प्रचंड वाढली.

आली आली, पालखी आली- चा गजर झाला; अन मंडपावर धमालच उडाली. पालखीसोबतच्या पोलिसांचे गर्दी आवरता आवरता नाकी नऊ आले. त्यातही मोठमोठ्या फुलांच्या माळा दुरवरून पालखीवर, पालखीच्या आत फेकताना पाहून थोडं विचित्र वाटलं. कित्येक लोक एकाच वेळी माऊलींच्या पादूकांना कमीत कमी स्पर्श व्हावा, म्हणुन जीव तोडू लागले. तो सोहळा डोळ्यांत साठवण्याच्या आतच पालखी पुढे मार्गस्थ होताना दिसली, तेव्हा आपल्याला स्वप्न पडलं की काय- असं वाटायला लागलं!

आता आमचा प्रवास उलट पावली चालू झाला. गजर करत, अन नाचत- पाठमोरे वारकरी जाताना बघितले, अन काही तरी चुकल्यागत वाटलं. जेमतेम बारा-चौदा तासांचा ऋणानुबंध, पण जीवा-भावाचं काहीतरी सोडून जातंय असं वाटून घसा दाटल्यागत झाला.

आम्ही थकल्या पावलांनी नि:शब्द होऊन पाठमोर्‍या वारीला हात हलवत निरोप देत होतो. अन वारी हजारो वर्षांची रीत असल्यागत आमच्याकडे न पाहता, आम्हाला मागे टाकून विठ्ठ्लाच्या भेटीच्या ओढीनं दुप्पट उत्साहाने पुढे वाहत होती..

वारी कसली, वाहती रीतच होती ती..!!

***
संपुर्ण
***

'वाहती रीत' हा शब्दप्रयोग स्लार्टीचा. इतका भावला की लिहायला घेतल्यावर दुसरं शीर्षकच सुचलं नाही..

गुलमोहर: 

साजिरा, अप्रतीम!!

सुरेख साजीरा Happy
येऊ दे भर भर Happy

काय सुरेख लिहिलंय. खरंच नशीबवान आहात! वारी सोबत चालायची सवय वगैरे केलीच नव्हती का आधी? अतिशय कौतुकास्पद!

पहिल्यांदाच गेलो. पण पायी चालायचं दुखणं एका दिवसात संपलं. त्याच्या बदल्यात 'वारीच्या दुनियेच्या' अनुभवाचा एक मौल्यवान खजिनाच माझ्या अकाऊंटला जमा झाला..

साजिरा, अजुन येउ द्यात. मस्त वाटतंय वाचायला. "पालखी" पाहीलं होतं त्याची आठवण येतीय.

साजिरा, छानच लिहिलाय वारीचा अनुभव तुम्ही.

वारीला जाण्याचं पुण्य घेतलय तर खिशात टाकुन, एकंदरच वारी केलीच नाहीयेत तर अनुभवलियेत सुध्दा, साजिरा मान गये दोस्त ! Happy
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

अरे वा. छान मांडता आहात अनुभव.
>>>ही लोकं इतक्या दुर पायी जाऊन काय मिळवत असतील, असं वाटून जायचं.
अगदी हेच कुतुहल आहे वारीबद्दल. त्यामुळे पुढल्या भागांबद्दल उत्सुकता वाटत्ये.

साजिरा ..
वाट बघतोय ... लवकर लिहा पुढचं Happy
>> बहूतेक नफा कमवायचाच नाही असं एकदा ठरल्यावर आपल्या दानतीत येणारी चव बहूधा त्या चहात उतरली होती..!
खास आवडलं Happy

छान मस्त .. येउ देत पुढचा भाग लवकर... वारीला निघाल्या सारख वाटतय.

या म्हातार्‍याने गाण्यावर 'बारीक' ताल धरला, अन त्याच्या कौतूकासाठी गर्दी जमली
Vaari1.jpg
पाऊले चालती, पंढरीची वाट..
Graphic2.jpg
पायाचे तुकडे, अन चिखलातच बसकण!
Graphic1.jpg

ही आषाढीची वारीपण करायची आहे एकदा.. मस्त रे साजिरा.. मी पण जरा लवकर लवकर उरकतो माझी वारी.. आषाढीच्या वारीमध्ये एक रिंगण नावाचा प्रकार होतो पुढे पंढरपूरापाशी.. जिथे रिंगण असते तिथे बाजीरावाची विहिर आहे.. ऐतिहासिक संदर्भ माहिती नाही.. आता गावाचे नाव पण आठवत नाही.. पण रिंगण एकदा अवश्य बघण्यासारखा प्रकार आहे..

पुण्यात ९०-९१ साली आषाढीची वारी बघायचा योग आला होता. अक्शर्शः रोमांच उभारले होते. पण नंतर कुणाच्यातरी तोंडुन 'वाहतुकीचा किती खोळांबा होतो' वगैरे एकले होते ते ऐकुन खुप वाईट वाटले होते.
पुढच्या लिखाणाची वाट पहातोय.

बहूतेक नफा कमवायचाच नाही असं एकदा ठरल्यावर आपल्या दानतीत येणारी चव बहूधा त्या चहात उतरली होती..! >> अप्रतीम!!!!

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

फारच सुरेख लिहिल आहे वर्णन. पुण्यात राहून, दारावरून जाणारी पालखी फक्त पाहायचो. पण पालखी बरोबर जाणं जमवल नाही. पण ह्यावाचनाने अनुभव घेता येतो आहे हयातच समाधान मानाव लागणार आहे.

असच सविस्तर वर्णन येऊ दे.

वा अप्रतिम!! वारीचे असे वर्णन कधी वाचायला नाही मिळाले.. माझी आईदेखील या वर्षी आळंदीपासून पुण्यापर्यंत वारीबरोबर चालली.. तिच्या कडून ऐकलंच वर्णन, मलाही हाच प्रश्न पडला, की एव्हढं पहाटे४ ला उठुन दुपारी ५ पर्यंत चालत येण्यासारखं काय आहे वारीमधे.. अर्थात लहानपणापासून वारी , काही वारकरी आमच्या कॉलनीतून जायचे,एका बिल्डींग मधे त्यांच्यासाठी जेवणं असायचे..तो विठ्ठ्लाचा गजर्,तल्लिन झालेले वारकरी..नुसतं त्यांच्याकडे पाहून इतकं छान आणि प्रसन्न वाटतं! रोमांचं येतात अगदी अंगावर.. परंतू प्रत्यक्ष तिथे कसे वाटत असेल ते आईने फोनवर सांगूनही नीट कळले नाही.. पण हे अगदी डिटेलवार आहे! Happy फोटो पण मस्त! तिथेच पोचले मी!! अजुन खूप फोटो येउदेत..आवडतील बघायला..

भरलेले द्रोणांचा ढीग, आणि तरीही स्वयंसेवकाचा आग्रह विपरीत आहे! लोकं कुठे राजकारण करतील्,आणि स्वार्थ बघतील त्यांच त्यांनाच ठाऊक!

व्वा. वारी डोळ्यासमोर उभी केलीत.
साजिरा पुण्यवान आहेस!

खुप सुरेख साजीरा....... लवकर येउ द्या पुढचा भाग..
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल....

सुरेख लिहीतोयस रे ! बोलत आणि बोलतं करत गेलास हे फार छान आहे.

    ***
    Insane : When you're crazy and it bothers you.
    Crazy : When you're insane and you like it.

    साजिरा, सही लिहितोयस.
    पुढचा भाग लौकर टाक.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Order is for idiots. Genius can handle chaos.

    मस्त अनुभव वर्णन करताय साजिरा तुम्ही.... नुसते फोटो पाहून भावना उचंबळून येतात तर प्रत्यक्ष वारीत सामिल झाल्यावर काय होईल.... सुरेख एकदम!!

    आधी पोटोबा, मग विठोबा!
    DSC03839.jpg
    आघाडी शासनाची कृपा!
    DSC03858.jpg
    महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाची सजवलेली गाडी ही वारीत सामील झाली होती.
    DSC03863.jpgMahaUrja.jpg
    टाळ्करी..! वारकरी..!!
    DSC03899.jpgDSC03902.jpg
    घाटातली वाट, काय तिचा थाट..
    DSC03934.jpgDSC03873_0.jpg
    मध्ये बारीक पांढरी रेघ दिसते का? रेघ कसली, वारी!!
    DSC03940.jpg
    साधे सरळ वैष्णव जन..
    DSC03956.jpgDSC03888_0.jpg
    चहा- नाश्त्याच्या गाड्यांचीही वारी!
    DSC03962.jpg
    हा बाप्प्या बघा वडाच्या पारंबीवर..
    DSC03977.jpg
    आम्हीही प्रयत्न केला, पण पोटाला कळ लागली, अन हात सोलवटले..
    DSC03981.jpg

    साजिरा, खुपच छान लिहिलय. अगदी प्रत्यक्ष वारीत दाखल झाल्यासारखे वाटले.
    आणि तटस्थपणे लिहिलय त्यामूळे फारच आवडलं.

    वारीसाठी चालायचा सराव वगैरे काही नव्हता केला मी पण.... अप्रतिम अनुभव आहे. प्रत्येकानी जरुर घ्यावा. वारी शारीरीक बळावर अवलंबून नाही केली जात ती इच्छाशक्तीवर केली जाते हे माझं मत. इतकी म्हातारी कोतारी इतके मैल पायी चाललीच नसती फक्त शारीरीक बळाचा विचार केला तर. जगात कुठेच असं होत नसणार इतकी लाखो लोकं एक परंपरा जपायला इतकं अंतर चालून जातात. विशेष म्हणजे यातल्या एकालाही कुणीही आमंत्रण पाठवत नाही.

    वारीबद्दल खरंच खूप लिहीण्यासारखं आहे.

    ~~~~~~~~~
    ~~~~~~~~~
    Happy

    छान लिहितोहेस रे साजिर्‍या! (अनुभवाचे बोल, दुसर काय?) Happy
    ...;
    आपला, लिम्बुटिम्बु

    साजिरा, खुपच छान लिहिलय. अगदी प्रत्यक्ष वारीत दाखल झाल्यासारखे वाटले.व्वा. वारी डोळ्यासमोर उभी केलीत.

    लेख आणि छायाचित्रे दोन्हीही उत्तम !

    वारीला जायचं असेल तर चालायचा सराव करावा हे चांगलेच.. आषाढीच्या वारीला फार दमायला होत नाही.. दिवसात १५-२० किमी चालतात.. मधे मधे एखादा विश्रांतीचा पण दिवस असतो.. पण आमच्या इथुन जी कार्तिकीची वारी निघते ती चार दिवसात मिरजेहून पंढरपूरला पोचते... त्यामुळे पायाचे पार तुकडे पडतात..

    अमच्या इथुन ३-४ जण माघीच्या वारीला पण जायचे.. स्वत:चं सामान पाठीवर घेउन.. आजकाल जातात की माहिती नाही.. त्या ३ जणातला एक अवलिया मेला पण.. ते मिरज ते पंढरपूर अंतर ३ दिवसात कापायचे..

    मिरज ते पंढरपूर हे १२८ किमी अंतर २ दिवसात कापलेले पण मी पाहिले आहे.. पहिल्या दिवशी ८४ किमी आणि दुसर्‍या दिवशी ४४.. ज्या दोघांनी हा पराक्रम केला होता त्यांच्या बरोबरीनं त्यांचं सामान घेउन मी सायकलवर गेलो होतो..

    फारच छान लेका. धमाल. मी असाच नाशिक ते सप्तशृंग गड तोही रडतोंडीचा घाट चढून गेलेलो आहे पावसात !!! विसरणं अशक्य !!!!!! टॉप मेजवानी दिलीस.

    साजिरा, मिनू, आशुडी चांगली माहीती व फोटो.

    वरच्या काही फोटोतुन एक वेगळी गोष्ट पाहायला भेटते ती म्हणजे रांग. एक लाईन वारीसाठी व दुसरी वाहतुकीसाठी ठेवलेली व पाळलेली दिसते. - मग बाकीच्या वेळेस हेच लोक रांग का पाळत नाहीत हे कळत नाही Happy

    ती इच्छाशक्तीवर केली जाते >>> अनुमोदन. माझे काका ७० वर्षांचे आहेत, दोन मोठे रोग त्यांचा सोबतीला आहेत पण ते वारीला नियमीत जातात. गेल्या वर्षी पहिलेंदाच ते वारी पुर्ण करु शकले नाही व २/३ मार्गातुन हॉस्पीटलात दाखल झाले. ह्या वर्षी परत वारीत आहेतच.

    वारीत दुसरा मोठा प्रश्न म्हणजे प्राण देन्याचा. चंद्रभागेत खुप जन आत्मसमर्पण करतात. पोलीस ह्यावर भरपुर उपाययोजना करत असतात पण एका भाविकाची साथ दुसर्याला असल्यामुळे आत्म समर्पनाच्या खुप केसेस पंढरपुरात होतात. ह्या साठी डॉक्टर लोकांचा एक मोठा ताफा सरकारी ईस्पीतळातुन पंढरपुरात दाखल केला जातो. आपल्या पैकी कोणाला वारीला जायचे असेल व तो / ती डॉक्टर असेल तर ह्या योजने अंतर्गत तुम्ही भाविकांची मदत करु शकता.

    वारी साठी ऐस टी ही मोफत गाड्या सोडत असते. ज्यांना पायी जाने शक्य नाही ते अशा गाड्यांचा लाभ घेऊ शकतात. पंढरपुरच्या जवळ एका मोठ्या पटांगणात एक तात्पुरता डेपो उभारला जातो व तेथुन बरेच लोक एकादशी संपली की परतीच्या गाड्या पकडतात. वारीला प्रत्येक डेपोला गाड्या द्याव्या लागतात. एक महीना आधी पासुनच ही तयारी सुरु असते व प्रत्येक डेपोचे काही माणस पंढरपुरला आठवडाभर असतात. - माझे वडील ऐस टीत असताना सलग १० वर्षे वारीला जायचे, त्यामुळे ही माहीती. Happy
    सरकारने पंढरपुरास एक मोठी बिल्डींग उभी केली आहे. त्यात एकादशीच्या दिवशी रांग लागते. (बालाजी टाईप) पण प्रयेक वारकरी देऊळात जाऊन दर्शन घेत नाही. चंद्रभागेत डुबकी मारुन, कळसाचे दर्शन घेऊन ही मंडळी परतीच्या मार्गावर लागतात.

    कदाचीत पंढरपुरला जातानाच कधीतरी विठोबाला पाहुन होत असेल त्यामुळे दगडी विठोबाला पाहन्याची गरज वाटत नसेल.

    रुप तुझे कैसे पाहू
    आम्ही जाती हिन
    पायरीशी होऊ दंग
    गाऊनी अंभग

    Pages