होळी भाग १

Submitted by नितीनचंद्र on 21 April, 2011 - 12:28

( चिंचवड गावचा इतिहास सांगणारी ही कथा थोडिशी सत्य बरीचशी काल्पनीक. चिंचवड गाव जरा लहान आणि खेडेगाव ते शहर असा प्रवास करत होत तो काळ. गेले कित्येक दिवस लेखन घडत नव्हत. एक मायबोलीकर मात्र मला लिहायला प्रोत्साहन देत होते. त्यांच्या नावाचा उल्लेख न करता ही कृतज्ञता.)
----------------------------------------------------------

व्हळीला गवर्‍या पाच पाच हा आवाज जसा गल्लीत घुमला तशी चा्ळींच्या खिडक्यातुन, अनेक डबलरुम कडे जाणार्‍या बाल्कनी वजा पॅसेजमधुन, अनेक बिर्‍हाडे असलेल्या वाड्यांच्या दरवाज्यात मुलांची गर्दी जमली.

चार वर्ष सार्वजनीक होळीला जणु चिंचवडात बंदी होती. चार वर्षांपुर्वी झालेल्या वरातीतल्या बाचाबाचीच पुढे तुंबळ धुमश्चक्रीत रुपांतर होऊन गल्लीतल्या गाववाल्यांपैकी घरटी किमान एक तरी पुरुष मुक्या माराने जायबंदी होता किंवा जायबंदी होऊन पोलीसांच्या अटकेत किमान सात दिवस होता. गाववाल्यांचे शेजारच्या गावातले नातेवाईक जामिनासाठी वकिल धाडत होते. पुणे पोलीस कमिशनरने गावात शांतता प्रस्थापित होण्यासाठी जामिनाचे सर्व अर्ज कचर्‍याच्या टोपलीत टाकले होते.

दोन गटात कशासाठी मारामारी झाली हे पोलीसांना समजत नव्हते. मुळ कारण समजल्यावर समझोता घडवुन आणण्यास पोलीस इन्स्पेक्टर चिंचवडला तळ ठोकुन होते पण काही समजत नव्हते. मारामारीत सायकलच्या चेन्स, काठ्या, यांचा यथेच्य वापर झाल्यामुळे ही मारामारी पुर्व नियोजीत होती की काय या शंकेने पोलीस ग्रस्त होते. पोलीसांनी पंचनामे केले, घरच्या महिलांच्या जबान्या घेतल्या पण दंगलीचे कारण समजले नव्हते. सात आठ दिवसांनी जेव्हा राजकीय वजनाचे फ़ोन येऊ लागले तेव्हा सगळ्यांची जामीनावर मुक्तता झाली. ज्यांनी एकमेकांच्या डोक्यात ढोल वाजवायची टिपर वापरुन एकमेकांची डोकी फ़ोडली त्यांना दोन दिवसांनी कळेना की हे आपण का आणि कशासाठी केले.

दोन गटात मारामारीचे गुन्हे दाखल करुन जामिनावर मोकळीक देताना राजकीय पुढार्‍यांच्या साक्षीने इस्पेक्टर बर्गे यांनी एक तिढा अक्कल हुशारीने मारला होता. गावच्या प्रत्येक सार्वजनिक कार्येक्रमात प्रत्येक गाववाल्याच्या गटाच्या /गल्लीच्या वतीने एक हमीपत्र द्यावे लागणार होते ज्यात सर्व सार्वजनिक कार्येक्रमात शांतता राहिल याची जबाबदारी घेणारे पाच गाववाले जेव्हा पुढे येतील तेव्हाच सार्वजनिक कार्येक्रमाला परवानगी देण्यात येईल. चार वर्षे गणपती उत्सव साजरे झाले कारण प्रत्येक गल्लीचा वेगवेगळा गणपती उत्सव व त्यात गाववाल्यांच्या बरोबरच बाहेर गावाहुन बिर्‍हाड करुन रहाणारे अनेक उत्सवाचे नेते होते. पण होळी व त्यामागुन येणारा भैरवनाथाचा उत्सव हा सगळ्या गावचा असायचा. वर्गणी सगळ्या गावात मागीतली जायची आणि सर्व गावकरी त्यात सहभागी असायचे. त्यात उत्सवाचे मानकरी असायचे.

गेले चार वर्षे सर्व गावकरी गप्प होते. पोलीसांकडे कोण जाणार आणि कोण परवानगी आणणार ? मारामारीच्या गुन्ह्यात दाखल झालेल्या केसची कशी बशी सुनावणीची पुढे टाकली जात होती. गावची मंडळी एकत्रच कोर्टात जात होती पण वकीलाच्या हुशारीमुळे पोलीस केस मागे घ्यावी. आमची कोणाविरुध्द काहीही तक्रार नाही हे म्हणायला कोणी पुढे येत नव्हते.

यावर्षी परिस्थीती बदलण भागच होत कारण चिंचवड गावची तसेच आजुबाजुच्या गावांची मिळुन एक नगरपालिका अस्तित्वात आली होती. तालुक्याच्या आमदारांनी ह्या नगरपालिकेच्या उभारणीत मोलाची कामगिरी बजावल्यामुळे त्यांचे नियुक्त नगराध्यक्ष हे स्थान गेले पाच वर्षे अबाधित होते. पण आता प्रथमच नगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्याने राजकीय जुळवा जुळव करंणे भाग होते.

गेले चार वर्ष चिंचवडात होळी पेटत तर होती पण या होळीत काही दम नव्हता. गावचा गुरव आणि ज्यांना पाच गवर्‍या मागु शकत होता अश्या घरातुन शंभर दिडशे गवर्‍या आणि पाटलाच्या घरच्या शंभर दिडशे गवर्‍या यातुन होळी जेमतेम रात्री बारा पर्यंत जळत होती.पाटलांना मान देऊन गुरव आपल काम करत होता. पुर्वी सारखी सर्व गावकर्‍यांकडुन व भाडेकर्‍यांकडुन पाच गवर्‍या किंवा घरच्या गवर्‍या नसतील तर एक रुपया वर्गणी कोणी जमा करायला जात नव्हते. वर्गणीच्या पैशामधुन आणखी गवर्‍या खरेदी केल्या जायच्या. किमान हजार गवर्‍या दोन चार मोठी सुकलेल्या झाडांच्या फ़ांद्या यातुन होळी किमान तीन दिवस जळायची. जुने गाववाले या आठवणी काढुन घरी जायचे. तरुण मंडळी होळीला पुरणपोळीच्या निवदाला लहान मुलांना पाठवुन घरात बसायचे.

होळी पुढे ढोल लेझीम, दांड पट्टा, याच्या त्याच्या नावाने बोंब मारणे सगळे बंद झाले होते. भैरवनाथाचा उत्सव त्या निमीत्ताने कुस्त्या, वाजत गाजत निघणारा छ्बीना, तमाशा हेही बंद झाले होते. मारामारी नंतर तीन वर्षे पोलीस फ़िरुन होळीच्या निमीत्ताने काही गुन्हा घडण्याची शक्यता किंवा जुना वाद उफ़ाळुन तर येत नाहीना याची शहानिशा करत होते. गेली चार वर्ष का जाणो आपण हमी पत्र दिल आणि दुसर्‍या कोणी आगळीक केली तर लफ़ड नको म्हणुन कोणीच पुढ येत नव्हत.

चार पाच वर्षात एका पिढीला मिशरुड फ़ुटल.जोश्यांचा राज्या ( राजेश ) नेता झाला. शाळेतल्या लेझीम पथकात राज्या हलगी वाजवायला लागला की इनामदाराचा उस्मान्या पण त्याच्या पुढे फ़िक्का पडत होता. उगाच राज्या दमला तर रंगलेला डाव फ़ुटायला नको म्हणुन शाळेने दुसरी हलगी आणुन उस्मान्याला पण हलगी वाजवायला सांगीतल होत. त्यात चाफ़ेकरांच्या टॉवर आणि पुतळा उभारणीला येणार्‍या नेत्यांच्या स्वागताला गावचे ढोल ताशे सध्या बंद असल्यामुळे या मुलांना बोलावण्यात आले. ह्या हलगीचा नाद जोरदार घुमवल्यामुळे नेत्यांकडुन राज्याला शाबसकी मिळाली. दोन रुपयांच्या बंद्या नोटेने राज्या खुलला. एका गटान राज्याला हाताशी धरुन होळीची वर्गणी जमवण्याचा बेत रचला.बघुयात गावकरी काय साथ देतात याच कानोसा घ्यायला हे बर म्हणुन मुलांना भेळ भत्याची लालुचही दाखवण्यात आली.

राज्याच्या आणि उस्मान्याच्या हातात हलगी शाळेत शिपाई असलेल्या वसंताने शाळेच्या गोदामातुन काढुन दिली. वसंता जरी शाळेत शिपाई होता तरी एका गटाचा नेता होता. शाळेचा मुख्याध्यापक सुध्दा आमदार आणि नियुक्त अध्यक्षांच नाव घेताच वसंताला कशालाही अडवत नव्हता. यावेळेला तर चक्क वसंताने मुख्याध्यापकांना त्यांचा फ़ोन आल्याची थाप मारली. हलगी सारखी शुल्लक बाब असल्याने शहानिशा न करता गोदामाच्या किल्या त्यांनी वसंताला दिल्या.

डिपांग डिपांग हलगी घुमली. जोश्यांचा राज्या पुढे आणि बाकी सगळी मुल मागे अशी होळीला गवर्‍या जमवायला बाहेर पडली. हलगीचा आवाज थांबला की "व्हळीला गवर्या " असा आवाज उस्मान्या द्यायचा की बाकी सगळी मुल "पाच पाच" म्हणुन आवाज टाकायची. अनेक वर्षात ढोल वाजवुन गलका करुन गवर्‍या मागायची प्रथा गेल्या पंचविस वर्षात बंद पडली होती. ढोल वाजवण्याची रित असलेल्या समाजाने चामडी सोलण, ढोल तयार करण असली काम केव्हाच सोडली होती. गेल्या पंचवीस वर्षात ढोल वाजवण्याच काम कोणाच असा कुणाला प्रश्न पडला नव्हता. ज्याला कमरेला पेलवेल आणि नाद धरता येईल तो कोणीही कमरेला ढोल बांधत होता पण फ़क्त गणपतीच्या मिरवणुकीत आणि भैरोबाच्या छबिन्याला. पुढे लाकडी ढोल जाऊन पत्र्याचे ढोल आले, ढोलाला चामडी पानां ऐवजी प्लॅस्टिकची पान आली. पण हे सगळे ढोल मारामारीत फ़ुटले आणि पुरावा म्हणुन जप्त झाले.

गाववाल्या प्रत्येक तरुणाला मोठी गंमत वाटत होती. पण पुढे न जाता जो तो ती हलगी आणि आत्ताच मिसरुड फ़ुटु पाहणारी मुले यांची गंमत पहात होते. राज्या त्याच्या प्रत्येक वयाने मोठ्या पण तरुण गाववाल्याकडे त्याच्या गल्लीत घुसताना होळीला गवर्‍या म्हणुन आवाज देत आशेने पहात होता. जरी नेतेपण घेतल तरी मनात धाकधुक होतीच. गाववाल्या मोठ्या तरुणांना ही कल्पना पसंत पडल्याने प्रत्येक जण त्याला तोंडी नाही, पण नजरेने आणि मान हलवुन संमती देत होता. चार गल्ल्या फ़िरल्यावर राजाने पाचव्या गल्लीत फ़िरताना जणु काही तोच या गावचा सर्वात मोठ्ठा पुढारी असल्याचा आव आणला. चार गल्ल्यात जवळ जवळ पाचशे गवर्‍या जमल्या होत्या. ज्यांच्या कडे गाई म्हशी नाहीत म्हणजे गवर्‍या ही नाहीत अश्या बिर्‍हाडातुन एक एक रुपया करुन साधारण दोनशे रुपये जमा झाले होते. लहान मुले बहिरोबाच्या देवळाच्या दारात मिळालेल्या गवर्‍या पोचवुन पुन्हा परत येत होती.

पाचव्या गल्लीच्या सुरवातीला गुंजाळांच्या वाड्यात खानदेशी - जळगावकडच्या मुलांची खोली होती. हलगीचा आवाज ऐकुन खानदेशी मुल आपल्या लुंग्या सावरत गंम्मत बघायला बाहेर आली. नव्यानच शहराकडे रहायला आलेल्या मुलांना मार्च महिना असल्यामुळे कारखान्यात सुट्या नव्हत्या. यावर्षी इकडची होळी पाहु असा विचार प्रत्येक खानदेशी मुलगा करत होता. राज्या पुढ होताच " ए काढारे रुप्या रुप्या होडीची वर्गणी" त्यांच्यातल्या चौधरीन आवाज टाकला. "होडीची नाही होळीची" राज्याच्या मागे असलेल्या बाब्याने चुकिची दुरुस्ती केली.

कागदाच्या होड्यांना कशाला वर्गणी ? वह्याची पान फ़ाडली की झाल्या होड्या. अभ्यासाचा कंटाळा असलेल्या दिल्याने ( दिलीप ) मनातल्या मनात वह्यांची पाने टराटरा फ़ाडली. अरे बाबा आमच्या जडगावकडे होडीच म्हणतात. दाढीवाला भोळे म्हणाला. त्याच उग्र रुप पाहुन मुलांनी तो विषय थांबवत बस पाचच रुपये ? असा नविन विषय काढला. दहा अजुन देतो की आमच एक काम कराव लागल त्यांच्यातला एकजण भोळे कडे पहात म्हणाला. भोळे ने डोळे मोठे केले पण तो थांबला नाही. रात्री घोटा करणार असाल तर दहा रुपये अजुन देतो. राज्याने खुणेने मान हलवली आणि हलगी पुन्हा घुमु लागली.

आता एकच गल्ली राहिली. ती बामणाची गल्ली. गल्लीच्या तोंडालाच राज्याच घर होत. राज्याचा बाप दामुअण्णा उघड्य़ा अंगाने धोतर सावरीत दारातच उभा होता. भावांची मुल भिक्षुकीत पारंगत झाली होती पण हा राज्या मात्र घरात बापाला दाद लागु देत नव्हता. शाळेत पहिला येतो म्हणुन भिक्षुकीच्या शिक्षणातुन त्याने सुट मिळवली होती. पण हलगी वाजवण, शिपतर वाढवण हे काय आपल काम आहे ? दामुअण्णाला आपल पोरग हलगी वाजवताना पाहिल की तिडिक भरायची. हातात जे मिळेल ते घेऊन त्याला मारायला दामुअण्णाचे हात वळवळायचे. एकदाच चांगला फ़ोडायला घेतला तेव्हा दामुअण्णांची आई मधे पडली. "नाही शिकत भिक्षुकी म्हणुन काय जीव घेशील काय दामु त्याचा". म्हातारी कडाडली. "जशी हलगी वाजवायच काम आपल नाही तस मुलांना मारण पण आपल काम नाही. समजवुन सांग ऐकल तर ठिक नाहीतर तो आणि त्याच नशीब."

आता गोधळ नको म्हणुन हलगी शिकव म्हणुन मागे लागलेल्या बबन्याच्या हातात हलगी सोपवुन राज्या जरा मागे सरकला.

गल्लीत शिरताना परत उस्मान्यान आवाज दिला. "व्हळीला गवर्‍या " हलगी घुमु लागली तेव्हड्यात कोणितरी आवाज दिला "व्हळीरे व्हळी पुरणाची पोळी" बाकीची मुल ओरडली "बामणाच्या xxवर बंदुकिची गोळी" हा आवाज ऐकताच दामुअण्णाच माथ भडकल." काही मिळाणार नाही वर्गणी. चला चालु लागा. इतका वेळ दरवाज्यात उभ राहुन मुलांचा उत्साह निरखण्यात दंग असलेले केशवतात्या पुढे आले. अहो जावई, रागवु नका गावच काम आहे. गोवर्‍या नाहीतर वर्गणी देऊन टाका.

"ब्राम्हणांना काही किंमत आहे का या समाजात कशाला द्यायची वर्गणी हे असल ऐकायला ?"

"रोज थोडीच ओरडतात ही मुल आपल्या नावानी ? पुर्वी होळीला इंग्रज साहेबाच्या नावाने मुल ओरडायची. आता साहेब या देशातुन गेला आणि लगेचच गांधीवधामुळे आपण बदनाम झालो." पंच्याहत्तरीकडे झुकलेले केशवतात्या बोलले. त्यांनी मुलांना खुणेने फ़िरुन यायचा इशारा केला तशी मुल पुढच्या दरवाज्यात गेली.

"दामुअण्णा, ब्राम्हणाने नेहमी क्षमाशील असाव त्यातुन मुलाच्या कृतीकडे दुर्लक्ष कराव. अहो मुल ती, त्यांना काय कळतय ?"

"तात्या माझ लहानपण जळलय या वादात. गांधीवधात वाडा जळाला पाठोपाठ कुळकायद्यात सगळी जमिन संपली. सुखासुखी नव्हतो आलो चिंचवडच्या वेदपाठशाळेत वयाच्या आठाव्या वर्षी. इथे शिक्षणाबरोबर अन्नछत्र होत म्हणुन आलो होतो. काय ब्राम्हणांनी घोड मारल होत म्हणुन आमचा वाडा जाळला लोकांनी ?" दामुअण्णाची भरलेली जखम भळाभळा वाहु लागली.

आता या व्यथेने आपला नवरा जेवणार नाही. रात्रभर उपाशी राहुन मन कुरतडणार या काळजीन राजेशची आई पुढ आली. वाड्याच्या तोडांशी हा नवर्‍याचा आणि वडीलाचा संवाद ऐकुन राजेशच्या आईने आपल्या वडिलांकडे पाहिल. केशवतात्यांनी तिला काळजी करु नकोस मी त्याला शांत करतो असे खुणेने समजावले.

"दामुअण्णा, शांत व्हा जुन्या गोष्टी उगाळुन का कुणाला सुख लाभलय?" भोग असतात दुसर काय." केशवतात्यांनी मलम पट्टी केली. याच बरोबर त्यांना हा इतिहास आठवला. केशवतात्यांच्या घराण्याकडे ग्रामजोशी पद व सगळ्या गावाशी चांगले संबंध असल्यामुळे त्यांचच काय पण अख्ख गाव या वादापासुन लांब राहिल होत. पुढे कुळकायद्यात पाटिलांच्या पुढाकाराने कुळांशी समेट होऊन अर्धी जमिन वाचली होती.

केशवतात्यांची मुलगी दामुअण्णांना दिली होती. चिंचवडच्या वेद पाठशाळेत शिकायला आलेला दामोदर केशवतात्यांच्या नजरेत भरला. वेदपाठशाळेत वेदमुर्ती ही पदवी संपादन करुन भिक्षुकी करु लागला. आजुबाजुच्या पंचक्रोशीत बरेच धनीक रहात होते. त्याच्याकडुन चांगली दक्षिणा मिळत होती. लग्न, मुंज, वास्तु, जननशांती यात उत्तम गती असलेला दामुअण्णा बघता बघता नावाजलेला भिक्षुक झाला.

घराशेजारची रिकामी जागा वरदक्षीणा देऊन केशवतात्यांनी त्यांच्या मुलीचे उमाचे सालंकृत कन्यादान केले. दामुअण्णांना पहिला मुलगा झाला. त्याच नाव त्यांनी राजेश ठेवल.आणि मग मुलगी तीच नाव प्रज्ञा. पुढे दामुअण्णांनी केशवतात्यांच्या शेजारी घर बांधल. केशवतात्या चिंचवडचे ग्रामजोशी होते. आजुबाजुच्या पाच गावात गाववाल्यांच्या मुलांची आणि मुलीची लग्ने फ़क्त केशवतात्यांच्या हाताने लागत.

दामुअण्णा घरात गेले. केशवतात्या मुलांची वाट पहात उभे राहिले. आपल्या बरोबर जावयांची वर्गणी देऊन त्यांनी मुलांशी बोलण केल. खुप वर्षांनी मोठ्ठी होळी करा. सुकलेली झाडच होळीत घाला. हिरवी झाड पाडु नका. सगळ्या ब्राम्हण गल्लीतुन होळीची वर्गणी मागुन मुल पुढ बाजारपेठेच्या रस्त्याला लागली.

क्रमश:

गुलमोहर: 

इतकि विश्रांति बरि नाहि.गावाचि चित्तरकथा मस्त जमतेय.आता आणखिन जास्त लेट करु नका हो.

सुरुवात छान झालीये......इंटरेस्टिंग वाटते आहे. Happy

कधीचं वर्णन आहे हे ?

चाफेकरांचा पुतळा उभारला जात असल्याचा उल्लेख आहे. त्या दिवसांचं वर्णन वाचून तेव्हाचं चिंचवड डोळ्यासमोर उभं राहीलं. गावपण , उत्सव हे सगळं मस्त जमून आलय.. पुढच्या भागाची उत्सुकता आहेच.

अनिलजी, १९७७ साली पुतळ्याच उदघाटन श्री मोहन धारीयांच्या हस्ते झाल. त्याच्या आधी सुमारे दोन वर्ष बॅ. विठ्ठ्लराव गाडगीळ यांच्या हस्ते भुमीपुजन झाल. या कार्येक्रमाला त्यावेळेचे महाराष्ट्राचे सर्वात तरुण कृषी मंत्री श्री शरद पवार सुध्दा हजर होते.

नितीनजी,
कथा आवडली.
जुन्या चिंचवड गाव असो किंवा पुण्यातल पेठातले रस्त्यावरुन फिरताना एक वेगळाच भास/अनुभव होतो मनाला,आवडतो आणि जुने लोक कसे राहत असतील याचा विचार पडतो.
Happy

सहीच.... मी बघत असलेलं चिंचवड खूपच वेगळं आहे.. आम्ही ८८ ला इथे आलो.. त्यामुळे त्याआधीच्या चिंचवडबद्दल वाचायला मजा येत आहे... यातला सत्य भाग कोणता आणि कल्पनाविस्तार कोणता तेव्हड मात्र हरकत नसल्यास मेलमधुन कळवा Happy

चाफेकर की चापेकर??? मला शाळेत चापेकर असं सांगितल्याचे आठवते...

इथेच लिहायला हरकत नाही चिमुरी,

मारामारी झाल्यावर चिंचवडची भैरवनाथ मंदीराजवळची होळी लहान झालेली मी पाहिली आहे पाठोपाठ भैरवनाथाचा उरुस, कुस्त्या, छबिना बंद झालेला होता. या शिवाय सगळी पात्र (रज्जी आणि राज्या )काल्पनिक आहेत. होळीच्या रात्री भांग पिण, काड्या मागुन शिग्रेटी ओढण, होळीची वर्गणी मागण असले उद्योग आमचेच.

या शिवाय सगळी पात्र (रज्जी आणि राज्या )काल्पनिक आहेत. होळीच्या रात्री भांग पिण, काड्या मागुन शिग्रेटी ओढण, होळीची वर्गणी मागण असले उद्योग आमचेच.>>>>>>>>>> हेच वाचायच होतं Happy

मेमधे भैरवनाथाचा उरुस आहे ना?