फलश्रुती - भाग २ - आंबा

Submitted by दिनेश. on 18 April, 2011 - 06:31

कोयलीया बोले अंबवा डालपर...

खरंच चैत्र लागला कि नव्या पालवीबरोबरच आपल्याला, आपल्या लाडक्या आंब्याचे वेध लागतात.
यावर्षी मोहर किती आलाय. कोकणातले हवामान कसे आहे. ढग तर आलेले नाहीत ना, उन्हाळा
जास्त कडक तर नाही ना, असे प्रश्न मनात उठत असतात.
ज्यांचे गावाला नातेवाईक असतात, त्यांच्याकडे आडून आडून चौकशी केली जाते, कधी कधी तर
गावाचे आमंत्रणच येते, यंदा मे महिन्यात आंबे खायला या.
मग मुंबईच्या बाजारात पहिली पेटी आली, कि तिची चक्क वर्तमानपत्रात बातमी येते. अशी
बातमी इतर कुठल्याही फळाबद्दल वाचलीय का तूम्ही कधी ?

आपल्या संस्कृतीमधे घट्ट रुजलाय आंबा. दाराला लावायचे तोरण असो, कि कुंकवाची कुयरी
असो, सगळीकडे आंबा आहेच. आणि का नसणार, तो आहे इथल्या मातीतलाच.
Mangifera indica असे नावच तर आहे त्याचे.

अर्थातच त्याचा उगम आपल्या भारतातलाच. या कूळातील इतर काही झाडे, आग्नेय आशियात आहेत.
(उदा. हॉर्स मॅंगो, याची पाने, फूले आणि फळेही मोठी असतात. पण त्यात आंब्याचा स्वाद नसतो.)
त्यामूळे आंबा असा उअल्लेख आला, कि आपला नेहमीचा आंबाच समजला जातो.

आंब्याचे झाड तसे आपल्या सर्वांच्या परिचयाचे. आपल्या लहानपणीच्या आठवणीत एकतरी आंब्याचे
झाड असतेच. गावोगावाप्रमाणे त्याला खास नावेही असतात, आणि त्याची चवही एकमेव अशीच असते.
मालाड पुर्वेला, आमच्या घराजवळ एक खास झाड होते. त्याचे नाव खोबरी आंबा. त्याचे आंबे आम्ही
पिकूच देत नसू. कैरीच इतकी मधूर लागायची, कि मीठ मिरचीची पण गरज नसायची.
दादरला जे मुख्य पोस्ट ऑफ़िस आहे, तिथेच गेटजवळ एक मोठे आंब्याचे झाड आहे. त्याची खासियत
म्हणजे त्याला वर्षभर आंबे लागत असतात. आणि ते अधूनमधून खाली पडतातही. तिथे एकदा मी पार्सल
पॅक करुन घेत असताना, असाच एक आंबा पडला. मला त्या पार्सलवाल्याने भेट दिला. आणि त्याची
खासियतही सांगितली.

असेच एक आठवणीतले झाड म्हणजे, माझ्या आजोळचे. त्याचे आंबे पिकले तरी हिरवेच रहायचे,
आकाराने तर मुठीपेक्षाही लहान, पण चव मात्र अप्रतिम. आम्ही त्या झाडाखाली सावधच असायचो.
झाडावरुन आंबा पडतो कधी आणि त्यावर झडप घालतो कधी. आणि त्याचे नाव होते, साखरगोटी.

परदेशातही अनेकवेळा मला आंबा चाखता आला. मी थायलंड मधे गेलो होतो, त्यावेळी तिथे मॅंगो फेस्टीव्हल सुरु होते. आंबे वापरुन केलेले वेगवेगळे पदार्थ तिथे विकायला होते. थाई कलाकुसर
असल्याने, ते पदार्थ दिसायला अप्रतिम होते, पण चवीला पपईपेक्षा फार वेगळे नव्हते.

मस्कतजवळच्या कुरियत गावी आंब्याची मोठमोठी झाडे आहेत. तिथले आंबे पिकायला लागले कि आम्ही मुद्दाम तिथे सहल काढत असू. त्या झाडाखालून एक निर्मळ पाण्याचा फ़लाज (पाट) वहात असे. झाडावरुन काढलेले आंबे, एका रियालला चाळीस पन्नास मिळत असत. त्या फलाजमधले पाणी घेऊन, त्याने ते धुवून खाण्यात वेगळीच मजा असे. एकावेळी प्रत्येकी आठ दहा आंबे फ़स्त करत असू आम्ही.

नायजेरियातल्या पोर्ट हारकोर्टमधे माझ्या घराजवळच आंब्याचे झाड होते. त्याला वर्षातून दोन वेळा भरपूर आंबे लागत. नायजेरियातले स्थानिक लोक चुकूनसुद्धा कच्चा आंबा तोडत नाहीत कि खात नाहीत. तसे केले तर हमखास मलेरिया होतो, असा त्यांचा ठाम विश्वास. त्यामूळे मला कुणी स्पर्धक नव्हता. रोजच्या रोज कैरीचे वेगवेगळे प्रकार मी करत असे. (माझी करेबियन शेजारीण, आवर्जून ते पदार्थ मागून नेत असे.) नायजेरियातल्याच बदागिरी गावाजवळ व्हिसपरिंग पाम्स म्हणून एक रिसॉर्ट आहे, तिथेही अशीच मोठी झाडे आहेत. त्या झाडाच्या कैऱ्या तर जमिनीपासून केवळ वीतभर उंचीवर लागलेल्या असतात. पण एक खरे, हे आंबे पिकल्यावर एवढे गोड लागत नसत, त्यामूळे मी तरी ते कच्चेच खात असे.

केनयामधेही भरपूर आंबे येतात. ठराविक दिवसात बाजारात तर ते असतातच, पण ठिकठिकाणी टेंपो मधे भरुन विकायला असतात. या आंब्यांचा आकार खूप मोठा असतो. एक आंबा म्हणजे माझे एका वेळचे जेवण होते. या आंब्यांच्या वरचा रंग लालसर असतो. पण चवीला मात्र, तितके गोड नसतात.

मी पाकिस्तानचे आंबेही खाल्ले आहेत. रंगाने पिवळे असले तरी बऱ्यापैकी गोड असतात.

गोव्यालाही माझ्या घराजवळच एक मोठे आंब्याचे झाड होते. त्याचे आंबे पिकल्यावर तितके गोड लागत नसत, पण आंब्याचा मोहोर, बाळ कैऱ्या, त्यावरची कोकीळ कावळ्याची झटापट, खारींची धावपळ हे सगळे मला घरबसल्या निरखायला मिळत असे. माझ्याघरी आलेल्या मायबोलीकरांनी, अगदी खिडकिशी लागलेले आंब्याचे घोस बघितले आहेत.

आंब्याचे झाड :-

हे झाड साधारण १०० फूटांपेक्षाही उंच वाढू शकते. जूनी झाडे तितकी उंच आहेतच. पण नव्याने
लावलेली कलमे मात्र, तेवढी वाढू दिली जात नाहीत. फळ काढणीसाठी ते सोयीचे ठरते.
हे झाड अनेक वर्षे, अगदी १०० वर्षांपेक्षाही जास्त जगू शकते.
याची पाने साधी व लांबट असतात. नवी पालवी चमकदार लाल रंगाची असते व ती पुढे हिरवी होत जाते. पण या झाडाची पूर्णपणे पानगळ क्वचितच होते. तशी पाने वर्षभर थोडी थोडी गळत असतात, पण झाड पूर्ण ओकेबोके कधीच होत नाही. कदचित याच कारणासाठी मंगल तोरणात आंब्याची पाने लावली जात असावीत किंवा शूभ कार्याच्या मांडवात त्याचे टाळे लावले जात असावेत. आंब्याची ओली पाने, सुकल्यावरही हिरवीच राहतात, हेही कारण असावे.

पुर्वी आमराया म्हणजे गर्द सावलीच्या जागा असत. झाडांमधे भरपूर मोकळी जागा असे आणि सावलीमूळे तिथे थंडगारही वाटत असे. तिथे सहलीचे किंवा वनभोजनाचे कार्यक्रम केले जात असत (रेखाच्या उमराव जान मधे, असा प्रसंग आहे.) ,मुंबईतदेखील काही आमराया होता. मालाड पूर्वेला जिथे आता पिरामल हॉस्पिटल आहे तिथे १९७२ पर्यंत आमराई होती.

सध्याची कलमी झाडे मात्र फार उंच वाढू दिली जात नाहीत. फ़ळतोडणी, औषध फवारणी
सोयीची व्हावी म्हणून त्यांची उंची मर्यादित ठेवावी लागते.

आंब्यांच्या नवीन झाडाची लागवड मात्र आता कलमानेच केली जाते. कोय लावून त्याच प्रतीचा आंबा मिळेल अशी खात्री नसते. आंब्याची बोटभर जाडीची फांदी, भेट कलमाने रुजवता येते. एकाच झाडावर एकापेक्षा जास्त प्रकारच्या आंब्याच्या कलमाचे प्रयोगदेखील यशस्वी झालेले आहेत.

(दमण जवळच्या एका गावात चालणारे आंब्याचे झाड आहे, असे मिलिंद गुणाजीच्या पुस्तकात लिहिले आहे. त्याचा फोटोही आहे. हे झाड धावत्या खोडाच्या वनस्पतीप्रमाणे पुढे पुढे जात असते. आणि त्याला फलधारणाही होते.)

आंब्याची फुले


आंब्याची फुले म्हणजेच मोहोर. हा आपल्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याचा फुलोरा
पांढरट हिरव्या रंगाचा असतो. त्याला एक खास सुंगध येतो. असाच वास येणाऱ्या तांदळाला
आपण आंबेमोहोर हे नाव दिलेय.

हा मोहोर आला कि त्यावर किटकांची गर्दी होतेच. पण मोहोर आल्यावर जर ढग आले तर
एक प्रकारच्या बुरशीची वाढ होते व मोहोर गळून जातो. तसेच जास्त थंडी वा जास्त उष्णता
असल्यासही मोहोर गळून जातो.

गुढीपाडव्याच्या तोरणात व गुढीवरही आंबेमोहोर लावायची प्रथा होती.

फलधारणा

या सर्वातून मोहोर बचावला तर त्यात फळधारणा होते. आधी फळे मूगाच्या दाण्याएवढी छोटी
असतात, ती वाढत वाढत मोठी होत जातात. फ़ळे झाडावरच पूर्ण पिकायला ३ ते ६ महिने लागू
शकतात.

आपल्याकडे आंबे अगदी सुपारी एवढे झाले कि ते विक्रीसाठी पाठवता येतात पण केवळ फळासाठी
लावलेल्या झाडांची फळे मात्र पूर्ण जून होईपर्यंत झाडावरुन काढत नाहीत.

कच्च्या कैर्‍यांचे विविध पदार्थ करतात (त्याचा उल्लेख मग करतोच आहे.) पण पक्व आंब्यापासूनही अनेक पदार्थ करता येतात.
आज आंबा उत्पादनात, भारत पहिल्या स्थानावर आहे. पण तरिही आंतरराष्ट्रीय व्यापारात आपला हिस्सा नगण्य आहे. आपले बहुतांशी उत्पादन, भारतातच खपते.

हापूस, खास करुन देवगड, रत्नागिरी भागात होणारा, जगभरात प्रसिद्ध आहे. पोर्तूगीजांनी इथे रुजवलेले हे वाण, कोकणच्या मातीत अजूनच चवदार झाले. रंग, स्वाद आणि चव या तिन्ही बाबतीत त्याला तोड नाही.

त्याला तोड नाही असे लिहिलेय खरे, पण त्याला तोडीस तोड म्हणून मी गोव्याच्या मानकुराय आंब्यांचा उल्लेख करीन. (या दोन आंब्याची तूलना अत्यंत गैरलागु आहे.) मानकुराय आंबा हा गोव्याबाहेर फारसा मिळत नाही. पण गोव्यात मात्र तो अमाप लोकप्रिय आहे. कितीही महाग असो, तो विकत घेतला जातोच. या आंब्याचे बाह्यरुप तितकेसे देखणे नसते. गराचा रंग किंचीत पिवळसर असतो. पण चव मात्र एकमेव असते. महाराष्ट्रात हा आंबा फ़ारसा माहित नाही.

पण महाराष्ट्रात असाही गैरसमज आहे, कि उत्तम आंबा हा फक्त कोकण भागातच होतो. ते मात्र तितकेसे खरे नाही. सर्व राज्यभरातच नव्हे तर सर्व भारतभरात तो होतो. मुंबईच्या बाजारात गुजराथ ते आंध्रा, तामिळनाडू पासूनचे आंबे येतात. (लंगडा, तोतापुरी, दशहरा असे अनेक) पण बाकिच्या राज्यातही त्यांचे उत्तम पिक येते.

आंब्याची वाहतूक हा एक मोठा प्रश्न आहे. झाडावर पिकलेला आंबा हा अप्रतिम चवीचा असतो. पण तो पिकेपर्यंत झाडावर ठेवता येत नाही, कारण तो पिकला कि वाहतुकीसाठी निरुपयोगी ठरतो. घरी खाण्यासाठी किंवा बाजारात नेण्यासाठीही तो जून झाल्यावर (म्हणजे देठाकडे किंचीत दबला गेल्यावर ) तो झाडावरुन उतरवला जातो. तो झाडावरुन खाली टाकता येत नाही, तर अलगद उतरवावा लागतो. यासाठी एक खास उपकरण वापरतात. त्यानंतर तो सुक्या गवताच्या आच्छादनाखाली ठेवला जातो. त्या उबेने काही दिवसात तो पुर्ण पिकतो. याला आंब्याची अढी लावणे असे म्हणतात. यात आंबे अगदी अलगद आणि लांब ठेवावे लागतात. तसेच ती अढी रोज उघडून बघावी लागते आणि पिकलेले आंबे बाजूला काढावे लागतात. हापूस आंब्याच्या बाबतीत, रंग आणि गंध याबरोबरच किंचीत सुरकुत्या असा एक निकष आहे. पण बाकिच्या आंब्यांच्या बाबतीत, रंग हा निकष फसवा ठरू शकतो. काही आंबे पिकले तरी हिरवेच राहतात तर काही पिवले झाले तरी चवीला आंबट लागतात.

बाजारात लवकर येणाऱ्या आंब्याला उत्तम भाव मिळतो. त्यामूळे आपलाच आंबा बाजारात
प्रथम यावा, यासाठी तो लवकर पिकवण्यासाठी काही रसायनांचा वापर केला जातो. अनुभवी
लोकांना असे कृत्रिम रित्या पिकवलेले आंबे, अजिबात आवडत नाहीत. आणि ते तसे चवदारही
नसतात.

महाराष्ट्रातील आंब्याचा व्यापार मात्र मर्यादीत काळासाठीच असतो. पावसाला सुरवात झाली कि
आंब्याचा गोडवा कमी होतो. त्यानंतर इतर राज्यातील आंबे महाराष्ट्रात येऊ लागतात.

आंब्यातली कोय हा फळातील मोठा भाग व्यापते. त्यामूळे तो कापताना मधोमध कापता येत नाही. हि कोय लहानात लहान करण्याचे प्रयोग चालू असतात. आणि अशी एक जात निर्माण झाल्याची बातमीही आली होती.

आंब्यांवर असे संशोधन होतच असते. आणि हवे ते गुणधर्म असणारे फळ मिळेल, असा प्रयत्न कायम चालू असतो. यातून नवनवीन जाती तयार होत असतात.

आंब्यापासून तयार केले जाणारे पदार्थ :-

आपल्या नववर्षाची सुरवात आंबाडाळ आणि पन्हे याशिवाय होतच नाही.

त्यानंतर मात्र
कच्च्या कैरीचा वापर करुन अनेक प्रकारची लोणची घालण्यात येतात. ती तात्पुरती खाण्याजोगी असतातच शिवाय टिकाऊ पद्धतीची देखील असतात. अशा प्रकारची लोणची भारतातल्या सर्व राज्यात आवडीने खाल्ली जातात. अख्खी मेथी आणि व्हीनीगर वापरून केलेले पंजाबी लोणचे, मेथीचा रवा घालून केलेले राजस्थानी लोणचे, लालभडक मिरची घालून केलेले गुजराथी लोणचे, सर्व मसाले वापरुन केलेले मराठी लोणचे, तिखटजाळ आंध्र पद्धतीचे लोणचे, मिठाच्या पाण्यातील कारवारी लोणचे, चण्याची डाळ वगैरे वाटून केलेले मॅंगलोरी लोणचे.. ते अगदी मोहरीने लपेटून काढलेले बिहारी लोणचे.

कच्चे किंवा पक्के आंबे पाकात शिजवून त्याचे मुरंबे, गुळांबे केले जातात. पण गोड आणि तिखट अश्या दोन्ही चवीचा गुजराथी छुंदा मात्र या दोघांमधला सुवर्णमध्य आहे.

कच्ची कैरी आपल्याकडे अनेक शाकाहारी आंणि मांसाहारी पदार्थात वापरतात. (बिरडे, मसूराची आमटी, जवळा, कैरीचे सार वगैरे ) पण महाराष्ट्रात कच्ची कैरी सुकवून (आंबोशी) वापरायचे प्रमाण फार कमी आहे. गोव्यात असे तूकडे, कोकमाप्रमाणेच वापरतात. बंगालमधे त्याचे लोणचे खूप लोकप्रिय आहे. उत्तर प्रदेशात, हळद आणि मीठ लावून कैरीच्या मोठ्या फ़ोडी सुकवून ठेवल्या जातात.

आपल्याकडे आमचूर पण पारंपारिकरित्या वापरला जात नाही. उत्तरेकडच्या राज्यात मात्र, अनेक पदार्थात आंबटपणासाठी तो वापरतात.

कच्ची कैरी अनेक चटण्यात, आंबटपणासाठी वापरता येते. पाशात्य पद्धतीत मात्र ती साखर आणि काही मसाले घालून शिजवून करतात.
कैरी शिजवून केलेले सरबत म्हणजेच पन्हे हि पण आपली खासियत. कच्ची कैरी किसूनही सरबत करता येते.

पिकलेला आंबा जास्त करुन नुसताच खाण्यासाठी वापरला जातो. त्यापैकी घट्ट गर असणारी फळे कापून खाल्ली जातात तर नरम गर असलेली फळे चोखून खाल्ली जातात.

आमरस हा पण आपल्या आवडीचा पदार्थ. तोही सर्व भारतभर खाल्ला जातो. त्यासोबत राज्या राज्यानुसार, पुऱ्या, गवसण्या, शेवया केल्या जातात. बिहारमधे त्यात पोहेही भिजवून खातात. आमरस घालून केलेले श्रीखंड, मोदक, शिरा, आईसक्रीम, मिल्कशेक हेही लोकप्रिय प्रकार आहेत. आंब्याचा रस बाटलीत वा टीनमधे भरुन टिकवता येतो, तसेच तो आटवून मावाही करता येतो. अतिरिक्त आंब्याचा रस ताटात सुकवून, त्यापासून आंबापोळी करायची पद्धत कोकणात पुर्वापार आहे. झाडावरुन पिकून गळून पडलेल्या आंब्यापासून जर असे टिकाऊ पदार्थ करता आले, तर ती फळे वाया जात नाहीत.

आंब्याच्या कोयीपासूनही उत्तम चवीची मुखशुद्धी गुजराथमधे करतात. या कोयी भाजून
वा उकडून, फ़ोडून त्याचा गर मीठ मसाला लावून वाळवून ठेवतात.

पिकलेल्या आंब्यापासून कोकणात सासव नावाचा एक प्रकार करतात. खोबरे, लाल
मिरची आणि मोहरी यांचे वाटण लावलेले पण नाममात्र शिजवलेले हे सासव, अगदी
चविष्ठ असते. गोव्यात अनसाफ़नसाची भाजी असा एक प्रकार करतात. त्यात आंबे,
फ़णसाचे गरे आणि अननस वापरलेला असतो.

आंब्यातील रेषा हे डायेटरी फ़ायबर्स आहेत. काही प्रमाणात ते असावेतच. पण अलिकडच्या
नवीन वाणात, ते अभावानेच असतात.

आंब्यातील पोषणमूल्ये :-

पिकलेला आंब्यामधली चरबी नगण्य असते तर त्यात कोलेष्ट्रॉल अजिबात नसते. आणि सोडीयमही नसते. जीवनसत्व ए, बी, सी, इ आणि के असतात. बी जीवनसत्व आपल्या शरिरात साठवून ठेवले जात असल्याने, सिझनमधे खालेल्या आंब्यापासून त्याची साठवण शरिरात केली जाते.

थायमिन, नायसिन, रिबोफ़्लेवीन, पायरीडॉक्सीन यांनी आंब्याचा गर युक्त असतो. खनिजांपैकी
कॅल्शियम, तांबे, लोह, मॅगनेशियम, मॅंगनीज आणि जस्त असतात.
(मी मुद्दाम यांची टक्केवारी देत नाही कारण वाणानुसार ती वेगवेगळी असू शकते.)

तसा आंबा आहार म्हणून योग्य असला तरी काही वेळा त्याचा अतिरेक होतोच. त्यामुळे तो प्रमाणात, शक्यतो चोखून आणि त्यातल्या रेषांसकट खावा. (अगदी वैयक्तीक आवड सांगायची तर मी बहुतेक आंबे सालासकट खातो.)
आंब्यापासून तसा धोका नाही पण काही जणांना त्याची खास करुन चीकाची ऎलर्जी असू शकते. आंबे खाल्ल्याने तोंड येते, याचा अनुभव आपल्यापैकी बहुतेकांनी घेतला असेलच. काही जणांना श्वसनाचा त्रास आणि उलट्या होऊ शकतात.

अलिकडे आंब्यावर फ़वारणी केलेली असते त्यामूळे तो स्वच्छ धूवून खावा हे ओघाने आलेच. आंबा खराब झाला असेल तर खूपदा आतील रंग मळकट झालेला असतो व सालीवर डाग पडलेले असतात. तोतापुरी सारखा एखादा आंबा, वरुन व्यवस्थित दिसत असला तरी त्यात एक प्रकारचा भुंगा असू शकतो.

इतर उपयोग :-

आंब्याचे लाकूड मजबूत असते व पेट्या करण्यासाठी उत्तम असते. जळण म्हणूनही त्याचा चांगला उपयोग होतो. होम हवन करताना अनेकवेळा आंब्याच्या काटक्या वापरतात. आंब्याची पाने पण जळणासाठी उत्तम.

जंगलामधे अनेक पक्षी या फळांवर तूटून पडत असले (आफ़्रिकेत पक्ष्यांनी चोच लावल्याशिवाय फळ तोडायचे नाही, असाही एक समज आहे.) तरी आंब्याच्या कोयी वाहून नेण्यासाठी त्यांचा उपयोग नसतो. हे काम थोड्याफार प्रमाणात माकडे करतात.

पण मानवाने त्याचा प्रसार करायचे मनावर घेतल्यामूळे झाडे मानवावर भार टाकून मोकळी झाली आहेत. हापूससारखे काही वाण, स्वत:चे प्रजोत्पादन करु शकत नाहीत. म्हणजे त्यांच्या कोयींपासून झाडे उगवत नाहीत असे नाही, पण त्या झाडांच्या फळात, ते गुणधर्म असत नाहीत. त्यासाठी कलमच करावे लागते.

साहित्यात आंबा :-

आंब्याचा मोहोर आणि वसंत ऋतू यांची सांगड घातली गेलीय. त्यामूळे वसंत कालीन रागात, चैती सारख्या उपशास्त्रीय रचनात आंब्याच्या झाडाचा, फळांचा उल्लेख असतोच. कोकिळ पक्षाला देखील हे झाड प्रिय, त्यामूळेही शास्त्रीय चीजांत या झाडाचा उल्लेख येतो.

रागांवर आधारीत जी चित्रे असतात, त्यातही अनेकवेळा हे झाड दिसते. आपल्या मेंदीमधे, रांगोळ्यात, कपड्यावरील भरतकामात, कुंकवाच्या करंड्यात कुयरी हा आकार अगदी लोकप्रिय आहे.

चित्रपटातही अनेकवेळा आंब्याचे झाड दिसते. नायिकेला डोहाळे लागले म्हणजे ती एकतर कैरी खाणार किंवा चिंचा. शोले मधे पण बसंतीचा, कैरी पाडण्याचा मजेशीर प्रसंग आहे.

लावण्यांमधे पण आपल्याला आंबा दिसतो. एकदोन आठवतात त्या लिहितो.

कलमी आंब्याला मोहर फ़ुटता,
गुलाबी सुटली हवा, अन राघूचा टपून बसलात थवा..

आला गं बाई आला गं, पाडाला पिकलाय आंबा
नीट बघ ( हि पूर्ण लावणी, आंब्याचेच रुपक घेत पुढे जाते.)

आणि आपले बालपण ज्या गाण्याशी निगडीत आहे ते गाणे..

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त दिनेशदा.. Happy
आंबा म्हंटल की एकदम तोंपांसु...
आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला जायचो तेव्हा भरपुर आंबे खायचो.पाडाचा आंबा (पिकलेला झाडावरचा) खाण्यात जी मजा आहे ती आंबा पिकवुन खाण्यात नाही.आमची दोन मोठी आंब्याची झाडे आहेत.एक खोबरी आंबा अन दुसरा शेपु आंबा... हा जो दुसरा आंबा आहे खुप मोठा असतो.त्याच्या ओझ्याने झाड खाली येते. रसाळ असतो.फक्त खालल्यावर (शेपु खालल्यासारखे) ढेकर येतात.पण हा आंबा वातासाठी चांगला असतो.

<< मला कायम कोकणात मिळतात ते आंबे बेस्ट आणि बाकी सगळे वर्स्ट असेच वाटत राहिलेय >> साधनाजी, 'कोंकणातलाच आंबा बेस्ट' याला बर्‍याच जणांचं आव्हान असूं शकतं ! डॉ. जयंत नारळीकरानी कुठंतरी इंदोरच्या आंब्याचं कौतुक करताना रत्नागिरी हापुसही त्याच्यापुढे फिका पडतो म्हटल्याचं निश्चित आठवतं !!
<< आंब्यांच्या नवीन झाडाची लागवड मात्र आता कलमानेच केली जाते. >> दिनेशदा, व चांगला भाव मिळतो म्हणून तीं कलमं हापुसचींच असतात, हें विशेष. माझ्या बालपणी "रे, चटणीक त्या 'गारफा'चो आंबो घेवुन येशीत " असलं ऐकायचो पण "गारफ' हा 'ग्राफ्ट'चा [कलम] अपभ्रंश असावा हे खूप नंतर लक्षात आलं. या 'गारफा'च्या आब्यांत खूप वैविध्य असायचं [ व ती झाडंही उंच वाढायची ] कारण कोणत्याही दोन जातीच्या आंब्यांचं त्यावेळीं कलम केलं जात असावं. [ कुणी जाणकार यावर प्रकाश टाकतील का ?]. आताच्या आमराईत जाणं म्हणजे गलीव्हरच्या बुटक्यांच्या राज्यात गेल्यासारखंच !

मस्त माहीती Happy
तो मानकुराय आंबा गावाला होता. त्याची चव खरच अप्रतिम असायची. पण ते झाड जुनं होऊन उन्मळुन पडलं, तेव्हापासुन मानकुर खाल्लेला नाही.
बिटके आंबे खायला काय धमाल यायची लहानपणी. अगदी छोट्या सुपारी एवढे वगरे पण असायचे. मज्जा.

दिनेशदा,
कच्च्या आंब्याचे फोटो पाहूनच तोडाला पाणी सुटले....
काय तो काळ होता.....गावी शेतात तीन-चार एका ओळीत आंब्याची मोठीच्या-मोठी झाडे होती...
उन्हाळ्याच्या सुट्टीला गावी जायचो....त्यावेळी दुपारी आंब्यांच्या झाडाखाली काय मस्त झोप लागायची (नैसर्गिक ए.सी.) झाडाच्या खाली काळी जमिन होती .....झाडाचा विस्तार जितका होता त्या विस्ताराच्या परिसरात कुठेही माती उकरून पाहीले की हमखास मिठ-तिखटाची पुडी सापटलीच पाहीजे......

आमच्या इथे पण एक झाड होते त्याच्या फळांचा रंग पिकल्यावर सुध्दा हिरवाच रहायचा पण त्याची गोडी भयंकर होती ......त्याची फळे खुपच लहान असायची ...चव साखरेसाखी ....त्यामुळे त्याचे नाव साखरगुठ्ठी असं होत.
उन्हाळ्यात आंब्याच्या झाडावर सुर-पारंब्या खेळायला खुपच मज्जा यायची.......
आत्ता सर्व हरवलं.....लोप पावत चालल आहे सर्व ....त्याच बरोबर आंब्याची झाडे पण....

दिनेश मस्त लेख.

इतर आंब्यांचे माहित नाही पण हापूस झाडावरून उतरवायला तयार आहे याची खूण म्हणजे देठाजवळ पडणारा लहानसा खळगा. मला अजूनही तो पटकन दिसत नाही पण आजी मला निवडून द्यायची असे आंबे आणि ते चवीला अप्रतिम असायचे - त्याच पेटीतल्या इतर आंब्यांपेक्षा!

हापूस कधीच झाडावर पूर्ण पिकू देत नाहीत. त्याची चव उतरते. उतरवायला तयार झाले की त्यांची आढी घालतात.

दगडी जमीनीत हापूसला उत्तम चव येते.

मला वाटतं सगळ्यांच्याच आठवणीत एखादा साखरगोटी / बिटक्या आंबा आहे. हा आंबा बाजारात कधी येतच नाही. मानकुर आंब्याची हापुस ला टक्कर झाली असती (यावर्षी ५०० रुपयाला एक आंबा विकला गेला म्हणे.) पण तोही गोव्याबाहेर कुठे नाही.
हापुसच्या टिनमधल्या रसाला पण ती चव येत नाही, त्यात भरमसाठ साखर असते.
कोकणात तर कातळात मीटरभर लांबीरुंदीच्या खड्ड्यात लागवड करताना बघितले आहे मी.
मी एका प्रदर्शनात गोल गरगरीत आंबा पण बघितला, पण त्या कुयरीशेपशिवाय मजा नाही.
माझ्या आजोळी शेपू आंबा, म्हणजे त्याची कैरी वापरुन जवळा करतात. शिजल्यावर वास नाही रहात इतका.
यावर्षी आंबा नाही, असे मी पण ऐकले. म्हणजे भाव भरपूर महाग होणार तर !
अजून थोडी भर घालतो या लेखात. पण भारतात आंबे यायला लागले कि त्याचे फोटो अवश्य काढा रे.

दिनेशदा मस्तच. हे लेख आता छापून पुस्तक काढायला पाहिजे. आणखी काही वर्षानी मूलांना आंब्याचे पदार्थ काय असतात ते कळणार देखील नाही. त्याना फक्त आमरस ( तो देखील पपया टाकून आणि फ्लेवर टाकून बनवलेला) श्रीखंड माहीत असेल.
पण मी सासन खाल्ले नाही. बाकी सगळ माहीत आहे.
मी गेल्यावर्षी गोव्याहून माऩकूर चे कलम आणले आहे. माझ्याकडे मल्लीगा नावाची जात आहे त्याचा बाठा अगदी पातळ असतो.
दादरच्या पोस्ट औफीसचा पत्ता दिलात ते चांगल झाल. आता फेर्या मारतो बाठया साठी. तसा माझ्याकडे दूसरा एक आंबा आहे त्याला बारमासी म्हणतात. पण तो वर्षातून दोनदाच येतो.
ईथे आंबे यायला लागले आहेत पण ९०० रूपये डझन.

मस्त लेख!!! आता बिनकोयीचा पण आंबा मिळतो!! सिडलेस सिंधु नावाचा!! दापोलीच्या कृषी विद्यापिठाने विकसित केली आहे हि जात!!

दिनेश मस्त माहीती.
आंब्याचा घमघमाट अजुनही मनात घोळतोय, झाडावरची शाक पाडुन खाणे , अढीतले पिकलेले आंबे काढुन खाणे, अहाहा काय गोड आठवणी जाग्या झाल्या. Happy

भाऊ, तुम्ही गारपाची माहीती दिलीत ते बरे केलेत. मी घरी गारपाचा आंबा हाच शब्द ऐकलाय. सग़ळ्यात उत्तम आंबा तो गारपाचा आंबा. पण हे गारप प्रकरण काय ते कधी कळले नाही कारण गारप ही जात कोकण सोडून इतर कुठे ऐकली पण नाही. Happy

Pages