तुरळक काही

Submitted by उमेश वैद्य on 17 April, 2011 - 12:19

तुरळक काही
.
हा ही गाव मागे पडला
राहिले जे तुरळक काही
एवढ्यातच ते ही जाईल
पुढल्याचा मज सोस नाही
.
कुठेच नाही थांबायाचे
आता कुणास भेटायाचे?
दूर कुठेसे दिवे दिसले
तरी पाऊल नाही वळवायाचे
.
जे आहे काही चिकटले
ते ईथेच म्हणतो देईन टाकून
शुष्क आड हा बरा भेटला
टाकण्या हे त्यात एकूण
.
माग कशाला काढील कोणी
पण पाउले ही विस्कटवावी
घ्यावी इतुकी आता काळजी
कुणास ना ही वाट कळावी
.
सावल्यांचे काय सांगु
मने त्यांची कशी कळावी
जरी घेतला शोध माझा
त्यांस केवळ पिसे मिळावी
.
आता सारे हलके हलके
रिकामे ही रिक्त खरोखर
बजावले मी आठवणींना
घ्यायचे ना काही बरोबर

असेलही जरी कुठे बरीशी
घरट्यांची एखादी फ़ांदी
तमा कशाला मला त्याची
नकोच मजला असली संधी

उमेश वैद्य २०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: