"सहावी sss सहावी ss चौथी ss चौथी sss बालभारती ss, इतिहाssस भूगोssल ......" अवतीभवतीच्या कोलाहलामधे मी ही आपला आवाज हळूहळू मिसळला. अकोल्यातला मे महिन्यातला उन्हाळा होता , ऊन मी म्हणतय, अवतीभवती माझ्यापेक्षाही जोराने असेच काहीसे ओरडत असणार्या मुलांमुळे आपल्याकडे कोणीही लक्ष देत नाही हे लक्षात आल्यावर आपोआपच माझा आवाज टीपेला पोचला.
"ए लडके इधर आ"
बाजूच्या तट्टे बांधून तयार केलेल्या छोट्या छोट्या दुकानांपैकी एका दुकानातून जमीनीवरच सावलीत बसलेल्या दुकानदाराने मला आवाज दिला.शाळेची सगळ्याच वर्गांची पुस्तके, कॉलेज ची पुस्तके काही जुनी मासिके काही रद्दी हिंदी -मराठी कादंबर्या, कमी कपडे घातलेल्या बायांची चित्रे असलेली इंग्रजी मासिके असे सारे काही असणार्या पुस्तकांच्या गठ्ठ्यांमधे तो बेरकी दुकानदार मांडी ठोकून बसला होता. पण मी फारसे लक्ष दिले नाही. लगेच त्याच्या कडे गेलो तर याला घाई आहे कमी किमती मधे पुस्तके मागून याला बनवता येइल असा विचार तो करणार हे मला गेल्या वर्षीच्या अनुभवाने ठाऊक होते. तेव्हड्यात एक मुलगा त्याच्या बहिणी बरोबर माझ्या जवळ आला.
"दुसरीचे सामान्य विज्ञान आहे का रे?" मुलाने विचारले.
"मी काय तिसरीतला दिसतो का तुला?"
मी चिडून विचारणार होतो.
काय करणार मी तेव्हा एकदमच किरकोळ, बुटका मुलगा होतो. पण मी स्वतःला आवरले. त्या मुलाची बहिण जरा मोठी दिसत होती कदाचित तिने माझ्या कडून चौथी तून पाचवीत गेलेल्या माझ्या बहिणीची पुस्तके विकत घेतली असती. गिर्हाइकाला दुखवून कसे चालेल ? (आपण अकोल्यात राहातो पुण्यात नाही वगैरे ज्ञान तेव्हा मला होते असे मी काहीही लिहिले नाहीये कृपया नोंद घ्यावी.
)
आपला राग आवरून मी म्हटले "नाही रे, चौथीची पुस्तके आहेत बघ तुझ्या ताईला हवी का? एकदम चांगली आहेत एक ही पान फाटले नाहीये " मी आपल्या मालाची भलावण केली.
"ताईची सगळी पुस्तके मिळाली माझीच बाकी आहेत."
मी निराश झालो.
बराच वेळ तसाच ओरडण्यात गेला. मी नाईलाजाने दुकानदाराकडे वळलो.
"ये चौथी और छटवी की किताबे है, लोगे?" (महाराष्ट्रात असला तरी विदर्भाची मार्केट लँग्वेज हिंदीच आहे)
"उसी के वास्ते तो बैठा हू दुकान लगाके बाबू " दुकानदाराने गोड बोलत माझ्या भोवती आपले जाळे पसरायला सुरुवात केली. पण मी या वर्षी उल्लू बनणार नव्हतो.
"दिखा तो जरा कौन कौनसी है? .... हं .. ये क्या ? ये तो धागे ढीली हो गई है , कभी भी पन्ने निकल आयेंगे"
पुस्तक वाचतांना पाने फराफरा उलटायची, एकाच हातात पकडायसाठी पाने पूर्ण मुडपून पुस्तक वाचायच्या माझ्या बहिणीच्या सवयीचा हा परिणाम होता.कितीदा सांगितले तरी उपयोग शून्य!! काय करणार बहिणी , त्यातही लहान बहिणी अशाच असतात, शेंडेफळ ना !! पुस्तक कमी किमतीत गेले तर मात्र दोष माझा !!
सगळी पुस्तके बारकाईने पाहून दुकानदाराने तोंडी आकडेमोड केली, आपले आधी बोललेले मत पुन्हा एकदा अधिकच जोर देऊन म्हणून दाखवले. व म्हणाला "वैसे तो बीस रुपये होते है, तुझे पच्चीस दुंगा , बहोत देरसे धूप मे खडा है देख रहा था मै."
गोडबोल्या लेकाचा .
"सिर्फ पच्चीस? ये तो बहोत कम होते है. नये किताब अस्सी मे मिलते है, आधी किमत भी चालीस होती है." मी आपली नाराजी जरा मोठ्यानेच ऐकवली.
" अबे लडके, ये किताब देख. सारे धागे निकल रहे है बाइंण्डिंग ढीला हो गया है ऐसे किताबोके आधे पैसे कौन देगा तुझे" मी काही गळाला लागत नाही हे लक्षात आल्याने दुकानदार जरा माझ्यावर ओरडतच बोलला .
"इधर लाव वो किताबे, इधर लाव, मुझे नही बेचनी अपनी किताबे तुम्हे.
" मी पण ओरडलो अन पुस्तके त्याच्या हातातून हिसकावूनच घेतली. अन दुकाना समोरून निघून जाउ लागलो."
"आखरी बोलता, तीस रुपये देता हू मंजूर ?"
"बोलाना मुझे नही बेचनी तुम्हे..." गेल्या वर्षी अशाच दुसर्या एका दुकानदाराने फारच कमी किमतीत माझ्या कडून पुस्तके विकत घेउन मला मूर्ख बनवल्याचा राग आता एक वर्ष होउन ही माझ्या मनात खदखदू लागला होता.
"चल पैतीस ले"
मी आता लक्षच दिले नाही.
अवतीभवती माझ्या सारखीच मुले, काही धीट मुली पण असेच पास झाल्या नंतर गेल्यावर्षीची पुस्तके ओरडून ओरडून आपल्या सारख्याच छोट्या मुलांना विकत होती. काही थोडी मोठी मुले गरज नव्हती तरी पुस्तके कमी किमतीत घेउन जरा जास्त किमतीला पण दुकानदारांपेक्षा कमी नफा घेउन विकत होती. पाठ्यपुस्तक मंडळाच्या अनागोंदी मुळे कोणत्या वर्गाची पुस्तके बाजारात आलीच नाहीत किंवा कमी प्रती आल्यात हे त्याना नेमके ठाउक दिसत होते. प्रत्यक्ष बाजारात अनुभवाच्या शाळेत सेल्स / मार्केटिंग चे धडेच जणू गिरवीत होती. आपलीही पुस्तके नक्कीच खपतील हा विश्वास मला त्यांच्या कडे पाहून वाटू लागला. थोड्याच वेळात तो खराही झाला. तिथले दुकानदार ९०% किमतीत विकत अशी चांगल्या अवस्थेतली पुस्तके पाउण किमतीत व जरा बाइण्डिंग ढीली झाली अशी अर्ध्या किमतीत विकल्या गेली.
तहान फार लागली होती खुले नाट्यगृहासमोरच्या पाणपोयी वर घटाघटा दोन पेले पाणी प्यायलो. जवळ्च्याच रसवंती कडे लक्ष गेले. मे महिन्यातलल्या उन्हात दुपारी साडेबारा वाजता सायकल मारत दूर राउतवाडी पर्यंत जायचे तर पोटात पेट्रोल हवेच त्यामुळे आई काही रागवणार नाही. पैसे ही आहेत. मग "यहा पीलीया के रोगीयो को मुफ्त मे गन्नेका रस दिया जाता है " अशी रसवंतीमधे लावलेली पाटी वाचत
"हा पीलीया काय आहे तो आपल्या ला एकदा झाला पाहिजे रोज इथे येउन मस्त रस प्यायला मिळेल "असा विचार करत दोन रुपयात फुल ग्लास उसाचा रस प्यायलो( ग्लास अर्धा संपल्यावर थोडा बर्फ और दो ना हे अर्थातच ओघानेच ) . सायकल वर टांग मारली अन घराकडे निघालो.
तर मंडळी आत्ताच आपण भूतकाळात जाउन अकोल्याच्या चिवचिव बाजारात जाउन माझी सहावीची व माझ्या बहिणीची चौथीची पुस्तके विकून आलो. माझ्या वेळला दरवर्षी नवा अभ्यासक्रम सुरु झाल्याने जुनी पुस्तके उपयोगाची नाही. त्यामुळे दरवर्षी नवी पुस्तके!! माझीच पुस्तके बहिण नंतर वापरणार त्यामुळे तिच्या करता ही आपण तिथे पुस्तके विकत घेतली नाही. जुन्या बालभारती मधे लेखका ची चित्रे असत, त्या चित्रांना चष्मे काढणे कुंकू अथवा मिशा काढून स्त्रीचा पुरुष वा पुरुषाची स्त्री करणे या आनंदाला मी मुकलो पण दरवर्षी नव्या कोर्या पुस्तकांचा नाकभरून वास घेण्याचे सूख मात्र मी भरपूर अनुभवले.
गांधी रोडवर डिलाइट चौकात एका कोपर्यात हा बाजार तसा नेहमीच असे पण शाळा सुरु होण्या आधीच्या महिन्यात इथे मुलांची गर्दी भरपूर. तिथल्या भल्या मोठ्या पिंपळावर पाने जास्ती की चिमण्या जास्ती अशी परिस्थिती असे. त्या चिमण्याचा आवाज रहदारीच्या आवाजावर ही मात करे. त्या चिवचिवाटामुळे या बाजाराला "चिवचिव बाजार"असे नाव मिळाले की तिथे खरेदी विक्री करणार्या मुलांच्या किलबिलाटामुळे? हा संशोधनाचा विषय आहे.
बरेच दिवसात अकोल्याला गेलो नाही. गेलो तेव्हा या बाजारा कडे जाणे झाले नाही. काही इंजिनियरींग ची पुस्तके स्वस्तात मिळाली असती.
काळाच्या ओघात आपल्या बालपणा सोबतच बरेच काही हरवते. तो पिंपळ आता आहे की नाही ते ठाउक नाही, तिथल्या भेळवाल्यांची मात्र भरपूर प्रगती झाली आहे. तशा अनेक गाड्यांमुळे चिवचिव बाजार आता दुसर्या जागी हलवला आहे / अकोला बस स्टॅण्ड व प्रमिलाताई ओक हॉल च्या मधे असलेल्या एका गल्लीत भरतो असे ऐकिवात आहे.
तिथे खरेदी विक्री करणार्या मुलांपैकी किती जण मोठे झाल्यावर नोकरी करतात व किती व्यवसाय धंदा हा प्रश्न तेव्हढा महत्वाचा नाही. जगात आपल्या भोवती कसे कसे लोक असतात सावध नसले तर नुकसान होणारच, नवी पुस्तके न परवडणारे गरीब मुलं कशी काटकसर करून पुस्तके घेतात/ विकतात ही सारी दुनियादारी तिथे मला लहानपणीच अनुभवायला मिळाली. तिथे मी कधीच पुस्तके खरेदी केली नसल्याने म्हणून की काय मला कोणत्याही वस्तूच्या खरेदीतले काहीही कळत नाही असे एक माझ्या बद्द्लचे मत आहे ( कुणाचे ते सु.वे. सां. न ल.)
नव्या नोकरीत आता आजवर कधी न केलेले बिझीनेस प्लानिंगचे मालाच्या विक्री संबधीत काम आता मी करतो. विक्रीची कला मी कितपत शिकलो ते लवकरच अप्रेझल च्या वेळी समजेलच घोडा मैदान जवळच आहे.
पुढच्या अकोला ट्रीप मधे मुलाला चिवचिव बाजार दाखवला पहिजे.
http://mimarathi.net/node/5921 इथे ही कालच प्रकाशित.
एकदम प्रांजळ अनुभव. माझ्या
एकदम प्रांजळ अनुभव. माझ्या बालपणात मीदेखील हे उद्योग केलेत. आमच्या वेळी पुस्तके फार फार वर्षानी बदलत त्यामुळ कॉलेजच्या शेवटच्या वर्षीच नवीन पुस्तके नशिबी आली. पण त्याची नवलाई अजून टिकून आहे.
या सर्व अनुभवांमुळेच की काय मला सेल्समनगिरी किंवा मार्केटींग जमते असे मला वाटते.छान लेखन आहे. पु.ले.शु.
श्रीकांत चिव चिव बाजार, मस्त
श्रीकांत
चिव चिव बाजार,
मस्त आठवण दिली, मस्त ललित
किती छान लिहिलय ,मस्तच
किती छान लिहिलय ,मस्तच ......आवडलं.
खुप आवडले... गोड.
खुप आवडले... गोड.
खुप छान लिहिला आहेस .....चिव
खुप छान लिहिला आहेस .....चिव चिव बजार एकदम समोर आला.........
श्रीकांत , लातुर बाफवर
श्रीकांत , लातुर बाफवर दिलेल्या लिंकमुळे लेख वाचला.
धन्यवाद , अन्यथा इतका चांगला लेख कदाचीत सुटला असता.
मलापण ३० वर्षांपुर्वीच माझं वर्ध्यातील शालेय जिवन आठवलं.
नॉस्टॅलजीक.
छान लेख
छान लेख
मस्त आहे लेख.
मस्त आहे लेख.
मस्त आहे लेख. पुलेशु
मस्त आहे लेख. पुलेशु
मस्तच लिहीलंय. खूप आवडलं.
मस्तच लिहीलंय. खूप आवडलं. मलाही नव्हता माहीत असा चिवचिव बाजार !
अरे...खूप उशिरा वाचलं
अरे...खूप उशिरा वाचलं हे.
मस्त लिहिलं आहे. 'चिवचिव बाजार' नाव कसलं गोडु आहे.
छान लिहीले आहे, एकदम आवडले.
छान लिहीले आहे, एकदम आवडले. शब्दबंबाळ न होता नेमके आणि तरीही प्रभावी.
एक चांगली बातमी.
एक चांगली बातमी. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8201899.cms आता 'बालभारती'ची पुस्तके ऑनलाइन डाउनलोड करता येतील. वेबसाइट अपेक्षेप्रमाणेच एखादी सरकारी साइट असावी तशी आहे. पण काम करतेय, शोधाशोध केल्यावर http://balbharati.abweb.in/index1.htm इथे डाउनलोड पेज आहे. पुस्तके उपलब्ध नसतील तर शाळा, सामाजिक संस्था आता पुस्तके मुलांना कधीही छापून देउ शकतील. जय जवान, जय किसान, जय तंत्रज्ञान !!
अरे हे तर आमच्या अकोल्याचे
अरे हे तर आमच्या अकोल्याचे आहे...
श्रीकांत जी...आम्ही पण बरेच वेळा जुनी पुस्त्के विकुन चिव चिव बाजारातुन विकत घ्यायचो.. :स्मितः
बादवे माझे माहेर अकोला आहे :स्मितः
मस्त लिहिलंय..
मस्त लिहिलंय..
धन्यवाद श्रीकांत, चिवचिवाट
धन्यवाद श्रीकांत, चिवचिवाट खुपच आवडला हं. मी पण अकोल्याला शिकलोय एक वर्ष बालक मन्दीरात म्हणून अकोल्या बद्दल नेहमीच खूप प्रेम वाटतं. आता मी ही अभिमानानी अकोल्याच्या ह्या चिव चिव बाजार बद्दल सांगील सगळ्यांना. खरंच लेख खूप सुंदर आहे.चिवचिवाट खूपच गोड आहे.
छानच लेख ! आमच्या वाट्यालाही
छानच लेख !
आमच्या वाट्यालाही बहुदा जुनीच पुस्तके आली. फक्त २१ चे प्रश्नसंच (तेही फक्त इंग्रजी आणि गणित) तेवढे नवे मिळाले होते दहावीला असताना. बाकी पुस्तके विकण्याची पाळी कधी आलीच नाही. कारण आईच्या एका मैत्रीणीचा मुलगा मला एक वर्षाने ज्युनीयर होता फक्त. त्यामुळे आमची पुस्तके आपोआप त्याला मिळायची, फुकट.
छान
छान
खुप सुंदर ललीत.. चिवचिव बाजार
खुप सुंदर ललीत.. चिवचिव बाजार नावच किती गोड आहे...
आम्ही पण विकायचो आमची पुस्तके ज्युनीअर पोराना.. आणी वर्षभर कधीही न वापरल्यामुळे माझी पुस्तके नवी कोरी असायची त्यामुळे त्याला भरपुर डीमांड असायचा..
प्रतिसाद देणार्या सर्वांचे
प्रतिसाद देणार्या सर्वांचे आभार!!
छान लिहीलय श्रीकांत. जुने
छान लिहीलय श्रीकांत. जुने दिवस आठवले .. त्या भल्या मोठ्या पेट्या .. जुनी/नविन पुस्तके... आणि गान्धी चौक ....
अरे...खूप उशिरा वाचलं
अरे...खूप उशिरा वाचलं हे.
मस्त लिहिलं आहे. 'चिवचिव बाजार' नाव कसलं गोडु आहे. <<<< + १
श्रीकांत, मी अकोल्याचाच आहे
श्रीकांत, मी अकोल्याचाच आहे आणि माझ्या ५ बहिणी आणि मी आम्ही सगळे जण ह्याच बाजारातून पुस्तके विकत घ्यायचो. आता हा बाजार बी. आर. हायस्कूलजवळ भरतो. पुर्वी जिथे गांधी चौकात भरायचा तिथे त्या ठिकाणी आता एक देवीचे मस्त मोठे मंदीर उभारले आहे. पाणीपुरीच्या टपर्या अजून वाढवल्या आहेत.
तुमचे नाव श्रीकांत डाबरे आहे का? कारण मी श्रीकांत दादांच्या घरी अनिकटला जाऊन पुस्तके घेऊन यायचो.
मस्त आहे हा चिव चिव बाजार
मस्त आहे हा चिव चिव बाजार
जुने पुस्तके घेऊन शाळा
जुने पुस्तके घेऊन शाळा शिकणे... हि परिस्थीती आजच्या मुलांना कशी काय समजवुन सांगावी!... जिथे महिण्याची शाळेची फि १००० ते १५०० आहे...वरुन डोनेशन.
... लेख मनापासुन आवडला... अगदी जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
Pages