चिव चिव बाजार !!!

Submitted by श्रीकांत on 15 April, 2011 - 13:05

"सहावी sss सहावी ss चौथी ss चौथी sss बालभारती ss, इतिहाssस भूगोssल ......" अवतीभवतीच्या कोलाहलामधे मी ही आपला आवाज हळूहळू मिसळला. अकोल्यातला मे महिन्यातला उन्हाळा होता , ऊन मी म्हणतय, अवतीभवती माझ्यापेक्षाही जोराने असेच काहीसे ओरडत असणार्‍या मुलांमुळे आपल्याकडे कोणीही लक्ष देत नाही हे लक्षात आल्यावर आपोआपच माझा आवाज टीपेला पोचला.
"ए लडके इधर आ"
बाजूच्या तट्टे बांधून तयार केलेल्या छोट्या छोट्या दुकानांपैकी एका दुकानातून जमीनीवरच सावलीत बसलेल्या दुकानदाराने मला आवाज दिला.शाळेची सगळ्याच वर्गांची पुस्तके, कॉलेज ची पुस्तके काही जुनी मासिके काही रद्दी हिंदी -मराठी कादंबर्‍या, कमी कपडे घातलेल्या बायांची चित्रे असलेली इंग्रजी मासिके असे सारे काही असणार्‍या पुस्तकांच्या गठ्ठ्यांमधे तो बेरकी दुकानदार मांडी ठोकून बसला होता. पण मी फारसे लक्ष दिले नाही. लगेच त्याच्या कडे गेलो तर याला घाई आहे कमी किमती मधे पुस्तके मागून याला बनवता येइल असा विचार तो करणार हे मला गेल्या वर्षीच्या अनुभवाने ठाऊक होते. तेव्हड्यात एक मुलगा त्याच्या बहिणी बरोबर माझ्या जवळ आला.
"दुसरीचे सामान्य विज्ञान आहे का रे?" मुलाने विचारले.
"मी काय तिसरीतला दिसतो का तुला?" Angry मी चिडून विचारणार होतो.
काय करणार मी तेव्हा एकदमच किरकोळ, बुटका मुलगा होतो. पण मी स्वतःला आवरले. त्या मुलाची बहिण जरा मोठी दिसत होती कदाचित तिने माझ्या कडून चौथी तून पाचवीत गेलेल्या माझ्या बहिणीची पुस्तके विकत घेतली असती. गिर्‍हाइकाला दुखवून कसे चालेल ? (आपण अकोल्यात राहातो पुण्यात नाही वगैरे ज्ञान तेव्हा मला होते असे मी काहीही लिहिले नाहीये कृपया नोंद घ्यावी. Happy )
आपला राग आवरून मी म्हटले "नाही रे, चौथीची पुस्तके आहेत बघ तुझ्या ताईला हवी का? एकदम चांगली आहेत एक ही पान फाटले नाहीये " मी आपल्या मालाची भलावण केली.
"ताईची सगळी पुस्तके मिळाली माझीच बाकी आहेत."
मी निराश झालो. Sad बराच वेळ तसाच ओरडण्यात गेला. मी नाईलाजाने दुकानदाराकडे वळलो.
"ये चौथी और छटवी की किताबे है, लोगे?" (महाराष्ट्रात असला तरी विदर्भाची मार्केट लँग्वेज हिंदीच आहे)
"उसी के वास्ते तो बैठा हू दुकान लगाके बाबू " दुकानदाराने गोड बोलत माझ्या भोवती आपले जाळे पसरायला सुरुवात केली. पण मी या वर्षी उल्लू बनणार नव्हतो.
"दिखा तो जरा कौन कौनसी है? .... हं .. ये क्या ? ये तो धागे ढीली हो गई है , कभी भी पन्ने निकल आयेंगे"
पुस्तक वाचतांना पाने फराफरा उलटायची, एकाच हातात पकडायसाठी पाने पूर्ण मुडपून पुस्तक वाचायच्या माझ्या बहिणीच्या सवयीचा हा परिणाम होता.कितीदा सांगितले तरी उपयोग शून्य!! काय करणार बहिणी , त्यातही लहान बहिणी अशाच असतात, शेंडेफळ ना !! पुस्तक कमी किमतीत गेले तर मात्र दोष माझा !!
सगळी पुस्तके बारकाईने पाहून दुकानदाराने तोंडी आकडेमोड केली, आपले आधी बोललेले मत पुन्हा एकदा अधिकच जोर देऊन म्हणून दाखवले. व म्हणाला "वैसे तो बीस रुपये होते है, तुझे पच्चीस दुंगा , बहोत देरसे धूप मे खडा है देख रहा था मै."
गोडबोल्या लेकाचा .
"सिर्फ पच्चीस? ये तो बहोत कम होते है. नये किताब अस्सी मे मिलते है, आधी किमत भी चालीस होती है." मी आपली नाराजी जरा मोठ्यानेच ऐकवली.
" अबे लडके, ये किताब देख. सारे धागे निकल रहे है बाइंण्डिंग ढीला हो गया है ऐसे किताबोके आधे पैसे कौन देगा तुझे" मी काही गळाला लागत नाही हे लक्षात आल्याने दुकानदार जरा माझ्यावर ओरडतच बोलला .
"इधर लाव वो किताबे, इधर लाव, मुझे नही बेचनी अपनी किताबे तुम्हे. Angry " मी पण ओरडलो अन पुस्तके त्याच्या हातातून हिसकावूनच घेतली. अन दुकाना समोरून निघून जाउ लागलो."
"आखरी बोलता, तीस रुपये देता हू मंजूर ?"
"बोलाना मुझे नही बेचनी तुम्हे..." गेल्या वर्षी अशाच दुसर्‍या एका दुकानदाराने फारच कमी किमतीत माझ्या कडून पुस्तके विकत घेउन मला मूर्ख बनवल्याचा राग आता एक वर्ष होउन ही माझ्या मनात खदखदू लागला होता.
"चल पैतीस ले"
मी आता लक्षच दिले नाही.
अवतीभवती माझ्या सारखीच मुले, काही धीट मुली पण असेच पास झाल्या नंतर गेल्यावर्षीची पुस्तके ओरडून ओरडून आपल्या सारख्याच छोट्या मुलांना विकत होती. काही थोडी मोठी मुले गरज नव्हती तरी पुस्तके कमी किमतीत घेउन जरा जास्त किमतीला पण दुकानदारांपेक्षा कमी नफा घेउन विकत होती. पाठ्यपुस्तक मंडळाच्या अनागोंदी मुळे कोणत्या वर्गाची पुस्तके बाजारात आलीच नाहीत किंवा कमी प्रती आल्यात हे त्याना नेमके ठाउक दिसत होते. प्रत्यक्ष बाजारात अनुभवाच्या शाळेत सेल्स / मार्केटिंग चे धडेच जणू गिरवीत होती. आपलीही पुस्तके नक्कीच खपतील हा विश्वास मला त्यांच्या कडे पाहून वाटू लागला. थोड्याच वेळात तो खराही झाला. तिथले दुकानदार ९०% किमतीत विकत अशी चांगल्या अवस्थेतली पुस्तके पाउण किमतीत व जरा बाइण्डिंग ढीली झाली अशी अर्ध्या किमतीत विकल्या गेली.
तहान फार लागली होती खुले नाट्यगृहासमोरच्या पाणपोयी वर घटाघटा दोन पेले पाणी प्यायलो. जवळ्च्याच रसवंती कडे लक्ष गेले. मे महिन्यातलल्या उन्हात दुपारी साडेबारा वाजता सायकल मारत दूर राउतवाडी पर्यंत जायचे तर पोटात पेट्रोल हवेच त्यामुळे आई काही रागवणार नाही. पैसे ही आहेत. मग "यहा पीलीया के रोगीयो को मुफ्त मे गन्नेका रस दिया जाता है " अशी रसवंतीमधे लावलेली पाटी वाचत
"हा पीलीया काय आहे तो आपल्या ला एकदा झाला पाहिजे रोज इथे येउन मस्त रस प्यायला मिळेल "असा विचार करत दोन रुपयात फुल ग्लास उसाचा रस प्यायलो( ग्लास अर्धा संपल्यावर थोडा बर्फ और दो ना हे अर्थातच ओघानेच ) . सायकल वर टांग मारली अन घराकडे निघालो.

तर मंडळी आत्ताच आपण भूतकाळात जाउन अकोल्याच्या चिवचिव बाजारात जाउन माझी सहावीची व माझ्या बहिणीची चौथीची पुस्तके विकून आलो. माझ्या वेळला दरवर्षी नवा अभ्यासक्रम सुरु झाल्याने जुनी पुस्तके उपयोगाची नाही. त्यामुळे दरवर्षी नवी पुस्तके!! माझीच पुस्तके बहिण नंतर वापरणार त्यामुळे तिच्या करता ही आपण तिथे पुस्तके विकत घेतली नाही. जुन्या बालभारती मधे लेखका ची चित्रे असत, त्या चित्रांना चष्मे काढणे कुंकू अथवा मिशा काढून स्त्रीचा पुरुष वा पुरुषाची स्त्री करणे या आनंदाला मी मुकलो पण दरवर्षी नव्या कोर्‍या पुस्तकांचा नाकभरून वास घेण्याचे सूख मात्र मी भरपूर अनुभवले.

गांधी रोडवर डिलाइट चौकात एका कोपर्‍यात हा बाजार तसा नेहमीच असे पण शाळा सुरु होण्या आधीच्या महिन्यात इथे मुलांची गर्दी भरपूर. तिथल्या भल्या मोठ्या पिंपळावर पाने जास्ती की चिमण्या जास्ती अशी परिस्थिती असे. त्या चिमण्याचा आवाज रहदारीच्या आवाजावर ही मात करे. त्या चिवचिवाटामुळे या बाजाराला "चिवचिव बाजार"असे नाव मिळाले की तिथे खरेदी विक्री करणार्‍या मुलांच्या किलबिलाटामुळे? हा संशोधनाचा विषय आहे.

बरेच दिवसात अकोल्याला गेलो नाही. गेलो तेव्हा या बाजारा कडे जाणे झाले नाही. काही इंजिनियरींग ची पुस्तके स्वस्तात मिळाली असती.

काळाच्या ओघात आपल्या बालपणा सोबतच बरेच काही हरवते. तो पिंपळ आता आहे की नाही ते ठाउक नाही, तिथल्या भेळवाल्यांची मात्र भरपूर प्रगती झाली आहे. तशा अनेक गाड्यांमुळे चिवचिव बाजार आता दुसर्‍या जागी हलवला आहे / अकोला बस स्टॅण्ड व प्रमिलाताई ओक हॉल च्या मधे असलेल्या एका गल्लीत भरतो असे ऐकिवात आहे.

तिथे खरेदी विक्री करणार्‍या मुलांपैकी किती जण मोठे झाल्यावर नोकरी करतात व किती व्यवसाय धंदा हा प्रश्न तेव्हढा महत्वाचा नाही. जगात आपल्या भोवती कसे कसे लोक असतात सावध नसले तर नुकसान होणारच, नवी पुस्तके न परवडणारे गरीब मुलं कशी काटकसर करून पुस्तके घेतात/ विकतात ही सारी दुनियादारी तिथे मला लहानपणीच अनुभवायला मिळाली. तिथे मी कधीच पुस्तके खरेदी केली नसल्याने म्हणून की काय मला कोणत्याही वस्तूच्या खरेदीतले काहीही कळत नाही असे एक माझ्या बद्द्लचे मत आहे ( कुणाचे ते सु.वे. सां. न ल.)
नव्या नोकरीत आता आजवर कधी न केलेले बिझीनेस प्लानिंगचे मालाच्या विक्री संबधीत काम आता मी करतो. विक्रीची कला मी कितपत शिकलो ते लवकरच अप्रेझल च्या वेळी समजेलच घोडा मैदान जवळच आहे.

पुढच्या अकोला ट्रीप मधे मुलाला चिवचिव बाजार दाखवला पहिजे.

http://mimarathi.net/node/5921 इथे ही कालच प्रकाशित.

गुलमोहर: 

तो पिंपळ नाही, चिवचिवाटही नाही.
बाजार पूर्वी जमिनीवर भरायचा, आता दुकानांमध्ये भरतो. आणि जुन्या पुस्तकांऐवजी बहुतेक सगळी नवी पुस्तकंच असतात.

छान लिहीलय. अश्या मुलांनी भरवलेल्या चिवचिव बाजाराबद्दल पहिल्यांदाच ऐकले.
आमच्या गावी असे काही नव्हते, आम्ही दुकानातच विकायचो पुस्तकं अर्ध्या किमतीला.

... मी सुद्धा जुनी पुस्तकं विकत घेऊन वापरल्यावर विकली आहेत, शाळेत असताना. बाजारात उभं राहून नाही... पण दुकानदाराला. ते आठवलं.
(हा लेख किंचित धप्पकन विनाच्याकारणी संपल्यासारखा मलाच वाटतोय का?)

माझ्या मुली अकोल्याला शिकत होत्या. त्यांच्या कडून चिवचिव बाजार बद्दल ऐकले होते.मला नाव ऐकूनच गंमत वाटली. मग मी एक वर्ष त्यांच्या बरोबर पुस्तके विकायला गेले.तुम्ही वर्णन केल्याप्रमाणेच गोंधळ असतो.बाकी कुठेही असे दिसत नाही. आता चिनुक्स म्हण्तो तसे दुकाने निघाली असावीत.

पहिल्यांदाच ऐकलं चिवचिव बाजाराबद्दल. आम्हीही दुकानदाराला विकायचो पुस्तकं ६०% किंमतीने. गिरगावतल्या पुस्तक दुकानांमध्ये ६०%चा स्टँप मारुन देत पुस्तकावर. पास झाल्यावर पुस्तकं परत करताना ६०% पैसे परत मिळत. कधी कधी वाडीतली आमच्या पाठची मुलं पुस्तकांवर क्लेम लावून ठेवायची.

खरे तर आपण सगळेच आपले हरवलेले बालपण शोधत असतो. चिवचिव बाजाराच्या या माझ्या आठवणी सुद्धा त्याच प्रयत्नाचा एक भाग. " निज शैशवास जपण्याचा" माझा हा प्रयत्न अनेकांना आवडला याचा आनंद वाटतो.
@रैना, आजकाल त्याला मिडलक्लास मेण्टॅलिटी म्हणून हिणवले जाते पण काटकसर / बचत विनाकारण काहीही वाया न जाउ देणे हे तेव्हा जीवनशैलीचा भागच होते. मी जरी कोकणस्थ नसलो तरी कोकणस्थांच्या कंजुषपणावरचे विनोद मला कधी कधी फार अस्वस्थ करतात ते करूण विनोद त्याकाळाचे प्रतिनिधित्व करतात असे वाटते. ती जीवनशैली आज ही ज्यांनी जपली ते आधीच्या पिढीत अमेरिकेत गेलेले लोक मंदीच्या काळातही टिकाव धरून राहु शकले असे मी वाचले होते.

@दाद, तुम्ही म्हटले तसे जरासे वाटते खरे. पण काय करू तो आठवणींचा भर ओसरला अन मग लिहायला काही सुचतच नव्हते.

बाकी तो चिवचिव बाजार धमालच असायचा. छोटी मुले हिरीरीने आरडाओरडा करीत पुस्तके विकायची, एरवी आरडाओरडा केला तर कोणी तरी मोठे रागवणार, इथे त्याला फुल्ल स्कोप!! त्यामुळे चेहरे कसे आनंदाने फुललेले असत. चिनूक्स ने म्हटले ते खरे असेल तर आता चिवचिव बाजार हरवल्यातच जमा झाला म्हणायचा.

ह्या बाजाराबद्दल पहिल्यांदाच ऐकतेय. अश्विनी के म्हणतात त्याप्रमाणे शाळेची पुस्तकं दुकानदाराला आणि इंजिनियरिंगची पुस्तकं खालच्या इयरमधल्या एखाद्या मुलीला दिली आहेत. हेच काय, जीमॅटची पुस्तकं, नोटस सुध्दा कुठल्याश्या साईटवर अ‍ॅड देऊन विकली. एमबीएला होते तेव्हा एक पुस्तक एका मैत्रिणीने तिच्या घराजवळच्या बुक डेपोमधून तिच्याबरोबर आणलं, स्वतःच्या कॉपीवर शिक्का मारून आणला आणि माझी तशीच आणली म्हणून नाराज झाले होते मी. मग कित्येक दिवस ते पुस्तक घरी पडून होतं. मागच्या वर्षी शेवटी रद्दीत दिलं. छान लेख आहे!

एकदम मस्त लिहीलेय
चिवचिव बाजार मोठ्या पोष्टामागे हलविला आहे
त्याला अपंगा बुक स्टॉल ही संबोधतात
मी ही या बाजारात स्कॉलशीपची गाईड आणायला गेलो तर १ गाईडसाठी ३ चकरा माराव्या लागल्या आधीच्या २ ही गाईड मधील पाने गहाळ होती

हा येथे मात्र कोणतेही पुस्तक हमखास मिळते

मस्त!

आमच्याकडे शाळेतल्याच गरजू मुलांसाठी पुस्तकमेळा करायची पद्धत होती.. म्हणजे आम्ही शाळेत नेउन द्यायची..आणि काही शिक्षक ती पुस्तके परत बाईंड करून काही गरीब मुलांना द्यायचे.
मूळातच आमच्या घरी पुस्तकावर "गिरबटलेलं" खपत नसे. माझी पुस्तकं वैद्यसरांच्या लेकाची होती.. त्यांच्याकडेही पुस्तकांवर लिहिणे वै. प्रकार नव्हता.. त्यामुळे चांगल्या अवस्थेतली पुस्तके होती सगळी. Happy

आता मेळा करतात की नाही माहीत नाही.

कित्ती ग्वाड आहे लेख.. खूप आवडला..
अजून ही भरतो का हा बाजार??
चिमण्यांपेक्षा मुलांच्या निरागस चिवचिवाटामुळेच हे नाव पडले असावे.. खूप क्यूट Happy

पहिल्यांदाच ऐकलं मीपण या बाजाराबद्दल. मस्तय हे! Happy

रच्याकने, माझ्या वेळी अभ्यासक्रम दरवर्षी बदलत होता, त्यामुळे मला नवीच पुस्तकं घ्यावी लागत. पण मग माझी पुस्तकं मी माझ्या शेजारच्या एका वर्षाने लहान असलेल्या मैत्रिणीला देई. आणि पुस्तकाला एखाद्या तान्हुल्यासारखं जपायची सवय असल्यामुळे दुमडलेले कोपरे, गिरबटलेली पानं, फाटलेली कव्हर्स असा प्रकार नसे. वाचताना मधेच उठावं लागलं तर खूण न घालता तसंच पालथं टाकलेलं पुस्तक मला अजूनही बघवत नाही. "वाचलेलं सगळं पालथं!" असं ऐकावं लागे मग.

Pages