ओळख, नाव, वागणूक इत्यादी आणि मी.

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

हे ही जुनंच लिहिलेलं. अनेकांना लक्षातही असेल. फरक तसा काहीच नाहीये अजूनही पण प्रसंगांचा त्रास स्वत:ला करून घेण्यापेक्षा समोरच्याची समजण्याची कुवत नाही हे मी शिकलेय थोडंफार इतकंच.. Happy
--------------------------------------------------------------------------------------------
"लग्न झाल्यावरही मी नाव बदलणार नाही. आणि ते तुझ्या आइवडिलांना पटवायची जबाबदारी तुझी."
असं स्वच्छपणे त्याला सांगितलं आणि मी निवांत झाले. त्यालाही या गोष्टिचं फारसं काही वाटलं नाही. बायकोने आपलं नाव लावलंच पाहिजे इत्यादी विचार त्याच्या आसपास फिरत नसत सुदैवाने.

लग्नाआधी नी नंतर काही खास शेलक्या प्रतिक्रिया आल्या होत्या मात्र यावर.
"तू काय स्वतःला जास्त शहाणी समजतेस?" इति माझेच एक काका
"आमचं आडनाव लावत नाहीस तू?" (हं विचित्रच दिसतेय ही!) हे मनात म्हणणार्‍या त्याच्या एक काकू.
"काय म्हणताय मिसेस अमुक अमुक!" हे मुद्दामून म्हणणारा एक मित्र
इतपत होणारंच हे गृहितच होतं त्यामुळे त्या प्रतिक्रियांवर आम्ही दोघांनीही हसून घेतलं.

दोघंही एका क्षेत्रात काम करत होतो पण वेगवेगळ्या विभागात. आपापल्या बळावर एका स्थानापर्यंत आलो होतो. तो captain of the ship आणि मी एक department head. आपापल्या वर्तुळात आमच्या कामाला महत्व होतं. मग झाली गंमत. आमचं एक प्रोजेक्ट खूप म्हणजे खूपच मोठं झालं आणि त्याबरोबर त्याचं नावही. आता त्याच्याकडे खूप लोक आदराने पहायला लागले. त्याच्याशी आपली ओळख आहे हे कॉलरी ताठ करत दाखवू लागले.

त्याच प्रोजेक्टमधले एकजण एकदिवस मला येऊन म्हणू लागले की
"आता तरी निदान सरांसाठी तरी नाव बदला!"
म्हणजे मला आजपर्यंत याच्या नावाची लाज वाटत होती नी आता लाज वाटायची गरज नाही म्हणून मी आता नाव बदललं पाहिजे?
माझं नाव ते माझं मी ठरवीन ना तुमचा काय संबंध?
मला आणि माझ्या नवर्‍याला, घरच्यांना काही प्रॉब्लेम नाहीये तर तुम्ही कोण टिकोजीराव मला नाव बदलायला सांगणारे?
असे खूप सारे व्हि.ओ. माझ्या डोक्यात. आणि मी वळून दुसर्‍या व्यक्तीशी बोलू लागले.

हळूहळू लक्षात येऊ लागलं की माझं नाव बदललेलं नसणं हेच नाही तर मला माझं माझं काही अस्तित्व असणं हेच लोकांना खुपतंय.

माझ्या स्वतःच्या नाटकासंबंधात माझी मुलाखत घेतली गेली आणि मुलाखतीत छापलं काय गेलं की माझा नवरा मोठा दिग्दर्शक असला तरी मला किती सपोर्ट करतो. माझे सासूसासरे कसे मला साथ देतात इत्यादी. ते खरं आहे हो पण त्याच्या मुलाखतीत नाही कधी विचारत बायकोचं योगदान वगैरे.

एकदा एका छोट्या गावात गेलो होतो. कुठल्यातरी विषयावर गप्पा चालू होत्या. एका मुद्द्यावर माझं आणि नवर्‍याचं म्हणणं वेगळं होतं. आम्ही एकमेकांचा मुद्दा समजून घेत होतो पण बरोबरच्या एका काकांना मात्र त्याचा त्रास व्हायला लागला. आम्ही दोघांनी नंतर बोलू म्हणून विषय थांबवला तरी ते काका नंतर मला खिजगणतीतही धरेनात. माझ्याशी बोलेहीनात. 'बिचारा एवढा मोठा दिग्दर्शक आणि त्याची बायको ही अशी!' असं त्यांच्या तोंडावर लिहिलेलं मात्र दिसू लागलं. चिडचिड झालीच आणि परिणामी मी जेवायचंच टाळलं.

हे असं अनेकदा होतं. मी प्रवासात जीन्स वापरते यापासून माझा माझा वेगळा मोबाइल आहे ज्याच्यावर मी माझ्या माझ्या कामाच्या लोकांशी बोलत असते ते मी माझं मत मांडते, कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरादाखल नवर्‍याकडे न पहाता जे मला पटतं ते उत्तर देते यापर्यंत कुठलंही कारण माझ्या नवर्‍याला बिचारा ठरवण्यासाठी पुरेसं असतं. असं होऊ नये म्हणून मग मला आदर्श पतिव्रता पत्नी सारखं वागावं लागतं. सिंदूर, बांगड्या आणि साडीचीच कमी असते. स्वतःचं मत/ स्वतःचं आयुष्य नसलेली, नवर्‍याच्या पावलात स्वर्ग बिर्ग शोधणारी कंटाळवाणी बायको मिळाली असती तर माझा नवरा या लोकांना बिचारा वाटला नसता हे माझ्यासाठी आणि माझ्या नवर्‍यासाठीही अचाट आणि अतर्क्य असतं.

महाजालावर देखील असे महाभाग भेटतात अधूनमधून की ज्यांना माझं वेगळं अस्तित्व सहन होत नाही. मग सगळा सारासार विचार बाजूला ठेवून 'यशस्वी माणसाशी लग्न करून स्वतःचं नाव मोठं करू पहाणारी' अशी विशेषणं लावली जातात. यावर हसावं की रडावं तेच कळत नाही. अश्यांची नी त्यांच्या मध्ययुगीन मानसिकतेची कीव मात्र येतेच येते.

इतर ठिकाणीच कशाला आमच्या क्षेत्रातल्या अनेकांना, अगदी जे मला आधीपासून ओळखत होते त्यांना सुद्धा माझी ओळख करून देताना वेशसंकल्पक(costume designer) पेक्षा अमुकतमुक ची बायको हे जास्त सोयीचं वाटतं. एक वेशसंकल्पक म्हणून मी जोवर माहित असते अनेकांना तोवरचं काहींचं वागणं आणि नवर्‍याची ओळख कळल्यावरचं वागणं यात जमिनअस्मानाचा फरक असतो.

अश्या वेळांना नाव आडनाव न बदलण्याचा निर्णय किती योग्य होता ते अजून अजून पटत जातं. निदान नवर्‍याचा संदर्भ कळेपर्यंत तरी लोक माझ्याशी माझ्या माझ्यापुरते वागतात.

आणि मग कधीतरी एखादं असं प्रोजेक्ट होतं जिथे सगळ्यांना माझ्या नवर्‍याचा संदर्भ माहित असतो. त्याच्याबद्दल आदर पण असतो. त्याचवेळेला माझ्या कामाबद्दलही आदर असतो. माझ्याशी वागणं हे माझ्या माझ्यापुरतं असतं. मी तिथे नीरजा असते. एक व्यावसायिक असते, नंतर एक मैत्रिण होते. मला नीरजाप्रमाणेच वागता येतं. कुठलाच आविर्भाव मिरवण्याची गरज नसते. अश्या ठिकाणी काम केल्याची मजा वेगळीच असते. पुढचे अनेक कंटाळवाणे प्रसंग पचवण्यासाठी इथे ताकद मिळते.

आम्ही दोघं दोन वेगळी माणसं आहोत ज्यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आणि तरीही अनेक बाबतीत मतभेदही आहेत पण या मतभेदांमुळे आमच्या नात्यात काहीच फरक पडत नाही. आम्ही एकमेकांमुळे वाढत असतो. दुर्दैवाने हे समजण्याची कुवत किंवा मानसिकता ५% च लोकांकडे असते. बाकी सगळे मध्ययुगातच अडकलेले

इरावतीबाईंनी (इरावती कर्वे) पन्नासेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखातल्याप्रमाणे अजूनही नात्यातल्या पुरूषमंडळींच्या विशेषतः नवर्‍याच्या संदर्भानेच केवळ बाईकडे बघण्याची, तिला ओळखण्याची सवय आणि गरज सुटत नाही. इरावतीबाईंच्यासारखी मोठी व्यक्तीही यातून गेलीये मग माझी काय कथा असं मनाशी म्हणत मी अनेक ठिकाणी खोटी खोटी वागत जाते.

- नी

प्रकार: 
शब्दखुणा: 

सगळ्या अडचणीच्या प्रश्नांना 'आपल्या संस्कृतीत हे बसत नाही' हे ठरलेले उत्तर मिळते>>>>>>>

जे मला करता येत नाही असे काम मिळाले तर " मला वेळ नाही " हे उत्तर देण्यासारखे आहे.......

जी गोष्ट मुळातच नाही बसत.........तिला मारुन मुटकुन बसवण्याचा अट्टाहस का...........????????

नुसतीच बायकांची आडनावे बदलून स्त्रीसत्ताक पद्धती कशी काय येईल? त्यासाठी इतरही बदल हवेत, त्याला स्त्रीयांची तयारी असते का?

संदर्भ : 'काटकोन त्रिकोण' मराठी नाटकात खालील अर्थाचा एक संवाद आहे..

'' बायका आजकाल काहीही करु शकतात, मातृसत्ताक पद्धती आणणं त्याना अवघड नाही , मग त्या आणत का नाहीत?

कारण तसे झाले तर, पुरुष बाईच्या घरी येणार, त्याला सांभाळायची जबाबदारी बाईवर येणार...

आणि जावई -सासू/सासरा यात भाम्डणे झाली तर ती बायकोच्या घरात होणार. रोज बायकोच्या घराचा आखाडा होणार.

त्यापेक्षा पुरुषसत्ताच राहिली तर काय वाइट? बायका नक्कीच हे समजण्याइतक्या हुशार आहेत.'' Proud

खरं तर, हे सगळे नाटकच स्त्री पुरुष दोघानाही विचार करायला लावणारे आहे, प्रत्येकाने बघितले पाहिजे.

स्वता:ची ओळख असावी आणि ती कायमच ठेवावी...........फक्त ती कायम ठेवताना दुसर्‍याची ओळख पुसली जाणार नाही.........याची काळजी घेतलीत तर.......मिळणारा..तो आनंद आणि आदर.....याची कशातही मोजदाद करता येणार नाही.................... >>>>
सुमीत,
हे वाक्य लाखमोलाचं आहे. फक्त हे जर तुम्हाला खरंच पटत असेल तर लक्षात येइल की जबाबदारी पुरुशांची आहे. कारण लग्नानंतर स्त्रीचे आडनाव बदलल्याने स्त्रीची ओळख पुसली जाते. पुरुषानी "परंपरे"च्या नावाखाली बायकोला आडनाव बदलण्याची सक्ती केली नाही तर बायकोची "ओळख पुसली जाणार नाही.........याची काळजी घेतलीत तर.......मिळणारा..तो आनंद आणि आदर.....याची कशातही मोजदाद करता येणार नाही.................... "
आलं का लक्षात? Happy

बाकी भरतनी बरेच्से माझ्या मनातलेच लिहिले आहे.

परंपरा आणि संस्कॄती सतत बदलत असतात. तेव्हा कुठली परंपरा आणि रूढी ग्राह्य धरायची? आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर -

महाराष्ट्रातील आद्य राजकुल सातवाहन. त्यांची सगळ्यात प्रसिद्ध राणी नागणिका/नागनिका, ही सिरीसातकर्णी ची पत्नी. नाणेघाटात असलेल्या तिच्या शिलालेखात ती आधी महारठि अंगिय कुलातील कन्या असल्याचे आणि मग पराक्रमी सिरीसातकर्णीची बायको असल्याचे सांगते. हिने नवर्‍याबरोबरचे संयुक्त चांदीचे नाणे पाडले होते. त्यात मध्यभागी ठसठशीतपणे तिचे नाव व बाजूला गोलाकार नवर्‍याचे नाव लिहिलेले दिसते.
शिवाय नंतरचे सातवाहन राजे स्वतःच्या आईचे नाव लावायचे - उदा: गौतमीपुत्र सातकर्णी, वासिष्ठीपुत्र पुळुमावि, इ, इ.

बिच्चारा सिरीसातकर्णी!!! Proud

त्या मुळे ज्यांच्या कडे जाणार आहे त्यांची मर्जी विश्वास संपादन करण्यासाठी >>>> Lol
सगळी पोस्टच हहगलो आहे, पण काही शब्द अन वाक्ये खूपच मजा आणत आहेत.

वरदा, छान माहिती.

'क्ष' घरामधे भात आधी आणि मग पोळी खाल्ली जाते.
'य' घरात भात आवडतच नाही
'ज्ञ' घरात भातच खातात.

आता या सगळ्यांनी एकमेकांच्या घरात घुसून आपल्या आपल्या सवयींना संस्कृतीचे पाणी लावून इतरांच्या सवयी कश्या चुकीच्या आहेत याबद्दल बडबड करत बसायची.
यामधे जो आणि जेवढा गाढवपणा आहे ना तोच गाढवपणा दुसर्‍या एका व्यक्तीच्या एका खाजगी निर्णयात नाक खूपसून त्या व्यक्तीला चुकीचे ठरवण्यात आहे.
मुद्दा दुसर्‍यांचे वैयक्तिक निर्णय आपल्याला न पटणारे असले तरी ते दुसर्‍याचे निर्णय आहेत आपला संबंध नाही, आपल्याला पटेल असाच निर्णय प्रत्येकाने घ्यावा असा आग्रह ठेवणं चुकीचं आहे, दुसर्‍याच्या खाजगी निर्णयावर टिकाटिप्पणी करायचा अधिकार आपला नाही (कितीही वय असलं तरी!) हे इतकंच लक्षात ठेवण्याचा आहे.

बाकी संस्कृतीबद्दलच्या विनोदी वक्तव्यांनी खूपच करमणूक केली. एकुणात प्रतिक्रिया विनोदी होत चालल्यात खरं.

>>दुसर्‍या एका व्यक्तीच्या एका खाजगी निर्णयात नाक खूपसून त्या व्यक्तीला चुकीचे ठरवण्यात आहे.
आले आले, चर्चेचे सार आले !

लेख छान. बहुतेक गोष्टी पटल्या. प्रतिक्रिया मात्र काही आवडल्या, तर काही मनोरंजक वाटल्या.

कधी कधी आंतरजातीय/धर्मीय विवाह करणार्‍यांना आपला तसा विवाह झाला आहे हे चार चौघात दाखवायचे नसते कारण आडनाव बदलले की बदलेली जात्/धर्म कळते म्हणूनही बर्‍याचजणी हा मार्ग अवलंबताना दिसतात!!
---- Angry हे अत्यंत चुकीचे विधान आहे. माझ्या माहितीत अनेक जोडपी आहेत, ज्यांच्या नावे न बदलण्याचा आणि जातीचा काहीच संबंध नाही आहे.

काहींना वाटते आपले स्वातंत्र्य अस्तित्व ठेवावे म्हणुन. तो त्यांचा किमान हक्क आहे, ते त्यांचे व्यक्तीगत स्वातंत्र्य आहे. तेव्हढे स्वातंत्र्य देण्याचे औंदार्य दाखवा राव...

नीधप...जर तु येव्हड्या खंबीरपणे हा निर्णय घेतला आहेस तर त्याला होणार्‍या विरोधालापण खंबीरपणे उत्तर दिले पाहिजे..... जर तुझ्या निर्णयाचा तु आणि तुझ्या नवर्‍याला काही प्रॉबलेम नाही तर मग झाल्....बाकी कोण काय म्हनत याला काहीच महत्व नाही पण जर तु ही गोष्ट माबो वर घेउन आलीस तर त्यावर सगळेजण आपापले मत देणारच ....
दर वेळेस काय बायकांनाच बिचार करता...सगळी कडे नवर्‍यामुळे त्याची बायको कशी बिचारी आहे हेच बोलल जात्...तु जरा हटके आहेस म्हनुन तुझा नवरा बिचारा होतो.....येकाच दगडात बरेच पक्षी मारले की......जुन्या परंपरा ज्या तुला मान्य नाही त्या नाही पाळल्या....नवर्‍याला बिचारा केला....
माझ्यामुळे माझ्या बायकोला कोणी बिचार म्हनु नये किंवा तिच्यामुळे मला.....

नी, वरदा, भरत, सॅम अनुमोदन..!

मी स्वतः लग्नानंतर नाव बदलले आहे.. आणि नुसते आडनाव नाही तर पहिले नाव सुद्धा.. आणि ते पण माझ्या स्वतःच्या आवडीने! त्यामागे माझी गंमतीशीर वैयक्तिक कारणे आहेत.. माझ्या एकंदर स्वभावाला पहाता, पूर्वी ओळखणारे उलट विचारतात, "अरे, तू पण? अपेक्षित नव्हतं" Proud

मला काही प्रतिक्रीया पहाता पेशवाची "वावर" आठवली , ह्याचा नीच्या लेखाशी काही संबंध नाही. नी, तुला अयोग्य वाटत असेल तर सांग, मी पोस्ट संपादते -

असे पुरुष,
पहिल्यांदा मेहेंदीने सजलेले हात आणतात तेव्हा
बराच काळ ठेवतात त्यांना सजवलेल्या मखरातून
असूयेने बघणाऱ्या नजरांचा काउंटर जितका जास्त
तितकी असते त्यांची अभिमानाची लिंग-कॉलर ताठ

असे पुरुष,
शिकवलेले असते त्यांना लहानपणापासून
पाहिलेले असते त्यांनी,
काका, मामा आणि बापाला सफाईदारपणे
आणलेले हात वापरताना...
साला ते चुकत नाहीत
शेंडीला गाठ मारून घोकतात सगळ्या ऋचा
घेतात कानमंत्र बापच्या मांडीवर

असे पुरुष,
निवडतात हात परंपरेने घडवलेले
लॉस्ट अत्मभान मेथड; परफेक्टेड ओव्हर सेंचुरीज
चकाचक घर, रुचकर स्वैपाक, मैथुनी शृंगार
साला सगळे चोख
रगड रगड रगडतात आणलेले हात
आणि नव्याचे नऊ दिवस संपल्यावर
उभे करतात दारामागच्या कोपऱ्यात
केरसुणीसारखे.

असे पुरुष,
कोरतात कोपर्‍या पर्यंतचे हात
मेल्यानंतर सतीच्या दगडावर
कधी एक, कधी दोन, कधी अधिक
जेव्हढे जास्त हात तेव्हढे जास्त कर्तबगार

काल विंचरताना आत्म्यातील अडगळ
जाणवला अशा पुरुषाचा वावर...
माझ्या व्यक्त होण्यात दिसतात अचानक कधी
त्याच्या अभद्र सावल्या...

मी कँसर रोखण्याचे उपाय वाचू लागतो...

वडिलांचे नाव/ आडनाव बरेच जण लावतात. विशेषतः सरकारी नोकरी लग्नाआधी लावलेली असेल, लग्नानंतर बदली झाली, तर नाव ब्दलणे, सर्विस बुकला चेंज करणे हे सगळे उपद्व्याप करु नयेत म्हनून. नंतर कधीतरी सवडीने बदलतात किंवा तसेचही ठेवतात. नाव कोणतेही ठेवा, पण नांदा सौख्यभरे हे महत्वाचे.

जामोप्या.. अजुन थोडीशी भर.. एखादा रेजिस्ट्रेशन आवश्यक असलेला पेशा असेल तरी मुली लग्नापूर्वीचे नाव पुढे वापरतात, जसे वकील, वास्तुविशारद किंवा डॉक्टर.
पुन्हा वेगळे रजिस्ट्रेशन करायला जाम वात येत असेल बहुदा.

.

इथे जे काही चालले आहे ते अतिशय उत्तम आहे. इथेही आणि झ्क्की यांच्या बाफवर पण...मागे सानीच्या एका बाफवर जुन्या लोकांनी येऊन जुनी मायबोली कित्ती बाई छान होती, सगळे किती गुण्यागोविंद्याने रहात होते आणि आता नविन लोक काहीही माहीती न घेता लगेच वर्गवारी कशी करतात म्हणे असा गळा काढला होता.
तिथेही काही आयडींनी दारावरच्या भिकार्याला वापरतात तशी भाषा वापरली होती. पण वाटले तो एखादा अपवाद असेल. पण इथे येऊन पहातो तर गेल्या अनेक वर्षांपासून हे सर्व प्रकार चालले आहेत तर. यांनी त्यांच्या रंगबिरंगीवर जाऊन खवचट पोस्ट टाकायच्या, त्यांनी ऐकून घ्यायचे, सहन होईना झाल्यावर त्याचे प्रत्युत्तर द्यायचे आदी रम्य लीला जुन्या लोकांच्या अगदी खास दिसता आहेत. काही हरकत नाही बापांनो, पण मग किमान नविन लोकांना रितभात तरी शिकवायला जाऊ नका...
लोका सांगे ब्रम्हज्ञान....अगदी अगदी

करता काय तुम्ही सगळे लोक बारा बारा वर्षे???? हे असले प्रकार???? >> बेफी, कॉलेज संपल्यावर तुम्ही कधी कॉलेजच्य कट्ट्यावर गेला आहात का? तुम्हाला तिथे काही लोक कॉलेज संपुन तप सरल तरी नित्य नियमाने येणारे लोक भेटतिल, "साला आपल्यावेळी असं काय नव्हत" हे वाक्य ऐकू येईल. का?
घरा पासुन, देशा पसुन, आपल्या संस्कृती पासुन दुर रहाणार्‍या, आपल्या मातृभाषेत गप्पा माराव्या, मत मांडावित, मित्र करावेत म्हणुन बरेच जण मायबोलीवर येतात. त्यांची मायबोलीशी फार भावनिक सलगी आहे, मायबोली हा त्यांच्या जिवनाचा भाग आहे.
काही लोक फक्त त्यांच्या कलागुणांना लोकां पर्यंत पोहचवण्याच माध्यम म्हणुन मायबोलीवर येतात, कही मायबोली शिवाय इतर संकेत स्थळावरही जातात पण जे भावनिक रित्या इथे गुंतले आहेत ते मायबोलीचा वापर कोणताही स्वार्थ साधण्यासाठी करत नाहीत.
मायबोली न संपणारा कॉलेजचा कट्टा आहे हा, न संपणारी रंगलेली मैफील, जिव्हाळ्याच्या गप्पा, दोन मैत्रीणीं मधली कुजबुज, मित्राच्या खाद्यावर हात ठेवुन अखंड चाललेली बाष्कळ बडबड , किंवा मित्रांनी ग्रूप मध्ये एकाला टारगेट करुन केलीली टींगल, चार मित्रांना ऐकवलेली पहीली कविता, मित्राच्या कवितेवर आपुलकीने दिलेली दाद, मोठं होउन दीलेला सल्ला, तर लहान होउन पुरवुन घेतलेले लाड, कुठे हक्काच भांडण, दोन भावडां मधील "हे नेहमीच आहे हा ह्याच" किवां "हीने माझी पहीली कळ काढली" असा कधी टोकाचा तर कधी वरवरचा पण आपुलकीचा वाद आहे. आजी सासू नात सुनेच्या पाठीवर हात फिरवुन तिला सांगतेच ना "आमच्या वेळी असं काही नव्हत, आणि तुम्ही आजकालच्या पोरी..." तर "तुझी सासू देखिल अशीच होती आधी" म्हणत केलेली पाठराखण पण आहे
किती आहे आणि काय आहे, हे सांगण अवघड आहे.
प्रत्येक विभाग उघडा प्रत्येक पोस्ट वाचा एक नातं सापडेल. गेली बारा वर्ष ही सगळी नाती जगली आहेत आणि जपली आहेत ह्यांनी. ह्या बाफ वरच्या १७५ प्रतिसांदाना आणि इतर काही हजारो प्रतिसाद असतील वादाचे, पण इतर लाखो नात्यातिल संवादांच काय?

"मला वाटते 'माबो' हे काही लोकांचे अक्षरशः आयुष्य झालेले आहे. लाईफ इज टू विन अ चाइल्डिश बॅटल ऑन माबो, फॉर सम, अ‍ॅज इट सीम्स टू मी! " मे बी अ चाइल्डिश बॅटल, बट ईट्स फुल्ल ऑफ लाइफ अँड लाईफ एस्क्पिरीयंसेस.. 'माबो' हे काही लोकांचे अक्षरशः आयुष्य झालेले आहे>> वेरी ट्रू विदाउट एनी रेग्रेट्स... Happy

माझ्या जुन्या बॉसने लग्न केले तेव्हा बायकोचे आडनाव आणि स्वतःचे आडनाव एकत्र करुन दोघांसाठी एक आडनाव बनवले, जे दोघेही आता सगळीकडे लावतात. उदा. स्मिथ्-रोझेट.
बाकी लोकांनाच या गोष्टीची जास्त उठाठेव असते.

नी, दुर्लक्ष करणे हाच उपाय.

काही प्रतिसाद पाहुन एक जोक आठवला... एकदा एक माणुस विहिरीत बुडत असलेल्या मुलाला जीवावर उदार होऊन वाचवतो, वर आणल्यावर त्या मुलाची आई विचारते, याची टोपी कुठाय?!! लेखाचा मुद्दा काये.. प्रतिक्रिया काय... असे कुचकट प्रतिसाद देणारे प्रत्यक्ष आयुष्यातही कुचकट असतात का तिथलं frustration इथे काढतात? जाऊदे...
नाव न बदलण्याचं अजून एक कारण... इथे (फ्रान्समध्ये) सगळ्या कागदपत्रांवर जन्माच्या वेळचे नाव-आडनावच असतं. लग्नानंतर आडनाव बदललं असेल तर तेही छोट्या अक्षरात लिहिलं जातं. पण त्याला एवढं महत्व नसतं. त्यामुळे इथे जन्मलेला भारतीय मुलाच्या जन्म-दाखल्यावर आईचं लग्नाआधीच आडनाव येतं!! अजून गम्मत म्हणजे इथे आपल्याप्रमाणे वडीलांच/नवऱ्याचं नाव middle name म्हणून वापरत नसल्याने first name म्हणून दोन नावं लिहिली जातात. त्यामुळेही बराच गोंधळ होतो.
एक प्रश्न: लग्नानंतर नाव बदललं नाही तर middle name काय असतं? वडलांचं नाव की नवऱ्याचं?

Pages